माझे कोकण वाहते जीवन

माझे कोकण वाहते जीवन

महाराष्ट्राचे नंदनवन, माझ्या परशुरामाची भुमी कोकण
उंच सह्याद्रीच्या रांगा, करती या भुमीची अष्टोप्रहर रक्षण
अथांग पसरलेला समुद्र, त्रिकाळ करी सह्याद्री पुजन
दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, बागेचे रोजच करती सिंचन

प्रसिद्ध येथील जुनी मंदिरे, कुणकेश्वर, रामेश्र्वर, भराडी देवी
पुरूषोत्तम, आदिनारायण, वेतोबा, माऊली, सातेरी, कोरजाई
स्वच्छ, निर्मळ येथील किनारे, वेंगुर्ला, देवबाग, निवती, भोगवे
समिंदराची तऱ्हा आगळी, कधी शांत, तर कधी बेभान धावे

कोचाऱ्याला गणेश थडीवर पूर्वजांचे घर चौसोपी नजरेत भरे
गाज येतसे ऐकू, गंभीर ध्वनी, सोसाट्याचा वारा, मनी कापरे
चहुबाजूंनी माड डोलती, पोफळी हसती, पाहता दृष्य भान हरपावे
घमघमे गंध श्वासात फणसाचा, कधी आंब्याचा प्रश्न पडे काय खावे?

मोठ मोठाली घरे इथली, समोर सुरेख भव्य दिव्य अंगण
तुळशी वृंदावन दिमाखात ऊभे सवाष्ण करते नित्य वंदन
या घरातील बुजुर्ग माणसे त्यांचे काळजाहून मोठे मन
माणूसकीचा गहिवर येथे साधी रहाणी, निखळ प्रेम हेच धन

सभोवती गर्द हिरवी झाडी, परसदारी उंच उंच देवाचा डोंगर
ढवळ्या पवळ्याची जोडी छान, ओढती तालात शेतीचा नांगर
बागेत येथल्या, नारळ, केळी, फणस, सुपारी, येथे हवा गारेगार
आंब्याचे कलम आणि चिकूचे झाड, त्याला सोसेना फळांचा भार

पपनीस, नीरफणस, काजू, लिंबे, पेरू, इथे नसे फळांची कमी
पिठी भात उकडा, भाजका सुका बांगडा सुग्रास अन्नाची हमी
वडे सागुती, उकडा भात, बांगड्याचे निस्त्याक, सोलकढी नामी
पेज-फणस कुयरीची भाजी, उडदाचा पापड तोंडी, पाहुणे यावे तुम्ही

गणपती, दसरा, शिमगा, पाडवा, सणवाराला गावी ओढीने येतो
मुंबई वरून आला म्हणजे शेजाऱ्यांसह प्रत्येकाला भेट देतो
दहिकाल्याला गजवंदना, वक्रतुंड तो गणराया नाचून जातो
मध्यंतराला परबांचा चिवडा, गोलभजी, बाम गणपती खातो

कुळाचार, ब्राह्मण भोजन, गवळदेव, राखणदार आठवणीने करतो
मित्र, शेजारी, सगेसोयरे भेटी गाठी गजालींचा फड रंगत भरतो
सुट्टीचे दिवस संपता, आईचा कंठ भरतो, अबोल दादा मी गहिवरतो
परततांना, कोकम, काजूगर, आंब्याची साटे, फणसाचा बोजा नतो

गाठता मुंबई, रिक्षा मज आणून सोडीते मन रेंगाळत मागे उरते
शरीराने मुंबईत परी मनाला ध्यास, स्वप्नी कोकण भिरभिरते
श्वासात गंध मोहराचा, अजूनही कोकीळ आंब्यावर तसेच गाते
मनी वादळ उठते आणि मी गावास निघण्यापूर्वी वर्दी पोचते

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

2 thoughts on “माझे कोकण वाहते जीवन

  1. राजेंद्र भोसले
    राजेंद्र भोसले says:

    शब्दरूपी…..छान कोकण दर्शन झाले ????????????????

  2. free email

    My cousin told me about this website, but I’m not sure if he made this message because no one else understands my issues as well as he does. Thank you; you are very fantastic.

Comments are closed.