बापाला मरावंच लागतं!
मुलांना किंमत कळायला बापाला मरावंच लागतं
तो जिवंत असेपर्यंत त्याचं बोलणं, वागणं सगळंच टोचतं
लहानपणी, बापाला आम्ही छोटे आहोत हे कुठे कळतं?
जेव्हातेव्हा शिस्तीच बाळकडू, आमचं सुख त्याला सलतं
दुखलं खुपलं आईच पाहते, त्याला कुठे काय कळतं?
काही ही मागा, याचा नेहमीच नन्ना, असं कुठे चालतं?
काही वेगळ करायचं म्हटलं, की प्रवचन, हे का त्याला शोभतं?
दुसऱ्याचे गुण गातो, आमचं वेगळेपण, का कुणास ठाऊक खुपतं?
खर्चाचा नुसता विषय आला की त्याच टाळकं पटकन तापतं
हौस मौज थोडी करावी म्हटली, की याला अर्थ नियोजन सूचतं
कितीही चांगले गुण मिळवा, किंवा स्पर्धेतील दाखवा ट्रॉफी
तो काय चुकलं तेच सांगतो, त्याचा सूर जणू माग पहिली माफी
मित्रांसोबत थोडा झाला उशीर, की याचे फोन हा उगाच अधीर
दारात पाय ठेवण्याचा अवकाश, की याच्या शब्दांचा पाठीत खंजीर
कितीही मोठे झालो तरी याच्या नियमांचे बंध होतच नाही कमी
जन्म देऊन वाढवलं हे तर खरं,आता आयुष्याची हाच देणार का हमी?
खरं खर सांगतो, या बाप माणसांचं, काही कधी नसतंच खरं
आपलाच हेका चालवतात, चुकले तरी म्हणत नाही चुकलंच बरं
याला आता कळायला नको का, आम्हीही याच्यापेक्षा गाठली उंची?
निवृत्त झाल्यावर याने शांत बसावं, का खर्च करावी नसलेली शक्ती?
हा अजूनही त्याच त्याच गोष्टी सांगत, उगाच देत बसतो फुकट सल्ले
जुळवून घ्यायला याचं काय जातंय? का कंठशोष, गेले ते दिन गेले
म्हणून वाटत बाप नावाचा उपद्रवी ताप अगदी कुणालाच असू नये
मोठया मुलांनीच का,अगदी बच्चे कंपनीने बापाचा जुलूम सोसू नये
तुमचं सगळं अगदी खरं,पण मित्रानो तुम्हीही कधी तरी बनालच बाप
त्या रोल मध्ये शिरलात की मात्र उगाचच मुलांवर नका करू तापाताप
बाप झाल्याशिवाय त्याची चिंता त्याचे दुःख समजून घेता येणार नाही
बापही असतो जिवंत माणूस, तो गेल्याशिवाय बाप डोक्यातून जाणार नाही
अत्यन्त सदेतोड़ व चोख निरीक्षण. अगदी सत्य आहे. बाप हा प्राणी नेहमी दुर्लक्षित असलेला प्राणी. त्याची किम्मत तो गेल्या नंतरच कळते.
बापाच्या भूमिकेत गेल्यावरच मुलांना कळेल.. कविता छान.
छान कविता 👌👌
अब्दुल, भोसले,कौस्तुभ अभिप्रायाबद्दल धन्यवाद.