माझी ८.१४ आणि ते
लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे असं म्हणतात ते काही उगीच नाही. मुंबईतल्या महासागरात आलेला माणूस कधी त्याच्या नकळत या सागराचा एक जलबिंदू बनतो आणि विशिष्ट लोकलचा सदस्य बनतो ते त्यालाही कळत नाही, पण एकदा की तो या लोकलचा झाला की मग त्याची लोकलची परिभाषा बदलते. तो घरी सांगतो माझी ०८.०५ जाईल गं लवकर डबा दे. सरावाने त्याची पत्नीही तेच संदर्भ गृहित धरून त्याला सांगते. “हं निघा आता तिथे माझी सवत तुमची वाट बघत्याय, तुम्ही वेळेत पोचला नाहीत तर ती रुळाखाली जीवच देईल”. तोही गंमतीने म्हणतो “अगं तुझ्या सवतीचं माझ्यावर आहेच तसं प्रेम, उगाच नाही काही, काळजी घेऊन मला वेळेवर कामावर पोचवते.” असं हे प्रत्येक प्रवाशाच आणि लोकलच आगळं वेगळं प्रेम.
तीन वर्षांपूर्वी मी नाईलाज म्हणून फास्ट लोकल चा प्रवास सोडला तेव्हा कोणत्याही नवीन गाडीत माझे बस्तान बसेल असे खरच वाटले नव्हते. फास्ट लोकल पकडणे अशक्य झाले म्हणून मी डोंबिवली ८.१४ लोकल ट्राय करून पाहू म्हणून फलाट क्रमांक दोन गाठला, मित्राने आधीच सूचना केली होती. “८.१४ पकडायची असेल तर ८ वाजण्या पूर्वी platform गाठावा लागेल आणि तुला लगेच कोणी जागा देईल या भ्रमात राहू नको, सगळे ग्रुपने प्रवास करतात. पहिले काही दिवस पॅसेज मध्ये उभ राहता आले तरी धन्यता मान.” त्याची सूचना सरआँखोपे मानूनच मी platform वर पोचलो. गाडीची अनाउन्समेंट झाली तशी प्रत्येकाने पोझिशन घेतली. कोणता डबा कुठे येतो हेच मुळात नीट माहीत नव्हते. केवळ फर्स्ट क्लास ची तांबड्या रंगाची मार्किंग बघूनच मी अंदाजाने उभा होतो.
गाडीने स्टेशनमध्ये प्रवेश केला आणि प्रत्येकाने स्वतः ला गाडीत झोकून दिले. मी ही अनुकरण केले. मी डब्यात शिरेपर्यंत सीट भरल्या होत्या किंवा सीट बँगा टाकून अडवल्या होत्या. मी एक दोन ठिकाणी विनंती करून पहिली पण उलट उत्तर मिळालं, “ओ, काका तुम्हाला जागा द्यायला आम्ही पागल आहोत का, एवढी फास्ट गाडी लटकून पकडतो ते काय फुकट द्यायला का?”
मी त्याला समजूतीच्या स्वरात म्हणालो, “मित्रा, मी सुध्दा कधीकाळी फास्ट गाडीच पकडत होतो, पण माझे ढोपर दुखते म्हणून मला गाडी सोडावी लागली. मला जागा दिली नाहीस तरी हरकत नाही पण बोलतांना जरा विचार केलास तरी ठीक.” माझं बोलणं ऐकून तो धुसपूसत शांत बसला.हळूहळू त्याचा मित्र परिवार आला आणि तो मला विसरूनही गेला.
गप्पा टप्पा सुरू झाल्या.कोणते नवीन picture आलेत,कुठे कोणता शो आहे याची चर्चा सुरू होती , तेव्हा दंगल, एअरलिफ्ट, सुलतान असे काही पिक्चर आले होते. या पिक्चर ची चर्चा सुरू होतीच, त्यातील आवडलेली गाणी,लावलेले सेट,आणि बोल्ड दृश्य या बाबत प्रत्येक जण स्वतः ची माहिती सांगत होता. त्याच बरोबर नवीन आलेल्या वेब सिरीज, त्यात काम करणाऱ्या नवीन मुली, अशी चर्चा रंगली होती.सिनेमात नवीन आलेली मुलगी किती सेक्सी दिसते हे सांगून ते व्याकुळ होत होते.त्यांच वयच होत ते रोमँटिक गप्पा नाही करणार तर कोण करणार!, मी ऐकूनही न ऐकल असं भासवत उभा होतो. मला ह्या गप्पा निषिद्ध नव्हत्या पण तो माझा प्रांत नव्हता. ठाणे जवळ आले तसे ज्या मुलांने माझ्याशी शाब्दिक भांडण केले त्यानेच मला जागाही दिली.मी त्या मुलाला thanks म्हणालो. Group मधली जास्त मुले वीस ते तीस वयोगटातील होती. विंडोला अंदाजे पन्नास वर्षे वयाचे गृहस्थ बसले होते. मी त्यांच्या शेजारी बसल्यावर त्यांनी नाव गावं विचारलं, कुठे कामाला आहात अशी जुजबी माहिती विचारली आणि हात मिळवला. मला थोडे रिलॅक्स वाटले. दोन-तीन दिवस असाच दोन सीटच्या मध्ये उभा राहून कधी ठाणे तर कधी घाटकोपर पर्यंत प्रवास केल्यावर सीट मिळत होती. थोडा कंफर्टेबल प्रवास होत होता यावरच मी खूश होतो. ह्या ग्रुप मध्ये नेहमी चेष्टा मस्करी चाले. सर्व मुले तरुण असल्याने त्यांचे चर्चेचे संदर्भ पार्टी, पिकनिक, क्रिकेट, हळदी कार्यक्रम असे असतं. कधीतरी बाजूला येणारी ८.१० लेडीज स्पेशल आणि त्यात चढणारे लेडीज ग्रुप यांची चर्चा तर कधी समोरून समांतर धावणाऱ्या गाडीतील एखाद्या मुली विषयी किंवा एखाद्या मॉडर्न काकू विषयी चर्चा चाले. वयाला स्वाभाविक असेच सारे असे.त्यात केतकर हे त्या ग्रुपमध्ये वयाने आणि मानाने मोठे. ते बऱ्याच वेळा नवीन येणाऱ्या प्रवाशाला ऐकवत की मी रुळावर झोपलो म्हणून ही गाडी मिळाली नाहीतर डोंबिवली वरून सुटणारी गाडी होती कुठे? अर्थात तो गंमतीचा भाग पण ही गाडी ते बऱ्याचदा कोपर येथूनच पकडत आणि ग्रुप मधल्या मेंबर साठी जागा राखून ठेवीत.
माणूस किती स्वार्थी असतो, जेव्हा मी त्यांच्या सोबत नव्हतो तेव्हा त्यांची कृती मला अयोग्य वाटे, पण जसा मी त्यांच्या ग्रुपचा सदस्य झालो त्यांची ती जागा अडवून ठेवण्याची कृती मला योग्य वाटू लागली. ग्रुप मधली मुले कधी टोरंटवरून डाऊनलोड करून आणलेले पिक्चर शेअर करत. कधी हिट आणि हॉट व्हिडिओ पाहण्यासाठी त्यांची एकाच मोबाईलवर धडपड चाले. केतकर मुलांबरोबर मूल होवून जगत. ही मुले केतकर यांना हे हॉट व्हिडिओ शेअर करत आणि काकूंना दाखवू नका नाहीतर काकू बुकलून काढतील अशी तंबी देत. बिच्चारे केतकर! केतकर गाडीने डोंबिवली सोडलं की उगाचच डोळे मिटून घेत आणि ठाणे स्टेशन आले की डोळे उघडत, पाण्याची बाटली काढून सगळ्या ग्रुपला पाणी वाटत. मुले त्यांची चेष्टा करत अरे केतकर फार हिरवा माणूस आहे, आपल्याला वाटत झोपले, झोपत नाही आपण दाखवतो तो हॉट सिन आठवतात आणि एन्जॉय करतात. कधी कधी केतकर रागावत पण पाच मिनिटात ते विसरून जात. तसा मनमोकळा माणूस, त्यांच्या पेक्षा वयाने लहान मुले बऱ्याचदा त्यांची चेष्टा करत पण ते कधी मनावर घेत नसत. ग्रुप मध्ये भरपूर चेष्टा मस्करी चाले कधी कधी मस्करी गुद्यावर जाई, समजूत काढता काढता नाकी नऊ येई. ग्रुप सर्व समावेशक होता. संदीप हा फक्त काही इयत्ता शिकलेला परंतू व्यवहारात हुशार असा युवक होता, त्याचे फोर्ट येथे भागीदारीत स्टेशनरी दुकान होते. तो गमतीत म्हणे अगर मै क्लास पुरा करता था तो गधा मजुरी नही करता था. सचिन हा आर्टिस्ट होता आणि तो इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या कंपनीत कामाला होता, केतकर बी.के.सी.येथे महसूल विभागात होते.दिनेश हा एका ब्रोकरकडे कामाला होता,तर बाला हा दक्षिणेकडचा, पण फोर्टला एका फर्म मध्ये मॅनेजर होता.
थोडक्यात ग्रुपमध्ये सर्व थरातील व्यक्ती असूनही समानता होती. सर्व खेळीमेळीत वागत. केतकर आणि बाला ह्या दोन व्यक्ती सहसा उठून कोणाला जागा देत नसतं, ह्या विषयी बालाला अनेक वेळा पिडल्या नंतर एकदा तो ठाण्याला उठला. खिडकी जवळ एका सीटवर दोन दोन मुले आलटून पालटून एकमेकाच्या मांडीवर बसत म्हणून ही सिट रिझर्व्ह असे. कधी कधी पंकज, केतकर यांना हात धरून गमतीने उठवे मग त्यांची जुगलबंदी पाहण्या सारखी असे.दोघेही इरेला पेटत पण मग पंकज माघार घेत असे. सगळ्यांचा छान time pass होत असे.प्रत्येक महिन्यात कोणाचा तरी वाढदिवस असे आणि मग त्या दिवशी वेळ कसा गेला कळत नसे. नाष्टा वाटे पर्यंत दिवा स्टेशन निघून जाई. दिनेश याच्यावर नाष्टा ठरवण्याची आणि आणण्याची जबाबदारी असे, त्यामुळे त्या दिवशी खिडकीकडे सिट रिकामीच ठेवावी लागे.आमच्या बाजूच्या कंपार्टमेंट मध्ये असणारे आमच्या ग्रुपचे खाऊ सदस्य होते.म्हणजे कुणाचा वाढदिवस असला आणि नाष्टा असला की सर्व हजर रहात. अश्या फुकट्या मुलांना पंकज टार्गेट करे. अर्थात या मुलांनी लाज नाही बाळगायची अशी शप्पत घेतल्याने त्यांना फरक पडत नसे.
ग्रुप चा एक अलिखित नियम होता नवीन सदस्य होण्यासाठी स्नॅक्स द्यावा लागे. अर्थात ही सगळी गंमत जंमत असे, त्यात सक्ती नव्हती.गोडी गुलाबीने प्रवास चाले. एखादा विषय मिळाला की तो किती ताणायचा त्याला अंत नसे. सर्व मुले त्यांच्या वाढदिवानिमित्त डब्यात स्नॅक्स देत, नव्हे ते कम्पल्सरी होते जो स्नॅक्स देण्यासाठी टाळाटाळ करेल त्याला पंकज पुन्हा पुन्हा आठवण करत राही. दिनेशकडे त्याच नियोजन असे. वाढदिवसापूर्वी डब्यात काय स्नॅक्स हवा त्याची चर्चा चाले. ज्याचा वाढदिवस असे तो सहाशे रुपये दिनेशच्या हातावर ठेवी. कोण किती खाणार, कोण रात्री उपाशी राहून आले, स्नॅक्स उरला तर ऑफिस मध्ये नेऊन कोण शाईन मारणार दोन दिवस अशी चर्चा चाले. ग्रुप मध्ये वीस ते पंचवीस मेंबर्स होते, साहजिकच तीस प्लेट ची ऑर्डर एक दिवस अगोदर द्यावी लागे, मग कधी वडा पाव, कधी डोसा चटणी,कधी समोसे तर कधी पॅटीस, मेदू वडा, दाल वडा,इडली, सगळ्या पदार्थाचं चक्र संपलं की पुन्हा येरे माझ्या मागल्या.
स्पाॅन्सर करणा-यांनी जास्त पैसे दिले तर मेनू डब्बल असे. शिवाय थंड पेय असल्याशिवाय मजा येईल कशी? एकदा गाडीला सिग्नल मिळाला की वाटप सुरू होई. चालत्या गाडीत प्लेट मध्ये चटणी सर्व्ह करणे फार कठीण काम. कधी कधी चटणी कोणाच्या पँटवर तर कधी प्लेट दुसरीकडे देताना कुणाच्या डोक्यावर असले उद्योग होतच असतं पण कुणी फारस मनावर घेत नसे. थंड देतांना तीच तऱ्हा ज्याच्या हाती बाटली लागे तो फुकट म्हणून घुसमट होई पर्यंत घोट घेई आणि कुणाच्यातरी अंगावर फवारे. मग सगळे त्याला ट्रोल करत.त्याचा फोटो मित्रांमध्ये चर्चेचा विषय होई. सर्वांचे खाऊन झाले की डिश एकत्र करून ती पिशवी सी. एस. टी.स्थानकात उतरल्यावर डस्टबीनमध्ये टाकली जाई.
कुणाचं लग्न ठरो, कुणाला मुलगा होवो,कुणाला प्रमोशन मिळो किंवा कुणी जॉब बदलो या ग्रुप मेंम्बर्संना कुठे तरी नेऊन खायला घातल्या शिवाय सुटका नसे.म्हणतात ना बामणाच लक्ष दक्षिणेवर तसं यांचं लक्ष पार्टीवर. एकदा तिथे बसून आले की दोन तीन दिवस कोणाला कशी चढली आणि कोणी कशी प्यायली यावरच चर्चा चाले.
कधी कधी एखादे तरुण जोडपे ग्रुप जवळ येवून उभे राही आणि कुणालातरी त्यातील “तिला” जागा द्यायची दया येई. थोड्या वेळाने ती आपल्या नवरोबाला सरकून जागा करून देई हे महाशय दादर पर्यंत उभे, अशावेळी त्याला ग्रुप टार्गेट करी, जर त्या दोन दिवसात कुणी दुसरे जोडपे आले की त्याचे नाव घेवून म्हणत “ये राज यार दे की त्या बाईंना जागा.” राजचा चेहरा रागाने लालबूंद होई. पण कधी कधी नाईलाजाने जागा द्यावी लागे. बरे करता ब्रह्महत्या म्हणतात ते यालाच. ग्रुप मध्ये प्रवास करतांना वेळ कसा गेला ते कळतही नसे. घाटकोपर पासून मेंबर्स उतरत. जातांना शेक हॅंड करूनच निरोप घेत. कधी कधी पास चेक करायला टीसी डब्यात चढे मग मूलं उगाचच दुसऱ्याच्या नावाने बोंब मारून म्हणत, पराग पास संपला ना काल, तिकीट काढल का? अर्थात टीसी चेहरे पाहूनच तिकीट विचारी. शक्यतो कुणी विदाउट नसे मात्र आपण टीसीला पिडले याचाच मुलांना आनंद होई.
कोणी मेंबर दोन दिवस न सांगता गैरहजर राहिला तर त्याला प्रत्येकाचा फोन ठरलेला असे. ग्रुप मध्ये मिश्रा नावाचा एक तिशीतला तरुण होता परंतु त्याच्या डोक्यावरचे केस अतिशय विरळ झाले होते मुख्य म्हणजे त्याचे अजूनही नीट बस्तान बसले नव्हते सर्व मित्र त्याला सल्ला देवून बेजार करत पण तो स्थितप्रज्ञ राहून हसे. कुणीतरी गम्मत करत म्हणे “मिश्रा भाडे पे बिबी भेजू क्या? त्यावर दुसरा म्हणे साला भुका सुव्वर है,एक दिन मे उसको खा डाले गा” प्रत्येकाला काहींना काही समस्या असणारच पण हसत कसे जगावे याच उदाहरण म्हणजे मुणगेकर. वयाच्या पासष्ट वर्षानंतर ते लोकल प्रवास करून नोकरी करत आणि सदा हसतमुख रहात. ते नेहमी न्यूज पेपर आणत आणि केरकर यांना देत. त्यांनी पेपर घेतला की कुणीतरी पाठून ओरडत असे, “ये, फुकट्या,एक रुपया दे मग वाच”. मग केरकर त्याच्या नावाने शंख करीत. गाडीच्या दरवाजावर काही मनाने हिरवेगार थांबत त्यात माने होते, पन्नाशी ओलांडली होती तरी ते दाराला लटकून रहात आणि समोरच्या प्लॅटफॉर्म वर येणाऱ्या मुलींकडे पाहत रहात, मुलांनी त्यांना कितीही नावे ठेवली तरी काही फरक पडत नसे. ग्रुप मधल्या कोणाचं लग्न ठरले की वर्गणी काढत आणि अहेरासह त्याच्या हळदी कार्यक्रमाला जात.हळदीमध्ये कोणी किती क्वार्टर मारल्या आणि कोण कसे नाचत होता त्याच्या व्हिडियो व्हायरल करून चार दिवस त्याची खेचल्या शिवाय त्यांची हौस फिटत नसे. पण तेवढेच एकमेका विषयीप्रेम आस्था सर्वांकडे होती. कोणी आजारी पडले की त्याला मदत करायला नक्कीच चौकशी करत. कधी कधी गाडी रद्द होई मग ग्रुपचे हाल होत कोणी कल्याण गाठे तर कोणी स्लो ट्रेन चा आसरा घेई. पावसात गाडी लेट येण्याचे प्रमाण वाढले की सर्वच अस्वस्थ होत.गेल्या तीन वर्षांच्या सहवासात ग्रुप मधील प्रत्येक व्यक्ती चांगली परिचयाची झाली. कधी काही कारणाने गैर हजर राहिलो तर दुसऱ्या दिवशी आस्थेने विचारपूस करत.
लोकलच्या प्रत्येक डब्यात असे छोटे मोठे ग्रुप आहेत, काही डब्यात भजनी मंडळ आहे. प्रत्येक ग्रुप आपल्या पद्धतीने एन्जॉय करत असतो. प्रत्येकाला काही न काही विवंचना असणारच पण पाडगावकर यांच्याच भाषेत सांगायचं तर “सांगा कसे जगायचे? कण्हत, कुथत कि गाणे म्हणत?”
लेडीज कंपार्टमेन्ट ही आगळी मौज, त्या डब्याची कथाच वेगळी, तिथे केळवण, डोहाळे जेवण, नवरात्र उत्सव, हळदी कुंकू दसरा, संक्रांतीचे वाण, तिळगुळ आणि काय आणि काय. पण ते पुन्हा केव्हातरी.
मी ८.१४ च्या प्रेमात पडलो त्याला तीन वर्ष झाली, आणि प्रेम आता चांगलंच घट्ट होतय तोवर निवृत्ती आली. तिच्याविषयी माझ्या भावना व्यक्त केलेल्या नाहीत म्हणून सारखी स्वप्नात येऊन छळत होती, म्हंटल आमचं प्रेम जगाला ओरडून सांगावं म्हणजे तरी शांत होईल पण घडलं विपरीत. गेले दोन महिने तीच एकदम शांत झाली. अगदी निवांत फारच वाईट वाटलं. तिलाही वाटलच असावं. तिची अस्वस्थता मी दूर करु शकणार नाही पण माझ्या भावना तिला कळल्या तरी ठिक. तुमचीही कोणी लाडकी अशीच असेलही. नाही सांगितलं तर मनाला रूखरूख राहीलं टाका सांगून तेवढंच या लाॅक अपमध्ये मन हलकं होईल. सांगताय ना!
छानच….! जुने दिवस आठवले….!
शारदाश्रममधील सुरवातीच्या दिवसात सकाळची ५.४५ ची सेमीफास्ट ठरलेली ट्रेन…! त्यात बराच मोठा ग्रुप, खूप छान जमला होता मोंडकर आणि मी तर खास मैत्री जमली होती
त्यांच्या अंत्य दर्शनाला जाऊ शकले नाही, यावर मी स्वतःवर जेवढी रागावले होते, तेवढीच५.४५ सेमीफास्टही रागावली असेल याची जाणीव झाली आज.