वास्तुपुरुष भाग 1

वास्तुपुरुष भाग 1

गावाच्या मध्यभागी तो बंगला आजही उभा आहे. साठ वर्षांपूर्वी त्या बंगल्यात आडारकर यांचं सधन कुटुंब वास्तव्यास होतं, त्यांची शेती वाडी होती. शेतीचं काम पहायला स्थानिक कुळवाडी होते. घरकाम करायला तारी होती. त्या घराचा कर्ता पुरुष रवींद्र आडारकर मुंबई शेअर मार्केटमध्ये वडिलोपार्जित स्वतःची फर्म चालवत होता. तो कधी शुक्रवारी तर कधी शनिवारी उशीराच्या गाडीने घरी यायचा आणि पून्हा सोमवारी मुंबई गाठायचा. गावातून रेल्वे गाडीवर त्याला सोडायला आणि गाडीवरून न्यायला घोडागाडी यायची. या नरेंद्रनं मुंबईत रखेल ठेवली होती असं लोक म्हणायचे, सत्य फक्त ईश्वराला माहिती. मात्र नरेंद्रची पत्नी प्रभा ही याच बंगल्यात रहायची. घरातील सगळी सुत्र तिच्या हाती होती. लग्नाला दहा वर्षे झाली तरी तिला मुलबाळ नव्हते त्यामुळे ती पहावे तेव्हा तणतणत असायची. तिची सासू पार्वती काकू मात्र सुस्वभावी होती, नेहमी तिची समजूत काढायची, “प्रभे तू तरूण आहेस, अजूनही तुला मुल होऊ शकत. त्या नारायणावर विश्वास ठेव तो कोणाच वाईट करत नाही. तुझ तरी का करेल?”

त्या बंगल्यात शेजार म्हणून आडारकरांनी दोनतीन भाडेकरू ठेवले होते तेवढीच घरात सोबत. बंगला मालकांकडे होणाऱ्या विविध कार्यक्रमात ते आवर्जून हजेरी लावत. बंगल्याच्या मागे बाग होती, त्या बागेत अनेक फळझाडे, फुलझाडे होती. एक बाजूस रहाट बसवलेली विहीर होती. या राहाटाने पाणी शेंदून बागेस घातले जाई. या विहिरीपाठी एक चिंचेचे अजस्त्र झाड होते. ते किती जुने असावे याची कोणाला कल्पना नव्हती. त्याच झाडावर त्या घराच्या वास्तूपुरूषाने व्यवसायात तोटा झाला म्हणूनआत्महत्या केली अशी वंदता होती. दुपारी बारा साडेबारा ते दीड वाजे पर्यंत कोणीही विहिरीवर जात नसे. संध्याकाळी दिवे लागण होण्यापूर्वी तेथे घराची मालकीण दिवा लावून येई. दर अमवास्येला तिथे नारळ देण्याची प्रथा होती. विसरून अमवास्येला नारळ दिला नाही तर “तो” पूढील अमवास्येपर्यंत त्या घरातील कुटुंबाला आणि भाडेकरूना त्रास देई.

मध्यरात्री बंगल्यातल्या लाकडी जिन्यावर कुणीतरी चालत असल्याचा आवाज येतो अस भाडेकरू सांगत. अर्थात याचा प्रत्यक्ष साक्षीदार कुणीही नव्हते. घरात कुणी आजारी पडलं तरी प्रत्येक जण त्यालाच दोष देत आणि उतारा म्हणून आजारी माणसाच्या अंगावरून उतरलेले लिंबू, मिरची कोळसा,काळ्या कपड्यात बांधून त्यावर गुलाल, अबीर टाकून झाडाखाली ठेऊन येत. त्या घरातील वास्तव्यास असणाऱ्या सगळ्यांना या उताऱ्याचा या पूर्वी अनुभव आल्यामुळे अमवास्या कोणी विसरत नसे.आज पर्यंत “त्याने” कोणाला शारिरीक इजा पोचवली नव्हती म्हणूनच कुणी फारसे गांभीर्याने घेत नव्हते.

या वास्तूपुरूषाच्या वाटेवरूनी रजस्वला गेली तर ती तापाने फणफणत अनेक दिवस आजारी पडायची म्हणूनच अडचणीत असतांना कोणतीही महिला अवेळी त्या बंगल्या बाहेर, त्याच्या वाटेत फिरण्याची हिंमत करत नव्हती. भितीचे गूढ वलय त्या बंगल्याभोवती आणि त्यात राहणाऱ्या कुटुंबा विषयी सर्वत्र होते.भाडेकरूना मालक भाडे विचारत नव्हते, उलट त्यांच्या अडचणीत त्यांना आर्थिक मदत करत होते म्हणूनच या विचित्र वास्तूत ते रहात होते.

या बंगल्याचा या पिढीतील तरुण मालक रवींद्र मात्र या सगळ्या गोष्टीला थोतांड म्हणे. तो असताना असा प्रकार कधी घडलाही नव्हता. त्यावर सर्वांची मखलाशी अशी होती की तो अधिकृत वारस असल्याने वास्तू पुरुष त्याच्या वाटेत येत नाही. त्याला बाधा पोचवत नाही. भाडेकरूंची खात्री पटवण्यासाठी रवींद्र अमवास्येला त्या चिंचेच्या झाडाखाली मध्यरात्री जाऊनही आला होता. दुसऱ्या दिवशी जागरण झाल्याने त्याला पित्ताच्या उलट्या झाल्या तर लोक म्हणू लागले त्याने वास्तूपुरुषाला आव्हान दिले म्हणून त्याला शिक्षा मिळाली. पार्वती काकू त्याला म्हणाल्या, “विषाची परीक्षा घ्यायला हवी का? नको असा वेडेपणा करू, तुझे काही बरे वाईट झाले तर आम्ही कोणाकडे पहायचे?” रवींद्र मात्र ठाम होता.तो हसून म्हणाला,”आई तू उगाच नको चिंता करू, हे सगळं खोट आहे.” ती म्हणायची,”अस आहे तर प्रभेची कूस अजून का नाही उजवली?” त्याच्याकडे याचे उत्तर नव्हते, तो म्हणाला,”वेळ आली की नक्की बाळ होईल, थोडा धीर धर. सर्व गोष्टी योग्य वेळी होतातच”

रवींद्र मुंबईवरून येतांना बरच काही घेऊन यायचा,फळांच्या करंड्या, सुका मेवा, कधी नवीन डिझाइनच्या साड्या तर कधी नव्या घडणीचे दागिने,अत्तराच्या कुप्या पण प्रभा मात्र नेहमी हिरमुसली असायची. संमजस सासूही कुस उजवत नाही म्हणून अधुनमधून टोमणे मारायची त्यामुळे प्रभा नवऱ्यावर नाराज होती. एक दोन वेळा तिने आडून आडून “मुंबईत तुमची कोणी आहे अस ऐकलय, ते खरं का?” असा प्रश्न विचारला होता.तो रागावून म्हणायचा, “मी माझा व्यवसाय सांभाळू की असली थेरं करू? कोण सांगते त्यावर तू विश्वास कसा ठेवतेस? असा संशय घेणार असशील तर एकटीच रहा, मी मुंबईलाच रहातो.” शेवटी डोळ्यांना पदर लावत तिलाच त्याची गयावया करावी लागे.

एका शनिवारी तिने रवींद्रकडे आपली खंत बोलून दाखवली, “लग्नाला दहा वर्षे होऊन गेली, अजून किती वाट पाहणार आहात, निदान मुंबईच्या डॉक्टरांना दाखवून येऊ.” रवींद्र नाही म्हणू शकला नाही. सासूची परवानगी घेऊन ती तयारी करून आठवडा भरासाठी मुंबईला जायला निघाली. बंगल्यातील भाडेकरू आणि कामवाली यांना लक्ष द्यायला सांगून ती बाहेर पडली. ती टांग्यात बसली आणि घोडा उधळला, बहुदा तिच्या साडीच्या रंगाने घोडा घाबरला, पण दोष दुसऱ्या कुणालाच गेला. म्हादूने खूप प्रयत्न करूनही घोडा शांत होईना.

शेवटी तिचे जाणे चुकले आणि रवींद्र एकटाच निघून गेला. ती बंगल्यात परतली आणि वास्तू पुरुषाच्या नावाने तिने बोटे मोडली, “ज्याला आपल्या लेकराबाळाचं भलं पाहवत नाही तो कसला वास्तू पुरुष?” सासू रागावली, “सुनबाई गेलेल्या माणसांविषयी असलं बोलणं तुला शोभत नाही, देवाकडे जा आणि माफी माग, त्या शिवाय माझ तोंड पाहू नको.” सासू म्हणाली म्हणून तिने ऐकलं पण त्या दिवसापासून ती अबोल बनली. आपण जायच ठरवलं आणि नेमकं घोड्याने थैमान घातलं, नक्की या वास्तूला कुणाचा तरी शाप आहे म्हणूनच माझी कुस उजवत नाही. त्या दिवशी ती जेवली नाही. काही न करता बसून राहिली. सासूने समजूत घालूनही तिचा राग शांत झाला नाही. पहाता पहाता आठवडा संपत आला, दर शनिवारी रवींद्रच्या प्रतीक्षेत साज शृंगारून वाट पाहणारी ती आजही निस्तेज “आबोली” सारखी तिच्या खोलीत बसून होती. ना स्वयंपाक करण्याचे भान होते ना दिवे लावण्याचे. सासुच रागावून म्हणाली, “प्रभे माझ्यावरचा राग अजून गेला नाही वाटतं! अग आज अमवास्या दिवा नाही का लावायचा आणि आज शनिवार सुद्धा आज रवी येणार लक्षात आहे ना?

सासूचे बोलणे ऐकल्यावरही ती तशीच बसून होती तेव्हा सासुच म्हणाली “प्रभे आजचा दिवस फुकट घालवू नको हो, तो नारायण तुला यश देईल. जा उठ,आधी देवखोलीत आणि झाडाखाली दिवा लावून ये.” यांत्रिकपणे ती उठली, तिने देवाला दिवा लावला,आणि दुसरा दिवा घेऊन ती बंगल्या मागील विहिरी जवळ गेली. दर अमवास्येला ती दिवा लावत होती पण का कोण जाणे आज तिला भिती वाटत होती. अन तेव्हाच अचानक वाटेतच तिला पाळी आली. तिच्या हातातील तबकात असणारा दिवा फडफडून विझून गेला तिला भोवळ आल्या सारखी वाटली आणि ती जोराने ओरडली, “सासुबाई ss ss ss”

तिची ती हाक बंगल्यात घुमत गेली, बंगल्यातील भाडेकरूनी तीची हाक ऐकली. वसू आणि त्याची पत्नी सविता धावत मालकीण पार्वती बाईकडे आल्या आणि सविता म्हणाली, “काकी तुमच्या सुनबाईची हाक कानी आली,ती बंगल्या पाठी गेली आहे का?” “हो! मीच तिला म्हणाले,आज अमवास्या आहे,दिवा लावून ये म्हणून, चल पाठी जाऊन पाहू. प्रभा, ए प्रभा, ए प्रभा, बहिरी झाली की काय ? ओ ही देत नाही. सवे या कंदिलची वाट मोठी कर. आता तर सात वाजले एवढा अंधार दाटून यायला काय झालं?”

प्रभे, अग कुठं आहेस, चालता ,चालता त्या धडपडल्या. नशीब सविताने पटकन हाताने धरलं. त्यांच्या पायाजवळ प्रभा पडली होती ती त्यांना दिसलीच नाही. सविताने कंदील फिरवून तिच्या चेहऱ्यावर धरला, प्रभा अस्ताव्यस्त पडली होती, चेहरा वेडा वाकडा झाला होता. पार्वती काकूंनी खाली बसून तिचा हात धरून वर ओढला.


“प्रभा,पोरी,उठ,इथे कशी पडलीस?”, पण तिची हालचाल नव्हती, त्या घाबरल्या. “वसुदेवss, वसूदेवss, जरा इथे ये रे, ए वश्या अरे लवकर ये, ही पोरगी इथे अचानक पडली, काही कळत नाही, तिची शुद्ध हरपली की काय? देवा आता रे काय करायचं? तो रवींद्र खुशालचेंडू मुंबईत, ही एकटी इथे. वेळेला मदतीला कोणी माणूसही नाही.” सविता, स्वतः घाबरलेली, तरी पार्वती काकूंना म्हणाली, “काकू हे येत आहेत,तो पहा याच दिशेने कंदील येतोय. धीर धरा.”

वासुदेव आणि देवेंद्र कुलकर्णी जवळ आले, त्यांनी प्रभाच्या नाकाला कांदा ठेचून लावला. ती घुसमटली, “सोडा मला, सोडा, सोडा म्हणते ना, मी तुमच्या बरोबर नाही येणार,नाही येणार. आज हे येणार आहेत, मला जाऊ दे, जाऊ दे म्हणते ना! “

“वहिनी,वहिनी,उठा,घाबरू नका तुम्हाला कोणी नेत नाही, मी देवेंद्र, आणि हे पाटील चला घरी. तुमच्या सासूबाई आहेत इथे. बिलकुल घाबरू नका.” “प्रभे अग काय झालं तुला,उठ हो ,चल पहिलं, वसूदेव निट धरा रे पोरीला चला घरी न्या, मग पाहू काय झालं ते. वासुदेव तिला आधार द्या, चल ग प्रभे. तुझा नवरा आला तर तू नाहीस हे पाहून घाबरून जाईल.”

वासुदेव आणि देवेंद्रनी तिला हाताला धरून उठवलं, सविताने कंदील धरला,ती त्यांच्या सोबत चालू लागली.
” आई मी इथे कुठे?, हे आले का? आई, आई मला काय झालं?” “काही नाही हो,आधी घरी चल मग सांगते.”पार्वती काकू म्हणाल्या. त्यानीं तिला तिच्या खोलीत नेली.तिला बंगल्यात आणतांना देवेंद्रची पत्नी शर्मीला लगबगीने आली, “अहो वहिनींना काय झालं? शुध्दीवर आहेत ना? कांदा लावा नाकाला पहा कशा पटकन शुध्दीवर येतात त्या.” देवेंद्रने रागाने पत्नीकडे पाहिलं,” थोड शांत रहा,वहिनी वाटेत अडखळून पडल्या असाव्या आता ठिक आहेत. पाण्याचा तांब्या भरुन आण.” पार्वती काकूंनी प्रभेच्या डोळ्यांना पाणी लावलं. तिच्या चेहऱ्यावरून ओला हात फिरवला, “प्रभे,आता कस वाटतयं? ठीक आहेस ना की डॉक्टरना बोलवायला पाठवू?” तिने सासूकडे पहात मानेनेच नकार दिला. सविताने पार्वती काकूंना विचारल, “काकू थांबयला हवं का तुमच्या सोबतीला. वहिनींना चहा करुन आणते.” “प्रभे थोडा चहा घेतेस का? जरा बरं वाटेल, सवे अस कर माझ्याच स्वयंपाक घरात चार पेले चहा कर आणि तुमच्या यांनाही दे हो, बिचारा हाक मारल्या बरोबर धडपडत आला.”

ती चहा करायला गेली. शर्मिला प्रभाच्या पायाशी बसली आणि हळू आवाजात हाक मारत म्हणाली,”वहिनी कस वाटतयं? पाय चेपून देवू का? लवकर बऱ्या व्हा आज भावोजी येणार ना?” ही मात्रा लागू पडली,ती घडाळ्याकडे पहात उठण्याचा प्रयत्न करत म्हणाली, “हो हो आता हे स्टेशनवर आले असतील. आई, म्हादू काका यांना आणायला गेलाय ना?” ती उठतांना तिला पाळी आल्याचं तिच्या लक्षात आलं, तसं ती बाथरूमच्या दिशेने निघाली, “प्रभे अग तो यायला वेळ आहे,तू पडून रहा पाहू” ,पण सासूच न ऐकताच ती निघून गेली.सासूला कळेना हे अस विचित्र का वागते? सासू बाथरूमच्या दिशेने गेली तेव्हा ती म्हणाली, “आई मला अडचण आली, आज ते येणार आहेत पण त्यांच करायला मी घरात नाही.”

बराच उशीर झाला तरी रवींद्र आला नाही तशी. पार्वती काकूंची घालमेल होऊ लागली, त्या येरझाऱ्या घालू लागल्या, त्यांनी किरण ठाकूर यांना हाक मारली,ते ही याच रेल्वे गाडीने नियमित येतात हे तिला ठाऊक होते, त्यांची मुलगी वैदेही खोली बाहेर येत म्हणाली,”आज्जी, बाबा अजून आले नाहीत, बहुदा रेल्वे लेट आहे, काही काम होत का?” “अग, तुझा रवी काका अजून आला नाही म्हणून चौकशी करत होते.” एवढ्यात टांग्याचा आवाज आला, टांगा थांबला आणि रवींद्र पायऱ्या चढून दिवाण खोलीत आला, त्याच्या मागे म्हादू सामान घेऊन आला. “प्रभा,ये प्रभा, कुठे आहेस?” रवींद्रची हाक खोलीत दूरवर गेली, तशा पार्वती काकू बाहेर येत म्हणाल्या,”आलास का? बरे झाले, मला कोण चिंता लागून राहिली होती,गाडी लेट झाली का?”
“आई प्रभा कुठे आहे? मी आलो आहे,तिला कळत नाही का?” “अरे उगाचच रागावतो आहेस,तिला अडचण आहे म्हणून मागच्या खोलीत बसली आहे. तुझं टॉवेल,गरम पाणी सगळं तयार आहे,तू अंघोळ कर तोवर जेवण तयार होईल,की मग अगोदर थोडा चहा घेशील?”

“हू s s s ,तरीच म्हटलं,बाई साहेबांचा राग अजून गेला की नाही.” तो पाठच्या खोलीच्या दिशेने पहात, आईशी काही न बोलता बाथरूमच्या दिशेने निघून गेला. पार्वती काकू काय समजायचे ते समजल्या, प्रभेला अडचण असल्याने रवी रागावला होता, त्याच येण फुकट गेलं होतं.”

जेवण खाण झाल्यावर पार्वती काकूंनी घडला प्रकार, मुलाला सांगितला ते ऐकून तो आईवर रागावला,”आई हे सगळं घडलं आणि तू आता मला सांगतेस? तिला एकदा डॉक्टरांकडे तपासून आणली पाहिजे, उगाचच उपवास तपास करते आणि मग हे अस होत. तिला अशक्तपणा आलाय उगाचच वड्याच तेल वांग्यावर काढू नका.”
“अरे, तू प्रवासाने दमला होतास म्हणून नाही सांगितलं,आता सांगितलं ना,जा जाऊन तिची चौकशी कर,तू तिला भेटायला गेला नाहीस म्हणून ती रागावली असेल.” ती अद्यापही जेवली नव्हती,पांघरूण ओढून झोपली होती, “प्रभा,,ए प्रभा ऐकतेस ना?अग पडलीस कशी, चक्कर आली का तुला?हे बघ उगाच उपवास तपास काही करु नको, नशीबात असेल ते होणार. तुझ्यासाठी आम्ही काय आणलय ओळख बघू?” ती ऐकूनही न ऐकल्यासारख दाखवत शांत होती.तस तो म्हणाला, ” ठिक आहे, नाही बोलायचे तर आम्ही उद्या सकाळी परत जातो. नाही तरी आमची गरज आहेच कुणाला.” ती पांघरूण काढत उठून बसली,रडत रडत तिने घडला प्रकार त्याला सांगितला तस तो म्हणाला,”तुझा भ्रम आहे तो. तू नेहमी नेहमी उपवास करते म्हणून तुला अशक्तपणा आला असेल. सर्व ठीक होईल. माझे
आजोबा आपलं वाईट का करतील.”, सासूने तिच ताट आणून दिलं.

त्याच्या बरोबर गप्पा मारता मारता तिने जेऊन घेतलं. त्याने तिची समजूत घातल्याने तिच्या मनावरचा ताण कमी झाला होता. रविवारी त्याने तिच्यासाठी आणलेला मलमलचा गाऊन तिला दाखवला. गुलाबी रंग तिच्या आवडीचा, रवींद्रने तो गाऊन स्वतःच्या अंगावर धरला, तशी ती लाजली. “शी तुमच आपल काहीतरी, हे अस बोंगड, नुसतच शरीरावर घालायच म्हणजे लोक हसतील की, म्हणतील इंग्लिश मॅडम आहे की काय?” तो तिला हसून म्हणाला,”अग ही लेस अशी कमरेला बांधायची आणि हा फक्त रात्री घालायचा, दिवसा नाही काही, मुंबईत रात्री हे असेच सुटसुटीत कपडे घालतात.” ती लाजून म्हणाली, ” खरं की काय? आणि तुम्ही कुठे पहायला गेला होता? खरं सांगा, ती कोण तुमची मुंबईला बया आहे ती तर घालत नाही ना?” तो रागावला, “हे तुझ्या डोक्यात कोणी काय खुळ भरून दिलय कोणास ठाऊक? तू पून्हा अस बोललीस तर मी येणार नाही हो, मग बस बोंबलत.” तस ती गयावया करत म्हणाली, “मी कुठे म्हणते, लोक तस म्हणतात.
पण खरच तुमच तस काही नाही ना? ,घ्या माझ्या गळ्याची शप्पथ” त्याने तिच्या गळ्याला हात लावण्याची खूण करत, शप्पथ घेण्याच नाटक केल आणि म्हणाला,” झालं, बाईसाहेब आता तरी पटलं ना.” ती हसली,”काय खर नी काय खोटं, माझ मलाच कळत नाही,पण माझीच कुस देवाने तशीच का ठेवावी? मी काय त्याच घोडं मारलं? पुढच्या वेळेस मला नक्की नेणार ना मुंबईला?”

“अगदी नक्की, त्या दिवशी त्या घोड्याने घोळ घातला नसता तर आपण जाणारच होतो, खरं ना? जा निवांत झोप.” रविवारी सकाळी, म्हादूला सोबत घेऊन तो बागकाम करे. वेड्या वाकड्या वाढलेल्या फांद्या कापून टाक,तर कुठे झाडांची मुळ कुदळीन मोकळी कर, झाडांना गोवर टाक अशा कामात सकाळ निघून जाई. अकरासाडेअकराच्या सुमारास तो बाजारात जाऊन घरात काय हवंनको ते घेऊन येई. जेवणानंतर वामकुक्षी घेता घेता ग्रामोफोनवर जुनी गाणी ऐकत झोप घेई. संध्याकाळी कधीतरी शेतावर जाऊन येई. येतांना शेतावरून भाज्या तर कधी चिकू, पेरू घेऊन येई. कधी शेजारी गप्पा मारता मारता एकत्र पत्यांचा डाव टाकत. रात्री जेवतांना आई बरोबर थोड्या गप्पा करताकरता दिवस कसा संपला कळतही नसे.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar