मुकूंद

मुकूंद

गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात मी त्याला विसरलोच नाही. मुकूंद गजा पाटील हे नाव आजही मनपटलावर एका वेगळ्याच कारणास्तव कालातीत उरलं आहे. कोण होता मुकूंद? कोणतं पदक मिळवल त्यान? की तो क्रांतीकारी होता? या प्रश्नाच्या गाभ्यात जातांना मला आठवतो १९७४-७५ चा दुष्काळ आणि अन्नासाठीच नव्हे तर दैनंदिन गरजेसाठी लागणा-या पाण्यासाठी वणवण.

आगरी समाज हा म्हटल तर शेतकरी, पोटासाठी पावसाळी शेती आणि इतर वेळेस बैलगाडीने सामानाची वाहतूक हे त्यांच काम. दुर्देवाने ह्या मुकूंदच्या वाट्यास एक खोली सोडली तर काहीच आलं नाही. मी त्याला पाहिले तेव्हा तो तिशीतला तरूण तर मी दहा-बारा वर्षांचा असेन. आम्ही कधी आईसोबत स्टेशनवर सामान आणायला गेलो तर मुकूंद वाण्याच्या दुकानाशेजारी बसलेला असे. लोकांनी खरेदी केलेले सामान घरापर्यंत पोचवण्याचं काम तो करे. त्या बदल्यात त्याला एक रुपया हमाली मिळे. मुळात दुष्काळी दिवस असल्याने लोकांची खरेदी यथातथाच असे पण त्यातही जे सरकारी नोकरीत होते त्यांना नियमीत पगार असल्याने ते वाण्याकडून एकत्र सामान खरेदी करत आणि मुकूंदला सामान घरी पोचवण्याचं काम हमखास मिळे.

 आता कोणत्याच दुकानात कोणत्याच वस्तूची शंभर किलो सामानाची गोण उपलब्ध नसते, पण त्या काळात गहू, तांदूळ, साखर या वस्तू बारदनाच्या म्हणजे ज्युटच्या गोणीतून येत आणि ही शंभर किलोची गोण मुकूंद एक हासडीत उचलून पाठगुळीला मारत असे. या गोणीसह तो अर्धा मैल अंतरावर राहणा-या  ग्राहकांकडे गोण पोहोच करी तेव्हा त्याला रूपया, सव्वा रुपया मिळे.

मुकूंद जन्मजात मुका होता, महत् प्रयासाने तो काही शब्द उच्चारण करण्याचा प्रयत्न करत असे.त्याला कोणी नाव विचारले तर तो मुतून पातील म्हणे.काही टारगट मुद्दाम त्याचं नाव त्याला पून्हा पून्हा विचारत.आणि तो बोबड बोलला की त्याची खिल्ली उडवत. मुकूंदचे आई-वडील कधी वारले या बद्दल कुणास फारशी माहिती नाही.मुकूंदने शाळा पाहिलीच नव्हती तरीही त्याला हिशेब कळे. जेव्हा काम नसे तेव्हा दुपारच्या वेळात तो मदरश्या बाहेर बाकावर बसून आतले संवाद ऐकत असे. बहूदा तेथेच त्याला इंग्रजी दहा अंकाची तोंड ओळख झाली. एक ते दहा अंक बोबड्या स्वरात, वन, तू  तर्री, फोल, फायव्ह सिक असे म्हणून दाखवी आणि कोणी कौतूक केले की हरखून जाई. कधीतरी कोणी अनोळखी कौतुकाने चार आणे हातावर घाली.





कधी कधी तपस्व्याप्रमाणे ध्यानस्थ बसून राही. तो काय विचार करीत असावा? आपल्या बोबडेपणाचा आणि अडाणी असल्याचा की मग सुशिक्षीत समाजातील अती शहाणपणाचा की अज्ञानाचा, त्यालाच ठाऊक. हा सल त्याला टोचत तर नसेल ना!

त्याचे आई वडील कोणी पाहिले होते की नव्हते नकळे, पण त्याच्या वाटणीस आलेल्या एका खोलीत तो एकटाच रहात असे, नाही म्हणायला भटक्या कुत्र्यांचा शेजार त्याला होता. दुपारी स्टेशनवरच हाॅटेलमधून काही खाऊन भागवून नेई.संध्याकाळी सात वाजता तो घर गाठे आणि स्वत: पुरत अन्न शिजवत असे. त्याच्या आजूबाजूचे भटके कुत्रे त्याच्या घराबाहेर बसून त्याच्या घराची राखण करत. त्या बदल्यात त्यांना उरलं सुरल घातलं की तो दोन भांड्यावर हात मारून मोकळा होई.

त्याचा पेहराव अत्यंत साधा,हाफ पॅन्ट आणि ढगळ शर्ट व खांद्यावर एक टाॅवेल इतकाच असे.सकाळी तो स्वच्छ आंघोळ करून आणि कपाळाला गंध लाऊन बाहेर पडे. धंद्याच्या वेळेला देवाचं नाव घेतलं की बरकत येते असं तो म्हणे.मगनलाल, फुलचंद, मोठाभाय, सुर्वे, दोशी अश्या मोठ्या दुकानात हजेरी लावली की कोणाच सामान चढवायचे असेल किंवा न्यायचं असेल ते कळे.

हे मारवाडी कंजूष असले तरी त्यांच्या न्याहरीच्या वेळात जर मुकूंद तिथेच असला तर त्याच्याही हातावर काही पडे त्या बदल्यात त्यांच्या गोडाउनमधील गोणी काढून घेत. रोज संध्याकाळी तो त्यांच्या समाजातील एका सधन व्यक्तीच्या घरी वळे आणि हाक मारून म्हणे, “वैनी मा , माह्ये पैसे ह्येव, दोल रुपे हान.” ती माउली गंमतीने विचारे, ” मुक्या कधी लगीन करायचा हाय? पोरगी पाहू का तुला?” तो कपाळावर हात मारून म्हणे, ” माना कोऽऽ देल पोलगी? घल नी न दालऽऽ नी, हाय का मझ्याकल? तसं त्या म्हणत मंग पैसे कशाला जमा करत तसं म्हणे घलावल नल टाकाय मजेली” 

तसं ती मुद्दाम विचारी तुझं कवड रूपये माझ्याकड हान माहुत हाय का? तसं तो बोट मोडत म्हणे “सातश बाला लुपे.” त्याचा हिशोब अगदी अचूक असे. कधी रूपया कधी दोन रुपये तर कधी पन्नास पैसे तो जमा करत असे. पावसाच्या दिवसात काम नसल की तो पून्हा त्या माउलीकडे पैसे परत मागे. पण त्यांनी गेल्या अनेक वर्षांत तिच्याकडेच व्यवहार ठेवला होता याचाच अर्थ त्या माऊलीवर त्याचा विश्र्वास होता.





कधी कधी त्याला सकाळ पासून अगदी तीन तीन वाजेपर्यंत काहीच काम मिळत नसे, पोटात अन्नाचा कणही नसे परंतू कधी कोणाकडे मागून खाणे त्याच्या  रक्तात नव्हते. कधी व्यापारी लोकांकडे आलेले गि-हाईक आपली पिशवी दुकानात विसरून जाई पण जर ती मुकूंदला मिळाली तर ती पिशवी तो वाण्याकडे परत करे आणि म्हणे,ज्यांची हाय त्या देउन ताक, दिली माना तांग” सवयीने वाणी लोकांना त्याची भाषा कळत असे. ती पिशवी योग्य व्यक्तीला दिली की त्याला बरं वाटे. एखाद उदार मनाचा गि-हाइक त्याला दहा-वीस पैसै देण्याचा प्रयत्न करे पण हरामाचा  पैसा नको हे त्याच सुत्र असे. त्यामुळे तो हमाली करत असला तरी त्याच्या बद्दल लोकांना आदर होता. हा मुकूंद रोज ठरल्या वेळेवर सकाळी हमालीसाठी निघे. वाटेत देऊळ लागलं की न विसरता  पाया पडून वाटेला लागे. गावातही तो कुणाकडे काही मागत नसे किंवा दुकानावर उधार घेत नसे त्यामुळे तो गरीब असला तरी त्याची कोणी मस्करी करत नसे.

गावच्या होळीला मुकूंद स्वतः एखादे सोंग घेवून होळी भोवती फेऱ्या मारत असे. अर्थात त्याच्या वाकड्या चालीने तो मुकूंद आहे हे लोक ओळखत आणि त्याच्या नावाने हाक मारत. परंतु सोंग घेतले असताना तो ओळख दाखवत नसे.असा हा साधा सरळ मुकूंद सर्वांच्या परिचयाचा होता. वाणी लोकांच्या दुकानात बसलेला सगळ्यांना दिसायचा.

अचानक मुकूंद, वाण्यांच्या दुकानावर यायचा बंद झाला तसं प्रत्येक वाणी गावातून येणा-या गाव वाल्यांना मुकूंद का येत नाही असे विचारु लागले पण जाऊन त्याची चौकशी करावी असे काही कुणास वाटले नाही. एक दिवस तो वारल्याची बातमी स्टेशनवर बाजारात पोचली तसं वाण्यांनी स्वत: ठरवून दुकानं बंद केली. कोणी तरी ग्रामपंचायतीच्या फलकावर त्याच्या मृत्यूची बातमी लिहीली, त्या बोर्डाला हारही घातला. संध्याकाळी त्याच्या अंत्ययात्रेला त्याच्या गावातील लोक जमले तेव्हा सर्व वाणी लोकांनी पाचशे रूपयांची वर्गणी त्याच्या अंत्यविधीच्या खर्चासाठी जमा करून गाववाल्यांकडे देण्यासाठी सुपूर्द केली.

गावातील पाटील बाई वाणी लोकांना म्हणाल्या, “तुम्ही वर्गणी जमा केली यावरून मुकूंद पाटील कसा होता ते गावाला कळले पण मी नम्रपणे सांगते की मुकूंदने आज पर्यंत कोणाकडे मदतीची अपेक्षा केली नाही. माझ्याकडे गेले अनेक वर्षे तो नियमाने पैसे जमा करत असे. माझ्याकडे त्याने जमा केलेले साडेतीन हजार रूपये आहेत यापैकी मयताला येणारा खर्च करून राहिलेले पैसे त्यांनी शाळेला मदत करा म्हणून सांगितले आहेत. म्हणून आपली वर्गणी आम्ही स्विकारू शकत नाही. हे सांगताना पाटील बाईचे डोळे पाण्याने डबडबले. एका हमाली करणा-या माणसाकडे केवढा दिलदारपणा होता ते ऐकून वाणी लोकही भाराऊन गेले. मुकूंदाच्या अंत्ययात्रेला पाचशे हजार लोक शांततेत निघाले. ती मानवंदना होती मुकूंदच्या प्रामाणिक स्वभावाला आणि दातृत्वाला पन्नास पैसै आणि रूपयासाठी हमाली करणा-या मुकूंदाने दातृत्वाचा एक नवा परिपाठ रचला यात वादच नव्हता. त्याच्या इच्छेप्रमाणे ते पैसै शाळेला मुकूंदच्या नावाने देणगी म्हणून देण्यात आले. अर्थात पाटील बाईंच्या प्रामाणिकपणालाही तोड नव्हती गावांसाठी प्रामाणिकपणाचा परिपाठ दुष्काळातही दोघांनी घातला. या मुकूंदला कधीतरी पुन्हा जिवंत करावं असं गेले अनेक वर्ष वाटत होत, शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या योगदानाची पोचपावती उशिरा का होईना देणे गरजेचे होते. त्या ऋणातून आज मुक्त झाल्याचा आनंद नक्कीच झाला.

इतर कथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar