परी
समीर रोज आपल्या बाईकने कामावर जायचा, साडेनऊची ड्युटी असल्याने आठ साडेआठला निघाला तरी तो तासाभरात महापेला पोचत असे. निघायला दहा मिनिटे उशीर झाला की तो ट्रॅफिकमध्ये अडकून पडे. घरून कितीही लवकर निघतो म्हटलं तरी सर्व आवरून निघेपर्यंत सव्वाआठ कधी वाजले ते कळत नसे. कधी सॉक्स जागेवर मिळत नसत तर कधी चार्जिंग करायला ठेवलेला मोबाईल तिथेच राहात असे. तो घराबाहेर पडे पर्यंत वसुधाला त्याच्या मागे राहावं लागे. त्याच्या पाठोपाठ श्रीधरपंत निघत आणि शेवटी शेंडेफळ सविता निघे.
आजही तो इमारतीच्या खाली उतरून निघत होता इतक्यात त्याच लक्ष समोरच्या इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर गेलं. एक सुंदर मुलगी हात हलवून बाय करत होती. त्या इमारतीखाली एक गाडी उभी होती त्यातून एक गृहस्थ हात हलवून तिला बाय करत होते. या पूर्वी तिथे पंजाबी कुटुंब राहात होत. बहुदा हे नवीन कुटुंब तिथे राहायला आलं असावं. त्याची बाईक त्या गाडी जवळून पास झाली तेव्हा त्याने पाहिलं. आत बसलेली व्यक्ती मध्यम वयाचे हँडसम गृहस्थ होते. अल्टो गाडी त्यांच्या आवारात पहिल्यांदा दिसत होती, नवीन राहायला आलेले दिसतात, तो मनाशी म्हणाला.
रस्त्याला लागला तसं तो सगळं विसरून गेला. आज त्याची ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट संबंधी मिटींग होती. रात्री उशिरा पर्यंत जागून त्यांने प्रोजेक्ट प्रोफाइल तयार केली होती. त्या प्रोजेक्ट बाबत ग्रुप डिस्कशन झाल्यावर तो प्रोजेक्ट रन करतांना येणाऱ्या संभाव्य अडचणी वर हायलाईट करणार होता.
त्या नंतर त्याचं प्रेझेन्टेशन मॅनेजर लेव्हलला होणर होत. कस्टमर एंडला तो सक्सेसफुल झाला तर कंपनीचा फायदा होणारच होता. अर्थात चॅलेंज म्हणूनच त्यांनी तो प्रोजेक्ट स्वीकारला होता. नवीन प्रोजेक्टवर काम करायला मिळण ही डेव्हलपमेंट साठी चांगली गोष्ट होती. एक वर्षाच्या आत त्याच लॉचिंग होणं गरजेचं होतं. तो कंपनी गेटवर पोचला तेव्हा पाठीमागून गाडीने त्याला हॉर्न दिला. त्याने मिरर पहिला, ते सबनीस साहेबच होते.
त्याने बाईक शेडमध्ये उभी केली आणि तो एन्ट्रन्स जवळ सबनीस साहेबांची वाट पहात उभा राहिला. गाडी पार्क करून सबनीस आले. Good Morning, hello, Hi झाल. “अरे समीर मगाशी हायवेला मी तुला मागून हॉर्न देत होतो. कसल्या तंद्रीत होतास?” सबनीस म्हणाले.
तो हसला, “काही नाही सर, तुम्ही नवीन प्रोजेक्ट दिला आहे ना त्याचाच विचार मनात होता.आज ग्रुप मीटिंग आहे.” “Very sorry, पण समीर असल्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नसतं, त्या होत राहतात. इट्स रुटीन, ऑफिस hours आहेत ना त्यासाठी. Our life is more precious than these projects. By, here after remember, On Highway you will focus on your driving not anything else, ok.” “Yes sir, very sorry, thanks for your suggestions.”
तो ऑफिसमध्ये पोचला इतक्यात फोन वाजला. साहेबांनी सकाळीच सुनावल्या बद्दल तो आधीच वैतागला. पण फोन आईचा आहे पाहताच तो थोडा घाबरला, “हॅलो!, ममा काय झालं? लवकर बोल फोन का केलास?” “अरे समीर! आपल्या समोरच्या इमारतीत, म्हणजे ‘प्राजक्त’ मध्ये नवीन कुटुंब आलय, त्यांना एक वीस बावीस वर्षाची सुंदर मुलगी आहे, एकदम क्युट, माझ्या ती मनात भरली.” “आई, तुझं आपलं काहीतरीच, त्या मुलीला नीट पहिली नाही तो पर्यंत स्वप्न रंगवू लागलीस काय? आणि हो मी बिझी आहे, आता फोन करू नकोस.” तो आईला म्हणाला खरं पण त्यालाही ती आवडली होती. ‘ती पाहताच बाला,कलेजा खलास झाला’ अशी त्याची अवस्था झाली होती. पण आत्ता तरी त्या गोष्टीवर विचार करायला वेळ नव्हता.
तो दिवसभर बिझी होता. लंचही त्यांने conference hall मध्येच घेतला. संध्याकाळी तो उशीरानेच घरी निघाला. प्रोजेक्टमध्ये काही लुपहोल होते. जो पर्यंत त्याला परफेक्ट सोल्युशन मिळणार नव्हते त्याला दुसरा विचार सुचणार नव्हता. तो घरी आला,सोसायटीच्या इमारतीत शिरता शिरता त्याच समोरच्या ‘प्राजक्त’ मध्ये लक्ष गेलं. तिथं कुणीही नव्हते. घरी गेल्यावरही त्याच्या डोक्यात पुन्हा प्रोजेक्टचाच विचार सुरू झाला. या आठवड्यात बेसीक प्रोजेक्ट सबनीस साहेबांना दाखवायचा अस त्यांनी ठरवलं होतं. अर्थात काही अडचण आली नाही तर ते शक्य होतं. पहिल्याच दिवशी प्रॉब्लेम फेस करावे लागतील याची शक्यता त्यांने धरली नव्हती.
तो कपडे बदलून फ्रेश होऊन आला तसा आईने चहा आणि उपमा पुढ्यात ठेवला. त्याच लक्ष लॅपटॉपवर होतं, “समीर , अरे नाश्ता घे चहा पी नंतर तुझ्या मित्राशी बोल.” आई त्याच्या बाजूच्या सोफ्यावर बसली. आईने भाषण सुरू ठेऊ नये म्हणून त्याने उपमा डिशकडे न पाहताच उचलून खायला सुरवात केली. डाव्या हाताने तो लॅपटॉपच्या बोटे फिरवत होता. त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी ती म्हणाली, “काय रे खूप काम आहे का? तस असेल तर मी आपली किचनमध्ये जाते तुला आणि अडचण नको.” तो मान वर करत तिच्याशी हसला, अग बस की तू, अजून स्वयंपाकाला वेळ आहे, तुझी लाडकी लेक कुठे राहिली? आतापर्यंत यायला हवी होती.”
affiliate link
“अरे ! ती सकाळी कॉलेजला जातानाच म्हणाली आज तिच्या मैत्रिणीचा Birthday आहे, यायला उशीर होईल म्हणून आणि बाबा येतांना खरेदी करत करत येतात त्यामुळे त्यांना उशीर झाला, तरीही एव्हाना यायला हवे.” त्याचं बोलणं सुरू असतानाच श्रीधरपंत आले. तिने लगबगीने त्यांच्या हातून पिशव्या घेतल्या. त्या बऱ्याच जड होत्या. “अहो इतकं सगळं एकाच दिवशी कशाला आणायचं आणि आणलं तर रिक्षाने यायचं.”
“अगं, रिक्षेने येणार होतो तर वाटेत समोरच्या इमारतीत नवीन आलेले भावे भेटले. त्यांनी शुक शुक करत हाक मारली आणि म्हणाले “तुम्ही पालवी मध्ये राहता ना? मी त्या इमारती मधून उतरतांना तुम्हाला पाहिलय.” मी “हो” म्हणालो तर म्हणाले, “मी भावे, प्राजक्त मध्ये राहायला आलोय, चला माझ्या गाडीने जाऊ.” मी नकार देत म्हणालो, “भावे, तुम्ही जा, मला थोडी खरेदी करायची आहे.” तर भावे म्हणतात कसे,”काही हरकत नाही, तुम्ही खरेदी आटपा मी थांबतो.” नाईलाज झाला, आलो त्यांच्या गाडीने.” “आई तुमच चालू दे मी बेडरूममध्ये जातो, तुला चहा द्यायचाय बाबांना, विसरली नाहिस ना!”
रोहन त्याचा लॅपटॉप घेऊन बेडरूममध्ये गेला. ती किचनमध्ये गेली. तिला सांगायचं होत ते अर्ध्यावर राहीलं.
दुसऱ्या दिवशी रोहन कामावर जायला निघाला त्याच अचानक प्राजक्ताच्या दुसऱ्या माळ्यावर लक्ष गेलं. ती गॅलरीत होती. तिनेही नकळत त्याच्याकडे पाहिलं. एवढ्यात तिचे वडील जिना उतरून आले. त्यांनी गाडी सुरू केली. हात बाहेर काढून तीने बाय केल. हे अस जवळजवळ रोज घडत होतं. त्यांची नजरानजर होत होती. ती गोड हसत होती. आता ती कधीतरी संध्याकाळी तो परतत असे तेव्हाही दिसे. त्याला प्रश्न पडला. ही नक्की करते काय? दिसायला सुंदर आहेच. घरी गाडी आहे,मोठ्या घरातील आहे. सुशिक्षित असणारच. मग उच्च शिक्षण घेते आहे की मग जॉब च्या शोधात आहे. तिला पाहिलं की डोळ्यासमोर तीच तरळत राही. अर्थात दिल मे कुछ कुछ होने लगा था।
ती कोणत्या जातीची,धर्माची, किमान आपली मराठी भाषा तरी तिला येते का? हे माहीत नसतांना आईने तिला अगोदरच भावी सून म्हणून पसंत केली होती. हे ऐकूनच त्याला आश्चर्य वाटत होतं. वास्तवता आई एवढी फॉरवर्ड असेल असं वाटत नव्हतं.
त्याची जिज्ञासा त्याला शांत बसू देईना,एक दिवस संध्याकाळी चहा पिता पिता तो आईला म्हणाला, “आई तू त्या समोरच्या मुली बद्दल काही तरी सांगत होतीस, तुला समजलं का ते कोण आहेत ?” “का रे? ,तुला त्यांची माहिती का हवी? जासूसी करायला का लागलास?
ती बया तुला आवडली बिवडली की काय? “नाही ग , आवडली वगेरे काही नाही पण , गेले दोन महिने मी पाहतोय कामावर जायला निघतो तेव्हा ती गच्चीत उभी असते, कधी कधी संध्याकाळी तिथेच उभी असते. ती नक्की काय करते म्हणजे शिकते की नोकरीच्या प्रतिक्षेत आहे ते तरी कळेल. हो तिचा माझ्याविषयी गैरसमज व्हायला नको. नाहीतर तिला वाटेल मी तिच्यावर लाईन मारतो.”
“शीsss समीर अस तुला आईसमोर बोलायला काहीच वाटत नाही का?” वसुधा थोड रागाने बोलली.
“आई ही डिप्लोमसी बरी नाही हा, त्या दिवशी तिला पाहताच, तूच मला फोन करून ती मुलगी पाहिलीस का? विचारलं आणि आत्ता—” “बरं बरं,म्हणजे एकंदरीत ती तुला आवडली तर, पण तू तिला आवडायला नको? जरा आरशात पहा, त्या वाढवलेल्या दाढीत कसा दिसतोस, दुःखी शाहरुख तरी बरा दिसतो.” “आई तू सारखी सारखी,माझ्या दाढीवर का येतेस? तुम्ही वेण्या घालता आम्ही कधी म्हणतो का एवढे केस का वाढवता म्हणून, आणि तू म्हणतेस शाहरुख पण त्याच्याकडे चेहरा तरी आहे का? मी शाहरुख पेक्षा खूप सुंदर आहे. तुला मी काय सांगतो, आपल्या सविला तिची माहिती काढायला सांग ना?”
“तू का नाहीं सावीला सांगत? एरव्ही पॉकेट मनी मागून घेतेच ना ! सांग की तिला.” “तुला तिचा स्वभाव माहीत आहे ना? तिला मस्का मारायला मला वेळ नाही. मला उगाच ब्लॅकमेल करत बसते. लहान बहीण म्हणून मी काही बोलत नाही तर डोक्यावर बसते.” “बघ ,काय मुलगा आहेस, बहिणीला सांगू शकत नाहीस आणि आईलाच जासूसी करायला सांगतोस?” “सून आणायची घाई तुला झाली आहे मला नाही, पुन्हा विषय काढच, मग मी पाहतो.”
“बरं बरं मी आपल्या सवीताला तिच्याशी मैत्री करायला सांगते. म्हणजे नक्की कळेल. उगाच एवढं रागवायला काय झालं? चेष्टाही कळत नाही होय. ये समीर तू काही म्हण, पोरगी मोठी गोड वाटते हो, मी उद्या तिची माहिती काढते, जर तुला तिच्याविषयी काही वाटत असल्यास सांग हो नाहीतर बैल मेला आणि खोपा केला अस व्हायचं.”
समीर त्याच्या प्रोजेक्टमध्ये गुंतला होता. परत यायला बऱ्याचदा खूप उशीर होई. ती दिसली नाही तर मन उदास होई. सकाळी मात्र नियमित त्यांची नजरानजर होतच होती, पहाव तेव्हा तिच्या हातात एखाद पुस्तक असे त्यामुळे ती कशाचा तरी पोस्ट ग्रज्युऐशन करत असावी असा त्याने समज करून घेतला. ती त्याला आवडू लागली होती. तिने त्याच्या ह्दयात घर करायला सुरवात केली होती. आता कधीतरी ती हात हलवून बाय करत असे. कुणी पहात नाही हे पाहून तो ही तिला स्माईल देत होता. प्रोजेक्टच काम प्रगतीपथावर होत आणी अबोल प्रेमाची गाडीही रूळावरून धावू लागली होती. गंमत म्हणजे त्या प्रेमाच नाव तिला आणि त्यालाही माहित नव्हतं.
तिन चार महिने तरी मागे पडले. दोन तिन प्रसंग असेही आले की त्यांना पाहणार त्यांच्या शिवाय बाहेर कुणीही नव्हतं पण ना तिने कधी त्याला साद घातली ना त्याने कधी तिचे नाव विचारले. अगोदर कधीतरी आई त्याची गंमत करे, “समीर चंद्र दर्शन झाल का रे? ,पण हल्ली आई सुद्धा कधी थट्टा मस्करी करत नव्हती. मुख्य म्हणजे तिच नाव त्याला अद्यापही कळलं नव्हतं. एक रविवारी तो किचनमध्ये घुटमळत होता. बहुधा आईला विचारु की नको अशी संभ्रम अवस्था त्याची झाली होती. शेवटी तो आईच्या अगदी जवळ जात म्हणाला, “आई, सवीताने तिच काम केलं का?” तरीही तिने पेडगावला जात विचारलं, कोणत्या कामाच म्हणतोस?”
“आई ,उगाचच कळल नाही अस दाखवू नको, तू सविताला त्या मुलीच नाव काय ते विचारायला सांगणार होतीस त्याचं काय झालं?” “समीर, बेटा तिला विसरून जा, खर तर तुला मी हे पुर्वीच सांगायला हवं होतं पण धीर नाही झाला. बेटा तिचं नाव परी. ती जन्मताच अपंग आहे, एवढ्या सुंदर मुलीला देवाने अपंग बनवावं याला काय म्हणावं”
“आई तू खरं सांगतेस!” तो दोन्ही हात डोक्यावर घट्ट दाबून मटकन खाली बसला. “होय बेटा तुझ्या गळ्या शप्पथ खरं, तुला मी खोट का सांगू. अरे कित्येक दिवस तुला सांगण्याचा प्रयत्न करते पण मनाचा हिय्या झालाच नाही. कसं सांगावं की सुंदर रूप देतांना देवान तिला अपंगत्व देत तिची थट्टा केली आहे. समीर तू समजूतदार आहेस. कधीतरी तिच्याशी हे स्पष्ट बोल , तिची मैत्री सोडू नको तिला धीर दे पण तिच्यात गुंतू नको.”
“आई, खरच गं, माझा महाल काचेचा आहे अशी मनी शंकाही कधी आली नाही. ती वेडी वेड्यासारखी रोज वाट पहाते. मी किती मुर्ख काही जाणून न घेता तिला फसवत राहिलो.” “समीर बेटा कोणीच कोणाला फसवलं नाही, ती अपंग आहे हे तुलाही ठाऊक नव्हते. Hello Hi याला काही कुणी प्रेम म्हणत नाही. तू एक दिवस तिला भेट, तिच्याशी बोल, म्हणजे तुझ्या मनातली अपराधी भावना निघून जाईल.”
त्याने दुसऱ्या रविवारी सकाळी दहा साडेदहाला त्यांच्या घराची बेल वाजवली. कोणीतरी आतून ल्याच काढल्याचा आवाज आला. दार उघडलं गेलं, समोर तीच होती. तिचा प्रसन्न चेहरा पाहून त्याला बरे वाटले. त्यांनी अगदी सहजचं विचारलं, “आत आलं तर चालेल ना?” ती गोड हसली, “म्हणजे काय, दारात उभ राहूनच बोलणार आहेस!”
ती बाजूला झाली तस तो आता आला. तिच्या हातात पुष्पगुच्छ देत म्हणाला, “शुभ प्रभात, आपण पहिल्यांदा समोरा समोर भेटतोय म्हणून हा बुके.” तोवर तिची आई कॉफी घेऊन आली.”घ्या, माझी मुलगी तुमच्या punctuality बद्दल नेहमी बोलत असते. तुम्ही गप्पा मारा, मी घरातल आवरून येतेच.”
त्याला आश्चर्याचा दुसरा धक्का, तो येत नाही तो तिच्या आईने कॉफी आणली, जणू तो आज येणार हे तिला माहीत असावे. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, “काकूंनी लगेचच कॉफी आणली, मी येणार हे कळलं होतं की काय?” ती हसली, “नाही नाही, तसच काही नाही,आम्ही कॉफी घेणारच होतो इतक्यात तुम्ही आलात, घ्या ना, तुम्हाला तू म्हटलं चालेल ना?”
तो कॉफी घेता घेता हसला, “हो चालेल की, मी काही काका किंवा मामा म्हणण्याच्या वयाचा नक्की नाही, खर ना?” तो मिश्कीलपणे हसला. ती ही खळाळून हसली. त्याने कप खाली ठेवला. ती त्याच्याकडे पहात होती कशी बोलेल पण काय बोलावं असा प्रश्न समीरला पडला होता. परीने त्याची अस्वस्थता हेरली, परी हुशार होती, तिनेच सुरवात केली, “तुझ नाव मला कळलय, तुझी बहिण माझी चांगली मैत्रीण झाल्याय. मी Law करते. इंडस्ट्री डिस्पूट अँड ह्युमन रिसोर्स यावर माझ स्पेशलायझेशन आहे.सविता मला चांगली पुस्तक आणून देते. आणि एक महत्त्वाचं, मला माहीत आहे की मी अपंग आहे,पण कोणाच्या सहानुभूतीची मला गरज नाही. मनाने मी खंबीर आहे.”
affiliate link
“परी ! I am very sorry, but I have not said anything, have I?” ती हसली, तीने हात पूढे केला, “Be a good friend, nothing else.” त्याने हात पुढे करत शेकहँड केलं. तिची बोट लांबसडक होती. डोळे निळसर घारे होते. डोळ्यात विश्वास दाखवणारी चमक होती. त्याला खुप बरे वाटले, डोक्यावरचा भार उतरल्यावर जसे वाटावे तसे हलके हलके वाटले. एक स्वप्न भंग होता होता मैत्रीचा नवा सेतू बांधला जात होता. थोड्या वेळाने तिची आई त्यांच्या बोलण्यात सामील झाली. त्यांनी त्याच्या जॉब विषयी विचारले. तो कंपनीमध्ये ग्रुप लीडर म्हणून काम करतो हे ऐकून त्याचे अभिनंदन केले. अगदी मोकळेपणे त्यांनी गप्पा मारल्या. आपली मुलगी अपंग असल्याचं दुःख व्यक्त केलं नाही की तिच्या बद्दल चिंताही दाखवली नाही. बोलता बोलता बरीच माहिती मिळाली.
ती जन्मताच अपंग होती. तिला तशा स्थितीत पाहून आईला किती दुःख झालं असावं. शक्य ते सर्व प्रयत्न कुटुंबांनी केले. पण डॉक्टर म्हणाले तिच्या दोन्ही पायाचे स्नायू अतिशय कमकुवत असल्याने ती स्वतः चालू शकेल की नाही या बद्दल खात्री नाही. पण इच्छा शक्तीच्या जोरावर ती आधाराने उभी राहिली.आणि आज ती स्वतःच स्वतः करण्या इतपत स्वावलंबी बनली. तिच्या जन्मानंतर त्या दाम्पत्याने तिच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून दुसरे मूल होऊ दिले नाही.
“Simply Great” समीर मनातच म्हणाला ,त्यांचे विचार समजले. आणि समीरला त्या कुटुंबातील व्यक्तींची उंची कळली. त्या काकू स्वतः ग्रॅज्युएट होत्या, नोकरी करत होत्या केवळ मुलीचं संगोपन नीट करता याव म्हणून त्यांनी सरकारी नोकरी सोडून दिली. संपर्कात आल्याशिवाय माणसं कळत नाही हेच खरं.
भावे यांचे लिगल कन्सल्टंसी ऑफिस होतं. साहजिकच घरात कधी तरी क्लायंट आले की चर्चा ठरलेली. ते ऐकूनच परीने स्वतःच क्षेत्र ठरवलं. ती वॉकर घेऊन कॉलेजमध्ये जायची, जिने चढण उतरणं त्रासदायक होत होतं पण गोल ठरवलं होतं. पुढे शिकत राहिली. समाजात चांगली माणसं असतातच तुम्हाला ओळखता आलं पाहिजे अस परीच ठाम मत.परी शरीराने अपंग होती पण मनाने नाही म्हणूनच तिच्या अपंगत्वावर तिने मात केली होती.
समीरला एक वैचारिक दृष्टीने सशक्त मैत्रीण भेटली. मनातील मळभ दूर झालं. या परीला उडता यावं, बागडता याव या साठी जी काही मदत लागेल ती केली पाहिजे असं त्याला मनोमन वाटलं. पण परीच स्वतःच मत काय, तिला कोणाची मदत घेण आवडेल? दुसऱ्या दिवशी जाता जाता त्याने प्राजक्तच्या दुसऱ्या माळ्यावर पाहिलं. तसच स्मित करत ती उभी होती. ती होती प्राजक्तावर नियमित फुलणारी पांढरी शुभ्र पण भगवा देठ असणारी फुला सारखी अल्लद खाली येणारी परी. त्यानेही हात हलवून बाय केले त्याची आई गॅलरीमधून पहात होती. समीर सावरला याचाच तिला आनंद होता.
त्या नंतर समीर वेळ असेल तेव्हा तिच्याशी गप्पा मारायला जाऊ लागला. त्यांच्या गप्पात कधी कधी भावे काका सामील होत. समीरच्या क्षेत्रातील जाणून घ्यायला भावे उत्सुक असत. अर्थात समीरला वकील पेशातील अनेक किस्से ऐकायला मिळत. तेवढीच करमणुक होई. हळू हळू दोन घरे स्नेहाच्या नात्याने जोडली गेली.आता तो नसला तरी परी त्याच्या आईला भेटायला येत असे. समीरच्या अनेक आवडी निवडी तिला त्याच्या आईकडून ऐकायला मिळाल्या.
affiliate link
कधी कधी तो तिच्या घरी सहज म्हणून गेला की ती त्याची आवडती डिश त्याच्यासमोर ठेवायची त्याला आश्चर्य वाटायच, मला काय आवडत हिला कस कळतं? पण तो हे तिला विचारत नसे. तो ही कुठे फिरायला गेला की सवितासाठी काही प्रेझेंट घेताना तिला काय आवडेल याचा अंदाज करून तिलाही गिफ्ट घेत असे. त्यांची ही मैत्री टिकून राहिली याच कारण त्यांची दोघांची समान आवड, “समान शिले व्यहनेषु सख्यम्” दोघांनाही नोव्हेल वाचायला आवडत. तो दर दोन तिन दिवसांनी तिला पुस्तक घेऊन येई. त्यांची ती मैत्री पाहून सोसायटीतील काही महाभाग उगाचच चर्चा करत पण त्यामुळे त्यांच्या मैत्रीवर काही परिणाम झाला नाही कारण ती मैत्री राधा-कृष्ण यांच्या मैत्री इतकीच पवित्र आहे हे दोन्ही घरात माहिती होते.
अधून मधून त्यांची समीरच्या लग्नाविषयी चर्चा चाले, ती हसता हसता विचारे, “समीर तुला कशी पार्टनर हवी, म्हणजे माझ्या पाहण्यात असेल तर नक्की सांगेन.” तो हसून म्हणे, “तुझ्या सारखी,घाऱ्या निळ्या डोळ्यांची, सावळी असली तरी रेखीव आणि उमदया स्वभावाची मला समजून घेणारी, मनकवडी.” ती हसून म्हणे, “म्हणजे तुला आदर्श नायिका हवी म्हण की” दोघ खळाळून हसत आणि माहोल बदलून जाई. त्याने मात्र कधीही तिची अपेक्षा तिला विचारली नव्हती, तिलाही मनी वाटत असावे आपल्याला समजून घेणारा, आपली काळजी घेणारा जोडीदार मिळावा पण ती शापित परी होती,जिच्या मनाची झेप तर प्रचंड होती पण —-
समीरला जेव्हा एखादे स्थळ आलं की ती उत्सुकतेने तिची चौकशी करत असे, कदाचित ती स्वतःला तिच्या जागी पहात असावी. अखेर समीरचा शोध संपला,त्याला त्याच्याच क्षेत्रात काम करणारी मेघना भेटली, म्हटलं तर दिसायला परी सारखी स्मार्ट पण थोडी गौर वर्णी. समीरने तिचा फोटो तिला पाठवला तेव्हा ती एकदम खुश झाली.
“Samir I like your choice, she is really beautiful.” समीरने ऐंगजमेटच्या वेळी तिची ओळख करून दिली. Meghna meet my
Family friend Pari, पुढच्या बिल्डिंगमध्ये रहाते. मेघनाला आश्चर्य वाटल, एका तडफदार पुरुषाची मैत्रीण एक अपंग मुलगी असावी. पण जेव्हा परीच्या सोशल प्लॅटफॉर्म वरून तिची माहिती मिळाली तेव्हा ती मोठ्या कंपनीत लिगल कॅन्सल्टंट असल्याचं पाहून तिचा गैरसमज दूर झाला. त्यांची मैत्री झाली. परीला मित्रा बरोबर बोनस म्हणून मैत्रीण मिळाली.
समीर आणि परी यांची निखळ मैत्री लग्नानंतर टिकून राहिली. समीरचे लग्न झाले तेव्हा सवितापेक्षा परीच जास्त आनंदी झाली. समीरने उगाच आपल्यात गुंतु नये असे तिला पहिल्या पासून मनोमन वाटत होते. मेघना आली आणि समीर तिच्यात गुंतून गेला. पण दर आठवड्यात दोघ परीला न विसरता भेटून येत. कधी टूर वर गेले तर मेघना तिच्या आवडीची वस्तू परिसाठी नक्की खरेदी करत असे.स्वतःचे आयुष्य कष्टमय आहे हे माहीत असूनही, फुलपाखरू जसा आनंद पेरतं, तसाच आनंद वाटणारी ती शापित देवता होती. ती परी होती.