वृंदावन
प्रत्येक माणसाच्या जीवनात चढ उतार असतात. कष्ट सहन केल्यानंतर सुख वाट्याला आले तर त्याचा आनंद मोठा असतो. पालघर तालुक्यात उमरोळी येथे दत्तात्रय कदम यांचे शेतकरी कुटुंब रहात होते. दत्तात्रय कष्टाळू शेतकरी होता. कोणत्या वेळी कोणते पिक घ्यावे या विषयी त्याचा अंदाज चुकत नसे त्यामुळे तो खाऊन पिऊन सुखी होता. खर तर त्याला भाऊबहिण कोणीही नव्हते, त्यामुळे तो संपत्तीचा एकटाच मालक होता. त्याला सांगून आलेली मुलगी दिसायला सुंदर तर होतीच आणि त्याच्यापेक्षा दोन इयत्ता जास्त शिकलेली होती. ती शिकली असल्याने सासुला तिच कौतुक होतेच. सासू तिला सहसा धुणीभांडी असल्या कामाला हात लावू देत नसे. तरीही सासू सासरे यांचा हस्तक्षेप नको म्हणूनच प्रतिमाने लग्नानंतर सहा महिन्यातच स्वतंत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. दत्तात्रय यानी तिची समजूत काढली.
लगेचच ते वेगळे राहिले असते तर शेजारच्या लोकांनी त्याचे बायल्या म्हणून हसे केले असते म्हणूनच दत्तात्रय तिला म्हणाला, थोडे दिवस कळ काढ. बाबाचा मुड बघून मी विषय काढतो मग आपण स्वतंत्र राहू. एक दिवशी रात्री वडील निवांत असताना त्याने विषय काढला.वडिलांना आश्चर्य वाटले. त्यांनी त्याला खडसावले, म्हणाले, “तुला इथे काय त्रास आहे? का तुझ्या बायकोला त्रास आहे ते मला सांग? तू वेगळा रहायचं ठरवलं तर शेजारी तुझ्या आईला नावं ठेवतील, म्हणतील एकुलती सुन आहे वागवून घेता येत नाही. पटतय ना?”
तो म्हणाला, “तस काहीच नाही पण आम्ही याच घरात वेगळे राहिलो तरी तुम्हाला अंतर देणार नाही. लागल्यास व्यवहार तुमच्याकडे ठेवा. शेजारी काय, ते काही नाही झालं तरी बोलतातच.” “हे बघ दत्ता, माझ काही नाही, तु आमच्या बरोबर राहिलास किंवा स्वतंत्र राहिला मला काहीच फरक पडत नाही पण तुझ्या आईच काय? तिला तर वाईट वाटणारचं ना?” “आबा, माझी तुम्हाला विनंती आहे, प्रतिमाला वेगळ रहायचं आहे, नाहीतर ती उगाचच धुसफूसत राहणार, त्यापेक्षा तुम्ही आईची समजुत काढलीत तरं” शेवटी त्यांनी पत्नीची समजुत काढली, तिला मुलाने आणि सुनेने वेगळी चुल मांडायची ठरवलं ऐकून फार वाईट वाटले. ती म्हणाली,” ठिक आहे त्या माऊलीची इच्छा, निदान वर्ष, दिडवर्ष थांबा, नाहीतर लोक, काय काय बोलतील. ठेवायची ती नावं ठेवतील.” मी इतके वर्ष संसार केला तो फुकट जाईल. सुनेला मुलगा झाला. पहिला नातू म्हणून जोरदार बारसे झाले. शेखर नाव ठेवले. त्याची आंघोळ,शेक देणे, दूध भरवणे त्याला खेळवणे यात सासूसासरे यांचा वेळ जाऊ लागला. त्यांना वाटले चला आता सुनबाई स्वतंत्र राहण्याची गोष्ट विसरून जाईल पण कुठले काय!
लग्नानंतर दिड दोन वर्ष तो वडिलांसोबत थांबला. प्रतिमाने पुन्हा जुनाच आग्रह सुरू ठेवला. दत्तात्रयचा नाईलाज झाला. स्वतःच्या आई वडिलांपासून स्वतंत्र राहू लागला. तिच्या करारी स्वभावाचा दत्तात्रय याला त्रास होत होता पण त्यानेच तिला पसंत केली होती त्यामुळे त्याला बोलता येत नव्हते. आधी आईआबांची मदत होती. आता दत्तात्रयला शेताच्या कामाबरोबर घरी मदत करावी लागत होती. पत्नीच्या हट्टी स्वभावामुळे शेती आणि घरचे काम सांभाळताना हाल होत होते.
शेखरच्या पाठीवर त्यांना दोन मुले झाली. मधला शरद आणि धाकटा सुमन. शेखर वयाने मोठा म्हणून घरची काही जबाबदारी आपोआपच त्याच्या अंगावर आली.शरद आणि सुमन त्याच्या जन्मानंतर दोन, दोन वर्षांनी जन्मले. मुले लहान होती तोवर दत्तात्रय त्यांच करताना मेटाकुटीला यायचा. तेव्हा कोणी पुरुष मुलांच हगण,मुतणं काढत नसत पण दत्तात्रयला ते करावे लागे, मग कधीतरी शाब्दिक स्फोट होई आणि तो बायकोची चांगलीच धुलाई करे. ती तो राग मुलांवर काढत असे. मला मदत करू शकणार नव्हता तर लागोपाठ तीन मुलं कशासाठी दिलीत? अस बेधडक विचारून त्याला निरूत्तर करत असे. बिच्चारा तोंडाला तोंड नको म्हणून निमुटपणे सहन करत असे. सुंदर बायको हवी होती त्याच व्याज भरत होता. या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून तीने लहान वयातच मुलांना कामाचे वळण लावले.
शेखरला साधारण कळू लागले तेव्हापासून म्हणजे चवथी इयत्तेत असल्यापासून घरातील झाडलोट, भांडी घासणे अशी कामे तो करू लागला. खर तर हे खेळायचं, बागडायचं वय, पण आई त्याच्याकडून दररोज ठराविक कामे करून घेत असे. शेखरच्या आजीला त्याची दया येत असे पण सुनेला आवडत नाही म्हणून ती दुर्लक्ष करत होती. इतर मुले बाहेर खेळत असत तेव्हा तो भांडी घासत असे किंवा नळावरून पाणी आणत असे. आई आपल्या कडून काम करून घेते याचा त्याला राग येत असे पण तोंडातून ब्र काढण्याची प्राज्ञा नव्हती. भावंडे मोठी झाल्यावर काम विभागली गेली मात्र प्रत्येकाला आपले कपडे स्वतः धुवून वाळत घालावे लागत.संध्याकाळी ते घडी करून जाग्यावर ठेवण्याची जबाबदारी त्यांचीच असे. तिला मुलगी झाली नाही याचा राग कदाचित ती मुलांवर काढत असावी. आपल्या भावांजवळ ती फारच क्वचित जात असे त्यामुळे मुलांना मामाजवळ जायची संधी नसे.
शेखरची आजी, सुन नातवाला काम सांगते म्हणून घरातून मोठ्या आवाजात सुनेच्या नावाने बडबडत असे पण सुन निगरगट्ट होती. ती कधीच उत्तर देण्याची तसदी घेत नसे. उलट सासू बडबडू लागली की काहीतरी कारण काढून मुलाला धोपटून काढी. मोठ्या आवाजात रेडिओ लावून ठेवे त्यामुळे सासू ने बोलणेच बंद केले.
वेळ असेल तेव्हा शेखरला वडिलांना मदत करण्यासाठी शेतावर जावे लागे. आईच्या दडपणाखाली वावरण्यापेक्षा वडिलांना मदत करणे नक्कीच आनंददायी होते.तिथे वडील मनमोकळे बोलत. आईला समजून घे अस सांगत. संध्याकाळी ठराविक वेळीच घरात परतावे लागे. या बद्दल शेखरने अनेकदा मार खाल्ला होता. त्याच्या नशीबाने त्याला उशिरा बॅटिंग मिळत असे तोपर्यंत पावणे सात वाजून जात. खेंळ रंगात आला असतांना, म्हणजेच त्याची बॅटिंग भरात असताना,घरून जोरदार हाक येई,” “शेखर, अंधार पडला,घरी चल.” तेवढ्या वेळेत त्याला परतावे लागे, थोडा उशीर झाला तरी, त्याच्या पायाच्या पोटऱ्या फुटून निघत. “आई आई ग, नको ना मारू, पुन्हा नाही उशीर होणार,तुझी शप्पथ मी वेळेत येईन.” एवढं वाक्य म्हणे पर्यंत चार ,सहा छड्या पडत.
त्याची भावंडे मोठी झाली तसा तो नियम त्यांनाही लागू झाला. ती त्यांना जन्म देऊन आई झाली पण तिच्या मनात मायेचा ओलावा द्यायला बहुदा देव विसरला. त्याची भावंडे लहान असतांना त्यांना खेळवण्याची जबाबदारी त्याच्याकडे असे. यदाकदाचित एखाद्याने भोकांड पसरलं आणि तो सांगूनही नाही ऐकला, गप्प नाही झाला तर ती कापडाचा बोळा तोंडात कोंबत असे. तिच्या नजरेत असा दरारा होता. की भावंडे चड्डीत सू करत पण रडणं बंद. मग ती बोळा काढून जवळ घेऊन समजवत असे, “मी कामात आहे ना! रडायच नाही बरं, माझं काम झालं की दूध देणार, तो पर्यंत दादा बरोबर खेळ.’ तिने, “अल्ले ले, राजा तू थांब हा बाला, तुला जवल घेते, दूधू देते. ललू नये,शहाणा तू?” अस लाडिगोडीत मुलांना म्हटल्याचं कोणी ऐकल नव्हतं. त्यांच्या आजूबाजूच्या बायका तिला घाबरून होत्या. मुलांना अशी वागणूक का देते? अस एकदा चुलत जावेने विचारले तर म्हणाली, “तुमच्या घरी नेताय का? माझी मूल कशी वाढवायची ते मला चांगलं कळते.”
लहानपणी आईचा पदर धरूनच मुलं मोठी होतात, कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करतात, लाड करून घेतात, आईवर रुसतात, रागावतात. तिच्या कुशीत निजतात. पण शेखर याला अपवाद होता. आईच्या प्रचंड शिस्तीत तो वाढला. बाबा घरी असले तर त्यांना कधीतरी जवळ घेत असत पण इतर पालकांप्रमाणे त्यांनी कधी घोडा घोडा केलं किंवा त्यांनी मुलांना कांदे-बटाटे अस म्हणत खेळावल्याचे त्याला आठवत नव्हते. म्हणूनच तो मोठा होत गेला, तस तसा आई या शब्दांचा त्याला अधिक तिटकारा येऊ लागला. मोठा झाला तसा तुटत गेला.
ती त्याला चवथीपाचवी पर्यंत जबरदस्तीने शिकवत होती. त्या बाबतीत तिचे कौतुक करायला हवे. त्या नंतर तिला बदलेल्या अभ्यासक्रम शिकवणे शक्य नव्हते, त्याचा बदललेला अभ्यास समजत नव्हता आणि कळतही नव्हता त्यामुळे त्याची तिच्या तावडीतून सुटका झाली. शाळेचा अभ्यास करण्यासाठी तो शेजारी राऊत गुरुजींकडे जाऊन बसू लागला. त्यांच्या मुला सोबत रमत गमत अभ्यास करुन घरी परते. काही अडलं तर गुरूजी मदत करत. त्यामुळे त्याला कधी अडचण आली नव्हती. मूडमध्ये असले की कधीतरी राऊत गुरूजी त्यांना गोष्ट सांगत. त्याला खूपच उशीर होत आहे असे वाटले तर आई हाक मारत असे आणि तो निमूट घरी परते. ती गोष्ट पूर्ण ऐकता आली नाही याचं शल्य मनात घेऊनच तो निजत असे.
दहावी बोर्ड परीक्षेत त्यांनी दोन विषयात गटांगळी खाल्ली आणि आईने उद्धार केला. तु नापास झालासच कसा? तुला तर या वर्षी फारस काम सांगितले नव्हते, मग गुरूजींच्या घरी जाऊन टाईमपास केलास का? त्या वर्षी त्याला घरातील कोणतेही काम सांगितले नव्हते याचा तिने वारंवार उल्लेख केला. खरे तर त्याचा अभ्यास शिकवण्यासाठी गुरुजी अपुरे होते. त्याच्या नशीबाने तो तिच्यापेक्षा उंच वाढला म्हणून तिने मारलं नाही इतकचं. पुढील पुर्नपरीक्षेला वेळ होता. त्यामुळे तिने त्याला पुन्हा घरातील कामाला जुंपलं. काम झाले की त्याला अभ्यासाला बसवत असे. खरं तर गणित आणि इंग्रजी विषय त्याचा अंत पहात. शाळेतही तो मागच्या बाकावर बसत असे त्यामुळे बाई शिकवत असताना त्याचे पुस्तकातील चित्रांशी चाळे चालत. कान धरून उभे राहण्याची किंवा ओणवे राहून अंगठे धरण्याची शिक्षा त्याने अनेकदा भोगली होती त्यामुळे तसाही तो निगरगट्ट झाला होता. वडील फारसे शिकले नव्हते. शेतकरी असल्याने त्यांना वेळ नसे. त्यामुळे शेखराला इंग्रजी विषयाची चार वाक्य धड लिहिता येत नसत, व्याकरण डोक्यावरून जाई. गणीताचेही तेच कोणत सुत्र कधी वापरायचे कळतच नसे. त्यांनी या विषयी वडिलांना वारंवार सांगितले तेव्हा कुठे वडिलांनी त्याच्या साठी तिच्याकडे रदबदली करून त्याला क्लासला पाठवले. ऑक्टोबरमध्ये झालेल्या परीक्षेत तो एकदाचा एसएससी पास झाला आणि त्याची सुटका झाली.
कधीतरी त्याची आई आणि बाबा बाजारात जात आणि परततांना गोड गाठे, जिलेबी, मैसूर पाक घेऊन येत असे कधीतरी रावळगाव आणत, तेवढाच काय तो गोडवा. ती बाजारातून घरी परतताच तिच्या पायावर ओतायला पाणी ओटोवर आणून ठेवावे लागे. जर तिची गैरसोय झाली तर खैर नसे. रात्रीही मुले एका खोलीत तर ती वेगळ्या खोलीत झोपत असे. हे अस तुटके वागणे तीने कुठून घेतले ते तिचे तिलाच माहिती.पण मुलांना अकाली एवढी समज आली होती की कुणी न सांगताच ती कामे करत.
कॉलेजमध्ये जाऊन काही साध्य होणार नाही हे माहिती होते म्हणूनच शेखरने आपल्या ओळखीच्या मोठ्या मित्रांना, कुठे काम असेल तर मला बोलवा म्हणून विनंती केली आणि त्यांची अंगयष्ठी चांगली असल्याने तो पंधरा दिवसात हेल्पर म्हणून पिडब्लूडी खात्यात कामाला जाऊ लागला. तिथे वायरमनच्या हाताखाली वेगवेगळी कामे असत. वजन उचलावे लागे पण घरी छळ सहन करण्यापेक्षा ते काम त्याला आवडे. तो इलेक्ट्रिक काम सुरू असले की निरिक्षण करून समजून घेई.
रोज कामावर निघतांना आई डबा देत असे, पण त्या व्यतिरिक्त एक रुपयाही देत नसे. कामावर इतर मित्र कधीतरी चहा, वडा घेत तो त्यांच्या पासून दुर थांबे. कधीतरी मित्र आग्रह करून चहा पाजत, त्याला ओशाळल्या सारखे वाटे.पगार झाला तसा,काही रूपये स्वतःकडे ठेऊन त्यांनी पगार आईकडे दिला. तिने पगार किती मिळाला? याची चौकशी केली मात्र त्याने खरी माहिती सांगीतली नाही म्हणून तिने त्याच्या मित्रांना त्याच्या नकळत विचारले मात्र मित्रांनी खरी माहिती न सांगता सावरून घेतलं.
त्या महिन्यात त्याने आईकडे खर्चासाठी पैसे मागितले. तिने पगाराचे सगळे पैसे रागाने हातात ठेवले आणि रागाने म्हणाली, “सगळे पैसे घे आणि घरातून निघून जा.” बाप पहिल्यांदा त्याची बाजू घेऊन म्हणाला, “त्याला खर्चाला पैसे नको का? त्याला शेदोनशे दे. कधी थकलाच तर बसने येईल, चहा घेईल.” तेव्हा कुठे तिने ते मान्य केलं. आतापर्यंत वडील त्यांना वेळ नसल्याने तिच्या कामात हस्तक्षेप करत नसत. पण दिवसेंदिवस तिचे मुलांशी वागणे जास्त कठोर होऊ लागले तेंव्हा ते रागावले. अर्थात असे काही झाले की अबोला ठरलेला असे मग वडिलांचा नाईलाज होई.
दिवस पुढे जात होते, हळूहळू त्याने स्वतः चे खर्च भागवून चार पैसे जमा केले. पाहता पाहता वर्ष सरले ,लोकल बोर्ड अधिकाऱ्यांनी त्याला कायम कामावर नेमले त्याचा पगार वाढला. आता घरातून बंधने थोडी शिथील झाली. तो मित्रांसोबत गावच्या जत्रा पहायला जात असे तिथेच त्याला ती मंदिरात दर्शन रांगेत दिसली. काळजात बसली. सावळ्या रंगाची असली तरी ती दिसायला देखणी आणि भारदस्त होती. उंची जवळपास त्याच्या इतकीच, चेहरा तजेलदार, बोलका, नाजूक जीवणी, बोलक्या भुवया आणि सुंदर केशसंभार. तिच ते रूप पाहून तो पागल झाला. त्याने तिची माहिती मिळवली तिच नाव सौदामिनी पवार होत. तिचे वडील शासकीय अधिकारी होते.
भेट घेण्याची अनिवार ओढ त्याला त्या गावात घेऊन जाई. एक दिवस तो तिची वाट अडवत म्हणाला,”सौदामिनी मला तू खुप आवडतेस माझ्याशी मैत्री करशील का?” ती थोडी रागावली, “तू कोण? कुठला? मी तुला ओळखत नाही आणि तू थेट मला मैत्री करशील का कस विचारतोस?” तो म्हणाला,” मी शेजारच्या गावात राहतो,मी पीडब्लूडीत कामाला आहे. तू रोजच मला दिसतेस, स्पष्ट बोललो राग मानू नको पण तुला पाहिले की मी भेटण्यासाठी अस्वस्थ होतो काही करून आज तुला भेटायचच ठरवून निघालो होतो म्हणून.” ती म्हणाली,मला एसएससी ला ७८% मार्क आहेत,मी ग्रँज्युऐशन करणार आहे तू किती शिकला आहेस मला माहितही नाही. मी कसं काय तुला सांगणार.” तो म्हणाला, “मी एसएससी आहे. नुसत शिक्षण काय कामाचे? मी सरकारी नोकर आहे, वाटले तर पुढे शिकीनही.”
ती त्याच्याकडे कुत्सितपणे पाहून म्हणाली, “पाहिलस तुझी सोच फार खालची आहे. मला असल्या कमी शिकलेल्या, ध्येय नसणाऱ्या मुलाशी मैत्री करायचीच नाही . माझ्या वाटेत येऊ नकोस. प्लिज मला त्रास देऊ नको,नाहीतर मी बाबांना सांगेन, मग तुझं व्हायचं ते होईल.” ती सायकलवर निघून गेली.
त्या दिवशी तो पूर्ण दिवस तो जेवला नाही,कामावरच्या मित्रांनी त्याला विचारले, शेखर तब्येत बरी नाही का? त्याने उत्तर दिले नाही. काहीही करून तिला मिळवायचीच ही त्याची जिद्द होती. घरी गेल्यानंतर तो भावंडांचा अभ्यास घेत असे पण आज त्याने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. दादा ,दादा करत ते त्याच्या पाठी फिरत होते पण दादा वेगळ्याच दुनियेत हरवला होता. रात्री तो उपाशीच निजला. एखाद्या आईने मुलगा का जेवत नाही? त्याला काय बरे नाही याची चौकशी केली असती. पण तसे काही झाले नाही. ताट वाढण्यापूर्वीच तो आईला म्हणाला,”आई,आज मला जेवायचं नाही.” तिने काहीही विचारले नाही. ती म्हणाली, “बाहेरून खाऊन आला असशील म्हणून भूक नसेल. जेवायच नव्हतं तर आधी सांगायचे होते. माझा वेळ वाचला असता.” थोड्या वेळाने स्वयंपाक आटोपला तस ती ती शरद आणि सुमनला म्हणाली, “तुम्हाला तरी जेवायचे आहे ना? जा बाबांना बोलवा जेवायला. तुमच्या दादाचं काय बिनसलयं ? की कुठे मारामारी करून आलाय ? माहिती नाही. भुक लागली असेल तर जेवायला चला. नाहीतर आवरून ठेवते सगळं.” दत्तात्रय आणि मुले निमुटपणे जेवली.
शेखरला सौदामिनी शिवाय काही सुचत नसे इतका तो तिच्या प्रेमात पडला होता. चार दिवसांपूर्वी सौदामिनी ने त्याचा खरपूस समाचार घेऊनही, त्याने हट्ट सोडला नाही. तो जास्त टापटीप राहू लागला. तिच्या कॉलेजच्या वेळेत सकाळीच ती दिसावी म्हणून घरून लवकर निघू लागला. त्यामुळे कधी कधी दुपारचा डबा न घेताच तो निघे आणि त्याने डबा नेला नाही की, त्याचं, थंडगार चपात्या त्याला रात्री खाव्या लागत. तिची भेट व्हावी या साठी तिच्या मागे मागे फिरू लागला. तिच्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबून वाट पाहू लागला तशी ती थोडी वरमली. पण प्रत्यक्षात ती त्याला काही प्रतिसाद देत नव्हती.
एक दिवस शेखरने तिला वाटेत अडवून तिच्या वागण्याबद्दल विचारले, ती भयंकर चिडली, “मला विचारणारा तु कोण? तु सारखा सारखा मला त्रास दिला तर मी गावातील मुलांना सांगीन आणि ते तुला झोडपून काढतील.” त्याने तिची मनधरणी केली . तो तिच्यासाठी किती वेडा झाला आहे ते ऐकवले. ते ऐकून ती थोडी हळवी झाली. तिने त्याला सांगितले,” हे बघ शेखर,मला नुकतेच सतरावे वर्ष लागले आहे. मला शिकून खूप मोठं व्हायचं आहे . एवढया लहान वयात मला प्रेम करणे किंवा लग्नाच्या आणाभाका घेणे शक्य नाही. तु माझा नाद सोडून दे, तुला दुसरी कोणीतरी मिळेल”
तो म्हणाला,” मी तुझ्यासाठी कितीही वर्ष थांबायला तयार आहे तु फक्त हो म्हण.” त्याला कटवण्यासाठी ती त्याला म्हणाली, “पुढची पाच वर्षे थांबायची तुझी तयारी असेल तर पहा, माझं शिक्षण पूर्ण होइपर्यंत मी लग्नाचा विचार करू शकत नाही.” ते ऐकूनच त्याची चलबिचल झाली, तरीही तो म्हणाला, “पाच वर्षांनी तुझा विचार बदलला तर?” ती म्हणाली, “त्याची खात्री मी आज कशी देवू? तो पर्यंत तुझ्यापेक्षा शिकला सवरला मुलगा मिळाला तर माझे बाबा तुझ्याशी माझे लग्न कसे लावून देतील?” त्याला ते पटले, “सौदामिनी मी तुझ्यापेक्षा जास्त शिक्षण घेऊन दाखवीन मात्र तोपर्यंत तु माझ्यासाठी थांबायला हवे आणि माझ्या बरोबर बोलायला हवे एवढीच request आहे.” तिने हसून मान डोलावली, ती जायला निघाली तसा त्याने हात हलवून तिला बाय केलं. ती हसली.
कॉलेजला जातांना तिच्या मनात त्याचेच विचार येत होते. “शेखरच काय चुकलं? त्याला आपण खरचं आवडलो म्हणून तर त्याने भर रस्त्यात न भिता विचारण्याची डेरींग केली. दुसरा कुणी असता तर आडून आडून भेटण्याचा प्रयत्न केला असता किंवा कोणाला तरी गाठून चिठ्ठी पाठवली असती. तो खरंच साधा, सज्जन आहे . दिसायला खूप स्मार्ट नसला तरी शरीरयष्टी चांगली आहे . लं आपल्यापेक्षा उजळ आहे. मुख्य म्हणजे त्यांनी माझी मी रस्त्यावर एकटी असुनही शारीरिक छेड काढली नाही. मग मी त्याच्यावर का संतापले ?” ती स्वतः शीच हसली. शेखरच्या धिटपणाचे तिला कौतुक वाटले. त्या दिवशी ती गोंधळलेली होती. थोडी शांत शांत होती. मैत्रीणींनी,तिला विचारले, “सौदामिनी, तुला बरं नाही का? तु आज अगदी शांत शांत का दिसतेस?”
ती हसली, “मी आणि शांत! नाही तस काही नाही, मी ठीक आहे, तुम्हाला उगाचच तस वाटतंय.” ती तस वरकरणी म्हणाली पण तिच्या मनात मात्र येत होते, तो उद्या भेटायला आला तर? आपण काय बोलणार ? की मग त्याला सांगून टाकायचे, तु येत जाऊ नको, कोणी पाहिले तर घरी कळेल आणि मग माझी अडचण होईल. अशी विचारांची कित्येक आवर्तन तिच्या मनात येत होती.मन सैरभैर झाले होते.
ती संध्याकाळी घरी परतली, तेव्हा तीच एक मन म्हणत होतं, घडली गोष्ट घरी सांगून टाकावी, दुसरं मन म्हणत होतं, जाऊ द्यावे. ती गोष्ट वडिलांना समजली तर ते नक्की त्याला तुडवल्याशिवाय राहणार नाहीत. एक दोन वेळा ती आईला सांगायला म्हणून स्वयंपाक घरात गेली, पण त्याचा निरागस चेहरा आठवून तिला त्याची दया आली. कसाही असला तरी तो प्रामाणिक आहे. पण त्याला समजावून सांगायला हवं, पाच वर्षे गोष्ट लपवून ठेवणे सोप्पं नाही. तिच जेवतानाही लक्ष नव्हते. आई तिला म्हणाली,”सौदामिनी, तुला बरं नाही का? आज नेहमी प्रमाणे जेवणात लक्ष नाही.”
लहान भावाने पण हीच तक्रार केली होती. शाळेत त्या एकमेकींना वर्गातील इतर मुलांच्या नावाने चिडवायचे पण तो विषय तिथेच संपत असे मग आजच अस का होतयं? त्याच्या विचाराने डोक तापतं, ह्दय धडधडतं. आज आपण अभ्यासही केला नाही. नक्कीच हे थांबवल नाही तर आपण वेड्या होऊ. उद्या दिसला तर त्याला हे ठाम सांगितले पाहिजे. तू मुद्दाम इथे येता कामा नये, माझ्यासाठी माझं करिअर मोठे आहे, त्यात तुझ्यामुळे अडचण आली तर मीच मला माफ करणार नाही. ठरवल्यामुळे डोक शांत झालं. उशीराने झोपही लागली. सकाळी ती उठली नेहमीप्रमाणे ती सायकल दामटवत जात होती. तो दूरून तिच्या दिशेने येतांना तिला दिसला. तिने काय बोलायचे त्याची मनात उजळणी केली.
त्याने हात हलवून हाय! केले. कदाचित तेवढे करून तो निघूनही गेला असता, तिच त्याला थांब म्हणाली, त्याला आनंद झाला. तिने स्वतः च पुढाकार घेतला तर त्याला थोडच नको होता. तिने दिर्घ श्वास घेत सुरवात केली,”हे बघ शेखर, तु मला भेटायला अजिबात येता कामा नये. काल मी पूर्ण दिवस डिस्टर्ब आहे, कॉलेजमध्ये माझ लक्ष नव्हते, माझ्या मैत्रिणी, माझा भाऊ, आई यांनी माझ्यातील बदल पहिला आहे. मला प्रेम वगेरे काहीच कळत नाही आणि ह्या वयात माझा अभ्यास मला महत्वाचा आहे त्यामुळे तु उद्या पासून इथे चुकूनही येऊ नको. मी तुला हात जोडते. भविष्यात काय होईल ते मी आज सांगू शकत नाही पण
मी तुझा आदर करते. तो तसाच रहावा असे वाटत असेल तर मला माझ्या वाटेने करिअर करून मोठे होऊ दे. तुला माझी विनंती समजली असावी अस मी मानते. तेव्हा पुन्हा भेटण्याचे साहस करू नको.”
तो तीच एकसंघ बोलणे ऐकत होता. एकदाही त्याने तिच्या बोलण्यात अडथळा आणला नाही, पण तिचे बोलणे संपले तसे तो म्हणाला. “तुझे बोलणे मला पटले,मला फक्त एकच शब्द दे की मी तुझ्यासाठी थांबलो तर साथ देशील की नाही.” ती म्हणाली, ईश्वराला वाटले तर आपली भेट नक्कीच होईल, मी आज शब्द देऊन तुला अडवून ठेवणार नाही, आज एवढ्या पुढचा विचार करण्याची माझी क्षमता आणि पात्रता नाही पण मी नक्की तसा प्रयत्न करेन आणि तू स्वतः ला सिद्ध केलेस तर मी नक्की तुझाच विचार करेन.” तो तिच्याकडे विश्वास पूर्ण नजरेने पहात म्हणाला, ठीक आहे मी वाट पाहीन,जो पर्यंत तु तुझे शिक्षण संपवून मला स्वतः भेटत नाही. मी तुला भेटणार नाही. पण माझ्या प्रेमात कोणी आले तर मात्र..”
“तु मला धमकी तर देत नाहीस ना? हे पहा तु चांगला मुलगा आहेस असं समजून मी तुझ्याशी बोलले, त्याचा गैरअर्थ काढू नकोस. तुला थांब अस मी म्हणाले नव्हते, तेव्हा तो तुझा चॉईस आहे. ओके ! या पुढे माझी भेट घेण्याचा प्रयत्न मुळीच करू नकोस. तुला समजत असेल तर शहाण्या मुला प्रमाणे वाग. गुड बाय.”
तिने सायकल पायडल मारत पळवली, तो तिच्या परखड बोलण्याकडे आणि तिच्या धगधगत्या रूपाकडे पहातच राहिला. न भुतो न भविष्यती असा लखलखीत हिरा त्याला सापडला होता. त्याला कोंदण म्हणून आपण शोभू की नाही हिच शंका त्याला सतावत होती. त्याने तिचा विचार मनातून काढून टाकण्याचा जो जो प्रयत्न केला तो तो विचार उसळी मारून येत होता. त्याची झोप हरवली. जे काही घडले ते तो कोणालाच सांगू शकत नव्हता. घरी आईकडून कधी प्रेमाचे शब्द मिळाले नव्हते पण जिच्यावर जीव जडला होता ती खरोखरीच सौदामिनी होती. काहीच तर सूचत नव्हते, तिला दोषही देता येत नव्हता इतके तिचे विचार व्यवहार्य आणी स्पष्ट होते.
दुसऱ्या दिवशी तो नेहमी प्रमाणे उठला. छानसा ड्रेस घालून तयार झाला. कितींदा तरी त्याने आरशात पाहिले. आई नकळत आणलेला परफ्यूम कपड्यांवर मारला. तो कुठे निघाला होता ते त्यालाच कळत नव्हते. मनात विचारांचा कल्लोळ होता. तिच्या ध्येयापर्यंत ती नक्की पोचेल याची त्याला खात्री वाटत होती, पण आपले काय? त्याच्या कानात तिचे शब्द न शब्द रसरशीत लाव्हा सारखे पडत होते.
‘शहाण्या मुला प्रमाणे वाग.’ त्याने मनगटावरच्या घड्याळात पाहिले साडे नवू वाजून गेले होते, त्याने वेग वाढवला दूरवर रेल्वे गाडीचा परिचित आवाज येत होता. काही सेकंद आणि राजधानी धडधडत गेली. त्याच्या देहाचे अनेक तुकडे झाले.
पण त्याने तसे का केले? का त्यानी संयम पाळला नाही? का त्याने स्वतः शिकून तिच्या अनुरूप होण्याचा प्रयत्न केला नाही? याचं कारण एकच, तो अगदी लहान वयात आईच्या प्रेमाला पारखा झाला होता आणि आता पाच वर्ष तू मला भेटता कामा नये या तिच्या निर्णायक शब्दांनी तो पोरकाही झाला होता. त्याला गरज होती ती प्रेमळ शब्दांची. सहानुभूतीची, घरातून तर ते शक्य नव्हतेच. मग बहूदा त्याच्या मनात निर्णय झाला. विरहाची तडफड सहन करत जगण तर शक्यच नाही. म्हणून बहुधा त्याने सर्व प्रश्नांतून सोडवणूक करून घेतली. कोणताच धागादोरा न ठेवतो तो सौदामिनीला दिलेला शब्द पाळण्यासाठी तिच्या मार्गातून दूर निघून गेला होता. तो ट्रँक ओलांडताना त्याचे अपघाती निधन झालं असावं असेच सगळे समजले असावेत. कदाचित सत्य काय ते फक्त सौदामिनी जाणत होती.
ती त्याला कडक शब्दात बोलल्यापासून तो तिला भेटण्यासाठी आला नव्हता याच तिला कौतुक वाटत होत. खरच शेखर शब्दांचा पक्का निघाला असेही वाटत होते. त्याने भेटायला यायला हवे होते असेही वाटत होते. मनात हुरहूर होती. तिला नक्की काय वाटते ते कळतच नव्हते पण त्याच्या न भेटण्याने एक पोकळी निर्माण झाली होती. आणि अचानक काही दिवसांनी त्याच्या अपघाती निधनाबद्दल तिला समजले. तिला खूप वाईट वाटले. चटकन डोळे भरून आले. आपल्या रागीट स्वभावाने मर्यादा ओलांडली, त्याच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत अशी टोचणी तिला लागली. ज्या दिवशी त्यांचे बोलणे झाले त्याच्या दुसऱ्या दिवशीच तो प्रकार झाला होता. तिच काळीज हेलावून गेलं. खरच तो पाच वर्ष थांबला असता तर? त्या दिवशी तिने त्याला तसेच जाऊ दिले असते आणि कधीतरी समजुतीने सांगितले असते तर? खरे तर, आता कशालाच अर्थ नव्हता.
जेव्हा तिला ती बातमी कळली त्या दिवशी ती जेवली नाही. आपल्याला बरं नाही आणि थोडा आराम केल्यानंतर बरं वाटेल अस खोटच तिने आईला सांगितले. रात्री सारखा तो स्वप्नात येत होता. थोड्या थोड्या वेळाने तिला जाग येत होती. मनाचा कोंडमारा झाला होता. त्या दिवशी ती उशीरा उठली. आईनेही बरं नसावे म्हणून उठवले नाही. पण घाईघाईने तिने तयारी केली.
कॉलेजला निघतांना कोणाच्या लक्षात येणार नाही अशा अंदाजाने घरच्या फुलझाडांची फुले घेतली. ज्या ठिकाणी त्यांची चर्चा झाली आणि जिथे तो उभा होता तिथे पोचताच तिने आजूबाजूला पाहिले. तिथे कोणी नाही पाहात तिने फुलांची ओंजळ जिथे तो उभा होता तिथे वाहिली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कदाचित कोणालाही दिसणार नव्हते, कळणारही नव्हते पण तिथेच वेड्या प्रेमविराचे वृंदावन पायतळी तुडवले गेले होते. तिचा इलाजच नव्हता. सगळं काही अचानक घडलं होतं. पण ती आठवण आता आयुष्यभर पाठलाग सोडणार नव्हती.