लग्नसंस्कार, बंधन की सोहळा?

लग्नसंस्कार, बंधन की सोहळा?

लग्न म्हणजे दोन शरीरे, मन आणि दोन आत्मे यांच पवित्र बंधन. लग्न म्हणजे दोन व्यक्तींचा एकत्रित प्रवास. सहजीवन, जीवन प्रवासातील सुसंवाद. लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे समर्पण बुद्धीने मनोमिलन. लग्न म्हणजे अद्वैताकडे वाटचाल. लग्न म्हणजे सुख दुःखाचा, दोघांनी एकमेकांना सावरत, एकमेकांना समजून घेत आणि चुका झाल्या तरी दोघांनी एकमेकांना माफ करत केलेला प्रवास. भारतीय संस्कृतीत वैदिक संस्कारांनी आणि अग्निदेवासमक्ष सप्तपदींनी सज्ज झालेला किंवा साजरा झालेला विवाह पवित्र मनाला जातो.

विवाह संस्कार झाल्याशिवाय गृहस्थाश्रमात प्रवेश नाही असे हिंदू संस्कृती मानते. इतर समाजात लग्न हा एक करार असतो जो विशिष्ट परिस्थितीत संपवता येतो मात्र हिंदू संस्कृतीत लग्न म्हणजे जन्मगाठ मानली जाते. पारंपरिक भारतीय समाजव्यवस्थेत एकपत्नीकत्व आदर्श रूढ होती , आजही आहे. पत्नी ही गृहस्वामिनी आहे म्हणून गृहसंस्थेत तिला वरिष्ठ स्थान आहे. ऋग्वेदकालीन गृहसंस्थेत स्त्रीला वरिष्ठ स्थान होते. दक्षिणेकडे मातृसत्ताक पद्धती आजही रूढ आहे. सपिंडी किंवा एक गोत्रात लग्न करू नये असे शास्त्र सांगते त्याला विज्ञानाचा आधार आहे.

पूर्वी मुलगा आठ वर्षे वयाचा झाला की मुंज, उपनयन किंवा व्रतबंधन होत असे. मुलगा आश्रमात शिक्षणासाठी असे तेव्हा ब्रह्मचर्य पाळावे लागे. या काळात अभ्यास व विद्या शिकून अर्थार्जनासाठी सज्ज व्हावं अशी अपेक्षा असे म्हणूनच विद्यार्जन पूर्ण झालं की सोडमुंज करून लग्न करून गृहस्थाश्रमास प्रवेश करण्यास अनुमती मिळे. या विधीत कमरेचा करगोटा काढून टाकतात, सोडमुंज म्हणजे ब्रह्मचर्यव्रताची निवृत्ती.





अर्थात वैदिक काळात किंवा तदनंतर गृहपुरुषाची किंवा कर्त्या माणसाची सांपत्तिक स्थिती पाहून मुलांचे विवाह होत. आज लग्न करण्याआधी वराची पाच किंवा सहा अंकी वेतनाची चांगली नोकरी, स्वतःचे घर, चारचाकी असल्याखेरीज मुली लग्नास तयार होत नाहीत. ज्यांच्या क्रेडिट कार्डची क्रेडिट क्षमता मोठी ती व्यक्ती लग्नाच्या बाजारात भाव खाऊन जाते. पन्नास वर्षे अगोदर लग्नाचा थाट वेगळाच होता. लग्न घरी आठ पंधरा दिवस अगोदर आप्त जमत. लग्न, दारासमोर मांडवात होत असल्याने, मांडव घालणे, घराची रंगरंगोटी इत्यादी उरकण्यासाठी गावातील भावकी मदत करत असे. आजही कोकण, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर येथे काही समाजात घरासमोर मांडवात लग्न करण्याचा प्रघात आहे.

त्या काळी केळवण, देवनिमंत्रण, गृहशांती, घाणा भरणे, हळद हे विधी दोन्ही घरी पार पडत. तर नवरीच्या घरी चुडा भरणे हा विशेष कार्यकम असे. प्रथम वधूस हिरव्या बांगड्या भरून त्यानंतर वधूच्या घरातील स्त्रिया, शेजारच्या महिला यांना त्यांच्या पसंतीच्या बांगड्या भरण्यासाठी कासार घरी बोलवला जाई. बांगड्या भरणे, कुंकू रेखणे हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते. आज वेळे अभावी आणि अर्थात जागे अभावी या गोष्टी करणे मनात असले तरी शहरात शक्य नाही.

सिमांत पूजन हा विधी नवरीच्या माता पित्याने गावाच्या सिमेवर करायचा विधी होता. या वेळी नवऱ्या मुलाचे पाय धुवून त्याच्या डोळ्यांना पाणी लावून पंचरातीने ओवाळून त्याचे तसेच वर माय आणि पिता यांना कपडे देणे असा स्वागतचा कार्यक्रम होता. आज हॉलचे प्रवेशद्वार हीच सीमा मानून मुलाचे स्वागत केले जाते. त्यानंतर रूखवत, ओटी पुजन, गौरीहर, मंगलाष्टके, वरमाता ओटी भरणे, कन्यादान कंकण बंधन, मंगळसूत्र बंधन, होम, सप्तपदी मुलीच्या नावातील बदल इत्यादी विधी क्रमाने करावे लागतात. अर्थात या सर्व विधिबाबत यजमान किती जागरूक आहे आणि पुरोहितांना बिदागी किती मिळाली आहे यावर हे सर्व उपचार अवलंबून असतात.



affiliate link

प्रत्येक विधीस एक विशिष्ट अर्थ होता, जसे गौरीहर पुजेत महादेवासारखा पती मिळावा म्हणून वधू तांदळाची रास करून त्यावर अन्नपूर्णेची प्रतिमा ठेवून पुजा करते, काही ठिकाणी बाळकृष्ण ठेवला जातो. या विधीच्या पूर्वी वराकडील पाच सवाष्णींनी वधूची गौरीहरा समोर पाच फळे व पाच नारळासंह हिरवी साडी, खण आणि दागिना यांनी ओटी भरावी.

पुर्वी नवरा दूरवर प्रवास करून वधूच्या गावी येत असे, लग्नविधी उरकेपंर्यत उपासपोटी त्याला रहावे लागू नये म्हणून रूखवात वाढला जाई. यात वर व वराकडील धेडा आणि पाच मुले यांना रुखवाताची न्याहारी दिली जाई.
लग्नात वधूकडून करवली आणि वराकडील धेडा यांना मानाचे स्थान आहे. लग्नात वर वधूकडील जवळचे नातेवाईक यांनी वधू किंवा वराकडील यजमान, धेडा, करवली यांना घरचा अहेर करणे अभिप्रेत असते. हा अहेर लग्न लागण्यापूर्वी करतात. आज शहरात लग्नविधी आणि लग्न संस्कार यापेक्षा लग्न समारंभाला महत्व दिले जाते. हॉल कोणत्या एरियात आहे, एसी की नॉन एसी? कॅटरर कोणता? या गोष्टीवर, आमंत्रित, लग्नाला जायच4 की नाही ते ठरवतात.

हल्ली यजमान आपल्या परिचयाच्या खासदार ,आमदार किमानपक्षी जिल्हा परिषद सदस्य किंवा नगरसेवक यांना लग्नाला आमंत्रित करून त्याचे स्वागत करतात. समाजात आपली पत दाखविण्याचा तो उपचार असतो. अर्थात त्या आमंत्रित व्यक्तीला आपली व्होट बँक गरजेची असल्याने तो ही हजेरी लावतो. जुन्या काळीच नव्हे तर आजही काही राजकीय किंवा व्यावसायिक समिकरणं जुळवण्यासाठी दोन घराण्यात रोटी, बेटी व्यवहार उपयोगी पडतो. शिवाजी महाराजांच्या काळापासून राजकीय संबंध दृढ करण्यासाठी भिन्न जातीतील किंवा भाषेतील अथवा प्रांतातील वर वधूची लग्न झाल्याची उदाहरणे आहेत.

भारतीय चित्रपट व्यवसायातील अनेक अभिनेते, निर्माता, संगीतकार, गायक यांनी आपल्या व्यवसायातील किंवा क्षेत्रातील मुलींशी सूत जुळवल्याचे दिसत आहे. मुख्य म्हणजे इतर वेळेस चुकीच्या समजातून Love Jihad, Honour killing घडत असतांना उच्चभ्रू आणि नवश्रीमंत कुटुंबात धर्म, भाषा व जातीपातीस चिकटून न राहता कलाकार हीच जात समजून लग्नास त्यांचे कुटुंबीय कोणतेही आढेवेढे न घेता स्वीकारत आहेत ही मात्र चांगली बाब आहे. तर काही भागात मात्र प्रेमात पडलेल्या दोन भिन्न जातीच्या किंवा धर्माच्या मुला मुलींनी विवाह करण्याचा प्रयत्न केल्यास ऑनर किलिंगच्या घटना घडत आहेत. दोन सज्ञान व्यक्तींनी विचारपूर्वक आपल्या भविष्यासाठी एकत्र येऊन निर्णय घेतला तर चुकले कुठे?



affiliate link

पण आजही धर्माच्या आणि जातीपातीच्या कल्पना समाजात इतक्या घट्ट आहेत की समाज हे पवित्र नाते स्विकारत नाही. मुलीने भिन्न जातीत किंवा खालच्या जातीतील मुलाशी लग्न करण्याचा प्रयत्न केला तर तिची कोंडी केली जाते किंवा लग्न केले तर सख्खे आई वडीलच तिच्याशी नाते तोडून टाकतात. प्रसंगी अशा जोडप्याचे जगणे खडतर बनते.

सातारा, सांगली, कराड, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात मुलाने भिन्न धर्मातील किंवा खालच्या जातीच्या मुलीशी विवाह केला तर गाव त्यांच्यावर बहिष्कार टाकते. कोकणात बऱ्याच भागात दुर्दैवाने देवाचा कौल घेतल्याशिवाय आणि लग्नपत्रिका ३६ गुणांनी जुळल्याशिवाय लग्न होत नाही. या शिवाय ९६ कुळी की ९८ कुळी, देशावरील, घाटावरील की कोकणी, देशस्थ की कोकणी असे मतभेद आहेत ते वेगळेच. घरात आधुनिक साधने आली,उच्च शिक्षण घेतले तरी मनातील मळभ किंवा उच्चनिच जातीचा भेद अजूनही कमी झाला नसेल तर वेगळी अपेक्षा बाळगणे म्हणजे अपेक्षा भंगाचे दुःखच वाट्यास येणार..

कोणतेही बदल हे पांढरपेशा समाज लवकरत स्विकारतो, माई आंबेडकर यांचे उदाहरण पुरेसे बोलके आहे. सुशिक्षित आणि पुढारलेल्या घरात म्हणूनच आज मिश्र संस्कृतीचा पुरस्कार समाज करत असल्याने मोठ्या शहरात समान क्षेत्रात काम करणारी अनेक मुलं आणि मुली स्वतः ठरवून लग्न करत आहेत. वेस्टर्न कंट्री मध्ये नोकरी करणारी अनेक मुलं मुली आपला जोडीदार निवडतांना त्याचे शिक्षण, अभिरूची, स्वभाव समजून घेण्याची क्षमता याच गोष्टींना महत्व देत आहेत. कधी अशी लग्ने न्यायालयीन प्रक्रिया करून केली जात आहेत तर कधी या लग्नाचा डामडौल पारंपरिक लग्नापेक्षा काही और असल्याचे पहायला मिळते. मुलगा तुझ्या पसंतीचा निवडलास ना? मग लग्न सोहळा आता आमच्या पसंतीने कर.असा प्रेमळ सल्ला पालक मुलांना देतात.

कधी इच्छुक जोडपे एखाद्या आवडीच्या प्राईम लोकेशनची निवड करते. आपल्या निवडक मित्र, मैत्रिणींसह एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी जाऊन लग्न करते तर कधी काही नवा विक्रम होण्याच्या उद्देशाने किंवा आवड म्हणून हवेत, पाण्याखाली, किंवा एखाद्या ट्रेकिंग स्पॉटवर असे लग्न करणे पसंत करते. अर्थात असे हटके लग्न करणे ही काही सामान्य कुटुंबाच्या बसकी बात नही. तरीही जर दोघ मनाने आणि हृदयाने जवळ आली, आपला अहंकार, आपली सामाजिक पातळी यांचा त्याग करून समरस झाली तरच या लग्नाला अर्थ उरतो कारण लग्न म्हणजे काही भातुकलीचा खेळ नाही.




काही दिवसांपूर्वी मी माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी गेलो होतो. हॉल बाहेर खूप गर्दी होती, बँड वाजत होता, वऱ्हाडी फेट्यात वावरत होते. माहोल एकदम आनंदी होता. बरेच परिवार करोना काळानंतर प्रथमच भेटत होते. हॉलच्या गेटवर सुंदर आरास केली होती.लाईटचा झगमगाट होता.संध्याकाळ असल्याने वातावरणात गारवा होता. थोड्या वेळात उमद्या घोड्यावरुन वाजत गाजत नवरा मुलगा आला. फटाक्यांच्या आताशबाजीत नवऱ्या मुलाचे मुलीकडील मंडळींनी स्वागत केले. त्याचे पाय धुवून त्याला औक्षण केले.कुंकूम तिलक लावून त्याला हात धरून त्याच्यासाठी असलेल्या राखीव सूट मध्ये नेले.

मित्राने आम्हाला दूर उभे असलेले पाहून जवळ येऊन स्वागत केले, तो गडबडीत होता ते पाहून मी म्हणालो, “तू पाहूण्यांकडे पहा, त्यांची काळजी घे. आम्ही आहोत, वी वील मँनेज.” तो गोड हसून निघून गेला. लग्न समारंभात येणाऱ्या प्रत्येक आमंत्रिताला वाटतं, घरातील यजमानाचं माझ्याकडे लक्ष असावं, माझं, कुटुंबाचं स्वागत व्हावं.
पाहुण्यांच्या प्रचंड संख्येमुळे ते शक्य नसतं.

पण काही यजमान मंडळी हुशार असतात त्यांनी आपल्या कुटुंबातील बारा, पंधरा वर्षाच्या गोड मुली प्रवेशद्वारी उभ्या केलेल्या असतात त्या सर्वांची नीट वास्तपूस्त करतात. त्यांना अत्तर लावण, गुलाब देणं, अक्षता देणं त्यामुळे यजमानावर ताण येत नाही, आणि अनावधानाने कुणी राहिले तर कोणी कोणाला बोलही लावत नाहीत.

आम्ही काही मित्र दूर उभे राहून हा आनंद सोहळा अनुभवत होतो. या पूर्वी एकदा अशाच एका मित्राच्या लग्न सोहळ्यास वडाळा येथे गेलो तेव्हा नवर देवाचा भाऊ बाहेर स्वागताला उभा होता. गळ्यात चार पदरी सोन्याची चेन, उजव्या हाती ब्रेसलेट, दोन्ही हाताच्या बोटात अंगठ्या. मला आश्चर्य वाटले. मित्राच्या घरची परिस्थिती उत्तम असल्याचं कधी ऐकलं नव्हतं.

मी प्रवेश करताच मला दोन तरूण हात धरून घेऊन गेले आणि त्यांनी मला मी नको म्हणत असताना फेटा बांधला. हॉलमध्ये पोचलो तर सगळीकडे फेटेच फेटे. पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे ही पद्धत रूढ आहे. फेटे बांधण्यासाठी दोन तीन माणसे होती. गंम्मत म्हणजे या फेट्यामुळे परिचितही ओळखू येत नव्हता. तर या लग्नाच्या निमित्ताने मला कळलं की लग्नसाठी नवीन कपडे शिवायची गरज नसते, तुमच्या मापाचे कपडे भाड्याने मिळू शकतात. दागिन्यांचे ही तेच मित्राच्या भावाने घातलेले दागिने हे खोटे होते.मी मात्र गैरसमज करून घेतला. शेवटी सेलिब्रेशन महत्वाचे.

नवीन प्रथे प्रमाणे लग्न समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ शुट करायला चार सहा माणस राबत होती. त्यांचे स्टँड फ्लँश,केबल, व्हिडिओ कॅमेरा केबल सर्वत्र पसरले होते. दोन मदतनीस फोटोग्राफर बरोबर इकडे तिकडे नाचत होते. फोटोग्राफर येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा फोटो आणि व्हिडिओ घेत होते. हॉल आलिशान आणि कूल होता.अत्तर उडवणारे फवारे होते.वातावरण एकदम झक्कास होत. सगळ्या हॉल मध्ये स्टार्टर म्हणून कटलेट, मंचुरीयन दिले जात होते, सोबत Apple Juice, Orange juice, pineapple juice, waterMelon juice यांची रेलचेल होती.

लग्न मुहूर्त ११.५५ अस पत्रिकेत छापलं होतं. पण मुलीची तयारी होऊन ती हॉलमध्ये येण्यास उशीर झाला होता. नवरी नववारी नेसून आणि साज शृंगार आटोपून येई पर्यंत पुरोहित पुन्हा पुन्हा येऱ्या झऱ्या घालत होते ,आळस देऊनही कंटाळले होते. माझ्या मागील बाजूस बसलेल्या महिलांमध्ये नवऱ्या मुलीच्या नववारी साडी आणि ब्लॉउज किती महाग आहेत, एकवीस हजाराची साडी म्हणजे खूपच झाले ना? अशी चर्चा सुरू होती. नवऱ्या मुलीचा मेकअप करणारी मॅडम उशिराने आली कारण तिची पहिली assignment सकाळी दुसऱ्या हॉलवर होती. या मेकअप करणाऱ्या मुलींना किती मागणी असते ते आपल्या लक्षात येईल. या मेकअप वूमन एका लग्नाचे दहा हजारा पासून पंचवीस हजार रुपये साखरपुडा ते लग्न समारंभाला घेतात ऐकून आश्चर्य वाटल. मेकअप वूमन लवकर न आल्याने लग्न फक्त एक तास उशिराने लागल. अशा छोट्या मोठ्या गोष्टी होणारच हे गृहीत धरायला हवं. सर्व आमंत्रित मंडळींना छोट्या मखमली पिशवीतून अक्षता अगोदरच वाटल्या होत्या. वेळेचं नियोजन सोडून सगळं उत्तम होतं, असं नक्कीच म्हणावे लागेल.

लग्न मुहूर्तास अवकाश होता तो पर्यंत आमंत्रित पाहूण्यांनी धिरान घ्याव म्हणून खाण्याचे वेगवेगळे पदार्थ हॉलमध्ये वाटत होते,मिनी समोसा, मिनी बटाटा वडा, कचोरी,मिनी कटलेट,ज्युसेस आणि बरेच काही. दोन फोटोग्राफर हॉलमध्ये फिरून ग्रुप ने बसलेल्या मित्र आणि फॅमेलीचे स्टार्टर खातांनाचे च्याव म्याव फोटो शूट करत होते.तर दोन तीन फोटोग्राफर लग्न विधी कव्हर करत होते. लग्नातील प्रत्येक क्षण मेमोरेबल करून देण्यासाठी त्यांनी पैसे घेतले होते,त्यामुळे त्यांच्या नजरेतून काही सुटत नव्हते. यजमान लग्नासाठी आलेले विशेष मान्यवराचे स्वागत शाल व श्रीफळ देऊन आणि फोटो काढून करत होते.त्यांच्या उपस्थितीची दखल माईक वरून घेतली जात होती. सर्व काही सुनियोजित सुरू होते.





लग्नाचा मुहूर्त गुरुजींकडे जाऊन मुद्दाम शोधला जातो तर मग मुहूर्तावर लग्न का होत नाही? आम्ही उगाचच विचारतो. आम्हाला आपल वाटत विशिष्ट वेळेच्या अंतरात मुहूर्तावर लग्न व्हायलाच हवं.लग्न घटीका भरत आली की त्या शुभमुहूर्तावर लग्न लागल पाहिजे अस गुरूजी सांगतात तर दोन्ही कुटुंबाने वेळ पाळण गरजेच नाही का? पण —–

कोणत्याही व्यक्तीच लग्न एकदाच व्हायचं असतं त्यामुळे पदार्थ जसा चवी चवीन खावा, किंवा पान जस चावून चावून खाव तस लग्न प्रत्येक प्रसंगाच यथोचित फोटोशूट करून त्यातील बारकावे टिपूनच पूर्ण व्हाव अस वरमाय आणि अर्थात वधूमाय यांचं म्हणणं असतं. मग मुहूर्त थोडा इकडे तिकडे झाला तर बिघडलं कुठे. आता “लग्न घटीका” हा शब्द कालानुरूप अस्तंगत पावला असल्याने. मुहूर्त तासभर सरकला तरी कोणी खळखळ करत नाही ही जमेची बाब. खरतर लग्न घटीका म्हणजे नक्की काय हे ही तरूण जोडप्यांना माहित नसण्याची शक्यताच आधिक.

असो ,याचाच अर्थ आता मुहूर्त आणि संस्कार यापेक्षा लग्न हा समारंभ म्हणूनच पार पडला पाहिजे अस समाजालाही वाटत असावे. वर वधू कडील मंडळी काही लाख खर्च ते करणार असतात, काही महिने नियोजन सुरू असत.खूप सारा मित्र आणि आप्त परिवार एकत्र झालेला असतो मग सेलिब्रेशन न होऊन कस चालेल? पण या सेलिब्रेशनसाठी ज्यांनी पदरमोड केलेली असते त्याची अवस्था त्यालाच ठाऊक.सांगता येत नाही,सामाजिक दडपण आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी त्याला ह्या वाढीव खर्चाची तरतूद प्रसंगी आपल्या म्हातारपणासाठी ठेवलेल्या पुंजीतून करावी लागते.

त्याच्या गृहखात्याचे दडपण असतेच, जावई मोठ्या घरचा, उच्च शिक्षीत, चांगल पँकेज असणारा आणि सुखसोयींनी सज्ज असा फ्लॅट असणारा, झालच तर फोर व्हिलर, किमान चांगली टू व्हिलर असणारा आणि कुठेतरी फार्म हाऊस किंवा गावी घर असणारा हवा, तर थोडा जास्तीचा खर्च करावाच लागणार. माझ्याच सारख लेकीचे होऊ देऊ नका. अस निक्षून सांगीतल्यावर, बिचारा बाप काय करेल? त्या अर्धांगिनीला लेकीच्या लग्नासाठी पैसे जपून खर्च कारावे लागतील कस सांगणार? शेवटी लग्न काही पुन्हा पुन्हा होत नाहीत आणि हौसेला मोल नसते.खर ना? अशा मंगल प्रसंगी गृहस्वामीनीला नाराज करून कसं चालेल?

लग्न घरातील दोन तीन मुली पायावर काढलेली मेहेंदी दिसावी म्हणून शरारा, लेहेंगा,साडी वर उचलून धरून जात होत्या . मेहेंदी सांभाळताना थोडा त्रास होत होता पण फोटोशूट होतांना मेहेंदी दिसलीच नाही तर मेहनत घेऊन काय उपयोग? दाखवण्यासारखे कपडे, कोरलेल्या भुवया, लिपस्टिक, दंडावरचा Tatoo इतक काही असतांना पटकन आवरायच म्हणजे !

त्यामुळेच विहिण बाई, कुटुंबातील would be bride, वयातील मुली आपला पोशाख सांभाळत इथून तिथे तिथून इथे अशा फिरत असतात. जर त्यांच्या सुंदर रुपड्याकडे, कपड्यांकडे,दागीन्यांकडे कुणी पहिलंच नाही तर काय उपयोग. अर्थात आमच्या सारख्या निमंत्रीत पाहुण्यांना लग्नात करमणूक म्हणून अस सौंदर्य पहायला मिळत हे नाकारून कस चालेल. पण त्याच बरोबर सुंदर दिसाव, परिवारानी, मित्रमैत्रीणींनी पहावं, त्यांची तारीफ करावी यासाठी केलेला अट्टाहास आगळाच असतो हेही खरं. स्वतःच फोटोशूट करून घेणं, कुटुंबाचे, मित्र मैत्रीणींचे ग्रुप फोटो काढून घेण यात ही मंडळी एवढी व्यस्त असतात की तिथे स्टेजवर काय चालल आहे याच्याशी त्यांच काही देण घेण नसत. लग्न हा ही संस्कार आहे हेच मुळात कुणाला मान्य नसावं.



affiliate link

लिव्ह इन रेलशन च्या जमान्यात अजूनही देव ब्राह्मणाच्या साक्षीने आणि अग्नी भोवती फेरे घेऊन लग्नसंस्कार होतात हेच मोठ. काही मंडळी किती लग्न करावी याच मोजमाप करत बसत नाहीत, विशेषतः कलाकार मंडळी किती वेला लग्न करतील आणि किती वेळा विभक्त होतील याचा काही नेम नसतो. दिलीप कुमार, धर्मेंद्र- हेमा, राजेश खन्ना,डिंपल पासून एश्र्वर्या-धनुष,अमीर-किरण,शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा , मलायका अरोरा-अरबाज खान, ह्या काही फिल्मी जोड्या, ज्यांनी लग्न केल पटेल तितके दिवस सोबत राहिले. त्यामुळे ही बडी धेंड अग्निसाक्षीने फेरे घेण्याच टाळतात. त्यांचे वकीलच डीव्होर्स आणि एंगेजमेट किंवा मँरेज कॉन्ट्रॅक्ट करून देतात.जमेल तितके दिवस टिकवायच,मतभेद विकोपाला जाण्यापूर्वी डीव्होर्स घ्यायचा एवढा साधा फंडा हल्ली सर्रास वापरला जातो.

सात फेरे घेण्याची आणि सात जन्म हाच पती दे असं म्हणण्याचा उगाच अट्टहास नाही. आज विवाह जुळवून देणे आणि प्रत्यक्ष विवाह कार्यक्रम उत्तम आयोजित करणे हा व्यवसाय झाला आहे. या व्यवसायाची सुरवात विवाह मंडळ सुरू करून त्याच्या पुढील पायऱ्या, समुपदेशक, Event manager, marriage Halls, Event contractor या प्रकारे तयार आहेत. तुम्ही फक्त तुमचे खिसे भरून तयार असा तुम्हाला सेवा द्यायला ही मंडळी तयार आहेत.

खानदेशात आजही मुलीकडून हुंडा घेतल्याशिवाय लग्न होत नाही. तेथे लग्नाचा संपूर्ण खर्च तसेच २० बाय ०२, म्हणजे २० तोळे सोनं आणि ०२ लाख रोख. लग्नाच्या याद्या पंचासमोर बनवणं हा सोपस्कार पूर्ण केल्यानंतरच लग्न होते. गोव्यात मुलाला संपूर्ण संसार साहित्य देण्याचा प्रघात आहे. वधू पित्याची, त्यातही ज्यांना दोन तीन मुली असतील त्याची, हे खर्च भागवतांना काय वाट लागत असेल ती कल्पना न केलेली बरी.

आजही महाराष्ट्रातील बऱ्याच भागत लग्नाचा थाट वेगळाच असतो, घोड्यावरुन वरात, वरातीत पेट्रोमॅक्स बत्त्या, बेंजो आणि हजारोंच्या पंक्ती, मग एकरभर काळ्या आईचा तुकडा विकला तर कुठे बिघडलं? ह्या मोठेपणापाई अनेकजण भुमीहीन झाले आहेत तरीही फुकाचा डामडौल करण्याची हौस फिटत नाही, काय करावे? आताची लग्न, ही लग्न संस्कार, लग्नगाठ, लग्नबंधन या पेक्षा सेलिब्रेशन म्हणूनच केली जातात. या करोना काळातही दोन तीन दिवस मँरेज सेलिब्रेशन चालते म्हणजे नक्कीच लोकांचा उत्साह अजूनही टिकून आहे, असच म्हणावं लागेल.

अधूनमधून लग्न या विषयांवर वर्तमानपत्रात लिखाण येते,अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्ते, बुध्दीवंत, महिला सबलीकरण संघटना, म्यारेज ब्युरो यांची विवाह, परंपरा, तरुणांच्या अपेक्षा, अडचणी यावर खूप माहिती वाचायला मिळते.लग्न करणाऱ्या मुलाची किंवा मुलींची अपेक्षा यादी वाचली की धक्का बसतो. प्रत्येक ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट करण्याची सवय लागू नये काही त्याने समजून घ्यावे काही तिने समजून घ्यावे. एकमेकांकडे संशयाने पाहिले तर वाईट गोष्टीच नजरेस दिसतील तेव्हा पूर्वग्रह मनात न ठेवता दोघानी एकमेकांकडे पहाव, मॉलमध्ये वस्तू घ्यायला गेल्यानंतर प्रत्येक वस्तूला आपण हात लावून तिची पडताळणी करतो तसे माणसांच्या बाबतीत शक्य नाही कारण त्याचं बर वाईट वागण हे दिसण्यावर नक्की नाही.

लिव्ह इन रिलेशन हा काही सहजीवनाचा प्रशस्त मार्ग नव्हे. वाटलं तर एकत्र राहिलं, बिनसलं तर दिलं सोडून आणि नव्या वाटेने निघून गेलं. हे ब्रेक आणि मेक किती वेळा करणार आणि मेक-ब्रेक पद्धतीने मनाला कायमचा ब्रेक लागला आणि त्याचा परिणाम मेंदूवर झाला तर? अशा कित्येक घटनांत तो किंवा ती उध्वस्त होते. सामान्य माणूस बनायला अपात्र ठरते, नैराश्य आल्याने आत्मघातकी कृत्य करते. म्हणून तुमचा जीवनसाथी म्हणजे खेळातील पार्टनर नव्हे. त्याची निवड जाणीवपूर्वक आणि शांत मनाने आणि एकमेकांचा आदर ठेऊन करणे कधीही चांगले. तरी अजूनही लग्नसंस्था आणि वैदिक लग्न पध्दती टिकून आहे, परदेशातील मुला मुलींना आपल्या जीवनशैलीत जगावससं वाटतं, आपल्या रितीरिवाजाप्रमाणे राहावंसं वाटतं आणि आपण मात्र अंधानुकरण करत वेगळ्या दिशेने निघतो. अजूनही लग्नसंस्था टिकून आहे हिच जमेची बाजू.

असो, तर सामान्यतः जे दृश्य कोणत्याही लग्नसमारंभात दिसत ते दृष्टिपथात आलं.स्टेजवरील तयारी झाली तशी गुरूजींनी वराकडील मंडळींना नवरा मुलगा आणायला सांगितला, पुरोहितांनी मंत्र घोष सुरू केला. मंगलाष्टके सुरु झाल्यावर मुलीच्या मामाने मुलीस आणावे आणि वरा समोर आंतरपाटाआड मुलीला उभे करावे.

गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा
कावेरी शरयू महिंद्रतनया शर्मनवती वेदिका
तारा बलांत——- ,
वाजंत्री बहू गलबला न करणे दोघे करावी उभी—
शुभ मंगल सावधान, हे सावधान कोणासाठी असते? खरं तर ते विवाह बंधनात प्रवेश करणाऱ्या जोडप्यासाठी असते, यापुढे सावधपणे ,सजगतेने जीवनाची वाटचाल करा असा अर्थ अभिप्रेत असतो. परंतु हे सावधान शब्द कानी पडताच फटाक्यांच्या आवाजाने आसमंत दणाणून जातो. खरे तर सनई, चौघडा वाजवून या नव दाम्पत्याचे स्वागत करावे असे अभिप्रेत असताना party popper चा धमाका उडवून स्वागत का करायचे? याचे भान कोणाला उरत नाही. या अनिष्ट प्रथा आम्ही किती सहज स्वीकारल्या आहेत ते प्रकर्षाने लक्षात येते.

मंगलाष्टक आठ श्र्लोकांचे असावे असा संकेत आहे. अलीकडे गुरूजींसह वर वधू कडील मंडळी मंगलाष्टक म्हणतात. पूर्ण होण्यापूर्वीच लोक अक्षता उडवून बुफे एन्जॉय करायला गेले. त्यानंतर एक तास होम हवन आणि फोटोशूट सुरू होतं. त्यांच होमहवन संपेपर्यंत हॉल पूर्ण खाली होता. मी, हे विधी संपले की प्रेझेंट देऊनच जेवायला जाऊ म्हणून ऐसपैस बसलो होतो. माझ्या मित्राचा मोठा भाऊ येवून म्हणाला, “अरे सर, तुम्ही जेवायला नाही आलात, यांचं उरकायला अर्धा तास तरी लागेल. या ना तुम्ही जेवून.”

त्याचा मान राखावा म्हणून मी उठून उभा राहिलो पण हातातील गिफ्टचा बॉक्स घेऊन जेवायचं कसं हा प्रॉब्लेम होताच. अखेर गिफ्ट देऊनच जाऊ म्हणून मी पुन्हा बसलो. गुरुजी या फोटोशूटला कंटाळले होते.पण त्यांनी वाजवून दाम घेतले असल्याने त्यांचा नाईलाज होता. दोन तासांनी म्हणजे दीड पावणे दोन वाजता, होम हवन, सप्त पदी आणि बंध विधी पार पडला. नवऱ्या मुलाचा कान पिळून झाला. संपूर्ण हॉलमध्ये धूर पसरला होता. गुरुजी मंडळींनी आवरत घेतलं, त्यांनी आणलेल्या पिशव्या भरल्या. तेव्हा मला हायसे वाटले.

हे गुरुजी लोक महावस्ताद. सुप, रवळी, पंचे, कपडे, अस जे जे साहित्य लग्नासाठी लागत ते सोबत आणतात आणि कोरडी बिदागी घेतात. सोबत असणाऱ्या त्याच साहित्याने पाच पन्नास लग्न सहज लावतात, अर्थात प्रत्येक लग्नासाठी या साहित्याचे वेगळे पैसे ते लावतात. तर गुरूजींनी आवरलं आणि मला हायस वाटलं. कधी लग्न उरकले आणि मी बाहेर पडतो अस मला सारख वाटत होतं.

रिसेप्शनला तयार होण्यासाठी उभयता निघाले तस मी त्यांना गाठून प्रेझेंट मित्राच्या हाती दिले.दोघ गोडं हसली. पाया पडली. मी त्यांच्या डोक्यावर हात ठेवत औक्षवंत व्हा अस म्हणत मित्राला शेकहँड केले. खरं तर माझा त्यांना रागही आला असावा, अस वाटेतच अडवून आहेर करायचा म्हणजे जरा जास्तच झालं की, पण काही बोलले नाही.
“सर जेवूनच जा बरं.” अस म्हणे पर्यंत प्रेझेंट द्यायला अजूनही दोन चार जणं येऊन गेले.

मी डायनिंग हॉलमध्ये गेलो तिथे ग्रुप ग्रुपने आमंत्रित बसले होते .बरेच जण उभे राहून जेवण घेत होते. मी ही काफिल्यात मिसळून गेलो, मेनू चांगला होता, मराठमोळ्या जेवणा बरोबरच पंजाबी डिश, साऊथ इंडियन आणि चायनीज असा थाट होता. शिवाय दोन तीन फ्लेवर चे आईस्क्रीम होतेच. पाण्याच्या थंड आणि मिनी बॉटल अर्धवट पिऊन इतस्ततः पडल्या होत्या. अन्नाची नासाडी होऊ नये व ज्याला जे व जेवढ हवं तेवढ नेमक त्याला घेता याव हा बुफे पध्दतीने जेवण देण्याचा मुळ उद्देश. पण आमंत्रित, पून्हा पून्हा बुफेच्या रांगेत उभ रहावे लागू नये म्हणून प्रमाणापेक्षा जास्त वाढून घेऊन तो पदार्थ आवडला नाही म्हणून किंवा अंदाज आला नाही म्हणून न खाता अर्धी डीश तशीच टाकत होते. किती ही अन्नाची नासाडी? जवळ जवळ प्रत्येक लग्नसमारंभात हिच स्थिती आढळते.”अन्न हे पूर्ण ब्रह्म.” हे फक्त तोंडाने म्हणण्यापुरतं. गरीबाला एक वेळ पोटासाठी अन्न मिळत नसतांना अशी अन्नाची नासाडी म्हणजे माजच.

मी लहान म्हणजे आठ दहा वर्षांचा असताना समाजात कुठेही लग्नासाठी गेलो तरी बैठक भोजन असायचं,थोड्या थोड्या अंतरावर केळीच्या सोपावर किंवा बटाटा कापून त्यावर सुगंधी अगरबत्ती लावली जायची. संपूर्ण वातावरण प्रसन्न व्हायचे. वाढपी विचारून वाढायचे आणि पहिली पंगत बसली की हात जोडून “वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरिचे” म्हटल्यावरच जेवण जेवायला पंगत सुरवात करायची.ज्याला जे आवडेल ते तो पोटभर जेवून तृप्तीचा ढेकर देत आमंत्रित जायचा. आता सारखं कधी एकदा पोटात ढकलतो आणि घरी जातो अशी स्थिती नव्हती.





आज मी मित्राच्या मुलीच्या लग्नाला आलो ते माझ्या इतर मित्रांच्या आग्रही विनंतीमुळे. असो तर मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी निवडलेला हॉल प्रशस्त होता.स्टेज फुलांच्या सुन्दर मांडणीने सजवले होते सनई नसली तरी स्पीकरवर गाणं वाजत होत, स्टेजच्या बाजूस मोठ्या स्क्रीनवर pre wedding shoot ची क्षणचित्रे आणि संगीत सुरू होत. समुद्रावर, किल्ल्यावर, गार्डनमध्ये, मोटरसायकलवर असे फोटोग्राफरला वाटतील त्या लोकेशनवर शूट केलेले वर वधूचे अनेक फोटो एकामागून एक दिसत होते. वेगवेगळया अँगल मधून आणि पोझेस मधून घेतलेले फोटो डोळ्यासमोर दिसत होते.इतके सारे आणि विविध लोकेशनचे फोटो शूट करायचे तर किती वेळ द्यावा लागेल? असा प्रश्न मनात आला. अर्थात ही सगळं फोटोशॉप ची कमाल आहे हे कळणे अवघड नव्हते.या Pre Wedding shoot आणि Marriage events कव्हर करायला दिड दोन लाख घेतले असावेत. आता लग्न समारंभ किंवा अन्य कार्यक्रमाचे क्षण फोटो अल्बम आणि व्हिडिओ अस दोन्ही प्रकारे चित्रित करण्याचा रिवाज आहे. लग्नानंतर दोन्ही बाजूची मंडळी हा व्हिडिओ अल्बम पाहण्यासाठी वेगळा कार्यक्रम करतात अस ऐकून आहे.एवढेच चांगले नाते त्या दोन कुटुंबात कायमचे प्रस्थापित व्हावे तरच या कार्यक्रमाला अर्थ प्राप्त होईल.

पूढील बाजूस दोन तिन कोचच्या रांगा होत्या. मित्राने आमचं शाल, श्रीफळ देऊन स्वागत केलं. काही निवडक मंडळींचे स्वागत केले जात होते. लग्न समारंभात कसलीच कमतरता नव्हती. स्टेजवरील थाटमाट, सभागृहात जमलेली मंडळी, यावरून मुलीच्या लग्नाचे निमंत्रण शक्य तितक्या लोकांना दिल्याचे दिसत होते.लग्नानंतर कोणी आप्तांनी किंवा मित्रांने, वाटेत हटकू नये, का रे, मुलीच लग्न केलंस असं ऐकलं, आम्हाला विसरलास की?” त्याची समजूत काढता पुरेवाट म्हणून हल्ली Whatsapp message पाठवतात. तसाच स्नेह असेल तर या, नाही आलात तरी वा वा.

आज ज्या प्रकारे विवाह होत आहेत त्यात लग्नाचा मूळ उद्देश साध्य झाल्याचे दिसत नाही. नवरा मुलगा, नवरी मुलगी यांच्या दोन कुटुंबात एक सौख्याचा बंध निर्माण व्हावा, मनोमिलन व्हावे, अडिअडचणीत एकमेकांनी सांभाळून घ्यावे. गरजेनुसार मदत करावी हा या लग्नविधी मधील महत्त्वाचा गाभा आहे मात्र इथे दिसते ते दोन्ही कुटुंबातील सांपत्तिक स्थितीचे प्रदर्शन आणि परस्परानी समाजासमोर दाखवलेला उथळ व्यवहार. मित्रहो लग्न हे दोन कुटूंबाना एकत्र आणणारा सांस्कृतिक परंपरा जपणारा संस्कार आहे.पण “अति झालं आणि हसू आलं”, अशी स्थिती आज आहे. पाच पन्नास पक्वान्न, बुफेत वाया घालवलेलं अन्न, पायदळी तुडवल्या जाणाऱ्या अक्षता. अर्धवट पिऊन टाकलेल्या मिनरल पाण्याच्या बाटल्या हा केवळ श्रीमंती उन्माद झाला. हा मार्ग योग्य किंवा अयोग्य ते तरूण पिढीने ठरवले पाहिजे.

आजही बऱ्याच कुटुंबाची आर्थिक स्थिती बेतास बात अशी असते पण सामाजिक दडपण आणि मुलीला चांगले स्थळ मिळते म्हणून थोडी आर्थिक झळ सोसली पाहिजे या भावनेने क्षमता नसतांना अशी लग्न होतात.तर मुलाचे लग्न तर एकदाच करायचे हात आखडता घेतला तर नातेवाईक, समाज काय म्हणेल? या खोट्या समजुती मधून बऱ्याचदा पालक, विशेषतः बाप आपल्या म्हातारपणाची पुंजी प्रॉव्हिडंट फंडातून मोठे कर्ज काढून किंवा घरावर, शेतावर किंवा अन्य स्थावर मालमत्तेवर कर्ज घेऊन अशा लग्न समारंभाची तरतूद करतात.ज्या पालकास एक पेक्षा जास्त कन्यारत्न असतात त्यांची कानकोंडी अवस्था होते.दोन मुलींची लग्न करेपर्यंत बिचारा चिंतातुर होऊन ऐन पन्नाशीत म्हातारा होतो. जर मुले विचारी किंवा संमजस असतील तर आपल्या वडिलांना या अविचारातून नक्की बाहेर काढतील.

लग्न हा पवित्र संस्कार आहे. तो दोन कुटुंबातील सहज आणि विवेकी नात्याचा आविष्कार आहे. त्याला फक्त समारंभाचा डामडौल आणि किती हुंडा दिला? किती दागिने मुलीला घातले? जावयाला काय घातले? किती लोक लग्नाला उपस्थित होते? आणि कोणता बेंजो किंवा बँड आणला होता याची मोजपट्टी लावून मापण योग्य नव्हे. दोन्ही बाजूची मंडळी संमजस असतील तरच विवाह कार्यक्रम आनंदमय होईल.

वर पक्षाने अपेक्षांचे ओझे मुलीच्या बापावर लादले तर या आनंदी सोहळ्यात निखळ आनंद कसा असेल? म्हणूनच लग्न समारंभ कसे असावेत? खरच डामडौल आवश्यक आहे का? लग्न साधेपणाने करून उर्वरित पैसे मुलीच्या नावे ठेवल्यास तिच्या अडचणीला तिला मदत होईल हाच विचार दोन्ही बाजूने झाल्यास दोघांचे भावी आयुष्य नक्कीच आनंदी जाईल हे सांगायला कोणा कुडबुड्या जोतिष्याची गरजच नाही. अर्थात हा बदल अचानक घडणे शक्य नाही, या साठी पुढाकार विवाह इच्छुक जोडप्यांनी आणि दोन्ही बाजूच्या जेष्ठ मंडळींनी घेतल्यास बापाचे खांदे उतार वयात झुकणार नाही. त्याचेही जीवन आनंदी होईल, आनंदी राहील.शेवटी मुली, मुलांपेक्षा बापाच्या बापतीत संवेदनशील असतात असं म्हणतात. मुलीमध्ये मातृत्व लपलेल असत, मग या मातृत्वाने, आपल्या पालकांच्या आर्थिक स्तिथीचा विचार करायला नको का? आपल्या मैत्रिणी किंवा सासरच्या मंडळींना इंप्रेस करण्यासाठी इतका खर्च करण्याची गरज आहे का?

हीच गोष्ट वर म्हणजे मुलगा आणि त्याचे पालक यांच्यासाठी. त्यांनीही लग्न थाटामाटातच व्हावे असा आग्रह धरण्याची गरज आहे का? याचा विचार करावा. ज्यांच्याशी आयुष्य भराचे संबंध आपण जोडणार आहोत त्यांच्या आर्थिक क्षमतेचा त्यांनी नक्कीच विचार करावा. म्हणणे पटले तर नक्कीच स्विकार व्हावा. बरेच वर्षे करून कमावलेले पैसे भावनेच्या आहारी जात एक दिवसाच्या हौसेखातर खर्च करायचे की समजून उमजून पूढील भविष्याचा विचार करत लग्न हा संस्कार सोहळा आनंदमय तर करायचाच पण अनाठायी खर्च टाळायचा हे आपल्याच हाती आहे. चार वर्षांपूर्वी एका व्यापाऱ्याच्या मुलीने आपल्या लग्नासाठी खर्च होणाऱ्या पैशांतून पाच सहा कुटुंबाना पक्की घरे दिली आणि स्वतः च्या लग्नाचा आनंदा बरोबरच त्यांच्या जीवनात आनंद फुलवला हा विचार नक्की प्रेरणादायी आहे. शेवटी लग्न सोहळा तुमचा,खर्चही तुमचाच पण एक चांगला पायंडा पडत असेल तर का स्विकारू नये.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar

One thought on “लग्नसंस्कार, बंधन की सोहळा?

  1. Bhosle R. B.

    एक वास्तव…… सर.

Comments are closed.