वास्तुपुरुष
मी इथे वास्तव्य करून आहे त्याला पन्नास वर्षे झाली, म्हणजे माझा जन्म इथलाच, खरं तर तुमच्या भाषेत माझी गोल्डन ज्युबिली नाही का? माणसाचा जन्म होताना मातेलाच वेदना होतात पण मला जन्म देतांना किती जणांनी सायास केले असावेत? कोण कोण राबले असावेत? माझ्या जन्माच्या वेळी त्यांनी प्रसूती वेदना झेलली असावी. त्यांना इजा झाली असावी, अर्थात ही माझी आपली समज बरं का! कारण जन्मापूर्वीचं आठवण्याचं भाग्य मला कुठे? तरी पण एका आईला, बाळाला जन्म देताना किती यातना होत असाव्यात ते संवेदनशील व्यक्तीला नक्की कळत असावं.
माझ एकदाच, जंगी स्वागत झाल्याच मला आठवतं. जन्मानंतर मला हार घातले होते, लायटिंग केली होती आणि पुरोहितांनी माझ्या शरीरावर स्वस्तिक कोरले होते, माझ्या भोवती सुंदर रांगोळी काढली होती. प्रवेशद्वारावर गो पावले होती. फारच सजवलं होतं मला. नामकरण करुन छान नाव ठेवलं होतं “प्राजक्त”. ज्यांच्यासाठी माझा जन्म झाला त्यांनी माझ्यावर दुधाचा अभिषेक केला. वास्तूपुरूष म्हणून मला सोन्याचे आभुषण बहालही केले. माझ्या डोक्यावर पवित्र जल कलश ठेवला होता. मंत्रोच्चार करत, शांती शांती शातीsss असं म्हणत माझ्या सर्वांगावर जलभिषेक केला होता. किती बरं वाटत होतं म्हणून सांगू, सगळं सगळं कालच घडलं असावं इतकं स्पष्ट आठवतय. खुप आप्तेष्ट जमले होते.
अगदी आनंदी वातावरण होते. सनईचे सुर निनादत होते. गोड धोड जेवणाच्या पत्रावळी उठल्या. त्या वेळी ती टेबलही नव्हती आणि आता असत तस बुफे की काय म्हणतात तस जेवणही नव्हतं. जन्म कृथार्थ झाला अस तेव्हा मला वाटत होतं. हो, तेव्हा, शिशु असेपर्यंत सर्वच बालकांचे लाड होतात नाही का? माझेही झाले. नाकबूल करण्याचा प्रश्न नाहीच. माझी जन्मदात्री रोज मला न्हाऊ माखू घालायची. शरीरावर कुठे कशाचा डाग तर नाही ना हे निरखून पहायची. सुरवातीस त्या थंड पाण्याने शिरशिरी यायची पण तो फिनाईलचा सुगंधी साबण माझ्या अंगाला चोळला की मौज वाटायची. ते सुख कैक वर्ष मी भोगलं.
माझे पिता दर महिन्यात एक रविवारी त्यांच्या मनाने अंघोळ घालायचे. त्यांचा हात थोडा खरखरीत होता, खराट्याचा ब्रश घेऊन माझी काया चोळ चोळ चोळायचे आणि वरून थंडगार पाण्याने धू धू धुवायचे,तसं त्यांचं माझ्यावर प्रेम होतं पण पुरुषी रांगडा स्वभाव, त्यांना माझ्या भावना कशा कळाव्या? माझी जननी ओरडायची, “अहो सहस्त्रबुद्धे तुमच्या चोळण्याला काही सीमा? बिचारं खंगुन जाईल की, पुरे करा आता, त्याला थंडी लागत असेल.” तरी हसून म्हणायचे, “उमे जरा बाहेर येऊन पहा या कोवळ्या किरणात कसं लख्ख दिसतय.” ती कामात व्यस्त, तरीही केवळ पिताश्रीना वाईट वाटू नये म्हणून पाहायला यायची, येताना सहस्त्रबुद्धे यांना चहा घेऊन यायची आणि उसन हसत म्हणायची, “अहो इतक लख्ख दिसतय की, पावडर लावायची गरजच नाही. तो दिनकर तो प्रभाकर तो भास्कर या बाळाचा गोरेपान देह पाहून लाजेल.”
affiliate link
दर दोनचार वर्षांनी मला नवीन वस्त्र मिळायची, आधी वेगवेगळ्या कापडांच्या चळती माझ्या शरीरावर ठेऊन कोणते कपडे शोभून दिसतील ते घरातील माणसे वेगवेगळ्या प्रहरी पहायचे आणि नंतर रंगारी येऊन त्यांच्या द्रवरूपी तलम कापडाने माझी वस्त्रे शिवून द्यायचे. पुन्हा नवी कांती नवी झळाळी मला प्राप्त व्हायची. पांथस्थ मुद्दाम उभे राहून मला पहायचे, कौतुक करायचे आणि म्हणायचे सहस्त्रबुद्धेचा प्राजक्त आहे, तो सोज्ज्वळच असणार, आ हा हा! ते ऐकून खुप आनंद व्हायचा. माझे जन्मदाते कृतकृत्य व्हायचे. दुसऱ्याला आनंदी पाहून आनंदी होतो तो सुखी, नाहीतर हल्ली बरेचदा दुसऱ्याच सुखच लोकांना टोचत. त्यांची जातकुळी वेगळीच.
माझ्या डोळ्यांनी मी किती काय पाहिलं, ते सांगून संपणार थोडंच आहे? कधी येथील बाळांचा जन्म तर कधी साठी. आशा दिवशी माझं पण जंगी स्वागत व्हायचे. मला अभ्यंग स्नान घालून, कधी फुलांच्या माळा तर कघी पताका यांनी शोभिवंत आरास केली जायची. कोणाची नजर लागू नये म्हणून कोळसा आणि लिंबू माझ्या पायात बांधून ठेवत. माझं आवार गुलाब, प्राजक्त, जास्वंद, वेल मोगरा, अनंत अशी फुलझाडे तर केळी, पपई, सिताफळ,पेरू, ईडलींबू इत्यादी फळझाडे यांनी हिरवगार दिसत असे. प्राजक्त तर माझ्या प्रवेशद्वारावरच होता. माझा आयकॉन होता. वाटेवर नेहमी फुलांचा सडा पडलेला असे.
रोज सकाळी माझी जन्मदात्री वाटेवरची फुले हळूवार उचलून परडीत ठेवायची आणि तितक्याच नाजूक हातानी हार तयार करायची. पक्षी आणि फुलपाखरे माझ्या अवती भोवती घोटाळत असत. कधी पोपट पेरूवर बसून विठू विठू चा गजर करत असे. माझ्या शोभिवंत शरीराकडे पहातांना त्याला माझा हेवा वाटत असावा. कधी कोकीळ येऊन कुहू, कुहू बोलांनी आसमंत दणाणून टाके. कबूतर मात्र मला कधी आवडली नाहीत , माझ्या सर्वांगावर बसून घाण करण्यात त्यांना काय आनंद मिळे त्यांनाच ठाऊक. मला प्रचंड राग येई पण मी हतबल होतो.त्याच्यावर जोराने ओरडाव अस वाटे पण कंठातून सुरच उमटत नसे. कधी कधी कावळे कर्कश ओरडून कंटाळा देत. भोग वाट्याचे दुसर काय!
माझ्या मालकांचे छोटे पिल्लू भारी खट्याळ ते मोबाईल कॅमेऱ्याने वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून फोटो घेत असे, सगळीच गंम्मत. माझ्या बाबत मला कौतुक करून घ्यायला आवडलं तरी तुम्हाला वेळ हवा ना? उगाचच पाल्हाळ लावून काय फायदा? नाहीतर माझ्या बडबडीला कंटाळून जाल निघून. तुम्ही ढीग जाल हो पण मी तुम्हाला जाऊ दिले तर ना? तर असं माझं आयुष्य खूप सुखात गेलं. ऐन उमेदित होते. उत्साह दांडगा होता.घरात लहान मुल होती, त्यांच्या गडबड गोंधळात दिवस निघून जायचा. रात्री मात्र अगदी एकट आणि निवांत वाटायचं पण अस होण स्वाभाविक होतच.
माझं नूतनीकरण झालं तेव्हा मी बत्तीस वर्षांचा होतो, माझ्या तुळ्या तोडून त्यांना दुसऱ्या तुळ्या जोडण्यात आल्या, आणि गरज म्हणून वरती बांधकाम झालं.जागा कमी पडू लागली म्हणून माझ्यावरती नवी जबाबदारी दिली. हे नुतनीकरण करतांना माझ्या अवतीभोवती असणारी माझी सहकारी झाडे बळी पडली. अगोदर माळी दादा चार सहा महिन्यातून यायचा आणि गरज असेल तिथच हत्यार चालवून मला मोकळा श्वास घेता यावा म्हणून तोडकाम करायचा. तेव्हा गोकुळ नांदत होतं मी खुशीत होतो,तिथं दुड दुड पावलं वाजली की वात्सल्याने मन उचंबळून यायचं पण मला एक जागी स्थिर राहण्याचा शाप त्या नियंत्याने, विश्वकर्माने दिला असल्याने माझा नाईलाज होत असे.
तरी पण ती इवली इवली पावलं आणि छोटे हात मला स्पर्श करत तेव्हा अंगावर आनंदाने शहारे येत. आत्ताही आठवणीने शरीर शहारतय. पण नंतर कोणाची तरी मला दृष्ट लागली. माझ्या जन्मदेत्या घरी कलहाची फेरी आली.
रोज काहीतरी अघटित घडू लागलं, भांड्याला भांड लागू लागल. कोणीतरी म्हणाले ग्रहशांती करा, या वास्तूत राहू केतूंच वास्तव्य आहे. पुरोहितांना बक्कळ बिदागी घेऊन होम हवन केल. पण माझं मन मात्र दुहीने विच्छिन्न झालं. दोन सख्खे भाऊ एकमेका विरूद्ध भांडून घर डोक्यावर घेत. या सर्व प्रकारांनी माझ्या जन्मदात्यांना किती दुःख झालं असाव त्यांनाच ठाऊक. सदानंद इथल पहिलं बाळ, त्याच पडणं, आधाराने चालणं आणि समोरच्या मातीत खेळताना पाहणं सगळीच गंमत. त्याच्या नंतर चार वर्षांनी स्वरूप जन्मला, नावाप्रमाणेच होता पण अगदी हट्टी, हव ते हव असा खाक्या, बिचारा सदानंद, स्वरूप ने भोकांड पसरल की त्याला नेहमी आपली वस्तू त्याला द्यावी लागे. पण मुल मोठी झाली त्यांची लग्नही धामधुमीत केली आणि घराला ग्रहण लागलं, वैचारीक मतभेद वाढत गेले.
अकस्मात माझ्या पित्यांनी इहलोक गाठला. मला खरच खूप दुःख झालं. ते गेले आणि त्यांच्या मागोमाग माय माऊली गेली. माझी वास्तपूस्त करणारं कुणी उरलच नाही. ते असेपर्यंत माझी काळजी घेत. मला कोणी दुखापत करू नये म्हणून सजग असत. ते गेले आणि दर आठवड्यातून होणारी माझी देखभाल बंद झाली. कधीतरी बाहेरून माणसे येत आणि तासाभरात कापाकाप करून निघून जात. शेवटी ती नोकर मंडळी,हुकमाचे ताबेदार. त्यांच्याकडून स्नेह, प्रेम याची अपेक्षा कशी करणार?
माझ्या शरीरावर कबुतरे आणि कधीकधी कावळे बसून जात. त्यांनी फळे खाऊन टाकलेल्या विष्ठेतुन माझ्या शरीरावर वड, पिंपळ कधी उगवले ते मला कळलच नाही. त्यांनी डाव साधला, माझं शरीर ते पोखरत गेले अन माझी शक्ती शीण झाली. मी पन्नाशीकडे झुकलो होतो तरी निश्चल उभा होतो. वादळ वारा, पाऊस पाणी सोसूनही पिल्ले सांभाळत होतो. त्यांची किलबिल ऐकत सुखावत होतो. जन्मदेत्या पित्याचे ऋण मनापासून चुकवत होतो. माणसे पन्नाशी, साठी साजरी करतात तसा सोहळा आमच्या नशीबात का नाही? आम्हाला भावना आहेत. आम्हालाही आनंद, दुःख होत हे मनुष्याला का कळत नाही?
अधूनमधून माझी तब्येत ढासळत होती, माझ्या शरीराची तक्रार वाढत होती. एक दिवस काही पाहुणे आले. माझ्या भोवती फिरून आपसात काही बोलू लागले. एकाने स्टँडवर यंत्र अडकवून माझ्या आजुबाजूचे निरीक्षण सुरु केले. दुसऱ्या टोकाला दुसरा माणूस उंच काठी घेऊन उभा होता. तर दुसरी दोन माणसे टेप घेऊन मोजमाप करत होती मला कळेना त्यांचे नक्की काय चालले होते.पण त्यांची कुजबुज ऐकून मला भिती वाटू लागली. नक्की त्यांनी काय षडयंत्र रचले माझे करायचे ठरवले आहे ते कळेना पण त्या दिवसापासून माझी झोपच गायब झाली.
एक दिवस सकाळीच माझ्या आवारात काही वाहने आली. काही धडधाकट माणसे घरात शिरली ,त्यांनी घरातील सामान बाहेर काढले आणि ट्रक भरुन वाटेला लागला.त्या दिवसापासून घरातील वावर थांबला. रात्री मी अगदी एकटा पडलो. एकटा आणि एकाकी. माझा साधा निरोप ही कुणी घेतला नाही. ना कोणी सांत्वन केले. दुसऱ्या दिवशी सकाळीच काही माणसे आली. त्यांनी पहार, टिकाव, फावडे असली हत्यारे आणली होती. त्या मधील एका वयस्क माणसाने मला नारळ वाढवला, हार घातला. दंडवतही केला. त्या परक्या, उपऱ्या माणसाला वाटले ते माझ्या मालकांच्या मुलांना कळले नाही याला काय म्हणावे?
पाहता पाहता माझ्या शरीराचे भाग त्यांनी ओरबाडून काढायला सुरवात केली, मला किती वेदना होत असाव्यात पण व्यक्त करण्याचे सामर्थ्य राहिलेच नव्हते. त्यांनी आपले काम दोन चार तासात संपवले आणि नंतर एक पिवळा राक्षस माझ्यावर तुटून पडला. त्याच्या अजस्त्र बाहूंनी तो माझ्यावर निघ्रुणपणे वार करत होता. पन्नास वर्ष झाली तरी जुनी हाडं होती मी बराच प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी त्या राक्षसी शक्तीपूढे मला हार मानावीच लागली.
छिन्न विच्छिन्न शरीराने मी माझ्या जन्मदात्या बाळांची वाट पाहिली पण श्वास घुटमळत असतांनाही कुणीच आलं नाही. या अंगाखांद्यावर त्यांना मी वाढवलं, त्यांच्या पुढील वंशाचा दिवा माझ्या तळहातावर जपला त्यांना आता माझी आठवण राहिलीच नाही हे पाहून किती दुःख झालं असावं ते कोणाला कसं कळावं? पण माझा आत्मा या आवारात घुटमळत राहिला होता. मला मुक्ती मिळणे शक्य नव्हतं.
affiliate link
माझ्या जन्मदेत्या मालकाची पुढील पिढी सुरक्षित राहावी अस आताही मला वाटत होतं. माझी व्यथा मी माझ्या बाळाला त्याच्या स्वप्नात सांगताना तुम्हीही ऐकावी असच मला वाटत होतं. कारण नवीन गोष्टीचा ध्यास असण चुकीचं नाही पण पुढील पिढीने आपल्या पुर्वजांना विसरूनच जावं म्हणजे जरा अतिच झालं, नाही का? होय मी या जागेचा वास्तूपुरूष आहे, होतो आणि राहिन. इतकी तरी ओळख जपाल ना? आता मला निघायलाच हवं, सकाळची किरण पडण्याआत कारण वास्तूपुरूषाला शापच असतो, म्हणे त्यांनी अस चार चौघात वावरायच नसतं. चला तर सुखी रहा, आपल्या करत्या सवरत्या माणसाला,आपल्या पुर्वजांना लक्षात ठेवायच त्यांच स्मरण ठेवायची ही आपली संस्कृती, तेच आपलं कुळ आणि मुळही. मग वास्तुपुरुषाची आठवण ठेवाल ना?
छान कथा……सर.
भोसले सर धन्यवाद