प्रजासत्ताक
शाळेत असताना प्रजासत्ताक दिनी स्वप्नात तिरंगा यायचा तसा तो आता येत नाही
समुहगान म्हणताना यायची छाती फुलून, गर्व वाटायचा तसा मनी आता वाटत नाही
आता नको त्या मनोव्यापाचा इतका गुंता वाढलाय की तिरंग्याचा रंग मनी झालाय धुसर
तेव्हा प्रभातफेरी, घोषणा यांनी रस्ता दुमदुमत होता गर्जत होता गावाचा शांत परिसर
जण गण मन म्हणतांना लागणारा सूर आणि ती ५२ सेकंद
ह्याची गुंज होती अंतरी
प्रजासत्ताक दिनाची धामधूम, पताका, बँड पथकाचे संचलन, आमची कवायत सारेच मनोहारी
पितळेच्या तांब्यात निखारे घालून करत होतो इस्त्री, नाचत होत्या कोऱ्या गंधाच्या आनंद लहरी
ध्वजवंदन उरकल्यावर शाळेतील चॉकलेट, हाती तिरंगा चवीचे गोडधोड प्रत्येकाच्या घरी
शाळा सुटली तरी बेलचा निनाद, पदपथावरील शिस्तबद्ध संचलन ठसत होतं अंतरी
बरेच अंतर पडले, विद्यार्थी आणि “व्यवहारी मी”, आता सुट्टी उपभोगत लोळतो घरच्या घरी
या राष्ट्रचे आम्ही नागरीक फक्त हक्कांपुरते, मी प्रथम, देश नंतर, इतके स्वार्थी, संसारी
आमचे नेते मात्र पक्के हिशोबी, आज खादी, टोपी गांधी, लिखित भाषणाची पुरी तयारी
या नेत्यांचे नेतृत्व आम्हालाही मान्य कारण आम्हाला कुठे जमते कुणाशी हाणामारी?
यांच्यावरती गंभीर गुन्हे तरी ते निवडून येती आणि यांच्या हाती सत्ता, तिरंग्याची दोरी
काही उत्सवी लोकांसाठी प्रजासत्ताक म्हणजे हक्काची सुटी
पिकनिकसाठी तयारी
एखादा गड, एखादे रिसॉर्ट, पिण्याची, खाण्याची चंगळ आणि हाती तीन पत्ते भारी
तेव्हा समृद्धी नव्हती पण देशावर, गावावर आणि शेजारच्या
कुटुंबावर होत तितकच प्रेम
आता मोठ्या इमारती, प्लेनचा प्रवास, उंची हॉटेल्स, शेव्हरलेट सगळाच पैशांचा गेम
अजूनही आठवतात मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, मृणाल गोरे, डांगे, ठाकरे आणि एस. एम.
फक्त देशहित अन समाजसेवा ना गाडी, ना पैसा, समर्पित
जीवन ना पैसा ना लेनदेन
मात्र आजही जेव्हा राजधानीत पदपथावर सैन्याचे संचलन आणि आकाशी विमान भिरभिरते
माझ थोटं मन पून्हा घेत झेप अन फडकणारा तिरंगा पाहून
मनात उत्सहाचे कारंजे थुयथुयते