प्राधान्यक्रम तुमचा आणि त्यांचाही

प्राधान्यक्रम तुमचा आणि त्यांचाही

आई, मी आता लहान नाही तू प्रत्येक वेळी मी काय करावे काय करू नये येऊन सांगत बसू नको. माझे मला ठरवू दे. तू सारख का पाठी लागतेस? मी कशीही वागले तरी तू तक्रारच करतेस. आता सतत टोचणे बंद कर. मी कोणते कपडे घालायचे, मी किती खायचं? काय खायच? कधी जायच? केव्हा परतायचं हे ही तूच ठरवणार का? असे संवाद प्रत्येक घरात ऐकू येत असतात याच कारण, “आई नावाचं काळजी वाहू सरकार.”

आता तर लहान मुल जे दुरदर्शनवर दाखवलं जातं त्याचं अनुकरण करत आजोबांना भरभर खाऊ नका पोट बिघडेल अस सांगायला घाबरत नाहीत. किवां ज्या पदार्थांची जाहिरात पहातात, ती जाहिरात पाहून आजीला म्हणतात, “आज्जी एकदा पिझ्झा ट्राय तर करून बघ तू नाही खाल्लास तरी मी तुला रागावणार नाही, हो की नाही गं मम्मा.” अगदी होमवर्क करतांना सहज म्हणतात, “मम्मा एखादा क्वेच्छन स्कीप केला तर कुठे बिघडत? नाहीतरी टिचर सर्व रीड कुठे करतात?” यावरून ही पिढी किती शार्प झाली आहे ते लक्षात येतं. म्हणूनच आता सर्व पालकांना घरात जपून वागाव लागत.शब्द तर फारच जपून वापरावे लागतात ही मुलं तो शब्द आजी आजोबांना कधी वापरतील सांगणे अवघड. बरे हा शब्द संग्रह आई आणि बाबांच्या संवादात सापडल्याने मुलांनी तो वापरू नये असे तरी कसे म्हणावे? म्हणूनच पालकांची पालक म्हणून परीक्षा सतत होणारच आहे. ही परीक्षा मुल घेणार आहेत आणि ममा यू आर रॉग अस सर्वांदेखत म्हणाली की रागावताही येणार नाही.

साधारण आठवी पर्यंतची म्हणजे चौदा वर्षापर्यंत वयाची या पूर्वीची मुले आईच ऐकायची, आईचं अनुकरण करायची. तिच्या म्हणण्याला दुजोरा द्यायची. मनात नसलं तरी सरळ सरळ विरोध न करता लाडीगोडीन आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करायची. कधी तिला समजावून सांगण्यात यशस्वी व्हायची तर कधी हातपाय आपटत आणि मी आत्ता तुझ्याशी अज्जिबात बोलणार नाही, अस म्हणत खोलीतील एखादा कोपरा धरून मुसमुसत किंवा धुसफूसत राहायची पण प्रत्युत्तर करत नव्हती. कधी कधी धपाटा खायची आणि हौस फिटल्या प्रमाणे गपगुमान बसायची तर कधी घर डोक्यावर घेऊन उरलेला धपाट्यांचा रतीब बाबांजवळून पूर्ण करून घ्यायची तर कधी बाबांच्या आश्रयाला जाऊन आईच घर उन्हात बांधायची किंवा आईला आजीच्या घरी पाठवून द्या म्हणून बाबांकडे हट्ट धरून बसायची. अर्थात हे सगळं त्या वेळची परिस्तिथी किंवा बाबांचा मूड बघून ते ठरवत असत.

आज संसाराची गरज म्हणून आई, वडील दोघांनाही कामावर जावं लागते. सगळ्यांच कुटुंबात आजी आजोबा राहत असतीलच अस नाही. परिणामी लहान वयातच मुल परिस्थितीवर मात करायला शिकतात. त्यांचे स्वतःचे मत बनवतात. बेबी सीटरमध्ये रहाण त्यांना अगदीच बालीश वाटत. समज आल्यापासून एकट रहायला लागतात. स्वतःच्या गोष्टी स्वतः करतात.

आता चार पाच वर्षे वयाची मुले, आग्रहाने आपणास हवे तेच खातात. खिमट, खिचडी असले पदार्थ फार तर दोन वर्षे वयापर्यंत, तेही आईने भरवले आणि आईला हे पदार्थ बनविण्यासाठी वेळ असला तर किंवा, ते खातांना त्यांच्या आवडीचे कार्टून मोबाईलवर लावून दिले तर. न्यथा खिमटीच भांड लाथेने इतकं दूर उडवतात कीं आईने ते खिमट पुन्हा भरावण्याचा प्रयत्न करू नये, या पूर्वीची आई खिमट जोर जबरदस्तीने अगदी डोळ्यातून पाणी येत असेल आणि नाकात फरफरत असेल तरी भरवत होती. आता आईच्या वेगवान वेळापत्रकात चंदा मामा, काऊ चिऊ दाखवून घास भरवायला आईला वेळच नाही. आता दूध आणि न्युट्रामुल, यासारखी सप्लीमेंट हेच त्यांचे अन्न. फारतर बाळाने दूधात कुस्करून बिस्कीट खाल्ली तर आई धन्य होते. अजून काही वर्षात खिमट हा शब्द अवसायनात जाईल किंवा या शब्दाची व्याख्या म्हणजे डेफिनेशन द्यावे लागेल. असो तर अशी ही अती जलद, अती समज आलेली पीढी.

अर्थात मुलांच्या कलाने घेण त्यावेळी आर्थिक परिस्थितीमुळे किंवा प्रत्येक घरातील संस्काराचा भाग म्हणून शक्य नव्हते. त्यामुळेच पालक म्हणतील ती पूर्व या पध्दतीने मुलांचे संगोपन आणि शाळेनंतरचे शिक्षण होत होते. आता पालकांना त्यांच्या व्यस्त जीवनात मुलांचा गृहपाठ घेण जड जात मग पर्वचा आणि उजळणी याला वेळ कुठून असणार? अर्थात तरीही ज्या पालकांना त्याच महत्व वाटत ते वेळ देणारच.

तेव्हा करिअर करण्यासाठी ठराविक संधी होत्या त्यामुळे मुलाची आवड किंवा कल याचे काही पालकांना सोयरसुतक नव्हते. जेथे नक्की नोकरी मिळायची हमी असेल त्याच प्रकारच शिक्षण मुलांना दिल जात असे. त्याचा कल, त्याची आवड लक्षात घेतली जात नसे. अगदी तो स्वयंपूर्ण झाला तरीही त्याने काय खाव? कोणते कपडे घालावे? कोणत्या कुटुंबातील मुलीशी लग्न करावे? याच नियोजन आई वडील करत. त्याची सुरक्षा, त्याचे स्थैर्य, त्याचे भविष्य हाच त्या नियोजनाचा हेतू असे.

आता पालकांपेक्षा मुले सुज्ञ झालेली आहेत. प्राथमीक शिक्षण हे पालकांच्या मनाप्रमाणे किंवा कलेने कदाचित होत असेलही परंतू शालेय शिक्षणानंतर मुले स्वतः शाखा ठरवत आहेत. मुलांना त्यांच्या मित्राशी बोलून किंवा गुगल सारख्या माध्यमावरून कोणती शाखा निवडली तर भविष्यात संधी आहे या विषयी मार्गदर्शन मिळते.

कोणत्या कॉलेजमध्ये कोणती शाखा आहे?आणि तेथे स्टाफ कसा आहे? हे ही समजते. ज्या विषयात रूची असेल व ज्या कॉलेजमध्ये त्या प्रकारच्या शिक्षणासाठी चांगली सुवीधा असेल त्या प्रकारचे शिक्षण घेता येते. मग ते परदेशाबाहेर असेना का? तेथे जाऊन शिक्षण पूर्ण करण्याकडे कल असतो. पैसे नसतील तर प्रसंगी शैक्षणिक कर्ज काढून जाणे मुल पसंत करतात. शेक्षणिक कर्ज घेतांना त्याना याचे भान असते पण भय नसते. त्यामुळेच काय शिकावे? कुठे शिकावे? हे पालकांनी ठरविण्याचे दिवस संपले. उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कधी शिष्यवृत्ती प्राप्त होते तर काही विद्यार्थी शैक्षणिक कर्ज घेऊन आपली गरज भागवतात. थोडक्यात मुलं आपल्या आवडीनुसार शिक्षण शाखा ठरवतात.

जे शिक्षणाच्या बाबतीत तेच इतर बाबतीतही, मुलांनी नव्हे तर मुलींनीही कोणते कपडे घालावे हे ठरविणे पालकांच्या हाती नाही. किंबहूना तसा अट्टाहास पालकांनी बाळगला तर महाभारत होणारच. ज्या कपड्यांची बाजारात आणि जाहिरातीत किंवा टीव्ही वरील कार्यक्रमात चलती असते तेच कपडे मूल पसंत करतात. त्यांच्या साठी 3 पेज वरील मॉडेल यांच्या You Tube किंवा Googal वर जाहिरात पाहूनही मुले कपडे त्यांची फॅशन ठरवतात. मुले ही पालकांची मालमत्ता नाही की जी त्यांच्या ताब्यात राहील.तुमच्या वेळी कसेही कपडे घातले तरी तुम्हाला चालत होते हे स्पष्टीकरण पुरेसे ठरते.आणि योग्यही असते.तुमच्या वेळेस कपड्याबाबत तुम्ही एवढे जागरूक नसाल परंतु इम्प्रेशन पडायला हवं तर त्याची सुरवात तुमच्या नीट नेटक्या कपड्याने होते हे तितकेच खरे. आताच्या तरूण पिढीला जसा ट्रेंड बदलेल त्याप्रमाणे बदलावे लागते मग फाटकी किंवा उसवलेली जिन्स किंवा ड्रेस फॅशन म्हणून खपून जाते आणि पालकांनी कशाला फाटके कपडे घालतोस? असे विरोधात बोलणे चुकीचे ठरते.

तुमच्या काळी मैत्रीची व्याख्या वेगळी होती. आज ती तशीच का असावी? त्यांचे मित्र त्यांच्या मैत्रीणी कोण आहेत? ते एकत्र जमल्यास किंवा व्हिडिओ कॉल करून कोणत्या विषयांवर व किती वेळ गप्पा मारतात या विषयी आपण त्यांना हटकण किंवा त्यात रस दाखवणं हा ही गावंढळ उपचार, तो पालकांनी करू नये. प्रत्येक व्यक्ती ही जन्मताच स्वतंत्र असल्याने तिला स्व तंत्राने जगण्याचा जन्मजात अधिकार आहे. मग दुसऱ्याच स्वातंत्र जपलं तरच स्वतःच अस्तित्व जपता येत. जंगलात जाऊन तुम्ही वाघाच्या अधिवासात हस्तक्षेप केला तर त्याची शिक्षा होणं स्वाभाविक.

तुमच्या मुलांनी किंवा अन्य कोणी किती तोकडे किंवा किती फाटकी जीन्स घालावी? या बाबत कोणतेही भाष्य करणे हा ही गुन्हाच ठरतो. मुळात तुम्ही त्या व्यक्तीकडे पाहता म्हणून तुम्हाला त्या व्यक्तीचे कपडे दृष्टीस पडतात. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीकडे चुकीचा दृष्टीकोन ठेऊन पाहिल्याबद्दल तुम्हीच शिक्षेस पात्र ठरतात. ती बिचारी व्यक्तीस्वातंत्र उपभोगत असतात. त्याचा तुमच्या असण्या नसण्याशी काही संबंध नाही. तेव्हा भविष्यात असे कुणाकडे पाहणे हा गुन्हा ठरू शकतो म्हणून चांगली सवय लावून घ्यावी. जो पर्यंत तुमच्या अधिवासात कुणी हस्तक्षेप करत नाही तुम्ही स्वतः संकट विकत घेण्याचे धाडस करू नये. म्हणूनच पालकांनी मुलांना सतत सूचना देण्याचा अट्टाहास टाळावा. मुले आता मोठी झाली असून त्यांचे त्यांना ठरवण्याची क्षमता आहे. त्याच्या होणाऱ्या परिणामाची जाणीव त्यांना आहे. अशा प्रसंगाची भीती त्यांना वाटत नाही आणि तसे झाल्यास ती परिस्थिती त्यांना हाताळणे शक्य आहे. त्यांच्या येण्या जाण्याच्या वेळा, प्रसंगी मित्र मैत्रीणी बरोबर होणारी कॅज्युअल पार्टी, शनिवारी आणि रविवारी ठरलेलं पिकनिक या गोष्टी नॉर्मल आहेत.या गोष्टीबाबत त्यांना सतत बोलू नये. त्यांचे वाढदिवस,त्यासाठी एकत्र येणे, भेटवस्तू देणे हे यात नवल वाटून घेणे म्हणजे काहीतरीच!

त्यांच्या बाबतीत घडणाऱ्या घटनेचा दोष ते कुणावर टाकणार नाहीत. म्हणजे येणाऱ्या संकटाचा सामना करण्याचा प्रयत्न जर ही पिढी करत असेल तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. या पिढीच्या भविष्याची चिंता करत बसण्यात काहीच अर्थ नाही. ती मुलगी असो की मुलगा उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशी एकटी पाठविण्यास टाळाटाळ करणे अयोग्य आहे.त्यांच्या प्रगतीच्या आड पालकांनी येऊ नये तर त्यांना उत्तेजन द्यावे.

परंतू आजही आमची पिढी या मुलांच्या क्षमते बद्दल उगाचच साशंक असते. त्यांना उगाचच अनभिज्ञ संकटाचा सामना करावा लागू नये याची काळजी घेताना दिसते. आजची पिढी सजग, चौकस, आणि हरहुन्नरी आहे. ते कोणत्याही परिस्थितीत मार्ग काढण्यात तरबेज आहेत. आपण मात्र सतत त्यांना लहान मुला सारखी वागणूक देण्याचा प्रयत्न करत असतो यातूनच मुले आणि पालक यांच्यात विसंवाद निर्माण होतो.

एखादी महत्त्वाची जबाबदारी स्विकारणे, किंवा एखाद्या महत्त्वाच्या निर्णयात सहभागी होणे यातूनच कामा बाबत अनूभव आणि आत्मविश्वास जागृत होण्यास मदत होते. तेव्हा अगदी लाडाचे एकूलते एक अपत्य असले तरी त्याच्या स्वप्नावर बंधने घालू नये. लहान मूल चालतांना पडले तरी कुणी पहात नसल्यास एकटे उठून उभे राहते, पुन्हा चालू लागते. तसेच या तरुण पिढीचे आहे ते स्वतः मार्ग शोधतात. त्यांनी मार्ग शोधला किंवा साहसी कृती केली तर कौतुक करावे पण मार्ग चुकला तर नाउमेद करू नये अशी त्यांची अपेक्षा असते.

आलेल्या अडचणीत जेव्हा ही मुले मार्ग शोधतात आणि त्यांचा अनुभव तुम्हाला शेअर करतात. तेव्हा त्यांना प्रोत्साहन द्यावे एवढीच आपली भूमिका असावी अशी त्यांची अपेक्षा असते. त्यांनी त्यांचा मित्र वा जोडीदार ठरवला किंवा ठरवली तरी आपण त्यावर आक्षेप घेण, शंका घेण त्यांना अपमानास्पद वाटते. त्यानी केलेल्या कृतीवर किंवा घेतलेल्या निर्णयावर पालकांनी टीका टिप्पणी करू नये असा त्यांचा समज असतो. “We are mature enough. We can decide right and wrong.” अस सांगितल्या नंतरही जेव्हा सूर जुळत नाहीत आणि काहीतरी बिनसत तेव्हा आपल्या लक्षात आल्यावाचून रहात नाही. पिल्लू कुठेतरी फसलय, त्याला सावरण्याची गरज आहे हे आईशिवाय कुणाला कसे कळणार? पण फुंकर घालतांना त्याचा इगो हर्ट होणार नाही याची काळजी तिलाच घ्यावी लागते कारण ती आई असते.

तेव्हा तुम्ही जन्मदाते म्हणून उगाचच त्यांच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करण त्यांना सतत लहान मुलासारखं वाढवण. त्यांच्या निर्णया बाबत शंका व्यक्त कारण नक्कीच अयोग्य आहे. कदाचित त्यांचा निर्णय हा अतिशय योग्य होता असे काही काळाने तुम्हाला वाटू शकेल. वाढत्या मुलांवर अधिकार गाजवणे किंवा आम्ही पालक आहोत अशी सारखी जाणीव करून देणे तितकेसे योग्य नाही. कोणती काम कशी करावी? किंवा कशाला महत्त्व द्याव या विषयी तुमच्या आणि त्यांच्या विचारात फरक असणारच आहे त्यामूळे त्यांना Priority ठरवू द्या. प्रत्येक ठिकाणी सूचना देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनाही तुमच्या बोलण्यावर रिऍक्ट होता येत. तुमचा स्वतःचा मान राखण किंवा अपमान करून घेणं हे तुमच्या आचरणावर अवलंबून आहे. शेवटी टाळी एक हाताने वाजत नाही हेच खरे.

जन्म दिल्याचा किंवा पालक असल्याचा फॉर्म्युला कायमस्वरूपी उपयोगी कसा पडणार? वय वाढल्यावर लहानपणी दाखवलेला भीतीचा बागुलबुवा कसा चालेल? त्यांच्याशी सन्मानाने वागा तुम्हाला मान मिळेल. त्याचे निर्णय, त्याची कृती, त्याचे वागणे बोलणे हे त्याच्या वाढत्या वयानुसार बदलणार याच भान ठेवल तर संघर्ष टळेल. तुम्हाला ज्या गोष्टी अयोग्य किंवा बिनकामच्या वाटत होत्या त्या गोष्टी त्याला महत्वाच्या वाटत असाव्या, शेवटी दृष्टीकोन वेगळा असणारच.ज्या गोष्टी तुम्हाला अयोग्य वाटत होत्या त्याला योग्य वाटत असाव्या. जीवनात कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचे त्याचा क्रम त्याच्या नजरेतून वेगळा असेल. म्हणून त्याच्या मताचा आणि सूचनांचा आदर केला तर तुमच्या चूका कमी होतील. सुसंवादाची सुरवात होईल. जे जे तुम्हाला अयोग्य ते कदाचित त्याला योग्य दिसत असावे.

तर या बदलत्या वातावरणात मुलांवर, शिक्षण, नोकरी, नवीन घर, आजच्या गरजा भागवण, जगण्याची पातळी सांभाळण, स्थैर्य, लग्न, त्यांच्या मुलांचे शिक्षण असा व इतरही ताण आहे, हे वास्तव आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना सतत झुंजाव लागणार म्हणूनच जर आपल्या कडून त्यांना या बाबतीत मदत होणार नसेल तर त्यांना शाब्दिक अडथळे निर्माण करण योग्य नाही. तटस्थ भूमिका निभावणे किंवा समोरचा मदतीसाठी हात मागत नाही तो पर्यंत अलिप्त राहणे हेच उत्तम.

त्यांनी कोणती नोकरी करावी, लग्न कधी करावं, मुळात कराव की करू नये कारण आता हे प्रश्न त्यांचे खाजगी असून कुटुंबाशी त्याचा थेट संबंध नाही. लग्न करून येणाऱ्या जोडीदाराला सुखी समाधानी ठेवण्याविषयी त्यांच्या स्वताच्या अपेक्षा आणि कल्पना आहेत त्या शिखरा पर्यंत पोचे पर्यंत कसतरी मना विरुद्ध लग्न करण आणि स्वतः बरोबर दुसऱ्या व्यक्तीला दुःखी करण कदाचित मान्य नसाव. सुखी संसाराच्या त्यांच्या कल्पना वेगळ्या असाव्या. कदाचित तुमच्या माझ्या सारखे ते अल्पसंतोषी नसावे. म्हणून Let them decide their life, don’t be obstacles in their way.

जीवनाकडे पाहण्याचा, आव्हाने पेलण्याचा, सुख शोधण्याचा, सुखी आणि समाधानी राहण्याचा मार्ग भिन्न असू शकतो. प्रत्येक बाबतीत तुमचे आणि त्यांचे एकमत होईल ह्याची शक्यता कमी आहे. ज्या गोष्टींचा तुम्हाला बागुलबुवा वाटत होता आज त्यांना वाटत नसावा म्हणूनच तुम्ही चैन ठरवलेल्या वस्तू कर्ज काढून घेण्याची हिम्मत दाखवत नव्हता. त्याना त्या वस्तू चैन वाटत नसून प्रापंचिक गरज वाटत असेल तर चुकले कुठे?

तुमचे आणि त्यांचे संदर्भ कालानुरूप बदलणार हे तर उघड आहे. त्यांनी त्यांचे जीवनाचे नियोजन नक्कीच केले असावे कदाचित ते तुमच्यापेक्षा जास्त सुनियोजित असावे. म्हणूनच त्यांना त्यांच्या लक्षापर्यंत पोचण्यास तुमची साथ द्या.तुमचा आणि त्यांचा प्रधान्यक्रम वेगळा असेलही पण तुमचे ते योग्य आणि त्यांचे ते अयोग्य हे घाई घाईने ठरवणे म्हणजे आति घाई. तेव्हा पालकाची झुल खाली ठेऊन मित्र, मैत्रीण बनण्याचा प्रयत्न केल्यास दोघांचे जीवन आनंदी होईल. आनंद शोधात फिरण्यापेक्षा आनंद मानण्यात आहे असे स्वतःस बजावा म्हणजे मनाच्या वेदनेवर फुंकर मारत बसण्याची आणि कुणीतरी तुमच सात्वंन करण्याची पाळी तुमच्यावर येणार नाही.बापाचा शर्ट मुलाला किंवा मुलाचा बापाला होऊ लागला की वैचारिक समानतेच्या
तराजूत स्वतःला ठेवणे योग्य.सर्वच तुमच्या मनासारखे का घडावे? त्यांनी स्वतः निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त केल्यावर त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेचा आदर करूनच तुम्ही प्रश्न सोडवू शकाल. वयातील अंतर कमी होणारच नाही पण मनातील अंतर कमी करण तुमच्या हाती आहेच. पालकाच्या भूमिकेत नव्हे तर संमजस मित्राच्या नजरेन पहालत तरच प्रश्न नक्कीच सुटतील, तुमचे आणि त्यांचेही.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “प्राधान्यक्रम तुमचा आणि त्यांचाही

  1. Harshada Mishra
    Harshada Mishra says:

    नवीन पिढीचे यथार्थ चित्रण!

Comments are closed.