marga-maza-mangeshkocharekar

मार्ग माझा

आमच्या वेळी मिनी केजी, सिनियर केजी, पूर्व प्राथमिक असे काही प्रकार नव्हते त्यामुळे आई आणि आम्ही मुले हे घट्ट समीकरण वय वर्ष सहा पर्यंत पुरले. त्या वेळी दुधाची बाटली हा प्रकार नसावा, बहुतांश आया गृहिणी होत्या म्हणून आईचं आणि माझ्या पिढीतील लहान मुलांचं नातं हा खून का रीश्ता होता, म्हणजे बरेच वर्ष तिच्या दुधावर असायचो. त्या काळात आईचा अख्खा पदर हाच आमचा जम्बो रुमाल, टॉवेल आणि चादर सुद्धा. तोच आमचा पंखा. बाबांबद्दल दहशत नसली तरी त्यांच्याकडे प्रेम करून घ्यायला आणि हट्ट करायला जायचं नाही हे समीकरण ठरलेल होतं. आज बाबाची भिती राहिली नाही

आज लहान मुलांवर अभ्यास आणि संस्कार यांच्या नावाखाली जो जुलूम होतो तो तेव्हा नव्हता. आता काय तर म्हणे तीन साडेतीन वर्षं वयाच्या बालकांना टेबल मँनर्स शिकवतात. त्या मानाने आम्ही ‘मॅनरलेस पिढी’. पण आई आम्हाला, रामरक्षा, हनुमान स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष इत्यादी शिकवत होती. म्हणून घेत होती. झोपतांना बिरबल,गुलबकावली, अलिबाबा चाळीस चोर, चांदोबा, आशा गोष्टी सांगायची. तिच्या मांडीवर गोष्टी ऐकता ऐकता झोपी जायचो. त्यामुळे बालपण आम्ही पूर्ण अनुभवलं. तिने हातात दगडी पाटी देऊन मुळाक्षरे कधी घोटून घेतली ते कळलं देखील नाही. पर्वचा, उजळणी यांचही तेच. बोट मोडून बेरीज वजाबाकी शिकवत होती, हाच्चा देणे, घेणे हे अगदी सहजी दाखवत होती. नेहमी म्हणे, आम्ही काही शिकलो नाही म्हणूनच तुम्ही शिकलं पाहिजे.

सरपण आणण्यासाठी जंगलात आम्ही तिच्या बरोबर जायचो, तिने लाकड तोडली की आम्ही गोळा करायचो, मोळी कशी करायची? आटवायची कशी? बांधायची कशी? तिनेच की शिकवलं. डोक्यावर तो पंचवीस तीस किलोचा भार घेऊन तीन चार किलोमीटर अंतर चालण सोप्प नव्हतं. पण आत्मविश्वास म्हणजे काय? त्या आत्मविश्वासाच्या जोरावर करायला तिनेच तर शिकवल. भिती ही काम टाळण्यासाठी माणसांनी काढलेली पळवाट आहे अस ती म्हणे. त्यामूळे दोन पाच किलोमीटर चालणे यात श्रम आहेत कुठे? तिचं म्हणणं. शाळेच्या इयत्ता सुरू होताच, रोज घरी आल्यावर, घरी करायच्या अभ्यासाबाबत नियमित चौकशी व्हायची आणि तो अभ्यास पुर्ण झाल्याशिवाय तरणोपाय नव्हता, बोट दुखू दे, हात दुखू दे, नाही म्हणजे नाही. अभ्यास पूर्ण झाला की मात्र घामाघूम होऊन परते पर्यंत खेळण्यासाठी मनाई नव्हती.





तिची पावकी निमकी, सव्वाईकी सर्व तोंडपाठ. सगळे हिशेब अगदी बोटावर अशी ती. पंचाग पहायची, नक्षत्र त्यानुसार रास कोणती सर्व पंचागी हिशोब चोख. मला पूर्ण समजयेण्या अगोदरच ती सोडून गेली. पण जाण्यापूर्वी जीवनात कष्टांना न डगमगता कशी वाटचाल करावी ते सांगून गेली. आईच्या अकाली जाण्याने जीवनात पोकळी निर्माण झाली तरी जगणे का कुणाला चुकले? सावरत सावरत चालत राहिलो. संध्याकाळी पर्वचा आणि उजळणी चुकली नाही.

१९७५ साली मी नववी इयत्तेत असतांना माझ्या दादाने एका पारसी बाबाकडची हरक्यूलस सेकंडहँड सायकल आणली. त्यांच्याकडे पडून होती पण फुकटचे नको म्हणून दादांनी पंचवीस रूपये मोजले. ती सायकल येण्यापूर्वी पन्नास पैसे तासावर महीन्यात एखाद्या दिवस सायकल आणून त्यावर शिकलो होतो. अशी भाड्याने सायकल आणतांना ताईकडे टूमणे लावावे लागे. नेहमीच्या मापाची म्हणजे कमी उंचीची सायकल मिळत नसे मग दोन दांड्यातून पाय घालून सायकल चालवत असे. ज्यांची स्वतःची सायकल असे त्यांना फार मसका मारावा लागे आणि ते अगदी क्वचित सायकल चालवू देत.

व्रात्यपणा हा ठसठशीत गुण माझ्यातही भरला होता. एकदा मी सायकल च्या पाठच्या व्हिलच्या एक्सलवर उभा रहात असतांना त्याच्या गीअरमध्ये अंगठा अडकून कापला गेला. अंगठ्याचा खालील भाग कापला गेला होता. डॉक्टर बाळकृष्ण पाटील यांनी ड्रेसिंग केलं. दोनतीन आठवडे पाय जमीनीवर लावायला मिळत नव्हता इतकी गंभीर जखम होती. ते तीन आठवडे मुगाचं वरणखाऊन काढले पण सायकलचा नाद काही गेला नाही.
कोणीही सायकल चालवण्यास दिली आणि अगदी दोन राउंड मारायला मिळाले तरी त्या वेळी होणारा आनंद शब्दात व्यक्त करण शक्य नाही. सायकल पुढच्या चाकावर चालवणे, मागच्या चाकावर चालवता चालवता उभी करणे, कॅरीअरवर बसून सायकल चालवणे. सायकल वेगाने पळवून सीटवर उभे राहण्याचा प्रयत्न करणे असले प्रयोग करत असू. भीती शब्द माहीत नव्हता.



affiliate link

सेकंडहँड सायकल चर्निरोड येथून आणल्यावर तिच तेलपाणी करून मी वापरु लागलो.आणि जणू टोयोटा गाडी घरी असल्याचा रूबाब मला आला. ती सायकल १९७५ ते १९९० पर्यंत माझ्याकडे होती. अतिशय दणकट व वजनदार होती. एकदा रस्त्याचा चढ चढतांना ती पडली आणि तिचा मधला दांडा हातावर आपटून हात फ्राँक्चर झाला. एक दीड महीना हात प्लास्टरमध्ये होता. हा धडा मिळूनही मी सुधारलो नाही. महीना दिड महिना जाताच पुन्हा ये रे माझ्या मागल्या. दोन्ही हात सोडून सायकल चालवण्याची भरपूर प्राक्टीस केली. तेव्हा फुट कंट्रोलने मी सायकल पळवत असे आणि एखाद्या घोड्यावर स्वार झाल्याचा आनंद मिळत असे. वळणदार रस्त्यावरही हँडल न धरता चालवत असल्याचा आनंद अवर्णनीय होता. आपल्याकडे कुणी पाहताय हे पाहून फालतू अभिमान वाटायचा.

Henry Charles यांची Boys song, Going Down the hill by cycle ही कविता आम्हाला नारायणन मूर्ती यांनी शिकवली होती. सायकलने रस्ता चढून डोंगरावर गेल्यावर, सायकलने वरून खाली येतांना होणाऱ्या आनंदाची अनुभूती त्यात होती. ती कविता मी तांदूळवाडी डोंगर रस्त्यावर अनेकदा जगलो. सायकल वळणा वळणाच्या वाटेने वर दामटतांना दमछाक व्हायची. पायाच्या पोटऱ्या दूखू लागत पण वरून खाली येताना आणि तो वळणा वळणाचा रस्ता उतरतांना I Flew like a Flea and it’s just glee असं वाटायचं. जणू पंख लावून मी हवेतून खाली यायचो. आहाहा! ‘My lungs laugh with Joy’, म्हणजे काय ते तेव्हा कळलं. आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे, नभात भरला दिशांना उरला अशी ती स्थिती होती.

त्या सायकलवर मी खूप फिरलो, गावात असतांना आम्ही १० ते १२ किलोमीटर अंतर कापून एडवण, कोरा या गावी समुद्र किनारी जायचो. सोबत चार आण्याचे चणे असायचे. समुद्राच्या लाटा पहात बराच वेळ निघून जायचा मग आम्ही सायकल पुन्हा घरी पळवयाचो. १९८०-८२ साली मी मुंबईत आलो आणि सायकल माझ्या सोबत आणली. मी भांडूप नरदास नगर येथे रहात होतो. चक्क भांडुप टेंभीपाडा ते विक्रोळी आणि विक्रोळी ते विद्याविहार सोम्मया असा दोन्ही बाजूने चार वर्षे प्रवास मी याच सायकलने केला. अनेकदा छोटे मोठे अपघातही झाले पण “न रूके है, न रूकेंगे हम, हर एक मुश्किल को सुलझायेगें हम। , अस म्हणत सायकल आणि मी चालत राहिलो.

कोणा कोणाचे पाहून सायकलचे ऑइलिंग आणि पंक्चर काढण जमू लागलं. पाण्याच्या टपात ट्युब बुडवून पंक्चर शोधायला निरिक्षण करून शिकलो. जिथे पंक्चर असेल तिथे पुन्हा पंक्चर होऊ नये म्हणून तिथे टायरचा तुकडा आधारासाठी टाकयचो त्याला गँडर अस म्हणत. ट्यूबमध्ये हवा भरायला २० पैसे लागत म्हणून पंप खरेदी केला. कोणी हवा भरायला नेला तरी परत आणून देई पर्यंत धागधूग असे. न जाणो त्याचा लेदर वायझर गेला तर दोन रूपये लागत. ऐपत नव्हतीच म्हणून अगदी गरज तेव्हा दुरूस्ती बाहेर करून घेत होतो.



affiliate link

१९९० ला ती सायकल एस.टी च्या टपावरून गावी पोचली आणि तिथेही तिने सेवा दिली. या सायकलने सफाळे ते भांडूप आणि भांडूप ते मालवण व्हाया डोंबिवली असा प्रवास केला. तिच्यावर लादून कोकम घुल, भात, आंबे अस बाजारात घेऊन जायचो. गावी काटेकुटे भरपूर म्हणून जपाव लागे. कधी कधी सायकल कपळावर घेऊन जाव लागे. सायकलने खुप सेवा दिली. त्या सायकलने खुप प्रवास केला. नंतर एका गरजूला ती सायकल १९९५ ला फुकट दिली. आता कोणत्याही कंपनीची सायकल आठ दहा वर्षे आली तर नशीब समजायच.त्यानंतर हिरो कंपनीची सायकल घेतली. मध्यम वर्गीय कुटुंबाचे सायकल हेच वाहन होते. सायकलवर डबलसीट प्रवास करणे म्हणजे गंमत अर्थात तुम्ही डबलसीट घेत असाल तर चढणीवर जोर लावताना ताकदीचा अंदाज येत असे. एकदा चढण चढून सायकल उताराला लागली की घामाने भिजलेल्या अंगाला वारा गारेगार करून टाकत असे.

२००६ साली दादरच्या पानेरी दुकान इमारतमधील एका सदगृहस्थाने त्याची जुनी वेस्पा मला बावीस शे रुपयांना दिली. वर्ष दीड वर्ष पडून होती. कार्बोरेटर प्लग साफ केला, थोडं तेलपाणी केलं आणि दादर ते डोंबिवली व्हाया ऐरोली असा प्रवास करत डोंबिवलीत आलो. वाटेतच हेल्मेट घेतलं. आजवर तेच हेल्मेट वापरलं. गाडी अतिशय दणकट, अर्थात गिअर असणारी टू व्हीलर. ती मी पहिल्या दिवशी शिकलो आणि त्या नंतर वर्ष दोन वर्षांनी ड्रायव्हिंग लायसन्स काढलं. ती गाडी तामिळनाडू येथे रजिस्ट्रेशन केलेली होती, तेथून ती डोंबिवली व्हाया दादर अशी आली होती अर्थात मी सेकंड ओनर त्यामुळे कधीतरी वाटेत बंद पडली की किक मारून घामाघूम व्हायला व्हायचं पण हळू हळू कार्बोरेटर काढून साफ करण्यात तसेच इंजिन ट्यून करण्याची कला अवगत झाली. सायकल पॅडल मारून दामटावी लागे ते श्रम कमी झाले . मुलांसाठी सेकंड का असेना स्कुटरवर प्रवास करायला मिळतो हा आनंद मोठाच होता. तिला दर रविवारी स्वच्छ स्नान घालून सफरीवर निघत असे. कधी इंजीन ऑइल बदल कधी ब्रेक वायर बदल अशी छोटी काम निघत पण तिचे टायर बद्दलल्याचे मला आठवत नाही.किंवा प्रत्येक वस्तूचे पूर्ण मूल्य वसूल झाल्याशिवाय टाकायची नाही म्हणून मी टायर बदलले नाही.

तिने जीवनास गती दिली तरी सायकलने जो आनंद दिला त्याची तुलना कोणाशी होणार नाही. गाडीचं इंजिन 150 CC होतं. कितीही दामटवली तरी तापत नसे पण कधी रुसेल ते सांगण् मुश्किल. तिने अनेकदा माझ्या सोशिकतेची परीक्षा घेतली. पण त्याच हेवी गियर स्कुटरवर माझी दोन्ही मुलं शिकली. आमचं सैतानी शिकवणं, जमत नाही हा शब्दच अमान्य खर तर ते योग्य नव्हतं पण ती मेहनत घेऊन दोन चार दिवसात शिकली तरी त्यांनी लायसेन्स मात्र उशिराने आणि स्वतः काढलं. ती स्कूटर वजनाला जास्तच हेवी होती त्यामुळे मधल्या स्टॅन्डवर लावणे मुलांना जिकरीचे वाटे. जूनी असल्याने तिच अँव्हरेज कमी झाल. आणि ती वारंवार काम देऊ लागली म्हणून ती टू व्हिलर मी भंगारात देऊन टाकली तेव्हा तिचे दिड हजार मिळाले. अर्थात भंगारात देतांना वाईटच वाटले. या प्रत्येक टप्प्यावर मला सायकलची आठवण होत होती.

२०१० ला मी Activa घेतली आणि किक मारण्याचा त्रासापासून सुटका झाली. प्रवास जास्त सोप्पा झाला. या सहा वर्षांत पेट्रोलची किंमत दुप्पट झाली. पण अँक्टिव्हा चालवण्यास सोप्पी, गिअर ची भानगड नव्हती त्यामुळे मुलांचे काम इझी झाले. या आधी एक रुपया खर्च केला की हवा भरून पंधरा दिवस सायकल वापरता येत असे, पण स्कुटर आली आणि पेट्रोल, इंजिन ऑइल असे खर्च वाढत गेले. पेट्रोल किंमत वाढत गेली पण एकदा शरीराला आरामाची सवय लागली ती कशी जाईल किंवा कमी होईल? थोडक्यात अनवाणी पायी प्रवास ते सायकल प्रवास आणि सायकल ते टू व्हिलर आणि अगदी अलीकडे फोर व्हीलर अर्थात ती ही सेकंड हँड.

या सर्व स्थिंत्यातरात एक लक्षात आले की मागे वळून पाहताना कधी दुःख झाले नाही, तर गेले ते दिन सुखाचे अशीच भावना होत गेली. जो अनुभव अन्यथा पैसे देऊनही मिळाला नसता तो अनुभव परिस्थितीने नकळत शिकवला. काटकसर करून जगणे, असेल त्यात समाधान मानून पूढची वाटचाल करणे आणि चांगले दिवस आले तरी अहंगंड न बाळगणे ह्या गोष्टी शिकायला मिळाल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे Self help is best help.
तुम्ही स्वतः प्रयत्न करून शिकता त्याने जे शिकाल ते पक्क होत जात आणि त्याचा आनंद अवर्णनीय असतो. त्या अनुभवाच्या शिदोरीवर जगण जास्त सुकर होत. कोणत्याही अडचणीचा उगाच बाऊ वाटत नाही हीच अनुभवाची कमाई.

जसे आपण वरच्या श्रेणीचा,वरच्या रहाणीमानाचा विचार करतो तस तसे त्याची जबाबदारी आणि त्यासाठी द्यावा लागणारी वेळ व मोबदला वाढत जातो. आता हेच पहाना, जेव्हा सायकल होती,त्याचा मेंटेनन्स नगण्य होता. त्याची रनींग कॉस्ट कमी होती, सहज शक्य होती.त्याच्या सुरक्षेची काळजी कमी होती, कधी बाहेर गावी जायचे म्हटले तरी घरात सुरक्षित ठेवणे शक्य होते. स्कूटर आली तशा ह्या सर्वच गोष्टी थोड्या खर्चिक आणि किचकट बनल्या. सुरक्षेच्या कारणास्तव स्कूटर घरात ठेवणे आणि ते ही शहरात शक्य आहे का? मग जेव्हा तुम्ही काही दिवसासाठी बाहेर जाता तेव्हा तुमच्या मनात त्या स्कूटर विषयी चिंता असते की नाही,कोणी पेट्रोल काढून तर नेणार नाही ना? किंवा सीट कव्हर फाडून तर टाकणार नाही ना? किंवा ब्रेक वायर खराब करणार नाही ना?

अगदी फोर व्हीलर च्या बाबतीत घरी नसतांना हीच भावना असेल. पैसे देऊन काय खरेदी केल, आराम की सुख? कदाचित तुमच्या वाहनाला कुणी काहीही करणार नाही तरीही मनात हे विचार येतात की नाही? याची सफाई मनाला स्वतः द्या, विचारा त्याला बाबा हे खरं की खोटं. तेव्हा पैसे मोजून तुम्ही नेहमीच सुख खरेदी करता या भ्रमात राहू नका तर पैसे खर्च करून तुम्ही ऐपत सिद्ध करता पण म्हणून सुख खरेदी करू शकत नाही हे लक्षात घ्या.





कोणतंही उदाहरण घ्या, तुम्ही स्वतःचे पैसे खर्च करून दागिने खरेदी केले लग्नात घातले. प्रामाणिकपणे कबुल करा, स्वतःला विचारा तुमचं लक्ष लग्न विधिकडे असतं की हातातल्या किंवा गळ्यातील दागिन्यांकडे? तुम्ही ते दागीने कडी कुलपात तिजोरीत ठेऊन काही दिवसांसाठी फिरायला गेलात तरी मनात अचानक विचार घरी ठेवलेले दागदागिने किंवा रोकड यांचा येईल. जरा मौज करू अशा उद्देशाने तुम्ही गेलात तरी मनात ज्या क्षणी विचार येईल चिंता वाटून तुम्ही सफरीचा आनंद घेऊ शकणार नाही. तुम्ही भरजरी पैठणी खरेदी केली आणि तुम्ही जेवायला बसला लक्ष जेवण्याकडे असते की शालू सांभाळण्याकडे? बाटाची डिझायनर चपल घेतली आणि देवदर्शनाला गेलात तुमचं लक्ष कुठे आहे देवाकडे की बाहेर काढून ठेवलेल्या चपलाकडे?अशी कितीतरी उदाहरणे देता येतील की आपला मुळ हेतू साध्य होत नाही.

हे सर्व सांगण्यामागे, लिहीण्यामागे एकच उद्देश की पैसे खर्च करुन सुविधा मिळवता येते अवघड गोष्ट सोप्पी होते पण सुख किंवा समाधान मिळवता येते असा दावा करता येईलच याची मुळीच खात्री नाही. मग सुख समाधान कुठे आहे? तर सुख, समाधन हे मानण्यावर आहे. समाधान हे तुम्हाला येणाऱ्या अनुभवावर आहे. तुम्ही कोणालाही त्याच्या गरजेच्या वेळी उपयोगी पडता तेव्हा तो आभार मानतो. समाधान व्यक्त करतो.आपण त्यांच्या उपयोगी पडू शकलो ही भावना मनात तरळताच जो आनंद होतो तो मोठा, त्याची किंमत करता येणार नाही.मिळणाऱ्या आनंदाने काम करण्यासाठी, नवीन उत्साह,जोश निर्माण होतो. आनंद ही प्रेरणा आहे. नवनिर्मिती करण्यासाठी चेतना आहे. स्व कष्टाने मिळवलेले यश जास्त समाधान देऊन जाते. तेव्हा आनंदी रहाण्याचा मार्ग ज्याचा त्याने शोधावा. एखाद्या गाण्याची तानही आनंद देऊन जाते. कोकीळ गातांना तिने लावलेल्या पंचमावर उत्स्फूर्तपणे दाद द्यावी वाटते. रेल्वे गाडीत कोण्या कानड्याने विचित्र ढंगात म्हटलेलं केशवा माधवा हसवून जाते. तेव्हा आनंदाचे ठाई आनंदी आनंद म्हणावस वाटते.

आनंद मानण्यावर आहे. देण्यात जे सुख आहे ते घेण्यात नाही. त्यागात जे आहे ते उपभोगात नाही. कष्ट करून समाधानाने जगण्यात आहे ते कुणाला फसवून किंवा लाचार होऊन जगण्यात नाही. लहान मुलांच्या बरोबर खेळण्यात, त्यांच्याशी गप्पा मारण्यात, त्यांना समजून घेण्यात आणि समजावण्यात आहे ते एकट कुढत बसण्यात नक्कीच नाही. मोठेपणाची झूल पांघरली की एकट पडायला होत. दुःख लपवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मोठयाने रडा, व्यक्त व्हा. मित्रांच्या गप्पात सामील व्हा त्यांच्या विनोदाला दाद द्या दिलखुलास हसण्याचा प्रयत्न करा. क्षणात मनावरील ताण कमी होईल.

शेवटी आयुष्य किती जगलो ह्यापेक्षा कसं जगलो हे जास्त महत्वाचे. अनुभवासारखा गुरू नाही. माणसं ओळखायला तोच शिकवतो. तेव्हा आपल्याला आलेलं कटू अनुभव ही शिदोरी समजा आणि असा अनुभव किमान आपल्याकडून अन्य कोणास येऊ नये याची काळजी घ्या.जीवन म्हणजे सुखदुःख याची भरली ओंजळ आहे.ती फक्त सुखाची किंवा दुःखाची असती तर जीवन निरस झाले असते, समुद्राच्या भरती ओहोटीमुळे तो सुंदर दिसतो,त्याची अथांगता कळते. माणसाच्या मनातही भावभावनांची भरती ओहोटी सुरू असते म्हणूनच आव्हान पेलत जगतांना आणि नवनवीन आव्हानांना सामोरं जाताना माणूस थांबत नाही. नदी वाहायची थांबली की तीच डबकं होत. तसच आयुष्याच आहे ते प्रवाही असेल तो पर्यंत आनंद आहे. जीवनाच्या या प्रवासात दुःखाचे, निराशेचे अनेक प्रसंग आले, मग आईचे खुप लवकर जाणे असो,भावाचा अपघाती मृत्यू असो की कार्यालयात येणारा ताण आणि येणारे अनुभव असो, असे प्रसंग हे तुमची परीक्षा पहात असतात, जर तुम्ही या प्रसंगांना समर्थपणे तोंड दिले तर तुमचा आत्मविश्वास दुणावतो. या प्रसंगातून मार्ग काढताना जे सोसल ते भविष्यात मार्ग काढण्यासाठी उपयोगी ठरलं.

अनेक आव्हान स्विकारली आणि त्यात यश मिळाल्यानंतर स्वप्न पुर्तीचा आनंद व्हावा तसे सुख अनुभवले. तेव्हा जीवन हा उन पावसाचा खेळ आहे.तो जिद्दीने आणि शांत मनाने अनुभवला तर स्वतःचे सिंहावलोकन करतांना मागे वळून पाहताना नक्कीच मन प्रसन्न होईल.किती प्रसंगाना आपण समर्थपणे तोंड देवू शकलो हे आठवून जो आनंद होतो त्याची अनुभूती अवर्णनीय असते.
प्रत्यकाने जीवन जगतांना आपल्या जीवनातील मुल्य जोपासली तर आपला प्रवास अडचणीतही सुखाचा झाला असे नक्कीच वाटेल.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “मार्ग माझा

  1. Harshada Mishra
    Harshada Mishra says:

    लेख आवडला सर!

Comments are closed.