शहाणपण

शहाणपण

तो परदेशात रहात असला तरी त्याची पाळंमुळं याच जमिनीत होती. तरूण होता तेव्हा काही वर्षे त्यांनी भारतात नोकरी केली होती. ऐन पंचविशीत असतांना तो अरब देशात नोकरीला होता. Technical Qualifications असणाऱ्या भारतीय मुलांसाठी तेव्हा संधी होती, त्याच संधीचा फायदा घेत तो दुबईत एका Oil equipment manufacturing कंपनीत पाईपींग डिझाइनर म्हणून कामाला लागला. बरे पैसे मिळत होते. घर खाते पिते असल्याने पैसे पाठवण्याची गरज नव्हती, त्याला पुस्तके वाचण्याच वेड होतं. तिथे तो मित्रांसोबत रहात असे. तेव्हा टेलिफोन करायचा असेल तर ट्रंक कॉल बुक करावा लागे. दर आठ दिवसांनी तो आपल्या आईवडिलांशी बोलून खुशाली घेई. कधीतरी,इराण इराक यांच्या किंवा कुवेत आणि इराण यांच्या युद्धाच्या बातम्या वर्तमानपत्रात किंवा दूरदर्शनवर पहिल्या की घरून भारतात परतण्याविषयी सांगितले जाई. तो आपण इथे सुरक्षित असून Everything is normal and good असं सांगून त्यांना आश्वस्त करत असे.

तिथे वेळ घालवायला तो कधीकधी घराबाहेर पडला की एकटाच फिरत बसे. एखाद्या ठिकाणी गेला तर तेथील आवडते दृष्य कॅमेरात उतरवल्या शिवाय आणि नवं कोरं पुस्तक खरेदी केल्याशिवाय परतत नसे. यातूनच हळूहळू लिहायचा छंद लागला. सुरवात अर्थात वाचलेल्या पुस्तकाचे रसग्रहण. प्रामुख्याने इंग्रजी ऑथर. Dयाn Brown, Jane Austen, Dickens, Agatha Christie, J.K.Rowling, Ruskin Bond, John Keats यांची पुस्तके त्यांनी वाचून काढली होती. त्याची मांडणी आणि गुंतागुंत त्याला खूप आवडायची. मग रहस्य कथा असो की प्रेम कथा. ती वाचताना जो थरार, जो सस्पेन्स वाटायचा त्यात बुडून जायला व्हायचं. त्याच काळात आपण जगतोय नव्हे त्यातलच एक पात्र आपण आहोत की काय असं वाटायचे. काहीतरी वेगळं वाचतोय अस वाटतच नसे.आपलं आयुष्य यात मांडलंय अस त्याला वाटायचं. बारा तासाची ड्युटी संपली की उरलेले बारा तास त्याच्या हाती असतं. बहुदा जेवण बाहेर व्हायचं. आठवड्यात एक दिवस कपडे कमीतकमी पाण्यात स्वच्छ धुवून काढायचे. तिथे तीच एक अडचण होती. मनसोक्त अंघोळ दुर्मिळ, प्यायला दारू मिळेल पण पाणी विकत घेऊन प्यावं लागते, या विषयी सुरवातीस राग यायचा. हळूहळू ते अंगवळणी पडलं. तस म्हंटल तर पाहिल्याची सगळ्यांना नवलाई असते मग सरावाने सगळंच जमतं. जमवावच लागतं. तिथे थोडाफार विरंगुळा मिळायचा तो फॉरेन व्हीझिटर आले तर, त्यामुळे तस जीवन शुष्क, उदास वाटायचं. तेथील स्थानिक पोरी अतिशय चिकण्या पण त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग्य तसा दुर्मिळ. नखशिखांत बुरख्यात पण कधीतरी आपल्या शोहरला हाक मारतांना थोडा बुरखा इकडे तिकडे झाला तर मुखचंद्र दिसायचा, तिला पाहून काळजात कळ यायची,हे ईश्वरा काय रूप दिलय, पण! तेव्हा स्त्री बाबत चुकूनही काही गुन्हा घडला तर अतिशय कडक शिक्षा व्हायची पण तरीही कधीतरी ओझरते दर्शन झाले तर कामाचा क्षिण निघून जायचा पण तिची आठवण येताच रात्र बैचनित स्वतःला सावरण्यात निघून जायची.

भारतात आला की कोणाला भेटू,कोणाला नको असे व्हायचे, एक महिन्याची रजा कापरा सारखी उडून जायची. असाच एक वर्षी सुट्टीसाठी भारतात आला आणि काही कल्पना नसतांना लग्न बंधनात अडकला. आई अण्णा नी मुली दाखवल्या पण तिने त्याला पाहिले आणि नकळत त्याच्याकडे ओढली गेली. कोणीत्याही मुलीने त्याला पसंत करावं असाच तो होता. गोरा गोमटा, अंगाने भरलेला,कर्ली हेअर, चांगला हॅण्डसम, हसतमुख निळसर घारे डोळे आणि वेगळीच चमक.

त्याच वार्षिक उत्पन्न चांगले असल्याचे त्याच्या राहणीमानावरून तिला दिसत होते. घरच्या मंडळीनी उपचार म्हणून चौकशी करून लग्न करून दिले होते. लग्नापूर्वी एक दोन वेळा भेट झाली तेव्हा आवडी निवडी या बद्दल दोघ बोलले होते. तो उत्तम लिहितो ऐकून ती खुलली होती.

“माझ्यावर पण लिहीशील का?” तेव्हा तिने विचारल होतं. पण सामान्य जोडप्यांच्या जीवनात तस लिहिण्यासारख कुठे काही घडते? पण तिला बरे वाटावे म्हणून तो लिहीन, म्हणाला होता.लग्नानंतर कुलूमनालीला ते दोघ हनिमूनला गेले. तेथे मनमुराद आनंद लुटून ते परतले.ती त्याच्या आगळ्या वेगळ्या अदाकारी हरखून गेली. त्याने तिच्यावर जणू मोहिनीच घातली होती. त्याने एवढी पुस्तके वाचली होती की देवावर त्याचा विश्वास नव्हता त्यामुळे मुद्दाम देवदर्शनाला जाणे त्याच्या स्वभावात नव्हते. मात्र त्याला फोटोग्राफीचा छंद होता हे ही तिथेच तिला समजले. तिचे अनेक पोझ मधले फोटो त्याने काढले. त्याचे कौशल्य पाहून तिला हेवा वाटू लागला. त्याच्या कॅमेऱ्यात खूप सारे फोटो होते, मुलींचेही. त्यानेच तर तिला ते दाखवले. त्यातील बऱ्याच जणी परदेशी होत्या. ती काही बोलली नाही पण तिच्या मनात पाल चुकचुकली. कधीतरी संधी मिळाली तर विचारायचं तिने मनाशी ठरवले.

ते हनिमून वरून परतले आणि त्यांनी रेंटवर त्यांच्यासाठी घेतलेले घर सजवले. राजा राणीचा संसार सुरू झाला.
दोघानी मिळून घरातील वस्तू,सामान याची खरेदी केली. आठ दिवस रोज खरेदी करूनही मागाहून काही तरी राहिल्याचे लक्षात यायचेच. पैश्याची तेव्हातरी काहीच कमी नव्हती. रोज नवी स्वप्ने पहात भविष्याच्या योजना मांडत रात्र फुलत होती. तीची सुट्टी संपली तशी ती कामावर जाऊ लागली. तो तिच्यासाठी स्वयंपाक करत असे. त्याला चपातीसह देशीविदेशी चांगल़े पदार्थ येत होते. ती त्याच्यावर खुश होती.

त्या महिना दिड महिन्यात तिच्या मनाजोगती खरेदी झाली होती. आजुबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांची भेटी देऊन झाल्या होत्या. फोटोग्राफी झाली होती. त्याने तीने न मागता तिच्यासाठी अनेक ड्रेस खरेदी केले होते. केवळ तिच्यासाठी काही मंदिरांची वारीही झाली होती. सुख सुख म्हणतात ते तिने भरपूर उपभोगल होतं. त्याच्या सहवासात रातराणी सारखी ती रोजच फुलत होती.

हा हा म्हणता दोन महिने संपत आले त्याने आपल्या जाण्याची तयारी सुरु केली. तिकीट बुक केले. व्हिसा रिन्यू केला. मेडिकल टेस्ट करून घेतली. एक दिवस ती त्याला म्हणाली,”संदिप गेले दिड महिन्यात तू मला खूप आनंद दिला, खूप सुख दिलेस पण आता तू गेल्यानंतर मला एकटीला रहावे लागेल तुझा विरह मला असाह्य होईल, मी तुझ्याशिवाय एकटी इथे कशी राहू?”

“समीरा तू आता एकटी नाहीस, तुझ्या सोबतीला आपल्या आठवणी आहेत आणि अंश रूपाने मी ही आहेच, लवकरच तुला त्याची प्रचिती येईल.” ते ऐकून ती शहारून गेली.
लग्नानंतर ऐकमेकांच्या सहवासात आणि सहमिलनात ते दोघ ऐवढे बुडाले होते की खरे तर हनिमूनच्या वेळेस या गोष्टींची त्या दोघांनी पर्वा केलीच नव्हती. पण त्या नंतरही या बाबत ते गंभीर नव्हते. आज पुन्हा एकदा मिलनाच्या नशेत परमोच्च क्षणीच तिला ते आठवले आणि ती गडबडली. ” संदीप, म्हणजे पुढील वर्षभरात आपल्याला बाळ होईल?” “Yes my sweety, You will be the mother of our child.” तो तिला पुन्हा एकदा जवळ घेत म्हणाला. ती त्याला अंगावरून दूर लोटत म्हणाली, “तू फार दुष्ट आहेस, आम्हाला एकट सोडून तू जाणार आहेस? तुला त्या बद्दल तुला काहीच कसं वाटत नाही?आणि एवढ्या लवकर मला बाळ नको होतं. I am just 25. It’s too early to have baby, एकदा त्यात गुरफटले की लाईफ राहणार नाही.” “No Darling, I am aware of that, but I read somewhere, it’s always better to have a child at the right age. Because it will be fit and fine. I know I will miss you but, I must join duty. You are not alone, We are together. I will call you every week.”

त्याच्या जाण्याचा दिवस उगवला,तो गेला, तिच त्याला एअरपोर्टवर सोडायला गेली होती. डोळे भरून आले होते. काहीच सूचत नव्हते. त्याने व्हिजिटर गॅलरीत तिची शेवटची भेट घेतली, तीच दीर्घ चुंबन घेत तो आत निघून गेला.

त्याच रात्री त्याचा पोचल्याचा ट्रंक कॉल आला. तो तिच्याशी नेमकं बोलला, स्वतःची काळजी घे, वाचन कर, करमत नसेल तेव्हा आई-अण्णा ना बोलाव वगेरे. सुरवातीला त्याचा दर रविवारी नियमित फोन यायचा. तो तेथील बूथ वरून कॉल करत असल्याने तिला कॉल करण्याची संधी नव्हती. त्या बद्दल तिची काही तक्रार नव्हती. ती त्याच्याशी बोलत राहायची आणि तो थोड्या थोड्या वेळाने darling फोन ठेवू, आपण नंतर बोलू अस म्हणत राहायचा याचं कारण ट्रंक कॉल महाग पडत असे. तिला मात्र त्याचा राग यायचा. “अरे तु सारख फोन ठेव का म्हणतोस,माझं ऐक की!” कधी कधी ती रडत रडत येथील अडचणींचा पाढा वाचायची. त्यालाही तिचं म्हणणं पटायचं पण इथे त्याला जेवढा पगार मिळत होता भारतातील कोणत्याही कंपनीत मिळालाच नसता.

दोन महिन्यांनी तीची मासिक पाळी चुकल्याचे तिच्या लक्षात आले. त्याचा कॉल कधी येतो आणि ती गुड न्युज त्याला कधी सांगते असे तिला झाले होते. रोज ती आपल्या शरीरात होणारे बदल पाहून हरखून जात होती पण याचे कौतुक करायला तो हजर नव्हता.

ती प्रेग्नेंट राहिली हे चक्क पंधरा दिवसांनी त्याचा ट्रंक कॉल आला तेव्हा त्याला कळले. तो आनंदाने ओरडला,”Hइy! Did I not say, you are not alone. Sweet heart I am, I have no word to express my gratitude.” ती भाऊक झाली होती,” संदीप अशा आनंदाच्या वेळी तू सोबत हवा होतास. मला तुझा तो मोठा पगार नको किंवा भविष्यातील स्वप्ने नाही रंगवता आली तरी चालतील पण तू परत ये. मी एकटी हे सगळ नाही पेलू शकत.” तिचा मुसमुसत रडण्याचा आवाज ऐकून तो स्तंभित झाला. “Darling I will Promise you, I will find the Job there and then come back but please till then don’t lose your Heart. If you cry, what message will you give to our Baby?”

तो बाहेर असल्याने तिला एकटीला डॉक्टरकडे जावं लागे. इतर बायकांचे नवरे त्यांच्या सोबत यायचे. मग तिच्या भावनांचा उद्रेक व्हायचा. कॉल केला की ती रागाने त्याला काहीबाही बोलायची. तो तिला समजवायचा प्रयत्न कारायचा.” डार्लिंग प्लिज माझं ऐक. थोडे दिवस तु आईकडे रहायला जा, डॉक्टरकडे तिला सोबत ने, Be happy. Don’t be afraid. Everything will be alright.” ती रागावून म्हणायची, “तुला सांगायला काय होतंय. भोगावं तर मला लागतंय. तु इथेच नोकरी पहा.” तो दर आठवड्यात तिची समजूत घालतांना मेटाकुटीला यायचा. पण त्यालाही तिची आठवण तितक्याच तीव्रतेने येत होती. लग्न झाल्यानंतर त्यांनी स्वतः च्या खर्चाना कात्री लावली. आता तो पूर्वी इतकी पुस्तके खरेदी करत नसे. हॉटेलमध्ये गेला तरी पूर्वी सारखा मनसोक्त खात नसे. मुलांच्या भविष्यासाठी काही वाचवणे गरजेचे होते.

काही महिन्यांनी थोडे जास्त पैसे वाचवता यावे म्हणून तो आठ दिवसांऐवजी दर पंधरा दिवसांनी तिला फोन करू लागला. पण तिचा मात्र त्याच्या विषयी गैरसमज वाढतच गेला. ती त्याला रागाने काहीही बोलायची,त्याच्यावर आरोपही करायची, “आता मी तुला आवडेनाशी झाले का? तिथे तुझी मैत्रिण आहे ना?” रागाने विचारायची. बिच्चारा, तिच्या संशयी स्वभावाने होरपळून जायचा. त्याने तिची कितीही समजुत घालण्याचा प्रयत्न केला तरी तिची समजुत पटत नसे.

या तिच्या कटकटीने तो हळूहळू तो सिगरेट प्यायला लागला,आधी कधीतरी रिलॅक्स होण्यासाठी आणि कालांतराने नियमित. दिवसाला एखादं पाकीट सहज फस्त करत असे. तिथे सहजासहजी दारू मिळत नसे आणि दारूच्या नशेत कोणी सापडला तर मोठी शिक्षा होत असे त्यामुळे तो दारूपासून चार हात दूरच होता.

कधीतरी मुंबई मधील कोणाची अचानक भेट होई आणि त्याला समिराची आठवण होई, तिच्या भेटीची अनावर ओढ लागे. त्यांच्या कंपनीचा विचित्र नियम होता. कामावर हजर होतांना व्हिजा आणि पासपोर्ट कंपनी जमा करून घेई. जेव्हा त्याला वर्षांची रजा मिळत असे तेव्हा त्याचा पासपोर्ट व व्हिजा परत मिळत असे साहजिकच तेथील कोणत्याही कर्मचाऱ्यांना तोच नियम पाळावा लागे.कधीतरी मन या
अन्यायाविरुद्ध पेटून उठे पण त्यांनी कंपनीच्या बॉण्ड वर ते मान्य केले होते.

दर पंधरा दिवसांनी समिराशी बोलतांना तो प्रचंड भाऊक होत होता. तिला ते जाणवत होत पण एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी सोडून तो भारतात परतू शकत नव्हता शिवाय काहीतरी इमर्जन्सी कारण सांगून सुट्टी घेतली तर स्वतःच्या तिकीटाने यावे लागले असते आणि ते परवडणारे नव्हते, तिच्या डिलिव्हरीच्या वेळेस त्याने हजर रहावे असा तिचा आग्रह होता. त्यालाही आपल्या बाळाची प्रतीक्षा होतीच पण ते त्याला रजा मिळण्यावर अवलंबून होते.

आता तिला आठवा महिना लागला होता, तिची हालचाल खूप मंदावली होती. त्याचे आई-नाना तिच्या घरी येऊन राहिले होते. त्याची आई तिला होईल ती सर्व मदत करत होती. तिने कामावरून प्रेग्नन्सी लिव्ह घेतली होती पण तो जवळ नसल्याने ती नाराज होती. गेल्या पंधरा दिवसात त्याने तिची काळजी वाटून दोन तीन वेळा फोन केला होता. बोलताना तो खोकला तशी तिने शंका व्यक्त केली. “संदीप तू का खोकतोयस? तुला बरं नाही की मग.. तू सिगारेट तर पित नाहीस ना? मला खरं सांग, संदीप मी काय विचारतेय?
“Yes you are right, Darling you begin to doubt my character, it hurts me a lot, I tried to explain to you the fact, I have girl friends but no emotional attachments with any of them. But in spite of listening to my explanation you abused me with rude words. This pressure caused to smoke.”

“संदीप,मला माफ कर हवं तर मला द्यायची ती शिक्षा दे पण स्मोकिंग सोडून दे, तुला बाळाची शप्पथ आहे. मी पून्हा कधीच तुला काही म्हणणार नाही पण चुकीच्या वाटेने नको जाऊ.” “It’s too late now, no sandeep without a cigar, I can’t stop myself.” त्याला पूढे काय बोलावे कळेना. त्याने फोन ठेवला. त्यानंतर तो एकांतात ओक्साबोक्शी रडला. कोणाशीच वाईट संबंध नसतांना तो तिच ऐकून घेत होता मात्र ती त्याच काही ऐकायला तयार नव्हती. आपण चुकीच तर बोललो नाही ना? आपल्या रागाने समिराने स्वतः च काही करून घेतल तर? जस जसा विचार करू लागला त्याची अस्वस्थता वाढली. अर्धा पाकीट सिगारेट पिऊन चैन मिळेना.

मन पोखरून निघालं तस तो समुद्रावर गेला. किनाऱ्यावर दूर वर मुल खेळत होती.कुणाचच त्याच्याकडे लक्ष नसावं. त्यानी स्वतःचे खिसे चाचपले. खिशात कंपनीच ओळखपत्र आणि अवघे पन्नास दिराह्म शिल्लक होते. मनाशी ठरवले बस आता जीवन संपवून टाकू. डोळे भरून आले होते. अख्खा जीवनपट ,घराजवळचे मित्र, एस एस सी पास झाल्यानंतर घरातील सल्ले, कॉलेजचे दिवस, तिथले मित्रमैत्रिणी मग अचानक जीवनाला मिळालेली कलाटणी ते अचानक ठरलेलं लग्न. कुलूमनालीचा हनीमून, समीरा बरोबर सहवासाचे दिवस आणि पुन्हा निघतांना झालेली घालमेल. त्यांनी त्या अफाट सागराकडे पाहिलं आणि तो खिन्नपणे हसला,या सागरात आपण टीचभर नाही.कशाला कोण आपल्याला शोभेल? माणसाचं मरण कुठे असेल त्याला नाही सांगता येणार?

तो उठला, समुद्रात हळूहळू चालत जात होता, कमरे ऐवढ्या पाण्यात शिरला आता बाहेरील गजबज कमी झाली. डोळयांना फक्त सभोवती घेरत जाणारे पाणी दिसत होते. इतक्यात एक मोठी लाट आली, प्रचंड मोठी, त्याने डोळे मिटून घेतले.पुढे काय घडलं त्याला काहीच कळलं नाही. तो शुद्धीत आला तेव्हा त्याला दिसले,तो सरकारी हॉस्पिटलमध्ये होता. त्याच्या बाजूला पोलीस गार्ड बसले होते. ते त्याच्याशी हसले. तो ही हसला.थोड्या वेळाने त्यांनी चौकशी सुरू केली, खरं सांगायचं तर समीरला अटक झाली असती, त्याने आपण समुद्रावर फिरत असतांना अचानक लाट उसळत आली बाकी काही आठवत नाही अशी कबुली दिली. त्याची कबुली त्यांनी लिहून घेतली.दोन दिवसांनी त्याला हॉस्पिटलमधून सोडले. त्यांचं संभाषण रेकॉर्ड करण्याची व्यवस्था तेव्हा असती तर त्याला नक्की सजा झाली असती, कदाचित कैद पण नियतीच्या मनात काही वेगळे होते. प्रकृती बिघडली आहे असा अहवाल हॉस्पिटल प्रशासनाने दिला म्हणून त्याला पंधरा दिवस सुट्टी मिळाली आणि तो भारतात अचानक हजर झाला. काय योगायोग असावा, त्याच दिवशी त्याला बाळ झालं होतं. तो नेमका त्याच दिवशी तिथे पोचला, यावर ती समाधानी होती.

गेल्या दोन आठवड्यात त्याने एकदाही तिची चौकशी केली नव्हती तरीही तिने त्याला माफ केले. उलट तो आला आणि तिची कळी फुलली. या दरम्यान काय घडले याची वाच्यता न करण्यात शहाणपण होते ते दोघांनाही उमगले. संदीप आज मुलाच्या जन्म दिवशी हजर राहू शकला कारण सागराने ज्याची अमानात त्याच्या सुपूर्द केली. तो दुबईला निघण्यापूर्वी मुलाचे बारसे थाटामाटात पार पडले. संदीपनेच त्याचे नाव सागर ठेवले. त्याने बाळाचे अनेक फोटो काढले. आता त्याच आठवणींवर त्याचे तेथील एकाकी जीवन सुसह्य होणार होते.

सागराने स्वतः त्याचे प्राण वाचवले होते म्हणूनच तो समिराला आणि आपल्या मुलाला भेटू शकला. त्याने त्याच्या जीवनात घडलेली कथा आपल्या पत्नीला कधीच सांगितली नाही,ना भविष्यात तो ती तिला सांगण्याची शक्यता होती. तो जेव्हा दुबईत परतला त्याने किनाऱ्यावर जाऊन सागराची क्षमायाचना केली. आपल्या नेभळट विचारांची त्याला कीव आली. पण दोन जिवात अविश्वास असेल तर संसार कसा उध्वस्त होऊ शकतो त्याची झलक त्याने अनुभवली म्हणूनच शब्दबद्ध करत दिवाळी अंकात बदलेल्या नावासह कथा दिली.

जेव्हा ती कथा दिवाळी अंकात छापून आली तेव्हा तो अंक योगायोगाने समिराच्या वाचनात आला. वाचताच क्षणी ती कथा तिचीच आहे याची तिला खात्री पटली पण तो तर आपल्या कर्मभूमीत निघून गेला होता. स्वतः त्या गोष्टी बाबत खुलासा विचारणे म्हणजे गुन्ह्याची कबुली देणे. आता त्याची क्षमा मागण्यासाठी तो समोरही नव्हता. पश्चातापात ती होरपळून गेली. यापुढे ती संदीवर कधीही शंका घेणार नव्हती. तिच्या संशयी स्वभावानेच संसार कायमचा तुटण्याची वेळ आली होती पण पुर्वजांच्या पुण्याईने तिचे कुंकू वाचवले होते. त्यानंतर ना त्याने कधी तिच्याकडे या संबंधी वाच्यता केली पण समिराच्या मनातील अपराधी भावना कोणत्याच उपायाने कमी होणे शक्य नव्हते. सागरच्या जन्माने एक जुना अध्याय त्याच्याच पोटात गाडला गेला.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar