मी
मी मनाचा व्यापार, स्वयंभू अहंकार
मी ओंकार, निराकार, अविनाशी ईश्वर
मी सुक्क्ष्माती सूक्ष्म, जीव जलचर
मी एकपेशी जीव, महाकाय भूचर
मी अविनाश आत्मा, इश शुभंकर
मी अचल, निश्चल, अहिल्या पत्थर
मी यत्किंचित रजकण, तव चरणावर
मी कृपासिंधु परमात्मा, दयेचा सागर
मी अनंत अपेक्षा, कल्पनेचा महापूर
मी भुकेला, हव्यासी अतृप्त वानर
मी तेजोमय रवी, शशी, अवखळ सागर
मी आप, तेज, वायू, आकाश धरोहर
मी वासनांचा गुलाम, जणू खेचर
मी मत्सगंधा विवेकी, प्रणयी जलचर
मी उग्र संतापी दुर्वास, दुर्योधन सहोदर
मी श्वापद, भुकेले, मी तृप्त, बन्सीधर
मी भीमाचा अहंकार, तर कधी वानर
मी महाकपी हनुमान, मी शापित किंकर
मी पर्वतीय प्रपात, तर कधी निर्झर
मी शब्दांचे कोडे, कधी “श्री” एकाक्षर
मी उद्रेकी अहंकारी पर्वत मेरू
मी श्वास, निश्वास अवखळ वारू
मी पर्णावरील दवाचा एक थेंब
मी कवडसा रवीचा सूर्यबिंब
मी पहाट वारा, कधी मंद झुळूक
मी निळे नभ, कधी अविचारी मळभ
मी स्वर्गातील जलप्रपात गंगा
आसुसली धरणी आली संगा
मी आजची रात उद्याची उषा
मी स्वप्न मनीचे मी अभिलाषा
मी प्रेरणा कवीची सुरेल भाषा
मी लेखणी त्या हातीची, स्वप्ने अन उषा
मीच रावण मीच इंद्र, मीच चंद्र
मी शक्तिशाली परी शापित गंधर्व
मी पिता, भ्राता, सखा मुरलीधर
मी वामन, बळी, त्राता परशूधर
मी तुझा अंश, तू येशी या धरणीवर
मार मज वा तार, कृपा करी, उद्धर
Nice poem !
धन्यवाद मॅडम