व्यासंग आणि पसारा भाग 1
जुन्या जमान्यात, ज्यांच्या दारात चपलांचे भरपूर जोड असतील ती व्यक्ती मोठी, त्याची योग्यता जास्त असे म्हटले जात असे. आता शहरात घरे राहिलीच नाहीत. डोंबिवलीत रामनगर, टि ळकनगर, रामचंद्र नगर,पांडुरंग वाडी येथे टुमदार बंगले होते. विकास संक्रमणात ते बळी गेले. साहजिकच बंगला, त्याचे प्रवेशदार, प्राजक्त, फुलांची झाडे, गुलाबाचा ताटवा, वेडा निशिगंध, जाईजुईचे मांडव काळाच्या उदरात गडप झाले. नाती धुसर झाली. दारात मांडव टाकून लग्न किंवा मुंज कालबाह्य झाली. आता आपण इमारतीत राहू लागलो. मग पाहुण्यांचा, is to have to मित्रांचा संकोच झाला. ‘हम दो हमारे दो’, पाठी पडले, आता एक मुल ते ही जेमतेम असते. भविष्यात जोडप्यांना मुल असेल की नाही आणि अजून पाच वर्षांनी लग्नसंस्था टिकेल का? हा गंभीर प्रश्न आहे. मामा, काका, aatya,नणंद, भावजय, मावशी या शब्दांचे अर्थ शब्दकोशात शोधावे लागतील.
नात्याचा पसारा सोडाच, माणूस माणसाला महाग होईल, चालेल का असले जीवन? पण अजूनही गावाकडे घरे आहेत, घरात माणसे आहेत, शेजारी आहेत. कोणी गेले तर खांदा द्यायला जिवाभावाची नसली तरी आपुलकीची किंवा ओळखीची माणसे आहेत. अर्थात गेलेल्या माणसाला काय कळणार की त्याला शेवटचा निरोप द्यायला कोण कोण येऊन गेले? पण याची मोजदाद गावी आजतरी होते. तेव्हा एकत्र कुटुंब पध्दतीचा काय फायदा होता ते कळते.
तुमच्या दारा बाहेर जास्त जोडे कधी पाहिलेत का? कधी दिसतील? तुमच्या घरात काही शुभकार्य असेल तर किंवा काही दुःखी प्रसंग घडला तर. पण समाजात अशा काही व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे सतततचा राबता असतो. लोक ये जा करत असतात, अर्थात हे कधी शक्य आहे? तुम्हाला हे अस लोकांचं येणं, जाणं चालत असेल तरं,त्यांची मदत करण्यात तुम्हाला स्वारस्य असेल तर, तुमचा वेळ, पैसे दुसऱ्यासाठी देण्यासाठी तुम्ही तयार असाल तर. किंवा तुम्ही मानाचे पद धारण करत असाल तर. तुम्ही एखाद्या विद्येचे साधक असाल, पट्टीचे प्रवचनकार, वक्ते, पक्षाचे नेते असाल तरच हा दुर्मिळ योग पहायला मिळतो.
सध्या आपल्या घरी आपल्या गावावरून पाहुणे आले आणि जास्त दिवस राहिले तरी आपल्या कपाळाला आठ्या पडतात, का? तर आपले रुटीन बिघडते,आपल्याला त्यांची अडचण ठरू लागते म्हणून. ही माझी रूम, ही माझी खुर्ची असं सगळं ठरलेलं असत. स्वतः ची स्पेस कायम राहावी त्यावर आक्रमक नको हा स्वार्थी विचार. मग ज्यांच्या घरात अखंड राबता असतो त्या घरातील गृहिणीला आणि अर्थात त्या घरातील नोकरांना मोकळा वेळ आणि स्वतःला स्पेस मिळत असेल का? पण त्यांच्या घरातील संस्कृती तशी असते. येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत हसतमुख चेहऱ्याने करायची मनाला सवय असते. ज्या मुली छोट्या परिवरातून अशा मोठ्या घरात जातात त्यांची गैरसोय होते.
मग भांड्याला भांडं लागतं. घरी संस्कृती असावी लागते, किंवा स्वतःत बदल करून आत्मसात करावी लागते. यासाठी व्यासंग हवा, मी, माझे, माझ्या पुरते पाहून चालत नाही.’अतिथी देवो भव’ अंगी बाणवावं लागतं.
मोठ्या घरातली माणसं येणाऱ्या पाहुण्यांसाठी पिण्याच पाणी ठेऊन देतात आणि घरातून चहाची वाफ बाहेर टाकणारी किटली आणी खूप सारे पेले आणून त्यात चहा ओतला जातो. लोक स्वतः उठून चहाचा पेला घेऊन चवीने सिप सिप चहा पितात आणि त्यांचा चेहरा आनंदाने फुलतो. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायलाही भाग्य लागतं. “वा! काय चहा आहे, कुणीतरी म्हणतं, ‘नेहमीच काही माझं काम भाईंकडे असतच अस नाही पण या स्वादीष्ट चहासाठी ऐवढ्या दूर यावचं लागतं.” भाई नावाची घरची व्यक्ती ओरडून म्हणते, “गोविंदा याच्या घशात किटली ओत रे!” हास्याची लाट फुटते. याला म्हणायचा व्यासंग आणि माणसाचा पसारा.
घरासमोर तुळशी वृंदावन पाहुन गृहलक्ष्मीचं औदार्य ओळखावं आणि दारी आलेल्या पै पाहुण्यांची उठबस कशी होते ते पाहून घरधनी मोठ्या मनाचा की कोत्या मानाचा ते ओळखावं. तेव्हा दारी खूप चपले जमली आहेत आणि हसत खेळत संवाद सुरू असेल तर समजावं त्या घराची आब समाजात आहे. लोकांचे ऐकून त्यांचे समाधान करण्याची ताकद त्यांचा शब्दात आणि कर्तृत्वात आहे. ‘भाग्यवंत ज्यांचे चरण, त्यांच्या पुढती उतरते वहाण.’
आजकाल मोठ्या घरात, चपलेसह किंवा बूट घालून बसण्याची सवय आहे. ती सवय चांगली की वाईट ते ज्यांनी त्यांनी ठरवावे. पण गावाच्या रस्त्यावर घाण तुडवत आलेले चप्पल बाहेरच शोभते. ते जर तुमच्या दिवाणखान्यात नाचत असेल तर थेटर आणि तुमचं घर यात अंतर काय राहिले हो ? थेटरात खेटर शोभतील पण घरात? तेव्हा पाश्चिमात्य संस्कृती दारा बाहेर ठेवा. त्यांच्या चांगल्या पद्धती घेऊ नका, स्वीकारू नका असा आग्रह नाही पण घरात चप्पल,धूम्रपान,अश्लील चाळे आणि मोठ्या मोठ्याने उपरोधिक संवाद असूच नये.
आजही ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ग्रामस्थ चपले घालून जात नाहीत.तलाठी कार्यालय, ग्रामसेवक भाऊ,सरपंच यांच्या कार्यलयाच्या बाहेर तुम्हाला चपले पहायला मिळतील.हा ग्रामीण संस्कृतीचा भाग आहे.तिथे ग्रामपंचायत हे सुध्दा दैवतच आहे. गावात मोक्याच्या ठिकाणी,देवळाच्या बाहेर , चावडीवर, एस.टी थांब्याच्या शेडमध्ये गावातील अनेक टाळकी एकत्र बसून कुचाळकी करत असतात किंवा राजकरणावर तावातावाने बोलत असतात.तंबाखूची देवाण घेवाण होते एक चुन्याची डबी सात जणांजवळ फिरते. कोणीतरी उठून दूर जात पिंक टाकून येतो.
मग यु ट्यूब पाहून आलेला एखाद्या तरूण काल पाहिलेल्या बातमीने सुरवात करतो, “आयला, मोदी सायबाची लय मजा आहे, बेणं रोज कनच्या न कंच्या देशाला फिराय जातं, आपल्याला तालुक्याला जायचं म्हटलं तर शा,दोनशे पाठी पडतात. साल्याचा काय रूबाब हाये, माणूस एक आख्ख विमान घेऊन जातो. काय बडदास्त ठेवत्यात विचारता सोय नाही, नाय तं आपणं, सालं घरची पोट्टी बी इचारत न्हाई.”
“आर दाजी ते देशाचे पंतप्रधान हायेत, आपल्या वानी तंबाखू मळत चावडीवर गप्पा नाही मारतं,त्यांचा दिस तांबड फुटायच्या आत सुरू होतो,आपल्यावानी कामधाम टाकून ते चावडीवर येळ घालवायला न्हाई येतं” प्रत्येक जण आपली अक्कल पाजळायला सुरवात करतो. पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता यांच्याबाबत पाहून आलेल्या एखाद्या व्हिडीओ बातमीवरून आपआपले मत व्यक्त करतात. आपल्याला राजकरणातल खूप कळते अशा अविर्भावात आपले कसे बरोबर ते पटवण्याचा प्रयत्न करतात. एकंदरीत राजकारण त्यांनी कोवळून प्यायल असा आव असतो.
कोणी म्हणते,” नाना! काय त्यांच मोठेपन सांगतो,घरात समदं कराय नोकर चाकर असल्यावर काय झालयं तस वागायं, आपल्या सारखं वावरात राबंल की बुडबुडे येतील. मोदी चांगला हाय होय? पक्का चोर माणूस आहे त्याने नं बेवड्या शहाने नोटबंदी करून गुजरातमध्ये लाखो करोड दडवून ठेवलेत.”
तर कोणी मोदींची बाजू घेऊन म्हणतो, ‘मोदीनला पैशांची काय गरज? तो सडिफटींग माणूस कुटुंब नाही की घर नाही. पैसा घेऊन काय करंल?” तिसरा म्हणतो,पांडू च बरोबर आहे, “मोदी हाय म्हणून चीन न पाक चिप बसल्यात. त्यानला ठाव आहे,मोदी थेट घरात घुसून मारलं, म्हणून आपली वार्ता करत नाही. भारताचं नाव जगभर आहे, पहिले आपल्याला कोणी किंमत देत नव्हते. आता G–20 असो की Briks भारताची बाजू वरचढ असते.”
ही चर्चा उत्तरोत्तर रंगत जाते. सरळ दोन तट पडतात आणि दोघही एकमेकांवर तुटून पडतात. तिथे सभेत मोदी हम शांतीदूत है, हमे किसिसे कुछ छिनना नही है। हम वैश्विक शांती बनाने का प्रयास कर रहे है। ऐकू येतं. भाषण सुरू असते आणि गावाच्या चावडीवर तोंडावर गलिच्छ शब्दात एकमेकांचा उध्दार सुरू असतो. यात कुठे आहे व्यासंग? अस तुम्ही म्हणालही, पण यात व्यासंग आहे, मिळमिळीत बोलणं तुम्हाला कुठे ही ऐकू येईल पण असला ठसका अन्य कुठेही नाही.
कामधाम नसले की तासनतास या विषयावर हक्काने बोलण्याइतकी त्यांनी तयारी केलेली असते.कोल्हापूर, सांगली, सातारा नाशिक,अहमदनगर, संभाजीनगर, यवतमाळ कोणताही भाग घ्या ज्यांना बारामाही नोकरी नसेल, शेती नसेल किंवा शेतात राबण मान्य नसेल ते उपटसुंभ घरी इकडची काडी तिकडे करणार नाही, पण चावडीवर येऊन गप्पा हाणण्यात पटाईत. राजकीय चर्चा म्हटली की ते सर्वात पुढे. त्यात त्यांचा व्यासंग मोठा. तेव्हा कामधाम नसतांना चकाट्या पिटायला वेगळं काही लागत नाही.
या चावडीवरच्या चर्चेला व्यासंग म्हणता येईल का? पण लोकांसाठी तो व्यासंगच आहे. कामधाम टाकून नियमित चावडीवर येऊन गप्पा मारणं आणि दुनियादारी करत ऐकमेकांना खरीखोटी माहिती सांगण हे वाटतं तेवढेही सोप्पे नाही.
कशालाही व्यासंग म्हणणे तस अवघडचं पण हेच चावडी मंडळ, निवडणूक आली की सक्रिय होते. प्रत्येक घरातील मंडळींची बीत्तम बातमी यांच्या कानावर असतेच असते. थोडक्यात चावडीवर, मंदिराच्या प्रांगणात कुठेही एकत्र जमून मोठ मोठ्याने गप्पा साटणे, हजर नसेल त्यांची कुचाळकी करणे, कोणाच कोणाशी सुत जुळलयं, कोणं पोटुशी आहे ,कोणत्या सासू सुनेच पटत नाही ते हातभर करून सांगणे याला व्यासंग म्हणायचं का? पण दुर्दैवाने चावडी आणि गप्पाष्टठ याचा जवळचा संबंध आहे. चावडी ही गोष्ट खेड्यातील लोकांसाठी महत्त्वाची आहे. नव्हे त्या शिवाय ते जगू शकणार नाही.
व्यासंग कशाकशाचा असू शकतो? मोल्यवान वस्तूचा, मान्यवर लेखकांच्या पुस्तकांचा, कलासक्त लोकांच्या स्वाक्षऱ्या जमा करण्याचा, विविध देशाचे चलन बाळगण्याचा, इतिहास कालीन शस्त्रे जमा करण्याचा,शंख शिंपले जमा करण्याचा, असा कसलाही व्यासंग असू शकतो पण माणसे जमा करण्याचा आणि त्यांच्याशी मैत्री करण्याचा व्यासंग हा आगळा वेगळा असतो. जसा काही हौसी लोकांना शास्त्रीय गायनाचा व्यासंग असतो, जिथे कुठे शास्त्रीय संगीत मैफल असेल तिथे ते हजेरी लावतात त्यासीठी पैसे आणि प्रतिष्ठा पणाला लावतात. त्यामुळे ज्याला वेगळा व्यासंग आहे त्याला वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो.
किलोभर दागिने अंगावर घालून फिरणे आणि त्यासाठी बाऊंसर पोसणे तुम्हाला परवडेल का? पण महाराष्ट्रात असे शेकडो तरुण आहेत ते आपला हा व्यासंग पुर्ण करतात. ते जगाला कळावे म्हणून सेलिब्रिटी सोबत शो आयोजित करून फोटो माध्यमातून सामाईक करतात. काही नियमित लाल मातीत अंग मेहनत करतात. तर काही जिथे कुस्ती भरवली जात असेल तिथे कुस्ती पहायला किंवा खेळायला आवर्जून जातात. एखाद्या मल्लाने चांगली कामगिरी केली तर नावाजतात. खिशात असेल ते त्याच्यावरून ओवाळून टाकतात, तेव्हा ज्याला व्यासंग जडला असेल तो त्यासाठी काहिही करायला तयार असतो.
एखाद्या गोष्टीची आवड असणे वेगळं आणि व्यासंग वेगळा. झपाटलेपण अंगात मुरल्या शिवाय व्यासंग येणार नाही. पाण्यात पोहायचे तर किनाऱ्यावर बसून पोहणाऱ्या व्यक्तीचे निरीक्षण करून नाही भागणार. अंग कोरडे राहून नाही चालणार,स्वतःला पाण्यात घालून घ्यावे लागेल,डुंबावे लागेल, प्रसंगी पाणी प्यावे लागेल. जीवाची घुसमट सहन करावी लागेल तेव्हा कुठे थोडफार पोहता येईल. आधी डबक्यात, मग ओहोळात, ओढा आलेल्या नदित आणी मग सागरात असे टप्पे करतच त्यातील निपुणता येईल. ज्याची पाऊले नदीकडे वळली नाही असा माणूस शोधावा लागेल. ज्याला व्यासंग जडला असेल तो गेट वे ते धरमतर किंवा इंग्लिश खाडी पोहून जाईल. त्यासाठी सराव करेल, पैसे खर्च करेल, प्रायोजकत्व शोभेल पण माघार घेणार नाही.
जेव्हा स्वातंत्र्य लढ्यात अनेक तरूणांनी उडी घेतली तेव्हा या रस्त्यावर अडचणींचे डोंगर असणारच, हाय खाऊन नाही चालणार हे त्यांना माहिती होते. प्रसंगी जिवाची बाजी लावावी लागेल हे गृहीत धरूनच उडी मारलेली होती. राष्ट्राला पारतंत्र्यातून मुक्त करणे एवढं एकच ध्येय डोळ्यासमोर होत. पकडले गेलो तर काळ्या पाण्याची सजा होणार हे माहिती असूनही या यज्ञकुंडात उडी घातली होती. कारण एकच, व्यासंग.
इंग्रजांना जेरीस आणण्यासाठी वेगवेगळे उपाय सुरू होते. क्रांतीची ही मशाल महाराष्ट्र ते बंगाल अशी पसरली होती. हजारो कैद्येत कोंडले जात होते, पण त्यात खंड नव्हता. टिळक, सावरकर यांनी पेटवलेली ठिणगी सुभाषचंद्र बोस, मदनलाल धिंग्रा, भगत सिंग,चंद्रशेखर आझाद,अश्फाक खान यांच्यापर्यंत पसरली याचे कारण प्रत्येक क्रांतिकारकाच्या मनात इंग्रज सत्तेच्या विरोधाची आग पेटली होती. हा वणवा सर्वत्र पसरला नसता तर देश स्वतंत्र होण्यासाठी अजून वाट पहावी लागली असती.
सावरकरांनी मार्सोलेस येथे आगबोटीतून उधाणलेल्या समुद्रात उडी मारली ती स्वतःच्या जीवावर, कोणीतरी येऊन वाचवेल या संभ्रमात नव्हते. त्याला असामान्य ध्यैर्य लागतं. चंद्रशेखर आझाद, भगत सिंग, सुभाषचंद्र बोस, चाफेकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्या अंगी अतुल्य साहस होते. देशभक्तीचा व्यासंग होता. ‘मर मिटा सकते है लेकीन सर झुका सकते नही।’
चांगल्या गोष्टींची सुरवात करायची असेल तर प्रथम स्वतः विषयी आदर, प्रेम निर्माण वाटायला हवे. विचारांचा ठामपणा हवा. प्रबळ इच्छाशक्ती हवी, शब्दात माधुर्य हवे, मनात करुणा हवी, ओलावा हवा, प्रेम हवे. वृत्ती बेडर हवी. झोकून काम करायची मनात इच्छा हवी. तरच तुमचं नेतृत्व कोणीतरी स्वीकारेल, कबूल करेल. पांडुरंग शास्त्री आठवले, नाना धर्माधिकारी, आणि सतसंग चालवणारे यांचे हजारोनी अनुयायी आहेत. दर वर्षी एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते सर्व एकत्र येतात तेव्हा जनसागर लोटतो. स्वच्छता मोहीम किंवा अन्य कामे ते एकत्र येऊन करतात.
तेव्हा चांगल्या गोष्टींचा व्यासंग असेल तर त्यातून चळवळ उभी राहते आणि एखादे विधायक काम या शिष्यांच्या श्रमातून हा हा म्हणता उभे राहते.
माधव ज्युलियन,बा. सी.मर्ढेकर आणि समकालीन इतर कवी यांचा काव्यकट्टा पुण्यात जमत असे, बा.भा. बोरकर,मधू मंगेश कर्णिक, मंगेश पाडगावर यांचे कथा कथन आणी काव्य वाचन कार्यक्रम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होत असत. लोकांना चांगले काही ऐकवले तर त्यांना हवे असते.चांगले काही ऐकवण्यातूनच व्यासंग निर्माण होतो. जेव्हा चित्रपट गृह मर्यादित होती तेव्हा खुल्या मंचावरील नाटके पाहूनच लोकशिक्षण आणि आनंद मिळत असे. ठराविक कंपनीची नाटके पहायला लोक गर्दी करत. याचा अर्थ तुमच्याकडे लोकांच मनोरंजन करण्याची किंवा मौलिक विचार देण्याची क्षमता असेल. तर तुमच्या पुढे लोक जमतात. हा लोकसमुदाय तुमची फुकटात जाहिरात करतो आणि पसारा वाढत जातो. सुरेश भटांच किंवा कवी माणिक सिताराम गोडघाटे अर्थात कवी ग्रेस यांच आकाशच वेगळं, सुरेश भटांचा व्यासंग हा निसर्ग, तारका, नाती यांची सांगड घालणारा हळूवार शब्दात प्रेम ,विरह आणि वेदना व्यक्त करणारा तर ग्रेस यांना जे सांगायचं आहे ते समजून घेण्याची कुवत असेल तरच कळेल अस दुर्लभ लिखाण. दोघेही तसे समाजापासून स्वतःला दूर पाहणारे,दूर ठेवणारे. भटांची गझल मनाचे धागे उसवून टाकणारी, कविता जीवाला बोचणी लावणारी. ‘केव्हा तरी पहाटे उमलून रात्र गेली’ कवितेतला आर्त शब्दांत तर आहेच पण स्वरातही आहे. त्यामुळे या गझलांना आणि कवितांना मुक्त व्दार आहे. प्रेमात हरवलेल्या प्रियकराला विरहाची,प्रणयाची अनुभूती देण्याच काम भट करतात आणि कसे? तर पाण्यात उभे राहुनही पाण्याचा साधा स्पर्श होऊ नये तसे. हाच तो कलामय व्यासंग जो ह्रदयात गहिरी जखम करून जाते.
त्यामुळे भिमराव पांचाळे असो की अन्य कोणी ह्या गझलेची अनुभूती देतांना पिळवटून निघतात, ते आर्त मनाला क्षुब्ध करतात. आपण त्या गझलेतील नायक आहोत इतकी ती आपली वाटू लागते रक्तात भिनते. का बरे ती सर्वोमुखी होणार नाही?, का बरे पसरणार नाही ?का बर ती अवकाश व्यापणार नाही? काजवा अंधारात चमकला तरी त्याचा प्रकाश सर्वत्र पडणारच आहे. ग्रेस यांच लिखाण दुर्बोध आहे असे म्हटले जाते कारण त्यांच्या विचारापर्यंत पोचणे आपल्याला जमत नाही. “
‘ती गेली तेव्हा रिमझिम रिमझिम पाऊस निनादत होता’ ही पहिली ओळ ऐकता त्यात कुठेही दुर्लभपणा जाणवत नाही. जर ती कविता पूर्ण वाचली तर त्यातील दुर्बोधपणा रहात नाही. कवितेचा गाभा समजला तर त्यात दुर्बोधपणा रहातच ना. ज्यांच्या वाट्याला दुःख येते तो आपल्या भावना व्यक्त करताना कसेच गहिरे,दुःखात चिंब भिजलेले शब्द योजतो आणि ते समजून न घेतल्याने दुर्बोध ठरतात.तेव्हा कोणतेही काव्य कोणतेही वाद्य वा कला समजून घेण्यासाठी व्यासंग हवा तरच त्याची व्याप्ती समजते.
पुलंचा व्यासंग असाच मोठा होता त्यांच्या मित्रात वसंत देशपांडेही होते आणि भीमसेन जोशी ही होते. कोणीही व्यक्ती असू शकत होती. उत्तम कान आणि गळ्यात सुर असणारे तर होतेच पण समाजसेवेची आवड असणारे होते, डॉक्टर होते, राजकरणी होते. अनिल अवचट त्यापैकी एक, या माणसाने आयुष्यात स्वतः वर कोणतेच बंधन बांधून घेतले नाही. हा माणूस अमुक एक करतो अस म्हणताच येत नसे. कोठेही मुशाफिरी करायची, एखादा विषय मनात बसला की त्याच चिंतन,मनन करायचं तो विषय मनात रूजवायचा त्याच बारसं घालायचे, समाजापर्यंत पोचवायचा मग त्याची कोणी कितीही अवहेलना केली, कितीही कष्ट उपसावे लागले तरी फिक्र नाही. सुनिता ताई आणि पु.लं यांच मुक्तांगण याच ईर्षेने त्यांनी आपल म्हटलं. वाढवल,जोपासल.
क्रमशः
Hello Neat post Theres an issue together with your site in internet explorer would check this IE still is the marketplace chief and a large element of other folks will leave out your magnificent writing due to this problem