मळभ भाग 1

मळभ भाग 1

प्रतिमा आज सेवानिवृत्त होणार म्हणून तिच्या जवळच्या मैत्रीणीला वंदनाला खूप भरून आले होते. आकुर्डीच्या टाटा मोटर्स कंपनीत त्या दोघी गेले ३२वर्ष आस्थापना विभागात काम करत होत्या. प्रतिमा अकाऊंट विभागात होती तर वंदना Human Resources and Supply सांभाळत होती. दोघी एकत्र कामावर यायच्या गंमत म्हणजे आठवड्यात दोन दिवस वंदना प्रतिमाला लिफ्ट द्यायची तर तीन दिवस प्रतिमा वंदनाला लिफ्ट द्यायची. त्यामुळे दोघींच्या प्रवास खर्चात बचत होत होती आणि एकमेकांना सोबतही होत होती. त्यांच्या या उपक्रमाची दखल घेऊन कंपनीने त्यांचा कामगार दिनी सत्कार केला होता. कुणीतरी त्याची पेपरात फोटोसह बातमी दिली होती.त्यामुळे ती जोडगळी पुण्यात प्रसिद्ध झाली होती.

त्या दोघींच्या कामात शिस्तबद्धता होती. कार्यालयाचा वेळ चकाट्या पिटण्यासाठी नाही याची जाणीव त्यांना होती त्यामुळे लंचब्रेक सोडला तर अन्य वेळेस त्या मान मोडून काम करतांना दिसत किंवा त्यांच्या विषयाशी संबंधित डिस्कशन असेल तरच बोलतांना दिसत. त्यांच्या या अशा वागण्यामुळे इतर महिला कर्मचाऱ्यांवर दडपण होते. अर्थात त्या दोघींची त्यांच्या मागून भरपूर टिंगलटवाळी होत असे. ‘एखाद्या जेलमध्ये जेलर म्हणून छान शोभतील.” असे कुणी म्हणे तर “अंदमान किंवा एखाद्या निर्मनुष्य बेटावर यांना ठेवलं तरी या दोघींवर काही परिणाम होणार नाही.” असे आणखी कोणी उपरोधाने म्हणून जाई.

खरे तर दोघींचा स्वभाव गोड आणि लाघवी होता. प्रत्येक सणाला काही ना काही आणून आपल्या सहकाऱ्यांना देण्यात त्यांना आनंद मिळे पण हे सारे ‘टी ब्रेक’ किंवा ‘लंच ब्रेक’ वेळेतच. दोघी तरूण अविवाहित असताना इथे कामाला दोन चार महिन्यांच्या फरकाने लागल्या आणि आता त्या कार्यालयात सिनिअर पदावर कार्यरत होत्या.

आज प्रतिमाचे कुटुंब तिच्या निरोप सत्कार समारंभाला फोर व्हिलरने येणार होते म्हणून इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा वंदना तिच्या स्कुटीवर एकटी आली. त्यांना गेटमधून आत येतांना सिक्युरिटी ऑफिसर भिडे म्हणाले, “अरे मॅडम आज आपण एकट्याच, आपली मैत्रीण कुठे राहिली?”

खरं तर भिडेना प्रतिमा सेवानिवृत्त होत असल्याचे नक्की माहिती असणार होते कारण सेवानिवृत्त होणाऱ्या व्यक्तीचे नाव आठ दिवस अगोदर सिक्युरिटी कार्यालयास कळण्याची कार्यालयीन पध्दत होती. ज्या दिवशी व्यक्ती सेवानिवृत्त होईल त्याचे आयडी, ओळख पत्र त्याचा अन्य कोणी दुरुपयोग करू नये म्हणून जमा करून घेतले जाई. दर पाच वर्षांनी किंवा प्रमोशन झाले की नवीन आय डी देण्याची पद्धत कंपनीने अजून पर्यंत राखली होती. व्हिजिटर ओळखपत्र घेऊनच बाहेरील व्यक्तीला आत जाता येई.त्यामुळे वंदनाने प्रतिमाच्या कुटुंबाचा व्हिजिटिंग पास भिडे यांच्याकडे ठेवला आणि म्हणाल्या, “भिडे, प्रतिमा मॅडम आल्या की त्यांना हा पास द्या.” त्यानीही मान डोलवत, “हो मॅडम नक्की देतो तुम्ही निश्चिंत रहा.”

दुपारी लंचब्रेक पुर्वी म्हणजे १२.३० वाजताचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात आकुर्डी युनिटचे जनरल मॅनेजर वसंत प्रधान संबोधित करणार होते. या कार्यक्रम आयोजनाची जबाबदारी पर्सनल अफेअर विभागाकडे असली तरी वंदना त्यांना मदत करणार होती. किंबहुना त्या विभागाने वंदना मॅडम यांना तशी विनंती केली होती. वंदनाला व्यक्त होण्यासाठी ती चांगली संधी होती. नेहमीप्रमाणे थंब करून वंदना आपल्या कामाला लागली. टेबलावर आणि खुर्चीवर फडका मारून त्यांनी ते स्वच्छ केलं. मग बॅगमधून पाण्याची बाटली काढून पाणी प्यायले. तेवढ्यात त्यांना आज माने यांच्या सोबत टेंडर बाबत बोलणे असल्याची आठवण झाली.

अलीकडे कंपनीने तिच्या नव्या गाडीसाठी लागणारे स्पेअर पार्ट बाहेरून उपलब्ध करून घेण्यासाठी टेंडर मागवली होती. पुण्याजवळ असलेल्या कंपनीला प्रधान्य देण्याचं कंपनीच धोरण होतं. मागावलेल्या टेंडर मध्ये प्रतिमाचा मुलगा आल्हाद साने याच्या साने मशीन टूल्स या कंपनीचे टेंडरही होते. हे टेंडर भरल्याबद्दल प्रतिमा वंदनाला काही बोलली नव्हती. जेव्हा वंदनाचा असिस्टंट सतीश माने यांनी वंदनाच्या कार्यालयात इतर दोन अधिकाऱ्यांच्या समोर टेंडर उघडली तेव्हा ते टेंडर कोणाचे याची नोंद करतांना सहकाऱ्यांच्या समोर वंदनाला उद्देशून म्हणाले, “वंदना मॅडम, हा साने मशीन टूल्स चा आल्हाद साने म्हणजे प्रतिमा मॅडम यांचा मुलगा तर नाही ना? “

त्यांचं सूचक वाक्य आणि ते वाक्य बोलण्याची लय पाहून वंदना मॅडम माने यांना थोड्या मोठ्या आवाजातच म्हणाल्या, “माने, तुम्हाला काय म्हणायचे आहे? स्पष्ट बोला. आल्हाद प्रतिमा मॅडम यांचा मुलगा आहे, पण तो स्वतंत्र उद्योजक आहे. जर त्याने टेंडर भरलं असेल आणि तुमच्या अटीत तो बसला तरच या टेंडरसाठी तो बीडमध्ये बसेल. त्याला कोणतेही फेवर करण्याची अजिबात गरज नाही.”

“मॅडम तुम्ही म्हणत असाल तर?” “What Nonsense ! मी म्हणण्याचा प्रश्न येतच नाही. ज्याची ऑफर आपल्या कंपनीच्या स्पेसिफिकेशनशी जुळत असेल, मटेरीयल quality उत्तम असेल आणि कॉस्ट मर्जीनल असेल त्याला बीड मध्ये ठेवा. जो बीड जिंकेल त्याला सिलेक्ट करू.” “पण मॅडम,आपण त्याच्याशी चर्चा करून आपल्या अपेक्षा त्याला स्पष्ट केल्या, तो जर कॉस्ट कटिंग करून दयायला तयार असेल तर.”

“टेंडर भरतांना त्यांनी या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करूनच टेंडर भरले असावे. त्यानुसार त्यांनी कॉस्ट कोट केली असावी. आपण त्याला कॉस्ट कटिंग कर म्हणून सांगितले आणि त्यांनी कुठेतरी निगोशिएट करण्याचा प्रयत्न केरून घोळ घातला तर ? कंपनीचे नुकसान होईल. असा आजवर एकही निर्णय मी घेतलेला नाही, या पूढे ही घेणार नाही.”

“पहा मॅडम या गोष्टी आपल्या हातात आहेत, quality मेंटेन करूनही बीड सक्सेस करणं आपल्या हाती आहे.आपण त्याला संधी द्यायला काय हरकत आहे. आपण चुकीचे काही करत नाही. तुमच थोड वजन वापरून तुमच्या मैत्रिणीच्या मुलाचे काम होत असेल तर तुमचा विरोध का? कारण ही बीड पुढचे काही वर्षासाठी आहे. किमान चार वर्षांसाठी. प्रत्येक वर्षाला आपल्या कंपनीला वीस टन कास्टिंग माल लागेल. खूप टर्न ओवर होईल त्यांचा.”

“सतीश तु मला चांगलं ओळ्खतोस, आजवर मी कधीच कोणाला फेवर केलेले नाही आणि यापूढेही करणार नाही. इतर सप्लायर प्रमाणे त्याच लिस्टिंग कर,तो कंपारिझनमध्ये जिथे असेल तिथेच त्याचा विचार होईल.”

“मॅडम, प्रतिमा मॅडम आणि तुमची वर्षानुवर्षे मैत्री आहे, त्या आता कंपनीतून निवृत्त होत आहेत, कॉम्प्लिमेंट म्हणून एकदा त्यांच्या मुलाला संधी द्यायला काहीच हरकत नाही अस आमचं तिघांचं मत आहे. ही काही फार मोठी रिस्क नाही. त्यांच्या मुलाला आपल्या सारख्या मोठ्या कंपनीची संधी मिळाली तर त्याच्या बिझनेस प्रोफाइलमध्ये एक प्रतिष्ठित नाव जमा होईल. इतर ठिकाणी ऑर्डर मिळवायला त्याला या ऑफर लेटरची मदत होईल.”

“Sorry Satish! , please don’t play with me, do as I say. I don’t like anyone blaming me for such nonsense. Now discuss among yourself and email me an Excel sheet. I will study and will call you for discussion. Now I have a lot to do. Is that Ok.”

सतिष निघून गेला तस त्या स्वतः वर चडफडल्या, काय शहाणा आहे? या प्रकरणात मला गुंतवू पहात होता, पण त्याला कळत नाही अशा सापळ्यात सापडणारी मी नाही. मैत्री मैत्रीच्या जागी, काम कामाच्या जागी. त्यांनी टेबलवर पडलेल्या पर्चेस फाईल चेक करून क्लिअरन्स दिला.त्यांची चर्चा सुरु होती तेव्हा शिपाई चहा ठेऊन गेला होता सतिश आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांनी बोलता बोलता चहा संपवला त्यांचा चहा थंडगार झाला. कप नेण्यासाठी सदाशिव आला तोच त्यांच्यासाठी चहा घेऊन. त्याला पाहून त्या गोड हसल्या. “मॅडम चहा घ्या खास तुमच्यासाठी आणालाय, तुमची चर्चा जोरात होती म्हणून मी डिस्टर्ब नाय केल.” “थँक्स, चहा मला हवाच होता, पाहिलंत ना माने साहेबांनी माझं डोकं उठवलं.” “जाऊ द्या हो मॅडम, प्रत्येक माणूस वेगळा असतो, तुमि कोणाकोणचा इचार करणार? तुमचं मत ठाम असतं ते त्यानला बी माहिती आहे, उगा खणत होते.” वंदना त्याच मत ऐकून हसली.स्वतःशीच म्हणाली, कोण म्हणतं ह्यांना शिक्षण नाही म्हणून? ते अनुभव घेऊनच इतके शहाणे होतात कीं प्रत्येक माणूस नुसत्या नजरेने वाचतात. याच्या तोंडावर काही बोलून काही फायदा नाही. उलट काहीतरी मानेला जाऊन सांगायचा.

त्यांनी आलेले email तपासले, इतक्यात त्यांना कशाची तरी आठवण झाली त्यांनी आपली बॅग टेबलवर ओढून तपासली आणि स्वतःशी त्या हसल्या. प्रतिमाला हे गिफ्ट नक्की आवडेल. गिफ्टबॉक्स, गुलाबी पेपर लावून पॅक केला होता त्यामुळे गिफ्ट काय आहे ते बॉक्स उघडल्या शिवाय कळणार नव्हते. या गिफ्टसाठी अठरा हजार त्यांनी मोजले होते. त्यांनी ते गिफ्ट बॅगेत ठेवले. थोड्या वेळाने त्या जागेवरून उठल्या. कार्यक्रमाची तयारी कुठपर्यंत आली ते पाहण्यासाठी त्यांनी एक राउंड मारला. पुढे एक डायस आणि सोफा, एका टेबलावर पुष्पगुच्छ आणि फुले. थोडी जागा सोडून खुर्च्या लावल्या होत्या. कॉन्फरन्स हॉलमध्ये मोजक्या पन्नास साठ लोकांची बसण्याची व्यवस्था होती. पुढे एक डायस आणि सोफा, एका टेबलावर पुष्पगुच्छ आणि फुले.

त्यामानाने स्टाफ प्रचंड होता त्यामुळे प्रतिमा मॅडम विषयी ज्यांना व्यक्त व्हायचे असेल तेच कॉन्फरन्स हॉलमध्ये बसू शकणार होते. उर्वरीत स्टाफला बाहेर उभं राहून सदिच्छा समारंभ पहावा लागणारी होता. कंपनी कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ विभागापुरता करते, मॅडम ऍडमिन विभागात होत्या, सगळया कर्मचाऱ्यांशी संबंध चांगले होते म्हणूनच विशेष सवलत दिला होती.

प्रतिमाने स्टाफ साठी श्रीखंड पुरी, आळूवडी, मलई कोफ्ता, वालाच्या डाळींब्या, पुलाव, मटार पॅटिस ,सॅलड आणि सोलकढी असा बेत ठेवला होता. ऑफिस बाहेर बुफे पद्धतीने जेवणाची सोय केली होती. साधारण दीडशे सहकाऱ्यांना आमंत्रित केले होते.

बरोबर सव्वाबारा वाजता प्रधान साहेब कॉन्फरन्स हॉल जवळ आले तशी वंदना त्यांना समोरी गेली. “या साहेब, साने मॅडम फॅमिलीसह येतील इतक्यात.” बोलणं सुरू असतांनाच प्रतिमा, तिचे मिस्टर प्रकाश साने, आल्हाद, त्याची पत्नी मृण्मई आणि बहीण अस्मिता कॉन्फरन्स हॉल जवळ येतांना दिसले.

वंदनानी प्रधान साहेबांना त्यांची ओळख करून दिली.”सर, हे मॅडमचे मिस्टर, प्रकाश साने, बँक ऑफ बरोडा चे झोनल मॅनेजर म्हणून निवृत्त झाले आहेत.” ” Glad to meet you!” साने म्हणाले. दोघांनी एकमेकांना शेक हॅन्ड केले. आल्हादने त्यांना नमस्कार केला आणि आपले बिझनेस कार्ड प्रधान साहेबांना दिले, “सर माझा हिंजवडी येथे छोटा व्यवसाय आहे, मी ऑटो कास्टिंग पार्ट manufacturer आहे.” “अरे वा! Proud of you son!”

“Thanks” आल्हादला मिळालेली संधी तो वाया जाऊ देणार नव्हता. “सर माझ्यासाठी काही काम निघाले तर आठवण ठेवा. मी आपल्याला उत्तम रिझल्ट देईन.” आल्हाद म्हणाला. “Sure, you are in auto part manufacturing. But your mother never told me about this, we would have thought about your company ” प्रधान साहेब म्हणाले. त्यांनी वंदना मॅडमकडे पाहिले. त्यांनी मंद स्मित केलं.

वंदनाच्या मनात विचार आला, प्रधान साहेबांना कार्ड देऊन ही अशी ओळख सांगणे ही कल्पना, प्रतिमाची तर नसेल? असेलही कदाचीत. कधी कधी आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तीला ओळखायला आपण कमी पडतो. तो विचार येताक्षणी तिने प्रतिमकडे पाहिलं, पण तिने आपलं लक्ष नाही असं दाखवलं.

लवकरच प्रतिमाच्या सदिच्छा कार्यक्रमास सुरवात झाली. वंदनानेच प्रतिमाची ओळख करून दिली,” मी वंदना, आज मी मॅडम बद्दल बोलायला उभी आहे. आपण एका कंपनीत,एका ऑफिसमध्ये अनेक वर्षे काम करतो पण आपली फक्त तोंडओळख असते. निवृत्त होतांना आपल्या बद्दल आपले सहकारी किंवा मित्रमैत्रिणी आपल्या बद्दल कौतुकाचे चार शब्द बोलतात तेव्हा इतरांना आपली खरी ओळख होते. प्रतिमा मॅडम यांचं असेच आहे. आम्ही एकमेकिना एकेरी नावाने हाक मारतो. ती कंपनीत लागली आणि चार दिवसांत आमची मैत्री झाली. वयाने त्या मोठया म्हणून त्या आज सेवानिवृत्त होत आहे. आजतागायत आमची मैत्री टिकून आहे.”

वंदना मॅडमनी, प्रतिमाच्या कामाप्रति निष्ठा,एकमेकींच्या कामात ढवळाढवळ न करण्याची सवय, वेळेचा काटेकोर वापर, त्यांचे एकत्र येणे जाणे, त्यांच्या खवय्येगीरीची स्तुती एक ना दोन अनेक आठवणी सांगितल्या. दहा मिनिटात त्यांनी प्रतिमा मॅडमच्या विविध पैलूंचा वेध घेतला. समारोप करताना वंदना मॅडम म्हणाल्या,”आमचा तीस बत्तीस वर्षांचा सहवास, रक्ताच्या, सख्ख्या बहिणी नसलो तरी तशा राहिलो. आज ती सेवानिवृत्त होत असल्याने आमचा येथीस सहवास संपतोय याचे मला दुःख आहे. अर्थात आम्ही एकमेकींना भेटत राहू. त्यांची कार्यशैली आपण प्रत्येकांनी घेतली तर जीवनात नक्कीच फायदा होईल.”

वंदना मॅडमच्या भाषणानंतर प्रतिमा मॅडम यांचे प्रधान साहेब यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यांचे मिस्टर, मुलगा, सून आणि मुलगी यांचेही गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रतिमा मॅडम यांना पुष्पगुच्छ, स्वीट बॉक्स, भेट वस्तू त्यांची ग्राच्युईटी, प्रॉव्हिडंट फंड, आणि कंपनीतर्फे दीर्घकाळ सेवा बजावली म्हणून ₹१,११,१११ चा धनादेश देण्यात आला.

प्रधान साहेब यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. असे कर्मचारी हीच कंपनीची ताकद असते असाही उल्लेख केला. त्यांचा मुलगा उद्योजक असल्याचे ऐकून आनंद झाल्याचे मान्य केले. त्यांचे पती सेवानिवृत्त असल्याने त्या उभयतांना सेवानिवृत्ती नंतरची सेकंड इनींग आता निवांत मांडता येईल यासाठी शुभेच्छा दिल्या. कंपनीला गरज लागली तर प्रतिमा मॅडम यांची आम्ही नक्की मदत घेऊ अशी अपेक्षा व्यक्त करून इतरांनी मॅडम प्रमाणे उत्कृष्ट काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवला तर आनंद होईल असे म्हणत समारोप केला.

त्यांच्या भाषणानंतर कंपनीतील वेगवेगळ्या विभागाचे मॅनेजर यांनी प्रतिमा मॅडम यांना प्रेझेंट देऊन निवृत्तीनंतर त्यांना चांगले आरोग्य लाभो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.त्या नंतर युनियन लीडर मनोहर नरवणे यांनी शुभेच्छा दिल्या. अतिशय तल्लख बुध्दीच्या आणि शांतपणे सचोटीने, आपले काम करणाऱ्या प्रतिमा मॅडम यांनी आपल्या कामाने आपल्या नावाची छाप कंपनीत सोडली आहे असा उल्लेख त्यांनी केला.

प्रतिमा मॅडम यांनी सर्व प्रथम, प्रधान साहेब त्यांच्या निरोप समारंभाला वेळ काढून उपस्थित राहिले तसेच युनियनचे नरवणे आणि सर्व सहकारी मोठ्या संख्येने आज हजर आहेत त्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त केले आणि आभार मानले.त्या कंपनीत कामाला लागल्या तेव्हाची परिस्थितीती सांगितली. त्या म्हणाल्या, “मी कंपनीत graduate होऊन लागले तेव्हा नव्याने कॉम्प्युटर आले होते, त्या बद्दल काही माहिती नव्हते. टीसीएस ने ट्रेनिंग ठेवलं होतं ते पूर्ण करूनही कॉम्प्युटर ऑपरेट करायला खूप अडचण भासत होती. खूप परिश्रम घ्यावे लागले. पहिले वर्ष खूप गोंधळाची गेली पण नंतर त्यावर हात बसला. स्वतः कित्येकांना शिकवले. अकाउंट विषयाची मला मुळातच आवड असल्याने जस जसे समजत गेले मी स्वतः शिकत गेले. सहकारी वर्गाचे उत्तम सहकार्य लाभले त्यामुळे मी माझी चोख सेवा देऊ शकले.

एवढ्या वर्षात कंपनीने नेमलेल्या अकाऊंट निरीक्षकांनी एकदाही माझ्या कामाबद्दल उपरोधिक शेरा मला दिलेला नाही. काम समजून उमजून आणि लक्ष घालून केले आणि चुकत असल्याचे जाणवल्यास वरिष्ठांची मदत घेतली तर आपण आपले काम उत्तम करू शकतो. माझी 32 वर्ष कशी गेली ते माझ्या खास मैत्रिणीमुळे मला समजलं नाही. वेळप्रसंगी एकमेकींना मदत करत आनंदात आणि उल्हासात इतकी वर्ष निघून गेली. मुख्य म्हणजे भरपूर काम असले तरी कामाचा ताण नव्हता .

माझी जीवश्य कंठस्य मैत्रिण वंदना क्षीरसागर हिच्या मैत्रीच्या ऋणात कायम राहायला मला आवडेल. आज थोड भावुक व्हायला होतयं पण प्रत्येकाला एक दिवस थांबाव लागत.मला गर्व आहे की मी टाटा युनिट मध्ये निष्कलंक ३२वर्षे सेवा बजावली. तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमास हजेरी लावून माझा आनंद द्विगुणित केलात त्यामुळे आजचा दिवस संस्मरणीय झाला. हि आनंदाची ठेव शिदोरीसारखी मी जपेन.

त्यांचं आभाराच भाषण संपताच प्रधान साहेब जायला निघाले तेव्हा वंदनाकडे पाहत प्रतिमा म्हणाली, “वंदू,प्लिज प्रधान साहेबांना बुफे काउंटर जवळ नेते का ? सर थोड खाऊनच जा, प्लिज! ” त्यांनी मुलाला,आल्हदला साहेबांच्या सोबत जायला सांगितले.

वंदना, प्रधान साहेबांच्या सोबत गेल्या. आल्हाद त्यांच्या सोबत होताच. तो आणि साहेब काही बोलत होते म्हणून वंदना अंतर ठेवून चालत होती. प्रधान साहेबांनी उपचार म्हणून थोडं वाढून घेतले आणि ते एका बाजूला उभे राहून खात होते. वंदना मॅडम थोडं अंतर ठेवून उभ्या होत्या. आल्हाद आणि साहेब याचं बोलण सुरू होत म्हणून थोड्या वेळाने,वंदना मॅडमनी प्रधान यांना विचारले, “सर मी निघू का? प्रतिमा मॅडम वाट पाहत असतील ” Oh! Yes ,Sorry बोलण्याच्या नादात माझ्या लक्षात आलं नाही, प्लिज जा तुम्ही,तुमची मैत्रीण वाट पाहत असेल.

वंदना कॉन्फरन्स हॉलमध्ये आली तेव्हा प्रतिमा मॅडमच्या भोवती बऱ्याच सहकाऱ्यांचा गराडा पडला. प्रत्येकालाच त्यांची भेट घेऊन फोटो काढून घेऊन झटपट निघायचे होते. तरीही शक्य होईल त्यांच्या सोबत त्यांनी फोटो काढून घेतले. भेट वस्तूचा ढीग जमा झाला. ऑफिस शिपाई सदाशिव त्या वस्तू नीट लावून ठेवत होता.

सत्कार समारंभाला आलेले सहकारी प्रतिमा मॅडम यांना भेटून जेवण्यासाठी गेले. हळूहळू गर्दी कमी होत गेली. त्यांच्या विभागातील सहकारीही ग्रुप फोटो काढून जेवण्यासाठी गेले. कॉन्फरन्स हॉल रिकामा झाला तसं प्रतिमाच्या मनात पोकळी जाणवू लागली. उद्या पासून प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असेल पण या गराड्यात मी नसेन. त्यांचे डोळे भरून आले. सून मृण्मईने हळुवारपणे त्यांचे डोळे टिपून काढले. इतक्यात वंदना मॅडम, प्रधान यांना सोडून आल्या तेव्हा मोजकी माणसे होती. मैत्रिणीच्या डोळ्यात असावं पाहून ती ही भाऊक झाली. पण लगेच सावरत हसून म्हणाली, “प्रतिमा उद्या पासून दुपारी दोघ राजा राणी पंगतीला असाल, वाईट वाटून काय घ्यायचं. हस बघू.”

वंदनाने आपल्या पर्स मधून आपली भेट काढून तिच्या हाती दिली आणि तिला घट्ट मिठी मारली. क्षणभर सर्व पहात राहिले. फोटोग्राफरनी ते फोटो काढले नसते तरच नवल.

वंदना मॅडम आणि प्रतिमा मॅडम यांचे कुटुंब जेवण्याची व्यवस्था केली होती त्या लॉबीत गेले. प्रतिमा मॅडम यांनी शक्य तितक्या सहकाऱ्यांची भेट घेऊन मेन्यू आवडला का? विचारले. तिथली गर्दी कमी झाली तसे वंदना मॅडम यांनी प्रतिमा च्या कुटुंबाला बुफे घेण्यासाठी आग्रह केला. त्यांना स्वतःला आपल्या टेबलावर जाण्याची घाई होती. प्रतिमाच्या ते लक्षात येताच तिने वंदनाला स्वतः डिश आणून देत म्हणाल्या,”तु सुरू कर तुला उगीचच उशीर व्हायला नको.” त्यांनी तिला रांगेत आणून सोडले. कार्यक्रम उशिराने संपल्यावर प्रतिमाचे कुटुंब वंदनाला भेटून आभार मानून गेले.

सदाशिव याने प्रतिमा मॅडमच्या गिफ्ट गाडीच्या डिकीत नेऊन ठेवल्या. साने यांनी सदाशिव याच्या खांद्यावर हात ठेवत मदतीबद्दल धन्यवाद व्यक्त केले. “सदाशिवराव एकदा या आमच्या घरी, नाहीतर म्हणाल मॅडम रिटायर झाल्या आता कशाला यायचं?”

“तस कस साहेब, मॅडमच्या हाताखाली लय वर्ष काम केलंय, आज रिटायर झाल्या पण जोडलेले संबंध रिटायर थोडेच होतात, त्या बाजूला आलो तर नक्की येईन बघा.” सदाशिव बोलण्यात हुशार होताच. दहा माणसांचा अनुभव घेऊन आलेल शहाणपण सहजा सहजी हार कशी मानेल? त्या कार्यक्रमाचा वंदनावर इतका ताण होता की प्रतिमा विषयी भाषण करतांना तिने लिहून आणलेला कागद कुठेतरी हरवला तरीही तिचे भाषण उत्तम झाले याची पोच सर्व सहकाऱ्यांनी दिली. त्या रात्री ती निवांत झोपली. सकाळी उशिराने उठली तेव्हा मिस्टर म्हणाले काल तुझी बरीच धावाधाव झाली असेल. थकली असशील तर आज रजा घे. पण आज रजा घेऊन चालणार नव्हते. कालचा गोंधळ आवरायला हवा होता.आपण प्रतिमाचा कार्यक्रम नीट मॅनेज करू शकलो या बद्दल वंदना समाधानी होती. स्वतः प्रधान साहेबांनी दुसऱ्या दिवशी त्यांना बोलावून कार्यक्रम नीट आयोजित केल्या बाबत आणि मुख्य म्हणजे कार्यक्रम आवरल्या नंतर,स्वच्छ सफाई करून घेतल्या बद्दल आनंद व्यक्त केला.तरीही वंदनाच्या मनात रुखरुख होती ती तिच्या मैत्रिणीने कालच्या कार्यक्रमाबाबत तिला काही कळवले नव्हते याचेच आश्चर्य वाटत होते. दिवसभरात दहादा तिच्या टेबलजवळ घुटमळणारी प्रतिमा. चल ग लंच ब्रेक झाला,तुला जेवायचं आहे की नाही म्हणत हाताला धरून हक्काने उठवणारी प्रतिमा ती हिच का? हे कोडं तिला उलगडत नव्हते. मोबाईल रिंग झाली की ती उत्सुकतेने स्क्रीनवर पाही आणि तिचा फोन नाही पाहून खट्टू होऊन जाई. थोडे थोडके नव्हे ३२-३३ वर्षांचा सहवास एका दिवसात प्रतिमाने विसरावा याचंच तिला आश्चर्य वाटत होतं.

क्रमशः

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar