विकल्प आणि समाधान
माणसाला जीवनात काय असावं असं वाटतं? सुखी की समाधानी? कोणी म्हणतील सुख असेल तर समाधान आपोआपच मिळेल, पण ते खरं नाही. आज शहरातील किमान १०% लोकांजवळ गरजेच्या सर्व वस्तू आहेत, मी गरजेच्या म्हटलं, तरी गरजेची व्याख्या देखील कालपरत्वे बदलू शकते कींवा शेजारांच्या घरात आलेल्या नवीन गॅझेट नुसार बदलू शकते. तरीपण सामान्य कुटुंबाच्या तुलनेत मध्यम वर्गीय घरात कष्ट कमी होतील अशी अनेक साधने नक्कीच आहेत, मग तो सुखी आहे का? उत्तर अर्थात नाही असेच असेल.
जेव्हा शेजारी एखादे नवीन साधन येते, स्पर्धा सुरू होते. ती वस्तू मलाही हवी असा अट्टहास आणि ती वस्तू मिळेपर्यंत त्रागा, मग सुख लागेल की असुया निर्माण होईल आणि व्यक्ती स्वतः उगाचच दुःखी होईल? बआपली आजी पाटा वरवंटा वापरत होती, तिने कधी आजोबांकडे तक्रार केलीली ऐकीवात नाही, “हे पहा उद्यापासून मी वाटप करणार नाही, हवे तर बिनवाटपाचे जेवा, नाहीतर तुमची मर्जी. सकाळ पासून वाटणे, लाटणे,कपडे धुणे यातच माझा सगळा वेळ जातो. तुम्ही मात्र मित्रांसोबत गप्पांच्या मैफलीत असता, नुसते बसून असता.” आता वाटण्यासाठी पर्याय निर्माण झाला, मिक्सर आला, श्रम कमी झाले पण मग शेजाऱ्यांनी फूड प्रोसेसर घेतला, झालं त्यांचं सुख आम्हाला सलू लागलं, मानवी स्वभाव आहे, इलाज नाही. हे केवळ साधनांच्या बाबतीत नाही तर प्रसाधनांच्या बाबतीत सुध्दा असू शकते. “तेरी साडी मेरे साडी से सफेद कैसी?” या चालीवर दाग,लदागीने असो की मोबाईल.
शेजारणीच्या गळ्यातील मोठं ,अनेक पदरांच किंवा आकर्षक डिझाइनचं मंगळसूत्र किंवा हातातील बांगड्या, बाजूबंध अस काहीही पाहिलं तरी या वस्तू माझ्याकडे नाहीत म्हणून प्रथम झोप जाते, “तिच्या पेक्षा जास्त किमतीचे दागीने मी घेईन तेव्हाच नावाची मी खरी!” अशी भिष्मप्रतीज्ञा केली जाते. मन दुःखी, आनंद कोसो दूर, समाधान हरवलेले.बजोवर तिच्या तोडीस तोड वस्तू ती घेत नाही तोपर्यंत तिच्या नवऱ्याचेही स्वास्थ धोक्यात. या वस्तू आल्यावर ती समाधानी होईल याची हमी देणार कोण?
“शेजारच्या गृहिणींचा नवरा किती टापटीप आहे,आणि आपल्या बायकोचा एकही शब्द ते खाली पडू देत नाही नाहीतर तुम्ही!” असं नवऱ्याच्या तोंडावर सांगून त्याची बोळावणी करणाऱ्या भगिनींना समाधान कसं मिळणार? आपल्याकडे मोबाईलच अगदी लेटेस्ट मॉडेल आहे हे सांगायला सर्व तरुण, तरुणींना आणि गृहिणींना किती आनंद होतो ते पहा म्हणजे कळेल. जोपर्यंत ती लेटेस्ट वस्तू यांच्याजवळ येत नाही तो पर्यंत ह्यांना चैन नाही. लोक मोबाईल तर बदलतात पण आपली टू व्हिलर किंवा फोर व्हिलर सुद्धा बदलत असतात. दुसऱ्याला सुखी पाहून दुःख मानण्यात ज्यांना धन्यता वाटते त्यांना कोणत्याच गोष्टीने सुख मिळणार नाही आणि समाधान तर नाहीच नाही.
खूप वर्षे अगोदर आपण कंदिलाच्या उजेडात अभ्यास केला,आज ठरवले तरी कंदिलच्या उजेडात अभ्यास करणे शक्य नाही. कंदील एक वेळ मिळू शकेल पण रॉकेलचे काय? तर खरा मुद्दा हा की घरात आधी काचेचा साधा बल्ब होता,मग ट्यूब लाईट आली. त्यानंतर CFL आले हे दिवेही स्वच्छ सफेद प्रकाश देत होते,मग विजेची बचत करणारे LED आले, जस जसा विकल्प मिळत गेला आम्ही तो विकल्प अजमावून पाहिला, क्षणिक आनंद झाला. तो विकल्प येऊन काही दिवस होत नाहीत तो पर्यंत नवीन विकल्प आला. हा नवीन पर्याय आपल्याला उपलब्ध व्हावा याचा अट्टाहास सुरू झाला, सांगा, सुख मिळेल? आणि समजा सुख मिळालं तरी समाधान वाटेल? “महाली मऊ बिछाने कंदील शामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या.” कविता वाचायला खूप चांगली, पण जगायला?
मित्रांनो प्रत्येक गोष्टीसाठी नवीन विकल्प येत राहणार, त्या प्रॉडक्टमध्ये जास्त सुविधा असणार हे मान्य, त्यांनी तुमचं काम जास्त सोपं होणार, अचूकता वाढणार यात शंका नाहीच,पण प्रत्येक विकल्प माझ्याकडे तातडीने यावा, असावा, हा अट्टाहास बाळगला तर त्यासाठी करावी लागणारी आर्थिक तरतूद, त्याची जुळवणी करतांना होणारी आर्थिक ओढाताण, त्यामुळेबहरवलेले मानसिक स्वास्थ ही नवीन शृंखला तुम्हाला अडचणीत आणणार यात शंकाच नाही. कोणतेही नवीन विकल्प घ्यायचे म्हणजे पैसे,बत्याची तरतूद करण आलंच, ओढाताण आलीच. मग मानसिक स्वास्थ हरवेल की टिकेल?
“अंथरूण पाहून पाय पसरावे. “ही म्हण तशी जुनी झाली पण मग आधी पाय पसराल की आधी अंथरूण मोठे कराल? मग अंथरूण मोठ करण्यासाठी जास्तीचा वेळ द्यावा लागणारच. नवीन विकल्प शोधू नये, वापरू नये असे माझे म्हणणे अजिबात नाही. मी म्हणेन हवे तेवढे मोठे अंथरूण घाला, पण अंथरूण घालण्यात आपल आयुष्य फुकट घालवू नका. घर मोठ्ठं हवं ,कबूल, पण त्या घरात तुम्ही दिवसाचे किती तास असता? घरी असता तेव्हा त्या घरातील वस्तूंचा उपभोग घेण्यासाठी वेळ असतो का? घरात नवनवीन साधन, फर्निचर, डेकोरेटीव्ह पिसेस, चित्र आणखी काही बाही आणून घर तर सजवल पण या वस्तू तुम्ही किती वेळा हाताळल्या?
मध्यंतरी अच्युत गोडबोले परदेश दौऱ्यावर गेले होते, एका मित्रांने त्यांना घरी बोलावले म्हणून ते त्याच्या घरी गेले, तीन चार हजार चौरस फुटांचा बंगला आणि त्यात प्रचंड मोठ फर्निचर, फुलदाण्या, एलसीडी टीव्ही, पुस्तकांचे सेल्फ, सीडी हे सगळं पाहिल्यावर गोडबोलेना राहवेना,” त्यांनी विचारले तुमच जीवन तर व्यस्त आहे मग कार्यक्रम कधी पाहता, कोणाचं संगीत ऐकता?” तो जंटलमन हडबडला, अहो कधीतरी ऐकतो झालं, घरी थांबायला वेळच नसतो.” मित्रांनो आपल्या घरात जी साधने आहेत, किती वेळा त्याच्यावरून हात फिरवून धूळ पुसलीत? आठवतय का ? पण तरीही नवीन वस्तू दिसली की तुम्ही थांबत नाही, काही दिवस ती वस्तू आल्या गेल्या, पैपाहुण्यांना दाखवून तुम्ही ती कशी मिळवली याचे कौतुक सुरू असते पण नवीन काही येत आणि ती अडगळीत पडते.
आपल हे असं आहे. तृप्तता नाहीच. म्हणून विकल्प मिळाला म्हणून आहारी जाऊ नये. दोन खोल्यांच्या घरात, आई बाबा,आजी,आजोबा आणि चार भावंड रहात होता पण आता तुम्ही दोघ,तुमची दोघ यांना थ्री बीएचके पुरत नाही, काय म्हणावं? म्हणे प्रायव्हसी हवी की नको?
या अगोदर घरात जो आनंद होता, जो समंजसपणा होता,जी एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती होती, दुसऱ्यासाठी काही तरी सोडून द्यायची वृत्ती होती ती, थ्री- बीएचके फ्लॅट मध्ये असते का?
हळूहळू प्रत्येक व्यक्तीसाठी एक एक घर निर्माण करावं लागेल.म्हणून विकल्प जरूर मिळवा,शोधा पण त्यासाठी आयुष्य पणाला लावू नका. मोठा फ्लॅट घेण्यासाठी कर्ज घेतलं, पैसे फेडण्यासाठी जास्त वेळ काम केलं, मित्रा तू घरा बाहेरच पैसे कमवण्यासाठी राहीलास तर घराचा उपभोग कधी घेणार? म्हणून म्हणतो, महत्वकांक्षा हवीच पण स्वतः च्या कुवतीनुसार गोल ठरवावा, अतिरेक नको.
नवीन विकल्प,बनवीन संकल्प असल्या खेरीज सुधारणा होणार नाही. आज आपण टू जी ते फाईव्ह जी पर्यंत धडक मारली आणि त्याची चांगली फळे, चांगली सेवा आपल्याला मिळू लागली आहे यात वादच नाही. घर बसल्या अनेक व्यवहार करणे आज सुरळीत झाले यात वाद नाही. वेळ व पैसा यांची बचतही झाली, ज्या वेगाने माहीतच संक्रमण होत आहे त्याच वेगाने सुख,दुःख आपल्याला वेगाने जाणवत आहे.सुख,दुःख यांची आंदोलन मानवी मनात वेगाने येत आहेत.
सुखी जीवनासाठी गाद्या गिरद्या वापरू लागलो, सोफा कम बेड काय किंवा अजूनही काही त्यामुळे Feel Good झालं असेल पण पाठीच काय? त्या गुबगुबीत गादीवर झोपल्याने काही व्यक्तींना पाठदुखी सुरू झाली. डॉक्टर म्हणाले पाठदुखी बरी व्हायची असेल तर कडक जागेवर झोपा, कुठे राहीला सोफा? तेव्हा सुख सहजासहजी लाभत नाही आणि समाधान तर फारच अवघड,बफारच दूर.
आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल आणि भाराभर साधन निर्माण झाली. या साधनांनी आपल्याला नक्की काय मिळालं? त्याचा विचार करण्याची गरज आहे. खरच इतकी साधन आवश्यक आहेत का? या साधनांनी तुम्हाला आळशी आणि निष्क्रिय तर बनवल नाही ना? आज अचानक मिक्सर बंद पडला तर पाटा,वरवंटा वापरू शकाल का? लिफ्ट बंद पडली तर जीने चढू शकाल? वाशींग मशीन अचानक संपावर गेली तर ढीगभर कपडे हाताने धुवू शकाल? मोलकरीण चार दिवस नाही आली तर ! अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. या साधनांनी आपल्याला नाजूक बनवल आपल्यातील क्रियाशीलता नष्ट केली. म्हणून खोट्या समाधानात जगणं थांबवा.
आठवड्यात एखाद्या दिवशी, दोन चार जीने चढा किंवा उतरा मग आपली हतबलता लक्षात येईल. लिफ्ट असल्याच समाधान असेलही पण सूख वाटणार नाही.
माणसाला जाऊ दे अगदी प्राण्यांच्या बाबतीतही हेच,जर त्याला पर्याय उपलब्ध झाला की तो सोप्पा मार्ग निवडतो. याबाबत अनेकांनी प्रयोग करून निष्कर्ष काढले आहेत. आपल्या नैसर्गिक क्षमता टिकवायची असेल तर उपलब्ध पर्यायापैकी सगळ्यात सोप्पा पर्याय निवडू नका. सुखाची व्याख्या व्यक्ती निहाय बदलेल पण गरीबाला मिळणारे समाधान आणि श्रीमंताला मिळणारे समाधान वेगळे असणार नाही. ज्यांनी आत्मीक आनंद होतो. तो आत्मिक आनंद म्हणजे समाधान.
मित्रांनो किल्ल्यावर चढण्यासाठी रोप वे आहे. रोप वे ने गेल्यास शरीराला थकवा येणार नाही. शरीराला सुख हे साधनांनी मिळतं आणि मनाला सुख हे समाधानान मिळतं. स्वतः तो किल्ला चढून गेल्यानंतर जे समाधान मिळेल त्याची तुलना लिफ्ट किंवा रोप वे ने तो किल्ला चढल्यावर करता येणार नाही.बबाजारातून गुलाब फुलांचा गुच्छ खरेदी करून नेहमीच आणता पण तुमच्या कुंडीत लावलेल्या गुलाबावर पहिली कळी फुलते आणि जे नेत्रसुख मिळते त्याची तुलना अन्य कशासी होईल का?
आज अनेक मुलांना ते महाविद्यालयात किंवा इंजीनियरींग शिकत असतांना नोकरीची ऑफर मिळते, अर्थात येणारी कंपनी, तुमचा चार वर्षांच्या प्रगतीचा आलेख यावर तुम्हाला नोकरीचे पॅकेज ठरते.पण तुमच्या ग्रुप मधील मित्राला जास्त मोठी ऑफर आणि तुम्हाला तुलनेने कमी रकमेची ऑफर मिळाली की मनात नक्की कोणते विचार येतात? लगेचच नोकरी मिळाली म्हणून आनंदी असता? सुखी असता ? की मलाच कमी पैश्याची किंवा छोट्या कंपनीची म्हणून असंतुष्ट असता! चला नोकरी तर लागली अस म्हणता? समाधानी असता? हाच तर मानवी स्वभाव आहे, “सहज मिळे त्यात जीव तृप्तता न माने जे असाध्य जे अधीर तेथे मन धावे.”
कोणत्याही माणसाकडे किती धन असलं म्हणजे तो समाधानी होईल? सुखाने आणि मुख्यतः शांतीने जगेल?अंबानी,अदानी समाधानी असते तर नवं नवीन उद्योग उभारत बसले नसते. यांची हाव न संपणारी, यांची
कशाला, आपलेही तेच. वेतन कितीही वाढले तरी नवीन DA कधी येणार याची डोळ्यात तेल घालून आपण वाट पहात असतो,एकदा का DA मंजूर झाला की दोन मिनिटे आनंद होतो आणि मग वाढलेल्या गॅसच्या, पेट्रोलच्या किमती, वाढते कडधान्याचे भाव,कडाडलेला भाजीपाला
हे आठवलं की दोन मिनिटांत आनंद हरवून जातो. म्हणजे हा आनंद क्षणिक आहे. अशा क्षणिक आनंदाचे समाधानही क्षणिकच असणार.
“सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे.” तुमच्या मुलांना कितीही टक्के मार्क मिळु दे, कितीही लाख रुपयांचे पॅकेज मिळू दे, तुम्हाला कितीही श्रीमंत आणि देखणी, मनमिळाऊ सून मिळू दे त्याचे समाधान हे क्षणिक असते. सून हुशार असली,तिला चांगल्या पगाराची नोकरी असली तरी तिला नीट स्वयंपाक येत नाही, किंवा तुमच्या पाठीमागे गोंडा घोळत नाही याचा तुम्हाला राग येतो, आणि घरी सुशिक्षित सून असल्याचं सुख असूनही त्याच समाधान वाटेनास होत,मानवी स्वभावाला उत्तर नाही.
एक व्यक्ती तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही,मग तो तुमचा नवरा असो, बायको असो, मुलं असो की सून. तुमचा मित्र असो की नोकर, एकाच व्यक्तीत अनेक गुण असणं शक्य नाही. अपेक्षांना काही अंत नसतो. म्हणूनच माणूस कितीही श्रीमंत असला, कितीही सुखी असला तरी समाधानी असणं हे त्याच्या मनावर आहे.खेड्यात जाऊन पहा पाहुणा आला की असं जंगी स्वागत आणि पाहुणचार करतात, आपले डोळे उघडेच राहावे. हे त्यांच्या प्रवृत्तीवर अवलंबून असते.
पंढरीच्या वाटेवरील वारकरी पहा, एक छोट्या पिशवीत त्याचा संसार असतो पण डोळ्यात असा आनंद असतो विठू भेटीचा की तृप्त तृप्त. अगदी मंदिराची पायरी नजरेस पडली तरी विठ्ठल भेटल्याचा आनंद मनात मावत नाही आणि डोळे पाझरू लागतात. त्यांच्या डोळ्यात दिसणार तेज पहा,ते आहे विठू भेटीच समाधान. पाई महिनाभर खडतर प्रवास करून दर्शन घेतलं किती मिनीटे? तर अवघ दोन पाच मिनिटे पण त्याच समाधान त्यांच्या डोळ्यात मावत नाही आणि डोळे पाझरतात, मन उचंबळून येत आणि ह्दय भक्तीरसात भिजून जात,गात्रे ओरडत असतात,”विठ्ठल, विठ्ठल! ” , आनंद,परमानंद, ते खरे समाधान. वारीत काय मिळवलं? ना पैसा ना अडका,ना जमीन जुमला तर,”हरी उच्चारण आनंद निधान”
असो ,”समाधान”, व्याख्येत बसवणं मला तरी शक्य नाही. लहानपणी मी चार पैसे मिळतील म्हणून एका भैया बरोबर आंबे विकायला गेलो.दोन रुपये की तीन रुपये डझन हापूस आंबे होते, मी एक ठिकाणी आंबे विकत होतो आणि भैया थोड्या अंतरावर विकत होता.दिवसभर आंबे विकायला मदत केल्यानंतर मला भैयाने एक रुपया दिला. आणि मी थोडे जास्त दराने विकून अधिकचा एक रुपया मिळवला, अर्थात भैयाला या बद्दल सांगितले नाही,म्हटलं तर ती बदमाशीच, त्यानंतर मी शाळा ,कॉलेजमध्ये असतांना स्वतः विक्री व्यवसाय केला, का? तर व्यवसाय केला की पैसे मिळतात, एक रुपयाने माझा हव्यास जागृत झाला.
त्या नंतर आयुष्यात नोकरी केली, छोटा बिझनेस केला,कधी कधी त्यासाठी रात्र जागवली, कितीही मिळाले तरी अपुरेच हे समजलं तेव्हा थांबलो, शक्य झालं त्यांना मदतही केली. कितीही संचय केला तरी जाताना काही न्यायचं नाही मग शरीराला किती पीडा देणार? कितीही मिळवलं तरी समाधान मिळत नाही हे खरं, कोणाला लवकर समजत, कोणाची लाकडं म्हसणात गेली तरी स्वार्थ सुटत नाही, समाधान मिळणार कसं? असो,बविकल्प आणि समाधान यावर मी काय लिहिणार, माझी पात्रताही नाही म्हणून थांबतो, आपली रजा घेतो. स्वांत सुखाय म्हणून लिहीत होतो, पण मित्रमैत्रीणी म्हणाल्या नुसत लिहून कागद भरू नको,बआम्हालाही कळू दे तु काय करतो? म्हणून हा प्रपंच.