व्यासंग आणि पसारा भाग 2
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
पहाडी आवाजातील, “माझे माहेर पंढरी” ऐकलं की भिमसेन जोशी यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही, किंवा जितेंद्र अभिषेकी यांचे सर्वीत्मका अणु दिव्यता हे सुमधुर गाण ऐकल की देवाच्या दिव्यतेची साक्ष पटते. हे महान कलाकार गात असतांना आपण त्यांची देहबोली पाहिलीत तर लक्षात येईल की
गाणं गात असतांना त्यांचं एकाग्र एक चित्त झालेलं असतं,आतला हुंकार त्यांना साद घालत असतो. पंचेद्रिये एकवटलेली असतात, ह्रदय नामाचा उदघोष करत असते. ही तद्रुपता, तल्लीनता ही काही एका दिवसात साध्य झालेली गोष्ट नाही. काही तपे त्यासाठी आराधना करावी लागली.
असं सांगतलं जातं की पंडित भिमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी संगीताचे खुळ डोक्यात घेऊन घरातून पळून गेले होते. कुठे? तर उत्तरेत वर्षानुवर्षे शिकत राहिले, आपली संगीतसेवा लोकांच्या चरणी अर्पण करत राहिले, स्वतःला अजमावत राहिले. गुरुगृही राबत राहिले, संकोच नाही, संभ्रम नाही. गुरू सांगतील तो रियाज दिवसाच्या त्या त्या प्रहराला करत राहिले, गळा आणि सूर जपत राहिले. वेगवेगळ्या मात्तबर लोकांच्या घरी संगीत साधना करत राहिले. वेगवेगळ्या चिजा, बंदिश गोळा करत राहिले. नित्य नियमाने संगीत पूजा बांधत राहिले आणि मग हीच साधना लोकांच्या मनास पसंत पडावी म्हणून देशोदेशी फिरत राहिले. मोगुबाई कुर्डीकर, हिराबाई बांदोडकर, किशोरीताई ओमणकर अशा अभिजात गायकांना ऐकून मन समृद्ध करत राहिले.
जेवढे मोठे कलाकार होऊन गेले त्यांनी काही पथ्ये पाळली, व्यासांगातून आपण मांडत असलेला पसारा आपल्या आवाक्यात हवा. आपल्या जवळची कला योग्य शिष्य हेरून त्याला द्यावी, कलेचा अनमान आणि अवमान होऊ नये याची काळजी घ्यावी. हे लक्षात घेऊन त्यांनी बहुगुणी शिष्य जोपासले.
शिष्यामध्ये कोण उजवा कोण डावा असे मात्र गुरू कोणाजवळून होऊ नये. कर्नाटकी संगीत देशाच्या कानाकोपऱ्यात तर पोचले पण साता समुद्रा पल्याड पोचले. संगीतातील सात स्वर पण ते स्वर आळवण्याची भिन्न शैली, भिन्न परंपरा. त्यातून निर्माण झालेली शिष्य परंपरा. कुमार गंधर्व, वसंतराव देशप्रेम, पंडित जसराज,भास्कर बुवा बखले, विष्णू पलुस्कर, डी .व्ही. पलुस्कर, गंगुबाई हंगल, प्रभा अत्रे, शुभा मुदगल,किशोरी आमोणकर, माणिक वर्मा, बेगम अख्तर, बडे गुलाम अली खान, रवी शंकर, बिरजू महाराज एका का दोन शेकडो नावे. यातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे संगिताच एक एक न लिहिलेलं पुस्तक. शास्त्रीय गायन आणि नाट्य संगीत क्षेत्रातील हा पसारा, आवरता येणार नाही इतका विशाल किंवा आवरुच नये वाटावे लावणारा.
आता जे नाट्यसंगीत आपण ऐकतो किंवा शास्त्रीय संगीत ऐकतो त्यातील पदे किंवा चिजा कोणी बांधल्या या बद्दल कधी फारशी चर्चा होत नाही. या चिजा ज्यांच्या गळ्यातून उतरून तुम्हाला आनंद देतो तो मोठा असे मानले जाते तरीही तेव्हाची ही गाणी दिड दोन शतके जुनी असुनही आजही तितकिच लोकप्रिय का आहेत? तर त्याच्या शब्दांची बांधणी आणि त्यातली फिरत,
अर्थपुर्ण सहजच जुळलेलं यमक, ‘वद जाऊ कुणाला शरण, करिल जो हरण संकटाचे’ कोणतही पद आशयपूर्ण तर आहेच पण सहजच तोंडात रूळेल असं ही आहे त्यामुळे ते लक्षात राहते. तर महत्त्वाचा मुद्दा नाट्यसंगीत कार्यक्रमात याचा उद्गता कोण ते ही संगीत प्रेमींना कळावं.
‘कट्यार काळजात घुसली’ नाटकातील वसंतराव देशपांडे यांची गाणी आठवून पहा, तसे तर त्यांनी गायलेली सर्वच गाणी एकापेक्षा एक सुमधुर आहेत. ‘हे सुरानो चंद्र व्हा किंवा लागी कलेजवा कटार, तेजोनिधी लोहगोल, घेई छंद मकरंद, मृग नयना रसिक मोहिनी, दाटून कंठ येतो.’ त्यांनी गायलेली गाणी आज त्यांचा नातू राहुल देशपांडे तितक्याच ताकदीने पुढील पिढीसाठी गातो. वसंतराव यांच्या काळात फारशी साधने नसतांना त्यांनी अवीट गोडीचा पसारा मांडला होता आज संगीत साथ द्यायला प्रत्यक्ष वादक मंडळी नसली तरीही जमू शकते. हा पसारा मांडण्याचे कौशल्य या ऋषितुल्य गायकांकडे होते. त्यांनी बारा बारा किंवा त्याहूनही जास्त वर्षे संगीत साधना करून आणि लोकांच्या नजरेला आणि कानांना खरे उतरून हे यश मिळवले आहे. त्यांनी आपले शिष्य घडवले आणि संगीत पूढे नेण्याची तजवीज केली.
जितेंद्र अभिषेकी बुवांच्या बाबतीतही असेच म्हणावे लागेल, शास्त्रीय संगीत, भक्ती संगीत यात बुवांनी विशेष नैपुण्य मिळवले होते. गुंतता हृदय हे, माझे जीवन गाणे, कैवल्याच्या चांदण्याला, सर्वात्मका अशी सुमधुर आणि काळाच्या हृदयावर कोरलेली गाणी त्यांनी श्रवणीय बनवली.
भारत रत्न भीमसेन जोशी यांच्या नावावर अनेक पुरस्कार आहेत. माझे माहेर पंढरी या गाण्यासाठी त्यांचा लागलेला खर्जातील आवाज ही जादू आहे. इंद्रायणी काठी, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, टाळ बोले चिपळीला, आरंभी वंदीन,सावळे सुंदर रूप मनोहर, आता कोठे धावे मन, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल अशी कित्येक गाणी आपण अनुभवली आहेत. त्यांना पु. ल. देशपांडे यांनी ‘हवाई गंधर्व’ पदवी बहाल केली होती. व्यासंग असल्याशिवाय हा असा पसारा मांडता येत नाही. गाणे हा त्यांचा ध्यास होता,श्वास होता. त्यांची मैफल कुठेही असुद्या कोणत्याही वेळी असूद ती रंगणार यात शंकाच नको.
आपल्या मराठी शास्त्रीय आणि नाट्य संगीताचा हा पसारा प्रत्येक दिग्गज गायकासह मांडूनही संपणार नाही आणि संपवावा असे वाटणार नाही. याला पसारा म्हटल्याबद्दल कोणाला तरी राग येणे स्वाभाविक आहे पण तुम्ही कोणतेही गाणे, कुठूनही ऐकायला सुरवात करा आणि त्यानंतर अशी अनेक मधुर गाणी ऐकत राहा तुम्हाला एका गाण्यातून दुसरे गाणे कधी सुरू झाले हे कळणारही नाही. स्वरांच्या लहरीवर तरंगताना जडत्व संपून जाते, मन कापूर होऊन तरंगू लागते.
या गाण्याची नशा जडली की एखाद्या झोपाळ्यावर बसून किंवा एखाद्या डोहात पाय बुडवून तुम्ही कानात इअर फोन लावून गाणी ऐकत राहिलात तर तुम्हाला वेळा काळाच भान उरणा नाही. हा आनंद उपभोगताना तुम्ही मांडीवर ताल धरता किंवा मान डोलवता ते सहसा कुणाला कळणारही नाही. गाणी ऐकताना ब्रह्मानंदी टाळी लागली तर संध्याकाळ उतरू लागली तरच कदाचित तुमची ‘कान समाधी’ भंग होईल.
काही राजकरणी माणसांची साहित्यिकांशी मैत्री असते, त्यांची रमेश देव, डॉ. श्रीराम लागू, डॉ. घाणेकर, अमोल पालेकर किंवा नाना पाटेकर या कोणाशीही मैत्री होऊ शकते. एखादा उमदा संगीतकार त्यांना जवळचा वाटतो किंवा किशोरकुमार आणि कुमार सानू यांच्याशीही मैत्री सहज होते. ते दादा कोंडके यांचे नाटक पहायला उत्सुक असतात आणि बाळ धुरीलाही आवडीने दाद देतात. मच्छिंद्र कांबळी, अशोक सराफ आणी लक्ष्मीकांत बेरडे यांच्या टायमिंगला टाळ्यांचा कडकडाट करतात. हा मित्रांचा पसारा त्या त्या वेळेस ते एंजॉय करतात.
या राजकरण्यात शरद पवार असतील, बाळासाहेब ठाकरे, गोपिनाथ मुंडे, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन हे राजकरणीही होते. लक्ष्मीकांत बेरडे, अशोक सराफ, विजय चव्हाण, मश्चिंद्र कांबळी हे कलाकार या राजकरणी लोकांवर कोट्या करत असत म्हणून हे नेते चिडले, रागावले असे कधी झाले नाही. कलेचा आस्वाद घेतांना ते संकोच न करता दाद देत असत. आपल्या भोवती माणसांचा पसारा असेल तरच समाजात आपले नाव होईल याची त्यांना जाणीव होती. पसारा कधी मांडायचा आणि कधी आवरायचा किंवा कसा सहज टाळायचा याच शास्त्र अवगत झाल पाहिजे.
गृहिणींना मात्र घरात पसारा मांडलेला अजिबात आवडत नाही. सगळं कसं जागच्या जागी नसेल तर त्यांना चैन पडत नाही, या उलट पुरुष मंडळीवर नियमित आरोप होतो की ते रोमटी असतात, एखादी वस्तू घेतल्यावर ती मूळ जागी पुन्हा ठेवावी यांचे त्यांना भान नसते, मग तो घातलेला शर्ट असो, की वाचायला घेतलेला पेपर किंवा पुस्तक. अगदी स्वतः च्या चष्म्याची तीच गत असते, पुल ओढायची जळती सिगेट बिनदिक्कत टेबलवर ठेऊन लिहित बसायचे. त्यावरचा कपडा पेट घेईपर्यंत भान नसायचे. लिहितांना एवढ समरस झाल्यानंतर लिखाण दर्जेदार झाल नाही तरच नवलं.
प्र. के. अत्रे यांचा पसारा तर विचारूच नका पुण्यात त्यांनी, ‘अध्यापन’, ‘रत्नाकर’, ‘मनोरमा’, ‘इलाखा’ अशी शिक्षणाला समर्पित मासिके काढली. मग मुंबईत त्यांनी नवयुग वृत्तपत्र सुरु केले. त्यानंतर मराठा दैनिक सुरू केले. दुसऱ्या कुणाच्या प्रेसमध्ये का छापा? म्हणून भाड्याच्या जागेत स्वतःची प्रेस काढली. हाती फुटकी कवडी नसतांना चित्रपट काढण्यासाठी स्टुडिओ विकत घेतला याला ‘ए आर ए’ कंपनी असे नाव दिले. याचेच पुढे नवयुग पिक्चर असे नाव झाले.
‘ब्रह्मचारी’, ‘ब्रॅण्डिंची बाटली’, ‘लपंडाव’, ‘संत सखू’ इत्यादी पिक्चर खूप चालले. अत्रे यांचा, ‘श्यामची आई’ चित्रपटाला सुवर्ण कमळ मिळाले. विनोदी लेखक, कवी , फर्डा वक्ता, चित्रपट निर्माता, झुंजार नेता असा बहुआयामी आसामी गेल्या दहा हजार वर्षात कुणी झाला नाही. प्रत्येक गोष्टीत त्यांना रूची होती. शिक्षण क्षेत्रातील बी.ए. बीटी ही तेव्हाची परदेशातील मिळवलेली उच्च पदवी प्राप्त करूनही ते फक्त शिक्षण क्षेत्रातच रमले नाहीत. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी मुशाफिरी केली. संयुक्त आंदोलनात त्यांनी झोकून दिले होते. तेव्हा त्यांनी मांडलेला पसारा पाहून थक्क व्हायला होते.त्यांचा विविध कलाक्षेत्रातील व्यासंग शब्दांत वर्णन करून सांगण केवळ अशक्य. एखाद्या सभेत ते बोलायला उभे राहिले म्हणजे कोणाकोणाच्या टोप्या पाडतील त्याचा नेम नव्हता मग कितीही मोठा राजकीय पुढारी का असेना, तथापि त्यांना कुणाविषयी आकस नव्हता.विनोदबुद्धी खचाखच भरलेली होती त्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्यांच्यावर रागावता येत नसे. या माणसाने प्रत्येक गोष्टीची नशा केली. स्वतःला लुटून घेतले. वसंतसेना चित्रपटानी अत्रेंना बुडवलं, निश्कांचन केल पण ऐट अशी की ते कुबेर आहेत. कितीतरी वेळा त्यांनी भणंग अवस्थेत काढले पण कोणा विषयी आकस वा तक्रार नाही. नाही म्हणता
ना. सी. फडके यांच्यावर तज टीकास्त्र सोडत असत.
आपल्या मराठी मुलकात कोल्हटकरांपासून ते पु. ल. देशपांडे यांच्यापर्यंत साहित्य आणि विनोद निर्मिती याचे अनेक दाखले आहेत. दादा कोंडके आणि गंगाराम गव्हाणकर या जोडीने मराठी चित्रपट सृष्टीत खळबळ उडवून दिली होती. फारसे कथानक नसले तरी द्विअर्थी शब्दांचा खेळ मांडून लोकांना हसवणे यात दादा माहिर होते. दादा कोंडके यांच्या व्यासांगाबाबत फारसे बोलता येणार नाही. त्यांनी जे चित्रपट दिले त्यामधून चांगला आशय घेणारे फार थोडे, मात्र लोकांची तीन तास मेंदू गहाण टाकून करमणूक करून घ्यायला लोक येत असत. त्यांनी गाढवाचे लग्न या लोकनाट्या पासून सुरवात केली आणि एकटा, ‘जीव सदाशिव’, सोंगाड्या, बोट लावीन तिथे गुदगुल्या अशा विचित्र शिर्षकाचे चित्रपट दिले. लोकांच्या अभिरुचिप्रमाणे ते काही ठिकाणी यशस्वी ठरले. त्यांनी सलग सहा हिट चित्रपट दिले पण त्यांच्या कलाकृतीला अभिजात दर्जा होता असे काही म्हणता येणार नाही. कमरेखाली वार करावा असे संवाद आपल्या मराठी सारस्वत संस्कृतीत शोभून दिसत नाही. त्यामुळे त्यांचे चित्रपट हिन अभिरूचीचे म्हणून गणले गेले.
असाच दर्दी कलाकार म्हणजे किशोर कुमार अर्थात कीशोर गांगुली. त्या माणसात काय नव्हतं! गाण्याचे कोणतेही शिक्षण न घेताही त्यांची गाण्यावर आधिसत होती. वेगवेगळ्या बाजातील आणि ठसक्यातील गाणी म्हणावी ती किशोर दा यांनीच. त्यांनी चित्रपटात अभिनेत्याची भुमिका केली आणि चित्रपट दिग्दर्शनही केलं. प्रसिध्दीच्या सर्वोच्च पदी ते अनेक वर्षे होते. याचा अर्थ त्यांना चित्रपट कलेच्या क्षेत्रात प्रचंड व्यासंग होता. पण त्यांच्या या कलेला कदाचित विवेकाचा लगाम नव्हता म्हणूनच अनेक प्रेम प्रकरणे, अनेक लग्ने आणि व्यसनाच्या आहारी गेल्याने बनलेला विक्षिप्त स्वभाव. तेव्हा विविध विषयांतील अभिरुची आणि व्यासंग यांनी तुम्ही प्रिय बनाल, तुमचा मित्र परिवार वाढेलही पण मनावर ताबा नसेल आणि देवाचे अनुष्ठान नसेल तर दुर्गती होण्यास उशीर लागत नाही हेच खरे.
महाराष्ट्राला व्यासंग आहे तो शृश्राव्य अभंगांचा आणि भजनांचा, तुकाराम मोरे उर्फ तुकाराम महाराज हा एका संत म्हणजे संत वांङ्मयाचे नालंदा विद्यापीठ, समाजातील अनिष्ट रुढींवर हल्ला करण्याचे सामर्थ्य अनेक संतामध्ये होते, पण ‘तुका तो तुकाच’ अणुरेणिया थोकडा तुका आकाशा ऐवढा, भंगवंताबरोबर तादात्म्य साधण्याची तुकारामांची क्षमता आणि त्यांच्या बुध्दीची झेप अगम्य आहे. देव केवढा? तर सुक्ष्माती सुक्ष्म अणु रेणु इतका, आणि किती मोठा? तर विश्वरूप आकाशा ऐवढा. त्यांच्या विचारांची झेप पाहिली की अवाक व्हायला होतं. तुकारामांचा देवा विषयी किती प्रचंड व्यासंग, त्याचा प्रत्येक अभंग ज्ञान आणि विज्ञानाच्या दिशेने विचार करायला लावणारे विधान. ते कोणत्या युनिव्हर्सिटीत गेले होते जेथे त्यांनी अणू रेणू शब्द ऐकले? त्यांची ही वैज्ञानिक दृष्टी त्यावेळच्या स्वतःला ज्ञानी समजणाऱ्या माणसांच्या पचनी पडणारी नव्हती. त्यामुळे त्यांचा छळ झाला, म्हणून तुका म्हणतात,
लावूनि कोलित,माझा करतील घात
ऐसे बहुतांची संधी,सांपडलो खोळेमधीं ।।
शुद्रातिशुद्रांना शिक्षणापासून वंचित ठेवून शोषण करण्याची रचना तेव्हाच्या वर्ण व्यवस्थेत होती याचा अभ्यास त्यांनी केला होता. किती उच्च प्रतिचा व्यासंग,उगाचच कुणी त्यांना जगग्दुरू म्हटले नाही.
राजस सुकुमार मदनाचा पुतळा। रविशशिकळा लोपलिया ।१।
कस्तुरीमळवट चंदनाची उटी।रूळे माळ कंठी वैजयंती ।२।
पांडुरंगाचे वर्णन करतांना शब्दांच भांडार तुकाराम महाराज मोकळं करतात, पांडुरंग कसा आहे? तर राजस, ज्याच्या तेजापूढे सुर्य चंद्र यांच तेज फिकं पडेल. एका तूकारामांनी मांडलेल्या अभंगांचा अभ्यास करायला आणि समजून घ्यायला वर्षे घालवावी लागतील आणि तरीही हे कधी शक्य होईल तर व्यासंग असेल तर, देवाची आवड असेल तर.
संत संप्रदाय हा पसाराच आहे. किती नावे घ्यावी, संत एकनाथ, संत नामदेव, संत गोरा कुंभार, चोखोबा,जनी या सर्वांवर कळस म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची चार भावंडे प्रत्येकाच्या वाट्याला उपेक्षा आली. कध कधी संत वाङ्मयाचा विपर्यास केला जातो,नाथांन म्हणे रेड्या तोंडी वेद वदवले, खरं काय तर वेद हे संस्कृत भाषेत होते, संस्कृत प्रचलीत बोलीभाषा नव्हती तर एकनाथांनी ते वेद सोप्या भाषेत सामान्य माणसांना सांगितले आणि म्हणूनच ते सर्वोमुखी झाले. त्याचा प्रसार झाला. आपल्या महाराष्ट्राची संतपरंपरा थोर आहे. ज्ञानेश्वरांनी दुर्लभ गिता सामान्यांना कळावी म्हणून ती प्राकृत भाषेत आणली त्यामुळे गिता सर्वश्रृत झाली. तेव्हा आपण संताचे उपकार मानायला हवे की देवापर्यंत पोचण्यासाठी लागणारा मध्यस्थ त्यांनी कमी केला.
आपल्या महाराष्ट्रात कलाकारांची कमी नाही येथे अनमोल रत्ने होऊन गेली यापुढे होतील याचे कारण ७५० किलोमीटर लांबीच्या रत्नाकराची जाग आणि गाज घेत आपण उठतोही आणि झोपतोही. मन थकून गेलं किंवा मनाविरुद्ध काही घडल की निवांत किनाऱ्यावर जाऊन बसावं किंवा शांतपणे वाहणाऱ्या गोदेत किंवा कृष्णा माईला साद घालावी वाटते की नाही? प्रत्येक नदी आपली संस्कृती घेऊन पुढे जात राहते, आपला व्यासंग वाढवत राहते, अवचित पावसाळ्यात आपला पसारा मांडून दाखवते आणि पुन्हा शांत होत प्रवाहित होते. तसेच शब्दांचे आहे मनातील विचारांचे प्रवाह कधीतरी थोपवणे अशक्य होते आणि मन जेव्हा रिते होते तेव्हाच लेखणी विश्रांती घेते.
हिंदी नाट्य सृष्टीतही पृथ्वी थिएटरचे नाव आदाराने घेतले जाते,
पृथ्वी थिएटर ची निर्मती पृथ्वीराज कपुर यांनी १९४५ सालीं मुबंईत केली होती. रामानंद सागर, शंकर जयकिशन , यांना पृथ्वीराज यांनी येथे संधी दिली होती. देशाभरातील अनेक गायक, संगीतकार, दिग्दर्शक आपल नशीब आजमवण्यासाठी मुंबईत येतात. ही स्वप्न नगरी आहे.
व्यासंग माणसाला काहीही करायला भाग पाडतो, रस्त्यावर पाकिटमारी करणारा किंवा भिक मागणारा मुंबईत अभिनेता बनू शकतो हा चमत्कार फक्त इथेच घडतो. जीवनाची आखणी निट केली नाही तर व्यासपीठ गाजवलेल्या अभिनेत्यावर उत्तरार्धात रस्त्यावर भिक मागण्याची पाळी येते, किंवा त्याची रवानगी अनाथाश्रमात होते.
अनेक कंपन्यांचा मालक असणाऱ्या विजय सिंघानियांना एकलेपणात जगावे लागते. काळ काय करेल सांगणे अवघड, मल्ल्या, निरव मोदी, चोकसी यांचा एक काळ स्टाँक एक्सचेंजवर दबदबा होता. आज त्यांना भारता बाहेर पळून जावे लागले. अनिल अंबानी बँक करप्ट घोषित होतो तर त्यांचा बंधू मुलाच्या लग्नात पाच हजार करोड खर्च करू शकतो. यात काहीतरी नैसगिर्क न्याय आहे का? असा प्रश्न पडतो पण नियती कोणाला फार काळ क्षमा करत नाही.
तेव्हा व्यासंग कितीही मोठा असला तरी तो जपणं अवघड आहे. जो वृत्तीने स्थितप्रज्ञ आहे, ज्याला अपयश, राग, दुःख पचवता येते तोच आपली प्रगती कायम राखतो. त्याचा डंका जगात गाजतो. मंगेशकर कुटुंब असेल किंवा बाबूराव पेंढारकर, सुधीर फडके असतील या कुटुंबांचा मान मरातब कधीहि कमी झाला नाही.’ विवेकाच्या पायरीवर जे ठाम त्यांना जगात मान.’
आचार्य अत्रे यांच्या उदाहरणानेच या लेखाचा शेवट करू, प्रल्हाद केशव अत्रे यांच्या सासवड येथील घरातील आर्थिक स्थिती काही फारशी ठीक नव्हती. पण त्यांनी वाचनाच्या आणि शिकत राहण्याच्या व्यसंगातून फार मोठा पल्ला पार पडला ते लंडन येथे जाऊन B.A. B.T झाले, अध्यापन शास्त्रातील ती मोठी पदवी होती. भारतात आल्यावर त्यांनी काही वर्षे विविध महाविद्यालयात नोकरी केली, पण मुळाचा चळवळ्या स्वभावामुळे ते एका ठिकाणी रमले नाहीत. कलेचा व्यासंग आणि अफाट वाचन याच्या शिदोरीवर त्यांनी विपुल, उत्तम लिखाण केले, नवयुग मासिक काढले, चित्रपट काढले, नाटके लिहिली. बहुआयामी व्यक्तीत्व असल्याचे जे जे वाटेल ते ते केले. अगदी रेस ही खेळले. व्यासंग दांडगा होताच पण हा पसारा त्यांना पेलवला नाही असे खेदाने म्हणावे लागेल. पहिल्या पत्नीच्या मृत्यू पश्चात त्यांनी दुसरे लग्न केले पण चित्रपट निर्मितीचा ध्यास आणि नव्याने सुशीलादेवी बापूराव पवार उर्फ ‘वनमाला’ यांच्याशी झालेली लगट त्यामुळे ते वाहवत गेले. पुण्यातील घरदार आणि पत्नी, मुले यांना सोडून ते मुंबईला गेले. पायाची दासी हा चित्रपट यशस्वी ठरला पण वसंतसेना ज्याचा तेव्हाचा म्हणजे १९४०साली खर्च पाच ते सहा लाख होता, तो पडला आणि ते कर्जबाजारी झाले. त्यानंतरही त्यांनी भरपूर नाटकं लिहिली पण एकदा पाय घसरला, त्यातून ते सावरले नाहीत.
बुध्दीमता आणि व्यासंग असून चालत नाही तर पसारा मांडताना जमीन सोडून चालत नाही. घार आकाशी झेप घेते पण तिच लक्ष आपल्या पिल्लांकडे असतेच. विवेक संपला की अधःपतन होते.अत्रे यांनी सरस्वती सारखी पत्नी आणि दोन मुली यांना ज्या मानसिक यातना दिल्या त्यामुळे अतिशय विशाल व्यासंग असणारा आसामी भुईसपाट झाला. त्यांनी ज्या बाईंशी मैत्री केली, ज्यांना मानसन्मान मिळवून दिला, आपल्या प्रेयसीच्या जागी पाहिले तिने त्यांचा वापर करून घेतला. एकदा नव्हे दोन वेळा त्यांचे घर धुवून नेले. मित्रांनो कलेचा व्यासंग हवाच, समान आवड असणाऱ्या दोन मित्रमैत्रीणींनी कलेसाठी एकत्र याव पण सिमारेषा ओलांडून जाऊ नये ,कलेचा पसारा मांडताना विवेक हरवून चालत नाही. अन्यथा सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाही. बुध्दी गहाण पडते, पदोपदी अपमान सहन करावा लागतो. अर्थात अत्रे त्यातून सावरले आणि त्यांनी मराठा साठी झोकून देऊन काम केले. पण त्यांच्या पत्नीच्या आणि मुलींच्या शरीरावरील जखम बरी झाली तरी मनावरील जखम भरून येणे अवघडच होते.
हे काही केवळ अत्रे यांच्याच बाबतीत घडले नाही, त्यांनी त्याची आत्मकथेत कबुली दिली त्यासाठी आभाळा ऐवढं मन हवं, आभाळा एवढं मन त्यांच्याकडे होते म्हणूनच अत्रे महानायकाच्या भुमिकेत वावरले. त्यांनी मराठी भाषेतील वेगवेगळ्या प्रांतात मांडलेला पसारा चिरायू झाला, सर्वांच्या भाग्यात ते नसतं. पण तरीही ही मोठी माणसं अशी का वागतात? त्या मागचे गुढ संपत नाही. व्यासंग आणि त्याचा पसारा कितीही मोठा असला तरी स्वतः ची मानमर्यादा राखता आली नाही की इतरांकडूनही उपेक्षाच होते. आचार्य पदी पोचलेली व्यक्ती, जी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी होती ती लोकसभा निवडणुकीत पडते, का? हा प्रश्न त्यांनीच समजून घ्यायला हवा होता.
नियतीच विचारते, कोण होतास तू काय झालास तू, रे वेड्या कसा वाया गेलास तू? तेव्हा कलेचा व्यासंग जरूर हवा पण गुडघ्याच सोडून कमरेला बांधून चालत नाही हेच खरं.
समाप्त
Your writing is like a breath of fresh air in the often stale world of online content. Your unique perspective and engaging style set you apart from the crowd. Thank you for sharing your talents with us.
Hi i think that i saw you visited my web site thus i came to Return the favore I am attempting to find things to improve my web siteI suppose its ok to use some of your ideas
Hello Neat post Theres an issue together with your site in internet explorer would check this IE still is the marketplace chief and a large element of other folks will leave out your magnificent writing due to this problem
Hi i think that i saw you visited my web site thus i came to Return the favore I am attempting to find things to improve my web siteI suppose its ok to use some of your ideas
“I agree with your points, very insightful!”