पोटासाठी दाही दिशा
आपल्याला काय खायला आवडते? म्हणजे बर्गर, पिझ्झा, चायनीज हे मला विचारायच नव्हते तर तुमच्या आहारात काय असेल तर तुम्ही आनंदी असाल? असं मला विचारायच होतं. तुमच्या मते तुम्ही पूर्णब्रह्म कशाला म्हणाल? का विचारतोय मी? अहो आम्ही शहरवासी जेव्हा दोन ठाय भरपेट जेवतो आणि वरून अन्न निट पचावं म्हणून छास, ताक,लस्सी किंवा कोल्ड्रिंक्सचा आग्रह धरतात, पण ग्रामीण भागात आजही बरेच लोक अर्धपोटी निजतात. मोदींची अन्नसुरक्षा तेथे पोचलेली नाही. सरकारने ८० कोटी जनतेला फुकट अन्न पुरवले असले तरीही अर्धपोटी रहाणाऱ्या लोकांची संख्या कोट्यवधी असेल. आजही अन्नासाठी वणवण फिरणारे कमी नाहीत. पोटात आग पडली की अक्कल गहाण पडते मग माणूस काही करायला तयार होतो तिथ प्राण्यांचं काय?
जशी लोकसंख्या वाढली गावातील जागा कमी पडल्याने नागरी वस्तीसाठी आपण जंगलांवर आक्रमण केले. त्यांच्या अधिवासात हस्तक्षेप केला मग जंगलातील प्राण्यांनी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीचा आसरा घेतला. बिबट्या, वाघ, वस्तीत शिरून आणि शेळ्या किंवा गाय अशा भक्षावर झडप घालून निघून जाऊ लागले. असे प्रसंग हल्ली वारंवार घडत आहेत. ज्यांची घरे किंवा झोपड्या राखीव जंगलाला लागून आहेत आणि ज्यांना शासकीय शौचकूपाची सोय नाही त्या कुटुंबातील लहान मुले आणि बायका प्रातःविधीसाठी पहाटे किंवा रात्री बाहेर पडताच दबा धरून बसलेले बिबटे त्यांची शिकार करत आहेत.
कोकणात गवेरेडे आणि हत्ती, तिलारी येथील जंगलातून पराड, वराड, काळसा, धामापूर, कुडाळ, सावंतवाडी येथे येऊन धुडगूस घालत आहेत. काही वर्षांपूर्वी या भागात कर्ली नदी किनारी कुळीथ, वरणे, फजाव, वाली यांनी संपूर्ण पट्टा हिरवागार दिसत असे आज गवेरेडे सगळ फस्त करत असल्याने येथील शेतकऱ्यांनी हिवाळी पिक घेणे बंद केले आहे. उत्तम प्रतीचा कडवा वाल किंवा वरणे येथे होत असत असं भविष्यात ऐकायला मिळेल. किनारी होणारी सोनयाळी केळीसुध्दा नाहिशी होत आहेत. यापूर्वी फक्त माकडांचाच उपद्रव कोकणात होता आता मोठ्या संख्येने केडलं, लाल तोंडाची मोठी माकडे आणि संरक्षित शेकरू अचानक येऊन केळी, आंबे याच्या बागा उध्वस्त करत आहेत. विविध कारणांमुळे जंगल विरळ झाल्याने तेथे त्यांना मिळणारी फळे, फुले कमी झाल्याने अन्नाच्या शोधात हे प्राणी गावाकडे स्थलांतरित होत आहेत.
मुख्य म्हणजे हल्ली सगळेच प्राणी आक्रमक झाल्याचे दिसत आहे. हत्ती रस्ता अडवून टोल वसूल केल्याप्रमाणे भाजीचे टेंपो, ऊसाचे ट्रक अडवून डल्ला मारत आहेत. तुम्ही कोणत्याही पर्यटनस्थळी गेलात तर माकडांचा गराडा तुमच्याभोवती पडतो. तुमच्या हातात खाण्याची वस्तू असली तर काही कळायच्या आत माकडे ती लंपास करतात. खाण्याची वस्तू पिशवीत असल्याचे त्यांना जाणवले तर पिशवीही माकडे ओढून घेऊन जवळच्या झाडावर किंवा छपरावर जाऊन बसतात. पोटाची भुक भागवण्यासाठी ती न कचरता गावात तसेच पर्यटन स्थळी बिनधास्त वावरताना दिसतात. कोल्हापूर, सोलापूर, बीड या भागात कोल्हे उसाच्या मळ्यात थैमान घालत असतात.
यापूर्वी अतिशय उंचावर उडणारी घार क्षणात खाली मुसंडी मारत कोंबडीचे पिल्लू, प्रसंगी मांजरीचे पिल्लू उचलून घेऊन जात होती. पण आता दाट जंगलातील गरूड, ससाणा इत्यादी पक्षीही गावात येऊन शिकार करू लागले आहेत. गरूड उंचावरून उडत येत समुद्रातील मासे घेऊन जातानाचा व्हिडीओ आपण नक्की पाहीला असेल. अगदी लहान कोकरालाही ससाणा उचलून घेऊन जातो. अन्नाच्या शोधात जंगली प्राणी मोठे धाडस करत आहेत. मोठमोठाले अजगरही घरातील अडगळीत लपून रात्रीच्या अंधारात शेळी, बकरी, पाळीव कुत्रा यांना आपले भक्ष्य बनवत आहेत. मारले जाण्याचे भय असुनही अन्नाच्या शोधात प्राणी हे धाडस करत आहेत. सोशल मेडियावर या गोष्टी दिसू लागल्याने त्याचे गांभीर्य नष्ट झाले आहे. दोन तीन दिवसांपूर्वी बिबट्याने एका माणसाला फाडून खाल्ल्याचा फोटो व्हायरल झाला होता. किती मुर्खपणा? बिबट्याने विद्रुप केलेल्या माणसाचा फोटो व्हायरल करण्याची गरज होती का? पण आमच्या संवेदना इतक्या बोथट झाल्या आहेत की काय फॉरवर्ड करावे ह्याचे तारतम्य संपले आहे.
अजगर एखाद्या लहान मुलाला गिळतानाचा व्हिडीओ
सहज व्हायरल केला जातो हे दुर्दैव. शहरात प्रत्येक चौकात दहा विस कुत्रे सहजच दिसतात आणि त्यातील एखादा कधीतरी आक्रमक झाला तर एखाद्या लहान मुलाचा लचका तोडतो.मलाही याचा प्रसाद मिळाला आहे. मनेका गांधी मंत्री होत्या तेव्हा पशूंना हिस्त्र वागणूक देण्याच्या विरोधात जे कडक कायदे केले त्याचे हे फलित आहे.
जे प्राण्यांचे तेच माणसाचे, चरितार्थासाठी त्याला आपल्या मुळ घरापासून फारकत घेऊन जिथे चरितार्थ चालेल अशा जागेच्या शोधात बाहेर पडावे लागत आहे. माणसे नदीकिनारी वस्ती करून राहू लागली याचे कारणच जीवनासाठी पाणी, आणि पोटासाठी अन्न हे नदीच्या किंवा समुद्र किनारी सहज शक्य होत होते. मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृती काय सांगते? गुजरात मधील मोंसेर ही कोणे काळी सरस्वती किनारी नांदणारी संस्कृती होती. सरस्वती नदी लुप्त झाली तशी ही नागरी वस्ती येथून स्थलांतरित झाली.
स्वातंत्र्य पूर्व काळात दक्षिण आफ्रिकेत भारततातील कामगार निळीच्या मळ्यात काम करत होते जेथे महात्मा गांधीनी त्यांच्या हक्कासाठी सत्याग्रह केला होता. आज अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, ओमान, कतार अशी अरेबिक राष्ट्र आणि सिंगापूर, मलेशिया इंडोनेशिया या देशातही भारतीय आपल्या पोटाच्या शोधत स्थलांतरित झाले आहेत. खूप वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया येथील काही भागात कमी खोलीवर सोन्याचे दगड मिळत होते. ठराविक पैसे सरकारला भरले की मर्यादित क्षेत्रफळाचा प्लॉट सोने उत्खनन करण्यासाठी मिळत असे आणि लोक आशेने मेटल डिटेक्टर घेऊन शोध घेत असत. पोटासाठीच नव्हे तर श्रीमंत होता यावे जगण्याची चांगली लाईफ स्टाईल मेंटेन करता यावी यासाठी लोक विविध देशात जातात आणि समुहाने रहातात. आज कॅनडा, इंग्लंड, इटली येथे मोठ्या प्रमाणात शीख समाज भारत येथून गेला आहे. मुख्य म्हणजे येथे विविध उद्योग धंद्यात ते जम बसवून आहेत.
याच प्रकारे केरळ येथील अनेक मुली अरेबिक देशात नर्स म्हणून कार्यरत आहेत तर बंगाल मधील सोन्याचे दागिने बनावणारे कारागीर मुंबईत आपले नाशिब अजमावून पहात आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर येथील सुशिक्षित आणि उच्चवर्णीय कुटुंबातील मुले, मुली परदेशात स्थायिक झाली असल्याने घरातील शुभकार्यासाठी पुरोहित, भटजी, गुरुजी यांची मागणी वाढली आहे. उच्चशिक्षित असले तरी आपल्या सांस्कृतिक परंपरा जपणे त्यांना गरजेचे वाटते. आपल्या पुढील पिढीवर योग्य संस्कार व्हावे यासाठी ते दक्ष आहेत. या पुरोहितांनी आपल्याला चांगले दिवस यावेत यासाठी ग्लोबल होण पसंत केलं आहे. त्यामुळे पुजेची वेगवेगळी पॅकेज हे गुरुजी देत आहेत. म्हणजे भटजीसुध्दा परदेशी सेटल झाले आहेत.
मध्यंतरी ट्रंप यांच्या काळात अमेरीकेने नवीन व्हिजा देणे बंद केले होते. परदेशातून अनेक मुले,मुली अमेरिकेत कामासाठी येत असल्याने स्थानिक लोकांचे रोजगार बुडत आहेत असे कारण देत व्हिजावर बंदी घातली होती. आयटी कंपन्या अधूनमधून कामगार कपात करत असते त्यामुळे जे परदेशात मोठ्या कंपन्यामध्ये कार्यरत आहेत त्यांची जोखीम वाढत आहे. भारतातही अधूनमधून आयटी कंपन्या कामगार कपातीच धोरण राबवत आहेत. सरकारी नवीन नोकऱ्यांचे प्रमाण घटले आहे. खाजगी कंपन्या आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन करत असल्याने कौशल्य कामगारांच्या हाताला काम नाही त्यामुळे पोट जगवण्यासाठी कमी वेतनात कोणतेही काम कंपन्या सुशिक्षित बेरोजगार मुलांकडून करून घेत आहे . खरेच तर पोटासाठी दही दिशा आशिच परिस्थिती ओढवली आहे.
ग्रामीण भागात ट्रॅक्टर, रोटावेटर, पीक कापणी यंत्र,थ्रशर अशी विविध साधने शेतीसाठी वापरात येत असल्याने लोकांच्या हाताला काम नाही.
स्मशानजोगी हे भयावह कपडे घालून भिक्षा मागतात पण त्यांचे लक्ष असते स्मशानभूमीत दहनासाठी येणाऱ्या मैतावर कारण पुर्वी दहन करणारे त्या व्यक्तीच्या तोंडात सोन्याचा दागिना, सवाष्ण असेल तर किमान एखादा सोन्याचा मणी हमखास ठेवला जात असे. आज त्यांची परिस्थिती गंभीर आहे. वर्षानुवर्षे पांगुळ बैल वाले, अस्वल घेऊन फिरणारे, वासुदेव आला म्हणत फिरणारे, संबळच्या तालावर सांकेतिक भाषा ओळखणारे, डोंबारी, पाऊस कमी झाला की पोटासाठी शहराकडे धाव घेतच होते. संबळ आणि हाताच्या खाणाखुणाणी भाषा ओळखणारे आजही शहराकडे येतात मात्र भविष्यात ही गुप्त भाषा समजणारे संपत आहेत.
धवड म्हणजे लोहार, सांगली, सातारा, कोल्हापूर येथून व्यवसायासाठी सिंधुदुर्गात आजही उतरतात. कर्नाटकातून टोपल्या विणणारे बुरुड, भजन गाणारे येतात. पोट भरण्यासाठी लोक काही काळासाठी आपला मुक्काम हलवतात. यात उसतोड कामगारही आलेच, ते तर उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यातुन आपल्या चिल्यापिल्ल्यांसह सांगली, सातारा, नाशिक, नगर येथे येतात आणि साखर हंगाम संपला की पुन्हा आपल्या गावाकडे जातात. वस्ती शाळेची आणि फिरत्या शाळेची कल्पना या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी राबविण्यात आली.
बांधकाम क्षैत्रात काम करणारे मजूर बिहार, ओरीसा, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान येथून याच प्रकारे कामासाठी शहराकडे येतात. बांधकाम बारामाही सुरू असते परिणामी फारच थोडे मजूर पावसाळ्यात आपली शेती करण्यासाठी घरी जातात कारण शहरात मजूरी मिळण्याची खात्री असते मात्र शेतीतून हमखास उत्पन्न मिळण्याची काहीच खात्री नसते, सारे काही निसर्गाच्या आधीन.
हिवाळ्यात काही पक्षी हजारो मैलांचा प्रवास करून भारतात विणीच्या हंगामासाठी आणि अन्नाच्या शोधात येथील पाणथळ जागेत येतात. याच काळात युरोपातील थंडी टाळण्यासाठी मासे भारतीय समुद्रात येतात. निसर्गाने प्रत्येक जिवाला पोटासाठीकाही कला, काही ना काही साधन दिले आहे. निसर्ग कुणाला मारत नाही असे म्हणतात.
फार पूर्वी नवीन भुप्रदेशाच्या शोधात शोण भारतात आले, मग मुघल आले, पूढेपूढे भारतात येणाऱ्या लोकांची जणू स्पर्धाच लागली. व्यापाराचं निमित्त पूढे करत इंग्रज आले, पोर्तुगीज आले, डच आणि फ्रेंचही आले. प्रत्येकजण या स्वर्णभुमीची लुटमार करुन गेला आणि येथील जनतेला हाल अपेष्टांच्या खाईत लोटून गेला. अर्थात आपण निर्धाराने पून्हा उभे राहिलो. एक काळ आम्ही लोकसंख्या मर्यादित असुनही अन्न आयात करत होतो पण आज आपण अनेक देशाना अन्न निर्यात करत आहोत. गरीब राष्ट्रांना करोना काळात आपण निशुल्क अन्न पुरोवठा करण्या इतके आपण सक्षम झालो. आज भारतातील लाखो विद्यार्थी शिक्षण, नोकरी आणि स्थैर्य याचा विचार करून विदेशात स्थाईक होण्याची स्वप्न पाहत जात आहेत.
मुंबईत गुजरातमधून गुजराती, राजस्थान मधून राजस्थानी, बिहारमधून बिहारी, उत्तरप्रदेशातून भय्ये, कर्नाटकातून शेट्टी आणि आंध्र, तामिळनाडू मधून. मद्रासी आले आणि येथे त्यांनी आपापले व्यवसाय केले. आम्ही माहाराष्ट्रीय लोकांनी काय केले तर गीरणीत कामगार किंवा रामागडी.
चाळीस वर्षापूर्वी सफाळ्यातील अनेक वनवासी बायका जंगलातील सुक्या फाट्यांची मोळी घेऊन सफाळ्यातून विरार ते भाईंदर पर्यंत रेल्वे गाडी पकडून विकायला जात असत. माकडवाले, अस्वलवाले मदारी गावा गावातून आपले माकड किंवा अस्वल घेऊन कमाईच्या शोधात फिरत असत. स्वतःच्या पोटासाठी आणि कुटुंबासाठी वणवण करावीच लागे. रस्त्यावर खेळ करणारे मदारी आपल्या मुलांची आणि स्वतःच्या जीवाची बाजी लावत छातीवर दगड फोडणे, स्वतःच्या मुलाच्या डोक्यावर किंवा हातात नारळ ठेऊन डोळे बांधून तलवारीने नारळ फोडणे, पेटत्या रिंगमधून उडी मारणे. पेटती वात किंवा कपडा गिळून दाखवणे, असले घातक खेळ दाखवत असत. कुणी दिलं तर शिळं अन्न खाऊन राहण्याची त्यांची तयारी असे. थोड्या फार प्रमाणात सर्कसमध्ये हेच प्रकार पहायला मिळत. सर्कसमध्ये झुला किंवा लँडरवर काम करणाऱ्या अल्पवयीन मुली किंवा मृत्यूगोल मध्ये स्कुटर चक्राकार फिरवणाऱ्या जोड्या या पोटासाठी कोणतेही आव्हान स्वीकारायला तयार होतात.
रिकामे पोट अन्नाची चोरी करायला लावतं, तसं धनही लुटायला लावतं. वाल्या कोळी वेगळं काय करत होता.
स्वतःच आणि कुटुंबाचं पोट भरता यावं म्हणून तो लूटमार करत होता. खूप वर्षांपूर्वी एक बोईंग पर्वतीय रांगात पडल होतं. अपघात ग्रस्त विमानाचा शोध घेतला जात होता परंतू ढगाळ वातावरण आणि दरीमुळे माग लागत नव्हता. या अपघातात काही व्यक्ती मेल्या आणि सुटल्या. सुरवातीला विमानात आणि प्रवाशांकडे काही सुके खाद्य होते त्यावर त्यांनी काही दिवस ढकलले. अपघातात जे वारले होते त्यांचे कपडे जाळून उब मिळवत होते आणि बर्फ वितळवून पाणी मिळवत होते. दोनचार दिवसात अन्न संपले त्यानंतर खरा संघर्ष सुरु झाला. जे अपघातात जायबंदी झाले होते आणि मरणाची वाट पहात होते त्यांनाच मारून खाण्याची पाळी जिवंत माणसांवर आली. भुक पोटाची असो की शारीरिक ती भागवण्यासाठी माणूस प्रसंगी पशू बनतो. तिथे तेच झाले. जायबंदी असलेल्या माणसांचे मास भाजून खाऊन त्या़नी काही दिवस काढले. अखेर शोध मोहिमेला यश आलं आणि अपघातग्रस्त विमान सापडलं. आजही या घटनेचं वर्णन ऐकलं तरीही अंगावर काटा येतो. जगण्यासाठी कोणतही दिव्य पार पाडण्याची माणसाची तयारी असते.
एकोणीसशे सत्तरच्या दशकात भारताची संख्या जेमतेम पन्नास करोड असावी पण तेव्हा अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नव्हतो त्यातच १९७३, ७४, ७५ साली अवर्षण झाले.परिस्थिती गंभीर होती. पोटाला अन्न नव्हतं, हाताला काम नव्हतं, पाकिस्तानशी युद्ध झाल्याने आर्थिक परिस्थिती गंभीर होती. ज्यांच्याकडे अन्नसाठा होता त्यांना पुढील वर्षाची चिंता होती. ग्रामीण भागातील लोक हाताला काम आणि पोटाला अन्न मिळावं म्हणून शहराकडे धाव घेत होते.
आज भारताची लोकसंख्या १४० करोडपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे भारतातील नागरीकांचे सरासरी वय ३० ते ४० आहे. म्हणजे आज तरी भारतासाठी हा काळ सुवर्णकाळ आहे. आज भारत तरूणांचा देश आहे. मात्र पुढील विस वर्षात परिस्थिती बदलेली असेल. आज जरी भारताची लोकसंख्या प्रचंड वाटत असली तरी जननदर कमी होत आहे आणि मृत्युदर घटत आहे. त्यामुळे भविष्यात भारत हा वृद्ध आणि अवलंबित्व असणाऱ्या नागरिकांचा देश बनण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मुख्य म्हणजे जनन दर कमी झाल्यामुळे कमावत्या हातांची संख्या तेव्हा कमी झालेली असेल. तेव्हा जगण्याची स्पर्धा जास्त अवघड असेल.
भारतात दर वीस दिवसांनी लोकसंख्येत 10,00,000 ची भर पडते. दोन हजार पंधरा साली आपल्या मुंबईची लोकसंख्या एक कोटी चोवीस लाख होती आज ती दोन कोटी वीस लाखापेक्षा जास्त आहे, म्हणजे गेल्या आठ वर्षात ती जवळजवळ दुप्पट झाली. का? याचं कारण देशाचा असंतुलित विकास हेच असावे. मुंबई हे जगातील जास्त मनुष्य घनतेचं तिसरे शहर आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यातुन लोक नोकरी आणि रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी मुंबई, पुण्यात येतात. येथे बिहार,
राजस्थान, उत्तरप्रदेश येथून बारा ते चौदा वर्षांची मुले सायन धारावी भागात बालमजुर म्हणून काम करतात. ही मुलं धारावीत छोट्या मोठ्या कारखान्यात चौदा चौदा तास विडी वळणे, चामड्याच्या पर्स बनवणे,चांदी गाळणे, वस्तीत फिरून इडली, दोसा विकणे अशी कामं करतात.
मुंबईत एखादा फुटपाथ अथवा कमी वर्दळीचा रस्ता दिसला की तेथे बाहेरून आलेले लोक तो काबीज करतात. दादरसारख्या गजबजलेल्या भागात पश्चिमेला गोपाळ इंडस्ट्रीयल इस्टेट इथे तसेच कामगार मैदान येथे वस्ती करण्यातही ते कचरले नाही. अनेक वेळा मनपा अतिक्रमण हटाव विभागाने त्यांच सामान रस्त्यावर फेकून दिलं, एका रात्रीत त्यांनी त्यांची झुग्गी उभी केली. या मुंबईत आपल्याला पाय रोवून उभं रहायचं आहे हा विचार मनी बिंबवून ते येणाऱ्या परिस्थितीवर मात करतात.
मुंबई प्रमाणे, पुणे, दिल्ली, कलकत्ता, अमृतसर, अहमदाबाद, गांधीनगर येथे अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत आणि बालमजूर मोठ्या संख्येने आहेत. देशातील बिहार, राजस्थान, उत्तरप्रदेश, मेघालय आणि नागालँड येथील जननदर 4 मुले प्रती महिला आहे. म्हणून कामाच्या शोधात ही कुटुंबे मुंबई, पुण्यात डेरा टाकतात. येथे त्यांना आपल्या उपजीविकेचे साधन मिळते. ते नाही मिळाले तर हात पसरण्याची मानसिक तयारी त्यांनी केलेली असते. मुंबई जगाच पोट भरते मग या चार अतृप्त लोकांचं का भरणार नाही पण हाच विचार मुबंई विकासाच्या आणि सुविधांच्या मुळावर बसला आहे. मुंबईत जेवढी श्रद्धास्थानं आहेत तुम्ही कोठेही जाऊन पहा, तेथे वेगवेगळ्या वयातील असंख्य भिक्षेकरी तुम्हाला दिसतील. भाविकांच्या भावनेला साद घालत ते स्वतःच पोट भरत आहेत.
भारतात ज्या ज्या ठिकाणी आपली तिर्थक्षेत्र आहेत तेथे प्रत्येक ठिकाणी असंख्य भिक्षेकरी तुम्हाला दिसतील. नुकतेच जम्मू येथील वैष्णोदेवी आणि अमृतसर येथील सुवर्ण मंदिर येथे जाण्याचा योग आला तेथेही रस्त्यावर मुले भीक मागताना पहिली. तेथील एक महिला माझ्याकडे अजिजीने पीठ विकत घेऊन द्या म्हणून मागे मागे फिरत होती. “साहब पैसे नही मांग रही हू,बच्चोंकेलिऐ सिर्फ आटा खरीद के दे दो.” मी ते गांभीर्याने घेतले नाही. थोड्याच वेळाने या महिलेने तेथील भर वर्दळीत एका दुकानातून पाच किलो पिठाची पिशवी आपल्या दुपट्ट्यात गुंडाळून पळ काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. बाजूच्या दुकानातील माणसांनी ते पहिले त्यांनी आरडा ओरडा करत तिला बोलावले. नाईलाज म्हणून ती परतली, तिने पिठाची पिशवी ठेवली आणि वाटेला लागली. महिला असल्याने तिला व्यापाऱ्यांनी मारले नाही. तिच्या सोबत तिच्या पेहरावातील तीन चार महिला होत्या. तिच्या चेहऱ्यावर हातून अपराध घडल्याची पुसटशी रेष नव्हती. पोटाच्या भुकेने तिला निर्लज्ज बनवली होती. आपण पंजाब राज्य सुजलाम, सुफलाम समजतो वास्तवात तेथे पैशांसाठी सायकल रिक्षावाले गिराईक शोधत फिरत असतात. गुरूव्दाराबाहेर लोक भिक मागत असतात.
असेच आठ दहा वर्षापूर्वी एका लग्नाच्या हॉल समोर असलेल्या कचरा कुंडीतील थर्माकोल पत्रावळ शोधून त्यावरील अन्न चाटून खातांना मी एक भिकारी पाहिला होता. एकीकडे लग्न समारंभात बुफे पध्दत असून लोक आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न वाढून घेऊन ते टाकून देतात तर दुसरीकडे याच पत्रावळीत राहिलेले अन्न चाटून खाण्याची परिस्थिती कुणावर येते. किती हा असमतोल?
प्रामुख्याने मंदिर, मस्जिद येथे विशेष सणावाराला भाविक दर्शनासाठी जातात तेव्हा ज्या क्षणी भक्त त्या पवित्र स्थळातुन बाहेर फडतात, दहावीस हात मागण्यासाठी पूढे येतात. अगदी पायावर डोकही ठेवतात. त्यांची ती असहायत्ता पाहिली की गदगदून येत. आपला हात नकळत खिशात जातो. पण निट निरीक्षण केलं तर नक्की लक्षात येईल, भिक मागणाऱ्या या षुरुष, बायका किंवा मुलांपैकी काही धडधाकट असतात. गंमतीचा भाग म्हणजे तुमच्याकडे सुटे पैसे नाहीत अस तुम्ही सांगितले तर ते तुम्हाला अगदी पाचशे रुपयांचे सुटे देण्यासाठी तयार असतात मग तुम्हाला त्यांना भिक न द्यायला काही कारण उरतच नाही.
श्रम न करता सहज पैसे मिळवता येतात म्हणून ते या मार्गाचा अवलंब करतात. आमच्या वाण सामान विक्रेत्याकडे एक बाई मी पाहिली जीने अडीच हजाराची चिल्लर देऊन नोटा घेतल्या. तेव्हा भिक मागणे ही कधीकधी अपरिहार्यता असते तर कधी ते प्रोफेशन असते. आपल्या साध्या स्वभावाचा ते फायदा घेत असतात. त्यांचा चेहरा आणि शरीराची लय किंवा हालचाल हेच त्यांचं भांडवल असते. कधीकधी एखाद्या वाहिनीवर एखादा भिकारी रस्त्यावर थंबीने कुडकुडून मेल्याचा व्हिडिओ आपण पाहतो, ज्याच्याकडे लाखो रूपयांची रोकड सापडते. आयुष्यात खूप पैसे जमवायचे या एकाच ध्येयाने काही भिकारी फक्त कमवत संचय करत राहतात. स्वतःच्या पोटास खातही नाही आणि स्वतः त्या पैशांचा उपभोगही घेत नाही. किती विपर्यास एकाच वेळेस पहायला मिळतो.
मात्र कष्टकरी लोकांची एक वेगळी जमात शहरात अवघड कामात तप्तर असते हे लोक आदेशानुसार नवीन रस्ते, गटार, विज वितरण वाहक यांची उभारणी, खाणातून कोळसा काढणे आणि अशीच कष्टाची शेकडो कामे करण्यासाठी तत्पर असतात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ते ही काम अविरत करत असतात. कामाच्या शोधात ते झारखंड, छत्तीसगड राजस्थान येथून तसेच मध्यप्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथून महाराष्ट्र येथे येऊन गटागटाने राहतात.
आध्र, तेलंगण येथील कामगार कामाच्या शोधात मुंबई, बंगलोर येथे येतात. शहरात बनणाऱ्या अति उंच इमारतीवर आपली नजर ठरत नाही. याच इमारतीच्या भिंतीला बाहेरून गिलावा देण्याचे किंवा रंग देण्याचे काम ते पोटासाठी करत असतात. तीस,चाळीस मजल्यापर्यंत बांधलेल्या लाकडी परातीवर एका हातात भरलेल घमेलं आणि दुसऱ्या हातात थापी अशी जोखीम घेत गाण गुणगुणत त्यांचं काम सुरू असत. त्यांचं जीवनातील आव्हान पाहिलं की त्यांच्या समोर आपण थिटे आहोत याची जाणीव होते. बिचारे खरोखरीच घर दार आणि प्रसंगी पत्नी आणि मुलं यांना सोडून दहा दिशांनी अन्नासाठी वेगवेगळ्या शहरात पोट जाळायला येतात. घर संसाराच्या चिंतेपुढे उंच इमारतीची आणि मरणाची भिती सामान्य वाटते. बरेचदा या कामगारांची अधिकृत नोंद कंत्राटदार करत नाही परिणामी अपघातात हा कामगार मेला तर त्याचे घरचे दाद फिर्याद मागू शकत नाहीत. त्याच्या कुटुंबाला कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही. मागील महिन्यात झारखंड येथील बोगद्यात अडकलेले कर्मचारी असेच पोटासाठी आपला जीव हातावर घेऊन काम करत होते.
अर्धशिक्षित तरूणांनाच नव्हे तर आजच्या सुशिक्षित तरूणांना हेच आव्हान पेलाव लागत आहे, उच्च शिक्षण, बदललेली जीवनशैली आणि अपेक्षा यांच्या ओझ्याखाली ही पिढी दबत आहे. आपली स्वप्न येथे पुरी करणे अशक्य आहे हे लक्षात आल्याने. पोस्ट ग्राज्यूऐशन नंतर त्यापुढील शिक्षण घेण्यासाठी प्रसंगी आपल्या वडिलांचे घर गहाण ठेवून बँक कर्ज घेऊन ती शिक्षण व तद्नंतर नोकरीच्या शोधात आपली जन्मभूमी आणि जन्मदाते यांना सोडून जगाच्या पाठीवर भ्रमंती करत आहेत. शिक्षण घेत असतानाच त्यांना आपले तेथील खर्च भागवण्यासाठी सामान्य कामगार म्हणून पार्ट टाईम नोकरी करावी लागते. तुमचे शिक्षण, घराणे तेथे आड येऊन चालत नाही. अगदी वेटरची नोकरी स्वीकारून स्वतः पुरते कमवावे लागते. पैशांचे नाटक कोणाला करता येत नाही. शेवटी प्रश्न जगण्याचाच आहे. कोणी दोन वेळचे अन्न मिळावे म्हणून झुंजत आहे तर कोण समाधानकारक जगता यावे याचा शोध घेत पळत आहे.
आपल्या गुजरात राज्यातील कोळी बऱ्याचदा मासेमारी करता करता पाकिस्तानमध्ये पोचतात, याच प्रकारे तामिळनाडू येथील मासेमारी करणारे श्रीलंका हद्दीत पोचतात आणि खितपत तुरुंगात पडतात. राज्याराज्यातील मासेमारी करणाऱ्या लोकांमध्यवर्ती सागरी सिमेवरून वाद आहेत, पर्सेसन नेट वापरून किंवा लेझर वापरून मासेमारी करणारे इतर कोळी बांधवांच्या हक्कांवर गदा आणतात.
तेव्हा संघर्ष अटळ असतो. स्वतः जगण्यासाठी आणि कुटुंबाला जगवण्यासाठी सतत आव्हानांचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागातील आणि विशेषतः पर्वतीय भागात पावसाचे चार महिने कसे काढावे याची सतत भ्रांत असते. पोट जाळण्यासाठी काहीही करावं लागत आणि तरी आम्ही त्याला यज्ञकर्म संबोधतो ही तर गरीबाची चेष्टा झाली.
लहानपणी आगगाडी काय म्हणते ते नीट ऐक अस मोठी माणसे म्हणत आणि त्या इंजीनाच्या आवाजात काय दडलय ते आता कळतय. ‘कशासाठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी, झाक झुक झुकू झुकू झाक झुक झुकूझुकू.’ तेव्हा ती गाडी कोळसा खात पळायची आणि लोकांना त्यांच्या अन्नासाठी इप्सित स्थळी घेऊन जायची. तेव्हा हे पोट नसतं तर पुढचे प्रश्नच उपस्थित झाले नसते हे खरं पण..! म्हणून म्हणतो जगण्याची झुंज न कधी संपली अन संपणार ही नाही. कोणाच्या पोटाला कोरडा भाकर तुकडा पुरतो तर कोणाला समोर मिष्टान्न असली तरी पोट मारावं लागतं. प्रत्येक माणसाची कथा निराळी व्यथा निराळी. आपले प्राक्तन म्हणत कुथत बसायच की झुंज देवून प्राक्तन घडवायचं हे आपल्याच हाती.
‘चरैवती चरैवती.’ हा मंत्र पशूपक्षी आणि माणसांनाही तंतोतंत लागू पडतो. भविष्यातील आव्हानांचा पाठलाग करत हे चक्र असेच चालू रहाणार आहे युगाच्या अंतापर्यंत!
क्रमशः