बोलावा विठ्ठल

बोलावा विठ्ठल

श्रीमती मंजुश्री गोखले यांचं, “हेचि दान देगा देवा” हे पुस्तक वाचत होतो. पै यांच्या फ्रेंड्स लायब्ररी मधून पंढरीची वारी नुकतीच सुरू झाली असताना हे पुस्तक अचानक हाती लागलं आणि चारशे तीस पानांचं पुस्तक अवघ्या चार दिवसात वाचून हाता वेगळ केलं. संत तुकराम यांच्या जीवनावर एक सुंदर कादंबरी वाचल्याचा अमृतानुभव मिळाला आणि त्या काळ्या जादूगाराचा जादूटोणा लक्षात आला. म्हटलं तर किती लबाड! सर्व काही करुन नामानिराळा. सर्वात पहिली लबाडी म्हणजे हा काळ्या एकटा त्या पुंडलिकाच्या भेटीला गेला आणि तिथेच पुंडलिकाशी गप्पा मारत राहिला, कमाल आहे, घरी रुक्मिणी वाट पाहात असेल हा विचार यायला हवा की नको? पण हे आपले निर्धास्त, म्हणतात, “क्या कर लेगी?” केवढा हा आत्मविश्वास, यांना माहीत आहे शेवटी सात जन्माची गाठ मारून आणलेली बायको,काय करेल? रुसून बसेल, रागावेल, अबोला धरेल, चार झणझणीत शब्द बोलेल आणि म्हणेल चला आता भूक लागली असेल तर गिळा.

मला तर त्या आवलीच्या रुपात रुक्मिणी दिसली. सोशिक, नवऱ्यासाठी खस्ता खाणारी, राग आला तर फटाफट बोलणारी पण शेवटी ढेकळागत त्याच्या प्रेमात विरघळून जाणारी. त्याला बर नसलं तर त्याच्या बाजूला बसणारी, त्याला समजावणारी, त्याला कोणी बोललं तर आकांत करणारी. कधी कधी तर त्या आवलीचा हेवा वाटतो, ती नवऱ्याच्या आजूबाजूला सदैव असते पण त्या रुक्मिणीच्या नशिबी ते सुख नाही. भक्तांनी विठ्ठलाला निवांत भेटता यावं म्हणून तिची बोळवणी वेगळ्या ठिकाणी केली आहे.
भक्तही लबाड, काही नको काही नको म्हणताना त्याची एकांतात भेट व्हावी त्याने या देहाचे चंदन करावे हे मागणे काही सुटत नाही, सारे काही मोहा कारणे.

आपण म्हणतो तो विठ्या एका जागेवर पुंडलिकाच्या भेटीसाठी उभा आहे, पण ते खरं का? मग जे काही घडतं त्याला जबाबदार कोण? तर त्या काळ्या शिवाय आणि कोण असणार? तो कोणत्या रुपात येऊन काय खेळ दाखवेल ते कळणे अवघड. पहा ढगांचा रंग काळा, ते गुरगुरतात, रागानं धुमसतात अन मग व्याकुळ होऊन स्वतः वर्षा होऊन भेटीला येतात. त्या ढगांना माहिती आहे जे त्या “काळ्यात” तत्व आहे तेच माझ्यात आहे. आणि म्हणून या वर्षधारा वारकऱ्यांची सोबत करत ताड ताड ताशा वाजवत भजन गाऊ लागतात, बघा वारकरी एकमेकांना भेटले तर वय विसरून एकमेकांच्या पाया पडतात. ते व्यक्तीच्या नव्हे तर परब्रह्मतत्व जे तुमच्या माझ्यात सामावले आहे त्याला हा नमस्कार आहे. पिंडी ते ब्रह्मांडी हेच ते, विठ्ठल पाहवया गेलो विठ्ठल होऊन ठेलो. तेव्हा भले तुम्ही पंढरपूर जा अथवा जाऊ नका, तो तुमच्या सोबत सदैव आहे.

“एक तत्व नाम दृढ धरा मनी”, तेव्हा माणसात जो कोणी आहे त्यालाच निश्चित करा. शेवटी केशव म्हणा, माधव म्हणा, गोपाल म्हणा गोविंद म्हणा. त्या विठ्याच्या ठाई वेगळे काय आहे. म्हणून वारकरी संप्रदाय निष्ठेने त्या पांडुरंगालाच भजतात.

“बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जिवेभावे।”

वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या कास्तकाराला आषाढी एकादशी म्हणजे जीवाभावाच्या विठ्याला भेटण्याचा दिवस म्हणूनच वारकरी, त्या काळ्या आईच्या कुशीत बी बियाणं पेरून निर्धास्त मनाने वारीच्या गर्दीत सामील झाले आहेत… त्यांना माहीत आहे,या काळीची कूस उजवायची ताकद त्या मेघांच्या सरीत आहे, तो मेघ हाच तर माझा विठू आहे, त्याला माझी काळजी नसेल तर कोणाला असेल म्हणून तो निर्धास्त आहे.

“तुझिया बळे पंढरीनाथा जालो निर्भर तुटली व्यथा
घातला भार तुझिया माथा”

अशी तुकारामांची अवस्था होत असे, तीच या हजारो, लाखो भाविकांची आहे, घर सोडतांना मनात चिंता नाही की घरघर नाही. मनी ध्यानी फक्त आणि फक्त पांडुरंग

“आता नाही सोस न करी आणीक, धरिन ते एक हेचि दृढ”

कसलीच चिंता नाही, कसले मागणे नाही मनात संकल्प असलाच तर तो एकच, विठू भेटीचा. जिव्हा फक्त त्याच्या नावाचाच टाहो फोडते आणि पाय फक्त त्याच्या नावाचा ठेका धरतात.

आता जळो देह सुख, दंभ मान न करी याचे साधन ।
तू जगदादि नारायण, आलो शरण तव पायी ।।

विठुच्या भक्तांच मागणं काय? तर सुखाची अभिलाषा नाही, तर मागणे एकच शरीरातील खोटेपणा, शरीरातील वैगुण्य जळून जाऊदे आणि तुझे दर्शन घडू दे याचसाठी हे नारायणा तुला शरण आलो आहे.तुझ्या पावलांच दर्शन मला दे.

“हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी”

आषाढी एकादशीच्या दिवशी त्या पंढरीत पोचून चंद्रभागेत स्नान करून विठुच दर्शन घ्यायचं म्हणून आसुसलेले भक्त महिनाभर पायी चालत असतात. देहू आणि आळंदीवरून निघालेली दिंडी पालखीसह जस जशी पूढे जात राहते तशा इतर दिंड्या तिला येऊन मिळतात जणू एक एक प्रवाह नर्मदेला,गोदेला येऊन मिळावा आणि पूढे तिचं स्वरूप बदलत त्याचा जनसागर होतो. त्या विविध ठिकाणाहून आलेल्या दिंड्या आणि विठूभक्त एका ठेक्यात “ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम”, गात असतात. पाऊले त्या तालावर नाचत असतात आणि तो एकरूप झालेला सागर पाहिला की वाटतं

अवघा रंग एक झाला,रंगि रंगला अभंग ।
मी तू पण गेले वाया पाहता पंढरी राया ।।

प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन घडण्यापुर्वीच एकमेकांना त्यांच्यातील विठ्ठलाचे दर्शन घडलेले असते म्हणूनच तेथे दुजाभाव नसतो. कित्येक मैलांच अंतर पायी वारी करून या पंढरीत येतात आणि अगदी पायरीच दर्शन झालं तरी कृतार्थ होऊन परततात कारण ही पायरी आहे नाम्याची, त्या नामदेवांची ज्याच्या आग्रहाखातर देव नैवेद्य जेवायला पंढरी सोडून गेला होता. नामदेवांच्या अढळ श्रद्धेविषयी,आणि त्यांच्या भक्तीच्या सामर्थ्याविषयी ज्ञानदेव यांना चांगली माहिती होती म्हणून नामदेवांच्या कीर्तनाला स्वतः ज्ञानदेव हजेरी लावत. ही ताकद होती नामदेवांच्या वीठूवरील प्रेमाची, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, नामदेव भजन, किर्तनाला उभे राहिले की विठ्ठल त्यांच्या संगतीनं नाचू लागतो इतक तादात्म्य नामदेवांनी त्या विठ्याशी साधलं होतं. हीच ती किमया विठू नामाची. एकनाथ असो की ज्ञानदेव, नामदेव असो की तुकाराम, काय म्हणतात?

“आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची”

कोणत्याही संतांनी जे ज्ञान भांडार निर्माण केलं त्याचं स्वतः क्रेडिट घेतलं नाही तर “तूच कर्ता आणि करविता शरण तुला भगवंता” हा भाव त्यांच्या ठायी आहे म्हणून ते खरे संत. नामाची ताकद काय आहे? त्या विठ्ठल नामात कोणतं चैतन्य लपलं आहे ते समजण्यासाठी तद्रूप होता आले पाहिजे, मी पण गळाले पाहिजे,
वारी करणारा म्हणतो विठ्ठलाचे बोलावणे आहे म्हणून मी वारीत आहे, ना काही देणे, ना मागणे मग वारकरी शेकडो मैल चालत का जातो? हे त्यालाच माहीत नाही, तुकाराम महाराज म्हणतात,

बोलाविले जेणे, तोचि याचे गुह्य जाणे ।
मी तो काबाडाचा धनी जेवू मागावे थिंकोनी ।।

हीच स्थिती हजारो लाखो भाविकांची आहे, जेष्ठ वद्य सप्तमीला देहू येथून तुकारामांची आणि अष्टमीला ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुणे येथे येते तेथून सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण या मार्गे पंढरपूर येथे जातात या मार्गात शेगाव, शिर्डी, आळंदी, नागपूर, कोकण अशा शेकडो दिंड्या मिळतात आणि पायी मार्गस्थ होतात कित्येक दिवस चालून पंढरीत येतात. था थकवा ना कंटाळा. शेकडो मैलांचं अंतर कापून पंढरपूरला येतात आणि दर्शन होताच विठू नामाचा गजर करत, “धन्य, धन्य ती पंढरी” म्हणत माघारी जातात.

विठ्ठल नामात जी जादू आहे त्याचा प्रत्यय हजारो , लाखो भाविक वाटेत घेतात. ज्या गावात भाविकांचा मुक्काम पडेल तेथील गावकरी या दिंडीतील वारकऱ्यांची जेवणाची आणि थांबण्याची सोय करतात. अनेक डॉक्टर स्वयंसेवक म्हणून वाटेत आरोग्य सेवा देतात. अशी ही जगातील एकमेव दिंडी. संपूर्ण वाटेत हरी उच्चारण सुरू असते.दिंड्या पताका यांच मनोहारी दृष्य अनेक घाटमार्गात दिसून येत. जागोजागी दिंडीचे रिंगण पडते आणि मानाचा अश्व दिंडीत दौडत जातो. ह्या सावळ्याचं वर्णन कस करावं ते आकळत नाही, जो तो आपल्या भक्तीभावाने त्याला पुजतो,

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटीवरी ठेवोनिया ।
तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर रूप तुझे ।।

काय गंमत आहे,हा भणंग विठ्या,ज्याच्याकडे मुद्देमाल काही नाही म्हणावं तर कोणतही शस्त्र नाही, अस्त्र नाही, बरं हा काही देईल, पुढची तजवीज करेल तसे ही नाही आणि तरीही त्याचा भक्तीत लाखो लोक बुडून जातात याच कारण आजवर ना कुणाला कळालं ना भविष्यात कोणाला कळेल.

“कानडा राजा पंढरीचा, वेदांनाही नाही कळला अंत पार याचा”

बरं याला कोणता सोस नाही,

नको आरती की नको पुष्पमाला
प्रभू भोवताली असे व्यापलेला

हा पंढरीत विटेवर उभा आहे म्हणावं तर तस ही नाही,

“हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो”

याचं कामच अवघड आहे बुवा, कधी नाथांच्या घरी पाणी भरतो तो कधी जनाईला दळण दळायला मदत करतो, काय कधी करेल याचा नेम नाही. याचा संचार नाही अशी जागाच नाही ,त्रिभुवन व्यापून दशांगुळे उरला तो हा मी. असा जो कोण तो विठू. पण तो तुमचा माझा आहे, गोर गरीबांचा आहे म्हणूनच दर वर्षी एका सर्व सामान्य भक्ताला सपत्नीक मुख्यमंत्र्यांनसोबत पुजा करण्याचा मान मिळतो. असा हा काळ्या,

“दिनांचा कैवारी भक्तीचा भुकेला, मुलामाणसात माझा विठ्ठल सोजीरा”

विठ्ठल, विठ्ठल,विठ्ठलंsss तुम्ही नामाचा गजर ऐकला की देहभान हरपून जाते. वीणा, मृदुंग, चिपळ्या यांच्या साथीने विठ्ठलाचं नामस्मरण करत वारी निघाली की सर्वांच्या अंगातच वारं भरत, ते केरळ किंवा गोव्याच्या सिमेवर ताटकळत राहिलेले नभ विठ्ठल नामाचा गजर ऐकू आला की वारीतील अश्व जसा धावतो तसे बेभान होऊन महाराष्ट्राचा काना कोपरा व्यापून टाकतात.एवढ सामर्थ्य त्या विठू नामात आहे. तुम्ही फक्त मनापासून आणि ते ही काम करता करता त्याचं नामस्मरण करा तेवढच त्या विठ्याला पुरतं.

“नको आरती की नको पुष्पमाला प्रभू भोवताली असे व्यापलेला”

काय राव, आहे का काही खर्च? त्याला नारळ नको, हार नको आणि प्रसादही नको. तुमचा भक्तीभाव तेवढा असू द्या आणि हो इच्छा असलीच तर एखादं तुळशीपत्र वाहा आणि म्हणा ” विष्णवेन नमः, कृष्णार्पणस्तु.” तोच विष्णू, तोच सावळा कृष्ण आणि तोच तुमचा विठ्या.

आषाढीला डोलणारी पिकं आपल्या इवल्याश्या पानांनी त्या विठ्याच गुणगान गात असतात, वारकरी आपली भगवी पताका आणि भगिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन निघतात पण सर्वांच्या मुखी एकच नाम. सर्वत्र एकच गाज

विठ्ठल नामाचा रे टाहो ।
विठ्ठल आवडी प्रेमभाव ।।

तुटला हा संदेहो, भवमुळ व्याधीचा ।
महान नरहरी उच्चार कृष्ण हरी श्रीधर ।।

सर्वात महत्वाचं काय तर या वारीत ना जात, ना पात, ना कुणी श्रीमंत ना गरीब, ही वारी एकतेची आहे. ही वारी मानवतेची आहे. इथे सर्व विठुचे सेवक ना कुणी उच्च ना नीच. भागवत धर्माची पताका घेतल्यावर,

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म,भेदाभेद भ्रम अमंगळ.।
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वरपुजनाचे ।।

तेव्हा हरीनाम कोणाच्याही मुखातून बाहेर पडू दे ते विठ्ठलाला जाऊन मिळते.

नाचूं कीर्तनाचे रंगीं। ज्ञानदीप लावूं जगी।।
परेहुनि परतें घर। तेथे राहूं निरंतर ।।

संत नामदेव अभंगात म्हणतात ज्ञान वाटायचे असेल तर किर्तनासारख माध्यम नाही. स्वतःच घर त्यागून त्या पांडुरंगाच्या पायाशी आसरा घेतला, त्याचे नाम घेतले तर आपण चिंतामुक्त होऊ. अर्थात घर त्यागणे म्हणजे संसारातून पळून जाणे नव्हे तर अलीप्तपणे संसार करणे तो संसारच विठ्ठलाच्या ठाई पहाणे. राम,राम म्हणा किंवा राधेश्याम म्हणा, राधाकृष्ण म्हणा किंवा विठ्ठल म्हणा. या जीवनरूपी भवसागरात “नाम” हे कसलेल्या नावाड्याप्रमाणे हा दुःखाचा ,चिंतेचा आणि विवंचनेचा सागर पार करण्यास उपयोगी पडते.

देवाचिये द्वारि उभा क्षणभरी। तेणे मुक्ती चारी चारि साधिलेल्या।।
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी ।।

सांगायचे ते इतुकेच की देवाच्या भक्तीत त्याच्या नामात इतकी ताकद आहे की स्थुल, सुक्ष्म, कारण आणि महाकारण किंवा मनुष्याच्या जीवनातील बालक, युवक, तरूण आणि वृद्ध यांना ज्या अवस्थेत वेगवेगळ्या टप्प्यावर दुःख भोगावे लागते त्याचा नामामुळे विसर पडतो. म्हणून नाम घेणे सर्वतोपरी आनंदाचे आहे.

समतेचा संदेश पोचवणारी ही आषाढी वारी आणि प्रत्येक भक्तांच्या ठाई वास करणारा तो विठ्या म्हणजेच परब्रम्ह. आषाढी एकादशीला विठूचे दर्शन झाले की भावविभोर होऊन परततात, निघतांना कृतकृत्य झाल्याचा भाव असतो.जेव्हा ज्ञानेश्वर आणि तीन भावंडांनी पहिल्यांदा विठ्ठलाचं दर्शन घेतलं होतं तेव्हा त्यांची झालेली अवस्था

रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी
तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा

या अभंगात व्यक्त केली आहे, मुक्तेला ते म्हणतात, मी ऐकलं होतं त्याहूनही ह्या विठ्याचे रूप खूपच गोजिर आहे आणि त्याच्या दर्शनाने मला आनंद झाला आहे. हाच भाव विठ्ठलाचा निरोप भक्तांच्या मनात असतो. त्याचे कितीही वेळा दर्शन घेतले तरी समाधान होणार नाही परंतु परंतु त्याचे रूप मनात साठवून पुन्हा भेटीचे नक्की करूनच ते निघतात.आज आषाढी एकादशी आहे. आपण पंढरपूरला जाऊ शकलो नाही तरी विठ्ठलाचे दर्शन आणि मंदिराची सजावट नक्कीच पाहू शकतो,त्यातच गोड मानुन घेऊ आणि उपवास म्हणून दुप्पट खाऊ.

रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल।

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

3 thoughts on “बोलावा विठ्ठल

 1. Rohini Tushar Bhoir
  Rohini Tushar Bhoir says:

  अप्रतिम लिखाण आहे सर.. जय हरी विठ्ठल

 2. Archana Kulkarni
  Archana Kulkarni says:

  तुकाराम महाराजांचे चरित्र आहेच असे की आपल्यासारखी संवेदनशील व्यक्ति त्यांच्या विचारात , भक्तिभावात चिंब भिजेल.
  खूप छान व्यक्त केले आहे तुम्ही हा भाव.

 3. Kocharekar mangesh
  Kocharekar mangesh says:

  रोहीणी मॅडम आणि कुलकर्णी मॅडम अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद.

Comments are closed.