माती
ती विहिरीच्या खोदकामावर करत होती नेमाने काम
विहिरीला लागावं पाणी यासाठी तिच्या सर्वांगाला घाम
मुकादम खुणेनेच माती वर ओढण्याचा करत होता इशारा
इंजिन धूर ओकत भसाभसा, भरले भांडे आणी धरेच्या दारा
तिचा नवरा विहिरीच्या आत खोलवर खणत होता माती
ती यारी ओढत होती सारा जीव एकवटत, घट्टे तिच्या हाती
टिकावाचा प्रत्येक घाव सोसत उसासत होती लाल माती
पाझर दिसावा म्हणून मालक पेटवत होता डोळ्यांच्या पणती
हुरूम घ्यावी म्हणून सर्व कामगार वर येऊन क्षणभर विसावले
अन दहाच मिनीटात घडले नवल जमिनीत धोंड्याला पाझर फुटले
पहाता पहाता धावले पाणी, भिजली माती, पसरे क्षणात तळभर
निसर्गाचे दान मिळता डोळे आनंदाने भरती अन हसू चेहऱ्यावर
तीनेच पाहिला पाण्याचा पाझर अआणि नवऱ्याला कौतुकाने दाखवले
तो शहाणा म्हणाला मालक गंगादर्शन घ्या, मी पाचशे ठेवले
तिच्या चेहऱ्यावर होते हसू अन शरीर मात्र बरेच थकलेले
पाणी लागल्याचा आनंद मनात पण तिला पाहून अंतर्मन हेलावले
मी बोलावून त्याबद्दल विचारले चेहऱ्यावर हासू आणि डोळ्यात पाणी
साहेब ती पहिल्यांदा गरोदर आहे तिचं बाळ हीच तर आमची जिंदगानी
वाढता गर्भ पोटी बाळगत ती उन्हा तान्हात राब राबत होती
पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट बाळालाही धडे देत होती
ते पाहून क्षणभरच वाटले वाईट पण शेवटी ती होती मजूर
पैसे कमावण्यासाठी कष्ट करावेच लागतात तिला होते मंजूर
मी माणूस म्हणायच्या लायकीचा नव्हतो, म्हणालो नाही “नको करू काम”
सावलीत बसून त्यांना सूचना देताना ना पडला हृदयास पीळ, ना म्हणालो थांब
थकली की ती क्षणभर विसावत होती,
जणू बाळाला समजावत होती
सोन्या नको रे तुझी घाई,
कामाचे दिस हाईत, बसणं मला परवडणारे नाही
आभाळ वरती पेटलं होतं अन तिच बाळ ओटीपोटात करत होता दंगा
तिचा नवरा अन सहकारी फोडत होते दगड धोंडे त्यांच्या हातास सहस्त्र भेगा
पहारीच्या अनेक प्रहारांनी दणकट काळेतर एकदाचा फुटला
ओलावली आधी माती मग मोठा झरा बाहेर पडत खळाळून हसला
ती आनंदाने झाली वेडी म्हणाली सायबा मला देता का याच पाणी!
बघा मजूर जमात, कष्ट करतांना, दुसऱ्यांच्या सुखात तेच समाधानी
यांनी बांधले रस्ते, रेल्वे, यांनी बांधले विमानतळ तुमच्या सुखासाठी
यांच्या नशिबी मात्र नियमित कष्ट, घण, टिकाव, घमेलं अन पहार हाती
यांनी उभारले इमले बंगले, यांनी वसवले वस्त्या, शहर की सिटी
यांच जगणं, मरण कष्टाचं यांच्या जीवनाची अखेर फक्त माती
कस्ट करणाऱ्यांच्या जीवनाचा पाझर
कष्टाची कविता फार आवडली सर.
कष्ट करणाऱ्या मजुरांची व्यथा त्यांच्या भावना या कवितेत खूपच छान मांडलेल्या आहेत.
धन्यवाद सुरेश, भोसले सर आणि तेंडोलकर.
आपल्याअभिप्रायाबद्दल आभारी आहे.