प्रवास, ‘अहो ते अरे’चा

प्रवास, ‘अहो ते अरे’चा

काल प्रवासात माझ्या कंपार्टमेंटमध्ये एक तरूण जोडपे आणि त्यांचा दिडदोन वर्षांचा मुलगा प्रवास करत होता. जोडप्यातील मुलगी आपल्या नवऱ्याला अधून मधून अरे आणि अधून मधून अहो संबोधत होती. त्याला हाक मारताना किंवा काही सांगताना त्याला काय म्हणून हाक मारावी या विषयी तिच्या मनाचा गोंधळ उडाला होता. नवविवाहित दाम्पत्य जेव्हा आपल्या गावी जाते, तेव्हा मुलीला तिच्या सासूसासऱ्यासमोर नवऱ्याला एकेरी नावाने हाक मारणे अवघड होते. जुन्या वळणाच्या सासू सासऱ्यांना अस एकेरी नावाने नवऱ्याला हाक मारणं आवडणार नाही याची तिला त्यावेळी कल्पना येते. जेव्हा ती सासर सोडते आणि प्रवास सुरू होतो तिच्या मनात हाच गोंधळ उडतो. पून्हा अरे चा प्रवास सुरू होतो. लग्न झाल्यानंतर मुलींना जी अडजेस्टमेंट करावी लागते ती या अरे-अहोच्या खेळात सुरू होते. तसा हा प्रवास नाट्यमयच असावा. भेट, स्वतःची ओळख, मैत्री, विचारांची देवाणघेवाण, भेटीतील सातत्य आणि फुलत जाणार प्रेम. शिक्षण आणि नोकरीमुळे मुलींचा बुजरेपणा कधीचाच संपलेला असतो. प्रवासात अरे ला कारे करावं लागतं या अनुभवाच्या शिदोरीवर पुढील प्रवास सुखकर होतो. स्त्री पुरुष स्वातंत्र्य आणि समानता , समान संधी मिळत असतांना तिने आपल्याच सख्याला अहो का म्हणाव? त्यालाही हे अनोळखी ‘अहो’ पेक्षा ‘अरे’ भावतं, मन जुळतं.

आज कार्तिकी एकादशी, आज आणि उद्या तुलसी विवाह होईल. तुळशीचे शाळीग्राम याच्याशी विवाह झाला होतो असा समज आहे. या दिवसानंतर माणसांच्या लग्नाचे मुहूर्त सुरु होतील. आता मुलंमुली स्वतः प्रेमविवाह करतात, फारच थोडी लग्ने ही पत्रिका पाहून होत असतात. त्यामुळे पालकांचे काम फारच सोप्पे झाले अस म्हणता येईल. आता जे सत्तरीत आहेत त्यांची लग्न शक्यतो मुलगी पाहून किंवा एकमेकांना पाहून आणि त्यांच्या घरच्यांच्या पसंतीने झाली आहेत. तेव्हा मुली पतीला अहो! अशी हाक मारायच्या आणि दुसऱ्या कुणाला आपल्या पतीविषयी सांगताना आमचे ‘हे’ किंवा ‘यजमान’ म्हणतात, अशी सुरवात करायच्या. अर्थात तेव्हाही सिनेमा किंवा नाट्य क्षेत्रात काम करणारी मंडळी आणि समाजात प्रतिष्ठित समजली जाणारी मंडळी आपल्या नवऱ्याला नावाने हाक मारायच्या.

मध्यमवर्गीय किंवा सामान्य कुटुंबात मात्र पतीला ‘अहो’ आणि नणंद यांना, ‘ताई’, कितीही छोटा दिर असला तरी ‘भावोजी’, सासऱ्यांना ‘मामंजी’ किंवा मामा आणि सासुला ‘आई’ म्हणण्याचा प्रघात होता. संस्कार म्हणून असंच म्हणावं लागे.

आता लग्न होऊन आलेली मुलगी आपल्या सासूला विचारते, “आई मला एक विचारायचे होते,विचारू का?” सासू खुल्या मनाने म्हणते,”अगं विचार की,त्यात परवानगी कशाला हवी.” “आई मी तुमच्या मुलाला नावाने हाक मारली तर तुम्हाला राग तर नाही ना येणार?” सासू हसते, “मला का राग यावा? त्याला चालतयं ना! मग झालं.” “पप्पांच काय? त्यांना विचारायला हवं की तुम्ही त्यांना सांगाल.” “मुली हुषार आहेस हो,कोणती गोष्ट कोणाकडे बोलावी तुला चांगलच कळत ठिक आहे, मी सांगेन त्यांना, नवीन जमाना आहे, बदल घडणारचं.” “आई आणखी एक विचारू का?” “आता आणखी काय राहिले?” “नाही म्हणजे तस काही नाही, पण मी तुम्हाला अहो आई ऐवजी अगं आई म्हंटल आणि राजेशच्या भावाला नावाने हाक मारली तर!” “बरं बाई नाहीतरी मला मुलगी नव्हती, तुच माझी मुलगी हो, हरकत नाही. आता सगळ झालं की आणखी काही राहिलयं.” मुलीने सासूला मिठी मारली आणि म्हणाली सासरी येतांना रुखरुख होती पण तू मला मुलगी म्हणून स्वीकारलं आणि मनावरच दडपण एकदम नाहीस झालं” हे दृष्य सगळीकडे घडेल की माहिती नाही पण सुसंवाद घडला तर गोष्टी सोप्या होतात याचं हे उदाहरण.

आताच्या सुना आपल्या नवऱ्याला अरे राजेश म्हणत असतील तर सासू हे अरे स्वीकारण्यासाठी चार पावलं पुढे आहे. कदाचित खासगीत त्या आपल्या नवऱ्याला सूनबाईच कौतुक सांगत असतीलही,”मला मेलीला तुम्हाला विचारण्याचा धीर नाही झाला पण समजा मी आता तुम्हाला नावाने हाक मारली तर आवडेल का?” तिचे ते शब्द ऐकून तो मोहरून जातो,”Why not? अगं मार की हाक,अहो म्हटलस किंवा अरे म्हटलं तरी या देहात मीच आहे.तुला आनंद मिळत असेल तर खुशाल नावाने हाक मार, अब भी हम जवान है, सिर्फ ये मत कहना की घर मे बहू आई है।” ती हसते चला तिकडे,चावट कुठचे. तुम्हाला काय म्हातरचळ लागलय का? ,मुल मोठी झालीत आता.” तो खो खो हसतो. जरा कल्पना करून पहा,मन तितकच तरूण होईल. गेले ते दिन गेले म्हणायची गरज नाही. पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा. गुण गुणून पहा.जमाना बदल रहा है। हमे भी बदलते वक्त के साथ बदलना होगा।

आता अहो,अरेतली बंधन सैल झाली किंवा तुटली म्हणायला हरकत नाही. मुख्य म्हणजे बरेचदा मुलगा, मुलगी एकाच वयाचेही असतात, सेलिब्रिटी जोडप्याला वयाचा अडसर नसतोच, त्यामुळे मुली,मुलाला ऐकेरी नावाने “अरे” म्हणून संबोधतात. कामाधंद्या निमित्त दोघेही आई वडील यांच्यापासून दूर रहात असल्याने तस जेष्ठ व्यक्तींच बंधन नसतंच. त्यामुळे मुलगी तिच्या पतीला अहो म्हणते की अरे याच्याशी दोन्हीकडच्या मंडळींना फारसा फरक नसतो. फक्त त्यांनी एकमेकांना समजून आणि एकमेकाची स्पेस अबाधित ठेवत आनंदाने रहावे एवढीच माफक अपेक्षा असते.

फारच थोडी जोडपी एकत्र कुटुंबात असतात. जर कुटुंबात मुलाची आजी,आजोबा किंवा आत्या असेल तर त्यांच्या मनाचा विचार करुन थोडी काळजी घ्यावी लागते. किमान त्यांच्या समोर तिने त्याला, “अरे समीर !” म्हणून हाक मारू नये एवढीच सासूची माफक अपेक्षा असते. सासूसासऱ्यांनी इतर घरातील बदलेले संदर्भ ऐकले असल्याने लिबरल वागायचं हे अगोदरच एकमताने मान्य केलेले असते, नव्हे ते त्यांनी गृहीत धरलेलं असते.

आता तर पालकच मुलाने स्वतंत्र रहावे असा आग्रह धरतात. दोन पिढीतील अंतर, त्यांच्या गरजा, त्यांची स्वतंत्र स्पेस याचा विचार करता ते योग्य असावं. वयानुसार असणारे वैचारिक मतभेद होण्याची शक्यता, नवीन जोडप्याची स्वातंत्र्य या बद्दलची व्याख्या किंवा कल्पना. त्यांच्या सकाळी उठण्याच्या वेळा. त्यांचा आहारविहार यातील फरक ह्या गोष्टी लक्षात घेता सासू आणि सुन यांच्यात मतैक्य असण तस कठीणच. त्यामुळे एकत्र कुटुंबात रहायला नवीन सुन फारशी उत्सुक असेलच असे नाही. जेव्हा हे जोडपे एकमेकांच्या सासरी जाते तेव्हा तिने त्याला अरे राहुल इथे ये, किंवा हे घे किंवा आणखी काही सांगताना एकेरी नावाने संबोधले तर घरातील जेष्ठांच्या भुवया उंचावतात.

खर तर उच्चभ्रू कुटुंबात पाच दशके अगोदरच अहो की अरे हा वाद संपलेला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात अहो की अरे हे गेल्या दोन दशकांपासून संपले आहे , तरीही जेव्हा ही जोडपी कोणा नातेवाईकांजवळ जात होती तेव्हा तिला फार जपून त्याला ‘अहो’ म्हणून हाक मारावी लागत होती. जिभेला अरे म्हणण्याची सवय असल्याने नातेवाईकांजवळ गेल्यानंतर त्याला हाक मारताना तिची गडबड होत होती. मुलांसमोर त्याला एकेरी हाक मारण प्रशस्त वाटत नव्हतं. किंबहुना आपल्या संस्कृती नुसार मुलांसमोर त्याला नाईलाजाने ‘अहो’ म्हणावं लागत होतं, जे अंगवळणी पडणं कठीण होतं. मुल समोर असताना चुकून नवऱ्याला अरे हाक मारली गेली तर जीभ चावत होती पण गेल्या दहा पंधरा वर्षात हा भेद संपला. आता मुली आपल्या मुलांसमोर नवऱ्याला अरे म्हणून हाक मारण्यात संकोच बाळगत नाहीत.

लग्न समारंभ किंवा कोणत्या कौटुंबिक कार्यक्रमात ,चार चौघात बोलतांना मात्र तिला कसरत करावी लागते. समाज काय म्हणेल? किंवा अति शहाणी म्हणेल याची मनी भीती असल्याने ती शक्यतो अहो चा अनैसर्गिक पुकारा करते तेव्हा तिच्या नात्यातील मंडळींना थोडं वेगळच वाटते. ती त्याला अरे म्हणते किंवा नावाने हाक मारते त्या प्रमाणे मुलांनी बाबाला डॅड, पप्पा न म्हणता नावाने हाक मारली तर मात्र तिला मान्य नसते. समाज काय म्हणेल याची भीती तिच्या मनी असते. किंवा आईने मुलांवर काही संस्कार केलेले नाहीत असं तिच्या अपरोक्ष कोणी म्हणू शकेल. प्रारंभी फक्त शहरात नवऱ्याला अरे म्हणण्याचं असलेलं स्वातंत्र्य ग्रामीण भागातील मुलींनी उचललं. माणूस हा अनुकरणीय प्राणी आहे. मग तिनेही नवऱ्याला अहोऐवजी अरे म्हणण्यास सुरवात केली तर बिघडलं कुठे?

पण नेमकं इथेच घोड पेंड खातं, आजही ग्रामीण भागात एकत्र कुटुंब पध्दत आहे. मध्यम वर्गीय कुटुंबातील सुनांनी साडी ऐवजी गाऊन कधीचाच स्वीकारला आणि तो प्रचलित झाला असला तरी सुनेने जीन्स किंवा शॉर्ट घालून घरात वावरणं मध्यम वर्गीय कुटुंबातील सासू, सासरे यांना मान्य होईल की नाही सांगण अवघड आहे.

त्यांना वाटत ,सुधारणेच्या नावाखाली अंधानुकरण किती कराव? याला मर्यादा हवी की नको? लहान मुलांसमोर आई आणि बाबा दोघही घरामध्ये बरमुडा किंवा शॉर्टस मध्ये वावरत असतील तर ते किती योग्य ? मुलांवर आम्ही समानतेचे कोणते धडे बिंबवण ठरवलं आहे याचा विचार तर व्हायला हवा? अर्थात कोणी? कुठे?कस?वागावं हे ज्याच त्याने ठरवायच असलं किंवा घरात बोलतांना पती-पत्नीनी एकमेकांना कोणत्या टोपण नावाने हाक मारावी किंवा एखाद्या प्रसंगी भांडण झाल्यास कोणत्या भाषेत बोलावं याबाबत काही संकेत नसले तरी मर्यादा बाळगली नाही तर लहान मुलांच्या मनात तुमच्या विषयी जे समज गैरसमज बसतील ते तुम्ही कधीही पुसू शकणार नाही.

तरुण जोडप्यांनी एकमेकांशी बोलतांना किंवा वैचारिक वाद निर्माण झाला तरी बोलतांना भान बाळगणं गरजेचं आहे, पण जेव्हा अहो तुन अरेकडे प्रवास सुरू होतो, तू आणि मी काय फरक आहे अशा मानसिकतेतून वैचारिक मतभेद झाले तर टीकाही तितकीच जहरी होते. याकरिता नावाने अथवा अरे हाक मारा वा अहो म्हणा, हाक मारतांना शब्दांची लय आणि तिव्रता लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. लहान मुले संवेदनशील असतात.या गोष्टी ते लक्षात ठेऊन या शब्दांचा योग्य वेळी अयोग्य वापर करतात, पण दोष त्यांचा नसतो. मुलाने वडिलांना काय हाक मारावी हे त्याची आईतली मम्मी किंवा मम्माच शिकवते, त्यामुळे त्याच शिक्षण योग्य मार्गाने होत आहे की नवरा घरात नसतांना ज्या टोपण नावाने तुम्ही त्याचा उल्लेख करता त्या नावाने होत आहे हे पाहण्याची जबाबदारी मातेचीच असते. अन्यथा मित्राला सांगताना मुलगा म्हणेल अरे यार ये तू, घरीच पत्ते खेळू, आज हिटलर घरात नाही.

हृदयनाथ मंगेशकर, अर्थतज्ञ आणि माझा बाप चे लेखक नरेंद्र जाधव किंवा आणखी काही सेलिब्रिटी त्यांच्या बालवयात आपल्या वडिलांना अरे म्हणून हाक मारत आणि त्यातून भावनिक आपुलकी किंवा प्रेम व्यक्त होते असे त्यांचे म्हणणे होते. पण हा अरेचा प्रवास भविष्यात कुठे पोचेल ते तेव्हा तरी कोणाला माहिती नव्हते. असो जो जे वांछील तो ते लाभो च्या चालीवर जो ती इच्छिल ते ‘ती’ बोलो तिच्या ‘त्याची’ मान डोलो, मनो मिलन अखंड घडो मनमनात. अहो ऐवजी अरेचा प्रवास सुरळीत घडो यासाठी त्याच्या तिला शुभेच्छा.

अहो अरेमुळे कोणत्या गमतीजमती होतात किंवा मुलांची याबाबत काय प्रतिक्रिया असते, म्हणजे घरात असताना आई, बाबांना अरे सुनील म्हणते पण तीच काही ठिकाणी अहो इकडे या म्हणाली की चाणाक्ष मुलांच्या नजरेतून हा लपंडाव सुटत नाही आणि ते मिश्कीलपणे आईकडे पाहतात. गंमत आहे की नाही. अशा गमतीजमती तुमच्या नजरेस पडतात तेव्हा तुम्हाला गंमत वाटते की नाही.अरे लिहीतांना थांबायला हवं याच भानच सुटलं. चला तर निरोप घेतो.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “प्रवास, ‘अहो ते अरे’चा

  1. SANDEEP NAGARKAR
    SANDEEP NAGARKAR says:

    अतिशय सुरेख प्रवास अहो ते आरे चा…

Comments are closed.