माता न ती वैरीणी भाग 2

माता न ती वैरीणी भाग 2

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पाहता पाहता संतोष मोठा झाला. स्टेशनच्या शाळेत ४ थीला जाऊ लागला. त्याची आई दारू गाळते हे कोणीतरी इतर विद्यार्थ्यांना सांगितले. ते संतोषला नावाऐवजी ‘दारूवाला’ म्हणून हाक मारत. त्याला खूप राग यायचा. त्याने ती गोष्ट आईला येऊन सांगितली, “शालेनची सगली पोरा माना ‘दारूवाला’ हाक मारतान, तू यो धंदा बंद कर, नी त मी शालेन नी जायचू.” तिने त्याची समजूत काढली, “धंदा बंद केला तं तुमचे हाल होतील. तुमच्या पोटाला काय घालू? तुझा बाप घरान त काय देय नी.” पण तो ऐकायला तयार नव्हता. तिने त्याची कशीबशी समजूत काढली, “पोरा या पाय दारू कराय माना का मजा येत? ते रांडेचे पोलीस दर सुकरवरी पन्नास घेऊन जातन. दारू नी केली त उपाशी रेह्याची पाली येल. तुझे बापाला सांग मजुरीचे पैसे घरा द्याया. तो त घरान काय देत नी, तुमच्या पोटाला काय घालू?” संतोषकडे याच उत्तर नव्हतं.

संतोषच्या पाठीवर दोन वर्षांनी तिला मुलगी झाली. संतोषपेक्षा अंगाने बरी म्हणायची. आता गाठीला चार पैसे होते त्यामुळे ती पहिल्या सारखी कामाला जात नसे. मालकाकडून खूप अगोदर बाळंतपणात उचल घेतली होती. थोडी थोडी फेडत होती. मालकांनी फारच तगादा लावला तरच जाई. मुलांच्या शिक्षणावर दोघाचं लक्ष नव्हतं. शाळेत बाई घेतील तोच अभ्यास. घरी आले की दप्तर एका कोपऱ्यात फेकून दिलं की दुसऱ्या दिवसापर्यंत पहात नसत. संतोष शाळेतून घरी आला की अभ्यास करत असे पण त्याच अभ्यासात लक्ष लागत नव्हतं.तरी तो इतर मित्रांसोबत दहावी पर्यंत शाळेत जायचा.

त्याची भावंडही शाळेत जात होती. तो अभ्यास करायला बसला की ते तिघही त्याच्या समोर बसायचे. पाहणाऱ्याला वाटावं किती अभ्यासु आहेत पोरं. नरेश अभ्यासात हुशार होता पण अभ्यास करण्याऐवजी टिवल्याबावल्या करायचा. रोज शाळेतील मुलांची खोडी काढायचा. रस्त्यावर विटी दांडू, डबल एक्स्प्रेस, गोट्या खेळायचा. संतोष त्याला मारायला गेला की मंदा मधे पडायची. प्रभा त्यांच्या बरोबर बसून पाटीवर उगाचच रेघोट्या ओढत बसायची. नरेश जिल्हा परिषद शाळेत तिसऱ्या इयत्तेत होता. संतोषने अक्षर काढून दिली तरी गिरवायला कंटाळा करायचा. मास्तरनी उगाचच पुढच्या वर्गात ढकललं होतं.

या चार पोरांचं करून मंदा दमुन जायची. सुरेशला मुलांच्या शिक्षणाशी देणंघेणं काही नव्हतं. पगार घेतला की तो पोरांसाठी गाठ्या, गुलगुले घेऊन यायचा. देवीची जत्रा लागली की पोरांना आकाशपाळण्यात बसवून आणायचा, बर्फाचा गोळा नाहितर म्हातारीचा कापूस घेऊन द्यायचा. कधीतरी सोमवारच्या बाजारातून पोराना कपडे आणायचा. पण मंदाकडे त्याने घर खर्चासाठी कधी पैसे दिले नाहीत आणि तिने मागितले नाहीत.

संतोष नववी पर्यंत रखडत रखडत पूढे गेला, मागच्या वर्षी ssc ला नापास झाला आणि कोणीतरी त्याला बामनाकडे गवताच्या गसड्या वळायच्या कामावर लावला. दर आठवड्याचा पगार रविवारी रोखीने मिळायचा. सोमवार बाजाराचा दिवस त्या दिवशी तो घरी सामान सुमान भरू लागला. दिसायला उंचपूरा आणि काटक होता.आई दारू बनवते, बाप दारू पिऊन फिस असतो हे त्याला आवडत नव्हते. शेवटी एक दिवस तो आईला म्हणाला, “तू यो धंदा बंद कर, मी कामाशी जाताव ना? दर आठवड्यात पोलीस घरान येऊन काय करतान ताव माना माहित हाय, तू त्यांच्या समोर क्याला नागडी बसतं?” तिचं डोक तापलं तिने त्याच्यावर हात उचलला तस तो संतापला, “लोखा काय काय बोलतान मी काय माझे मनाचा सांगतू काय? माना लाज वाटतय.”

ते ऐकून तिलाही पटलं. पोलीस हप्ता घ्यायला आले की तिच्याशी लगट करायचा प्रयत्न करायचे, ती त्यांना स्पर्श करू देत नसली तरी त्यांचा लाळघोटेपणा तिला धंद्यापाई सहन करावा लागत होता. तिने ठरवलं, बस उद्यापासून धंदा बंद. दोन आठवड्यांनी हप्ता घ्यायला पोलिस आले.तिने धंदा बंद केल्याचे सांगितले. त्यांना ते खर वाटे ना.”ऐ मंदा लय शाणी बनू नको,गुपचूप पन्नास देऊन टाक. तुला आमचा इंगा दाखवला की सगळ ओकून टाकशील.” ती संतापली तिने लोक त्यांच्यावरून तिच्याविषयी काय काय बोलतात ते ऐकवले तरी ते ऐकेनात, त्यांनी उगाचच दंडूका घरात इकडेतिकडे खुपसायला सुरवात केली तशी ती चवताळली. “हवालदार सायेब आदी माह्या घराभाहेर पडा. लय खपवून घेतल.आतापर्यंत तुमाना काय कमी केलं. आता मी दारू गाळणं सोडलं. आता नाय घेणार. माझं नुकसान केलं त हातात कापून देईन.” तिच डोकच ठिकाणावर नव्हते, तिन खरोखरच कोयता हाती घेतला ते पाहून त्यांनी घराबाहेर धुम ठोकली.

आठ दिवसांनी तिच्या घरावर पोलिसांनी पुन्हा रेड टाकली. सगळ सामान उस्तरून टाकल. घराचा कोपरान कोपरा तपासला पण तिथे काहीच मिळाले नाही. पुन्हा पुन्हा शोधुन पोलीस हैराण झाले, कुठे लपवलस सांग? म्हणून तगादा लावला पण ती शांत राहिली. शेवटी पथक निघून गेल. पण सुडाने पेटलेल्या पोलीसांनी त्याच रात्री तिचा नवरा सुरेश ज्यांच्या अड्ड्यावर दारू गाळायच काम करायचा तिथे धाड टाकली. सुरेश त्यावेळी कामावरच होता. त्यांनी माल ओतून नासधूस केलीच पण त्याच्या पोटरीवर फटके मारून त्याचे पाय निकामी केले.

सुरेश वेळेवर घरी परतला नाही पाहून मंदा शोधायला गेली तर पाटील सुरेशला बैलगाडीतून तिच्या घरी येत होते. तिच्या लक्षात आले की नक्कीच काही तरी वेडवाकड झालं असाव. त्याला गाडीतून उतरता येत नव्हतं. संतोषनी बापाला उचलून घरात नेले. पाहतो तर दोन्ही पाय रक्ताने माखले होते त्यावर पट्टी बांधली होती. मंदाने पायाची जखम धुवून त्यावर हळद बांधली. सुरेश रात्रभर वेदनेने कण्हत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदा पाटलांच्या घरी जाऊन भांडली. पाटलांनी काही उपाय न करता त्याला घरी आणून सोडल्याबद्दल खूप बडबडली. रडत रडत म्हणाली,” दादा पोलीस यानला मारत होते तवा तुमी सोडवाय का नाय गेले. अक्करमाश्यानी त्यांचे पाय मोडलेन. तू त्याला डॉक्टरकडे घेऊन चल. तुझे काम करीत होता. आथा तू खर्च नाय करशीन तं कोण करलं?”. पाटील डाफरले. “पोलीस कसा वागतान तुला कलाय नको, तुझ्या नवऱ्याला मी नी मारेल, तु जास्त शाणपण केला त्याचा नतिजा हाय. मी असतू त पोलीसाला माराय देतू का? आथा झाला त्या झाला, तू नेस त्याला डॉक्टरचे. माझाव नुसकान झाला. आख्खा पिंप रांडेच्यायी ओतून टाकला. वरून पैसे घेऊन गेले. हे पाचशे देतावं ते घे परत येव नको.तसा तुझा नवा दारुडाच हाय, काम कय जमतयं? दादा ,दादा करून पाया पडीत रेय म्हणून कामाला ठेवलात.”

ती पाटलाच्या नावाने बोट मोडत बाहेर पडली,काही इलाज नव्हता. पाटलांच्या विरोधात बोलायची तशी कोणातच हिंमत नव्हती. तिने घरी येऊन नवऱ्याला खूप शिव्या घातल्या. तिचा भाऊ प्रदिप पाटलाला भेटला. त्याने बहिणीची परिस्थिती सांगीतली तेव्हा कुरकुरत पाटलांनी थोडे पैसे दिले. डॉक्टरकडे नेऊन उपचार केले. दर पंधरा दिवसांनी डॉक्टरची फेरी होत होतु पण हाड नीट जुळलच नाही आणि तो पायातून कायमचा मोडला तो मोडलाच. तो कुल्यावर घसटत घरात फिरायचा. लहान मुलासारख त्याच सगळ तिला कराव लागे. तिच्या भावाने त्याच्यासाठी कुबड्या आणून दिल्या तेव्हाकुठे तो कसाबसा कुबड्या घेऊन फिरू लागला.

त्या प्रसंगानंतर ती नवऱ्याविषयी खूप भावुक झाली. आपल्या धंद्यामुळे तो अपंग झाला ही टोचणी तिला लागून राहिली. तरुण वयातच तो शरीराने कायमचा अपंग झाला. दारू गाळणे सोडल्यानंतर ती गावातील बामणांच्या घरी धुण भांड करू लागली. तिथून उरलं सुरलं जेवण आणायची. सणावाराला जास्त थकली की येतांना कधीतरी ती स्वतः दारू पिऊन यायची. नवऱ्याला दारू घेऊन यायची. मुल मोठी होत होती, त्यांच्यावर कोणतेच संस्कार नव्हते. तिच्या व्यसनामुळे मुलांवर परिणाम होत होता.

घरात कोणीच शिकलेलं नसल्याने मुलांच्या शिक्षणाची बोंबच होती. त्यातला त्यात संतोष नियमित कामावर जायचा. त्याने अर्धवट शिक्षण सोडलं होत, पण भावंडांनी शिकावं अस त्याला वाटत होतं. संतोष भावंडावर नेहमी डाफरत असे, “मी नी शिकलू म्हणून शेटकडे गासडीच्या मशिनवर गांड घासताव. तुमाना शिकाय काय झाला? नी कलला तं रजू मावशीचे जाया काय झाला. तीची फी मी भरन. उसाट पोरांमध्ये रेहून आयुष्य जाल का?” विलास त्याला प्रतिउत्तर करी, “आमाना एवडा शाणपण शिकिवतो, तं तु क्याला नी शिकला?तु रजू मावशीचे क्या नी गेला?”

संतोष त्याच्या अंगावर धावून जात असे,कधीतरी त्याचे केस ओढून खाली पाडून त्याला ठोसे लगावत असे. “अक्करमाश्या मी कामावर जाताव म्हणून खाया मिलतय नी तं उपाशी रेहेला असता. आयाला विचार घर कोणावर चाललाय?” चार आठ दिवसांनी भांडण ठरलेले होते.

मंदा त्यांची झोंबाझोबी सोडवताना मेटाकुटीला येई. “अर पोरांनो भांडतान क्याला? संतोष त्याना शालेन जायाचा नसल त भिक मांगू दे तू क्याला पाठी लागलाय?” “आठ तास कामवर गेला की कलल, शेट लोक कसा राबवून घेतान त्या. या रांडेच्याना फुकट खाया मिलतय म्हणून हुशारी करतन.” संतोष म्हणाला. मंदा चिडली, “तू क्याला त्यांना शीव्या देतय,निस्ता सांगून होय नी काय?” “ए आया, तु नुसती त्यांची बाजू घेव नको हां. शालेन नी जायाचा त कामावर पाठव, अय दंडाच्या चिचेखाली गोट्या खेलत बसतान, भुक लागली की घरान आली की तू नुसती वयरतं. बाबा एक तसा न यी अशी. मी एखलास यानला क्याला पोसू?”

संतोष घरात लक्ष देत होता ,भावंड शाळेतही जात नाहीत आणि काही कामात मदतही करत नाहीत पाहून त्याच डोकं तापायच. बाप अधु होऊन घरात पडला होता. त्याने भावंडांना शिक्षणासाठी मदत केली पण कोणीही एसएससी पार केली नाही. संतोषने मामाकडे खूप कटकट केली तेव्हा विलासला मामाने ओळख काढून विरारला स्टीलच्या कारखान्यात चिकटवला. नरेश बोयसरला एमएसईबीत हेल्पर म्हणून लागला. मंदाची आर्थिक स्थिती आता सुधारली.प्रभा गावातच ज्यु. कॉलेजमध्ये आर्ट शिकत होती. आता कुठे तिला सतरा लागलं होतं. ती प्रकृतीने उफाड्याची होती. दिसायला सुंदर होती. तीला तेंबोड्याच्या भोईर कुटुंबाने मागणी घातली. मंदा म्हणाली आदी मोठ्या पोराच लगीन होऊ दे घरी सुन आली की हीच लग्न करू. पण तिकडची मंडळी थांबयला तयार नव्हती. शेवटी विलासने मालकाकडे उचल मागीतली आणि प्रभाच लग्न घरच्या मांडवात झाले. मंदाने दारूचा धंदा चालायचा तेव्हा थोड सोन जमवलं होत ते तिच्या कामी आलं.

संतोषने गावतली किणींची पोरगी शर्मीला पटवली होती. त्यांची दोन तीन वर्षे मैत्री होती.ती टेलरिंग शिकली होती, गावातले कपडे ती शिवायची. मामाने मध्यस्थी करून त्याचे लग्न आणि विलासच लग्न एकाच वर्षी लावलं. लग्न होताच विलास दुसरीकडे रहायला गेला. आता सर्व जबाबदारी विलासवर आली. सगळं व्यवस्थित होत होत पण नरेश हल्ली संध्याकाळी दारू पिऊन यायचा. आला की लवकर जेवण केल नाही म्हणून विलासच्या बायकोवर रागावायचा आणि मग विलास आणि नरेश यांच्यात शाब्दिक खडाजंगी आणि नंतर हाणामारी व्हायची. मंदा या त्रासाला कंटाळली. अगोदर ती कधीतरी दारू प्यायची. मुलांच्या सततच्या भांडणामुळे ती त्रासली, यामुळे ती दारूच्या अति आहारी गेली. घरात आता दोन दारूडे झाले. कोणत्याही विषयावरून त्यांच भांडण सुरू होई. तासाभराने दोघ एकमेकांशी गप्पा मारत बसतं. या मुळे नरेशच टाळक अजून फिरलं. कोणीतरी म्हणालं त्याच लग्न करून दे तर तो शांत होईल.

लालठाण्याची भोईरांची मुलगी पाहून त्याच लग्न केलं. त्यांची परिस्थिती थोडी बरी होती. त्यांची दुपिकी शेती जमीन होती. ते आपल्या मुलींसाठी घरी पिकेल ते पाठवत. वर्षभराने त्याला मुलगी झाली त्या नंतर त्याच्या वागण्यात फरक पडला. त्याने चक्क दारू सोडली. आता तो कामावरून वेळेवर घरी यायचा, बायकोजवळ पैसे द्यायचा. काही वर्ष तो खूप चांगला वागला. या दरम्यान त्याला आणखी दोन मुलं झाली. संतोष आणि विलास यांचे संसारही बहरले.मुल आईची काळजी घ्यायचे पण एक दिवस नरेश चिंबोऱ्या पकडायला गेला आणि तिथे त्याला गिऱ्या दिसला त्या दिवसापासून त्याच्या वागण्यात पुन्हा बदल झाला. समोर दिसेल त्याला तो घाणारड्या शिव्या द्यायचा तर कधी आईला मारायला धावून जायचा. वाटेने जाणाऱ्या कुत्र्यांना बेदम मारायचा. एकदा त्याला कुत्रा चावला. पोटात सात इंजेक्शन्स घ्यावी लागली.

भावाला भुतबाधा झाली असावी समजून संतोषने नंदाड्यातुन भगत बोलवून आणला उतारा केला. उलट्या पिसाची कोंबडी, कोहळा, कोळसा, काळे तीळ, वांगी,लाल फडक्यात बांधून ओवाळणी टाकली. नरेशच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. मंदाला कळेना देव तिला कोणत्या कर्माची शिक्षा देत होता. दर दोन दिवसांनी त्याच्या अंगात वारं येई आणि मग अतिशय घाणारडी भाषा तो बोले. त्याला बरे वाटावे म्हणून तिने कुर्लाई, जिवदानी, शितलादेवी, वज्रेश्वरी, महालक्ष्मी येथे जाऊन ओट्या भरल्या पण त्याच्या वागण्यात सुधारणा होण्याऐवजी त्याचे वागणे बिघडत गेले. भावंडांनी खूप समजूत घातली पण उपयोग झाला नाही. प्रत्येक जण त्याची तक्रार घेऊन यायचे. या वागण्याने नोकरी सुटली. काम जोखमीचे होत आणि इलेक्ट्रीक खांबावर अपघात होण्याची शक्यता होती.

या वागण्याला कंटाळून त्याची बायको आपल्या मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. आता तर तो र्निबंध झाला. रस्त्यावर कुत्रा दिसला तर त्याला मार, मांजर दिसली तर तिला ठेचून काढ. त्याच्या या उपद्व्यापाना भाऊ कंटाळले. त्यांनी डॉ. मोहिते यांचा दाखला घेऊन ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले. दर आठवड्यात ते त्याला घरून काहीतरी पदार्थ घेऊन जायचे.तिथे गेल्यानंतर त्याच वागण हळूहळू सुधारल. एक दिवस भाऊ त्याला भेटायला गेले तेव्हा तो तिथं नव्हता. डॉक्टर म्हणाले,तो आता पूर्ण चांगला झाला होता म्हणून आमच्या नियमानुसार त्याला गेल्या आठवड्यात सोडले. त्याचा मित्र त्याला घेऊन गेला.

आश्चर्य म्हणजे तो घरी न येता तडक सासरी गेला. त्याची पत्नी सासरी जायला तयार नव्हती पण चांगले वागण्याची हमी सासरच्या मंडळींना देऊन तो तिला घेऊन आला.चांगल वागू लागला. कामावर जाऊ लागला. मंदाला मुलगा पुन्हा माणसात आला पाहून बरे वाटले. पण दुर्दैव हा आनंद फार काळ टिकला नाही एका अमवास्येला त्यांनी मर्यादा ओलांडली. कपडे काढून घरात फिरू लागला.बायकोने समजवण्याचा प्रयत्न केला तर बायकोच्या पाठीवर चावा घेतला. त्याला समजावायचा प्रयत्न केला तर सर्वांना अतिशय गलिच्छ शिव्या देऊ लागला.रात्री उठून धिंगाणा घालू लागला. कुटुंबाची वाताहत झाली. त्याचा साला त्याच्या बायकोला तडकाफडकी घेउन गेला.

हे पाहून शेजारी म्हणू लागले नरेश पूर्ण वेडा झाला आहे. त्याला घरान बांधून ठेवा. सुटा ठेवला तर तो कुणाचा तरी जीव घेईल. त्याच वेड वाढतच होत. त्याला पाहून मंदाचा जीव घाबरा घुबरा होई. परिस्थिती हाताबाहेर जात होती. गावची जत्रा चार दिवसावर होती मंदाने आपल्या मोठ्या मुलाला संतोषला बोलवून घेतले. ती अजिजीने त्याला म्हणाली, “संतोष तु वायला रेत म्हणून तुला कल नी, माना पोराचे हाल बघवत नी, काय तरी कर,लोखा येऊन येऊन त्याची तक्रार करतान. तो एखला घरान बसला की मोठे डोले करून माना बगीत रेतो. तुमी घरान नसला तं मानाव मारल. विलास त सकालीस कामावर जातय, त्याची बायको फाटी आनाय जंगलात जातय, याला सकालीस दारूला पैस मी कनशी देव? माना एकटीला भिती वाटतय. दारू पिली का निंघल तय जातयं, उद्या कय रस्त्यान मेला त कलायचाव नी. त्याचे हाल संपतीन त बरे.”

आईची भाषा ऐकून संतोष चक्रावून गेला,”तू माना एखल्याला काय कराय सांगतस? माना कल नी, विलासला सांगून पाय, त्याचाव मत घे.” मंदा अतिशय आतल्या आवाजात म्हणाली,” तो पोर त नरेशला बघून घेय नी, त्याच्या बायकोवर यान कितीतरी वेला हात टाकलात. तो तरी काय करल.” आईचा इशारा त्याला कळला, ती हे मनापासून सांगत नव्हती, पण परिस्थिती खरोखरच हाताबाहेर चालली होती. तरीही संतोष हादरला,चक्क आईच पोटच्या मुलाला वाटेला लावण्याचं, मारून टाकण्याच सुचवत होती.

संतोषने मनाशी ठरवले लकरच देवीची जत्रा येत होती. जत्रेला गावात भरपूर वर्दळ असते. घडलेल्या गोष्टीची चर्चा होऊ नये म्हणून गाव देवीच्या जत्रे दिवशी भावाचा मार्ग मोकळा करायचे त्याने ठरवले. जत्रेचा दिवस उजाडला. त्याच्या मनात वादळ उठले. आपल काही वाईट केलेल नसता आपणच नरेशला मारायच त्याला पटेना. पण आईचा असहाय्य चेहरा डोळ्यासमोर आला. तिने तरी किती भोगाव? बाप जाग्यावर पडलेला. ठरलं त्याने मनाशी निश्चय केला. तो घरी गेला. विलासची बायको सकाळीच देवीची ओटी भरायला देवळात गेली होती. बाप एका कोपऱ्यात खोकत बसून होता. नजरेनेच त्याने आईला खुणावले.तीने जवळ बोलवून त्याचे हात हाती घेतले. “पोरा सांभाळ हो, माना जाम भिती वाटतय पन मी तरी काय करु?जा ज्या होल त्या होल.” तिचा निश्चय ठाम होता.

त्याने नरेशशी “जत्रेला येतय ना, चल दर्शन करू मंग तु घरा ये.” म्हणत घरा बाहेर काढले. संतोष भलत्याच वाटेला निघाला तस नरेश म्हणाला, “अया कय चालला?” संतोष म्हणाला, “माना जुरूक काम हाय त्या आटपून जाव.” गप्पा मारत संतोषने त्याला शेरीत निवांत जागी नेले. गप्पांच्या ओघात नरेशला भरपूर गावठी पाजली. दारु प्यायला मिळाली म्हणून तो खुश होता. “तुस माझा खरा भाऊ हाय नी त कोनाला माजी कदरच नी.” संतोषने दारूची बाटली त्याच्या पायाजवळ टाकली. देवीची पालखी निघत असल्याचा आवाज येत होता. फटाके फुटत होते. वाजंत्री वाजवत होते. त्या कोलाहलात संतोषने नरेशच्या गळ्याभोवती त्याच्याच जवळचा टॉवेल झटक्यात आवळला. नरेशने स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला. संतोषची पक्कड जबरदस्त होती. थोडावेळ त्याने हातपाय झाडले आणि मग मान टाकली. संतोषने तिकडची जागा पुर्ववत केली. एखाद्या सफाईदार क्रुर खुन्याप्रमाणे त्याने पाच मिनिटात काम उरकले. नरेशच्या हातत टॉवेलचे टोक देत मूठ घट्ट केली. मग तो न थांबता त्याला तिथेच टाकून तो शांतपणे देवीच्या पालखीत सामील झाला.

मंदिराकडुन पालखी निघाली होती. मित्रांशी गप्पा मारता मारता त्याने पालखीला खांदा दिला. इतर मित्रांशी बोलला. देवीच्या मंदिरात कार्यकर्ते पालखी सोबत चालत होते त्यांच्याशी बोलला आणि उशिरा घरी आला. तोवर नरेशला झाडाखाली पडलेला त्याच्या मित्राने पहिला. त्याने जवळ जाऊन पाहिले. आधी त्याला वाटले दारू पिऊन पडला असावा पण त्याने हात लावताच त्याची मान पडली. मग तो ओरडतच पाड्यात आला. त्यांनी ते मंदाला येऊन सांगितले. काय प्रतिक्रिया द्यावी ते तिला कळत नव्हते. पोटच्या पोराला संपवण्याची जबाबदारी तिने थोरल्या मुलावर सोपवली होती. मुलगा हे जग सोडून निघून जाताच तिच्यातील आई जागी झाली. ती छाती पिटत आक्रोश करत होती. “मीच त्या पोराला मारला, माना शिक्षा करा. माना फाशी द्या.” पण कोणी तिच्याकडे पहात नव्हते. तिच्या डोक्यावर परिणाम झाला. दुःख झाल्याने ती रडते असाच सर्वांचा समज झाला. संतोष तिच्या कानाशी येऊन कुजबुजला, “आथा चुप रे, नी त खराच पोलीस घेऊन जातीन. झाला काय तं तुला माहीत हाय उगास बोंब मारू नको.” ती थोडी शांत झाली.तिला पुन्हा पुन्हा कढ येई आणि ती रडू लागे.

थोड्या वेळात गावातील नातेवाईक जमले , नरेशच वागणं आणि त्याचा लहरीपणा सर्वांना ठाऊक होता. गावातील पोलीस पाटील समजूतदार होता. तो म्हणाला याची उगाच वाच्यता झाली तर पोस्टमार्टेम होईल. अजून हाल होतील. त्यांनी मंदाकडे पहात विचारले, “पोरी, तुझा काय मत? पाय पोरी एकदा यी केस पोलिसांच्या ताब्यान गेली त चिरफाड करतीन बॉडी मिलाय उशीर होल. पैसेव खातीन. तुझा काय म्हणना हाय ? ती मोठ्याने आक्रोश करत म्हणाली, “दादा, त्याचे पेक्षा देवान माना नेला असता त बरा होता.आथा परत का येव्या हाय माझा पोरगा. अजून बिचाऱ्याचे हाल माना नी बघवणार तुम्ही नेया.” “त्याची बायको कय हाय,तीचीव संमत्ती लागलं. उद्यांना आमचे अंगलट येल.” त्याच्या बायकोला घेऊन तिचा भाऊ आला.बायको त्याच्या प्रेतावर पडून रडत होती. तिने काय गमावल हे समजणे फारच अवघड होते, कारण नरेशकडून तीन मुलांव्यतिरीक्त तिला कोणतेच सुख मिळाले नव्हते. तस ती रडत रडत म्हणाली, “काय सुख दिला यान? त्यालाच विचारा,पदरान तीन पोरा टाकून मेला, कशी सांभाळू?माझ्या जीवाची वाट लावली, किती वेला मिनी सांगितला पेव नको,ऐकत नव्हता.”

पोलीस पाटील तिला म्हणाला,”पोरी,तुझा कोनावर संशय हाय का?” “त्याला कोण क्याला मारलं? जाम पिय तो,डोखास फिरेल होता. काय तरी करी.मी क्याला कोणाचा नाव घेव. थोडा का त्रास माना दिला?” तिची जबानी पोलीस पाटलांनी लिहून घेतली, अंगठा घेतला. न जाणो उद्या काही विपरीत झालं तर तो गोत्यात आला असता.

विलास स्टेशनवर गेला आणि त्यांनी ओळखीच्या डॉक्टरकडून मृत्यूचा दाखला घेऊन आला. एकीकडे जत्रेत पिपाण्या वाजत होत्या. आकाश पाण्याचा फिरण्याचा आवाज येत होता आणि दुसरीकडे त्याच्या मैताचे आटोमबॉम्ब फुटत होते. वातावरण सुन्न झाले होते.जो तो म्हणत होता, “तो सुटला, न पाडा सुटला. कमी का तरास दिला, हैराण करून टाकेल होता.”

फार गवगवा होण्यापूर्वी प्रेत मसनवटीत नेले. पोरांनी लाकडाची आणि टायरची व्यवस्था केली होती. कोणीतरी रॉकेलचा कॅन आणला होता. बापाला कसेबसे धरून आणले होते. दुसरा कॅन अर्थात हातभट्टीचा होता. संतोषनेच अग्नी दिला. थोड्याच वेळात ज्वाळा भडकल्या, कोणीतरी प्रेतावर मीठ मारत होते. लोक कुजबूजत होते, “याच्या आसला, याला मराय जातरचा दिवस मिलला का?यानं सगला मुड खराब करून टाकला.” त्याच्या मृत्यूचे दुःख कुणाला नव्हते तर जत्रा झाल्या नंतर तो गेला असता तर लोकांची अडचण झाली नसती. हळूहळू लोक एका कोपऱ्यात जाऊन एक एक घोट मारून वाटेला लागले.

संतोष एका बाजूला जाऊन मोठ्याने टाहो फोडून रडत होता. त्याला विलास समजावत होता, क्याला रडतय? आपन कमी का केला, ऐकतच नव्हता त काय करशील? रेहु दे सगली लोखा निंघाली चल. पण संतोष तरी रडायच थांबत नव्हता त्याच कारण फक्त त्यालाच माहिती होत. त्याला जन्म देणाऱ्या आईचा असाही एक अवतार त्याने पाहिला. तिचा नाईलाज होता. रोज येणाऱ्या तक्रारी आणि मग नरेशला होणारी मारझोड पाहून त्याच्या विषयी तिच्या मनात कणव निर्माण झाली होती.त्याची एकदाच सुटका व्हावी म्हणून तिने तो निर्णय डोक्यावर पथ्थर ठेवून घेतला होता. सुरेश मात्र मनात म्हणत होता ‘माता न ही वैरीणी.’

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “माता न ती वैरीणी भाग 2

  1. Gluco Relief

    Thanks I have recently been looking for info about this subject for a while and yours is the greatest I have discovered so far However what in regards to the bottom line Are you certain in regards to the supply

Comments are closed.