पाश
संस्कृतीचा झाला नाश, लग्न वाटू लागले पाश, तुटे कुटुंबाचा आधार
ना उरला सहचरांत विनय, बिघडली नात्याची लय, शब्द झाले अंगार।
सौंदर्याचे मोल न उरले, भडक दिखाऊ ते तरले, देखणेपण उधार
लयास गेली मनाची श्रीमंती, कौतुकाचा भडीमार, शब्दांचा बाजार।
अनाहूतपणे होता नजरानजर, मी तिच्या सौंदर्याची शिकार
भेटीगाठी होताहोता गाठला टप्पा, वाटले जीवनाला आला आकार।
तिच्याविना करमेना, धडधडे काळीज पाहता, तिच्या लटक्या चाळ्याचा अधिकार
दिवसरात्र तिचाच ध्यास, प्रेमरोग, स्वातंत्र्य संपवत जाणारा गुढ आजार।
नात्याला मिळावा अर्थ, हाच असावा लग्न संस्कारामागील नेक विचार
तिच्या चित्रविचित्र मागण्यांनी मी त्रस्त, माझ्या जीवनात फक्त अंधार।
माझ्या प्रेमाच्या माणसाचा, तिटकारा, तिला हवा राजाराणीचा संसार
ती सुस्वरूप, सुशिक्षित, उच्च पगाराची तिची नोकरी, याचा तिला अहंकार।
अद्वैत कधीच न जुळले, तिचे माझ्यातील अस्तित्व, विटलेला उघडा संसार
ती अजूनही मजसमवेत राहते, यामागेही तिचा असावा काही दुष्ट विचार।
फसलो प्रेमाच्या जाळ्यात, उशीरानेच मज कळले उरले न मित्र न शेजार
मला संपवण्यासाठीच हा प्रेमाचा पाश,नियतीचा होता दुष्ट करार।
प्रेमरोग नव्हे बरा, ती हळू चढणारी सुरा, करू नका उशिरा तक्रार
झोपेच सोंग नव्हे बरे, न घेता माणूस बरळे, तिचे हसणे एक दुष्ट व्यापार ।
तिच्या बोलण्यातच सदैव आढ्यता, शब्दांना सहस्त्र शस्त्रांची धार
मी स्वतः मोहात पडूनी उठवला, माझ्या शांत जीवनाचा बाजार ।
तिला समजून घेता घेता, हरवून गेलो, मज नेत्री भविष्याचा अंधार
संसार थाटण्याची हौस फिटली, मतीच तिथे खुंटली ती सोन्याची कट्यार।
लग्नबंधनात जात असाल, घ्या मनाचा कौल, फसू नका सौदर्याला पडू देऊ नका भूल
दूरून जो मोहक दिसतो तो जरी सोन्याचा भासेल, पारखून पहा नाही ना वधाचा सूळ।