मनरमणी
तसं तिचं माझं काही नातं नव्हतं पण तिला पाहिलं की वाटायचं कधीतरी आपण तिला नक्कीच भेटलोय. कधी? कुठे? काहीच तर आठवत नाही तरीही ती दिसली की मनाची हुरहूर वाढायची. तिच्याकडे जाऊन बोलावं, तिची खुशाली घ्यावी अस वाटायचं पण ती कोण? अस ओळख देख नसतांना सरळ तिच्या समोर जाऊन बोलणार तरी कस? काही कारण नको? बोलायचा प्रयत्न केला आणि तिने लक्षच दिलं नाही किंवा गैरसमज करून घेऊन अपमान केला तर आपल्याला चालेल? पण काही असल तरी ती मनातून जात नव्हती हे ही तितकच खरं.
म्हणजे मलाच निट ठरवता येत नव्हतं की मला तिच्याशी का बोलावसं वाटतं? का तिच्याबद्दल जवळीक वाटते? ती दिसली नाही तर मन बैचेन का होत? बरं तिला अनेकदा पाठमोरी पाहिल्याने ती खुप सुंदर आहे की चार चौघींसारखी ते ही नीट माहिती नव्हतं, मात्र पाठमोरी ती सुडौल दिसत होती. म्हणजे कमनीय बांधा, साडे पाच फुटाची उंची, पायाच्या पोटरीपर्यंत पोचणारी वेणी. मुख्य म्हणजे तिची साडी व्यवस्थित नेसलेली असे आणि ब्लॉऊजही मॅचिंग असे. ती श्रीमंत किंवा मोठ्या घरातील होती की नव्हती ह्याची कल्पना नव्हती. ती रोज माझ्या पूढे चालतांना दिसायची, माझ्या चालण्याचा वेग कमी करून मी तिला पाठमोरी पहायचो. लांबसडक मुलायम केसात बऱ्याचदा गजरा असे, कधी मोगऱ्याचा तर कधी जाई, जुईचा तो गंध दुरून मी श्वासात भरून घ्यायचो. तो गंध फक्त फुलांचा नव्हता तर तिच्या तनामनाचा होता. ती तिच्या मार्गाने जाईपर्यंत मी तिच्या मागे हळुवार चालीत जायचो. जीना उतरतांना, तिचे लांबसडक केस तिच्या नितंबावरून पाठच्या पोटरीपर्यंत डोलायचे.
ते दृष्य तिला न पाहताही मनाचा ठाव घ्यायचं. कधीतरी वाटायचं तिची केसांची वेणी ती उतरताना पायरी झाडतील. अर्थात मला ते आवडलं नसतं. म्हणजे इतक्या लांबलचक, सुंदर काळोभोर केसांनी पायरी झाडायची म्हणजे? पण तसं काही झालं नाही. बरेचदा असाही विचार आला जर हे केस इतके लांब आहेत म्हणजे त्यांना चांगली वाढ आहे,
कधीतरी अस नक्की घडेल की तिचे केस पायरीला स्पर्श करतील आणि मी सावधपणे तिचे केस अलगद वर धरून तिला म्हणेन, “मिस हा आपला केशसंभार लोळत होता म्हणून मी उचलून धरला. या गुस्ताखि बद्दल माफी असावी.” पण अनेक महिन्यात ते घडलच नाही. कमाल आहे, म्हणजे हिचे केस वाढतच नाही की ती तंतोतंत माप घेऊन कापत असावी नाहीतर असही असेल की हा केशसंभार खरा नसून विग असेल. माझ्या प्रश्नांच उत्तर देणार कोण? तिला विचारावं, तर अजूनही साधलं नव्हतं.
अनेकदा मनाशी आलं, कधीतरी हिचा रूमाल पडेल आणि मी तो तिला देईन, ती हसेल, ओळख होईल मग कदाचित मैत्री मग अधूनमधून भेटी आणि भेटीतून प्रेम. माझी गाडी रूमालावरून बरीच पुढे गेली पण तो रूमाल काही एकदाही पडला नाही. शंका आली, रूमाल वापरत असेल की मग पदरालाच तोंड पुसत असेल! छे छे छे या रूमालाच काही खरं नाही.
एकदा एक धाडसी विचार सुचला, जो विचार सुचला तो ही पिक्चरमध्ये कधीतरी पाहिला होता. वाटलं ओळख करून घ्यायची तर हा उपाय करून पहायला हरकत नव्हती. एक शंभर रूपयांची नोट चलाखीने तिच्या पाठी टाकून क्षणात उचलायची आणि म्हणायचं, “Excuse me ही तुमची नोट, तुमच्या पर्स मधून बहूदा पडली, घ्या.” तिने दोन्ही हात झटकून दाखवत म्हणावं, “ओ मिस्टर माझ्याकडे पर्स दिसते आहे का पहा निट? नाही ना? ,मग माझी कशी असेल?” किंवा म्हणावं, “ओ मिस्टर जास्त शहाणे बनून मला इंप्रेस करु नका, ती नोट खिशात घाला आणि मी पब्लिकला काही सांगण्यापुर्वी फुटा.” ओळख काढून बोलण राहिलं दूर, इथ तर तिने पब्लिकला काही सांगीतल तर मार खायची परिस्थिती. असाही विचार आला, जर तिने, “हो माझेच पैसे,आणा इकडे अस म्हणत ती नोट घेऊन गेली.’ तर काय उपयोग? म्हणजे तेलही गेलं आणि तुपही गेलं, हाती राहिले धुपाटणे. शेवटी तो बेतही बारगळला.
affiliate link
कधीतरी मनात यायचं एकदा तरी हिच सँडल तुटावं, किंवा केळ्याच्या सालीवर घसरून ती पडावी आणि मी अलगद तिला सावरावी, पण प्रतीक्षा करूनही तीच सँडल एकदाही तुटलं नाही, ना ती अडखळून पडली ना तिच्या सॅंडल खाली कधी केळ आलं, कमाल आहे गेल्या कित्येक महिन्यात एकदाही चप्पल तुटू नये, अडखळून पडू नये किमान केळ्याच्या सालीवर घसरू नये म्हणजे अगदी अतीच झालं. हा विचार मनी आला की स्वप्न पडे, ती सँडलला अडकून पडतेय आणि मी तिला सावरतो. तिला सावरताना ती चक्क माझ्या बाहू पाशात आणि मग तिला सावरताना , माझा तोल जायचा आणि मी पलंगावरून चक्क खाली म्हणजे On Floor, आई आई ग टेंगुळ आलं की! तेव्हा कळायचं आपण घरातील पलंगावर आहोत. मनाचा ताबा घेणं म्हणजे काय ते कळायला अन्य उदाहरण नकोच.
आता हे वाचतांना तुम्हालाही उत्सुकता असेलच की पुढे काय झालं?, म्हणजे मी वाचक असतो तरी माझं काही वेगळं झालं नसतं, रोमान्स कोणाला आवडत नाही? त्यातुन “आम्ही” आदरार्थी म्हणजे मी विकार जिंकलेला बाबा नाही. तसा दावाही कधी केला नाही. हं तर हे अस मनाला आभास होणं सुरू होतं. तिने मला पाहिलं होतं की नव्हतं न कळे, तिच्या पाठीला डोळे नव्हते ती एखाद्या राजकन्येच्या थाटात तिच्या मस्तीत चालत असे, बाजूने कोण जातंय हे पाहण्याचं तिला काही कारण नसाव. किंवा अस ही असेल तिलाही माझ्या सारखच जागेपणी एखाद्या राजबिंड्या मुलाच स्वप्न रंगवण्याची सवय असेल. असो तर हा नियमित एकतर्फी भेटीचा सिलसिला सुरू होता. पाडगावकर उगाचच म्हणाले, “प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं तुमचं, आमचं, सगळ्यांच सेम असत.” काय सेम असतं डोंबाल? आमच्या एकतर्फी प्रेम यातना तुमच्या जाड भिंगाच्या चष्म्यातून दिसल्या नाहीत म्हणून किंवा “जे न देखे रवी ते देखे कवी.” हे खोटं ठरावं. आमचं प्रेम तुम्हाला दिसलं नसाव. म्हणे सेम,”ज्याचे प्रेम रूसले, न कळती यातना कुणाला.” किंवा, “कळा या लागल्या जिवा,मला की ईश्वरा ठाव, कुणाला काय हो त्याचे?” अस म्हणायची पाळी आमच्यावर आली तर काय करणार?
हो तर हे अस बिनसंवादाचं,बिनभेटीचं प्रेम सुरू होतं, तिच्या पाठीमागे सात आठ फरलांग चाललो की तिची वाट वेगळी व्हायची, तिच्या त्या वेगळ्या वाटेवर दिवाना होऊन कधी गेलो नाही न जाणो तिथं कसं स्वागत होईल. हे अस रिस्क घेणं जमलं नाही म्हणून तर प्रेम करता आलं नाही. कोणी, दिवार चढके, तर कोणी छत के उपरसे मीलने आया करते थे. आम्ही अतिविचारी, estimated risk लक्षात घेऊनच पुढचं ठरवणारे. म्हणजे तिच्या रस्त्याने तिच्या मागेमागे गेलो आणि कोणी तंगडं मोडलं तर? किंवा त्या वाटेवर तिचा मित्र तिची वाट पहात उभा असावा आणि ती तिथं पोचताच त्याने तिच हसून स्वागत करावं आणि हातात हात घालून चालू लागला तर? हे “तर” मनाभोवती तरंगत असताना डेरींग कशी करावी?
affiliate link
कधीतरी मित्र गप्पांच्या ओघात विचारत, ‘काय दिलप्या ! यार हल्ली तू गुमसुम असतो, कुच प्रॉब्लेम है क्या? यार बता दे, हम सब सेटिंग करके देंगे. तेरी मायूसी हमे पसंद नहीं आती. मी त्याचं म्हणणं उडवून लावायचो, “अरे अभितक कूच है ही नही, कुच होगा तो जरूर बता दुंगा.” आता माझं घोड कुठ अडलय हे सांगितले तर टिंगल टवाळी करणार, शिवाय समजा त्यांनी आमच हे स्वप्नशिल्प पाहिलं आणि तेच फिदा झाले तर? सुरेश भटांच पहा ना, प्रेम करता करता एवढे आकंठ बुडाले की शेरोशायरी करू लागले तरी “ती” बधली नाही ते निराळे. काहींच्या लग्नराशीत शनी वक्री असतो की काय न कळे?
हा एकतर्फी लपंडाव सुरू होता, ऋतू आले आणि गेले माझ्या जीवनात तो ओला श्रावण आला नाही, हेमंताची शिरवी शिरशिर आली नाही की वसंताचा उन्मादक बहरही आला नाही. तिच्या छत्रीनं कधी दगा दिला नाही आणि शिशीरात तिला थंडी बोचली नाही. बरं, तिचं कुठे अफेअर असेल तर इतक्या दिवसात तसही काही दिसलं नाही. हे पाखरू अजूनही स्वच्छंदी जीवन जगतय आणि आपल्याला मात्र यान झुरणीला लावाव म्हणजे फारच झालं.
दोन वर्षात, आणि शेकडो दिवसात एकदाही तिला भेटून बोलण्याच धाडस करू शकलो नाही ह्या माझ्या गुन्ह्यासाठी कितीही मोठी शिक्षा मला कोणी दिली तरी ती कमीच. उफss हमे प्यार जताना न आया. पण मी जिंकलो नसलो तरी हरलोही नव्हतो. नेहमी प्रमाणे मी एक दिवस त्याच ब्रीजवरून जात असता मला धक्का बसला, माझ्या पुढे ती चालत होती, होय चालीवरून तरी “ती ” नक्की तिच होती, पण अहो आश्चर्य तिचे लांबसडक केस मानेपर्यंत कापले होते, ऐवढे लांबलचक, मुलायम केस तिने कापून टाकावे हे मला अजिबात आवडल नाही. तिने बॉब कट केला होता. मी श्वास रोखून तिच्याकडे पुन्हा पाहिले, होय, ती तीच होती. मला भडभडून आल. काय अस घडलं असावं की तिने ते सुंदर,मुलायम केस कापून टाकले?
बरेच दिवस हा उद्योग सुरू होता. म्हणजे तिला असं पाठमोरी पाहण्याचं मला वेड लागल होतं असे म्हटले तरी वावगं नव्हतं. तिला समोरा समोर पहावं, प्रतिसाद देते का पाहावं असं वाटे पण काही उलटंच झालं तर या भीतीने तसा प्रयत्न आद्यपी केला नव्हता. पण बहुत राते गवाई, न पलके झपकी, न निंद आई, जिना हुवा हराम, तुझे देखा ही नही, न बुझे तनहाई अशी अवस्था झाली होती. अन्नावरची वासना उडाली होती, काय करावे? सुचत नव्हते. मग मी निर्धार केला. बस आता सोसणे नाही, एक घाव दोन तुकडे. मग कोणीही येवो वाकडे. दिवस ठरवला, मुहूर्त ठरला, उद्या म्हणजे उद्याच, या जीवाचं काही होवो. उद्या उजाडण्याची वाट पाहता डोळा कधी लागला कळले नाही. आईने हाक मारली, “दिलीप बाळा उठतोस ना? अरे साडे सात वाजले, म्हटलं कधी नव्हे तो तू झोपला आहेस म्हणून नाही उठवलं. चल तुझा चहा टाकते,डबा कधीचा तयार आहे.” मी तिच्यावर रागावलो, ,”हे ग काय आई, तुला उठवायला काय झालं, आता मला ऑफिसमध्ये जायला उशीर नाही का होणार?” मी घाई घाईत तयारी उरकली आणि निघालो. नशिबाने नेहमीची गाडी मिळाली.
स्टेशन उतरताच माझे डोळे तिचा शोध घेऊ लागले आणि अचानक ती पिंक साडीत दिसली. त्या साडीवर तिने लाईट ब्लु ब्लॉउज घातला होता. नेहमी प्रमाणे लांबसडक वेणीवर गजरा दिसत होता. मी मला रोखू शकलो नाही, पावलांचा वेग वाढवत मी तिच्या पुढे पोचलो आणि सँडल बेल्ट नीट करण्याचा बहाणा करत तिच्याकडे पाहिलं, होय “ती” तीच तर होती. नितळ चेहऱ्याची,सावळी पण रेखीव डोळ्यांची आणि अपऱ्या नाकाची. त्याच क्षणी तिनेही माझ्याकडे पाहिलं, पहिल्यांदाच ती गोड हसली. कोणास ठाऊक, कदाचित माझा बहाणा तिच्या लक्षात आला असावा. तिच्या गळ्यात नाजूक मंगळसूत्र आणि काळ्या मण्यात गुंफलेला एक सोन्याचा तन्मणी चमकत होता. मला काय होतंय हे कळण्यापूर्वी मी पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं, होय, तिच्या दोन्ही हातात हिरव्यागार बांगड्या किणकिणत होत्या. ते सौंदर्य अस समोरून पहिल्यांदाच मी पहात होतो.
तिला पाहिल्यानंतर मी तिला काही म्हणालो, की भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. का थोबाड रंगवून घेतलं, त्यानंतर नक्की काय घडलं मला काहीच आठवत नाही. मला कोणी हॉस्पिटलमध्ये नेलं? तिथे मी किती दिवस होत? कोणीच काही मला सांगितलं नाही. मी किती दिवस रजेवर होतो ते ही निट्स आठवत नव्हतं. जेव्हा या सगळ्यातून मी सावरलो तेव्हाही या दरम्यान काय घडलं याबद्दल कोणी माझ्याशी बोललं नाही.
मी पुन्हा कामावर गेलो तेव्हा सर्व स्टाफ ने माझं स्वागत केलं, Well Come Dilip Chitre, Well come after long Vacation. माझ टेबल मला आठवत नव्हतं, माझ्या एका सहकाऱ्यांनी मला टेबल जवळ नेवून खुर्चीत बसवलं. म्हणाला,”दिलीप, मित्रा मी मोहन, मोहन अष्टपुत्रे मला ओळखल नाहीस? काय रे ही अवस्था करून घेतलीस?
बघ, आता तू ऑफिसमध्ये आला आहेस ना, लवकरच तुला पूर्ण बरं वाटेल. काही मदत लागली तर मला हाक मार, मी पलीकडच्या टेबलावर आहे.” त्यांनी माझ्या पाठीवर हलकेच थोपटले आणि तो त्याच्या जाग्यावर निघून गेला.
क्षणभर शांत बसून होतो,जणू या जगात मी नव्हतोच, येतांना लहान भाऊ सोबत होता पण आता मी एकटाच, एकाकी होतो. काय करावं? माझं काम काय? या पूर्वी ऑफिसमध्ये मी काय करत असे? काही आठवे ना. आजूबाजूच्या टेबलावरून नजरा माझ्याकडे रोखल्या होत्या, मला ते जाणवत होतं यातून बाहेर पडणे गरजेचे होते. थोड्या वेळाने काही तरी सुरू करावे. किमान कोणते पेपर माझ्या टेबलवर आहेत ते पाहावे म्हणून मी ड्रावर उघडला आणि जुईचा धुंद करणारा सुगंध आला,त्या सुगंधाची लहर माझ्या मेंदूत सरसरत गेली. माझ्या नाकपुड्या फुलल्या जणू माझी जाणीवच परत आली. मला हळूहळू ओळख पटू लागली.सगळ्यात पहिली तिचीच आठवण झाली. कुठे असेल ती? अस अचानक तिने लग्न कसं केलं? मी स्वतःलाच हसलो, हे सुंदर पाखरू पटवण्यात मी अयशस्वी झालो हा काही तिचा गुन्हा? ,वरून मी तिलाच दोषी ठरवत होतो. माझा मलाच राग आला. मी डोळे मिटून घेतले. तेव्हा त्या दिवशी म्हणजे नक्की किती महिन्यापूर्वी, की दिवसांपूर्वी हे सर्व घडलं, आठवत नव्हते पण त्या दिवशी घडलेला प्रसंग आठवला दोन वर्ष तिच्या मागे मागे फिरूनही एकदाही तिला गाठून बोलण्याची आपली हिंमत झाली नाही म्हणून मी भान हरपून तिच्याकडे पहात होतो आणि अचानक जमिनीवर कोसळलो. ना बिचारीचा यात काय दोष ते सौंदर्य दृष्टीत साठवण्याची क्षमता माझ्यात नसावी. ते आठवून मला भडभडून आलं.त्यानंतर काय झाल ते आठवेना. थोड्या वेळाने मी शांत झालो. सगळं चित्र स्पष्ट झालं.
मी मान उचलून वर पाहिलं.होय हेच ते माझं ऑफिस. येथेच मी माझ्या नोकरीचा श्रीगणेश केला आणि पाहता पाहता साहेबांचा अससिस्टंट बनलो. माझ्या जाणीवेतील फरक सहकारी पहात असावे, थोड्या वेळाने आमचा शिपाई माझ्यासाठी कॉफी घेऊन आला. “सर, कसे आहात?
काही लागल तर जरूर हाक मारा.” दुपारी मी मोहन बरोबर टिफिन घेतला. आता मला थोडं बर वाटत होतं.संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळेत माझा लहान भाऊ आला.आम्ही घरी आलो.तो आठवडा रोज लहान भाऊ मला आणून सोडत असे आणि ऑफिस सुटण्यापूर्वी येऊन मला नेत असे.
चार सहा दिवसात माझं रुटीन सुरू झालं. मी पुन्हा कामावर जाऊ लागलो याचाच आनंद माझ्या घरच्यांना होता. पण मी शरीराने जरी कामावर जात असलो तरी मन मात्र त्या सुंदरीचा शोध घेत ब्रीजवर घुटमळत होतं. माझा शोध सुरूच होता पण यश येत नव्हते.
affiliate link
आठ पंधरा दिवसांनी मला समजले, वाटेत अचानक घडलेल्या प्रसंगाने मी पाच महिने कोमात गेलो होतो. केवळ आईची देवावरील श्रद्धा आणि डॉक्टरांचे उपाय म्हणूनच मी पुन्हा माणसात आलो होतो. पण ज्या घटनेने मला अचानक चक्कर आली आणि माझे स्वप्न भंग पावले. त्या माझ्या मनातील सुकेसिनी, मोहिनीचे काय? या पूर्वी सौंदर्याचा आस्वाद घेताना चक्कर येऊन पडलेला माझ्यासारखा कमकुवत मनाचा कोणी नसावा. माझे मलाच हसू आले, किती दुर्दैवी, दोन वर्षे ओळख काढू शकलो नाही, मी तिला सुखात ठेऊ शकलो असतो का? माझ्या मनात विचार आला. तिचं मन वाचता आलं असत का? जाऊ दे ती असेल तिथं सुखात राहू दे.
ही गोष्ट मित्रांना कळली असती तर ते नक्की माझ्या कृतीवर हसले असते. मला नामर्द म्हणाले असते, पण त्या सौंदर्याने खरंच माझं भान हरपले असावे. पुढील काही महिने मी माझ्या ऑफिसला जाण्याच्या वेळेत खूप शोध घेतला. आता तिची भेट घेण्याची मी मनाची तयारी केली होती. कधी कधी तिच्या भेटीसाठी थांबून ऑफिसला मी उशीरा गेलो, पण जेव्हा मी थांबूनही हाती काही आलेच नाही तेव्हा तर कधी कधी तिच्या वाटेवर थांबून, ती येईल म्हणून वाट पाहिली. माझ्या मनात मात्र तिची मूर्ती अजूनही तशीच होती.
दिवस गेले, वर्षे गेली.घरून लग्नाचा तगादा पाठी लागला पण मी ठाम नकार दिला.एक दिवस रात्री आई माझ्या बाजूला येऊन बसली आणि म्हणाली, “बाबल, तुझी चाळीशी सरली, तुझा विचार काय आहे? अरे लग्न केलं नाही तर पितृ ऋण कस फेडशील? माझं ऐकं, तोला मोलाची मुलगी मी पहाते, लग्न कर आणि मोकळा हो.”मी तिची समजूत घातली, “आता या वयात लग्न करून मी काय करू? मला कोण मुलगी देईल? त्या मुलीच आयुष्य मी डावाला का लावू? आहे तो सुखीच आहे की!”
आई आसवं गाळत निघून गेली की, खूप वाईट वाटल , पहिल्या धक्क्यातून अजून सावरलो नव्हतो, मन नाही म्हणाल.त्या नंतर घरातील कोणीही कधी विषय काढला नाही. मी नियमित कामावर जाऊ लागलो. मित्रांसोबत हळूहळू बोलू लागलो. तेव्हा माझा मीच शोध घ्यायचा ठरवले, मी हॉस्पिटलमध्ये कसा पोचलो, मी तिथे किती दिवस होतो या विषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. माझा मागील काही महिन्याच्या attendance record मी मास्टर मध्ये पहिला, माझा personal पीसी चेक केला तेव्हा माझ्या लक्षात आले की जवळपास पाच महिने मी कामावर नव्हतो. या पाच महिन्यात माझ्या कुटुंबाला किती कष्ट भोगावे लागले असतील ते त्यांनाच ठाऊक तरीही त्यांनी कोणतीही नाराजी व्यक्त केली नव्हती. आणि मी मात्र माझ्या कोषात माझे दुःख कुरवाळत बसलो होतो.
त्या नंतर घरी कोणी विषय काढला नाही,लहान भावाचं लग्न झालं, त्याची मुलं अंगाखांद्यावर वाढू लागली, हळू हळू सावरत गेलो. पण लग्न करावं, कुणी जीवनसोबती पहावा अस कधीच नाही वाटलं. तिच्या जागी कुणी वेगळी, मी विचारच करू शकत नव्हतो. तिच्यावर मी फिदा झालो होतो पण हमे प्यार जताना न आया, असं म्हणत दिवस जात होते पण ती मात्र मनातून कधी गेलीच नाही.
वृद्धत्व खुणावू लागलं तस कोणीतरी जोडीदार हवं होतं अस प्रकर्षाने वाटू लागले. पण ती वेळ आता निघून गेली होती. नजरेतील क्षितिज आता आधारासाठी धरणीला टेकलं होत, तो आभास नव्हता, तर वास्तव होतं.
खूप शोध घेतला, अगदी जशी आहे तशी दृष्टीस पडावी आता शारीरिक ओढ उरली नव्हती पण ती नजरेस तिच्या मुळच्याच रूपात लांबसडक केशसंभारात आणि त्यावर माळलेल्या मोगरीच्या धुंद करणाऱ्या गजऱ्यासह दिसावी असे खूप वेळ वाटले पण, माझे स्वप्नशिल्प पुन्हा दिसलेच नाही आणि माझी कथा पुढे सरकली नाही. खरं तर त्या कथेला पूर्णविराम देणं किंवा ती परिपूर्ण करणं माझ्या हाती होत पण दुर्दैवाने नाही जमलं. या धकाधकीत मी साठी ओलांडली, निवृत्त झालो पण…