नाते जुळले मनाशी मनाचे

नाते जुळले मनाशी मनाचे

सुरज चौबळची ती नेहमीची लोकल होती. तो एमबीए केल्यानंतर हॉंगकॉंग बँकेत कामाला लागला आणि महिन्याभरात त्याची अनेकांशी दोस्ती जमली. तीन साडेतीन वर्षानंतरही त्यांचा ग्रुप टिकून होता. प्रवासात अनेक चेहरे दिसतात. काही दोन दिवसात स्मृतीतून निघूनही जातात. गेले दोन तीन आठवडे जवळजवळ रोज ती त्याला गोरेगाव -चर्चगेट फास्ट ला दिसत होती. पाहताच क्षणी सुंदर वाटली. पण थोडी गर्विष्ठ सुद्धा. गेल्या आठ पंधरा दिवसात सुरजने अनेकदा तिला स्माईल दिले पण मॅडमचा चेहरा मात्र अजिबात हलला नाही. रोजच एकमेकांना दिसतो तर हॅलो नाही म्हटले तरी स्माईल द्यायला काय हरकत असावी पण नाही. अर्थात सुरजही हट्टी होता. तो काही तिच्यावरची नजर काढायला तयार नव्हता.

एक दिवस तो माणिकांचन योग जुळून आला. ती सुरजला पाहून चक्क हसली, खरंच हसली की तस सुरजला वाटल तेच कळेना,तिच ते स्माईल घेऊन सुरजच्या मनात गोड गुदगुल्या झाल्या. ती त्याच्याकडे न पाहताच, काही प्रतिक्रिया न देता डब्याच्या दुसऱ्या दरवाजाकडे निघून गेली. तिच्या या विपरीत वागण्याचा काय अर्थ असावा ते त्याला कळेना. सकाळी १०.२० ची गोरेगाव चर्चगेट गाडीने तो गेले चार वर्ष ग्रुपने प्रवास करत होता. ती गेले पंधरा दिवस मिडल फस्टक्लास जवळ गाडी येण्याच्या आधी दहा मिनीटे येत होती, तिच्या आगेमागे तो येत असल्यानेच हे त्याला कळले. हे अस हसण्याचं नाटक करून नंतर काहीच रिस्पॉन्स न दिल्याने तो अपसेट झाला. नेहमी प्रमाणे डब्यात रमीचा डाव रंगला होता, पत्ते तर त्याच्या हातात होते पण मन कुठतरी दूर भरकटलं होतं. हातात चांगले पत्ते असूनही त्याला दोन वेळा डावाने गुंगारा दिला दोन pure सिक्वेन्स, एक ट्रायो असूनही तो गेम त्याचा बिघडला. नंद्या, त्याच्याकडे तिरक्या मानेने पाहत म्हणाला, “यार सुरज काय गेम खेळतोस की गोट्या? हातात पत्ते असूनही तुला रमी दाखवता येत नाही, काय म्हणावं तुला?”

सुरजने पत्ते शक्य तितके जवळ धरले, नंद्या माझा गेम मी खेळतोय तूला का पंचायत्या, तुला काय पत्ते लागलेत मी पाहिलं का? त्यांची आता शाब्दिक मारामारी सुरू होणार हे पाहून पाटकर हसला, नंद्या साला सुरजचं सुरज बघेल, त्याच्या गेममध्ये का कडमडतोस? असं म्हणत पाटकरने गेम दाखवला. ते पाहून सुरजने पॉईंट काउन्ट केले. त्याच्या नशिबाने फारसे पॉईंट जात नव्हतें पण हातात पत्ते असूनही लक्ष नसल्याने तीन वेळा हातातला डाव गेला. कोणाचं लक्ष नाही पाहून त्यांनी लेडीज कंपार्टमेंट कडे वळून पाहिलं. ती नोव्हेल वाचण्यात गर्क होती, इथे आग लावून ती शांतपणे गाण ऐकत होती. गंमतच होती इथ फक्त गेमवर लक्ष देणं सुरजला जमत नव्हतं.affiliate link

सुरजला सलग तीन डाव हरल्यावर शहाणपण न आलं तर नवल. पुढचे पाच डाव तो सलग जिंकला तो ही पहिल्या दोन राऊंड मध्ये, अगदी, भरपूर पॉईंट कमावत.ते पाहून पाटकर त्याच्या पाठीवर हात मारत म्हणाला, “सूरज, काय मॅजिक आहे यार सलग पाच डाव,डबल हँट्रिक करण्याचा डाव आहे की काय?” तिच्या कानात इअर फोन असल्याने तिला काही ऐकू येण शक्य नव्हतं. अर्थात इअर फोन लावला तरी ती गाणं ऐकत असेल कि तस भासवते हे गोलमालच होत.

त्यांची चेष्टा मस्करी सुरु असतानाच, कुणीतरी चर्निरोड आल्याची बोंब मारली. “पॅक अप” शहा ओरडला. पटापट सर्वांनी बॅग उचलली आणि खाली उतरले.सुरज उठून उभा राहिला त्याच लक्ष लेडीज कंपार्टमेंटकडे गेलं. ती अजूनही वाचत होती. कानाला इअर फोन होतेच. चर्चगेट आलं तस तिने पुस्तक मार्कर ठेऊन बंद केलं आणि बॅगेत कोंबलं. लोकल पूर्ण थांबण्यापूर्वीच ती उतरली आणि चालू लागली तो संथ पावलं टाकत तिच्या मागोमाग चालू लागला. Erros थिएटर जवळ बाहेर पडताच ती टॅक्सी करून निघून गेली. तिने पाठी वळून पाहण्याची तसदी सुध्दा घेतली नाही. हे असं बरेच दिवस चालू होतं. ती काही त्याला भाव देत नव्हती.

रोज न चुकता तो गाडी येण्याच्या किमान पाच मिनिटे अगोदर येऊन मिडल फर्स्ट क्लासकडे उभा राहत होता. तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करत होता. ती पाहूनही न पहिल्यासारखं करून त्याला जास्तच अपसेट करत होती. साडेपाच फूट उंच, गौर वर्णी, धारदार नाक,बारीक भुवया, नाजूक हनुवटी, दिसायला ती सुदंर होतीच. कधी पंजाबी, कधी जीन्स आणि टॉप, तर कधी पॅन्ट शर्ट, कोणत्याही कपड्यात ती तितकीच मोहक दिसायची. कपाळावर नाजूक रंगीत टिकली, कानात कधी रिंग, तर कधी डुल तर कधी मोती. मानेपर्यंत कापलेले केस, तीच कपड्यांचं कलर कॉम्बिनेशन परफेक्ट असायचं. कोणालाही आवडावी अशीच ती होती त्याच्या स्वप्नातील परी. तिला तो आवडत होता की नव्हता ते अजून तरी ठरायच होत.

अजून तरी हे one side Love affairs मित्रांच्या लक्षात आलं नव्हतं किंवा त्याची गाडी कधी रुळावरून धावते याची वाट ते पहात असावेत. तिच लक्ष वेधून घेता यावं म्हणून त्यांने नोव्हेल ट्राय करायच ठरवलं. फडके जवळ नेहमीच चांगली नोव्हेल असतात हे त्यांनी पाहिलं होत म्हणून त्यांने फडकेला request केली. एक दिवस Erros च्या गल्लीत असणाऱ्या स्टॉलवर येतांना ते यास्मीन परचेस पॉईंट वर वळले, यास्मिनने त्यांना आवडतील अशी बरीच पुस्तके त्यांना दाखवली. “साहेब काय वाचणे प्रिफर करता?” .तो थोडा गोंधळला. समोर बरीच इंग्रजी पुस्तकं पडली होती. फडके म्हणाला, “तुला science Fiction आवडतील.” म्हणून त्याने मार्टिन क्रूझच Gorky Park, अँथनी होर्विट्झ च A Line to Kill, रिचर्ड ओसमानच A Man Who died Twice अशी तीन पुस्तके घे, वाचून झाल्यावर 30% लेस करून ते पुस्तक परतही घेतात. ही योजना सुरजला आवडली. पॉकेट साइज पुस्तके असूनही डिस्काउंट रेटने बाराशे लागले, तिथेच दोघांनी एक एक कोल्ड कॉफी मारली.

दुसऱ्या दिवशी ती येण्यापूर्वी तो प्लॅटफॉर्मवर पोचला, A man Who Died Twice रिचर्ड ओसमानच पुस्तक वाचायला घेतलं. पुस्तक वाचायची सवय राहिली नव्हती उभ्याउभ्या डोळे मिटू लागले,तस पुस्तक मिटून त्याने हातात धरलं. समजा तिने अचानक कोणतं पुस्तक आहे विचारलं तर काय उत्तर देणार? म्हणून preface वाचून घेतलं. गुन्हेगारी जग कस चालत यावर कथा सरकत जाते त्यामुळे खर तर ती रहस्यमय आहे पण ४५० पानांची कादंबरी पाहूनच छाती दडपून गेली. त्याच्यासाठी हे सगळं नवीन होत. यापूर्वी अनेक मराठी कादंबऱ्या वाचल्या होत्या ना.सी.फडके, शिवाजी सावंत, विश्वास पाटील,
ना.स.फरांदे, पू.ल.देशपांडे, वि.वा.शिरवाडकर, नगरकर, लक्ष्मण माने, शंकर पाटील, नारायण सुर्वे. पण इंग्रजी लेखकांच्या नावांची तशी बोंबच होती त्यामुळे तिची गुगली परतवून लावण्याऐवढे नॉलेज तरी असायलाच हवे असा त्याचा विचार होता. लोकल सुटता,सुटता ती आली आणि गाडीत चढली.तो गाडीत चढला आणि विंडोला टेकून उभा राहिला. पाटकर त्याच्याकडे पहात म्हणाला, “सुरज चल पत्ते पिस.” सुरजच त्याच्याकडे लक्षच नव्हते. योगेश सुरजच्या मांडीवर हात मारत म्हणाला,”सुरज भाय, सू प्रॉब्लेम छे, आज रमवानु नथी के?” “नाही, यार आज नोव्हेल वाचण्याचा मुड आहे तुम्ही करा सुरू. मग मी जॉईन होतो.” “एम नथी, रमवानु होय तो पछी शुरू से रमजो, पाछड रमवानू आवसे अने तमे पॉईंट निकाडसे तो पछी आपडो वांदो थसे.” योगेश बोलला. “योगेश, यार आज मुड नाही तुम्ही करा सुरु.”सुरज बोलला.

त्याने पुन्हा नोव्हेल उघडून वाचायला सुरवात केली. बरेचदा अर्थ निट लागत नव्हता पण अट्टाहासाने तो वाचत होता, संधी मिळताच लेडीज कोचकडे पहात होता. ती अगोदर डोक्यावरच्या हँगरला धरून उभी होती संधी मिळताच ती खिडकीकडे सरकली. तिने जेन्टस् डब्याकडे पाहिले, अचानक त्यांची नजरानजर झाली. तिने पुन्हा पुस्तक समोर धरल आणि वाचू लागली सुरज मात्र तिच्या त्या कटाक्षाने मोहरून गेला. तो मनातच म्हणाला,चला सुरवात तर झाली.

रमीचा डाव रंगात आला होता. सहा जणातली रमी आता पाच जणात सुरू होती. अधुनमधून सुरज नंदूच्या आणि योगेशच्या पत्यात डोकावत होता. चुक लक्षात येताच पुन्हा पुस्तकात डोक खुपसत होता. पहाता पहाता अंधेरी, सांताक्रूझ आणि बांद्रा पाठी पडलं. ग्रुप मधून एक एक जण कमी होत गेला. तसही बांद्रा नंतर रमी खेळण रिस्क होती. स्पेशल वाल्यांची धाड पडली तर दोन पाच हजार रूपयांना चुना लागला असता. यापूर्वी एकदा दादरला त्यांना पकडले होते. गयावया केल्यावर तीन हजार वसूल करुनच सोडले. चार आठ दिवस खेळण बंद केलं. पण म्हणतात ना, “जीत्याची खोड मेल्याशीवाय जात नाही”, तसला प्रकार घडला. आज सुरजला खरच मोकळे मोकळे वाटत होते, pure सिक्वेन्स लागेपर्यंत दडपण आणि हातात पाने असूनही pure सिक्वेन्स नसल्यामुळे डाव दाखवता न येण किंवा आपला पत्ता दुसऱ्या जवळ दिसत असूनही हाती न येण यासारखे दुःख नाही. आज पत्याएवजी कादंबरी हाती होती. थोडं अवघडल्यासारखे वाटत होतं पण तरीही बरं वाटत होतं.

ग्रांटरोड येताच योगेश शहा उतरला त्याच ट्रव्हल्सच ऑफिस होत आणि गेले पाच सहा वर्षे तो मोबाईल चार्जिंग, डेटा चार्जिंग, फोन अससेरिएज टीव्ही केबल चार्जिंग असलं additional काम करत होता. ग्रुप मधले सर्व फोन तोच रिचार्ज करत होता. शेवटी तो पक्का बनिया होता. थोडं फार डिस्काउंट मित्रांना मिळत होत म्हणून कोणाची काही हरकत नव्हती.

चर्चगेट येताच ती नेहमीप्रमाणे निघून गेली पण जातांना तिने तिरक्या मानेने त्याच्याकडे पाहिले असे त्याला वाटले. त्याच्या मनास आशेची पालवी फुटली. “चलो अब धिरे धिरे गाडी पटरीपे आयेगी.” तो स्वतः शी बोलला. प्रेमात पडला की व्यक्ती अस स्वतःशी बोलू लागते, हसू लागते आणि स्वतःला वारंवार आरशात पाहू लागते. कपडे, शूज यांची जास्त काळजी घेऊ लागते. कधी नव्हे तो घरातील सेंट, एअर फ्रेशनर फवारू लागते. घरातील मोठ्या मंडळींना ते आपोआप कळू लागतं कारण त्याच पावसात भिजून ते मोठे झालेले असतात. पण ते काही सांगण्याच्या भानगडीत पडत नाही, पावसाचे पाणी बादलीत पडून बादली भरली की आपोआप वाहू लागते तसेच प्रेमाचे. कधीतरी प्रेम जपण आणि लपवणे असह्य झालं की ते आपोआपच आपल्या निकटच्या माणसापर्यंत पोचत.

तो जास्त सिरियसली पुस्तके निवडून आणू लागला, Dan Brown, Thomas Friedman, Jan Astin त्याला कळू लागली, पुस्तके आणि ती आता त्याला आवडू लागली,आपली वाटू लागली. इंग्रजी नोव्हेलच कव्हर इतकं आकर्षक असत की पुस्तक हातून खाली ठेवावे अस वाटत नाही. मग ते फिक्शन असो की लव्ह स्टोरी, ट्रव्हल्स एक्सपिरिअन्स असो, की वॉर स्टोरी. हळू हळू त्याचं पत्यांचं व्यसन कमी झालं आणि पुस्तकाचं वाढलं. अर्थात हे नंद्याच्या चाणाक्ष नजरेतून कसे सुटेल! त्यांनी त्याला एकट्याला गाठून खात्री केली. “नंद्या, यार अजून आम्ही एकत्र भेटलो नाही, ती स्माईल देते, पण पुढे काय? तीचा गैरसमज नको व्हायला म्हणून…” सुरज म्हणाला.

“सुऱ्या, यार पार वेडा आहेस तू. पुढाकार घे तिच्याशी बोल, काहीही बोल डेरींग कर, नुसतीच वाट पहात राहिलास तर पाखरू उडून जाईल,शक्य तितका लवकर भेट. मुलींना जास्त वाट पाहायला लावलेली नाही आवडत, आणि हो हवा छान आहे, काल धुकं होत असलं फडतूस काही सांगू नको. आति क्या खंडाला म्हणू नकोस. मुली खूप सेन्सेटिव्ह असतात. त्यांना फालतूपणा रुचत नाही.” नंद्याची या विषयी बहुदा मास्टर्स किंवा Phd पूर्ण असावी.

नंद्या यातला गुरू असावा असं ठाम बोलत होता. ती संधी सुरजला लवकरच मिळाली,जुलै मध्ये उशीरानेच पाऊस सुरू झाला होता. गेले आठ दहा दिवस ढगाळ वातावरण होत पण पावसाचा पत्ता नव्हता. गोरेगाव येथून लोकल सुटली तेव्हा बारीक पाऊस पडत होता. पण लोकल उशिरा धावत असल्याची कोणतीही सूचना नव्हती. गाडीने जेमतेम जोगेश्वरी पास केलं असावं आणि अचानक पावसाने जोर पकडला,आकाशात तांडव सुरू झालं आणि पाऊस वाढतच गेला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पाऊस कोसळला म्हणून सर्व खुश होते. गाडी वाटेतच थांबली तर कुठे जायचं याचे प्लॅन आखण काही ग्रुपमध्ये सुरू झालं. तरीही रडत रखडत गाडी सुरू होती. महिमला गाडी पोचली तेव्हा रूळावर पाणी यायला सुरवात झाली होती.त्या पाण्यातूनच लोकल हळू हळू पुढे सरकत होती. माटुंगा आलं तेव्हा ट्रँकवर बऱ्यापैकी पाणी साचलेलं दिसू लागलं. बऱ्याच जणांनी माटुंगा जाताच दादरला उतरायचे नक्की केले. तरीही First Working day असल्याने काही अजूनही ऑफिसला पोचण्याची अपेक्षा बाळगून गाडीत निवांत बसलेच होते.

गाडीने दादर गाठताच डबा रिकामा झाला. तो, शहा, नंद्या, फडके आणि बाजूच्या ग्रुपमधले सहस्त्रबुद्धे, पाटील, शिरोडकर, लब्धे असे मोजके डब्यात होते. लेडीज कंपार्टमेंट मध्ये सात आठ महिला पेसेंजर होते. गाडी पुन्हा धक्का खात सुरू झाली, गाडी हळूहळू जेमतेम एलफिन्स्टनच्या सेवेज प्लान्टकडे पोचली आणि थांबली ती हलायच नाव घेई ना. बाहेर पाऊस धो धो कोसळत होता आणि आजूबाजूला पाणी भरू लागले होते. रूळ पाण्याखाली कधीच गायब झाले होते. मुंबई सेन्ट्रल येथून एक दोन मेल बोरीवलीच्या दिशेने निघून गेल्या पण बाकी शुकशुकाट. गाडी दोन अडीच तास एकाच जागी उभी होती आणि सेंट्रल लाईनवर परेलची अनाउंन्समेन्ट ऐकू येत होती. लोक एकमेकांच्या मदतीने ट्रँक वरून दादरच्या दिशेला गुडघाभर पाण्यातून जात होते.

सुरजने यापूर्वी एक दोन वेळा तिच्याकडे पाहिलं होतं तेव्हा ती नोव्हेल वाचताना दिसत होती पण आता ती आणि चार पाच लेडीज इतक्याच डब्यात होत्या. सुरजने मनाशी ठाम विचार केला आणि लेडीज कंपार्टमेंट जवळ जात हाक मारली,”अहो! मॅडम, मॅडम” इतर महिला त्याच्याकडे पाहू लागल्या तस तो म्हणाला, “ब्लु ड्रेस घातलाय त्यांना सांगता का?” तिने त्याच्याकडे पाहिले, तसं तो म्हणाला, “मॅडम गाडी सुटण्याची शक्यता कमी आहे, तुम्ही उतरता का? तुम्हाला मदत करू का?” तस ती जाळीकडे येत म्हणाली,”अहो खूप पाणी आहे,मला उतरायला नाही जमणार. मला पाण्याची भीती वाटते.” “अहो, मी आहे ना, मी तुम्हाला मदत करतो तुम्ही डोअर कडे या.” “अहो नको, मला नाही जमणार. मी पाण्याला भिते, कुठे खोल असेल तर? मला खरच नाही जमणार” “Don’t worry Mam तुम्हाला काही नाही होणार, माझे मित्र सोबत आहेत,उशीर केलात तर एकट्या रहाल. पहा गाडीतले बहुतेक उतरून गेले आहेत”

ती कशी बशी तयार झाली. सुरज खाली उतरला त्याच्या पाठीमागे नंद्या आणि योगेश उतरले. त्यांनी तिला हात देऊन इमर्जन्सी शिडी वरून हळु खाली उतरवले. गुडघाभर पाणी होते. तशी ती भीतीने ई ई ई sss अशी किंचाळली, सुरजने तिचा हात घट्ट धरला. पाण्यातील रेल्वे स्लिपर्स वरून हळू हळू ती परेल स्टेशनजवळ जाऊ लागली. आधी नंद्या आणि योगेश त्यांच्या पुढे,पाठी होते. नंतर फक्त ते दोघे चालत राहिली.

अधुनमधून पाण्यात पूर्ण बुडालेल्या रेल्वे स्लिपर्सचा अंदाज येत नव्हता, तिला पायाखाली स्लिपर्स न मिळाल्याने तोल जात होता, सुरज तिला सावरत होता.एलफिन्स्टन अगदी जवळ आल तस त्यांनी विचारल मॅडम तुम्ही गोरेगाव येताय की – – – -“
तिचा मोबाईल वाजला, “हॅलो, हा पप्पा, बोला- – – हॅलो, काय? हो हो मी दादर पर्यंत पोचले होते,लोकल थांबून राहिली आहे. काय म्हणता? कोण आहे माझ्या बरोबर? हो मैत्रिणी आहेत की, हॅलो, हॅलो.” फोन कट झाला तस ती म्हणाली, “पप्पांचा फोन होता. नीट ऐकू येत नाही, नेटवर्क नाही.” “अहो मॅडम मग मेसेज करा ना, आपण थांबू, करा मेसेज, ते काळजी करत असतील.” “तुम्ही मला मॅडम मॅडम का म्हणता? मला कसं तरी वाटतं, मी सारिका देशपांडे आणि तुम्ही?” “मी सुरज चौबळ, पण माझ्या प्रश्नांच उत्तर तुम्ही दिल नाहीत, गोरेगाव जायचं ना? की मग इथेच प्लँटफॉर्मवर मुक्काम करायचा. लवकर टॅक्सी पकडली तर ठीक, उशीर केलात तर इथे प्लॅटफॉर्मवर रात्र काढावी लागेल.” “इथे? प्लँटफॉर्मवर? नको नको,चला आपण टॅक्सी पकडू.” दोघ स्टेशन बाहेर पडली, तिथेही रस्त्यावर गुडघाभर पाणी होते. हळू हळू ते गोखले रोडच्या दिशेने बाहेर पडले, तिथे टॅक्सी उभ्या होत्या, “गोरेगाव जाणार का?” सुरजने एका टॅक्सी ड्रायव्हरला विचारलं. “हो जाऊ की, साहेब एक हजार होतील.”टॅक्सी ड्रायव्हर बोलला.
“एक हजार! ,मीटरने नाही नेत? दीड दोनशे लागतात, एक हजार म्हणजे?” “साहेब,पाऊस पहा किती आहे तो, किती वेळ लागेल कोणाला माहिती. तुमच्यावर जबरदस्ती थोडीच आहे, शंभर कमी द्या मग तर झालं.”

सुरज आणि ती पुढे निघून जाऊ लागली तस त्याने पुन्हा हाक मारली, “साहेब आठशे द्या चला बसा लवकर या पावसात कोणी इतक्या कमी पैशात नाही नेणार.”
सुरज म्हणाला, “सातशे देतो, आठशेला काही लागतं की नाही.”, ड्रायव्हर तयार होईना तस ती म्हणाली, “बघ पुढे जाऊन टॅक्सी नाही मिळाली तर?” सुरज नाईलाज म्हणून तयार झाला. टॅक्सी गोखले रोड वरून पळू लागली. सिद्धिविनायक मंदिर जवळ ट्राफिक लागलं, टॅक्सीची भली मोठी रांग होती. दादर ते शितला देवी मंदिर पर्यंत टॅक्सी मरत मरत जात राहिली. रस्त्यावरची गर्दी कमी दिसताच त्यांनी टॅक्सी थांबवून वडापाव, सँडविच आणि पाणी घेतले. टॅक्सी ड्रायव्हरला वडापाव दिला.तो नको नको म्हणत असताना, त्यांनी हाती वडापाव घेण्याचा आग्रह केला. “साहेब आमचा नाश्ता झालाय, तुम्ही खाऊन घ्या.” “आम्ही खाणारच हो, तुम्ही घ्या, तुमच्यासाठी आणलाय.” सुरजने त्यांच्या हाती वडापाव दिला.

ती ओलेती असल्याने थंडीने थरथरत होती.त्यांनी तिला सँडविच दिले.दोघानी एकमेकांकडे पाहिले.ती हळूच गोड हसली.”थंडगार लागतंय नाही!” “हो तर! इतका झिम्माड पाऊस पडल्यावर थंडगार होणारच. एसी बंद करायला सांगू का? सुरजने विचारले. “नको नको राहू दे. कपडे थोडे भिजले ना म्हणून गार लागतंय.” ती आणि सुरज अंतर ठेवून बसल्याने सुरजने पहिल्यांदा इतक्या जवळून तिला पाहिलं. तिने वडा पाव हातात धरून ठेवला होता. ते पाहून सुरज तिला म्हणाला “सारिका अग वडा थंड होईल खा की.” “हो खाते, मला अचानक काही आठवलं, तू गाडीत पत्ते खेळायचास म्हणून तुझा मला राग यायचा, हे अस चार चौघात पत्ते खेळणं चांगलं का?” “पण आता नाही ना खेळत? आणि हो तुला नोव्हेल वाचायला आवडते म्हणून मी तुझी नक्कल करत होतो पण आता मला इतका इंटरेस्ट आला की काही विचारू नकोस.”

टॅक्सी ड्राइवर आपल्या समोरच्या आरश्यातून अधून मधून त्यांच्याकडे पहात होता. त्याने तिला आग्रह करून वडापाव खायला लावला. ती म्हणाली माझा टिफीन आहे,खाणार का तू, हळूहळू तुम्ही वरून दोन तासांच्या भेटीत ती तू वर आली. तिनेच हळूच त्याचा हात हाती घेतला. दोघे एकमेकांकडे पाहून हसले. माहिम बांद्राला रस्त्यावर पुन्हा ट्रॅफिक लागले, रस्त्यावर पाणी जमले होते. टॅक्सी गेली की समुद्राची लाट यावी तसे पाणी पुढे जात होते. टॅक्सी रखडत रखडत जात राहिली. बांद्रा ब्रिजखालून वळसा घालून गाडी फ्लाय ओवरला लागली आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. खेरवाडी जंक्शन जवळ तिच तऱ्हा,संपूर्ण रस्ता पाण्याखाली होता. अगदी संथ गतीने टॅक्सी जात होती, काही पर्याय नव्हता. पावसाचा जोर पुन्हा वाढत होता.

ती त्याच्याकडे पहात म्हणाली, “आपण पोचू ना घरी? तो म्हणाला,”आता बसलो आहोत तर उशीरा का होईना पोचू.” ती गोरेगावला पोचली तेव्हा सहा वाजले होते. पाऊस अजूनही कोसळत होता. सुरजने टॅक्सीचे पैसे दिले. तिचे कपडे चिप्प भिजून अंगाला चिकटले होते. केसांतून पाणी टिपकत होत. थोड्या अंतरावर उडीपी रेस्टॉरंट होत,त्यांनी तिथे कॉफी घेतली. तीने पैसे देण्यासाठी पर्स उघडली तसा त्यांनी तिला मानेने नकार देत पर्सवर हात ठेवला. तो तिच्या हातावर ठेवला गेला. ती कावरीबावरी झाली. सर्वांगातून गोड झिणझिण्या गेल्या. मनाला मनाची ओळख पटली होती. कॉफी बरोबर संवाद सुरू झाला मनाची कवाडं हळुवार उघडली.

“सारिका तू कुठे राहतेस?” “अनुप टॉकीजच्या मागे, गोरेगावकर हेरिटेज मध्ये? आणि तू?” “मी गोगटे वाडीत,शाळेच्या पाठीमागे. तुझी शाळा कोणती होती?
“सेंट झेवीअर,आणि नंतर डहाणूकर कॉलेज. तुझी शाळा कोणती? “माझी सन्मित्र मंडळ, मी पाटकर कॉलेजमध्ये होतो. नंतर रुपारेल” “तू कुठे जॉब करतेस?” त्यानी तिच्यावर नजर रोखत विचारले. थॉमस कुक मध्ये मी त्यांचा आय टी सपोर्ट सेक्शन पहाते. Actually मी TCS मध्ये आहे. पण थॉमस कुकची साईट पहाते.Well तू कुठे आहेस जॉबला?” “मी हॉंगकॉंग बँकेत अससिस्टंट मॅनेजर आहे.नरिमन पॉईंट ब्रांचला.” “अरे वा! मॅनेजर आहेस ते ही foreign bank, छान, तू MBA करून गेलास का?” “हो MBA, Finance, तू काय केलेस?” “मी IT, BTecह आहे. IIT Powai.” “अरे वा, मग MS करावं, abroad जावं अस नाही वाटलं?” “नाही, I am only daughter to my family, माझे पप्पा म्हणत होते तू आमचा विचार करू नको, करिअर पहा, पण मी ठरवलं, नाही, एकदा तिथे गेले की तिथली संस्कृती, तिथला माहोल,पॅकेज यातून बाहेर पडणे अशक्य होईल. I am happy here.” “सारिका you are simply great, I am proud of you.” सुरज तिला शेक हॅण्ड करत म्हणाला. “सारिका खरं सांगू तुला मी गेले सहा महिने पाहतो आहे पण तू मला रिस्पॉन्स देत नव्हती. मला कळत नव्हतं की मी तुझ्याशी कसं बोलू,आज ह्या पावसाने आपली भेट घडवली. Thanks to this rain.” “तू ग्रुप बरोबर पत्ते खेळतोस, मला असले उद्योग करणारी मुलं नाही आवडतं, पण गेले काही दिवस तुझ्यातील बदल मी पहात आहे,खरं सांग माझ्यासाठीच तू पुस्तक वाचणं सुरू केलं की नाही?”
तो हसला, “मनकवडी आहेस,अग आम्ही Time Pass म्हणून खेळायचो, पण आता नाही ना खेळत?”

तिचा मोबाईल वाजला तस तीच लक्ष स्क्रीनवर गेल, “पप्पांचा फोन,एक मिनिटं”, “बोला पप्पा,काय? अहो मी On the way आहे, हो, हो तुम्ही काळजी नका करू,हो मैत्रीण आहे सोबत, हा मी टॅक्सीने येत आहे,थोड्या वेळात पोचते. बाय पप्पा.” “सुरज चल निघुया ना? बघ सात वाजता आले.” “हो तर ! मलाही कोणत्याही क्षणी माझ्या आईचा फोन येईल निघुया.पण तुझा नंबर देतेस ना,if you wish so.” ती हसली, तिने त्याचा नंबर विचारून मिसकॉल दिला. रिंगटोन वाजला, हा फोटो ठेवलास तुझे आई बाबा का? ” हो, माझ्या मम्मी-पप्पांचा फोटो आहे.”
दोघ निघाले, त्यांनी बिल पे केल,”सारिका मी तुला सोडायला आल तर चालेल का?” “ए हॅलो,आजच काही गरज नाही, मला रस्ता माहीत आहे. मी जाईन एकटी. “ती स्माईल देत म्हणाली. “ठीक मॅडम,आप को नही पसंद तो मै निकलता हू.” तस ती त्याचा हात धरत म्हणाली,”भारीच रागावतोस तू,चल चल फक्त बिल्डिंग पर्यंत येऊ नकोस. आजही मुलाकात और आज ही रुसवाई!” तो हसला, “smart आहेस, लवकर कळतं तुला. पण मी रागावलो नाही काही, मी पहात होतो, तू काय decision घेतेस. Pass, hundred percent” ” आजच सगळं कौतुक करू नको, थोडं ठेव उद्याला.” त्याने थोडे अंतर तिच्या बरोबर जात त्यांची बिल्डिंग जवळ आली तस तिचा निरोप घेतला. “अच्छा सारिका,सारिका..” ती त्याच्याकडे पहात म्हणाली, “निघतोस ना की इथं रस्त्यातच थांबायच!”
त्याने तिचा हात हळुवार दाबला आणि तो जायला निघाला, ती रस्त्याच्या बाजूला उभी राहून त्याला वळून पाहताना पाहून मनात सुखावली होती. आज कोणीतरी, कोणीतरी नव्हे तिच्या स्वप्नातील राजकुमार तिच्या मनावर मोरपीस फिरवून गेला होता. या पुढे ती आणि तो यांची मैफल जमणार होती. प्रेमाच्या गोड अध्यायाला सुरवात झाली होती. तिच्या विचारा सरशी वीज चमकून गेली जणू त्या वरुणाने तिला या नव्या नात्यासाठी मूक संमती दिली.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “नाते जुळले मनाशी मनाचे

  1. Bhosle R. B.
    Bhosle R. B. says:

    छान कथा सर.

Comments are closed.