माता न ती वैरीणी भाग 1
दोन भावंडांच्या पाठीवर तिसऱ्या पोराचा घरीच जन्म झाला. मुलाचा जन्म झाला तेव्हा मुलाचा बाप सुरेश कामावर होता. या आधीच्या मुलांच्यावेळीही तो नव्हता. त्याला बोलवून आणले तेव्हा तो तर्रर् होता. त्यामुळे तिसऱ्या मुलाचा जन्म झाला तेव्हा त्याला बोलवायला कोणी गेलच नाही. किती मुलं व्हावी? तिच्या हातात नव्हते. त्यांच्या दोघांत गर्भनिरोधक वगेरे भानगड नव्हती. त्याला वाटलं की तो जवळ घ्यायचा. आपल काम संपलं की कुस परतून झोपी जायचा.
तसही शृंगार वगेरे शब्द गरिबाला कुठे माहीत असतो? घरात तर अठराविश्व दारिद्र्य तरीही तो जन्मला. ठाणे जिल्ह्यातील आगरी समाज तेव्हा तसा फारसा पुढारलेला नव्हता त्यामुळे त्याचा जन्म घरीच सुईण बाईच्या मदतीने झाला. ती ओली बाळंतीण होती तेव्हा दोन तिन दिवस तिच्या भावजयने तिला आणि मुलांना जेवण दिले. बाळाला मालीश केले. धुरी दाखवली पण तिला आपली काम टाकून रोज येणं शक्य नव्हते. सुईण काही दिवस बाळाला आंघोळ घालून धुरी द्यायला यायची. सुईणीला महिनाभर बोलवणे तिला परवडणारे नव्हते.
बाळ जन्मताच कृश आणि किरकीऱ्या होता, किती पाऊंडाचा? वगेरे मोजण्याची पध्दत नव्हती. चारपाच दिवसांनी ती स्वतः कामाला लागली. काही दिवस मुलाला मंदाने खूप जपले पण फक्त त्याच्याच जवळ लक्ष देण्याऐवढा वेळ तिच्याकडे नव्हता. तिलाही दोन मुलांच्या पोटासाठी कामावर जावे लागे. तिचा नवरा संध्याकाळी दारू ढोसून टाईट अवस्थेत घरी यायचा. कधीमधी पैसेही द्यायचा किंवा ती खिशातून काढून घ्यायची. साहजिकच त्याच्या कमाईचा फारसा उपयोग नव्हता.
आठ वर्ष वयाच्या मोठ्या मुलांवर,संतोषवर ती उगाच डाफरायची, तिच्या आठ दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलाला खेळवत तिथेच बसायला सांगायची. संतोष त्या बाळाला घेऊ शकत नव्हता इतक ते लहान होत. ती त्याला पाजतांना घ्यायची तर तिच्या दोन हाताच्या तळव्यात तो पुरायचा. ते बाळ रडू लागलं की संतोष त्याला जत्रेतुन आणलेली पिपेरी नाहीतर पिटपिट वाजवून दाखवायचा. ते बाळ तो आवाज ऐकून थोडा वेळ शांत बसायचे आणि वाजवण बंद झाले की पुन्हा भोकांड पसारायचे. सारखं वाजवून संतोष कंटाळायचा. एक दिवस तो आईला म्हणाला, “आया, बाबूचे मी नी रेह्याचू, माना कंटाला येतयं, सारखा रडत रेतय, पिपेरी वाजवून माझा तोंड दुखाय लागला.”तो उठून जाऊ लागला तस तीने एक धपाटा घातला. “ऐ पोरा थांब, माना काम हाय, विहिरीवरशी पानी कोन तुझा बाप आनल का? भाकरी कोन करल? जुरूक थांब. नी थांबला त उपाशी रेह्या लागल.” दुसरा धपाटा पडू नये म्हणून तो गुपचूप थांबला.
पोराच रोज तेच रडगाणे. पाजलं की थोडा वेळ शांत रहायचा पण एकदा तोंड उघडलं की रडून हैराण व्हायचा. कदाचित तिच्या अंगावरच्या दुधाने त्याची भुक भागत नसावी, शेवटी तिने त्याला चमचाभर दारू पाजण्याचा निर्णय घेतला. दारु पाजली की तो गुंगीत झोपून जायचा. खारपाटील समाजात पोटात कृमी होऊ नये म्हणून लहान मुलांना चमचाभर दारू पाजण्याची पद्धत आहे. पण भुकेसाठी दारू म्हणजे भयानक होते. तिला सकस अन्न नव्हते की आराम नव्हता अंगावर दूध कुठून येणार? आईबाप अगोदरच उलथले होते. सासू सासरे तिच्याकडे सहसा येत नसत. या मुलाचा जन्म झाला कळले म्हणून सासू येऊन गेली. चार दिवस मदतीला राहिली असती तर मंदाला हाय से वाटले असते. भाऊ मदत किती करणार? त्याने मोठा मुलगा मला दे तुझा भार कमी होईल म्हटलं होतं. तिच मन मानत नव्हतं. नाही म्हणायला या अगोदरच्या मुलांचं बारसे झाले तेव्हा सासू ओटी घेऊन आली होती, पण मदतीसाठी फार दिवस थांबली नव्हती. त्यांचीही परिस्थिती, ‘उघड्याच्या घरी नागडा गेला.’ अशी ओढग्रस्तच होती.
समाजातील प्रथेप्रमाणे बाराव्या दिवशी पोराला पाळण्यात घातलं. घागऱ्या म्हणजे वाफवलेले चणे वाटून त्याचे बाराव्या दिवशी बारसे देखील झाले. नरेश नाव ठेवले. गावातील सोनाराने त्याचे कान टोचले तेव्हा त्याने भोकांड पसरून दिले. जमलेल्या बायकांना घागऱ्या आणि बत्तासे वाटून कार्यक्रम संपला. त्या नंतर दोन तीन दिवसांनी ती कामाला जाऊ लागली, नवरा दारूच्या भट्टीवर, दामू पाटील यांच्या शेतावर जात होता. तीन मुलांच भागवायचं तर तिला घरी राहून जमणार नव्हते.
आगरी, वारली समाजात मुलं झाल्याचे कौतुक फार दिवस टिकत नाही. स्वतःचे लाड करून घ्यायला वेळ नसतो. ती कामावर गेली की ती मुलं स्वतःच्या भावजयकडे ठेऊन जाई. त्याला ओटीवर एखादा फडका ठेऊन तिथे ठेवलं की इतर भावंड काळजी घेत. आधी तो आकांत करत असे पण दोन महिन्यानी हातात लाकडी चुखण दिलं की एकटा खेळत राही. तीन चार तासाने दुपारची सुट्टी झाली ती घराकडे धाव घेई. आल्याआल्या त्याला दूध देईपर्यंत तिचा पोलका पोराच्या मायेन दुधाने भिजू लागे. पाहता पाहता नरेश दहा महिन्याचा झाला आता त्याची भावंड, संतोष, विलास त्याला खेळवत होती. त्यामुळे ती निर्धास्तपणे कामावर जाऊ शकत होती. संतोष जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पिशवीमधुन पाटी घेऊन जायचा. विलास, मामाच्या ओटीवर नरेशला खेळवत बसायचा.तिची वहिनी त्या मुलांना आपल्या बरोबर असेल ते जेवायला घालायची. पण तिलाही त्या बाळाकडे सतत लक्ष देण्यासाठी वेळ नव्हता. खरं तर या पुर्वीची तिची दोन्ही मुल देखील तिच्या ओटीवरच वाढली होती. तिला त्यांच्याकडे लक्ष देण्याशिवाय पर्याय नव्हता.
मंदाचा नवरा संध्याकाळी घरी येतांना रोज नवटाक टाकून येत असे. घरी आला की त्याची बडबड सुरू व्हायची.कधी वेळेत जेवायला दिल नाही तर कधी मासळी आणली नाही म्हणून रोज भांडण करायचा. ती शक्य तो त्याला उत्तर देत नसे. कधी तरी तिची सहनशीलता संपून जाई. तो काही कारण काढून मारायला धावायचा आणि मुल जोराने रडारड करायची. तो दारूच्या नशेत असल्याने मुलांच्या रडण्याचा त्याच्यावर फारसा परिणाम व्हायचा नाही. एखाद्या वेळेस दोन मोठ्या मुलांपैकी हाती सापडेल त्या मुलाला तो धुवायचा. मुड असला तर बारक्या मुलाला खेळवायचा. त्यामुळे मुले घाबरून बापापासून दूर असायची. तिला कोणत्याही कारणाने दररोज एखादी तरी लाथ खावी लागे. त्याची दारू उतरत आली की पुन्हा तिच्याकडे दारूसाठी पैसे मागायचा, पैशांसाठी तिच्याशी झोंबाझोबी करायचा. जवळ असले तर ती पैसे द्यायची पण कधीतरी पैसे नसले तरी तिचा छळ था़बत नसे, मग मात्र तिचा नाईलाज व्हायचा. तीच त्याला चुलीजवळचं लाकूड घेऊन बडवून काढी मग तो दारूच्या नशेत, एका कोपऱ्यात कोकलत बसे.
तीचं जेवण तयार झालं की पोरांना वाढून काढत असे. मग त्याला जेवू घाली. पिलेल्या अवस्थेत तो अर्ध अन्न अंगावर सांडवून ठेवी तरी ती त्याला भरवायची. राग आला की वाटेल त्या घाणारड्या शिव्याही द्यायची. अस तिचं अनोखं प्रेम होतं. नरेशच्या पाठीवर तिला मुलगी झाली. ‘प्रभा’ नाव ठेवलं. खाणारी तोंड वाढली. खर्च वाढला. हळूहळू मुलं मोठी झाली. मोठा मुलगा संतोष पाचवीला इंग्रजी शाळेत जाऊ लागला खर्च आणखी वाढला.
आलेल्या मजुरीत भागेना, शेवटी तिने घरात हातभट्टी लावायचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणारे साहित्य तिने आपल्या मामीकडून मागून आणले. थोडी शिल्लक होती त्या पैशातून काळा गूळ, नवसागर, घेऊन आली, एका मडक्यात गूळ पाणी तयार करून नवसागर आणि जुन्या सेलीची भुकटी टाकून तिने ते मिश्रण एका मडक्यात ओतले. मडक्याचे तोंड घट्ट बांधून ते मडके शेजारच्या बामणांच्या गोठयात खड्डा करून मातीखाली गाडून ठेवले. हिशोब असा की शक्य तो तिथे कोणी कडमडायला जाचार नाही. चार दिवसांनी ते कुजल्याचा वास येऊ लागला. ती खुश झाली. त्या रात्री तिने नवरा आणि पोर झोपल्यावर भट्टी लावली. वरच्या भांड्यावर ओला फडका गुंडाळून ठेवला तासाभराने बाटलीत थेंब टपकू लागले त्या वासाने नवरा उठून चुलीकडे आला. तिच्या जवळ बसून गोड हसला.
“मंदा, या तुन बेस केला, आथा लोकांचे जाया नग, आपुन धंदा वाडवू, दे बघू ,पयल्या धारेची कशी लागतय?” तिने कौतुकाने त्याला थोडी दारू पेल्यात ओतून दिली. त्याने बोट बुडवून ती चारही दिशांना शिंपडली तेच बोट त्याने दिव्याकडे नेले तस दारूने पेट घेतला. तो खिदळत हसला. “जाम भारी झाल्याय, अगदी पेटती हाय.” “गं अस काय करतान? बोट जलल ना?” तो तिच्याकडे पहात हसला. तिच्या पदराने त्याने आग विझवली. बोट थोड भाजलं तस तोंड वेडंवाकड करत त्याने ती प्यायली. तो पुन्हा पेला पुढे करू लागला तस तीने त्याला दूर ढकलून दिले. तो एका बाजूला भेलकांडत पडला. “तुला प्याया का बनवली मीन? विकाची हाय, पाटलाचा गिऱ्हाईक आपले घरला पाठव. आपल्या पोरांची बुका न वह्या घेऊन द्याच्या हान.” तो उठून गेला आणि झोपून गेला. तिने दारू चुलीच्या रखेत लपवून ठेवली.
हळूहळू ती त्या कामात प्रवीण झाली. रोज घरी येतांना तिला दारूसाठी काळा गुळ उधारीवर आणावा लागे. दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवसाची थकीत रक्कम द्यायची आणि पुन्हा पुढील माल घ्यायची. कामावरही जायची आणि हातभट्टीची दारुही विकायची. ही गोष्ट लवकर सगळ्यांना कळली. वाईट गोष्टीची चर्चा झटपट होते. तिची गिऱ्हाईक वाढली. नवऱ्याला कळू नये म्हणून तिला रोज नवीन जागी दारू लपवावी लागे. तरीही नवरा दारू गुल करायचा किंवा दारू पिऊन त्यात पाणी ओतून ठेवायचा. तशी दारू असली की गिऱ्हाईक तिच्याशी वाद घालत.
ती भट्टी लावते,याची खबर पोलिसांना कशी लागली कोणास ठाऊक. एरवी मारामारीत एखादा पुर्ण जायबंदी किंवा मेल्यानंतर येणारे पोलिस हप्ता गोळा करायला वेळेत जायचे. एक दिवस दोन पोलीस आले आणि थेट घरात घुसले, चुलीवर तिचं काम सुरू होतं. बाटलीत पडणारी दारू त्याने बोटाने चाखून पाहिली. मग तिला दरडावत त्याने दारू गाळायच्या मडक्यावर लागोपाठ दोन दांडे मारले. तिने गयावया केली, “दादा, दांडा क्याला मारतान मडका फुटलं ना. माझी मेहनत फुकट जाल.” तरी तो तिच्याकडे पाहत हसला. “आम्ही आहोत की तुला मदत करायला पण आम्हाला न सांगता तू धंदा करतेस म्हणजे!” तिसरा तडाखा त्यांनी मडक्यावर मारला आणि ते उकळते मिश्रण चुलीत सांडले तशी आग भडकली.ते मडके एवढ्या पटकन फुटेल अशी त्याची अपेक्षा नसावी. मडके फुटले तस ती चिडली आणि तिने रागाने आपला पोलका फाडला. पोलका कोरमच होता म्हणून लगेचच फाटला. ती तिरमीरत त्याला म्हणाली. “ए आयघाल्या माझा मडका क्याला फोडला?तुला पैसच पायजेल होतं त मीन दिले असते, माह्या नुकसान क्याला केला?” “ऐ बाई काय करतेस?” अस म्हणत असतानाच तिने एका पोलीसाला मिठी मारली. ती जोर जोराने ओरडू लागली.
“आया या या,अक्करमाशानी माझ्या पोलक्यान हात घातला. माझी अब्रू लुटली. आया या या, यो बारबोडा माना बिछान्यावर नेईत होता. जलला मेल्यांचा लक्षन, माना एकटी बघून अब्रू लुटली. धावा, धावा. पोरानो मामाला बोलवून आना.”
तिची पकड जबरदस्त होती. पोलीस घाबरला तिचे हात सोडवून तो घरा बाहेर पडायचा प्रयत्न करत होता. ती सोडायला तयार नव्हती. त्याने शंभर रूपये काढून तिच्या हातावर ठेवले. “चुप बस, शिनाल कुठची, बोंबलणं बंद कर, हे घे पैसे, तुझ सामान आण, नाटकं बंद,जास्त नाटकं केली तर खरचं उभ्या उभ्या चोदीन. दर हप्त्यात पन्नास द्यायचे, नाही दिलेस तर तुला आणि नवऱ्याला आत टाकीन,याद राख, ओरडून तमाशा करू नको.” तिचा राग अनावर झाला होता, शंभरच्या नोटीवर तिचं लक्षच नव्हतं. दुसऱ्या पोलीसाने दात ओठ खात तिला दूर ढकलली.
एव्हाना घराबाहेर आठ दहा माणसे जमली. “मंदा,बाय काय झाला, घरान कोन शिरला? ओरडतं क्याला?” न सुरेश कय हाय? पोरा बायचे हान का?” बाहेर लोक जमा होत होते. गवगवा ऐकून पोलीस गडबडीत बाहेर पडले. कल्ला झाला. कोणी तरी म्हणालं, “यो पाय बाहेर आला यानुस मंदाच्या काष्ट्यान हात घातला, आथा सुरेश तिला नांदवायचा नी.” कोणीतरी म्हणाल, “कानफाटा यांना परन पाड्यान यायाची नी.”
पोलीस जमावाकडे पाहतच घराबाहेर पडले, ते लोकांना दरडावून म्हणाले, “काय रे इथे काय तमाशा आहे का? कोण बोललं कानफाटा म्हणून? अंगाला हात लावून बघा. ही बाई दारू गाळते अशी खबर मिळाली होती. त्याची शहानिशा करायला आलो होतो, तर चोरी पकडली म्हणून बाई बोंबलत होती. जा आपआपल्या घरी.” पोलीस उगाचच जमीनीवर दांडा आपटत निघून गेले.
मंदा घरातून डोकावली पण तिने कोणाला काही स्पष्टीकरण दिल नाही. तिचा नवरा लटपटत येत होता. दारासमोर लोकांची गर्दी बघून नरेशने लोकांकडे पहात ओरडत विचारल, “तुमी अय क्याला आल्यान? माझी बायको घरान हाय ना? का कय गेली? मंदा, मंदा, भाहेर ये, आदी भाहेर ये. यी अय क्याला जमल्यान?” ती घराबाहेर आली आणि नवऱ्याच्या हाताला धरून घरात नेता नेता म्हणाली, “डुकरावानी क्याला ओरडत रेलाय?, चल घरात,पिल्या शिवाय रेवं नी काय? “त्याने तिची मानगुट पकडली आणि कुडावर ढकलून देत म्हणाला,”तुझ्या आसला माना डुकर सांगत, तूच डुकरीण हाय. माझे घरानशी निंघून जा.” तिने त्याला धरुन लोटलं तस तो भेलकांडत जमनीवर पडला. मुलांनी बोंब मारली. तेवढ्यात तिचा भाऊ धावत आला आणि त्याने भावोजीला दूर नेत भांडण सोडवल.
दारू फुकट गेली आणि मडकही फुटलं आता पुन्हा सर्व जमवा जमवी करावी लागणार होती. चार दिवसांनी तिचा अड्डा पुन्हा जोमाने सुरू झाला. आता पहिल्यापेक्षा गिऱ्हाईक वाढले. पोलीस दर आठ पंधरा दिवसांनी हप्ता वसूल करायला येत. पन्नास रुपये आणि एक क्वार्टर घेऊन जात. तिचा धंदा जोरात आहे पाहून पोलिस म्हणाला, एवढे कमवतेस आणि आम्हाला फक्त पन्नास? साहेबांनी हप्ता दुप्पट करायला सांगितलाय.” तस म्हणाली, मानावं पोराबाळा हान जकले पैसे तुमाना देऊन मी काय खावं?” पोलीस आग्रही होता पण ती हप्ता वाढवून न देण्यावर ठाम होती शेवटी दोन क्वार्टरवर मांडवली झाली.
या धंद्यामुळे तिचे दिवस सुधारले, मुलांना जरा चांगलं चुंगलं मिळू लागल. जे गिऱ्हाईक प्यायला यायचे ते ‘चकणा’ आणायचे. कधी गाठया, पापडी, शेव,चणे तर कधी चक्क भजीची पुडी. कधीकधी तिलाच बोंबील भाजून द्यायला सांगायचे. ती त्याचे दहा पैसे घ्यायची. आलेलं गिऱ्हाईक प्यायला बसले की मुलं आजूबाजूला घुटमळायची मग हे त्यांच्या हातावर काहीतरी घालायचे. कधी जास्तीच झाली, तर पुडी तिथेच ठेऊन जायचे, पोरांची मजा व्हायची. मोठा मुलगा संतोष इतर भावंडवर डाफरायचा, “खरकटा क्याला खातान? घरान भाकरी नी मील का?” कधीतरी भावंडावर हात उचलायचा. मग मुलं भोकांड पसरायची.
मंदाही मुलांवर खेकसायची, “ऐ रांडेच्यानो, तय पडवीन बसा सांगला ना. अय नी येयाचा, पुना आला त कानफाडीत देन.” पोर पडवीत जाण्याचं नाटक करायची आणि पुन्हा यायची. दारू पिणारे येतांना मुद्दाम थोड जास्तच घेऊन यायचे तर काही दारूडे मुलांना शिव्या द्यायचे, “आसला हिकला तुमचे, रांडेच्याना फुकट खाया पायजे का? मायला तुमचे, बापसाला आनायं क्याला नी सांगत? देल की आनून.” ते ऐकल आणि मंदाच टाळक सटकलं, त्या दारुड्याचं बखोट धरून ती लात घालायची. “येशवंत रांडेच्या तू माना हिकतो, तुझ्या मायला, तुझ्या घरान रांड ठेवल्याय ना, तिच्यावर चड, माझा नाव घेशील त गांडीला कोलीत लावनं.” तो कोकलत निघून जायचा आणि चार आठ दिवसांनी पुन्हा यायचा. ती ही मागच सगळ विसरून जायची, शेवटी तिचा तो धंदा होता गिऱ्हाईक घालवून चालणार नव्हतं. रागावून चालणार नव्हतं.
क्रमशः
Nice story…very interesting…
Thanks for comment