पावसाच्या धारा
जून महिना सुरू होण्यापूर्वीच वळीव पडून गेला. विटाव्यात तसाही पाऊस कमीच पण हणमाच्या म्हाताऱ्यान पिकल्या मिशातून बोट फिरवत आभाळाकडे पाहिलं आणि हळू आवाजात पुटपुटला “पांडुरंगा ह्या वरसाला तरी पाऊस पाणी दे गा,जोंधळ पिकलं तरी चिंता मिटल, दया येवु दे रे देवा”इतर भागात खरीप आला की सणा सुदीला पोरा टोरांना नवी कापड,पोरांची हौस मौज,जमलंच तर घरच्या लक्ष्मीला एखांदा दागिना,दिवाळीला पुण्या-मुंबईची टिरीप पण च्या मायला ह्या विटाव्याच नशीब पार फुटक, जणू दुष्काळ पाचवीला पुजलेला. बर झाल हणम्या मुंबईला गेला. म्हतार स्वतःशीच बोलत होत.गावावरून ढग पळत होते,ते पाहून त्यांनी मनाशी अंदाज बांधला. आजूबाजूच्या गावाची चैन झाली की हा भडवा आमच्याकडे मुतणार, आगीन पेटलेली जिमीन त्यान कशी भिजणार? या गावाच्या नशिबी काय वनवास लिवलाय त्या ईश्वरालाच ठाव .म्हातार पार कावल होत.दोन वर्षा मागे हणम्यान म्हाताऱ्याला मोबाईल मुंबईवरून आणला होता.
“तात्या, यो तुज्यासाठी,मी तुला फोन करीन बर का ! वापराय साप सोपा हाय हे ऊजव्या हाताच्या वरच बटण दाबल की येक आकडा दिसलं,मंग डाव्या हाताच बटण दाबल की मला फोन लागल.ह्यो असा कानापाशी धरायचा नी बोलायचं,धर करून दाखीव मला” तात्या जाधवन घाबरत घाबरत फोन हाती धरला. हणम्यान सांगितल्या परमाण त्याच्याकडे बघून आधी उजव्या हाताच्या वरच,आणि नंतर डाव्या बाजुच बटण दाबल तसा हणम्याच्या हातातला फोन वाजायला लागला. तात्याला लय आनंद झाला,तरी बी हणामाकड बघुन तात्या म्हणला, “पोरा, याचा म्या म्हाताऱ्याला काय उपेग ? मला कंच्या कामावर जायचं हाय का कंच्या भौसाहेबाशी बोलायचं हाय?” हणम्या तात्याच्या हातातुन मोबाईल घेत म्हणाला. ‘आर तात्या मला तुझी आनी आयीची खुशाली कळल, आयला माझ्यासंग बोलता इल आणि जनीची खुशाली घेता इल अजून काय पायजेल?’ तात्याला ते आठवल आणि तात्यान मोबाईल बंडीतून काढून मोबाईल हणम्याला लावला, हणम्या पोरा मम्बयला पाऊस हाय का? “ तात्याचा अचानक प्रश्न ऐकून हणमा गोंधळाला ,तरी तात्याला बोलला “पडतोय की हित पाऊस,आपल्या गावाकड काय परीस्तीती हाये?” “आर पोरा इथ पाण्याचा थेब सुदा नाय,जिमीन तापून भट्टीगत उसासतिया अर्धा जून गेला, तीच चिंता हाय.”
“तात्या ,जे गावाचं होईल ते आपल तू बिनघोर –हा, पडलं तवा पडल, त्यो काय आपल्या हातात हाय होय.” तात्या केविलवाणा होत म्हणाला “तस न्हाय र, पण चार जोंधळ पिकल असत त आमचा दाणा–गोटा शाबूत नसता का –हायला? ” “तात्या तुज बरोबर हाय ,मीच आता त्या तुज्या विठ्याला सांगतो आमच्या गावावर किरपा कर नाय त तुज तोंड कंदी बघणार नाय.” हणम्याला आपल्या तात्याची विठ्ठलावर असणारी श्रद्धा माहित होती. “आर पोरा तो काळ्याच आत्ता जीवावर उठलाय नायत चार थेंब तरी पडलच असते कि नाय,सांगीलीला बदा बदा कोसळतो अन हथ एखांदी सर बी नाय,निदान बारक पोरग मुतत तितका तरी !” हणाम्याला तात्याच्या बोलण्याच हसू आल.पण तात्याला वाईट वाटलं म्हणून तो म्हणाला, “बर तात्या त्या पावसाला याच तेवा येवूदे तू जीवाला घोर लावून थोडाच तो यील,तू मायची काळजी घे,पाऊस पडला त कळीव बर का?”तात्यान नाराजीन बर म्हटलं.
मोबाईल खिशात ठेवत ठेवता त्याच्या बाजून धुरळा उडवत एसटी गेली तीच टप भिजलेल होत.तात्या एक जोरदार शिव हासडत म्हणाला, त्याच्या आयच्या xxx xxx xx ,ह्यो भाड्या नको त्याला जबरदस्तीन देतो आणि मागतो त्याच्याकड पाट फिरीवतो, देव कस म्हणाव याला ! ” एसटी मधून उतरलेले प्रवाशी पाठी येत होते,त्यांच्याकडे पाहत तात्यांन विचारल “ सोनबा एसटी कुठून आली म्हणायची ?” “का र तात्या कुणी यायचं होत का?” “तस न्हाई गड्या म्हणजे एसटी भिजलेली हाय म्हणून म्हणतो.” “अस्स होय, कराड वरून आली बगा” सोनबा कांबळे बोलाला. तस तात्या त्याच्याकडे पाहत म्हणाला “कुठवर हाय पाऊस?” सोनबा आकाशाकडे पाहत म्हणाला, “हाय की, वाटभर पाऊस हाय,म्हसोबाची हद लागली थीतून पावसाची सर बी लागली न्हाई.” तात्या डाफरत म्हणाला “त्या म्हसोबालाच कुठ तरी दूर टाकून याया हव म्हंजी पाऊस मुकाट हिथ पडल.” सोनबा त्याला समजावत म्हणला, “आर तात्या अस वंगाळ बोलू नाई,आपल ग्राम दैवत हाय ते,तोच गावाचा राखीन्दार त्याला दूर टाकल त आपल रक्षिन कोण करील? “ तात्या धुमसत बोलला, “काय करतो तो म्हसोबा,पाणी देतो का वावराला, पिकीवतो का शेती? ज्याला आपली पोर पोसता येत न्हाई त्याला बाप कशा पाई म्हणाव?” सोनबा, तात्याच्या बोलानं नाराज झाला, “तात्या अस हाई त सांग न तुझ्या विठ्याला पाऊस पाड म्हणून बघूया पाडतो तो का तो काळ्या? “ तस सोनबा बरोबरचा केशव टोपे हसून म्हणाला “ अर सोनबा ! तुमी कश्या पाई झट्या घेताय तुमी सांगून पडाय पाऊस काय तुमचा नोकर हाई होय? तो बोलायला अन कानठळ्या बसवीत ढग फाटायला एकच गाठ पडली, काशात जोरान लकाकल न विजेचा लोळ खाली कोसळला.डोळे दिपून गेले कोनालाबी कायबी दिसना,अन पाऊसाची सर कोसळू लागली सोनबान पाठी वळून तात्याला हाक मारली पण————
तात्या,तात्याला पांडुरंगाच आवतन आल नि विजेन त्याला गिळून टाकलं.सोनबा मनात म्हणला, म्हतार त्या म्हशाला दूर टाकाय बघित होता,त्या म्हशान तात्यालाच स्वर्गात धाडलं.त्यांनी बोंब मारली “तात्या काय र झाल,कशाला त्या म्हशाच्या वाटला गेलाता?” उतर द्यायला तात्या या जगात नव्हता.थोड्याच वेळात गाव जमा झाल. तात्याची घरवाली मोठ्यान रडत धावली,तीन स्वतःला तात्याच्या शरीरावर घालून घेतलं. “धनी मला का म्हनून सोडून गेला?मी माझ्या पोराला काय सांगू? हणम्या,तुझा बा आपल्याला सोडून गेला र” तिने त्याच्या कपळावर आपली काकण फोडली.दोघी तिघी तिला समजावीत होत्या पार्वती काकू जरा दमान घे तुझी पोरगी हित नाई तुला काय झाल त आमी काय करावं? इतक्यात तात्याच्या खिशातला मोबाईल वाजला.कोणीतरी तो काढून घेतला.फोन हणमाचा होता.त्याला काही सुच ना,सोनाबान फोन घेतला आणि हणमाला म्हणाला, “गा,हणमा,मी सोनबा कांबळे बोलतोय तू हिथ याया निघ गोष्ट वाईट घडली तुझा बा गावाला पाणी मिळाव म्हणून पांडुरंग घरी गेला.” हणमाला काही कळना,आता बा माझ्या संग बोलला त्याला अचानक झालं तरी काय? पण त्याला उत्तर मिळण्य आत फोन बंद झाला.म्हतार पांडुरंगाकडे पाऊस आणाय गेल इतकच त्याला कळल.
Heya i’m for the first time here. I found this board
and I find It truly useful & it helped me out much.
I hope to give something back and help others like you helped me.