मनोव्यापार
देह सोडतांना एकदा आत्म्याने विचारले मनाला
क्षणोक्षणी बदलतोस जरा सवडीने विचार स्वतःला
आहे का तुझ्या अस्तित्वाने कुणाला शांत झोप?
त्यागू शकशील का कधी लालसा, काम, क्रोध, लोभ?
अविरत भ्रमण करीत फिरतोस, आधी घे स्वतःचा शोध
परसौख्यात तु रमत नाहीस स्वःसुखाचा होतो का मोद?
सातत्याने वळवळलास तरी सुटणार नाहीत शरीराचे भोग
कितीही ईश्वराने दिलं तरी दुःखी राहणं हा तर विषय रोग
कधीच कुणाला कळत नाही तुझ्या अंतरगातला विषय
कुणाला प्रिय म्हटलं, कुणाशी हासलं की जागृत तुझा संशय
चेहऱ्यावर कधीच दिसत नाही तुझं दुःख, त्यामागचं वादळ
कधीच शब्दात मांडताही येत नाही, तुझा स्नेह, तुझी तळमळ
जोवर ह्रदयाचा तुला आसरा, तुझे साम्राज्य अखंड हे सुरवरा
तव विचारांच्या धगधगत्या ज्वाला, पदोपदी जाळती सुंदर शरीरा
कधी मुखावर तेज, कधी झरझरती नेत्र, गुलाम सारे तुझा इशारा
तव गतीचा महाअवाका, तू झंझावात, तव गतीने का पळेल वारा?
शरीर विकलांग झालं, तरी खरच अद्भुत तुझा अदृश्य संचार
शस्त्र किती कठोर, बाजंदी असलं तरी तुझ्यापुढे फिकी धार
तुझ्या खोप्यात सुटतो अविचार अन क्षणात कुणाचा मोडे संसार
कोणास ठाऊक ईश्वराच्या मर्जीने चालतो का तुझा मनोव्यापार?