कलाटणी

कलाटणी

“मिस मोडकss”, “मिस मोडकss”, तिला पाठीमागून हाक ऐकू आली. स्मिताला कळेना आपल्याला कोण हाक मारतंय? लक्षपूर्वक ऐकल्यावर तिच्या लक्षात आलं बहुतेक गोडबोले असावा, अधून मधून तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. काय करावं? त्याच्यासाठी थांबावं की ऐकलं नाही भासवत निघून जावं.एवढ्यात तिच्याच वयाच्या मुलीनेच तिच लक्ष वेधत तिला सांगितले. “मॅडम, तुम्ही मोडक आहात का? तुम्हाला पाठीमागून कोणीतरी हाक मारतंय.”

ती नाईलाजाने हसली, वेग कमी करत थांबली. खरं तर त्या मुलीचा तिला राग आला होता. तिला अतिउत्साह दाखवण्याची गरज नव्हती, पण आता पर्याय नव्हता. तो धापा टाकत जवळ आला, “स्मिता मॅडम किती वेगात चालता हो! आणि इतकं काय ऐकत होता, मी हाक मारून थकलो.” तिने इअर प्लग काढले, “काय म्हणताय गोडबोले?” या पूर्वीच संभाषण ऐकलच नाही अस भासवत तिने सुरवात केली. “अहो मोडक मॅडम, मी तुम्हाला हाक मारत होतो, तुम्ही ऐकत नव्हता, इतकं काय ऐकण्यात गुंग होता?” तिला त्याचा प्रचंड राग आला होता पण रस्त्यात बोलण बरं नव्हे म्हणून तिने स्वतः ला आवरलं, “अहो गोडबोले मी गाणं ऐकत होते,नाहीतर उगाच रस्त्यावरचे आवाज ऐकून मन विटत. बरं, का हाक मारत होता?”

“म्हणजे तस काही खास नव्हतं, पण म्हटलं आपण एकाच ऑफिसमध्ये काम करतो तर एकदा एकत्र चहा घ्यायला काय हरकत! नाही का?” “अहो गोडबोले प्रत्येक स्त्री ला तीच ऑफिस सुटल्यावर घरी कधी पोचते असं होतं, तेव्हा चहा पुन्हा कधीतरी घेऊ, निघू मी? उशीर होतोय” “मॅडम request आहे भेटलाच आहोत तर थोडा वेळ काढा की, पुन्हा कधीतरी कशाला? तेवढंच दोन शब्द बोलता येईल.” टाळता येईना, तोडता येईना, ती म्हणाली, “गोडबोले माझी सहा तेवीस बदलापूर आहे,ती सोडून मला चालणार नाही. तुम्ही म्हणता आहात तर जवळच चहा घेऊ.” “Thanks स्मिता मॅडम, तुमचा होकार ऐकून बरं वाटलं. या, या अशोक रेस्टॉरंटमध्ये घेऊ चहा म्हणजे तुम्हाला उशीर नाही होणार.” तो अतिशय आनंदी झाला होता, जणू तिने त्याला लग्नालाच होकार दिला असावा.

हॉटेलमध्ये एक कोपऱ्यात रिकामी सीट पाहून तो बसला, “या मॅडम, बसा, इथे चहा चांगला मिळतो, तुम्ही काही खाणार का?” “No thanks, only cup of tea, hurry I am getting late.” “वेटरsss, दोन cutting.” वेटर दोन चहा ठेऊन गेला. “स्मिता मॅडम घ्या ना चहा. सॉरी नावाने हाक मारली म्हणून राग तर नाही ना आला? मी मुद्दाम आपल्याला चहा घ्यायची ऑफर दिली,ऑफिसमध्ये बोलता येत नाही. तुम्ही किती बिझी असता! काय आहे की मी अजून बॅचलर आहे, म्हणून म्हटलं तुम्हाला विचारून पहावं.”

तीने चहाचा कप टेबलवर जोराने ठेवला,”मिस्टर गोडबोले, या वेळी आणि या वातावरणात तुम्ही मला propose करताय? हे पहा तुमचा अपमान मला करायची इच्छा नाही पण स्वतःला समजून घ्या. काय आहे,अशा कोंदट वातावरणात, कोणी पुरूषांने असला नाजूक विषय काढला नसता. प्रत्येक गोष्टीला काळ वेळ असते,Are you Mad? Don’t dare to ask any other girl, She will slap you in the face.Good bye.” ती उठून तरतर निघून गेली. तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात राहिला. वेटरने चहाचं बिल त्याच्या समोर धरलं, तो वेटरवर रागावला,”थांब बे, बिल काय कुठे पळून जात्याय का?” वेटर हसला,”साहेब तुम्हाला पटणारं हे पाखरू नाही बरं का!”

त्याने रागाने वेटरकडे पाहिलं,वेटर उगाचच हसत होता.
त्यांनी पन्नासची नोट काऊंटरवर काढून ठेवली आणि तो बाहेर पडला. एका मुलीने चारचौघात त्याचा अपमान केला होता. “च्यायला,कोण समजते ती स्वतःला.” ते स्वगत होतं. हॉटेल बाहेर पान पट्टीवर त्यांनी सिगारेट घेतली, मोठा कश घेत, हवेत धूर सोडला. स्मिता मोडक दूर निघून गेली होती. त्याने ठरवल काही झालं तरी हिचा पिच्छा सोडायचा नाही. कशी नाही म्हणते तेच बघायचं आहे.

दोन चार दिवसांनी त्यांनी तिला ऑफिसमध्ये गाठली, काहीच घडल नसावं इतक्या शांतपणे तो तिच्या समोर उभा राहिला.” मॅडम थोडं बोलायचं होत,बसू का?” “बसा, बोला, काय म्हणताय? ऑफिसशी रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे का?” “नाही, म्हणजे ऑफिसशी रिलेटेड आहेही आणि नाहीही, मी तुम्हाला पाच वर्षे सिनिअर आहे,तेव्हा तुम्ही माझा चार चौघात अपमान केलात ते बर नाही केलंत. ठरवलं तर मी तुम्हाला अडचणीत आणू शकतो.”
“गोडबोले काय म्हणालात तुम्ही? मला अडचणीत आणू शकता, अरे वा! मग तर मेहरबानी होईल. आणा अडचणीत. पण अडचणीत आणणार म्हणजे नक्की काय करणार?” “ते कळेल लवकरच,हातच्या काकणाला आरसा कशाला?” तो तरातरा निघून गेला.

तिच्या डोक्यात विचार आला, प्रधान साहेबांना याचा पोरकटपणा सांगावा, मग वाटलं एवढी शुल्लक बाब त्यांच्या कानावर का घाला? आपण स्वतः गोडबोलेला हँडल करू. ती यंत्रवत काम करत होती पण तिचं लक्ष लागेना, काय करू शकेल हा गोडबोले? आपल्या कामात घोळ घालेल, कदाचित आपल्या ड्रॉवर किंवा कपाटात पैसे ठेऊन भ्रष्टाचाराचे आरोप करेल, की मग कोणाला तरी आपली सुपारी देईल! तीचं तिलाच हसू आलं. तिने डोक्यातून विषय काढून टाकण्याचा प्रयत्न केला?

संध्याकाळी ती घरी निघता निघता संदीप गोडबोले तिच्या बाजूने जातांना छद्मी हसला. तीने रागाने त्याच्याकडे पाहिले. हलकट, मला प्रपोज करतोय,डोक्यावर टक्कल पडलय म्हणून ठिक, स्वतः ला रणबीर समजतो की काय न जाणे? ती मनात म्हणाली, तिने स्वतःच टेबल आवरलं आणि ती निघाली, तिच्या सोबत ऑफिसमेट रोझी आणि पूनम होती. तिने जातांना कालचा किस्सा त्यांना सांगितला. “अग स्मिता तो तसलाच चिकटू आहे. जोपर्यंत तू त्याला ठाम विरोध करत नाही तो छेडछाड काढतच रहाणार.तू लवकर त्याला जशास तसे उत्तर दे, नाहीतर त्याची पागलगीरी तो सोडणार नाही.” सीएसटी आलं तस त्या हार्बर लाईनला निघून गेल्या. तिने बदलापूर गाडी पकडली. ग्रुपमध्ये पोचली तसा गोडबोले विषय ती विसरून गेली. गाडीत मैत्रीणींबरोबर गप्पा टप्पा सूरू होत्या. घाटकोपर आलं तशी पौर्णिमा कदम उतरली,खिडकीतून हॅलो हाय करून निघून गेली. ठाण्याला कॅथरीन पिंटो उतरुन गेली. पाहता पाहता डोंबिवली जवळ आलं. नेहमी प्रमाणे ती गाडी स्लो होताच ब्रीजच्या जवळ उतरणार होती. ती उतरतांना तिच्या समोर एक तरुणाला ती धडकली. त्याने तिला सावरलं, “Extremely Sorry,.”ती म्हणाली.
“Ya, it’s all right, but take care, you have tried to get down before it could slow down. I can’t always be there.” Ya, henceforth I will take care, will not dash on you. दोघे दोन दिशेला निघूनही गेले. तीने चार पाऊल पुढे गेल्यावर तिने वळून पाहिले, तो ही तिच्याकडे पहात हसला. तिला अचानक गोडबोले आठवला, कुठे मला प्रपोज करायला निघालेला गोडबोले आणि कुठे हा! आपल्या नशिबात कोण आहे कुणास ठावूक?

ती रिक्षा पकडून घरी गेली. तिच्या मनात विचार आला, गोडबोले बद्दल घरी सांगण्यात अर्थ नव्हता.उगाच बाबा विचार करत बसले असते. आईची गोष्टीच वेगळी ती माझ्या कपड्यांबाबत शंका घेत बसली असती.तुझच वागण बरोबर नाही असही म्हंटली असती. मी कधी तरीच वन पीस घालते पण आईला वाटत मी साडी नेसावी किंवा पंजाबी घालावा, अगदी शर्ट पॅन्ट घातला तरी ती नाक मुरडते. म्हणते एवढे घट्ट कपडे घालून प्रदर्शन का करतेस? तिला काय सांगणार, ती ज्या काळात वाढली तो काळ तिच्या डोक्यात फ्रीज झालाय. थोड मॉड राहणं ही काळाची गरज आहे, अगदीच काकू राहिलं तर कुणी ढुंकून पाहणार नाही. विचाराच्या तंद्रीत आपण रिक्षा पकडण्याऐवजी चालत निघालो आहोत हेच ती विसरली.

आता पुन्हा मागे वळून जाणं परवडणारे नव्हते, ती नेहमीपेक्षा उशीरा घरी पोचली, आईने दार उघडले, ती घरात येताच धाड करून दार लावून घेतले. बाबा शिळा पेपर वाचत बसले होते ते पेपरमधुन डोक वर काढत म्हणाले, “प्रतिभा वड्याच तेल वांग्यावर काढू नकोस,तुझ्या वेळेतच सगळ घडेल अस नाही. तो दरवाजा तुटला तर हजारो खर्च होतील.” “जाऊ द्या ना पप्पा,मी आल्या आल्याच तुम्हाला भांडण करायला विषय मिळतो का?”ती “अग, तुला उशीर झाला म्हणूनच ही आदळाआपट, तू येण्यापूर्वी दारापर्यंत पंधरा तरी फेऱ्या घातल्या असतील त्यात चिरंजीव आले नाहीत मग काय!” “पेपर वाचताय तो वाचा, तुम्हाला कुणी वकिली करायला सांगितलेली नाही, माझं मी पाहून घेईन.” “पप्पा, आई अस भांडू नका,लोक काय म्हणतील?,आई तु मला चहा देणार आहेस की…”
“अग,कपडे न बदलताच चहा घेणार आहेस का? चहा गॅसवरच आहे तु कपडे बदलून आलीस की दूध घालते. तुझ्या आवडीच्या कोथिंबीर वड्या केल्या आहेत बरं का?” ती कपडे बदलून, फ्रेश होऊन आली, कोथिंबीर वड्या क्रिस्पी, टेस्टी झाल्या होत्या. तिने आईच्या गालाचा गुच्चा घेतला.आई ओरडली,”अग कार्टे काय हे,काही लाज, शरम.कोणी पाहिले तर काय म्हणेल.” बाहेर प्रभाकर खाकरले, “नक्की काय गुलूगुलू चाललय दोघींच?” “काही नाही, तुम्ही तुमचा पेपर खाऊन घ्या, या माणसाला दिवसभर काही तरी वाचायला लागत. वाचून पोट भरत मग भूक कमी लागते. थोडे पाय मोकळे करून या म्हंटल तर दहा मिनिटात घरी हजर. इथे काही कुणी वाढून ठेवलय का?” “आई,किती बोलतेस पप्पांना, एवढं बोलणं बर का?” “तु शिकवू नकोस मला, तुझ्या पप्पांना मी चांगली ओळखते. म्हटलं आता मुलीसाठी स्थळ पहा तर म्हणतात, आपल्या ज्ञातीत, अनुकूल, जीवनसाथी, साईटवर नाव नोंदवलय पाहू कुठून स्थळ येतय ते. यांना हात पाय हलवायला नको”

“आई,तू पण अशी आहेस ना! पहिल्या सारख पत्रिका घेऊन दारोदार फिरण्याची गरज नाही. कुठून विचारणा झाली तर ते माहिती पाठवतात की. नवरे काही वाटेवर पडलेले नाहीत, पप्पांच्या पाठी लागून काय होणार,ज्याला इंटरेस्ट असेल तो कळवेलच.” “स्मिता, अग अठ्ठावीस संपल तुझं, कधी करायच लग्न, अजून दोन वर्षांनी कुणी पसंत करणार नाही. माझा मेलीचा जीव तुटतो म्हणून बोलते इतकंच.” “बरं,बरं,तुझा जीव तुटण्या आतच लग्न करते मग तर झालं.” “कार्टे ,तुझ्या लग्नाचा विचार करून माझे केस गळायला लागले आणि तुला गमती सूचतात. कसली बनली आहेस गं! तो बाप तसला, इतक्या ओळखी आहेत पण कुठे शब्द टाकून मुलीचे हात पिवळे करायचे तर दिवसभर पेपर आणि पुस्तकं” “आई गंमत नाही,खरचं मी मनावर घेतलय, बघुया यश मिळतयं का? तु सारख सारख पप्पांना बोलत जाऊ नको. मला नाही आवडत.” ती मगाशी प्लॅटफॉर्मवर घडलेला प्रसंग आठवून खुदकन हसली.

“पोरी हसायला काय झालं ग? काही ऑफिसमध्ये घडल की तुझ्यासाठी तुझ्या मोबाईलवर स्थळ आलय का? “नाही ग, तस काही नाही उगाचच, बर प्रतीक कुठे गेलाय? अजून कसा नाही आला?” तिने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. रात्री आईला डायनींग टेबल,जेवणाचा ओटा स्वच्छ करून ती हॉलमध्ये गेली,बाबा प्रतिकशी बोलत होते. प्रतिकच्या केसातून हात फिरवत ती म्हणाली,” हा भार थोडा कमी कर आणि थोडा seriously अभ्यास कर. तुझी फायनल एक्झाम कधी आहे? टाईम टेबल आलं का?” तर तो रागावत म्हणाला, दीदी या घरात माझ्या अभ्यासाच टेंशन तुम्ही नाहक का घेताय? मी काही ssc ला बसत नाही.I know how to prepare for exam.” “मुली, पाहिलस त्याची प्रतिक्रिया, त्याला वाटतं तो आता बापापेक्षा मोठा झाला आहे, मी त्याला उशीर का झालं विचारलं तर म्हणतो, I have lot of friends,if they insist to join them I can’t always deny. I like social life.” तिला ते पटलं पण पप्पांना ते पटणार नव्हतं, तिला फारशा मैत्रिणी नसल्याने ती एकटी पडली होती, शनिवार, रविवार सुट्टी असली तरी कुठे जाण नाही की येणं नाही कदाचित म्हणूनच ती अशी एकटी पडली होती.

“पप्पा आता कोणत्याच मुलांना सतत सांगितलेल नाही आवडत, तुमचा मुलगा वेगळा कसा असेल? जीवनात काय अडचणी येतात ते त्याला कळू देत. स्वतः ला ठेच लागल्याशिवाय शहाणपण नाही येत. I think he knows it well,if he scores then only he has an opportunity for MS.” ती प्रतिकला टपली मारून झोपायला निघून गेली. रात्री तिच्या स्वप्नात तोच handsome आला, खर तर एकदाच नजरानजर झाली होती पण तीने पाहिलं तो चांगला उंचापुरा, निमगोरा होता. स्टाईलीश दाढी त्याला शोभत होती. तिने दिर्घ श्वास घेत झोपण्याचा प्रयत्न केला पण तो तिच्या मनातून जात नव्हता. आता तो पुन्हा भेटेपर्यंत काही खरे नव्हते. दुसऱ्या दिवशी त्याच गाडीने डोंबिवली उतरताना त्यांची नजरानजर झाली. तो हसला तशी ती ही हसली पण त्या पूढे काहीच घडले नाही. तिच मन त्या ओझरत्या भेटीनच विचलित झालं. कोणी पहिलं पाऊल उचलायच? आपण प्रयत्न केला आणि त्याने गैरसमज करून घेतला तरं, छे,छे तस व्हायला नको,आपण वाट पाहू. घरीही ती अस्वस्थ होती पण ही गोष्ट आईला कळू नये याची शक्य ती काळजी ती घेत होती.

जवळ जवळ रोजच ती चोरटी भेट,नेत्रकटाक्ष आणि विरह. असे दोन तीन दिवस गेले,मनात बैचेनी. एक दिवस ती थोडी उशिरा ऑफिसमधून घरी जात होती.सोबत मैत्रिणी नव्हत्या. उशीर झाल्याने झपझप पावलं उचलत ती निघाली. अर्ध्या वाटेत पोचली इतक्यात एक कार तिच्या मागून सुसाट आली, त्या आवाजनेच तिने प्रसंगवधान बाळगून बाजूला उडी घेतली.पण तिला सावरता आल नाही आणि ती फुटपाथवर पडली. डोक्याला लागल,त्यातून रक्त भळभळत बाहेर येत होत. त्याने ड्रेस भिजला, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दूकानदाराने तिला प्यायला पाणी दिलं, बर्फ लाऊन डोक दाबल.कोणीतरी महिलेनं तो बर्फ जोराने जखमेवर दाबून धरला. टेंगूळ आल नव्हतं पण डोक ठणकत होत. तिच्या भोवती बघे जमले होते. कोणीतरी हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला देत होत.ती मानेनेच नको म्हणाली. “बेहेनजी आप ठिक तो है ना?कही और चोट तो नही आयी ना?” त्या गृहस्थाने विचारलं. तिने मानेनेच नाही म्हणून खूण केली. “आप नेपकीनसे यहा जोर से पकडके रखो मै हल्दी लगा देता हू नही तो खून बहेगा.” थांबलेल्या बाईंनी तिची जखम पुसून त्यां माणसाने आणून दिलेल्या कापसाने तिची जखम पुसून त्यावर हळद लावली.तिचे डोळे पाण्याने भरले होते.ज्या माणसांनी बर्फ आणून तिला जखमेवर लावून त्यावर हळद लावून पट्टी मारली त्याचे आभार मानायला तिच्याकडे शब्द नव्हते. ती कशीबशी म्हणाली, “भाई शुक्रिया” तिने त्याला हात जोडले. तस तो म्हणाला, “अरे बेहेनजी, भाई केह रही हो,और शुक्रिया कर रही हो । अखिर मैने किया ही क्या? बस थोडी मदद की,भाई होने का फर्ज निभाया ।”

त्या बाईंनी आस्थेने ती कुठे राहते,घरी सोडायला यायला हवे का? विचारपूस केली. तिचा हात धरून तिला सीएसटी स्टेशनवर आणून फास्ट लोकलमध्ये चढवले. त्या बाईंचे हात हातात धरत तिने आभार मानले. मॅडम आपण एवढी मदत केलीत, आपले नाव सांगाल का? त्या गोड हसल्या, “मी मोहिनी काळे, गिरगावात रहाते. काळजी घ्या, फारच दुखत असेल तर डॉक्टरकडे जाऊन दाखवा,हयगय करू नका. थोडा आराम करा.” “हो मॅडम,फार आभारी आहे तुमची.” ना ओळखीच्या ना पाळखीच्या, पण सख्ख्या बहिणेला आधार द्यावा तस त्यांनी तिला स्टेशनवर आणून सोडलं. त्या लोकल बाहेर खिडकीकडे उभ्या होत्या. लोकल सुटली तशी तिने हात हलवून त्यांचा निरोप घेतला.

कधी नव्हे तो एका मुलीने तिला खिडकी जवळची सीट दिली. तिने सोडायला आलेल्या मॅडमचे आभार मानले. डोकं थोडं ठणकत होत. कधी झोप लागली तिला कळल नाही. ठाणे स्टेशनवर प्रवाश्यांच्या झालेल्या गोंधळाने तिला जाग आली.ज्या मुलीने तिला जागा दिली ती अद्यापही उभी होती.ती त्या मुलीला जागा देण्यासाठी उठली.तस तिच्या खांद्यावर हात ठेवत ती मुलगी म्हणाली, “ताई तुम्ही बसा, मला सवय आहे उभ्याने प्रवास करायची.” ते ऐकून एका बाईंनी उठून तिला जागा दिली. तिला आश्चर्य वाटल, त्या एवढ्याशा मुलीने माझ्याशी बहिणीच नात जोडल. तिने बॅगमधून बाटली काढत पाणी प्यायलं. तिलाही विचारल ती मुलगी हसली.”नको माझ्याकडे आहे पाणी,तुम्हाला कस काय लागल?” तिने थोडक्यात प्रसंग सांगितला तस ती चूकचूकली, अरे रे! खूप दुखतयं का तुम्हाला? त्या कारवाल्या माणसाचा गाडी नंबर कोणीच कसा घेतला नाही. चांगला ठोकायला हवा होता.” तिच्या मनात तो विचार येताच गोडबोलेचे शब्द आठवले. “निच,त्यानेच तर अपघात घडवून आणला नाही ना? मेला म्हणाला होता, लवकरच कळेल म्हणून”

पारसिक बोगदा आला तस ती उठली,थोडा आराम मिळाल्याने बरं वाटत होतं पण डोक्यावर पट्टी मारली असल्याने अवघडलेपण आलं होतं. एका बाईंनी विचारलं. “कुठे पडला का तुम्ही?” ती मंद हसली,”हो एक वाहन वेगाने माझ्या मागून येत होतं म्हणून मी बाजूला झाले तो अडखळून पडले.” “घरी गेलात की आधी डॉक्टरकडे जाऊन टिटॅनस इंजेक्शन घ्या.कधीकधी काय लागल ते आपल्याला कळत नाही सेफ्टीक व्हायला नको.” तिने मान डोलवली, दिवा जाताच ती दाराच्या दिशेन सरकली, थोड्या वेळात मार्ताडेश्वर मंदिर आलं, तिने मनोमन देवाचे आभार मानले.निदान हातपाय तुटला नव्हता. डोंबिवली स्टेशनवर उतरताना तिच लक्ष त्याच्याकडे गेलं तो पंख्याखाली उभा होता. ती डब्यातून उतरतांना त्याने पाहिल. तो लगबगीने तिच्याकडे आला.तिने ते पाहिलं. काय कराव सूचेना, इतक्यात त्यानेच हाक मारली “मिस,थोड थांबता का? या, इथे बाजूला या,कुणाचा तरी धक्का लागेल.” तिचा हात धरत त्याने तिला बाजुला नेल.
त्याला पाहताच खंर तर तिचे डोळे पाण्याने भरले होते,त्याने पुन्हा विचारल तस ती म्हणाली, “एक कार माझ्या मागून वेगाने येत होती. ती चुकवतांना मी अडखळून पडले आणि..” “Thank God,मला वाटलं तुम्हाला त्या कारने उडवल की काय? बर चला मी तुम्हाला रिक्षेपर्यंत सोडतो.” तो म्हणाला. “नको नको मी जाईन,I am absolutely alright now.” “Really! absolutely alright,मग डोळे का भरलेत? ते काही नाही, मी म्हणतो ना,चला, सांभाळून या,तुमचं नाव सांगितलत तर बरं होईल. नुसत मिस म्हणायला बरं नाही वाटतं.” “मी स्मिता मोडक.” “मी रोहन अभ्यंकर, पेंडसे नगरमध्ये रहातो,बाय द वे तुम्ही कुठे राहता?” “मी,सारस्वत कॉलोनी,विवेकानंद नगर.” “पाहिलतं, म्हणजे तुमचा, माझा एरिया जवळजवळ एकच आहे. एवढ्या जवळ असून तुम्हाला मी कधी पाहिलं नाही.” “म्हणजे,तुम्ही आमच्या एरियात चकरा मारत असता की काय?”

“अस का विचारता? चकरा मारण्याचा अधिकार फक्त मुलींना आहे,असा तर तुमचा समज नाही ना?बर रिक्षानेच जायचं ना की दोन पायाची गाडी!” “तस मी चालतच जाते,म्हणजे जाता जाता खरेदी करता येते पण आज रिक्षेनेच जाईन, आधीच उशीर झाला आहे,आई काळजीत असेल.बर पण तुम्ही तर बदलापूर गाडीने येता ना? मग इतका वेळ…” “तुम्ही लक्ष ठेवून असता की काय,खरं सांगू का, ज्या दिवशी तुम्ही अडखळून पडलात ना तेव्हाच तुम्ही माझी विकेट काढली.” “कमाल आहे तुमची,अहो अजून तुमची माझी नीट ओळखही नाही तुम्ही काय करता ? घरी कोण आहे ? काहीच तर माहिती नाही आणि तरी बिनधास्त सांगताय.” “मिस स्मिता,आपलं एकदम स्टेट फॉरवर्ड, लपाछपी करत बसण्यात अर्थ नाही, मी येस बँकेत बँलार्ड पिअर ला डेप्युटी मॅनेजर आहे.” “अभ्यंकर,कदाचित तुम्हाला राग येईल पण तुम्हा पुरूषांची बुलेट सुसाट पळते,म्हणजे तुम्ही लवकर ऍडजस्ट होता. आमच तस नसतं, आम्ही मुली प्रत्येक गोष्ट पारखून घेतो. तेव्हा मला थोडा वेळ द्या.” “Ok! As you wish, I am not in hurry, पण आता मी तुमच्या बरोबर रिक्षात आलेल चालणार आहे ना? की त्यालाही तुमच काही..”

“अहो या की, त्यात एवढ काय मोठ, आपली ओळख झाली नसती तरी कधीतरी accidentally एकत्र गेलोही असतो.” तो पेंडसे नगरच्या वळणावर उतरला,त्याने पैसे देण्यासाठी पाकीट बाहेर काढले तशी ती हसली. “राहू द्या, नंतर द्यायचेच आहेत.” तिने हात हलवून त्याचा निरोप घेतला. सारस्वत कॉलनीच्या गेटकडे ती उतरली. तिच्या डोक्यावरील जखमेकडे सर्वजण पाहत होते जणू ती विरचक्र पदक लावून जात असावी, थोड्या अंतरावर म्हसकर काकू भेटल्या, “काय गं स्मिता, हे काय झालं? कुठून पडलीस? एवढंच ना की अजून कुठे? ” “अहो काकू रस्त्यावर भरधाव वाहन चुकवतांना..” “बरी वाचलीस हो! हल्ली या मेल्याचं काही खर नाही, उडवून झर् दिशी निघूनही जातात, त्या गजाननाच तुला वाचवलं हो.” “बरं, मी निघते.” म्हणत तीन चालायला सूरवात केली नाहीतर त्यांनी सर्व अहवालच सादर करायला सांगितला असता.
रिक्षा घरापर्यंत नेली असती तर संपूर्ण सोसायटी तिला पहायला धावली असती, त्यापेक्षा हे बरे म्हणत ती चालू लागली. दहा पावलांवर परब काका दिसले, ते ईव्हनिंग वॉक ला चलाले होते, त्यांनी थांबवून पुन्हा तीच सरबत्ती लावली, झर झर् पाय उचलत ती ब्लॉक मध्ये शिरली. दारावरची बेल पूर्ण वाजण्याआत दरवाजा उघडला. जणू कोणी त्या लाकडी दरवाजा आरपार तिला येताना पहात असावं. ती आत शिरताच आई ओरडली, “ग ,पडलीस कुठे,अहो,तो पेपर बाजू सारून लेकीकडे पहा.” ते धडपडत पेपर बाजूला फेकत म्हणाले,”प्रतिभा,काय झालं? किती मोठयाने ओरडलीस, स्मिते,पोरी काय झालं,ये इथे बैस. हे पाणी पी, बस पंख्याखाली.” तीने खांद्याची पर्स बाजूला ठेवली आणि ती सोफ्यावर बसली. आईने पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणाली,थांब मी तुला चहा टाकून येते.
तीच्या बाजूला पप्पा बसले होते ते अस्वस्थ होऊन तिच्या जखमेकडे पहात होते. प्रश्नाचा भडिमार होण्यापूर्वीच तिने सर्व इत्यामभूत घटना दोघांना सांगितली.”बरं मग तो ड्रायव्हर सापडला का? मेल्याला पोलिसात द्यायला हवं होतं.” तिला पहिल्यांदा याची जाणीव झाली,की जो वेगाने गेल्याने ती पडली त्या, कारवाल्याचा कोणी नंबर घेतला की नाही ठाऊक नव्हतं. कदाचित कोणी घेतला असेल तर दुसऱ्या दिवशी चौकशी करायला हरकत नव्हती. आईने फ्रीजमधून बर्फ आणून हळुवार शेकलं. “आई मी थोडा वेळ पडून राहते,sorry आज तुला मी मदत करू शकणार नाही.”अगं, माझा स्वयंपाक झालाच आहे, थोडी खिचडी टाकली की झालं,जा तु पड थोडावेळ म्हणजे बर वाटेल?” जखम आता थोडी जास्तच दुखत होती. तिने पेन किलर कॉम्बिफ्लेम घेतली होती. थोडया वेळाने प्रतीक आला तेव्हा ती बेडरूममध्ये डोळे मिटून पडली होती. डोक्याला थोडा ठणका होता पण मनात मात्र मोगरा फुलत होता. प्रतिकने आल्या आल्या तिची फिरकी घ्यायला सुरुवात केली, “दीदी! काय ग कोणाकडे पहात असतांना धडपडलीस
?” तिने त्याच्या पाठीत रट्टा घातला, “जास्त शहाणा बनू नकोस,जा मला थोडा वेळ पडू दे.” तो तिची विचारपूस करून निघून गेला आणि गेल्या सात, आठ दिवसाचा घटनाक्रम झरझर तिच्या डोळ्यासमोर येऊन गेला. अपघात घडला हे निम्मतं, ती उशीरा आली त्यामुळे त्याची भेट झाली होती. नाही म्हटलं तरी तिला मनातून तो खूप भावला होता.आता प्रश्न होता तो घरून होकार मिळवायचा पण ते काही अवघड नव्हतं. जेवणं झाली. ती नेहमीप्रमाणे टेबल आणि ओटा आवरणार होती पण आज पप्पा आईच्या मदतीला गेले.तिला म्हणाले स्मिता आजचा दिवस आराम कर. ती हॉलमध्ये बसून विचार करत होती. खरच सगळ अनाकलनीय होत. काही चांगले घडायच असेल तर चार दिवसातही घडत.एखाद्या प्रसंगात जीवनाला कशी कलाटणी मिळते त्याचा अनुभव ती स्वतः घेत होती. त्या आनंदात ती तशीच निद्रेच्या कुशीत शिरली.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar