विहीर भाग 1
मे महिन्याचा शेवटचा आठवडा होता, रात्री दहाची वेळ असावी, घरात गरम होत होते म्हणून घरातील सगळेच घरासमोरील मांडवात बसले होते. अचानक सोसाट्याचा वारा सुटला, जिवाची तगमग थोडी कमी झाली. उकाड्याने हैराण झालेल्या जिवाला थोडं बरं वाटलं. वाटलं वारं आता शांत होईल मग शांत होईल, पण विपरीत घडलं, विजा चमकू लागल्या मिट्ट अंधार पडला आणि पाऊस पडू लागला. वळीव फार तर अर्धा-एक तास टिकतो पण पावसाने एकदा सूरुवात केली तो थांबायचे नावच घेई ना.
या वर्षीच नवीन विहीर खणली होती.घराच्या आवारात पंचवीस माड आणि वीस कलम लावले होते. पाण्याअभावी त्यांची चांगली वाढ होत नव्हती. मा. शरद पवार यांच्या शंभर टक्के शासन अनुदानातून आंबां कलम व माड रोपे मिळाली होती. डोंगरात खड्डे खणून आंबा कलम लावले होते. एक दिवस आड शिंपण करण्यासाठी ओळखीची बाई कामाला होती. ती वाडीतल्या सामाईक विहिरीवरून पाणी आणून शिंपण करत होती. दोन तीन महिन्यांपूर्वी चुलत चुलत्यानी शिंपणं चालू असतांनाच बाईला वाटेतच अडवून सांगितल, “माले, बावीचा पाणी खाऊक व्हया, त्याका सांग पाणी शिपाक नेता नये.” त्या बाईनी त्यांचा निरोप येऊन घरी आईला सांगितला. आईला मोठी चिंता लागून राहिली, आता काय करणार, पालवी फुटलेल्या झाडांना पाणी मिळालंच नाही तर ती जिवंत तरी कशी राहणार? तिने मुंबंईला मुलाला पत्र लिहून तस कळवलं. पाणी मिळालं नाही तर पंचवीस माड आणि कलमं पाण्याशिवाय उन्हान मरणार. मुलगा शेखर, मुंबईत कामाला होता. शेखरला सुचेना करावं तरी काय? दोनच वर्षांपूर्वी लग्नात होती नव्हती ती पुंजी संपलेली. हातात शिल्लक तर काहीच नाही, पण पाण्याची सोय करता आली नाही आणि झाड मेली तर उद्या शासन दंडही वसूल करेल, अनुदानातून पैसे वसूल करेल. काय कराव, विचाराने डोकं सुन्न झालं होतं,त्याने पत्नीला विचारल “मुक्ते आईचं पत्र आलंय, आता ग कसं करायचं? जर झाडांना पाणीच मिळाल नाही तर झाड उन्हानच मरतील, मला काही सुचेनास झालंय.” ती तरी त्याला काय सांगणार होती,पण विचार करता करता तिच लक्ष स्वत:च्या हाताकडे गेले आणि ती आनंदाने ओरडली, “अहो, इकडे बघा.” तो आधीच कावला होता, “काय बघू? माझ्या जीवाला घोर लागलाय तुला काय गंमत सूचते गं.” ती न रागवता बांगड्या वाजवत म्हणाली, “तुमच्या प्रश्नाच उत्तर मिळालं बघा.” त्याने तिच्याकडे पाहीलं, ती तालात बांगडया वाजवत होती. “ह्या गहाण टाका आणि बांधा विहीर.” तो तिचे दोन्ही हात हातात धरत म्हणाला, ” तुझ्या आप्पांनी, तुझ्या आईनी विचारलं तर काय सांगू, बांगड्या गहाण टाकल्या म्हणून?, नको नको, मला नाही जमणार.” ती त्याच्या जवळ सरकत म्हणाली, “आत्ता त्या झाडांची तहान मोठी खरं ना! , मी बांगड्या नसल्या म्हणून काही मरत नाही. उद्या कर्ज फिटलं म्हणजे आणाल की पुन्हा सोडवून.” “नको, नको, उद्या आप्पा म्हणतील स्वत: काय घातलं नाही आणि आम्ही मुलीला दिलं ते पण गहाण टाकून बसला.
मला ते पाप माझ्या शिरावर नको.” ती रागावली, आणि पलंगावर निमूट जाऊन बसली, “तुम्हाला माझं अजिबात कौतूक नाही.मी आणि तुम्ही वेगळे आहोत का? आप्पांनी विचारल तर मी सांगेन काय सांगयच ते, मी सांगते ते ऐका, त्या तुमच्या तात्याना दाखवून द्या, विहीर खणूनच दाखवा, म्हणा घाला तुमच्याच मढ्यावर पाणी.” शेखर रागावला, “असं म्हणू नये, त्यांच कदाचित बरोबर असेल, आपण पाणी शिंपल तर मे महिन्यात पाणी पुरणारही नाही. तु म्हणतेस तर पाहू विचारून बांगड्यांचे किती पैसे मिळतील ते.”
त्याने बांगड्या दादरला पेंडुरकरांकडे दाखवल्या, त्यांनी ख-या असल्याची खात्री करुन विचारले काय करायचे आहे, म्हणजे विकताय की गहाण ठेवणार आहात, त्याला तो गहाण शब्द ऐकून वाईट वाटले,
“पैशांची गरज होती, गहाण ठेवल्यास किती मिळतील?” त्यांनी वजन केले, बांगड्या पन्नास ग्रॅमच्या होत्या.” पंधरा हजार किंमत होते, तुम्हाला सत्तर टक्के म्हणजे बारा हजार मिळतील.”.ते म्हणाले. त्याने क्षणभर विचार केला आणि म्हणाला, दरमहा किती व्याज पडेल?” त्यांनी अठरा टक्के प्रमाणे, महिना अंदाजे तीनशे रुपये पडतील, शिवाय मुदतीत सोडवले नाही किंवा वेळेत व्याज भरले नाही तर दंड पडेल अशी सूचनाही केली. तो ऐकून घाबरला.त्याने दुकान मालकांना विनंती केली. “मी जरा घरी विचारतो मगच व्यवहार करु.” पेंडुरकरांनी मान डोलावली.
त्याने काळजीपूर्वक बांगड्या पिशवीत घातल्या आणि बाहेर पडला, रस्त्यात चालता चालता डोक्यात विचार आला, गहाण टाकलेल्या बांगड्या सोडवता आल्याच नाहीत तर, मुक्ताची आई काय म्हणेल, आप्पा काय म्हणतील. दुसर मन म्हणत होते आज विहीर खणली तर कमी खर्चात होईल चार दोन वर्षे गेली तर महागाईत विहीर खणण्याच नावच नको घ्यायला. विचारांच्या तंद्रितच तो घरी पोचला. मुक्ता त्याची वाट पहात होती.तिने त्याला प्यायला पाणी दिलं. त्याने हात पाय धुतले, तो तिच्या बाजूला येऊन बसला.
“जेवायला वाढू ना! की थांबणार थोडा वेळ?” त्याने यंत्रवत पिशवी तिच्या हाती दिली. “मुक्ते, मला बांगड्या गहाण टाकायला धीर नाही होत गं, तु ठेव ह्या कपाटात.” “अहो असं कसं? आणि मग पैशांच काय हो? काय सांगणार आईंना !” तो तिच्याकडे पहात म्हणाला “पाहू काही उपाय सूचतोय का, नाहीच सूचला तर पुढच पुढे.” तिने ताटं वाढली, फारसं काही न बोलताच त्याने जेवण उरकले, मुक्ताला फार वाईट वाटलं, आपण नव-याला काहीच मदत करू शकत नाही याची खंत तिला वाटत होती.
दोन दिवस तो अगदी विचारात होता ना अन्नावर लक्ष ना मुक्तावर, ती बिचारी त्याचा विचार करून वेडीपिशी झाली. दर गुरवारी ती संध्याकाळी लक्ष्मीची पोथी वाचत असे, आजही ती स्वयंपाक उरकून पोथी वाचत बसली होती. दारावरची बेल वाजली तेव्हा तीचं घड्याळाकडे लक्ष गेलं,”बाबा माझ्या,कधी नऊ वाजले कळलच नाही” ती स्वत: शी पुटपुटली.
तिने दार उघडलं.तो घरात आला. तिने पाणी प्यायला दिलं, पण ते न पिताच तो, पाय धुवून आला. “अहो चहा घेणार का थोडा, की जेवायलाच वाढू,आणि पैशांच काम झालं का?” तो तिच्याकडे पाहत हसला, “वीस हजार मिळाले बघ, वीस हजार.” ती त्याच्याकडे पहात म्हणाली, खरं सांगताय ना, कोणी दिले इतके पैसै?
काय तारण ठेऊन दिले?” “अग, मी आमच्या साहेबांना अडचण सांगत होतो, त्यांनी त्यांच्या नावावर कर्ज दिल.पाच वर्षांत फेडायचे, भला देव माणूस! साहेब म्हणाले, “देसाई,पैसेच पाहिजेत ना, मी देतो, वेळेवर परत करा म्हणजे झाले.” शेखरने पैसे तिच्या हातावर ठेवले. आधी देवाकडे ठेव, मग कपाटात, मोठी चिंता मिटली. पुढच्या सोमवारी गावी जाऊ, विहीर पूर्ण होई पर्यंत तिथेच रहा,” “अहो,आत्ताच ठरवलं पाहिजे का? आधी चला मी तुम्हाला जेवायला वाढते. मग सवडीने ठरवू.”
त्यांची जेवण झाली, तिने भांडी घासून, आवरा आवर केली. तो हिशोबाच्या वहीत कसल्याशा नोंदी करत होता. तिने अंथरुण घातले, तो त्याचे काम आटोपून झोपायला आला. तो आज खूश होता,त्याने हळूच तिला जवळ ओढले तशी ती रागवून म्हणाली “मला गावी ठेऊन येणार ना? माझी तुम्हाला गरजच नाही, जा तिकडे, मी नाही बोलत तुमच्याशी. “तो तिला समजावत म्हणाला, “अग आई तिकडे एकटी आहे, तिच्या सोबत नको का कोणी, परकी माणसं आपल्या कामावर लक्ष देतील का? सुट्टी मिळाली की मी लगेच येणारच आहे, पण तो पर्यंत कोणी तरी हवं ना लक्ष द्यायला. मुक्ते मला तरी करमतं का एकटं, आता मलाही तुझी सवय झाल्याय?” ती त्याच्या कुशीत शिरली.
चार दिवस गावी न्यायच्या वस्तू जमा करण्यातच गेले.परेल वरून ती दोघ रातराणीने जायला निघाली तेव्हा तिने शिंदे वहिनींच दार वाजवले.
“आम्ही गावी जातोय थोडं लक्ष ठेवा, हे लवकरच परत येणार आहेत.”
क्रमशः
गावाकडील प्रश्न आणि त्यांचे निराकरण शहरी लोकांना सर्वस्वी अनोळखी आहेत. त्यामुळे कथानक मनाला भिडले. मला मात्र तुम्ही स्वतः , हाताने विहीर खणल्याचे आठवले……! ग्रेट..!
धन्यवाद, गावाकडे असणाऱ्या समस्या आणि गावातील माणसाची मानसिकता मांडण्याचा छोटासा प्रयत्न आहे. आपणास कथा आवडली तर कृपया आपल्या मित्र मैत्रिणींना forward करा.