निवांत
आता प्रत्येक क्षण, तास, दिवस असते तिला प्रचंड घाई
समृद्धीच्या मार्गावर सुसाट बाळाच्या वाट्यास नाही आई
डबा, मुलांची शाळा, सासुचं पथ्य, तिला गाठायचं ऑफिस
७.१२ ची गाडी पकडतांना गाडीत तिचं शरीर होत वनपीस
मिळालीच जागा तर स्वर्ग दोन बोटे, ती घरचा फॉलोअप घेते
मुलं शाळेत गेली का? कामवाली आली का? काही सूचना देते
ऑफिसमध्ये अनेक फाईल ती धडाडीने हाता वेगळ्या करते
लंच अव्हरमध्ये चार घास खाऊन घरी ठीकठाक ना पाहते
परतीच्या वाटेवर असते रिलॅक्स, थोड्या गप्पाटप्प होतात
उतरतांना काय काय संपलं हे आठवताच घेते पिशवी हातात
वाटेवरून जाता जाता मिळेल ती भाजी, फळे, सामान घेते
अडथळा शर्यत पार करत पाय उचलून ती वेळेत घरी जाते
पोळीवाल्या मावशी येऊन गेल्या ऐकून थोडे गाली हसते
सासूनी भाजीची तयारी केली म्हणून ड्रेस बदलून निवांत बसते
एवढ्यात मुलं खेळ आटपून गाठतात घर, तो लिफ्टने येतो
त्याला चहा देतांना, चार गोष्टी बोलत नाही तो बराच वेळ होतो
बोलण अर्धवट सोडून ती निरोप घेत स्वयंपाकाला झोकून देते
सर्व आटोपून ओटा आवरेपर्यंत ती मलूल, बरीच रात्र होते
दारे-खिडक्या, मुलांचा पसारा आवरून ती मुलांची घेते जाग
दुसऱ्या दिवशीची तयारी करून परतताना तिला येते हळूच साद
मुलं, सासू जातात झोपून तो वाचत, मोबाईल पहात असतो निवांत
ती थकलेली म्लान, तरीही त्याच्या इच्छेपुढे तिच्या यातनेला नसतो अंत