शेवटचे विमान

शेवटचे विमान

शारदाश्रम इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असतांना सचिन तेंडुलकर याला १९ वर्षाखालील संघातून परदेशात जाण्याची संधी होती. त्याला परदेशात जाण्यासाठी बोनाफाईड सर्टीफिकेट तातडीने हवे होते. खरं तर बोनाफाईड देण्यासाठी फारसा कालावधी लागतही नाही, परंतु नियमानुसार म्हणा किंवा काही अन्य कारणांमुळे त्यावेळच्या मुख्याध्यापिकानी हे सर्टिफिकेट द्यायला संध्याकाळचे चार वाजवले. तरीही सचिनने दुसऱ्या दिवशी विमान पकडून पाकिस्तानमध्ये धावा कुटल्या पण असं भाग्य सर्वांच्या वाट्याला थोडंच येतं. शेवटच्या विमानाची वाट पहात थांबाच का? मात्र या एकाच कसोटीने सचिनची भारतासाठी उपयुक्तता सिध्द केली हे अलहिदा. सचिनला बोनाफाईड सर्टिफिकेट उशिराने दिल्यामुळे त्याच्या मनातील कटुता मात्र काळालाही दूर करता आली नाही. संस्थेने वेळोवेळी त्याचा सन्मान करण्यात धन्यता मानली मात्र प्रत्यक्ष तो या सन्मानासाठी एकदाही उपस्थित राहिला नाही. “बुंदसे गई हौदोसे नही आती.” हेच काळाला सुचवायचं असेल. खरं तर दोष कुणाचा? शिक्षा कुणाला? असाच हा व्यवहार. मी शिक्षक म्हणून शाळेत कार्यरत असतांना घडलेला प्रसंग आज ह्या लेखाच्या निमित्ताने मला अचानक आठवला. अर्थात यातील सत्याचा भाग किती ते सचिनला आणि ईश्वरालाच माहिती. आमच्या संस्थेसाठी सचिनला बोनाफाईड वेळेवर दिलं न गेल्याने विमान चुकलं ते चुकलंच.

जीवनात यशस्वी कोण होतो? ज्याला ‘टाईम गेम’ कळतो, नवनवीन संधी येतील, मिळतील पण संधीचा शोध घेत कुठपर्यंत थांबायचं? ते ठरवणं अखेर तुमच्याच हाती. लोकल पकडतांना हा अनुभव तुम्हीही घेतला असेल, पहिली लोकल भरलेली आहे असे वाटून तुम्ही ती सोडून देता, दुसरी उशीराने येते आणि जास्त भरलेली असते मग मनाकडे रुखरुख लागते.अरे रे! उगाच पहिली लोकल सोडली, एव्हाना ठाण्यात पोचलो असतो. जीवनाचं तसंच आहे मोठ ध्येय जरूर हवं पण फक्त संधीची वाट पहात बसून नक्कीच चालणार नाही. मग तुमचा विचार काय आहे?

शेवटचं विमान पकडण्यासाठी थांबणार आहात की मिळालेल्या संधीच सोन करत उंच झेप घेणार आहात? तुमची स्वप्नं कितीही मोठी असु दे ते सत्यात आणण्यासाठी कष्टही मोठेच करावे लागणार कदाचित एका पेक्षा जास्त पर्यायांचा विचार करावा लागणार. व्यावसायिक आणि त्यातूनही मारवाडी, जैन, कच्छी, सिंधी,पारसी कधीही एकाच धंद्याला चिकटून रहात नाही. तो वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करून शक्यता आजमावतात, ज्यामुळे व्यवसाय मंदीचा फटका त्याला कमी बसतो. तुम्ही अदानी,अंबानी, टाटा, महिंद्रा, बिर्ला, गोदरेज अशी कोणतीही नाव घ्या, पहा एकाचवेळी ते अनेक व्यवसायात उतरले आहेत. मित्रांनो आपल्याला ही ट्रिक कळली पाहिजे, जमली पाहिजे. ‘Survival of the Fittest’ हे लक्षात घेतलं पाहिजे. शिक्षणाचा आणि कौशल्य आत्मसात करण्याचा मूळ उद्देश अर्थार्जन आहे, जो पर्यंत तुमच्या गरजा भागवण्यासाठी हाती पैसे येत नाहीत तुम्ही स्वावलंबी बनत नाही, तुमच्या प्रयत्नांना काहीही अर्थ नाही.

जर तुमची विचार करण्याची किंवा कृतीची दिशा चुकली असेल, तुम्हाला अपेक्षित यश मिळत नसेल,तुमचे एकट्याचे प्रयत्न तोकडे पडत असतील तर अनुभवी माणूस तुमचे विमान योग्य ठिकाणी पोचवू शकतो. विमान भरकटण्यापूर्वी त्याला योग्य दिशा मिळाली तर अपेक्षित उंची किंवा अंतर वेळीच गाठता येईल. विमान भरकटते आहे असे वाटताच आपण दिशा दर्शकाची मदत घेतली तर अमूल्य वेळ तर वाचेल आणि मानसिक स्वास्थ टिकून राहील.

तुमच्याकडे गुणवत्ता असूनही अपेक्षित यश मिळत नसेल तर एक तर तुमची दिशा चुकत असेल किंवा तुमचा फाजील आत्मविश्वास तुम्हाला धोका देत असेल, या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी स्वतःचे काय चुकते याचे अवलोकन अन्य जाणकार व्यक्तीकडून करून घ्या, त्याचा सल्ला तुम्हाला तुमच्या उणिवा शोधून त्यावर मात करायला मदत करू शकेल.

कोणत्या क्षेत्रात संधी आहेत? आणि त्यात मी काय करु शकतो? याचा शोध प्रथम घेतलं पाहिजे. तुमच्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी प्रथम अन्य अनुभवी माणसाशी किंवा अन्य अनुभवी व्यवसायिक व्यक्तीशी चर्चा केलीत तर तुमचे प्रयत्न योग्य आहेत की नाही ते तर कळेलच पण त्या क्षेत्रासाठी तुम्ही काय सेवा देऊ शकता आणि त्याच तुमच्यासाठी फलित काय? हे ठरवू शकता. आज शिक्षण आणि व्यवसाय याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.
तुम्हाला एखादी कला अवगत असेल किंवा एखाद्या क्षेत्रात रुची असेल आणि त्या कलेत तुम्ही निपुण झालात तर त्या क्षेत्रातही तुम्ही तुमचे करिअर करू शकता. तुमचा स्वतःचा ब्रँड निर्माण करू शकता. मग ते क्षेत्र जुने असो की काही नवं कल्पना.

हाऊस किपिंग हा म्हटलं तर शुल्लक विषय पण कार्पोरेट क्षेत्रात याला खूप महत्व असतं,चाळीस वर्षपूर्वी मी “Bells House” या एका कार्पोरेट कंपनीत माझ्या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून गेलो होतो. त्यांच ऑफिस इतकं निटनेटक होतं की ती स्वच्छता पाहून आश्चर्य वाटलं. त्या ऑफिसमध्ये ठीक ठिकाणी वेगवेगळ्या झाडांच्या कुंड्या ठेवल्या होत्या ज्यांची रचना रोज बदलली जात असे. ऑफिसमधील वातावरण आल्हाददायक होतं. याचा चांगला परिणाम कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर, त्यांच्या पोसिटिव्ह एनर्जी वर नक्की होत असणार. म्हणजेच इतर कोणत्याही कंपनीच्या तुलनेत त्या कंपनीतील स्टाफची कार्यक्षमता आणि कामाची शैली ही कंपनीला पूरक अशीच असणासर.

पेस्ट कॅट्रोल असो की गार्डनिंग किंवा पेटिंग, क्षेत्र कोणतही असो त्यातील तुमचे कसब परमोच्च स्थानी हवे,तुम्ही उत्तम सेवा दिली आणि त्याची माऊथ पब्लिसिटी झाली तर लोक स्वतः तुमच्याकडे येतील. तुमच्या एरियातील डॉक्टर काही होर्डिंग लावत नाही तरीही एखाद्या डॉक्टरची प्रॅक्टिस धो धो चालते, त्याला उसंत नसते, हे झाले विशिष्ट प्रोफेशन बद्दल, आपण अगदी सामान्य उदाहरण घेऊ,एखाद्या दुकानातील किंवा टपरी, हातगाडीवर वडापाव खाण्यासाठी, उत्तप्पा किंवा डोसा खाण्यासाठी लोक लाईन लावतात, ठाणे येथील मामलेदार मिसळ असो की भांडुप, शिवाजी तलाव येथील किंवा कल्याणच्या कुलकर्णी यांचा खिडकी वडा. आपल्या उत्पादनाची गुणवत्ता राखणे आणि आपल्या ग्राहकांना आपला भगवान मानणे हे जमले तर यश तुमचेच.

प्रत्येक व्यक्तीने आपली जमेची बाजू ओळखली पाहिजे आणि त्याचा नीट उपयोग आपल्या क्षेत्रात कौशल्य आत्मसात करण्यासाठी केला पाहिजे,म्हणजे मी काय करू? हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही. मुख्य म्हणजे मार्केटिंग ही एक अशी कला आहे की तुम्हाला मातीही सोने म्हणून विकता येईल आणि हे शक्य आहे. आमच्या गावातील काळे हे झाडांची नर्सरी चालवतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची आकर्षक कलमे मुंबई येथे विकतात, अर्थात त्यासाठी माती आणि खत हवेच म्हणून ते काळी, लाल माती आणि सेंद्रिय खत तयार करून मुंबई येथे विकतात. गेले चाळीस वर्षे हा व्यवसाय ते करतात, आज त्यांचं नाव प्रत्येकाच्या ओठी आहे.या व्यवसायाच्या जीवावर त्यांना सुबत्ता मिळाली. हे काही एक दोन दिवसात झालं नाही. अथक परिश्रम आणि उत्तम सेवा देऊन त्यांनी नाव कमावलं. ते याच व्यवसायात थांबले नाहीत तर उत्सुकतेपोटी त्यांनी औषधी वनस्पतींचा अभ्यास सुरु केला, त्यासाठी ते संस्कृत शिकले. आता ते फुलझांडांसोबत औषधी वनस्पतींची लागवड करतात. आरोग्याविषयी अनेक जुन्या संस्कृत आणि इतर पुस्तकांच त्यांनी सखोल वाचन केल. जे वाचलं ते लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केले. आता लोक त्यांना व्याख्यान देण्यासाठी बोलवतात. याचा अर्थ आपल्या अर्थार्जनाचा मार्ग त्यांनी प्रशस्त बनवला.

असच उदाहरण निवृत्ती काशिनाथ देशमुख अर्थात इंदोरीकर महाराज यांचे भजन आपण विविध दूरदर्शन वाहिन्यांवर पाहिले असेल. ते अहमदनगर येथील अकोला तालुक्यातील इंदुरी गावचे,शिक्षण बिएससी बीएड असे असुनही शिक्षकी पेशात न वळता त्यांनी भागवताचा मार्ग स्विकारला. ज्ञानेश्वरीचा संपूर्ण अभ्यास आणि इतर ग्रंथांचे वाचन करून त्यांनी वारकरी संप्रदायाला आवश्यक ते गुण स्वतःत आणून भजन किर्तन यामध्ये झोकून दिले.विनोदी शैलीत अवगुणांवर टिका करत प्रवचन करणे हा त्यांचा हातखंडा. या कलेत ते ऐवढे निपुण झाले की त्यांच्या किर्तनासाठी आज महिना महिना अगोदर बुकींग करावे लागते. या कलेमुळे उत्तर अर्थार्जन होतेच पण याचबरोबर समाजातील अंधश्रद्धा, परंपरागत रूढी या विरूध्द ते समाजजागृती देखील करतात. परमार्थ आणि स्वार्थ एकाच वेळी ते साधू शकतात. वर्षभराची कमाई अवघ्या आठ पंधरा दिवसात करतात पण यासाठी त्यांनी रात्र रात्र जागून धार्मिक ग्रंथच नव्हे तर इतिहास आणि इतर माहिती वाचली आहे मुख्य म्हणजे रोजच्या घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष आहे.असाध्य ते साध्य करिता सायास हे त्यांनी जमवले आहे.अवघ्या पन्नाशीत पैसा आणि प्रसिद्धी त्यांच्या पायाशी चालूच आल्या आहेत.आपल्याला अवगत कलेचा विकास आणि जोपासना केली तर ती तुमच्या जीवनाचा विकास घडून शकते हे इंदुलकर यांच्या उदाहरणावरून दिसून येईल.

तुमच्या व्यवसायाबद्दल तुम्हाला मोजक्या शब्दात प्रभावीपणे मांडता आलं पाहिजे. गुणवत्ता टिकवता आणि वाढवता आली पाहिजे. मुख्य म्हणजे आपल्या व्यवसायाबद्दल आपल्याला आस्था हवी आणि व्यवसाय प्रामाणिक पणे किंवा सचोटीने करण्याची वृत्ती हवी.

तुम्ही मूव्हर आणि पॅकर असं टेम्पो किंवा ट्रकवर वाचलं असेल. शहारतील लोक आपली आर्थिक स्थिती सुधारली की घर घेतात किंवा नोकरीचे ठिकाण बदलले की दुसऱ्या ठिकाणी जातात. पूर्वी सर्व लोकांची आर्थिक स्थिती बेतास बात होती परिणामी लोक थोडं थोडं सामान एक ठिकाणाहून दुसरीकडे नेतं, यात शारिरीक कष्ट तर होतेच पण वेळेचा अपव्यय ही होता. तुलनेने आज कोणत्याही समाजाची आर्थिक स्थिती आणि मानसिकता पहिल्यापेक्षा चांगली आहे. आता लोक खोली, ब्लॉक बदलताना, सामान एकाच फेरीत दुसरीकडे नेता यावे आणि त्याचे नुकसान होऊ नये, ते हरवू नये या साठी एकाच वेळेस मोठ्या वाहनातून नेतात. त्यांची सेवा घेतल्यास सोफा, बेड, कपाट, फ्रीज, वॉशिंग मशीन या सारखे सामानही एकाच वेळेस त्यांचे नुकसान न होता सांभाळून नेणे शक्य होते. हे सामान ही मंडळी पुन्हा योग्य प्रकारे जुळवून जागेत लावूनही देतात. आज असे movers and packers व्यवसाय करणारे अनेक आहेत. जर तुमच्याकडे इमानदार, प्रामाणिक माणसे असतील आणि time line तुम्ही पाळू शकत असाल तर हा व्यवसाय नफ्याचा आहे. असे कित्येक व्यवसाय आपण करू शकतो.

कॅटरिंग सेवा असो, मंडप डेकोरेशन तुम्ही आपल्या क्षेत्रात माहिर असाल तर ग्राहक तुम्हाला शोधत तुमच्याकडे येतील. अहो भिक्षुकी ही सुद्धा सामान्य बाब नाही, तुम्ही त्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले असेल आणि तुमच्या भाषेत माधुर्य, शब्दोच्चार स्पष्ट आणि पेहराव तुमच्या पेशाला पूरक असेल तर शहरात तुमच्या व्यवसायाला मरण नाही. लोक कितीही शिकले, अवकाशात गेले किंवा वैज्ञानिक दृष्टीकोन घेऊन जगत असले तरी त्यांच्या देवावरील श्रद्धेला कोणताही पर्याय नाही. मग वास्तू शांती, मौजिबांधन, सत्यनारायण, ग्रहशांती असलं काही ना काही काम असणारच.म्हणजे शहरात काम आहे, तुमचे कौशल्य पणाला लावले तर वर्ष दिडवर्षात दोन चाकीला मरण नाहीच नाही. अहो स्मशानातील काम काही मोजकेच गुरूजी करतात आणि ते वाजवून दाम घेतात.दहन ते तेरावे असे हे पॅकेज असते आणि शास्रोक्त विधीसाठी वीस हजार हा शहरातील दर आहे.हे काम तीन दिवसांत विभागले जाते आणि एकूण कालावधी साधारण सात ते नऊ तास. म्हणजे नऊ तासांचे वीस हजार,बिना भांडवल, हो! म्हणजे योग्य आणि शास्त्रानुसार माहिती,स्पष्ट उच्चार, योग्य पोषख हे ही भांडवलच म्हणा. शोधक नजर असेल तर कामाची वानवा शहरात मुळीच नाही फक्त तुम्ही “सेवेशी तत्पर” या वृत्तीने उभे राहिले पाहिजे.

वर्षानुवर्षे जो व्यवसाय फक्त कोळी समाजच करत होता तो व्यवसाय अगदी पांढरपेशे लोकही करू लागले आहेत, काय? कोणता? अहो घरी “Ready to cook” मासे पुरविण्याचा. यासाठी स्वतःची वेबसाईट तयार करून किंवा customer Group तयार करून, उद्या कोणते मासे मिळतील? याची माहिती देऊन, उद्याचे दर कोट केले जातात. Online Order नोंदवली जाते.wholesale मार्केटमधून निवडक माल आणून मासे साफसूफ करून ऑर्डर प्रमाणे पॅकिंग केले जाते आणि Door Service दिली जाते. ते ही अगदी वाजवी भावात. आताच्या तरुण जोडप्यांना डर्टी बाजारात जाऊन मासे आणायला आणि ते नाक मुरडत स्वच्छ करायला वेळ आहेच कुठे? हे मासे तुम्ही सांगितले तर मँलीनेट करूनही दिले जातात.आता बोला! काय करु? रडत बसणार की जगण्याच आणि विकासाच आव्हान पेलत पुढे पुढेच जाणार हा प्रश्न तुमचा आणि तो सोडवायचाही तुम्हीच.

आमच्या दुरच्या नात्यातील एक आयटीयन्स रेशेशनमध्ये भारतात आला. त्याला पोहण्याचा नाद होता. परदेशातही तो छंद जोपासुन होता. अनेक स्पर्धेत सहभागी होऊन त्याने बक्षिसे मिळवली होती. तो भारतात सपत्नीक आला तेव्हा सुरवातीला काही महिने इथे मिळेल तेथे आयटीमध्ये नोकरी केली, पण युएसमध्ये हजारो डॉलर पगार घेणाऱ्या व्यक्तीला इकडचा पॅकेज तुटपुंजे वाटू लागले. दुसरे काय? याचा शोध घेता घेता आधी तो swimming pool मध्ये Part Time coach म्हणून काम करू लागला. बऱ्यापैकी पैसे मिळू लागले आणि त्याने आपले Profession अचानक बदलले. तो बेंगलोरला शिफ्ट झाला. आता तो मोठमोठ्या Swimming Pool मध्ये नवीन Atthelate घडवत आहे. पैसे कमवत आहे. सकाळी साडेचार ते दुपारी साडेबारा आणि संध्याकाळी तिन ते रात्री आठ.”कठोर परिश्रमास पर्याय नाही.” हे खरे पण एसी केबीनमध्ये बसून Laptop बडवत बसून कामातील तोच तो पणा आणि Frustration घालवून त्यांनी आपल्या कौशल्याचे रूपांतर व्यवसायात केले.आता त्याचा बंगलोरमध्ये मोठा फ्लॅट आहे. गाडी आहे आणि स्वतःचा छंद जोपासता जोपासता कमाई सुरू आहे. योग्य वेळी विमान पकडण गरजेच आहे. शोधा म्हणजे सापडेल हेच खरे.

आज प्रत्येकजण इतका व्यस्त झाला आहे ,इतका एकलकोंडा झाला आहे की तो जाता जाताच हाय! गुडमॉर्निंग म्हणतो आणि वाटेला लागतो. कोणी घटकाभर थांबून कोणाशी बोलत नाही. जणू तो पकडणार तीच गाडी शेवटची असावी. कोणी कामावर जात असो, कोणत्या शुभ कार्यक्रमाला जात असो की अजून कुठे. प्रचंड घाई, रिक्षा स्टँडवर गेल्यावर जर तेथे रिक्षा नसेल तरी तो चार पावलं चालणार नाही, तर चाळीस वेळा घड्याळ पाहून मनात संताप व्यक्त करेल, अरे बेट्या घाई आहे ना थोडा लवकर निघ, पण नाही घडाळ्याकडे पहात ब्रश करणं, चहा घेणं,टॉयलेटला जाण, अंघोळ करणं, अगदी घरा बाहेर पाऊल टाकतानाही घड्याळ पाहून टाकलं तरी जिथं उशीर व्हायचा तो होतो. मित्रानो काही गोष्टी आपल्या हातात नाहीत ना! म्हणून थोडं मार्जिन ठेऊन जगा,मार्जिन ठेऊन वागा. प्रत्येक गोष्ट ठरल्या वेळी घडेल याची हमी कोणीच देऊ शकणार नाही.

समाजातील या व्यस्त स्थितीचा तुम्ही फायदा घेऊ शकता. आज अनेक कामे मोबाईल अँप द्वारे होतात हे खरं आहे तुम्ही टेक्नो सॅव्ही असाल तर ठीक तरी पण अशी काही कामे असतात की ती तुम्हाला प्रत्यक्ष त्या कार्यालयात जाऊन करावी लागतात. जस सेतू सेवा देते तस तुम्ही स्वतः विविध सेवा देणार सेंटर चालवू शकता ज्यात कस्टमरला टीव्ही, फ्रीज अशी साधन दुरुस्ती करणारा माणूस घरपोच देणे, प्लांबिंग सेवा देणारी व्यक्ती देणे, घरातील साफसफाई करून देणारी व्यक्ती शोधून देणे अशी सेवा देऊ शकाल, याच बरोबर त्यांच्या घरातील वृद्ध माणसाची सोबत करणे, त्यांची काळजी घेणारे आणि सेवा देणारे शोधून देणे अशी मोठी यादी तुम्ही करू शकाल.

किती उशीरा पर्यंत जागावं? किती स्वच्छंदी जगावं? लग्न किती उशीरा करावं? यालाही लिमिट हवं की नको, ज्या गोष्टी जेव्हा घडायच्या तेव्हाच घडणार हे विधान जरी बरोबर असलं तरी संधी आणि वेळ असेल तेव्हा कारण नसतांना वेळ वाया घालवायचा आणि नंतर घोड्यावर बसून विमान पकडायचा प्रयत्न करायचा यात कोणतं शहाणपण दडल आहे असा तुमचा समज आहे?

प्रश्न शिक्षणाचा असो, नोकरीचा, लग्नाचा की मुलं होऊ देण्याचा किंवा उद्योगाचा, काही मुलं डबल इंजिन जोडल्या प्रमाणे वेगात प्रगती करतात, लग्न झाल्यानंतर जर कमावती बायको असेल तर ज्या गोष्टी जी साधने आमच्या पिढीने पन्नाशीत घेतली ती साधने ते तिशीत घेतात भले त्यासाठी क्रेडिट घ्यावं लागलं तरी हरकत नाही याचं कारण आज, आत्ता आणि ताबडतोब हा फंडा दोघांनाही प्रिय असतो. पैसे फेडण्याची कुवत आहे मग का वाट पहा? घर सजवायला ज्या गोष्टी हव्या त्या वेळीच घेणं त्यांना गरजेचं वाटतं. हळूहळू प्रगती हे काही त्यांच्या बुद्धीला पटत नाही. नोकरीत प्रमोशन मिळालं नाही किंवा मनाजोगती hike मिळाली नाही तर ते वाट पहात नाहीत तर नोकरीवर लाथ मारतात याचं कारण थांबणं त्यांना माहिती नाही.

पण मुलांच्या जन्माबाबत त्यांचं मत वेगळं असत, आज करिअर करणं महत्वाच आहे, मुलं कधीही होतील, मग करिअरच्या नादात बरीच वर्षे पाठी पडतात, तोपर्यंत दोन चार जॉब बदलून झालेले असतात आणि आता त्या बैठ्या कामाचा कंटाळा आलेला असतो. तेच ते रुटीन आयुष्य जगण्याचाच कंटाळा आलेला असतो.पार्टी किंवा पिकनिक मध्ये मन रमत नाही, कामात काही चॅलेंज राहिलेलं नसते. वय वाढल्याने पहिल्यासारखा उत्साह वाटत नाही आणि आता प्रयत्न करूनही मुलाच्या आगमनाची चाहूल नाही. डॉक्टर तपासण्या होऊनही फारसा दिलासा मिळत नाही. मित्रांनो काही गोष्टीसाठी शेवटच्या विमानाची वाट पाहू नका, संधी आणि वेळ पुन्हा पुन्हा तुमच दार ठोठावत नाही. मोठ ध्येय जरूर हवं पण गरज भासली तर तडजोड करण्याची तयारी हवीच हवी, केवळ विचारांवर अडून चालणार नाही. आपल्या कृतीचा पश्चाताप होण्याची वाट पहाच का? अगदी हीच गोष्ट तुमच्या स्वभावाची कोणाशी बोलतांना अगदी आई, बाबा, तुमची मैत्रीण, मित्र किंवा पत्नी, कोणत्या पातळी पर्यंत ताणायचं याचं भान हवच ना? तुटेपर्यंत ताणलंत तर नंतर सांधण कठीण होते हे माहित असूनही आतताईपणाच केला तर त्याच फलीत काय हे न समजण्या इतके तुम्ही नक्कीच अडाणी नाही.

कॉम्प्युटर किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील काही मुलांना इतर क्षेत्रातील मुलांपेक्षा नोकऱ्या लवकर मिळतात पण सतत नवीन आव्हान सतत नवीन नोकरीच्या शोधात त्यामुळे कितीही चांगला जॉब मिळाला तरी त्यांचा समाधान कसं ते होत नाही,हाती बऱ्यापैकी पैसा असूनही समाधान नाही.घरातील गरजा कधीच पूर्ण झालेल्या त्यामुळे मनात एक पोकळी निर्माण होते.ही पोकळी कशी भरून काढावी याचा ताण सहन झाला नाही की तो किंवा ती व्यसनांच्या आहारी जाते. घरात विसंवाद वाढतात आणि त्यातून नको त्या घटना घडतात.जे सतत Computer च्या सानिध्यात असतात त्यांना सतत एकाच गोष्टीवर फोकस कराव लागत असल्याने आणि टाईम लाईन पाळण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते त्याचा मनावर ताण असाह्य झाला की नको त्या गोष्टी घडतात. हा ताण सुसह्य व्हावा म्हणून कामातील बदलही आवश्यक आहे. शक्य असल्यास मेडिटेशन किंवा निसर्गाच्या सानिध्यात काही दिवस राहणे या उपायांनी मनावरचा ताण कमी करता येईल आणि भरकटलेले विमान पून्हा टेक ऑफ साठी सज्ज करता येईल.

आजकाल बदलेल्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला एक साचलेपण येत ते घालवणं गरजेचे असते. मोठ्या शहरांच्या आजूबाजूला तुमचे गाव किंवा तुमचे second Home असेल तर त्याचा योग्य प्रकारे विकास केला तर त्याचा उपयोग पर्यटक निवासस्थान म्हणून करणे शक्य होईल, ज्यामुळे तुमचा शनिवार, रविवार मजेत आणि वेगळ्या प्रकारच्या कामात जाईल, शहरी लोकांना शहराजवळ week end साजरा करण्यासाठी विसाव्याचे ठिकाण मिळेल आणि आनंद देता देता आनंद आणि अर्थार्जन शक्य होईल. “बस सोच बदलो, रास्ते खूद निकल आयेंगे.”

ज्यांच्याकडे कौशल्य असुनही शिस्त न बाळगल्याने,स्वतःच आणि आपल्या आयुष्याच नियोजन न केल्याने जीवनात अडचणी आल्या अशा पैकी जाणती व्यक्ती म्हणजे विनोदवीर, विनोद कांबळी होय. दोघांचे करिअर एकत्र सुरु झाले दोघांनीही एकच आणि विश्वासनिय गुरू लाभला एकाला त्याचा परिसस्पर्श होऊन मार्ग सापडला,मेहनत आणि स्वशीस्त याच्या बळावर ९९ शतके रचत आणि धावांचा डोंगर उभाररून, दैदिप्यमान कारकीर्द गाजवत भारतरत्न खिताबाचा मानकरी ठरला तर विनोद जवळ तितकीच क्षमता आणि कौशल्य असुनही शिस्त, सराव आणि सातत्य यांचा वसा सोडून दिल्याने जीवनात अडचणींना तोंड द्यावे लागले. जीवनातील विमान भरकटणार नाही याची खात्री करूनच विमान पकडले तर यश हे तुमचेच आहे. खरा खिलाडी तो जो भरकटलेले विमानही काबू करून यश प्राप्त करतो. आता आपण यापैकी कोणत्या विमानाचे प्रवासी आहोत? आणि शेवटच्या विमानापर्यंत थांबायचे का? हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar