मित्र ,सखा, सहचर, कोण हवे?

मित्र ,सखा, सहचर, कोण हवे?

मित्र, सखा, सहचर या शिर्षकाचा अर्थ खरतर मीच शोधत होतो. मित्र ते सखा आणि सखा ते सहचर हे टप्पे किंवा यातील अंतर कापणं तसं अवघडच.

मित्र कोणाला म्हणाल? मैत्री कधी होते? तर एखादी व्यक्ती तुमच्या सानिध्यात आली आणि त्याचे विचार, मतं मनाला पटू लागले, तो विश्वास ठेवण्यास पात्र वाटू लागला की आपले मन आपण ज्याच्याजवळ व्यक्त करावेसे वाटते. त्याने आपले म्हणणे ऐकून घेतल्यामुळे मनाला दिलासा मिळतो तो मित्र. किमान तो आपल्या विचारांवर किंवा मतावर आपले मत लगेचच व्यक्त करत नाही यामुळे मनाची जखम भरून येण्याला मदत होते. ज्याचा सहवास आपल्याला हवासा वाटतो तो मित्र. मित्र तोच जो आपल्या प्रगतीत अडथळा ठरत नाही तर मार्गदर्शक असतो. मित्र तो, जो आपल्याशी दुटप्पी वागत नाही, आपले गुपित कुणाला सांगत नाही किंवा त्याची जाहीर वाच्यता करत नाही. मित्र तो, जो आपला मुड ओळखतो, आपल्याला खुलवतो, दुःखातुन बाहेर काढतो. आपली ढाल बनतो.

मित्र कोणासारखा हवा? तर कर्णासारखा, एकदा मैत्री स्विकारली की त्या मैत्रीला जीवापाड जपू शकेल. प्रसंगी स्वतःच्या जीवावर बेतलं तर मित्राला संकटात टाकून जाणार नाही. दुर्योधनाने कर्णावर जे उपकार केले त्यामुळे कर्ण कायमस्वरूपी दुर्योधनाच्या आज्ञेत राहिला. वेळ आली तेव्हा कर्णाने आपली मैत्री सच्ची असल्याचे प्रमाणही दिले. सुदामा आणि श्रीकृष्ण यांची मैत्री पहा, सुदामा निर्धन असला तरी स्वतःजवळ आहे ते भक्तिभावाने देण्याची त्याची आस कृष्णाला दिसली.

आज तुम्ही सधन असलात तर शेकडो मित्र मिळतील पण निर्धन असलात तर कुणी ढुंकूनही पाहणार नाही. तुम्ही सधन आहात, खात्यापित्या घरचे आहात का? तुमच्याकडे स्वतःची गाडी आहे का? तुमचे पँकेज काय आहे? तुमच्याकडे asset काय आहे? हे पाहुनच मुली मैत्री करतात. जी तुमच्या मनावर नाही तर मनीवर प्रेम करते असली मैत्री काय कामाची? मित्र सधन नसला तरी चालेल तर सह्रयी, संयमी आणि संकटकाळात पहाडाच्या ताकदीचा हवा. त्याचा चेहरा पाहिला तरी आश्वस्त वाटायला हवा. म्हणून कुणीतरी म्हटलं आहे,

“दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा
एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र असावा एक मनासारखा”
असा मित्र मिळाला तर तुमचे सौभाग्यच.

सखा ही जरा पुढची पायरी ज्याच्यावर आपण विसंबून असतो, आपल्या सुखदुःखाची उजळणी ज्याच्याजवळ विनासंकोच करतो आणि जो संकटात आपल्या मदतीस धावून येतो. धीर देतो. आपले वागणे किंवा विचार चुकीचे असतील तर निर्भिडपणे आपले कान टोचतो. प्रसंगी वाईटपण स्विकारूनही आपल्या मताशी ठाम राहतो, मात्र आपल्याला एकटे पडू देत नाही. आपल्या कमकुवतपणाचा किंवा मानसिक अस्वस्थतेचा गैरफायदा घेत नाही आणि सावलीसारखा पाठीशी रहातो तो सखा. अनेक भक्ती गीतात, “माझ्याकडे पाहे माझा सखा पांडुरंग” हे पद ओघानेच येते. या ह्रदयीचे त्या ह्रदयी घालण्याची माया ज्याच्याकडे आहे तो विश्वंभर म्हणजे सखा. भुकेल्या पाडसाची तहान त्याची माता हरिणी भागवते, त्याचा भुकेला आवाज येताच प्रतिसाद देते तसाच सखा दयाळू अंतकरणाचा असतो. तो आई, ताई होतो तर प्रियकर अथवा प्रेयसी होतो कधी पांडुरंग होतो. प्रियकराची ओढ लागल्यावर प्रेयसी ज्या आंतरिक ओढीन त्याला साद घालते आणि तो तिच्याकडे खेचला जातो त्याच तत्वाने भक्ताच्या मनाची तळमळ त्या माऊलीस कळते.affiliate link

येथे भगवंताशी तद्रूपता अपेक्षित आहे. भले तुम्ही त्याचा हात सोडला तरी तो तुमची साथ सोडत नाही. तुमच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे तो तुमचा सखा.

सहचर म्हणजे आपले दुःख जो स्वतःचे मानतो, आपल्या सुखाने आनंदी होतो. आपल्या स्वास्थ्यासाठी स्वतः खस्ता खातो. आपण मोठे व्हावे यासाठी प्रसंगी स्वतः कमीपणा स्विकारतो. आपल्या आजारपणात किंवा संकटात खंबीर बनून आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. आपल्या संवेदना स्वतःच्या मानून मनाने एकत्व प्राप्त करतो. आपल्या दुःखाची सल ज्याला न सांगता जाणवते असा किंवा अशी व्यक्ती म्हणजे सहचर.

माझ्या पाहण्यात अशा दोन मैत्रिणी होत्या की एक आजरी असेल तर दुसरी रजा टाकून तिची काळजी घ्यायची. दोघी एकत्र जेवणाचा डबा एकत्र जेवायच्या. एकत्र निघायच्या. एकत्र खरेदी,फिरणे अस सगळं काही करायच्या. दुर्दैवाने की समजून उमजून त्या दोघी अविवाहित राहिल्या. दिवसभरात भेट झाली नाही तर त्यांची तगमग व्हायची. एक अतिशय धाडसी तर दुसरी सॊम्य प्रकृतीची. एखाद्या विषयांवर त्यांचं कधीच पटकन एकमत होत नसे, कधीकधी वादही झडायचे अगदी जाहीर, तरीही त्यांचं कायमच वितुष्ट कधी आलं नाही. यदाकदाचित त्यांच्यात भांडण झाले तरी कधी एकमेकिना भेटतो अशी तळमळ असायची. ही झाली मैत्री. समाजात मित्रमैत्रीणींची अशी अनेक उदाहरणे असतील ज्यांचा दिवस hello,Good morning,how are you? ने होतो आणि Good night dear, Have a sweet dream म्हणत ते किंवा त्या झोपी जातात.दिवसातून पाच दहा वेळा स्टेटस् बदलत किंवा व्हिडीओ कॉल करून एकमेकांची चौकशी करतात.

आपल्या बालपणी आई नावाची कवचकुंडले आपल्या सोबत असतात तिच मित्र,सखा, सहचर होते. काही दुखलं, खुपलं, मनाविरुद्ध झालं तर आपण धाव घेतो ती आईकडे. जोपर्यंत घराबाहेरील मित्र आपला ताबा घेत नाही तोपर्यंत आई सारखा भरोशाचा दुसरा मित्रच नसतो. आई नावाचा मित्र आपले हित आणि फक्त हितच पाहतो म्हणून जर दुर्गुणाचा संसंर्ग झालेल्या मित्राच्या सहवासात आपण गेलो तर आई आपल्याला या व्यक्तीपासुन दुर रहाण्याचा संकेत देते. दुर्दैवाने आज मिसरूड फुटण्याआधी आम्ही नको त्या मित्रांच्या जाळ्यात स्वतः चालत जातो. आईने कितीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी भरकटलेले विमान पुन्हा योग्य जागी येतच नाही. अकाली हाती आलेली मोबाईल सारखी साधने यांनाच आम्ही आमचा जवळचा मित्र मानू लागलो तर आई हतबल ठरते. दारूच्या इतकेच मोबाईल वापराचे व्यसन घातक ठरत आहे. मोबाईल चांगला मित्र होऊ शकणार नाही कारण तो तुमचा गुलाम आहे. संवेदना नावाची अमृतकुपी त्याच्याकडे नाही. तो तुम्हाला प्रलोभनाच्या मोहात पाडून तुमची विचारशक्ती क्षीण करतो. सांगा बघू या मोबाईलशी मैत्री योग्य ठरेल का?

साधारणतः मुलं सोळा सतरा वर्षांची झाली की आईपासून अलिप्त होतात आता हे वय अजूनही खाली आलं आहे. मित्रमैत्रीणींशी त्यांचा संवाद वाढतो. कुटुंबातील सदस्यांपेक्षा मित्रमैत्रिणी जवळच्या वाटू लागतात. वाढत्या वयानुसार त्यांच्या शरीरात बदल होत जातो. चाल बदलते, जास्त टापटीप रहावे वाटू लागते. घरी असल्यावर आरशात डोकावून स्वतःशी बोलू लागतात. मित्र बदलतात. स्वतः सारखे आचार आणि विचार असणाऱ्या मुलांशी मैत्री होते. ज्याविषयी बोलायला संकोच वाटत होता तेच विषय मित्रांच्या चर्चेत असतात आणि ते मनात उत्साह आणि आनंद निर्माण करतात. पोषाख, आवड, अभिरुची आणि भेटल्यानंतर संभाषणाचे विषय बदलत असतात.हळूहळू मनात प्रेमाची भावना निर्माण होऊ लागते. भिन्नलिंगी आकर्षण वाढते. एखाद्या मुलीवर वा मुलावर जीव जडतो. त्याची प्रत्येक गोष्ट आवडू लागते. त्या तिच्यासाठी मुले जीममध्ये जाऊन आपली फिगर सलमान सारखी बनवण्याचा प्रयत्न करतात. केसांची भांगही एखाद्या अभिनेत्याप्रमाणे ठेवण्याचा प्रयत्न करतात. मुलींच्या सानिध्यात रहाण्याचा प्रयत्न करतात. तरूणींना आपण आकर्षक दिसावं, मुलांनी आपल्या सौंदर्याला दाद द्यावी असे वाटू लागते. त्या करता लेटेस्ट फॅशनचे कपडे ट्राय करतात. लिपस्टिक, आय ब्रो, केस रचना, मेहेंदी याकडे आवर्जून लक्ष देतात. आपण बोल्ड आहोत दाखवण्याचा आटापिटा करतात.

मुलाला किंवा मुलीला मित्र मिळाले की मुलांच्या वर्तनात होणाऱ्या बदलाबाबत आईचे लक्ष असते. ती डोळस असेल तर मुलांना सावध करते,पण याच वयात तिच्या अपेक्षा दाबल्या गेल्या असतील तर मुलांच्या या वागण्याकडे ती सोईस्कर दुर्लक्ष करते. प्रसंगी उत्तेजन देते. त्यांचे हट्ट पुरवते. त्यासाठी ती स्वतः बाबांच्या नकळत पॉकेटमनी देते. बर्थडे सेलिब्रेशनसाठी मित्रांना घरी बोलावून स्वतः ओळख करून घेते. यातून ती आपल्या मुलाचे किंवा मुलीचे मित्र कोण?आणि कसे आहेत? ते पडताळण्याचा प्रयत्न करते. पण याचमुळे,” अरे! आईने चक्क बर्थडे पार्टी देऊ दिली.” असा विचार करत मुलामुलींचा उत्साह मग दुणावतो, एखाद्या कृतीविषयी बाबा बोलले तर बाबा खलनायक वाटू लागतात.

बाबांनी मुलांना खडसावले तर एकांतात ती त्यांनाच धारेवर धरते. “मुलं या गोष्टी आता नाही करणार तर कधी? संसाराची जबाबदारी पडल्यावर?” थोडक्यात आईचा या गोष्टींना पाठींबा असतो. मुलांना आपल्या मित्रांचे, मैत्रीणींचे फोन येऊ लागतात किंवा मुलं मोबाईल चॅटिंग करू लागतात. त्यांचे विषय तसेच नाजूक असल्याने शक्य तो आई बाबा यांच्यापासून दूर बसून किंवा रात्री ह्या गोष्टी चालतात. अगदी पांघरूण घेऊनही मोबाईल चॅटिंग सुरू असते. जर गोष्ट डोक्यावरून जात आहे हे आईच्या लक्षात आलं तर ती बोलते, सावध करते.

याच काळात मुलं जास्त चोखंदळ बनतात. खूप वेळ आंघोळसाठी घालवतात. आरश्यात पाहून केस पुन्हा पुन्हा विंचरतात, वेगवेगळ्या केश रचना करून पाहतात. कधीकधी मुलं एकदम आनंदी दिसतात तर कधी कधी स्वतःत हरवलेली दिसतात. त्यांचं लक्ष जेवणात किंवा घरातही नसतं. अर्थात अभ्यासातही नसतं. मुलांच्या वागण्यातील बदल आई नोटीस करते. त्याची समजूत घालते. त्याच्या लक्षाची जाणीव करून देते. मुल रिबॉक शूज, स्मार्टवाँचची मागणी करतात. ब्रँडेड कपडे आणि वस्तू मागतात.

एकत्र पिक्चरला जाणं, पिकनिकला जाणं, धम्माल करणं आवडू लागत. आपण स्मार्ट आहोत, डॅशिंग आहोत, ग्रेट आहोत दाखवणं मुलांना आवडत तर आपण क्युट आहोत, फॅशन सेन्स आपल्याला कळतो हे दाखवणं मुलींना आवडतं. यातूनच प्रेमाचे बंध निर्माण होतात,पण या वयात ते शारीरिक आकर्षण आहे? की त्यात भावनिक बंध आहे? ते समजण्याची क्षमता नसते.

वयात आलेली मुलं, मुलींनी आपल्याला भाव द्यावा यासाठी, आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत दाखवण्याचा प्रयत्न करतात. वर्गात शिक्षकांना प्रश्न विचारणे, शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची तात्काळ उत्तरे देणे, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडाकलाप्रकारात सहभागी घेणे या माध्यमातून ते आपला ठसा मित्रांमध्ये आणि मैत्रीणींमध्ये पाडण्याचा प्रयत्न करतात. इंग्रजी नोवेलची देवाणघेवाण करतात. मुलींचं लक्ष आपल्याकडे जावं यासाठी एखादे आव्हनात्मक काम करतात. याच काळात आपली प्रौढी मिरवण्यासाठी एखादी देखणी टू व्हिलर भन्नाट वेगाने रस्त्याने चालवतात. एखादी पिकनिक, ट्रेक अरेंज करतात,स्वतः खर्च करतात. “रोज डे” ला गुलाब देऊन मैत्री प्रकट करतात. हळूहळू मैत्र आकार घेतं, जो पर्यंत त्याचा खिसा गरम असेल किंवा वर्गात तो टॉपर असेल तो पर्यंत ते प्रेम रूसत, रागावत, त्याने गीफ्ट दिल तर खुलत, बहरत जातं. तो दिवाना प्रेमात वाहून जातो.सदा सर्वदा, तिन्ही त्रिकाल “बस तू ही तू आँखो मे तु,सपनो मे तु, खयालो मे तु.” ती मात्र सावध पवित्र घेत उद्यावरती नजर ठेवत त्याला हळूहळू टाळते आणि ज्याला भविष्य असेल अस दुसर पाखरू हेरते. कहोना प्यार है। कुठ पर्यंत? एक दोन सत्रातच निक्काल लागतो. मग तो, “मै आवारा हू, या गर्दिश मे, मै आसमान का तारा हू” म्हणत पागल दूर होतो. कोणी प्रेमात दीन होतो तर कोणी दिवाना!

एखाद्या मुलाला किंवा मुलीला कुणाचा फोन आला आणि ती किंवा तो थोडा दूर जाऊन बोलू लागला की शेजारी असणाऱ्या मित्रमैत्रीणीं कान टवकारतात किंवा वेगळ्या नजरेने पाहू लागतात. मुलाने आपल्याला अमुक मित्र आहेत किंवा तो माझा जीवलग मित्र आहे म्हटल तर कोणी फारसा रस दाखवत नाही पण त्याने “ती” माझी खास मैत्रीण आहे अस म्हंटलं किंवा तो माझा फास्ट फ्रेंड आहे म्हटलं तर तिच्या मैत्रिणी तिचा पिच्छा पुरवतात किंवा सोबत असणारे लगेचच कान टवकारतात किंवा काहीतरी कमेंट पास करतात. आपल्याला बाँयफ्रेंड आहे हे मुली आपल्या मैत्रीणींना दिमाखात सांगतात त्याचा फोटो डीपी म्हणूनही ठेवतात. मुलही चार मित्रांसमोर एखाद्या क्युट मुलीला प्रपोज करतात. हे सगळ चालत वयाच्या अवघ्या पंधरा सोळाव्या वर्षी.

मित्र कोणाला म्हणावं? कोणते गुण मित्र असणाऱ्या व्यक्तीत असावेत? मित्रांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? याच चित्र स्पष्ट होण गरजेच आहे. तुम्हाला “आरसा दाखवणारा” मित्र हवा की केवळ भाट, स्तुतीपाठक मित्र किंवा मैत्रीण हवी या बाबत तुमच मत स्पष्ट हवं. मैत्री कोणाशी होते? “समान शिले व्यसनेसु सख्यम्” अस सुभाषित आहे. ज्यांच्या आवडी निवडी समान आहेत किंवा ज्यांचे विचार समान आहेत त्यांची मैत्री लवकर होते पण कधीकधी भिन्न प्रकृती आणि प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तीही एकमेकांच्या मैत्रिणी किंवा मित्र असू शकतात. एक सरळमार्गी तर दुसरा नेहमी वाकड्या मार्गाने जाणारा आणि तरीही त्यांच्यात मैत्र होते, का? कोणत्या गोष्टी त्या दोघाना एकत्र बांधून ठेवतात? याचा विचार करणेही कठीण. एखादी व्यक्ती दुर्गुणी असली तरी लोभस व्यक्तिमत्वाची असते, सच्ची किंवा प्रामाणिक असते. अनेक गुन्हे,अनेक वाईट गोष्टी करूनही ती आपल्या मित्राकडे प्रांजळ कबुली देते. मुख्य म्हणजे त्याने दिवसभर केलेल्या वाईट गोष्टीबद्दल खेदही व्यक्त करते. त्याच्या त्या निरागसतेवर मित्र फिदा असतो. त्याने केलेल्या वाईट कृत्याबाबत कानउघडणी केल्यानंतर तो सुधारणार नाही याची त्याला माहिती असते, नव्हे तसा विश्वास असतो तरीही तो त्याला दूर सारू शकत नाही.

काही व्यक्ती दुसऱ्याच्या संकट काळात धावून जातात, उद्भवेल त्या प्रसंगातून मित्र अथवा कुटुंबाला बाहेर काढण्याची क्षमता त्या व्यक्तीच्या ठाई असते. वेळ, पैसा आणि स्वतःचे श्रम देण्यासही ते मागेपुढे पहात नाहींत आणि या बदल्यात त्यांची गरजूकडून काही अपेक्षाही नसते.
अर्थात अशा व्यक्ती संख्येने अल्प आणि प्रसिद्धीपासून दूर राहतात. या व्यक्तींचे असंख्य भक्त असतात. काही मित्र मात्र स्वार्थी प्रकृत्तिचे असतात, जो पर्यंत तुमच्याकडून काही लाभ होऊ शकतो याची कल्पना असते तो पर्यंत ते तुमच्या सोबत असतात. त्यांचा स्वार्थ साधला गेला की तुम्हाला विसरूनही जातात. “असतील शितं तर जमतील भूतं” ही म्हण आपण ऐकली आहे.ज्याप्रमाणे फुलातील मध संपला की मधमाशी फुलाची सोबत सोडते तशीच यांची कृती असते.

ज्या मुलांना अथवा मुलींना घरची खानदानी श्रीमंती, राजकीय वारसा, सामाजिक दर्जा, घरातील अधिकारी पदी असणारी व्यक्ती अशी कवचकुंडले असतात त्यांना खूप मित्रमैत्रिणी असतात. हे मित्र कटू प्रसंगात सोबत करतीलच ह्याची हमी नसते. जोपर्यंत सेलिब्रिटी मुलांच्या खिशात पैसे असतील तो पर्यंत एकत्र फिरणे, खरेदी किंवा मौजमजा चालू असते.जर खर्च करण्यासाठी पैसे मिळाले नाही तर मुल नको त्या मार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि संकटात सापडतात.

नाट्य क्षेत्रातील कित्येक अभिनेते आणि अभिनेत्री जोपर्यंत प्रसिध्दीच्या शिखरावर असतात त्यांचे कित्येक फॉलोअर्स असतात. त्यांची मुलाखत घ्यायला कित्येक पत्रकार ताटकळत असतात. पण एकदा का त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली की कोणी त्यांना चुकूनही पहात नाहीत.’उगवत्या सूर्याचे बिंब पाहणारे आणि त्याला दंडवत घालणारे अनेक असतात पण मावळतीचा सूर्य फारच थोड्याना खुणावतो.’ नटसम्राट मधील वृद्ध झालेले आप्पासाहेब बेलवलकर आणि त्यांची पत्नी आठवून पहा. पिंजरा पिक्चर मधील श्रीराम लागू आठवून पहा, त्यांची अगतिकता आपल्याला रडवून जाते. मावळतीला आपली सावलीही दूर पळते अस म्हणातात. शांता आपटे वृद्धपकाली वसईच्या आश्रमात होत्या. तो मी नव्हेच सादर करत प्रेक्षकांना हसवणारे सदानंद जोशी म्हातारपणी रोजच्या अन्नाला मौताद होते. आपल्या मैत्रीणीवर किंवा मित्रावर मनापासून प्रेम करणारे किंवा कलेवर प्रेम करणारे वाहवत गेले तर काय होत त्याच ज्वलंत उदाहरण.जरा देवदास आठवून
पहा, मैत्री तुटली तर भणंग अवस्था प्राप्त होते.

कधीकाळी रेखा आणि अमिताभ बच्चन यांची छान मैत्री होती. अनेक चित्रपटात त्यांनी एकत्र भूमिका केल्या होत्या.made for each other अस लोक म्हणतं होते, कोणतं वादळ त्यांच्या जीवनात आलं ते त्यांनाच ठाऊक पण आजही जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला रेखा आणि अमिताभ एकाच मंचावर असतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातील भाव पाहण्यासारखे असतात. तिची नजर आणि तीने त्याला पाहून गिळलेला आवंडा मनाला चटका लावून जातो.”काश! जया के जगह मै होती” असा भावही त्या श्वासात असावा.कधी कधी मात्र सच्चे मित्रही स्वार्थापोटी दूर लोटले जातात, जी स्थिती भाजपा आणि ठाकरे शिवसेना यांच्यात आज आहे.
तिस वर्षांपूर्वी जेव्हा बाळासाहेब आणि प्रमोद महाजनजी यांनी युतीचे स्वप्न पहात राजकरणाचा नवा अध्याय रचला तेव्हा अपराजित काँग्रेस हादरली होती. या मैत्रीत अनेकदा कटुता आली पण प्रमोद महाजन आणि त्यांच्या नंतर गोपीनाथ मुंडे यांनी प्रसंगी नमते घेत ही युती टिकवून ठेवली. दुर्दैवाने त्यानंतर दोन्ही बाजूचे नेते अपरिपक्व निघाले आणि ही दोस्ती तुटली. “दिल के टुकडे हजार हुए कोई यहा गिरा कोई वहा गिरा.” अशी अवस्था आज झाली. व्यक्तीचा स्वार्थ जागा झाला की समजुतदारपणा लोप पावतो हेच खरे. सुसंवाद नसला तरी चालेल पण कटुतेच विष मनात भिनल की काय होते? त्याच जिवंत उदाहरण म्हणजे युतीतील बिघाड. राज्य, राष्ट्र संपल तरी चालेल पण माझा अहंकार मी सोडणार नाही असा विचार जागृत झाला की विनाश अटळ आहे. आज महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान,उत्तरप्रदेश आणि दिल्ली येथे वेगळ काय चाललं आहे?

“दोस्ती” चित्रपट पाहून लोक त्या अतुट मैत्रीसाठी हळहळले होते. मराठी चित्रपटातील,”ही दोस्ती तुटायची नाय” हे लक्षाच गाणं आठवत असेल पण ऐश्वर्या आणि सलमान यांच्यात मतभेद होऊ शकतात तर मग दोस्ती शब्दाला अर्थ रहातोच कुठे? अस म्हणतात, हिंदी चित्रपट शृष्टीतील अनेक अभनेत्रींनी चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सलमान याची शिडी वापरली आणि आपले इप्सित साध्य होताच त्याला जीपीएल दिली. खरं खोटं सलमान जाणे. व्यवसायात दोन पार्टनर एकत्रितपणे व्यवसाय करून मोठे झाल्याची जशी उदाहरणे आहेत तशी एका मित्राने आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या मित्राला फसवल्याची उदाहरणेही कित्येक असावी. तुमचा आत्मा काय सांगतो ते महत्वाचे.

दोन भाऊ, दोन बहिणी किंवा दोन शेजारी जिवलग मित्र असू शकतात. मैत्रीला जातीपातीच, धर्माच किंवा राष्ट्राचं बंधन असतच अस नाही. आज इंटरनेटच्या जमान्यात कोणत्याही दोन भिन्न व्यक्ती मैत्रीच्या नात्याने एकमेकांच्या जवळ येऊ शकतात. दोघांच्या आवडी निवडी समान असतील तर वयाच बंधन न बाळगता, विचारांची देवाणघेवाण करतात सूर जुळले तर एकत्र राहू शकतात. मैत्री कोण कोणाशी करतो? तपशीलात जाण्याची गरज नाही. जिथ स्वार्थ संपतो तिथ मैत्रीचा अध्याय सुरू होतो. कुटुंब, समाज, कोर्ट, मान्य करो वा न करो कायदा त्या मैत्रीला किंवा एकत्र येण्याला मान्यता देवो वा ना देवो ते एकत्र रहातात. मनाने जोडले जातात,एकमेकांच्या सुख,दुःखाची काळजी घेतात.त्यात शारीरिक आकर्षण असेलच असही नाही. त्यांच्या एकत्र येण्याचा धागा नेमका काय ? ते शोधणही अवघड असतं. हे संबंध, ही मैत्री समाज मान्य करो वा न करो त्यांना त्याच सोयरसुतक नसत ना सामाजिक दडपण वा भिती.
कितीतरी मराठी चित्रपटात उत्कट प्रेमाची गाणी दिसून येतात “सख्या रे! सख्या रे! घायाळ मी हरीणी”

हा सागरी किनारा ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा

घायाळ मनाला जोजावत शांत करण्याची ताकद प्रेमात आहे, मैत्रीत आहे आणि मनातील भन्नाट वादळाला अंगावर घेऊन शांत करण्याची ताकदही मैत्रीत आहे, सहचरातच आहे. तो आपल्या प्रेमळ नजरेनच वादळाला बाहुत घेऊन कुरवाळू शकतो. शांत करतो. म्हणूनच मित्र बनता बनता काळजात शिरावं अन सख्य साधताना दुःख हलक करत सहचर बनावं तर ती मैत्री अजरामर होते.मैत्री दिन साजरी करता पण Whatsapp, Facebook च्या मेसेजमध्ये मैत्री शोधू नका, ती शब्दात मांडता येणार नाही, भावनेन व्यक्त केली तरी ती ह्रदयात पोचणार नाही त्याला अनुभूती हवी ती निशब्द सहजीवनाची, अनुभवाची.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “मित्र ,सखा, सहचर, कोण हवे?

  1. श्री मधुकर नारायण राणे
    श्री मधुकर नारायण राणे says:

    छान लेख आहे

Comments are closed.