भूक

भूक

पोटाची भूक ज्याला नाही असा विरळा, मग तो मनुष्य असेल,पशू असेल किंवा पक्षी. भुचर असेल, जलचर असेल किंवा हवेत राहणारा. झाडांनाही भूक असते म्हणून त्यांची मुळे सुपिक जमिनीच्या शोधात पळत असतात, खोल जात असतात. तर घटपर्णी किंवा ड्रासेरा कीटक खाऊन जगते. विषववृत्तावर काही वृक्ष असे आहेत की प्राणी त्यांच्या जवळ गेला की त्यांच्या काटेदार फांद्या प्राण्यांच्या शोधात हालचाल करतात आणि त्याचे रक्त शोषून घेतात. तेव्हा अन्न मिळवणे ही नैसर्गिक प्रेरणा आहे त्यासाठी माणूस, प्राणी, वनस्पती किंवा कोणताही सजीव धडपड करत असतो.

आज आपण अन्नाबाबत स्वावलंबी झालो असलो तरी आजही भारतात वेगवेगळ्या राज्यात भूकबळींची संख्या कमी नाही. बिहार, उत्तराखंड, मिझोराम, आसाम, मणिपूर येथे आजही अन्नतुटवडा आहे. या बाबत आपण श्रीलंका किंवा पाकिस्तान यांच्यापेक्षा मागास आहोत असे अहवाल सांगतो. शहरात रहात असल्याने याचे गांभीर्य लक्षात येत नसले तरी मेळघाट भागातील कुपोषणाची चर्चा नेहमीच होत असते.

आपण अमिताभ बच्चन यांची रोटी, कपडा और मकान चित्रपटातील भूमिका पहिली असेल, भूक लागली की रस्त्यावर भटकणारी मुलं चोरीही करतात, मुलं भूक लागली की आईजवळ आरडाओरडा करतत किंवा डबे शोधतात. डबे शोधून समाधान झालच नाही तर आईकडे खाऊसाठी पैसे मागतात. अर्थात ग्रामीण भागातील गरीबांना एक वेळच्या अन्नासाठी मर मर मराव लागतं ते मुलांना खाऊसाठी पैसे कुठून देणार? शहरात मात्र ज्या बायका लोकांची धुणी, भांंडी करतात त्यांना वेळ नसल्याने त्या देखिल आपल्या मुलांना खाऊसाठी पैसे देतात.

यातायात केल्याशिवाय पोट भरणार नाही म्हणून पक्षी रोज सकाळी उठून दाणे टिपायला जातात. कोळी समुद्रावर मासे मारायला जातात. वाघ, सिंह, कोल्हा यासारखे हिंस्त्र प्राणी शाकाहारी प्राण्यांची शिकार करून आपलं पोट भरतात. मगर भूकेपोटी पाणी प्यायला आलेल्या वाघ, सिंह यांच्यावर हल्ला करून त्याची शिकार करून जगते. काही प्राणी दिवसा उजेडी आपल्या अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडतात तर काही निशाचर अगदी मध्यरात्री किंवा पहाटे. अजगर किंवा सिंह एकदा पोटभर अन्न खाल्लं की सहसा लगेचच दुसऱ्या प्राण्यांची शिकार करत नाही. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.’ हे फक्त म्हणायचं झालं. प्रत्येकाला उदरनिर्वाहासाठी काही ना काही उद्योग करावाच लागतो. पोटाची भूक भागवायची तर, ‘यत्न तो देव जाणावा’ या न्यायानेच वागावे लागेल.

भूक लागली की आपण अन्नाच्या दिशेने शोध घेतो,
प्राचीन काळी नद्यांच्या काठी किंवा समुद्र किनारी वस्ती असण्याचे हेच कारण होते. भटके प्राणी अन्नासाठी वणवण करतात, आदिमानव आपल्या शिकारीच्या शोधात रानावनात फिरत असे. शेती करता येऊ लागली आणि माणसाची अन्नासाठीची भटकंती थांबली. दगडांची हत्यारे, अग्नी, चाक, लोखंड अशा शोधामुळे अन्न सुरक्षा मिळाली. तरीसुद्धा आपल्या गरजा भागवायला आणि अन्नात बदल हवा म्हणूनही भ्रमंती घडतेच.

मला १९७४-७५ चा दुष्काळ आठवतोय. रेशनकार्डवर माणसी अर्धा किलो तांदूळ आणि एक किलो गहू मिळत. हे मिळवण्यासाठी सकाळी सहा वाजता रांग लावावी लागे. रेशनवर मिलो किंवा मका मिळत असे. मी तेव्हा अगदी बारा वर्षांचा असेन, सतत भूक लागायची आणि घरात अपूरे अन्न. मग चिंचा, आवळे, कैरी, बोरं, उंबर आणि जंगलात मिळणारी फळे, कंद खाऊन पोटाला आधार द्यायचो. जंगलात मिळणारे कडू करांदे आणून उकडवून खायचो. कसल्या कसल्या शेंगा खायचो. आयात केलेला मिलो, जव आणि मका रेशनवर मिळायचा ज्याची भाकरी तुटता तुटत नसे. कोलम तांदूळ फक्त काळ्या बाजारात मिळायचा साहजिकच तो फक्त श्रीमंत माणसांच्या पंक्तीत.

आताच्या पिढीला हे अवास्तव वर्णन वाटेल पण सत्य ते सत्यच. आमची ही अवस्था तर वारली,आदिवासी या सारख्या गरीबाची काय अवस्था असेल? अगदी तहान भागवायला पुरेसे स्वच्छ पाणी सुध्दा नव्हते. पहाटे उठून विहिरीवरून पाणी भरावे लागे, कारण विहिरीचा झराच मंदावला होता. हरिजन ओहाळाच्या काठावर खड्डा खणून त्यात. झिरपून आलेले पाणी पित असत. तेव्हा भूक म्हणजे काय पिडा आहे ते १९७३ ते १९७५ पर्यंत अनेक नागरिकांनी अनुभवल होत.

रस्ते आणि वाहतूक साधने यांच्या उपलब्धतेमुळे आता कोणत्याही गोष्टी खेडेपाड्यात सहजपणे उपलब्ध होतात फक्त गडचिरोली, अमरावती मेळघाट येथील दूर खेडेगावातील गरीब भुकेपोटी खातो. उर्वरित मुले चवीसाठी खातात. आम्ही लहानपणी कधीतरी आईचा रागरंग बघून गोळी किंवा चाँकलेट घेऊन दे म्हणायचो. तेव्हा रावळगाव पाच पैशात मिळत असे. लिमलेटच्या मोठ्या गोळ्या मिळत. चाळीस वर्षांपूर्वी सुकडी नावाचा मका, गुळ व बेसन यांचा वापर करून केलेला खाद्य पदार्थ खेड्यातील शाळेत वाटला जात आहे. आता शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत दुपारचे जेवण पुरवले जाते त्यामुळे
खेड्यातील लहान मुलांच्या कुपोषणाचा प्रश्न सुटला आहे.

आज मुलांना मिळणाऱ्या खाऊ आणि इतर वस्तूचा अतिरेक झाला आहे. घरातील अन्न गोड लागत नाही. बर्गर, पिझ्झा, मंचुरीयन, चायनीज याशिवाय पान हलत नाही. अर्थात ही स्थिती मोठ्या शहरातील किंवा मोठ्या खेड्यातील. गंमतीचा भाग त्यापूढेच आहे. आमच्या भागातील कुत्रे बिस्कीटे खाऊन कंटाळले आहेत.अनेक गुजराती, मारवाडी आणि काही मराठी कुटुंब या कुत्र्यांना बिस्कीटचे पुडेच्या पुडे घालतात. तिच ती बिस्किटे खाऊन कुत्रे माजाटले आहेत. माणसासारखे बहुधा त्यांनाही
चिकन, मटण, मासे ,चायनीज हवं आहे की काय न कळे. पाळीव कुत्रे आणि मांजरे यांची कथाच वेगळी त्यांना बाजारात मिळणारे डॉग फुडच खायची सवय आहे त्यामुळे डाळभात किंवा वरणभात ते उष्टवत देखील नाही. जोपर्यंत पोटात वळवळत नाही चांगले अन्न गोड लागणार नाही. पोट उपाशी राहिले, फाके पडू लागले की मिळेल ते अन्न मग गोड लागतं.

आमच्या लहानपणी कधीतरी, टोस्ट किंवा कडक बटर मिळत असे पण बिस्कीट कोणी पाहुण्यांनी आणले तरच घरी यायचे ते ही ग्लुकोज किंवा क्रँकजँक तेव्हा मारीचा एवढा प्रसार नसावा. फरसाण त्यातील विविध प्रकार अभावानेच आणले जात. आता डी मार्ट ला खरेदीला जातो तेव्हा बिस्कीट प्रकारात किमान साठ ब्रँड पाहतो हिच गत कँडबरी किंवा इतर खाण्याच्या पदार्थाबाबतही.

हिच आईस्क्रीम बाबत, लहानपणी आईसफ्रुट किंवा बर्फाचा गोळा सहज मिळे. आईस्क्रीम चे काप मिळे ते सधन कुटुंबाच्या लग्नात. कुल्फी हा प्रकारही फारसा नव्हता. आता उन्हाळ्यात नव्हे तर हिवाळ्यात आईस्क्रीम पार्लरमध्ये कुल्फी, स्कुप, कँडी, फॅमिली पॅक असे नानाविधी प्रकार उपलब्ध आहेत. तेव्हा आज शहरात अगदी चाळीत राहणाऱ्या कुटुंबाला हे पदार्थ खरेदी करणे सहज शक्य होतं, पण तेव्हा हीच गोष्ट खूप अवघड होती.

डी मार्ट घरेदीला जे कुटुंब रिकामी ट्राँली घेऊन आत जाते ते खरेदी करतांना पुर्ण ट्राँली भर खरेदी पूर्ण झाल्यानंतरच बाहेर निघते. यातील निम्मे सामान हे फक्त खरेदीची भूक भागवण्यासाठी असते. काही महिलांना त्या आठवड्यात डी मार्ट किंवा एखाद्या नवीन शाँपींग सेंटरला जाऊन आले नाही तर अनईझी वाटते. तेव्हा खरेदीची भूक असते हे पचनी पडणं तसं अवघड आहे पण आजच्या पिढीचे ते वास्तव आहे. काही महिलांना ऑनलाईन शॉपिंग ची हौस असते. रिलॅक्स मूड मध्ये असतांना मोबाईल पाहता पाहता त्या दिसेल ते कधीतरी उपयोगी पडेल म्हणून खरेदी करून टाकतात.

एखाद्या वेळी तुम्ही प्रवासात असता. कधकधी अशा ठिकाणी प्रवास सुरू असतो की विडी काडी शिवाय काही कुठे दिसत नाही, पण पार्ले किंवा मारीचा पुडा बरणीत तुम्हाला दिसतो आणि तुम्ही खूश होता. झटपट तो खरेदी करून बकाबक खाऊन टाकता. तेव्हा भूक लागली की काहीही पचते. भूक लागली की अगदी क्षुद्र, यत्किंचित वाळवी किंवा कसरही पुस्तके, लाकडे खाऊन टाकते. हत्ती सारखा महाकाय प्राणी एका दिवसात ३५० किलो हिरवा पाला किंवा गवत अन्न म्हणून फस्त करतो. लहानपणी आपण गाडीभर अन्न आणि एक माणूस खाणारा राक्षस आणि भिमाची कथा वाचलीच असेल. काही महाभागांना भूक आवरत नाही, जर वेळेत अन्न मिळाले नाही तर गडबडा लोळतात किंवा बायकोला हाणतात. कोल्हापूर आणि पुणे येथे काही हॉटेलमध्ये महाथाळी मिळते तिची किंमत ₹१०००/असते ती कोणत्याही व्यक्तीने एकट्याने पूर्ण संपवली तर त्याला ₹१००० किंवा ५००० बक्षीस मिळते. अर्थात, ‘ते काम नोहे ऐरा गबाळ्याचे तेथे पाहिजे जातीचे.’

आपण हे ही ऐकल असेल की भिमराव आंबेडकर हे विदेशात बॅरिस्टर होण्यासाठी गेले होते. ते कमीत कमी पैशात जेवायाचे आणि ढीगभर पुस्तके वाचायचे. खाण्याखिलवण्याच्या सुरस कथा आपणही ऐकल्या असतील विदेशात जेवणे हा सोपस्कार नसतो तर तो सांग्रसंगीत सोहळा असतो. भल्या मोठ्या टेबलावर एक एक डीश सर्व्ह केली जाते थोडे मद्य आणि विविध प्रकारचे पदार्थ मंडळी चविचविने दोन तास खात असतात. इथे भारतात काही माणसे ताटावर जेवायला कधी बसले आणि हात धुवायला कधी गेले कळतही नाही.

कोल्हटकर यांच्या कथेत खेळातील हस्तीदंत सुपारी सारखा कातरून तोंडात टाकल्याची गोष्ट आपण वाचली असेल. तेव्हा भूक लागली म्हणजे सावकाश एक घास बत्तीस वेळा चावून खावा या बोलण्यात काही तथ्य आहे की नाही असा प्रश्न पडण स्वाभाविक आहे. आपण काहीतरी चमचमीत खायला मिळेल म्हणून आईकडे, ‘भूक लागली दे ना खायला.’ असा अट्टाहास धरला असेल तेव्हा आईने, ‘भूक लागल्याय ना मग जोरा जोराने भूंक.’ असे गंमतीने सांगितल्याचे आठवत असेल. तेव्हा भूक हा विषय रामायण, महाभारत किंवा त्याहून गहन आहे का? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मित्रांनो आजही भारतातील मेळघाट किंवा इतर ठिकाणी भूकबळी जातात. अन्न नाही म्हणून उपास घडून लहान बालके आणि वयोवृध्द वारल्याची बातमी आपण ऐकतो. मेळघाट किंवा खोलवर जंगलात आजही घडतात कारण तेथे मोदींची अन्न सुरक्षा पथके पोचू शकत नाहीत.

मोठमोठ्या लग्नात बफेट पध्दतीने जेवणावळ असते. लोक आपल्याला हवे तेवढे स्वतः वाढून घेतात. कधीकधी हे अन्न आपल्या भुकेपेक्षा बरेच जास्त असते. आपल्याला अंदाज न आल्याने किंवा पुन्हा पुन्हा पदार्थ आणायला जाऊ लागू नये म्हणूनही काही महाभाग तसे वागतात. दुर्दैवाने वाढून घेतलेले अन्न, आपल्या जास्त असल्याने वाया जाते किंवा उगाचच पोटात भरत राहिल्यास अपचन होते. म्हणून आवश्यक तेवढेच अन्न वाढून घ्यावे. जेवढे पचेल तेवढेच खावे. खाण्याचा मोह बाळगल्यास डॉक्टरची धन होते. शहरात लग्नाच्या मोसमात किती अन्न वाया जात असावे त्याची मोजदाद होत नसावी. एकीकडे अशी परिस्थिती असताना,भूकेपोटी माणूस गुन्हा करायला प्रवृत्त होतो. ज्या देशात राज्यकर्ते भुकेसाठी गरिबांना अन्न पुरवू शकत नाहीत त्या देशाला भविष्य नाही.

भूक म्हणजे, काही तरी हवे असल्याची प्रेरणा, जाणीव. अर्थात ती जाणीव कुणाला होईल तर फक्त सजीवांना. पण त्यामध्ये असा एखाद्या प्राणी असेल की ही जाणीवच त्याला नसेल त्याचे काय? म्हणजेच ही जाणीव निर्माण होणं यासाठी मेंदू जागृत अवस्थेत असावा लागतो.

समाजात काही मुले किंवा वृद्धावस्थेत असणाऱ्या व्यक्ती आपण पाहतो की त्यांच्या चेतना हरवलेल्या असतात,त्यांना ना भूक किंवा तहान लागल्याचे कळत ना शारीरिक धर्म कळत. अशा व्यक्ती ह्या सर्वस्वी परावलंबी असतात. खरं तर या व्यक्ती म्हणजे सजीव पुतळेच ज्यांची हालचाल होते पण त्यांना कोणत्याही भावना नाही. अशा व्यक्ती ज्यांच्या घरी असतील त्यांची किती मानसिक कुचंबणा होत असेल त्याचा विचार न केलेलाच बरा. त्याच्या मनात काय चालले आहे हे ओळखणं तितकंसं सोप्पे नाही त्यामुळे त्याची गरज ओळखून त्याला वेळोवेळी मदत करणं फारच अवघड.

काही दिवसापूर्वी मी माझ्या दूरच्या बहिणीला भेटायला गेलो होतो. ती कोणालाच,अगदी स्वतः च्या मुलालाही ओळखत नाही. आम्ही गेलो तेव्हा तिला, “मी आलोय, तुझा भाऊ, सांग माझं नाव काय ?”अस दोन तीन वेळा म्हणालो, ती हसली, मी माझं नाव तिला सांगितल्या नंतर ती ते दोन तीन वेळा म्हणाली, माझा हात आपल्या कृश हातात धरून खळाळून हसली, हसत राहिली. माझ्या दुसऱ्या बहिणीने, जी तिची काळजी घेते,मला सांगितलं, ती आता कोणालाच ओळखत नाही, स्वतः च्या मुलालाही ओळखत नाही, मी सतत जवळ असते म्हणून किंवा मी तीच सर्व करते म्हणून कदाचित मला ओळखत असावी.” मी तिला सफरचंद असलेली पिशवी दिली तस ती गोड हसली, “खाऊ,खाऊ.” ते पाहून मला गदगदून आलं. तिचं ते निर्व्याज हसू पाहून ती पुन्हा बालपण जगते की काय? असे क्षणभर वाटून गेले.

दहा वर्षे अगोदर, म्हणजे तिच्या सत्तरीत ती चांगली, तरुण वाटत होती. सर्व काही करत होती. ऍक्टिव्ह महिलामंडळ सदस्य होती आणि आज? मी, कित्येकदा तिच्या घरी, तिच्या हातचे जेऊन खाऊनच निघत असे, म्हणजे न जेवता ती जाऊ देतच नसे, ती आज पूर्ण परावलंबी होती. आम्हाला पाहून ती हसली, तिला आनंद झाला, बरं वाटलं की कसे? हे ती सांगू शकत नव्हती पण तिच्या कृश हाताची माझ्या हातावरील पकड काहीतरी वेगळं सांगत होती. असा आजार असणाऱ्या व्यक्तींना पोटा इतकीच भावनिक भूक असते आणि त्याचा विचार दुर्दैवाने आपल्यापर्यंत पोचत नाही. या अशा अवस्थेत ती किती काळ असेल आणि तिचं हवं नको पहायला दुसऱ्या बहिणीला जमेल की नाही, माहिती नाही. ईश्वर काही प्रश्न अनुत्तरित ठेवतो. त्यामुळे किती जणांना यातना सहन कराव्या लागत असतील ठाऊक नाही. माझ्या पाहण्यात अशा दोन तिन व्यक्ती आहेत. या लोकांना सांभाळण किती अवघड होत असावे. अशा व्यक्तींची काळजी घेणारी माणस एकाकी असतात त्यांना भेटणं दिलासा देण गरजेचं असतं. आपल्या दैनंदिन जीवनातील थोडा वेळ देऊन त्यांची विचारपूस केल्यास त्यांचा मानसिक ताण थोडा कमी होईल.

मित्रांनो ह्या जीवाला जशी पोटाची भूक असते, तशी शारिरीक, मानसिक आणि भावनिक भूक असते. तेव्हा एखाद्या व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा मिळाला म्हणजे त्याचे काम झाले अशी आपली समजूत असते. गावी आईला पैसे पाठवले की तिच्या गरजेच्या वस्तू ती विकत घेईल असं शहारातील तिच्या सुनेच म्हणणं असते. “आपण खडतर प्रवास करून नेहमी कसे जायचे?” अशी कदाचित ,तिची भावना असते. पण हेच जर आपल्या जन्मानंतर तिने केले असते तर? गावी राहणारी व्यक्ती तुमची पत्नी, तुमचे जन्मदाते, भाऊ किंवा बहीण असेल, त्यांच्या एकसूरी जीवनात तुमचे तिथे जाणे हा ही विरंगुळा असतो. तुम्ही एकाकी राहिलात तरच त्याची जाणीव तुम्हाला होईल. जर गावाकडे एकट राहणं कटांळवाण ठरू शकते तर मग सैन्यातील नव्याने भरती झालेल्या लहान वयातील मुलांच काय? किंवा ज्यांची नोकरी प्रवासी जहाजावर झालेली असते त्यांच काय? सुरवातीला ही तरूण मुलं घरची आठवण काढून रडतात. त्यांचे जेष्ठ मित्रच त्यांना वडिलकीच्या नात्याने आधार देतात. तेव्हा मनाची, प्रेमाची भूक ही पोटाच्या भुके इतकीच मोठी आहे.

लहान मुलांसाठी त्याचे वडील किंवा त्याचा मामा दूर गावावरून येणार असतील तर त्याच्यासाठी ती पर्वणी असते. तुम्ही आल्यानंतर तो तुम्हाला बिलगेल,माझ्यासाठी काय आणलय? म्हणून विचारेल, तुमच्या हाताने हट्टाने जेवेल, तुम्हाला आपले खेळ दाखवेल. अभ्यासही दाखवेल आणि झोप येईल तेव्हा तुमच्या मांडीवर किंवा कुशीत मस्त झोपेल. त्याला विश्वास आहे तुमचे त्याच्यावर प्रेम आहे. जेव्हा तो तुमच्या सायकलवर किंवा स्कुटरवर असेल किंवा ट्रेनने प्रवास करतांना तुमच्या मांडीवर झोपला असेल, तो निर्धास्त असेल याचे कारण त्याला तुमच्या विषयी वाटत असलेला खात्री, बाबा आहेत ना! प्रवासात तुम्ही दोघ असाल तर पत्नी तुमच्या खांद्यावर डोक ठेऊन झोपते, तुमच्या सोबत असतांना तिला भिती किंवा काळजी नाही वाटत. वाढत्या वयात मानसिक भूक जास्त असते.

हाच तो भावनिक बंध,विश्वास ज्याच्या ताकदीने आपण सर्व कष्ट सर्व दुःख विसरून जातो. तेव्हा शरीराची भुक मोठी की मनाची हे ठरवण अवघड असतं. तुम्ही बाहेरगावी कामाला असता, काही कारणास्तव तुम्ही तुमच्या पत्नीशी दोन दिवस बोलू शकत नाही. ती तुम्हाला संपर्क करत असते पण तुमच्याशी तिचा संपर्क होऊ शकत नाही.

जेव्हा, केव्हा तिचा तुमच्याशी संपर्क होतो, ती तुमचा आवाज ऐकते तेव्हा ती आसू भरल्या डोळ्यांनी विचारते, तुम्ही बरे आहात ना? तिला हुंदका आवरत नाही,काही सेकंद ती बोलू शकत नाही. तुमची इतक्या दूर वरून झालेली फोनवरील भेटही तिला पुरेशी असते.तुमच्या सौख्याच मागणं ती सदैव मागत असते. मित्रांनो हाच तो भावनिक बंध हीच ती तनमनाची भूक. ‘आसावला जीव’ हा शब्द कवितेत ऐकला असेल पण ज्यांनी हे अनुभवल असेल त्याला मनाची ओढ, मानसिक भूक आणि मानसिक समाधान म्हणजे काय? ते शब्दाविना कळेल. ‘शब्दावाचूनी कळले सारे शब्दांच्या पलीकडले’ अस म्हणतात ते हेच.

पहा, ईश्वराची किंवा नैसर्गिक शक्तीची किमया की ही जाणीव देऊनच त्यांनी आपल्याला जन्म दिला. म्हणून तर जन्म होत नाही तोच नव शिशु भुकेने रडते. जो पर्यंत ते कनेक्ट असते त्याला चिंता नसते. त्याचं पोषण नैसर्गिक रित्या होत रहात पण एकदा का ते सोर्स पासून विलग झालं की त्याला पहिली जाणीव होते ती भुकेची. प्रारंभी ही भूक फक्त पोटाचीच असते. लहान मुलाला पोटभर दुध मिळाले की ते झोपते.ते दूध आईचे की दाईचे प्रश्न गौण असतो. ममत्व, ममता ही जाणीव हळूहळू स्पर्शाने निर्माण होते.

म्हणजे भुक असतांना ते आईजवळ ज्या लाडाने आणि हक्काने भुक भागवते तशीच प्रेरणा ते दाईकडे दाखवेलच असे नाही. दुधाची बाटली दिली आणि थोपटलं तर भुकेपोटी ते बाटलीच दूध ते पिऊन टाकेलही पण आईची उणीव भरून काढणारं, आईचा वात्सल्य पुरवणारं या जगात अन्य कोणी नाही.

आपण मोठे होतांना आपल्या स्वभावातही बदल होत जातात. ज्या आईच्या अंगावर आपण वाढलो, जिचं बोट धरून पहिले पाऊल टाकले ज्या आईने पाटीवर पहिला ग गिरवून श्रीगणेशा केला तिच आई तुमच्या मोठेपणी तुमच्या प्रेमाला पारखी होते. जसजसे तुम्ही वयाने मोठे होता आई तुमची पोटाची भुक भागवत असली तरी तुमची सर्व नाटक खपवून घेण नाकारते आणि तिथच ठिणगी पडते. आता तुम्हाला इतर गोष्टी खुणावू लागतात त्यात मित्रमैत्रीणी, तुम्हाला आवडतील असे कपडे, हॉटेलिंग, मुक्त फिरणे आणि नेमक्या याच गोष्टीना तुमच्या आईचा अथवा वडिलांचा विरोध असतो मग वैचारिक मतभेद होणारच. तुम्ही आणि तुमचा मित्र परिवार यांनी जीवनाकडे मौज या व्यतिरिक्त गंभीरपणे पाहिलेलं नसते, स्वाभाविक तुमच्या फेजबूक, ट्विटर किंवा इन्स्टाग्रामवर जे तुम्ही पाहता तेच वास्तव आहे असं गृहीत धरून तुमचं वागणं किंवा बोलणं असतं.

जर तुम्ही उत्तम लेखकांचे साहित्य वाचले, उत्तम दिग्दर्शकांची नाटके किंवा सिनेमे पाहिले तर जगातील अनेक गोष्टी, अनेक समस्या यावर तुमचं प्रबोधन होईल. तुम्हाला वाचनाची भूक हवी, साहीत्य समजून घेण्याची किंवा एखादी कला आत्मसात करण्याची भूक हवी. एखादा संशोधक झपाटल्या प्रमाणे आपल्या संशोधनासाठी तासनतास प्रयोग करतो. एखादा लेखक पुस्तक लिहितांना अनेक ग्रंथ वाचून आपल्याला आवश्यक तो संदर्भ शोधून काढतो.एखादा इतिहासकार आपल्या ग्रंथाच्या विचारांना पुष्टी देण्यासाठी विविध गड किल्ले पालथे घालून योग्य तो पुरावे शोधून काढतो किंवा एखादा संगीतकार एखादी धून नीट वाजवता यावी यासाठी जसा तासन्तास सराव किंवा रियाज करतो तशी तडप मनाला असेल तर तुमच्या ध्येयाकडे तुम्ही पोचू शकाल.

ध्येय, वेड ही सुद्धा भूक आहे. ज्याला एखाद्या कलेची आवड असेल तो त्या साठी वाटेल ते कष्ट कारायला तयार असतो. चित्रकार किंवा शिल्पकार आपले चित्र किंवा शिल्पं पुर्ण करतांना त्या चित्रात, शिल्पात हरवून जातो. आपल्याला तहानभूक लागली याची जाणीव नष्ट होते त्याच्या मेंदूत जे भावतरंग उठत असतात ते त्या कलाकृतीत उतरवल्याशिवाय त्याला चैन नसते. मनाला समाधान नसते हीच ती अस्सल कलेची भूक. आपण अनेकदा पाहतो ते कलाकार हा मनस्वी असतो. वाढलेली दाढी, अंगावर व्यवस्थित न बसणारे कपडे, डोक्यात सतत विचार,
आत्ममग्न स्वतःच्या तंद्रीत. ही भावनिक आणि कलेची भूक आपल्या समजूती पलीकडची असते. एखाद्या अस्ताव्यस्त पडलेल्या दगडात किंवा वाढलेल्या झाडात त्याला वेगळीच कलाकृती दिसत असते.आपल्यासाठी तो ठार वेडा असतो, वेगळा असतो. अशा लोकांच्या सोबत आयुष्य घालवणं हे त्यांच्या जोडीदारासाठी चॅलेंज असते. तेव्हा फक्त शांत मनाने येईल त्या प्रसंगाला तोंड देणे इतकेच आपल्या हाती असते.

पोटाच्या भूके इतकीच भावनिक भूक महत्त्वाची आहे. काही घरी सर्व काही आहे पण घरातील माणस नीट बोलत नाहीत अशी स्थिती विशेषतः घरात येणाऱ्या सुने बाबत दिसते. अशा श्रीमंतीचा उपयोग काय? पती-पत्नी यांच्यात भावनिक बंध नसेल तर त्यांच्या लग्नासंबंधाला आणि घरातील सुबत्तेचा काय उपयोग ? काही कुटुंबात फक्त नाश्ता किंवा जेवणा पुरत सदस्य एकत्र येतात पण कुटुंबात कोणतीच चर्चा वा संभाषण होत नाही. त्यामुळे ज्या महिला नोकरी करत नाहीत त्या महिलांना कोणतही सामान्य ज्ञान मिळत नाही. साहजिकच त्या शिकल्या सवरल्या असल्या तरी सामाजिक ज्ञानात मागे पडतात.

भारतातील ग्रामीण भागात आजही मुलींना समानतेची वागणूक दिली जात नाही. तेव्हा भूक लागली तर जसे अन्न हवे तशीच भावनिक भूक भागवण्यासाठी प्रेमळ शब्द हवे. मानसिक आधार हवा. देव सुध्दा भावाचा, भक्तीचा भूकेला असतो तो नाम्या हातून भाकरी खातो मग आपल्या सारख्या सामान्यांचे काय? कधीतरी आपण ऐकलं असेल जेवाखायला दिल नसतं तरी चाललं असतं पण चार प्रेमाचे शब्दही सासरी बोलत नाहीत. तेव्हा भावनिक भूक भागली नाही तर स्त्री उध्वस्त होते. म्हणून कुटुंबात मुलांना समानतेची वागणूक आणि प्रेम मिळालं तर कुटुंब सुखी आणि समाधानी दिसेल, राहिल.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar