बाप्पा धाव रे

बाप्पा धाव रे

बाप्पा या वर्षी तुझे काही खरे नाही. तुला कळलंय ना सध्या देशात काय चाललंय ? कधी काळी तुझ्या मुषकाने हाहाकार माजवला होता आणि आत्ता या करोनानं थैमान घातलं आहे. ऐकतोस ना! ऐकू येणारच म्हणा तुझे कर्ण केवढे मोठे, पण ऐकून न ऐकल्यासारख करू नको हा, नाहीतर राजकारणी जसं ‘मी नाही ऐकलं’ म्हणतात तसं करशील.

अरे संपूर्ण जगात थरकाप उडालाय, का म्हणून काय विचारतोस? आपल्या पिताश्रींनी तिसरा डोळा नाही उघडला पण या करोनान त्राही भगवान करून सोडलंय. पूर्वी जे मूर्ती कारागीर नारळ वाढवून नोव्हेबरपासून तुझी मूर्ती घडवायला सुरवात करत होते ते तुला शिव्या घालत आहेत. गिरणगावात कोकणातील चाकरमानी मोठ्या संख्येनं राहायचे आणि त्यांनीच तिथे गणपती उत्सव मंडळे स्थापन केली. कापड गिरण्यांना बरकत होती तेव्हा एका एका मिलमध्ये दोन अडीच हजार कामगार काम करत होते, बहुतांशी कोकणी, पैशाच्या मर्यादेमुळे दर वर्षी गावी जात नव्हते म्हणून तर त्यांनी गिरणगावात मोठ्या प्रमाणात मंडळ स्थापन केली. या भागात अंदाजे शंभर लहान मोठी गणेश मंडळ वीस वर्षांपूर्वी आब राखून होती. गिरणगावात रंगारी बदक चाळ, भिवंडीवाला बिल्डिंग या आणि अशा अनेक चाळीतील भाषाही कोकणी, मालवणी. वीस पंचवीस वर्षांपूर्वी तिथे गेल्यास कोकणातच आहोत की काय असा भास होई. गणपती सणाच्या आठवडा अगोदर परेल डेपो, मुंबई सेंट्रल डेपो कोकणात जाणा-या गाड्यांनी गजबजून जाई. ज्यांना गावी जाणे शक्य होत नसे ते आपली भेट घेऊन डेपो गाठत आणि आपल्या आप्तांना शक्य ते सामान आणि रोख शेशंभर, चाकरमान्याहाती धाडत. एस.टी. सुटे पर्यंत त्यांचे पाय घराकडे वळत नसत.

गिरण्या संपल्या, गिरण गावात टाॅवर झाले आणि या टाॅवरमध्ये राहणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही म्हणून चाकरमानी हे टाॅवरमधले घर विकून डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा येथे पळाले. सहाजीकच गिरणगावातील काही मंडळांना घरघर लागली. देवा हा तुझा गिरणगावचा इतिहास, तुझे आणि कोकण्यांचे घनिष्ट नाते. येथेच दत्ता सामंत, इस्वलकरांसारखे युनियन लिडर तुझ्याच साक्षीने निर्माण झाले. प्रत्येक नगरात वेगळा भाई, त्याचे वेगळे मंडळ आणि वेगळाच रूबाब. संपलं सारं, आता या टाॅवर मधील मंडळींना खाली उतरायलाच सवड नाही. मग मंडळांच काय होणार, आता हीच मंडळ तिथेच डोंबिवली, बदलापूरात आहेत बरं! गाव बदललं तरी कोकणी तो कोकणी, मानी आणि गुणी. सटकली तर लगेचच काढील उणी दुणी,  मदतीस आला तर सोडून देइल नेसणी. असा बाहेरून काटे आत मधाळ गरांचा फणसच की.

तर या गिरण गावात किती तरी गणेश शाळा होत्या. तेव्हा खातू सारखे गिरण गावातील मोठे मूर्तिकार तुझी मोठी मूर्ती घडवायला किती उत्सूक असायचे पण आता या करोनापाई शासनाच्या चार फुटांच्या मर्यादेने त्यांची या पूर्वी केलेली मेहनत मातीमोल ठरणार आहे. बरं जर तू या करोना बाबत त्यांना कल्पना दिली असतीस तर तुझं काही बिघडणार होत का? सर्वव्यापी ना तू? मग हा व्याप तुला नाही कळला असं तरी कसं म्हणावं! पण तू अद्यापी दखल घेतली नाही, हे काही बर नाही. तु दखल न घेतल्याने जीवनातून किती बेदखल झाले याची तुला कल्पना आहे ना? असणारच तु बुद्धीदेवता, तुला तर सर्वच दिसत असणार.

अस आहे तर, तु सर्व भक्तांची  परीक्षा घ्यायची ठरवली आहेस की काय? भक्तांना संकटात टाकायचं ठरवलं अस दिसत एकूण, हे काही बर नाही. बिचा-यांची मागील चार महिन्यांची मेहनत, POP, सगळंच मोफत गेलं की. बरं मग तुझा सांगाडा, साँरी हा देह पुढील वर्षापर्यंत सांभाळायचं म्हटल तर जागाही अडून राहणार. तूच सांग या अर्धवट मूर्तींच त्यांनी काय करावं? नाही पेक्षा राज्यकर्त्यांना ज्या तयार होत आहेत त्या मूर्ती वापर करता याव्यात म्हणून सुधारीत निर्णय घेण्याची बुध्दी दे आणि पुढील वर्षापासून शक्य तितक्या लहानच मूर्ती असावी असा  आदेश काढण्याची बुध्दी दे. 

बाप्पा हे मी फक्त मुर्तीकारांबद्द्ल नाही म्हणत बरं,आमच्या मंडळाचे कायकर्ते तुझ्या नावाने बोट मोडत आहेत, काय?  का म्हणून? अरे ह्या करोनान एवढं संकट ओढवले असता लोक गणपती वर्गणी कशी आणि कुठून देणार? बरं वर्गणी नाही तर  मग हा तुझ्या नावानं चालणारा उत्सव पदरमोड करून कोण करणार? जर पैसेच नसतील, रात्रीची सोय नसेल तर तुझ्या मूर्तीसमोर जागरण कोण आणि कसं करणार? पटतंय ना? वर्गणी नाही तर खरेदी नाही, खरेदी नाही तर हिशोब नाही आणि हिशोब नाही तर कपची, म्हणजे चिरी मिरी काय घंटा मिळणार? तुच सांग आमचं या वर्षी कसं काय चालणार? 

बाप्पा तू पण अजब आहेस आम्ही तुला विलायतेत घेवून गेलो. न्यूजर्सी, लंडन कुठे कुठे म्हणून सांगू?. तू नाही म्हणालास तरी तुझी सजावट करायला विदेशी  लाईटची तोरण घेतली, तुझ्यासाठी पूजेची ऑनलाईन तयारी केली. माऊस खास बनवून घेतला, म्हटलं असावा स्टँड बाय. तुझीच कॉलर टाइट करत होतो ना, तू पण लय शांनाच आहेस काय पण घ्या म्हणायचं म्हणजे, जरा अतीच झालं की आत्ता तुला ती निर्जीव प्लास्टिक आणि थरमाँकॉलची सजावट आवडत नव्हती तर तस सांगायचं की? आम्ही माती ऐवजी प्लॅस्टर ऑफ पॅरिस ची मूर्ती सुबक दिसते म्हणून करत होतो, झगमगीत रंग देत होतो. हे तुला नव्हतं आवडत तर एकदा कान पिळायचा होतास, दृष्टांत देता येत होता ना? मग ते सोपे मार्ग असताना ही करोना आजाराची शिक्षा का म्हणून? आमचं आराध्य ना तू? शोभलं का हे अस वागणं? सगळ्यांना जर या करोनाने बेजार केलं तर तुला शेजार कोण? कोण तुझी आरती करणार? कोण नैवेद्य दाखवणार आणि कोण रात्री तुझ्या पुढे तीन पानांचं भजन करणार? 

बघ झाल तितकं फार झालं आता तरी त्या करोनाचा कान पीळ, करोनाला तुझ्या आसनाखली, मांडीखाली दाबून टाक. तुला हे नक्की जमेल, तसा अजूनही तुझ्यावर भरोसा आहे आमचा.

अरे, चाकरमान्यांना गावी जायची कोण उत्सूकता? गेले दोन महिने रेल्वे सुरू झाली की गणपतीसाठी रेल्वे बुकिंग करायचं म्हणून नवाकाळ, कोकण वैभव, तरुण भारत, प्रहार असे न्यूज पेपर वाचून आता तरी गाडी सुरू झाल्याची खबर येईल म्हणून वाट पहात आहेत, ऐकतोस ना, आता या करोना सारख्या महामारीतही कोकणी माणसाची तुझ्या वरची श्रद्धा कमी झालेली नाही. त्यांना विश्वास आहे तु काही तरी चमत्कार करशील आणि ह्या करोना रोगाला दूर पळवशील, केवढा हा विश्वास, पण बाप्पा अगदी खरं सांग ह्या करोनाने तुला पण दमवलं ना?, पहा गेले कित्ती दिवस तु एकटाच त्या मंदिरात अंधारात बसून आहेस, ना तुला कोणी भेटायला येतं, ना तु कुणाची भेट घ्यायला जात, बघ हे काही बर नाही आणि संकटात तु मदत केली नाहीस तर तुला संकटंमोचन कोण आणि कसे म्हणणार?

सगळे तुझे भक्त, तु सर्व निर्मितीचा आरंभ, आणि अंतही तूच. तुझे भक्त तुझ्या चमत्काराची वाट पहात आहेत,  तुच त्यांचा त्राता आहेस, त्यांच दुःख दूर करशील म्हणून डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहत आहेत.

दया नाही का रे येत तुला? त्यांचे दुःख त्यांचे अश्रू तुला नाही का दिसत? कसा विश्वास ठेवणार ते तुझ्यावर. तेव्हा आता एक कर या करोनाला तुझ्या उदरात गडप कर आणि तुझ्या भक्तांना दु:खातून मुक्त कर. 

आत्ता हेच पहा ना, काल काय झालं ते ऐक.

” मग गावाक येवचा काय करतस, कालच मी शामल्याकडे पाट देऊन इलय, त्याका सांगलय, मुर्ती लय मोठी नको म्हणान, देवखोलयेक मसवो काढून घेतलंय, झॅक दिसता. परबान चित्रव फार भारी काढल्यान, नजरव ठराची नाय, मग कधी येतस?” असा फोन आला की येथील मुंबईकरांची तगमग वाढते. कधी एकदा गावी पोचतो आणि अवाठात शिरतो असं होते. बाप्पा हा काही नवा रिवाज नाही, तुला तर हे माहीतच आहे. मी नवीन थोडच सांगतोय? पण प्रश्र्न तसाच भिजत पडलाय गावी जायचं कसं??

काही शहाणे नवं नवा उपाय सूचवत आहेत, म्हणे आरोग्य सेतू अँपमध्ये नाव नोंदवा, नेत्रावती आणि मंगला रोजच जाते, गोवा तिकीट काढलं की सहज गावी पोचाल, पण तिथेच जाऊन क्वारंटाइन व्हाव लागेल येतं काय? शिवाय उद्या घरच्याच मंडळींनी मुंबंईतून चाकरमानी आलाय म्हणून संशयाने तुमच्याकडे पाहील तर चालेल तुम्हाला, जर एकाच खोलीत चौदा दिवस एकटच रहावं लागलं तर “जल बिन मछली” असं नाही ना वाटणार? आधी ठरवा बरं, नाहीतर गावी जाल आणि “आगीतून फुफाट्यात” पडाल, बरोबर ना?

“गण्या , अरे शाण्या, काल आमच्या भावाशीचो फोन इलो होतो, गेले तीन महिने तुझ्या भेटीसाठी गावी येवची तयारी सर्वच  मुंबईकर  करतत. भाऊस  विचारी होतो “गावची काय खबरबात म्हणान?” मी सांगलय आताच लावणी आटोपली. या वर्षी मुंबयकरा गावी उतरलीहत म्हणान लावणीक माणसा शोधूची पाळी येऊक नाय. हय  हो महासंमंध करोना रोज धुडगूस घालता. आरोग्य खात्याची माणसा रोज घराकडे चलतत, विचारतत तुमच्याकडे कोणी मुंबईकर उतरेलत काय? गावातसून तीन चार लोकांका करोना संशेय म्हणान धरून जिल्ह्यात नेल्यानी. धा- वीस झेड.पी. शाळेत क्वारंटीन का काय म्हणतात तशी कोंडून ठेवलीहत. माका भय दिसता. मी बाजाराकव जाणा सोडून दिलंय. तु नाय इलस तरी जमात, तसो सालाबाद गणपती पुजतलय मी, तू  येण्याची धांदल अजीबात मारु नको. आमका होइत तसो देव धरम करतलव. बघूया काय काय जमता ता. 

गणराया, गेल्या वर्षी आमच्या भावाशीन ड्रम सेंट आणलोहा, तुझ्या आगमनासाठी नवीन बँजो पार्टी तयार केली हा. सारंगमामाकडे तुझी मूर्ती तयार होता. घराक रंग काढण्याचा काम घरचीच माणसं रात्रीचो दिवस करून करीत आसत. नवीन भजनाव तयार केली हत. चिनी बनावटीची आरास खरेदी करण्याचा विचार हा. तूच सांग जर हो करोना असोच बसान रवलो तर तुझी सेवा कोण करीत? तुका ठाऊक हा, तुझी लेकरा हट्टी आसत, ती तुका पुजण्यासाठी गावी जावचाच म्हणान तयारी करत आसत. करोनाचा संकट आसा याची जाणीव आणि भय असूनव ती तुझ्या भेटीसाठी भलता धाडस करतीत आणि स्वतः संकटात पडतीत आणि मगे तुझो धावो करतीत, ह्या नीट लक्षात घे. तुझ्या भक्तांका चांगली बुध्दी दी नायतर त्यांचो तुझ्यावरचो विश्वास उडान जाईत .

आमचे गावाचे स्वतःक नेते समजणारे मित्र अतीच हुशार आसत, ते स्वतः सुरक्षित रवतीत  आणि सामान्य जनतेक गणपतीक गावी जावचा म्हणान गाडीची मागणी करतीत, एसटीची सोय करा म्हणूनव सांगतीत. सगळोच अडाणी अचरटी कारभार. पण बाप्पा जनतेचे डोळे उघडे ठेवण्याचं काम तुझा. तु हयगय करू नको. तूच त्यांका बुद्धी दी आणि प्रत्येकाक ते आसत थयच दर्शन दी .त्यांका सांग आधी स्वतःची काळजी घेवा, मी तर तुमच्या सोबतच आसय. मुद्दाम गावाहून स्पेशल ट्रेन ने हय इलंय. करोना होतो तरी तुमची भेट घेऊक  इलय. बघ बाप्पा, इतक्या जमवच. आमच्या भावाबांधवांच्या डोक्यात जा गावी येण्याचं खुळ आसा त्याका  बाहेर खेचून काढ.

सांग,  बाबांनों या वर्षी झय आसास थयच मनोभावे माझी प्रार्थना करा,  धूप नको, दिवो नको, हार नको की आरास नको. मोदक नसलो तरी चलात. सांग त्यांका, स्वत:चा घर स्वच्छ ठेवा स्वतःची काळजी घेवा, आपल्या घरातील व्यक्ती निरोगी रवतीत या साठी काळजी घेवा. आणि घरातच सुखी रवा, मी गावी होतय, मी हयवं आसय. मी चरा चरात आसय. देवा सांगशीत ना ह्या? तु विद्येची देवता, तु कलेची देवता. तुका जमणा नाय असा या जगात कायच नाय, करशीत  ना ह्या? बघ घात करु नको. मी सांगलय ता अगत्यान सर्व आमच्या चाकरमान्यांका सांग.सांगशित ना? 

बघ मनावर घे आणि सगळ्या  भक्तांची धांदल मारून गावी जाण्याच्या अविचारातून आणि करोनातूनही सुटका कर. तुका  गाऱ्हणा घालूची गरज नाय, कारण गाऱ्हाणा तुका अगोदरच पोचला  असतला. विघ्नहर्त्या, या अजाण बालकाची सेवा रुजू करून घे आणि करोना संकटाक पळवून लाव.

सर्वात महत्त्वाचां म्हणजे जे चाकरमानी गावाक जाण्याचो विचार बाळगून सरकारच्या निर्णयाकडे डोळे लाऊन बसले  आसत त्यांका स्वता:चो करोनापासून रक्षण करण्याची, मगच गावाक जाण्यासाठी धांदल करूची बुध्दी दे. 

सर्व भक्तांचा  मंगल कर आणि तुझी सेवा चाकरी करून घे रे म्हाराजा.

ह्या मी तुका ह्या साठीच सांगतंय कारण चार चार दीसानी मुंबईकर फोन करून विचारीत रवतात, “काय ठरला ग्राम सभेत?” आणि आमची आयेव तसलीच विचारता “बबली भाऊस येतलो मा? त्याच्या आरतेची सर अवाठात कोणाक नाय, ये ई हो विठ्ठले ऐकुचा ता त्याच्या कडसून.” तूच तारण हार, तुका सगळाच कळता आणि तूच योग्य ता करशीत.

सर्वेऽपि सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामया: | 
सर्वे भद्राणि पश्यन्तु न कश्र्चिद् दु:खमाप्नुयात् ||

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

6 thoughts on “बाप्पा धाव रे

 1. भोसले राजेंद्र
  भोसले राजेंद्र says:

  छान …..कोकणची ओढ आणि तळमळ ….छानच… एकूणच कोकणी माणुस उत्सव प्रिय आहे. तो थोडीच हार मानणार?

  1. Mangesh Kocharekar
   Mangesh Kocharekar says:

   समजदार असणं आणि हार मानण्यामध्ये फरक आहे.

 2. Kala samant
  Kala samant says:

  Well written good subject.

 3. Archana Ashok kulkarni
  Archana Ashok kulkarni says:

  छान….!
  कोकणातल्या लोकांचे आणि गणरायाचे विशेष जवळचे नाते आहे. ते शब्दात छान उतरवले आहे.

 4. तानाजी पाटील
  तानाजी पाटील says:

  सुंदर लेखन कोकणी माणूस आणि गणेशोत्सव हे घट्ट नात आहे. पण सध्याच्या संकटाने सर्वजण अत्यंत दहशतीखाली आहेत.
  हे श्री गणेशा यातून सुटका कर बाबा.

 5. Kocharekar mangesh
  Kocharekar mangesh says:

  सर्व वाचक मित्रांचे आभार. असाच प्रतिसाद दिला तर उत्तम लिखाण करण्यासाठी प्रेरणा मिळेल.

Comments are closed.