विहीर भाग 2

विहीर भाग 2

निरोप घेऊन ती निघाली शाळांना सुट्टी  नसल्याने एस.टी.ला फारशी गर्दी नव्हती. रात्री महाडला बस थांबली. त्यांनी डबा आणला होता. एस.टी.कॅंटीनमध्ये त्यांनी डबा खाल्ला. चहा प्यायला आणि परत आले. रात्री दोन वेळा बस थांबली. तो लांज्याला पाय मोकळे करून आला. सकाळी त्याला जाग आली तेव्हा तराळे करून बस निघाली होती. बाहेर अंधूक दिसत होतं. तो सकाळी सहा वाजता गावी पोहोचला तेव्हा आई अंगण झाडत होती, त्याला सुनेसह पाहून तिला आश्चर्यच वाटल, “रे बाबल्या अचानक कसो? पत्र नाय की निरोप नाय, मुंबयक सगळे बरे मा!”

तिने हात पाय धुवायला गरम पाणी दिले. त्याची जाग लागताच नाम्या भुंकत त्यांच्या अंगावर उड्या  मारू लागला. त्याचे चहा पान होताच त्यांने आईला विहीरीच्या कामाबद्दल आणि घेतलेल्या कर्जाबद्दल सांगितले तशी ती थांबवून म्हणाली, “झक मारली आणि ग्रामसेवक भाऊंचा ऐकलव, आमका ते माडव नको आणि कलमाव नको. उद्या संसार बघशीत, आवशीक पोसशीत का बावीचा कर्ज फेडशीत, हे उचापती आपणाक नको, तु काय  कर्ज काढून पैसे आणले असशीत ते पैसे फेडून टाक.” आईची समजूत काढतांना त्याला नाकी नऊ आले. शेवटी मुक्ता त्यांच्या मदतीला आली.”आई, तुमी कर्जाचा टेंशन घेऊ नकास, ते काय वर्षात फेडूचे आसत?, पाच-सा वर्षात फिटानव जातीत, उद्या दारातली झाडा मेली तर अवाठ हसात शिवाय ग्रामसेवकभाऊ झाडा कशी आसत म्हणून बघूक इले तर, त्यांका काय दाखवशात? दारासमोर झाडा पेडा मोठी झाली तर मे महिनो सुखात जाईत .सर्व विचार करूनच आम्ही इलव, तुमी अजीबात टेंशन घेव नको.”

शेखरच्या आईने सगळं ऐकून घेतले, पण ती तरीही शेखरच्या निर्णयाशी सहमत नव्हती. “तुका सांगूक गो काय? पैसे फिटेस्तोवर माझ्या बाबल्याची पुरती वाट लागात. आदीच गाडयेच्या प्रवासान बिचारो हैराण जाता, ह्या कर्जाचा टेंशन त्याका वाढूक नको.” शेखर तिच्या जवळ जात म्हणाला,”आई, तू निवांत रव मी कायेक टेंशन घेणय नाय, आता आधी पेज आसा त माका घाल, माका भूक लागली हा.” म्हातारीने त्यांना पेज आणि तोंडाला पिठी दिली. तो एस.टी.प्रवासाने कंटाळला होता म्हणून त्याने लोट्यावर अंग टाकल. त्याला कधी झोप लागली ते त्यालाही कळल नाही.

दुपारी त्याला मुक्ताने उठवलं तेव्हा दुपारचे दोन वाजले होते. त्याने न्हाणीवर जाऊन आंघोळ केली.देवखोलीत जाऊन नमस्कार केला, मुक्ताने पूजा केली होती. देव्हा-यात अगरबत्तीचा सुवास सुटला होता. जेवण झाल्यावर तो परड्यात माड पहायला गेला, त्यांना नवीन चूडतं फुटत होती. माली चांगल

शिंपण करत होती. कलमावर त्यांनी नजर टाकली त्यांनाही पालवी फुटत होती. त्याने हाक मारुन मुक्ताला बोलावलं तसं ती गाऊनलाच हात पूसत आली. “अहो,कशाला हाक मारताय? भांडी घासत होती. काय सांगताय?”  “अगं, आईने कलम कशी जपलीत बघ, जर बाबा असते तर या पेक्षा चांगलीच जतन केली असती पण तापाच निमित्त झालं आणि मी दहावीत असतांनाच बाबा गेले.” ती त्याच्यावर रागावली “रडायला आलात का इथे, बाबांची गोष्ट खूपदा ऐकल्याय मी, आता विहिर खणण्याच काय ते पहा.”

संध्याकाळी दोन तीन माणसं भेटायला आली. शेखरने आईला चहा ठेवायला सांगितला. त्यानी सारंगना विहीर खणण्या विषयी विचार सांगितला तसं ते म्हणाले, “देसायानो आधी पाणक्याकडसून जागा बघून घेवा,मगे माणसांचा बघूक येईत, तेंडोलीक रामदास आसा तो बरा पाणी सांगता. त्याची आधी सोय करा, ग्रामदेवतेक कौल लावचो लागात, ही कामा झाल्याशिवाय बावीच्या कामाक हात लावताच नये, बरोबर ना माई.” त्यांनी शेखरच्या आईकडे पहात बोलणे संपवले. ती बिचारी काय उत्तर देणार, तीने मान डोलवत होकार भरला, “सारंगानू, तुमीच हात घालशात तर बरा होईत, आमच्या बाबल्याक काय बावीचो अनुभव हा? तुम्ही जाणते, वाईच तुमीच मदत करा म्हंजे झाला.” सारंगने तेंडोलीला शेखर बरोबर येण्याची तयारी दर्शवली. दुस-याचं दिवशी सकाळीच ते तेंडोलीला जाऊन आले, आढे वेढे घेत रामदास यांनी येण्याचं कबूल केलं. त्यांना लागणारी सामुग्री जमा करून ठेवण्याची त्यांनी सूचना केली. परतीच्या मार्गात कुडाळच्या स्टॅंडवर शेखरने सारंगना त्यांनी दाखवलेल्या हाॅटेलात जेवू घातले, पान, सुपारी घेऊन दिली. पेंडरात परतल्यावर पन्नासची नोट हातावर ठेवली.”काका तुम्ही सोबत होतास म्हणून काम झाला नाय तर कठीणच होता, ते काय माका तयार झाले नसते.” सारंग हसले, “बरा तो इलो म्हणजे माका निरोप धाड, मगे माणसांची जुळवा जुळव करूंक व्हयी.”





दोन दिवसांनी रामदास आले, चहापाणी झाल्यावर, त्यांनी शेत फिरून पाहिलं. नारळावर तवा ठेऊन स्वत: त्याच्यावर बसून पाण्याचा माग काढला, दोन तासांच्या शोधा नंतर एका कणकीच्या बेटा समोर जागा निश्चीत केली,त्यांच्या डाव्या बाजूला जांभळं होती. “देसाई, तुमका दोन बोटांचो झरो गावलोहा.

लय नशीबवान तुम्ही, डोंगराच्या वरच्या अंगाने एक आणि ह्या उगवतीकडसून दुसरो. कदीव बाव खणा, मात्र देवाचो कौल घेऊक विसरा नको, सारंग आसत ते बघतीतच आणि पाणी पडला की माका निरोप धाडा, काय ! लक्षात येईत मा?”

दुपारच जेवण करून ते जायला निघाले, शेखरने सारंगना विचारून अडीचशे रुपये आणि नारळ त्यांच्या हातावर ठेवला. संध्याकाळी ग्रामदेवतेला घाड्यांनी कौल लावला, देवाचा उजवा कौल मिळाला, देवानं कौल दिला म्हणजे काम निर्विघ्न होणार म्हणून आई समाधानी होती. सारंगांनी भटाला बोलवून रितसर भूमीपूजन केलं आणि कामाला सुरुवात झाली. टिकाव, पहारी, घमेली यांच्या घण घणाटान रान गजबजल. जो तो वाटसरू विहिरीला पाणी पडल का पहायला वळत होता.आठ दिवस थांबून शेखर मुंबंईला निघाला. तिच्यावर मोठी जबाबदारी पडली होती. कामगारांचा हिशोब ठेवायचा, त्यांचं चहापाणी पहायचं आणि सासूला स्वयंपाक करायला मदत करायची. पाठ टेकायला ही उसंत नव्हती. रात्री काम उरकून कधी एकदा झोपते एवढी ती थकून जायची. तिला रोज शेखरची आठवण यायची, काय करत असेल? जेवण बनवत असेल की कंटाळून तसाच झोपत असेल, शेजारच्या शिंदे वहिनी काही देत असतील का? विचार करता करताच ती झोपून जाई. त्यातही कधी अवजारांना धार काढण्यासाठी लोहाराकडे जावं लागे. तिच्या सोबतीला वाडीतली बाई आली तरी एवढी टिकाव फावडी नेताना दमछाक होई, परंतू नव-याच स्वप्नच ती जगत होती. खणतांना अचानक ओलसर माती लागली की ती आशेने धाव मारत विहीरीकडे जाई. आठ दिवस संपत आले तरी पाणी नजरेस पडेना तशी ती धास्तावली. सासूही अगदी शांत शांत दिसू लागली.तिनेच सासूला धिर दिला,” आई आत्ता कुठे धा हात खणान झाली हा. तुमी घाबरा नकात,आमचो देव काय आमका टाकूचो नाय.” दुस-या दिवशी बाजाराचा दिवस होता, ती तिठ्यावर गेली. तिने त्याच्या ऑफिसमध्ये फोन केला. तिच नशीब म्हणून शेखर 

लवकरच फोन घ्यायला आला. तिने हकीगत सांगितली. एस.टी.डी.वर आलेली माणसे घाई करत होती. तिने आणलेले पैसै पुरतील की नाही अशी शंकाही व्यक्त केली, तसा तो हादरला. “मुक्ते हिशोब नीट करतेस ना? कुणाला जास्त पैसै गेले नाही ना?” तिने हिशोब नीट असल्याचे सांगितले. गरज पडली तर माझ्या बांगड्या ठेऊन पैशांची सोय करा आणि तुम्ही या आता मला झेपत नाही असेही सांगितले. एस.टी.डी. वर फोन लावायला आलेली माणसे कटकट करु लागली तसा तिने फोन कट केला.ती घरी आली. शेखरच्या सूचनेनूसार तिने हिशोब पुन्हा पहिला. कुठेही चूक नव्हती पण कामाला जास्त माणसे असल्याने मजूरी जास्त खर्च झाली होती. त्यामानाने काम उरकले नव्हते.अजूनही चिरे, रेती, भरतीसाठी बोल्डर, सांगाडा या सर्व गोष्टींची खरेदी करायची होती.सात आठ हजार पाठी पडले होते.

दुस-या दिवशी ती दुपारची कामे आटोपून सासूशी बोलत होती इतक्यात विहीरी जवळून कुणीतरी ओरडलं, वैनी लवकर ये, नारळ हाड, पाणी पडला गे पडला.” ती दार ओढून सासूसह शेतात गेली. एका मोठ्या धोंडीपाठून पाण्याचा बोटभर झरा वहात होता. तिने वर पहात हात जोडले. सर्व कामगार काम थांबवून फुटलेल्या झ-याचे पाणी पहात उभे होते.शेखरची आई निरांजन, नारळ, कुंकू, पानाचा वीडा घेऊन आली. तिने मुक्तेला पाण्याची पूजा करायला सांगितली. तस मुक्तेन साडी खोचली व शिडीवरून खाली उतरून पूजा केली. खालून कामगारांनी माईला हाक मारली, “गे माई, शिरवणीवर भागवतस काय, शिरो कर चाय बरोबर. सारंगानू बरोबर सांगलय मा?” सारंग वर पहात म्हणाले, “माईक काय सांगूक व्हया, ती काय करूचा ता करतली, तुमी काम सुरु करा. तोंड सांडून बघीत रवा नको म्हंजे झाला.” त्यांच बोलणं ऐकून प्रत्येक जण कामाला लागला. खणलेली माती वर काढायचा रहाट पुन्हा कुरकुरू लागला. जस जशी माती वर उचलली गेली विहीर पाण्यानं भरू लागली. माईने सर्वांना तिखट शिरा आणि चहा दिला. विहीरीला पाणी लागलेलं ऐकून चुलते विहीर पहायला आले. माईने त्यांनाही शिरा आणि चहा दिला तसं ते म्हणाले,” एप्रिल महिन्यात इतक्या पाणी म्हणजे बघूकच नको. तुका खरोखर देव पावलो,आता व्हया तितक्या पाणी झाडांका गावात, एक इंजन बसवलस का काम भागला.” माईने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.संध्याकाळी अजून मोठा झरा लागला तसं सारंग माईला म्हणाले, “पाणी उसपाक इंजन सांगूक व्हया नायतर बाव ढेपा टाकीत.संध्याकाळी माईने शेजारच्या मदनला बोलवून तिच्या भावाकडे सुकळवाडला इंजन आणायला पाठवले पण तो रिकामाच परत आला. त्यांचा शेंगदाणा फुलला होता त्याला अजूनही पाण्याची गरज होती.





जर विहिर पाण्याने भरली तर विहीरीची ढेपं गेलीच असती पण कामही थांबवावं लागलं असत.शेवटी नाईलाज म्हणून भाड्याने तिने इंजीन मागवले. संध्याकाळी मुक्ता तिठ्यावर फोनसाठी गेली पण ती दुकानावर गेली तो पर्यंत उशीर झाला शेखर कामावरून लवकरच घरी गेला तरीही तीने त्याला फोनचा निरोप ठेवला. दुस-या दिवशी सकाळी तीने काम आवरल आणि तिठ्यावर गेली. तिच्या फोनची शेखर वाट पहात होता.विहीरीला पाणी लागले ऐकून त्याला आनंद झाला. विहीरीचे काम सुरू होऊन दोन‌ महिने झाले होते. आता उर्वरित काम वेगाने आवरणे गरजेचे होते.शेखरने साहेबांना कसं बसं पटवून रजा मागितली. पंचवीस एप्रिल नंतर पंधरा दिवसांची रजा मंजूर झाली. कधी एकदा गावी जातो असं त्याला वाटत होतं. संध्याकाळी घरी जाऊन जेवण करण नकोस वाटे. कधी मिसळ पाव तर कधी ब्रेड आणि चहावर तो भागवे. सकाळी तो कॅंटीनमध्येच जेवण करे. तेच ते खाऊन तो वैतागला होता, पण चपाती त्यांनी कधी बनवलीच नव्हती आणि आता थोडया दिवसांसाठी  कोणाकडे खानावळ लावणं बर वाटतं नव्हतं.

त्याने मित्राला गळ घालून पाच हजारांची कशीबशी सोय केली. गावी नेण्यासाठी काही सामान सुमान घेतले त्यालाच शे पाचशे संपले. रातराणीत कसे बसे शेवटच्या सीटवर त्याला बसायला मिळाले. तो सकाळी सहा वाजता घरी पोचला. मुक्ताने त्याला हात पाय धुवायला पाणी दिले. आईने त्याला चहा आणि भाकरी दिली. कधी विहीर पाहतो असे त्याला झाले होते. कपडे बदलून तो विहीरीकडे गेला विहीरीत कंबरभर पाणी जमा झाले होते. आठच्या दरम्यान सारंग आले तसे त्यांनी इंजीन सुरू केले. ते पाणी माडांच्या अळ्यात सोडले होते. गेल्या आठ दहा दिवसांत पाणी खाऊन माड हिरवे गार झाले होते.

 ते पाहून त्याचा जीव हरखून गेला. संपूर्ण मे महिना अजून बाकी होता. विहीर आरामात पूर्ण होणार यामूळे तो निर्धास्त होता. दोन दिवसांपूर्वी चार ट्रक चिरे पडले होते. बाबू बाण्यांची दोन मुले चिरे तासत होती. त्याने सारंग यांच्याकडून माहिती घेऊन विहिर बांधायला गेवरायचे गवंडी नक्की केले. चार रुपये चिरा प्रमाणे ते तयार झाले. सांगाडा बनवण्यासाठी पंगारा हवा होता, तो डोंगरातच मिळाला. या जुळवा जुळवीत त्याला आल्यापासून उसंत नव्हती. शेवटी बाजाराच दिवस उगवला आणि कामगारांची रजा म्हणून तो निवांत उठला. मुक्तेने त्याला तोंड धुवायला पाणी आणून दिले तसं तो तिला रागावत म्हणाला, “अंग तू का आणतेस मी घेईन की, आज मी पण बाजारात जाईन म्हणतो काय आणू ते सांग, आईलाही विचार.” चहा घेता घेता त्यांनी आईशी गप्पा मारल्या, त्याच्याकडे पहात ती म्हणाली, “बाबल्या किती वाळलस रे, मुंबईत जेवत होतस का बाईल नाय म्हणान तसोच दिस ढकलीत रवलस.उद्या आजारी पडलस तर हा कोण बघूक?” तो बळेच हसला “तुझा आपला कायतरीच, उपाशी कित्याक रवतलय? हाॅटेला काय भंगलीहत?” आईचा विश्र्वास बसेना “घे बायलेची शपथ आणि सांग बघू रोज जेवीत होतस म्हणान, आईची नजर फसता होय !”

तो बाजारात गेला, बरीच कामे होती, हत्यारे पाजळून आणायची होती, सिमेंट, आठीचे दोर,आणि बरेच घरगूती सामान. त्यांने अवाठातल्या अशोकला सोबत घेतले. बाजार करून यायला त्याला दिड वाजला.  रिक्षा मिळाली म्हणून तो घरी लवकर पोहोचला. विहीरीचे खणकाम आटोपले होते बारीक सारीक कामासाठी त्यांनी दोन मजूर कामावर ठेवले होते. ते सकाळी माडांची शिपणे करीत. विहीरीच आवार स्वच्छ करीत. पहाता पहाता सांगाडा तयार झाला, बरेच चिरेही तासून तयार झाले, आता फक्त मूहूर्तावर विहीरीचे काम सुरू करणेच बाकी होते. गेवरायचे वस्त भाऊ गवंडी आणि त्यांच्या मदतीला चिरे वरती माल द्यायला दोन माणसे इतकीच माणसे कामावर होती. सारंगांनी अळवणी भटाला सांगाडा पूजनासाठी बोलावले व त्याप्रमाणे बारा पाचाचा मान ठेऊन गुरुजीनी सांगाडा पूजला व रितसर विहीरीच्या तळाला बसवला. उद्यापासून विहीरीच चि-यांच रीतसर काम सुरु होणार होतं म्हणून तो आणि मुक्ता आनंदी होते.

जेवणखाण आटोपून ते लोट्यावर बसले तेव्हा कडकडीत उन पडलं होतं, दुपारी थोडं पडण्याची सवय असली तरी ह्या  उकाड्यात ते शक्यच नव्हत.म्हणूनच ते इकड तिकडच्या गप्पा मारत होते.साडे तीन चार ची वेळ असावी सोसाट्याच्या वारा वहात होता. हळू हळू आभाळ काळं नीळं दिसू लागलं. कुठेतरी दूरवर वीज चमकून गेली. तरी शेखर स्वत: ला समजावत राहीला अद्यापही मे संपूर्ण बाकीचं होता. पाच वाजायला अजूनही वेळ होता.त्याने मुक्तेसह विहीरीकडे चक्कर टाकली. सकाळी सगळे पाणी इंजनाने उपसूनही विहिरीत अद्यापही कंबरभर पाणी होते. त्याने डिझेल इंजीन हॅंडल फिरवून सुरु केले पाईप मधून मोठे पाणी माडांच्या अळ्यात नाचू लागले.हळू हळू अंधार वाढू लागला.तशी म्हातारी घराकडूनच ओरडली “बाबल्या, रे बाबल्या चल घराकडे, ता इंजान बंद कर. त्याच्यावर थयला काळा प्लास्टीक घाल, धोंडो ठेव वर उडान जायत. मुक्ता,ये गो बाय घराकडे ये, उकाड्याची किरडवा पायाखाली येतत.” आईचं सारखं ओरडणं ऐकून त्यांने इंजन बंद केल.

तो घरी आला आणि लोट्यावर  बसला. पुन्हा वीज चमकून गेली अचानक उकाडा वाढला. जिवाची काह्यली व्हायला लागली आणि सो-सो करत वारा सुटला, घरापाठच्या डोंगरात काही तरी तुटून पडल्याचा आवाज आला. बहुदा वादळाने एखादे झाड उन्मळून पडले असावे. 

दारातल्या माडांची  झावळे नाचू लागली आणि पाऊस सुरु झाला. म्हातारी लोट्यावर गोठून उभी होती. “ह्या माकडानं काय आरंभल्यान मधीच. आजून चुलीक लाकडाव करूक नाय, गोरवांची गायरीव जाग्यावर हा. मरता कित्याक कोणाक ठावक”

मुक्ता आणि तो बाकड्यावर बसून निसर्गाचं ते रौद्र रुप पहात होते.आता बाहेर बराच अंधार पडला.अधून मधून दूरवर वीजा चमकतच होत्या. अचानक पावसान जोर धरला तो बेभान होत पडू लागला. शेखरला करमेना त्यांने घरातून छत्री आणि टाॅर्च शोधून आणली आणि तो विहीरीकडे जावू लागला तशी आई ओरडली, “बाबल्या, थांब पाठी फिर, त्याच्यावर फटकी पडां दे तु जावं नको.” तरीही बाबल्या विहिरीकडे गेला,त्यांने दुरुनच विहीरीवर बॅटरी फिरवली, विहीर पावसाच्या पाण्याने पुरुषभर भरली होती.तो घरी आला. मुक्ता त्याच्या जवळ जात म्हणाली “मीच तुम्हाला त्या विहीरीच्या भरीला  घातलं,हा वैरी असा का कोसळतोय कळत नाही. कशी आहे विहीर? भरली का?” “अजुन तरी ठिक आहे, पुरुषभर पाणी आहे, भरली आणि माती खचली तर काही खरं नाही म्हणून भिती वाटतेय गं, बघ आजच याला कसा उत आलाय!” म्हातारी त्यांच्या बोलण्यानं जास्तच खचली.शेवटी मुक्तानच तीची समजूत काडली. “आई जा नशिबात आसात ता चुकाचा नाय, चला जेवण करुया, चार भाक-या थापल्या की काम झाला. चला, असो धीर सोडून कसा जमात.”

कसे बसे चार घास खाऊन ते लोट्यावर आले तेव्हा पावसाचा जोर कमी झाला होता.म्हातारीनेदेव खोलीत जाऊन नारळ ठेवला आणि ग्राम देवतेला साकडं घातलं, “बा ग्रामदेवते, या पोरांनी जी बाव खणलीहा तिका जशी असा तशी राख आणि तू या गावची राखण करतस हया दाखवून दी. माझो झील जोड्यान येऊन  तुका तुझो मान देईत. खरो असशीत तर माझो शब्द राख.”

ती बाहेर आली, ” पोरांनो झोपा जावा, जागून काय होता, माझी पूण्याई शिल्लक असात तर हेतूनव तो तारीत.” अगदी मनावर दगड ठेऊन ते झोपायला गेले. किती तरी वेळ दोघांना झोपच नव्हती ,सकाळी मुक्तालाच आधी जाग आली तेव्हा कौलांच्या  काचेतून बाहेरच अंधूक  दिसत होतं.ती आवाज न करता उठली. तिने हळूच आडणी काढली आणि विहीरी पर्यंत जाऊन आली. विहीर पाण्याने अर्धी भरली होती परंतू त्यांच्या नशिबाने विहीर कुठेही खचली नव्हती.ती सावकाश घरी आली आणि त्याच्या कुशीत शिरत कानात कुजबुजली, अहो उठताय ना आईचे गा-हाणे देवाने ऐकले, विहीर वाचली.” तिचे शब्द ऐकून तो धडपडून उठला आणि विहिरीकडे गेला. विहीर भरली होती आणि आईचे प्रेत मध्ये तरंगत होते.त्याने हंबरडा फोडला. त्याची आई, देवाने तीचा शब्द खोटा करू नये म्हणून त्याला गळ घालायला  त्याच्या घरी पोचली होती. मुक्ता आणि तो धाय मोकलून रडली एका विहीरीने त्यांच्या जीवा भावाचा  माणूस गिळला होता. विहीर वाचावी म्हणून आईने देवाला स्वत:ला अर्पण करुन विहीर वाचवली होती. आपल्या लेकरांचे श्रम वाचवण्यासाठी आईने आपल्या समीधा देवाला अर्पण केल्या.

ह्या गोष्टीला तीस वर्ष उलटली. बिचारी मुक्ता मुंबंईचा संसार सोडून पेंडुरात कायमचीच आली. एकटीच्या जिवावर तिने दारात बाग फुलवली. दोन मुलांच्या सोबतीने तिने शेखरचा संसार फुलवला मात्र विहीर खणतांना सासू गमावल्याच शल्य ती कधीच विसरू शकली नाही. आता बागेचं काम करायला मजूर राबत होता. पण जेव्हा ती विहीरीवर पाणी शिंपायला जाई तेव्हा माईंची तीच्या सासूची आठवण तिला खिन्न करून जाई. मुलांना तिने कधीही ही गोष्ट कळू दिली नाही.ती करती सवरती झाल्यावर त्यांना ते सांगणं गरजेचं होतं. ते शल्य वागवतच ती जगत होती. मुक्ताला त्या ऋणातून मुक्त होण शक्यच नव्हतं.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “विहीर भाग 2

  1. विहीर भाग 1 – प रि व र्त न

    […] भाग 2 साठी येथे क्लिक करा […]

  2. Archana Ashok kulkarni
    Archana Ashok kulkarni says:

    खूप छान….! कोकणात फिरुन आल्यासारखे वाटले. खरंच श्रमाचे चीज होण्यात किती आनंद असतो नं ?

Comments are closed.