मलाच कळत नाही
मी आस्तिक आहे की नास्तिक हे माझं मलाच कळत नाही
मी पुजापाठ करत नाही आणि चमत्काराला भाळत नाही
आई म्हणते आज गुरुवार अंड नको खाऊ, मी पाळत नाही
उपवास, तापास का करावे? उपाशी राहून शरीराला छळत नाही
मला एकादशी, संकष्टी दोन्ही सारखे, फरकच मला कळत नाही
अंगारिकेला भली मोठी रांग, गणपतीची फसवणूक मी करत नाही
एक दुर्वांच्या जुडीत लोक किती काय मागतात, मला ते जमत नाही
नवे जोडपे अष्टविनायक, शिर्डी, शेगाव तीर्थक्षेत्री जातात हे बरे नाही
शिरडीत हनिमून ही गल्लत त्यांनी करावी हे भेजात माझ्या उतरत नाही
मी सुंदर स्थळे आणि सुंदर चेहरे नेहमी पाहतो कारण मन माझे भरत नाही
नेहमी लहान मुलेच जेष्ठांचे पाय धरतात ते मनापासून मला पटत नाही
त्यांच्या पाया पडलं म्हणजे आयुष्याचं होईल सोनं याची आहे का ग्वाही?
कोणी दिसल की हॅलो अंकल अस खोटं बोलणं, ते नाटक मी करत नाही
कोणी काही सांगितले तरी खात्री केल्याशिवाय मी ते खरं कधी मानत नाही
फक्त ऐकणे किंवा पाहणे दोन्ही खोटे ठरु शकते, भ्रामक गोष्टींना भुलत नाही
भुंग्याचे कुंजन ऐकून, सकाळ झाली समजून सुर्यफुल फसुन उमलत नाही
संकटाची चाहूलीने गांगरून जायला होते, काय करावे कुणा कळत नाही
येणारी आपत्ती संधी असू शकेल म्हणून प्रत्येक संकटात मी पळत नाही
शक्ती दे, युक्ती दे, संकटापासून मुक्ती दे म्हणत देवादिकांना मी छळत नाही
लग्नात मी पाहतो, लोक हसून शेकहँड करतात, बळेबळेच हसतात
मुहूर्त वेळ येईपर्यंत बोअरिंग म्हणून स्टार्टर घेत उगाच चघळत बसतात
फुकटचे आहे घेऊया म्हणत मी तोंडाची चव उगाच घालवत नाही
गरज असेल तर कोणालाही मदत करायला मी मागे पूढे पहात नाही
हे माझे ते परके, हे फायद्याचे ते बिनकामाचे, असले छक्केपंजे मला जमत नाही
पण चारचौघांच्या घोळक्यात शिरून मदतीचं नाटक मला जमत नाही
कुणी काही म्हटलं तरी मनात कुशंका ठेऊन मी उगाच जळत नाही
मोकळंढाकळं बोललं की आकाश स्वच्छ होतं, औपचारिकता मी पाळत नाही
माझ चुकतय की बरोबर, कोणी बोलेल की तोलेल हा संभ्रम मनाला छळत नाही
मी कोण? कोणाचा? कोण माझा? कधी कधी तर मी स्वतःलाच ओळखत नाही
गैरसमजुतीन झालेली चूक म्हणजे गुन्हा नाही, त्यासाठी स्वतःला छळणं जमत नाही
नाही कुणाशी पटलं तर बाजूस व्हावं, पणपरंतू आणणं माझ्या माणूसकीला शोभत नाही