मांजर पुराण

मांजर पुराण

लहानपणी मांजर रस्त्यावर आडवी गेली तर आपण जागेवरच थांबत असू, आपण रस्त्यावरून जातांना मांजर आडवी जाणे अशूभ मानलं जाई. काळी मांजर म्हणजे चेटूक असाही समज होता. त्यामुळे काळ्या मांजराला आपण टाळत असू किंवा भिऊन वागत असू. पण खरंच का मांजर अशुभ आहे? तसे असते तर काही हौशी लोकांनी आपल्या घरात अर्धा डझन मांजरे पाळली असती का?

काही हौशी मालक आपल्या मांजराच्या गळ्यात घुंगरू बांधतात, अशी मांजर मध्यरात्री घरात शिरली पण तुम्हाला ती न दिसता फक्त तिचे घुंगरू ऐकू आले तर तुमच्या जीवाचे काय होईल?

आपण मांजराला वाघाची मावशी म्हटल्याच आठवत असेल. वाघ हा सुध्दा CAT कुटुंबातील आहे हे ऐकलं तर आश्चर्य वाटेल पण ते वास्तव आहे. किशोरकुमारच्या प्रणय गितात CAT मने बिल्ली आपण ऐकले असेल. मांजर आणि वाघ यांची, दातांची , पायाच्या नखांची रचना आणि शिकार करण्याची तसेच समागमाची पध्दत पाहिली तर आपली खात्री पटेल. होय ती वाघाची मावशी आहे.

पुर्वी फक्त कुत्रा पाळीव प्राणी म्हणून घरी पाळत होते पण आता मांजरी पाळण्याचे फॅड आहे. कोणताही प्राणी पाळणे वाटते तितके सोप्पे नसते. कारण त्याचा आहार, त्याची शारीरिक स्वच्छता आणि त्याची लैंगिक गरज माहिती नसेल आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिले नाही तर तो प्राणी हिंस्त्र बनू शकतो.

मांजरांच्या बाबतीत विचार करायचे म्हटले तर मांजराचे छोटे पिल्लू आणले तरच ते तुमच्याकडे ऍडजस्ट होऊ शकते. मोठी मांजरे सहजा सहजी आपले घर बदलायला तयार नसते. मांजराला दूध, ताजे मासे आवडतात. तुम्ही सवय लावली तर ते शाकाहार चालवून घेते मात्र त्याला शक्य होईल तेव्हा ते कीटकांची शिकार करून मटकवते. त्या वेळेस ते जास्त आनंदात असते. त्याची शिकार करण्याची पद्धत वाघा सारखीच असते. ते जमिनीसपाट दबा धरून बसते आणि भक्ष टप्प्यात आले असे वाटले की अचानक झेप घेऊन पंजात पकडते किंवा दाबून ठेवते. शक्यतो भक्ष अडगळीच्या ठिकाणी नेऊन खाते. मांजर चिचूंद्री किंवा घुस यांची शिकार करत नाही किंवा खातही नाही. बहुधा या प्राण्यांच्या शरीराला विशिष्ट दर्प असावा जो मांजरांना आवडत नसावा.

तुमच्या घरातील मांजराच्या भूकेची वेळ पाळली गेली नाही तर ते चोरी करते. मग किचनमध्ये असणारे दूध, मासे किंवा तुपात बनवलेला पदार्थ ते कधी फस्त करेल त्याचा नेम नाही. काही मांजरे कच्चे बटाटे खातात. मांजरांना भिजवलेल कडधान्य किंवा पीठही आवडते. माणसांप्रमाणे मांजराला फरसाण आवडते. विशेषतः तिखट पदार्थ आवडतात.तसेत त्याला तेलातुपात तळलेले पदार्थ, दूधाचे पदार्थ आवडतात. गंमत म्हणजे त्याला उकडलेले मक्याचे कणीस, भुईमुगाच्या शेंगा तसेच भाजलेले चणे शेंगदाणे आवडतात. तुम्ही जशी सवय लावाल त्याप्रमाणे त्याची आवड निवड बदलू शकते.

मांजराला तुमच्या सानिध्यात रहायला आवडते त्यामुळे त्याचे वास्तव्य जास्तीत जास्त किचनमध्ये असते, त्या काळात ते तुमच्या पायाशी सतत लुडबूड करत असते आणि काहीतरी वसुली केल्याशिवाय रहात नाही. मांजराला उंच जागेवर बसणे आवडते त्यामुळे घरातील खुर्ची, सोफा, बेडरूममध्ये पलंगावर किंवा गादीवर निवांतपणे ते विश्रांती घेत असलेले तुम्हाला दिसेल.

मांजरी एका वेळेस दोन ते सहा पिल्लांना जन्म देते. मांजरीला आपल्या नवजात पिलांच संरक्षण करण जिकिरीचे असते, म्हणून ती कधीही उघड्यावर पिल्लांना जन्म देत नाही तर ट्रंकपाठी, माडीवर किंवा दुर्लक्षित ठिकाणी जन्म देते. बोकाच लहान पिलांना खातो असे म्हणतात म्हणून मांजरीला आपली पिल्ले सुरक्षित ठेवणे गरजेचे भासते.

मांजराचे डोळे आकर्षक असतात आणि डोळ्यात फ्लूरोसेन्स असते त्यामुळे त्याला अंधारात पाहणे सोयीचे होते. मांजराच्या तोंडावर मिशा असतात त्या सेन्सर प्रमाणे काम करतात. तिचे कानही बरेच सेनसिटिव्ह असतात. मांजरीला रागावलेले कळते. तिला लाड करून घ्यायला आवडते. तिला मालकाबरोबर खेळायला आवडते. विशेष म्हणजे मांजराला स्वच्छ राहणे आवडते. मांजराला त्याच्या आवडत्या मालकाच्या मांडीवर नाही तर मांडीत बसायला आवडते. काहीही खाल्ले की ते आपल्या पंजाने तोंड स्वच्छ करते. जी कुटुंब तळमजल्यावर राहतात किंवा स्वतः च्या घरात राहतात त्यांनी मांजर पाळले तर घरात उंदीर त्रास देण्याची शक्यता नष्ट होते.

पण कधीतरी मांजर, सरडा, उंदीर, पाल, पक्षी किंवा लहान सरपटणारे प्राणी यांची शिकार करुन आणते. अर्धवट खाल्लेले भक्ष घरातील अडगळीच्या ठिकाणी टाकते मग मात्र त्याची दुर्गंधी असाह्य होते.

पाळीव मांजरांना त्यांचे CAT FOOD द्यावे लागते. हे चोचले सामान्य माणसाला परवडणारे नाही. घरगुती मांजर आजारी पडल्यास स्वतः विशिष्ट प्रकारचे गवत खाऊन स्वतः वर उपचार करते. गवत खाल्ले की ते वमन करते आणि पडून रहाते. पाळीव मांजरीला डॉक्टरकडे घेऊन जावे लागते आणि ते जिकिरीचे असते. मांजराच्या मनाविरुद्ध त्याच्याशी वागल्यास ते हिंस्त्र बनते आणि माणसावर हल्ला करू शकते.

तुम्ही म्हणाल या मांजरपुराणाची गरज काय? तर आमच्या घरी माझ्या लहानपणापासून आतापर्यंत अनेक मांजरी होत्या. कधीतरी दोनदोन मांजरी किंवा बोकाही असायचा पण आता आमच्या गावच्या घरी पाच मांजरे आहेत.

त्यांना उंदरो, भुरो, टवळो अशी वेगळीच आणि विचित्र नावे आहेत. त्यापैकी पिवळ्या रंगाचे मांजर बंगल्यात रहाते. याचे कारण सध्या मुळ घरी म्हशी आहेत पण दूध देत नाहीत आणि आम्ही नियमित दूध आणतो आणि गरम केले की त्याला घालतो. लहान मांजरालाही आधी घालतो. मोठ्या मांजराची अशी समजुत झाली आहे की लहान मांजर माझ्या दूधात वाटेकरी झाली आहे. बंगल्यात मोठ्या मांजराची जागा ठरलेली आहे. ते इतर मांजरांना बंगल्यात फार काळ घेत नाही. जणू तेच त्या बंगल्याचे मालक असावे.

गेले महिनाभर दुसऱ्या मांजरीचे लहान पिल्लू बंगल्यात आले की मोठे मांजर त्याला मारते. जणू त्याला सांगत असावे हे घर माझे आहे. तू येथे येऊ नको. जुने घर ते नवे घर किंवा बंगला या दरम्यान वीस पावलाचे अंतर आहे. मोठे मांजर या दरम्यान दबा धरून बसते आणि लहान मांजरावर हल्ला करते. लहान मांजर त्याच्या दहशतीला न जुमानता नियमित येते आणि त्यांचे भांडण आम्हाला सोडवावे लागते. तेव्हा माणूस तर स्वार्थी असतोच पण आता प्राणीही स्वार्थी झाले की काय कळेनासे झाले आहे ?

लहान मांजराला हे नवीन घर खूप आवडते. ते सोफा किंवा
अंथरुणावर बसून रहाते, तिथेच झोपते. चहा करतांना कप वाजला की ते धावत ओट्याकडे येते आणि दूध मिळेपर्यंत तोंड मिटत नाही. मांजरे असल्याने घरात झुरळ वा अन्य किटक मुळीच फिरू शकत नाही पण एका म्यानेत दोन तलवारी रहाणार कशा? यात लहान मांजर बळी पडेल ही भिती आम्हाला. अजून तरी, ते छोटे मांजर लपण्याच्या जागा बदलत सुरक्षित आहे.

माझ्या लहानपणी मांजराविषयी एक गैरसमज होता तो म्हणजे मांजरीची वार सुरक्षित जतन केली तर घरात वैभव येते. आजपर्यंत मला तरी तसा अनुभव नाही.

काही मांजरे घरातील वस्तू चोरून खाता, आमच्या मांजरांना मळलेले पिठ खाण्याची सवय आहे तर काही मांजरे कच्चा बटाटा देखील खातात. शेतकऱ्यांना मांजर पाळणे ही गरज आहे. घरातील साठवण केलेले धान्य उंदीर, किटक यांच्या पासून राखण्यासाठी मांजर हवे असते तर काही आवड म्हणून ते पाळतात. घरात मांजर असेल तर सहसा सरीपटणारे प्राणी घरात येणार नाहीत.

मित्रांनो हौस म्हणून मांजर पाळण्यापूर्वी त्याच्या सवयी माहिती करुन घ्या. कधीकधी मांजर बाहेरून काही खाऊन येते आणि घरात वांती करते. लहान बाळ पाळण्या इतकेच जोखमीचे आहे. आमची मोठी मांजर आजारी पडली तेव्हा आमच्या गावच्या वहिनीने तिची आठ दिवस शुश्रूषा केली. चक्क चमच्याने दूध, खीर, पाणी भरवले . हळूहळू ती बरी झाली. मुलांइतकेच त्यांच्यावर प्रेम करा तर ते तुम्हाला प्रेम देतील.

माझ्या सफाळ्याच्या घरी घडलेला प्रसंग सांगून मी लेख संपवतो. आमच्या सफाळ्याच्या घरी गाई, म्हशी होत्या. आमच्या आईच्या माहेरी दूधदूभते होते. तिला गुरांची आवड होती. वडील रिटायर झाल्यावर आईने आयुष्यात पहिल्यांदा हट्ट धरून गाय खरेदी करायला लावली. ऐकोणीसशे अडूसष्टची गोष्ट, किंमत होती ९९ रूपये. शंभर का नाही? नाही माहिती. विचारायचा शहाणपण नव्हते किंवा स्वातंत्र्य नव्हते. कानपाटात बसले असते. तेव्हा गाय एक पेला दूध देत होती. आईने तिची चांगली तजवीज ठेवली त्यामुळे ती दोन्ही वेळेस मिळून दोन लिटर दूध देवू लागली. तर सांगायच म्हणजे, पावसाच्या दिवसात,बहुधा श्रावणात आई आमच्या तांबू गाईचे दूध काढत होती.

काही वेळाने आईच्या लक्षात आले की तिची शाली मांजर तिच्या पदराशी खेळत आहे. आई मांजरीला ओरडली. “थांब गो शालग्या दूध काढू दे, तुझी नाटका नको.” तरीही मांजर परत परत आईच्या पाठीवर, पदरावर डावली मारत होती म्हणून आई रागाने दूध काढता काढता उठली तर पदरावर चढत असलेलं साप खाली पडला. मांजरीने त्याला डावली मारत अडवले. ते घराच्या कोनाड्यात शिरले होते तिथूनही शाली मांजरीने त्याला शिताफीने बाहेर काढले आणि वडिलांनी त्याला मारले. या झटापटीत नक्की काय झाले कळले नाही पण दुसऱ्या दिवशी शाली मांजर मेले. बहुधा त्याला जनावरांनी दंश केला असावा. आई त्या मांजरासाठी खूप रडली. त्या मांजराने आईला स्वतःची आहुती देऊन वाचवले.

तेव्हा मित्रांनो तुम्ही प्राण्यांवर जीव लावलात तर ती ही तुमच्यावर जीव लावतील. आपल्याला मांजर पुराण नक्की आवडेल अशी आशा आहे. पून्हा नवीन विषयासह भेटूच तो पर्यंत रामराम.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “मांजर पुराण

  1. Chaim Ward

    I just could not depart your web site prior to suggesting that I really loved the usual info an individual supply in your visitors? Is gonna be back regularly to check up on new posts.

Comments are closed.