शोषण
दुसऱ्या व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक छळ म्हणजे शोषण. छळ करणारी व्यक्ती पती किंवा पत्नी, सावत्र आई किंवा वडील, कुटुंबातील नातेवाईक,मित्र, धर्मगुरू, शिक्षक, पदाधिकारी कोणीही असू शकतो. एखादी गोष्ट न देणे, उशीराने देणे, हक्क नाकारणे, हक्काच्या बदल्यात अन्य अपेक्षा ठेवणे, मनाचा कोंडमारा करण्यास भाग पाडणे या पैकी कोणतीही गोष्ट छळ किंवा शोषण व्याख्येत बसू शकेल.
छळ करणे हा गुन्हा आहेच पण छळ सहन करणे यातही कोणतेच शहाणपण नाही. आपल्यावर अन्याय होत असेल तर कायदेशीर मार्गाने आपण प्रतिकार केला पाहिजे. दाद मागितली पाहिजे. अन्यथा छळ करणाऱ्या व्यक्ती वा समाजाला ती सवय होऊन जाते आणि कुठे जाईल? किंवा करून करून काय करेल असा अहंकार डोकावू लागतो. त्यामुळे शोषणा विरूद्ध लढा देण्यासाठी गरज भासेल तेव्हा एकजुटीने संघर्ष केलाच पाहिजे.
काळ कोणताही असो, रामायणात घडले तेच महाभारतात घडले आणि आज कलियुगात जे घडत आहे त्याला नावही देताही ही येत नाही. स्त्री कोणत्याही धर्मात, समाजात वा जातीत जन्मली तरी तिच्या सोबत होणारा अन्याय तसाच असतो.ती सुशिक्षित आहे की अशिक्षित आहे गरीब घरातील की खानदानी उच्चभ्रू घरातील याने काहीच तर फरक पडत नाही.
इंद्राने गौतम ऋषींच्या वेषात येऊन अहिल्येशी संग केला.
पती वेशातील इंद्राला ती ओळखू शकली नाही, अपराध इंद्राने केला मात्र अहिल्येला घरदार सोडून वनवासी व्हावे लागले. अहिल्या शिळा झाली याचा अर्थ समाजापासून दूर झाली, अज्ञातवासात गेली असा अभिप्रेत आहे. सीता रावणाच्या बंदिवासात होती आणि परतल्यावर केवळ नागरिक तिच्या चारित्र्यावर संशय घेतात म्हणून रामाने तिचा अव्हेर केला आणि सत्यप्रीय रामाने तिला वनात पाठवून दिली. स्वतः नारायणाला समाजासाठी आपल्या धर्मपत्नीचा त्याग करतांना काहीच का वाटले नाही? तो सत्यप्रीय, सत्वशील होता तर त्याने आपल्या पत्नीची बाजू घेऊन समाजापुढे धडा घालून देणे अपेक्षित होते पण..
द्युत पांडव हरले मात्र त्याची शिक्षा द्रोपदीला भोगावी लागली. भर सभेत कौरवांनी तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला आणि पराजित पांडव आपल्या पत्नीच्या मदतीसाठी जाऊ शकले नाहीत. काय चूक होती पांचालीची? हीच ना की ती द्युतात हरून शरण गेलेल्या पाच पांडवाची पत्नी होती? युधिष्ठिर ज्याला धर्मराज म्हणूनही संबोधल गेलं, आहा रे धर्मराजा ! सत्यप्रिय धर्मराजा तुला पांचालीला द्युतात लावण्याचा अधिकार कसा प्राप्त झाला? ती का तुझ्या कोषातली धनपेटी होती?
दुर्दैव! हरलेल्या माणसात पौरूषत्व उरत नाही हेच खरं. सत्यप्रीय म्हणून तुला अश्वत्थामा युद्धात मेला का? द्रोणाचार्य यांनी विचारले तेव्हा तू काय उत्तर दिलस? आठवं की, “नरो वा कुंजरो वा!” असं शत्रूला भ्रमीत केल्यानंतर तू स्वतःला सत्यप्रीय का म्हणवतोस? अश्वत्थामा युध्दात मेला ऐकले म्हणून दुर्योधन खचला आणि भानुमती विधवा झाली. असे खोटे बोलून तू काय साध्य केलेस?
रामदास स्वामी यांच्या बाबतीत आदर राखूनही थोडे तसेच घडले म्हणावे लागेल. नारायण यांनी आपल्या आईला मी बोहल्यावर चढेन वचन दिले होते मात्र तेही अक्षता पडण्यापूर्वी निघून गेले. परंतू त्यापूर्वी कन्यादान झाले होते, तिची जबाबदार घ्यायला तिचा पिता तयार होता पण ती ठामपणे म्हणाली,”बाबा तुम्ही माझे कन्यादान केले आता मी तुमची राहिले नाही.” खरे तर नारायण यांचे मोठे बंधू गंगाधर तिला घरची सून म्हणून घरी न्यायला तयार होते पण त्यांना ती म्हणाली, “भाऊजी, अक्षता पडल्या नाहीत आणि त्यांच्या बरोबर सप्तपदी झाले नाही. मी सासरी येऊ शकत नाही.” किती अचाट निर्धार, त्या अवघ्या नव वर्षे वयाच्या कन्येचा अपराध कोणता? तिला शिक्षा का भोगावी लागली.
हेच असंख्य देशभक्तांबद्दल सांगता येईल. त्याकाळी लहान वयात लग्न होत असत मग बटुकेश्वर दत्त ,सुखदेव चाफेकर बंधू आणि महाराष्ट्र भुषण क्रांतीवीर सावरकर यांचीही लग्न ठरली होती किंवा झाली होती, ते क्रांतिविर म्हणून देशासाठी आहुती देऊन अजरामर झाले पण त्यांच्या पत्नीला मात्र पतीच्या मागे किती यातना भोगावी लागली असेल? त्याची गणती कोण करणार? तिचा अपराध कोणता? तिने तर पतीची निवड स्वतः केली नव्हती तर घरातील जेष्ट लोकांनी ते लग्न तिच्या अजाणता ठरवले होते. स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारक यांच्या बाबतीतील आदर किंचित कमी न होऊ देता माझा प्रश्न आहे की त्यांच्या वाग्दत वधूवर किंवा पत्नीवर जो अन्याय झाला त्यासाठी त्यांच्या घरातील व्यक्ती जबाबदार आहेत की नाही? नवरा घरात नसता एकटीने समाजापासून स्वतः ला वाचवणे आणि दैनंदिन पिडा झेलत दिवस कंठणे हे ही शोषणच नाही का?
गांधीजीच शिष्यत्व ज्यांनी स्वतः स्विकारल त्यांना गांधीजी ब्रह्मचर्य पाळायला लावत, गांधीजींनी स्वतः ब्रह्मचर्य पाळून ‘बा’ वर अन्याय केलाच. पण अनेक शिष्यांना त्यांनी तरूण वयातच ब्रह्मचर्य पाळायला लावलं नेहरू यातून शिताफीने सुटले. काही शिष्यांची लग्न झाली होती पण गांधीजीचे अनुयायी झाले आणि ब्रह्मचर्य स्विकारल आणि आपल्या प्रणयाच्या सहजसुलभ भावना मारून टाकल्या,ज्या मुलीने त्या अनुयायाला आपला जोडीदार म्हणून निवडल होत तिचा कोणता गुन्हा? तिने शारीरिक सुख आणि मातृत्व या पासून वंचित का राहावं? गांधीजींना महान म्हणताना त्यांचे हे पाप क्षम्य आहे का?
बाजीराव पेशवे यांनी मस्तानीला विवाह करून आपल्या सोबत पुण्यात आणली पण तिला सरदारांच्या समोर नाचगाणे करावे लागले. तिची कोणती चूक होती ज्यासाठी तिचा जाहीर अपमान केला गेला? तिला कोठेवाली किंवा नाचगाणे करणारी संबोधले गेले. खरे तर पेशवे स्वतः अपराधी होते ते विवाहित असुनही त्यांनी मस्तानी आवडली म्हणून छत्रसाल राजाकडून तिला मागून घेतली. मेवाड आणि अनेक रजपुतान्यात महिलांना त्यांचा कोणताही अपराध नसतांना शिल रक्षणासाठी जोहार करावा लागला.मोघलांनी कित्येक वर्षे, युध्द जिंकल्यावर ते शहर लूटले आणि महिलांची अब्रू लुटली. ज्या स्त्री शी त्यांचे कोणतेही शत्रूत्व नव्हते त्या महिलेची अब्रु लुटताना त्यांची हिंमत झाली कशी? कुराणात या बाबत काय आदेश आहे? यांच्या माता भगिनींची अब्रू अशी लुटली असती तर ते खपवून घेणार होते का?
या सर्वांचे कारण आजवर जगात सर्वत्र स्त्री कडे भोगदासी किंवा भोगवस्तू म्हणूनच पाहिले गेले.आपला आणि दरबारातील इतर देवादिकांचा जीव रमवावा म्हणून,देवांचा राजा इंद्र याच्या दरबारात अप्सरा, रंभा, उर्वशी, इंद्र नृत्य करत हे आपण अनेकदा वाचले असेल.
कोणाचा जीव रमवावा म्हणून तिने का नृत्य करावे? पण समाजाने ती भोगवस्तू आहे असे गृहीत धरल्याने तिच्याकडे पाहण्याची सामान्य माणसाची नव्हे तर इतर देवादिकांची नजर तशीच आहे असेच म्हणावे लागेल. तिने ती एखाद्या राजाला, किंवा सरदारांना आवडली म्हणून तिने दुसरी पत्नी किंवा सवत म्हणून, स्वतः दुसरी पत्नी होण्याचे का मान्य करावे पण तिला आम्ही सतत दुय्यम वागणूक देऊन तशी सवय केली आहे. इतिहासात आपण अनेकदा वाचले असेल की प्रत्येक राजाचा जनानखाना असे. त्याच्या राज्यात सुंदर स्त्री त्याला दिसली की तिची रवानगी राजाच्या अंतपुरात होई आणि तिचे आई बाप त्याला आपले सौभाग्य मानत. आहा रे न्याय!
जगातील कोणताही इतिहास चाळला तरी स्त्रीला दिलेल्या वागणूकीत फरक पडलेला नाही. स्वलज्जा रक्षणासाठी तिने महाकाली, आदिमाया, जगदंबा, कात्यायनी अशी रूपे घेतली असावी असे वाटते. हे सामर्थ्य तिने स्वतः मिळवले आहे. जेव्हा तिच्यावर संकटाचा सामना करण्याची पाळी येते तेव्हा तिचा नव्याने जन्म होतो, ती कात टाकते आणि सळसळती नागीण बनते, महिषासुरमर्दिनी बनते.
आपल्या देशातील भोगविलासी राजांनी जनानखाना निर्माण करून आपल्या भोगाची तरतूद केली होती हे दुदैव आहे, ‘नरेची केली नारी हिन’ ज्या मातेच्या पोटी आपण जन्म घेतला त्या मातृत्वाचा तो अपमान आहे पण शरीरातील राक्षस जागा झाला की सद्विवेक बुद्धी भ्रष्ट होते मग समोरची स्त्री ही आपली भगिनी किंवा कन्येच्या वयाची म्हणजे कन्याच आहे हा विवेक संपतो.
प्रत्येक घरात स्त्री ला दुय्यम वागणूक दिली जाते. तिने जास्त शिक्षण घेण्याची गरज काय? तिच्या शिक्षणावर खर्च करण्यापेक्षा ते पैसे तिच्या विवाहाला उपयोगी पडतील असे घरातील जेष्ठ सुशिक्षित व्यक्ती सांगते त्यातून त्याची त्या मुलीबद्दल अनास्था कळते. घरात मुली वयाने लहान असली तरी तिला घरातील केर-वारा, कपडे धुणे,भांडी, लादी स्वच्छता स्वयंपाक,घरातील आवराआवर यासह सर्व कामे नियमित सोपवली जातात. त्या उलट घरातील पुरुष काही काम नसले तरी आरामात जगत असतो. त्याच्यावर कोणतीही जबाबदारी टाकली जात नाही त्यामुळे कुटुंबात आपले स्थान गौण आहे असा इंफिरीटी कॉम्प्लेक्स मुलींमध्ये निर्माण होतो. घरातील आर्थिक किंवा अन्य व्यवहार करायचा असल्यास तिला या व्यवहारात घेतले जात नाही. हे समानतेच्या न्यायला धरून अयोग्य आहे.
जर आई वडील यांनीच तिला सन्मानाने वाढवले,घरात मुलांमध्ये भेदभाव न करता दोघांना कामाची समान विभागणी करून दिली. जबाबदारीची आणि आर्थिक निकषाची कामे विभागून दिली तर दोन्ही मुले ती जबाबदारी तेवढ्यात जबाबदारीने आणि तेवढ्याच कौशल्याने पार पाडतील. कदाचित आरंभी कदाचित काही चुका घडतीलही पण त्या चुका सुधारण्याची संधी मिळाली तर तिच चूक कदाचित पुन्हा घडणार नाही.
सन्मानाने जगण्याचा अधिकार मुला इतकाच मुलीलाही आहे. त्यामुळे तिच्यावर विश्वास टाकलात तर कोणतीही जोखमीचे कामही ती आपल्या पध्ततीने पार पाडू शकते, मुख्य म्हणजे या गोष्टींमुळे तिचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. मुलाच्या गैरहजेरीत ती तुम्हाला विश्वासाने मदत करेल.
पुण्यातील पेशव्यांचे आप्त तांबे यांची कन्या झाशीची राणी होऊ शकते. राज्य रक्षणासाठी इंग्रजी सत्तेशी झुंज देऊ शकते. तुकोबा, मल्हारराव यांचा पुत्र याची पत्नी आपल्या पतीच्या पश्चात होळकरांची गादी चालवू शकते प्रसंगी पेशव्यांच्या सैन्याशी दोन हात करायला मागेपुढे पहात नाही. याचा अर्थ स्त्री जवळ शौर्य आणि धैर्य याची कमी नाही पण आम्हीच तिला शोभेची बाहुली बनवून ठेवतो. तिच्यातील ज्योत विझवून टाकतो. सामर्थ्य ही काही फक्त पुरूषांची मिरासदारी नाही हे जोधानेही सिध्द केले होते तरीही आमची संकुचित वृत्ती जात नाही.
ज्योतीबा फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षण घेऊ दिले म्हणून तर जगातील पहिली महिला शिक्षीका होण्याचा मान सावित्रीबाईंना मिळाला. आनंदीबाई जोशी यांच्या पतीने आपल्या पत्नीला धाडसाने विलायतेस डॉक्टर होण्यासाठी पाठवले नसते तर पहिली महिला डॉक्टर म्हणून नोंद झाली नसती. इतिहास घडवावा लागतो.
घरातील महिलेचा शोषण आपण थांबवले तर बाहेरच्या जगातही आपल्या हातून इतर मुलीचं शारीरिक किंवा मानसिक शोषण होणार नाही.उदारमतवादी विचार बाळगले तर कोणतीही महिला तुमचा अनादर करणार नाही. कोणत्याही कार्यालयात, महिलांच्या दिसण्यावरून पुरुष वर्ग त्यांना टोपण नावे ठेवतो, तिच्या चालण्या,बोलण्याची किंवा वागण्याची नक्कल करतो.ती एकटी दिसल्यास तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करतो. तिचे एखादे काम मुद्दाम रखडवून तिला उशिरा पर्यंत थांबवून तिचा मानसिक छळ करण्याचा प्रयत्न करतो. असे घडत असल्याचे लक्षात येताच त्याच्या या वर्तनाचा अन्य सहकाऱ्यांनी तातडीने जाब विचारला पाहिजे.असे करणाऱ्या व्यक्तीचे नाव काच फलकात जाहीरपणे लिहिले गेले तर त्याच्या कृतीला वेळीच आळा बसेल. मला काय त्याचे? न म्हणता अशा अशा अपप्रवृत्ती विरोधात कणखरपणे भूमिका घेतली पाहिजे.
पहिल्या पोलीस महानिरीक्षक किरण बेदी या पुद्दुचेरी येथे राज्यपाल म्हणून कार्यरत असतांना तेथील सामाजिक अनास्था, दुर्गंधी, लाचखोरी अशा गैरव्यवस्थे विरोधात लढत होत्या. राज्यपाल पदावर नियुक्ती असुनही मुख्य सचिव त्यांचे आदेश पाळत नव्हते. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीमंडळ त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमास हजेरी लावत नव्हते. एकंदरीत तेथे निवडणूक लढवून निवडून आलेले सदस्य यांना कोणताही घरबंध नव्हता. अतिशय शिस्तीच्या गणलेल्या किरण बेदी यांना तेथील प्रशासनावर वचक ठेवताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला पण तरीही त्यांनी आपले प्रयत्न सोडून दिले नाहीत आणि सचिवांची बदली करून मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाला शिस्त लावली. इच्छाशक्ती असेल तर महिला अंतरिक्षात भरारी घेऊ शकतात. अंतरिक्षात यान पाठवण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करू शकतात. वेगवान रेल्वेचे सारथ्य करू शकतात. त्यामुळे प्रत्येक बाबतीत महिला काटे की टक्कर देण्यास सक्षम होत असताना तिचे पंख छाटणे योग्य नाही.
अर्थात सैन्यात कायमचे कमिशन मिळावे म्हणूनही महिलांना झुंजावे लागले, आता महिला प्रत्यक्ष रणभूमीवर लढू शकतात, तुकडीच नेतृत्व करू शकतात. त्यापूर्वी केवळ आस्थापना विभागातच त्यांची वर्णी लागत होती. मे २०२१ मध्ये ८३ महिलांची भरती सशस्त्र दलाल करण्यात आली.प्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांनी कारगिल युध्दात सहभाग घेतला होता. शौर्य पदक त्यांना बहाल करण्यात आलं आहे. दिव्या अजित कुमार यांना स्वार्ड ऑफ ऑनर दिले गेले आहे. यापूर्वी सैन्यात उच्चपदी नेमणूक सहज शक्य नव्हती. तेथेही काही वर्षांपूर्वी महिला अधिकाऱ्यांना सरकार तर्फे दुय्यम वागणूक दिली जात होती. सतत संघर्ष करूनच महिला सेनानींना न्याय मिळाला आणि त्यांच्या पदोन्नतीचा तसेच थेट सैन्यात लढण्याचा मार्ग मोकळा झाला. करिता सायास असाध्य ते साध्य त्यांनी साधले.
भारतात जय ललिथा, शीला दीक्षित, मायावती, ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री पद भूषावता आले. पण त्यांनाही हे पद सहजा सहजी मिळालेले नाही. कारण राजकारणातही महिलांना उच्च पदी जाण्यासाठी झुंज द्यावी लागते.यापूर्वी आपल्या देशातच नव्हे तर सर्वत्र एक मानसिकता तयार झाली होती की स्त्री इतर लोकांवर नियंत्रण ठेऊन काम करू शकणार का? तिला सख्त बनून निर्णय घेण्याची क्षमता आहे का? पण इंदिरा गांधी यांनी देशाचे नेतृत्व करून पायंडा पाडला आणि महिलांचे राजकीय मार्ग खुले झाले.
एखाद्या कार्यालयात जर सहकारी किंवा विभाग प्रमुख छळवणूक करत असेल तर तिनेही आपला बॉस किंवा सहकारी याची तक्रार प्रथम कार्यालय प्रमुखांना किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा महिला आयोगाकडे केली पाहिजे म्हणजे पुन्हा कोणी चुकीचे वागणार नाही. तुमचे काम योग्य असल्यास तुमची वेतनवाढ किंवा तुमची बढती कोणीही खोट्या कारणास्तव थांबवू शकत नाही. तसे झाल्यास तुम्ही लेखी विनंती अर्ज करून दाद मागू शकता. महत्वाचे म्हणजे कोणत्याही महिलेने सतत महिला असल्याचे कारण देत सवलती घेऊ नये, तसे वागल्यास अधिकार पदावरील व्यक्ती तुम्हाला सहानुभूती दाखवत फायदा उचलू शकतो.
अनाहूतपणे आपल्या सर्व पुरुष वर्गाकडून आपली आई, बहीण,पत्नी यांचं शोषण होत असत,आपण त्याची नोंद घेत नाही, उदाहरण द्यायचं झालं तर स्वयंपाक करतांना एखाद्या पदार्थात अंमळ मीठ जास्त होताच समोरचे अन्न वाढलेले ताट पुढे लोटून आपण निघून जातो. खरे तर त्यात मध्यम मार्ग निवडता येतो पण आपण रागात असतो त्यामुळेच सारासार विचार न करता भरल्या ताटावरून उठून जातो, वास्तवता तेवढा पदार्थ सोडून आपण उर्वरित अन्न जेवू शकतो. त्या पदार्थांऐवजी अन्य पर्याय मागू शकतो पण तु चुकलीसच कशी? असा अगोचारी विचार मनात डोकावतो आणि ताबा सुटतो. बिचाऱ्या महिलेला कानकोंड वाटत. नवरा ताटावरून उठून गेला ती एकटी कशी जेवेल? साहजिकच ती ही उपाशी राहते.तेव्हा कोणताही निर्णय घेतांना त्याचे बरेवाईट परिणाम लक्षात घेऊनच निर्णय घेतला गेला पाहिजे. तुम्हाला वर्षाचे ३६५ दिवस सेवा देतांना एखादा दिवस चूक घडली तर त्याची सतत उजळणी नकोच नको. आपण सारेच हे तारतम्य पाळू या.
घरातील विविध वस्तू आपण योग्य जागी ठेवत नाही आणि गरजेच्या वेळी वस्तू मिळाली नाही तर तिलाच दोष लावतो. आपण कामावर किंवा ऑफिसला जात आहोत म्हणजे कुटुंबावर फार मोठा उपकार करत आहोत असे भासवत कामावर निघतांना आपल्या अनेक वस्तू तिने शोधून जागीच ठेवाव्या अशी अपेक्षा बाळगतो ते ही गैर वाजवी आहे. एखादी गोष्ट आपल्या हातून हरवली तरी तिच्यावर त्रागा करतो. तिची चूक नसतांना तिच्यावर आरडाओरडा करणे हे अप्रत्यक्ष शोषणच आहे.
बऱ्याचदा कुटुंबात एकत्र पंगतीत बसण्याऐवजी आधी पुरुष व मुले आणि नंतर मुली, महिला असा क्रम असतो,त्या मुलींनी किंवा महिलांनी गरमागरम न जेवता उरलेसुरले का जेवावे? खरे तर कुटुंब प्रामुख्याने स्वतः ही बाब लक्षात घेऊन महिलांना स्वतः बरोबर पंगतीला घेतल्यास त्यांच्यावर अन्याय होणार नाही. गोष्टी लहान पण त्याचा परिणाम मोठा अशा अनेक बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.
ज्या गृहिणी कुठेही कामावर नाहीत, त्यांनाही कधीतरी चमचमीत खावे, मोकळे फिरावे असे वाटणे स्वाभाविक आहे, पण पुरुष स्वतः तो विषय हाती घेऊन तिला हौसेने चल म्हणत नाही. स्वतः मात्र आपल्या मित्रांसोबत या गोष्टींचा उपभोग घेतात. ती बिचारी हा अतिरिक्त खर्च नको म्हणून विषय काढत नाही. हीच गोष्ट खरेदीच्या बाबतीत किंवा चित्रपट किंवा एखादे नाटक पाहण्याच्या बाबतीत, आपल्याला सहजा सहजी या गोष्टी तिची गरज आहे असे वाटत नाही. खरे तर ही शोकांतिका आहे. तिलाही या गोष्टींचा आस्वाद घ्यावासा वाटतो. दुर्दैवाने आम्ही स्वतःच्या प्रश्नांत मग्न असतो किंवा या गोष्टींना फारसे स्थान देत नाही.
जर कामावर जाणाऱ्या किंवा एका गृहनिर्माण संस्थेतील रहिवासी मित्रांना कुठे पिकनिक करायची असली तर ते कोणाची संमती घेण्यासाठी थांबत नाहीत पण, त्याच घरातील महिलेला पिकनिकला किंवा देवाधर्माला किंवा कुटुंबातील एखाद्या समारंभाला जायचे असेल तर घरातील जेष्ट माणसांची परवानगी घ्यावी लागते. ती कुठे जाते? का जाते? परतणार कधी? सोबत कोणकोण आहेत?तिथे राहण्याची व्यवस्था कशी आहे? एक ना दहा प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात तेव्हा कुठे मिळाली तर अनुमती मिळते. व्यवहारातील हा भेदभाव खचितच योग्य नाही. हे कुणा एका व्यक्ती अथवा घराबद्दल नाही तर समाजात सर्व स्त्रीयांना अशीच वागणूक मिळते.
तेव्हा तिच्या मनाविरुद्ध वागणे किंवा एखादा निर्णय तिच्यावर थोपवणे हे ही शोषणच आहे. तिला इच्छा असो किंवा नसो त्याच्या मनात येईल तेव्हा तिला त्याची सोबत करावी लागते. तिची मानसिक तयारी नसतांना तिला कोणत्याही गोष्टींची बळजबरी करण हे तर सर्रास चालते. मानसिक कोंडमारा सहन करून ती आपल्या आई वडिलांना त्रास नको म्हणून मुकाट्याने सहन करते. तीने नवरा त्रास देतो म्हणून त्याच्या सोबत रहायला नकार दिला किंवा घटस्फोट घेण्याची तयारी दर्शवली तरी त्या बद्दल माहेरी नाराजी असते.
अर्थात आता मुली स्वावलंबी असल्याने केवळ माहेरचे नकार देतात म्हणून अन्याय सहन करण्यास तयार नसते. पण जेथून केवळ सहानुभूती नव्हे तर संरक्षणाची हमी हवी असते ते माहेरचे रक्ताचे नातलग, लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीने परत माहेरी येण्यास टोकाचा विरोध करतात. तिची बाजू नीट न ऐकता, स्वतः च्या कन्येवर तुझच काही चुकत असेल असा शेरा मारून मोकळे होतात. मग तिने न्याय मागायचा तरी कोणाकडे?
लग्न होण्यापूर्वी मुलींना जेवढी आई वडिलांची गरज असते खचितच जास्त लग्न झाल्यावर असते कारण बदलेले वातावरण अनोळखी चेहरे, त्यांच्या भिन्न आवडी निवडी, सामाजिक संबंधाची जाणीव, तेथील बंधने ,घरातील मोठ्या माणसांचा इगो, नवरा अथवा सासू यांचा संशयी स्वभाव या सर्व गोष्टींशी तिलाच तर जुळवून घ्यावे लागते. सर्व गोष्टींशी जुळवून घेतांना थोडे अधिक उणे झाले की लगेचच ती नावडती होते. मग वेगवेगळ्या पध्दतीने तिच्याशी असहकार किंवा मानसिक छळ सुरू होतो. म्हणूनच लग्न नक्की करण्यापूर्वी, नवरा मुलगा, त्यांच्या घरातील आचार विचार घरातील माणसांचे स्वभाव, तेथील रितीरिवाज या बद्दल शक्य ती माहिती मुलीने काढून घ्यावी. तेथील वातावरणाशी जुळवून घेण्याची मनाची तयारी असेल तरच पूढे पाऊल टाकावे. लग्न करून छळ सहन करण्यापेक्षा स्वतंत्र जगणे कधीही चांगले. पण या बाबत हेकेखोरपणा करण्यापेक्षा दोघांनी आणि अर्थातच सासरच्या माणसांनी तडजोड स्विकारावी.
आता संयुक्त कुटुंब जवळपास इतिहासजमा झाली तरीही आपल्या जोडीदाराच्या अपेक्षा माहिती असणे आणि त्याच्या आवडीनिवडी समजून घेऊन नंतरच पुढाकार घ्यावा.लग्नापूर्वी तिच्या कलाने वागणारा नवरा कालांतराने तिच्यावर अनेक बंधने लादतो. आज जेव्हा मुली आर्थिक दृष्टीने स्वतंत्र आहेत त्यांचे विचारही तितकेच प्रगल्भ असणार यात वाद नाही. परिणामी मुलांशी किंवा जुन्या मित्रांशी मैत्री याबाबत त्या मनमोकळ्या वागत असतील तर आक्षेप नोंदवता येणार नाही. पुरुषांनी आपल्या मैत्रिणी किंवा मित्र यांच्याशी स्वैर वागावे आणि महिलांवर वेगवेगळी बंधने लादली जावी हे कोणत्याही क्षेत्रातील महिला मान्य करणार नाही.
आज चित्रपट आणि नाट्य सृष्टीत काम करणाऱ्या अनेक अभिनेत्री घटस्फोटीत आहेत. घटस्फोट होण्यामागच कारण हास्यास्पद असते ते म्हणजे एकमेकांना वेळ न देणं किंवा एक्ट्रा अफेअर ते कदाचित दोन्ही बाजूने घडत असावे पण शोकांतिका म्हणजे त्यातील बहुसंख्य मुलांचा, अभिनेत्यांचा दुसरा विवाह झाला आहे मात्र अभिनेत्री तशाच विनाविवाह दिवस कंठत आहेत. सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, मानसी साळवी, रूपाली भोसले, तेजश्री प्रधान, अपूर्वा नेमाळकर, स्नेहा वाघ यासह अनेक अभिनेत्र्या आजही एकट्या आहेत. प्रथम विवाहाच्या आलेल्या अनुभवानंतर त्या भविष्यात दुसरे बंधन स्विकारतील की नाही सांगणे अवघड आहे.
उच्च पदावर काम करणाऱ्या डॉक्टर,वकील, आयपीएस किंवा आयएएस महिला किंवा खाजगी कंपनी मधील व्यवस्थापन पाहणाऱ्या महिला,किंवा महिला खेळाडू ह्या सुद्धा शोषणाच्या शिकार होत आहेत. त्यांच्यापेक्षा उच्च पदावर असणारी व्यक्ती त्यांच्या जवळून चुकीच्या मैत्रीची अपेक्षा बाळगत असेल तर त्यांनी ते का म्हणून खपवून घ्यावे? उच्च पदी काम करणाऱ्या महिलांच्या लग्नातही वरपक्षाकडून हुंडा वसूल केला जात असेल तर तो तिच्यावर अन्याय नाही का? ती सुशिक्षित, कमावती असुनही तिच्या सासरची माणसे तिचा हुंड्यासाठी छळ करीत असतील तर ते शोषण नाही का?
आठ आठ वर्षे, एकमेकांची मैत्री असतांना किंवा हायफाय भाषेत रिलेशनशिपमध्ये असतांना त्यांची लग्न का यशस्वी होत नाहीत? यामध्ये कोणाचा इगो आड येतो ते समजणे अवघड असले तरी एकदा लग्न झाल्यानंतर घटस्फोट घेतलेल्या पुरूषाला दुसरे स्थळ किंवा जोडीदारीण मिळते मात्र महिलेचा घटस्फोट झाल्यानंतर तिला दुसरे स्थळ किंवा जोडीदार सहजा सहजी मिळत नाही, याचे कारण आजही समाजात मुलीच्या दुसऱ्या विवाहाविषयी मानसिकता सुधारलेली नाही.
मुलींना बिजवर अर्थात सेकंडहॅन्ड नवरा चालतो पण मुलांना सेकंडहॅन्ड पत्नी चालत नाही. कोणीतरी सेकण्डहँड शब्दाला आक्षेप घेऊ शकतो मात्र वास्तव तर बदलत नाही. आधी मैत्रीसाठी अधीर होऊन तिला वाट्टेल ते आश्वासन द्यायचे त्यानंतर अभिनय क्षेत्रात असूनही तिने कुणाशी बोलू नये, बाहेरचे कार्यक्रम घेऊ नये, दुसऱ्या अभिनेत्याची स्तुती करू नये, उशिरापर्यंत शुटिंगसाठी थांबू नये, त्याला विचारल्याशिवाय नवे काँट्रॅक्ट साइन करू नये, अशी संकुचित वृत्ती दाखवायची हे सुद्धा तिचे मानसिक शोषणच आहे.
स्त्री च शोषण झाले तर त्याच्या बातम्या होतात,कँडल मार्च निघतो, पोलीस ठाण्यात उपोषण होत, वर्तमानपत्रात सनसनाटी बातम्या येतात. बुध्दीजीवी, सरकारच्या कारभारावर निशाणा साधतात. का साधणार नाही? सरकारच्या गृह खात्याला जाग आलीच पाहिजे.
पण जर कोणी घरात नवऱ्याच शोषण केलं तर! एखाद्या कामवाली सारख त्याला राबवून घेतलं तर?, त्याला तिचे पाय दाबून दे किंवा अन्य सेवाचाकरी करून घेतली तर? त्याच लैंगिक शोषण केलं तर,विश्वास बसत नाही ना!
पण अशा घटना देशात ठिकठिकाणी घडतात,फक्त त्या जाहिरपणे मांडण्याची हिम्मत पुरुषात आणि त्याच्या कुटुंबात नसते कारण, जग त्या माणसाला बेजार करून टाकेल, जर त्या महिलेवर गुन्हा शाबीत करायचा झाला तर कोर्टाचा दरवाजा खटखटावा लागेल आणि कुटुंबाची इज्जत चव्हाट्यावर मांडली जाईल ती वेगळीच. नातेवाईक अशा मिळमिळीत कुटुंबाशी संबध तोडतील ही भिती कुटुंबाला असते. बिचारा नवरा तोंड दाबून बुक्याचा मार किंवा आत्महत्या! ज्या गोष्टी बोलल्या जात नाहीत, उघड होत नाहीत त्या जास्त दाहक आणि मन विषिण्ण करणाऱ्या असतात.
उच्च पदावर काम करणाऱ्या पुरूषांचे शोषण त्याच्या पत्नीकडून होते हे ऐकून कोणाचाही विश्वास बसणार नाही पण त्याला सन्मानाने न वागवणे. त्याची मानसिक आणि शारीरिक गरज न भागवणे. त्याला उपाशी ठेवणे. इतर नातेवाईकांसमोर अपमानित करणे असा पुरूषांचा छळ होतो. फक्त आपणच हे जाहीर केल्यास समाज काय मान ठेवेल या भितीपोटी तो शांतपणे हा अन्याय सहन करतो. अगदी राजकारणात मात्तबर असणारी मंडळीही घरी ‘मनीम्याँव’ असतात. त्यांना पत्नीच्या हुकमात चालावे लागते.
असच शोषण कारखान्यातील बाल कामगारांचे होते. कमी वेतनात त्यांना बारा बारा तास राबवून घेतले जाते. ही मुलं बिहार, बंगाल येथून दलालामार्फत मुंबईत, भिवंडीत, मालेगाव येथे येतात आणि चामड्याच्या वस्तू तयार करणे, चांदी गाळणे, कापड गिरणीत किंवा विडी कामगार म्हणून किंवा इतर शरीराला हानिकारक काम विना सुरक्षा करतात. या मुलांच्या राहण्याची सोय अतिशय छोट्या कच्च्या आणि सुविधा नसलेल्या खोलीत केली जाते आणि ती पळून जाऊ नये म्हणून धाक दाखवला जातो, एका मुलाला गंभीर शिक्षा केली जाते आणि त्यांच्यावर नजर ठेवली जाते. एरियातील भाई, दादाशी मिलीभगत असल्याने ही बातमी अनेक वर्षे गुप्त ठेवली जाते किंवा तशी खबर मिळताच त्यांना रातोरात अज्ञात स्थळी हलवले जाते. त्यांच्यावर नजर ठेवणारे त्यांच्यावर लैंगीक अत्याचार करतात ते वेगळेच. तुम्ही याला काय म्हणाल? हे शोषण आहे की नाही?
अनेक छोट्या कारखान्यात काम करणारे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत असतात.तेथे योग्य सुरक्षा साधने नसतात, खुले वातावरण नसते.कामाच्या तासांचे बंधन पाळले जात नाही. पिण्याचे पाणी, टॉयलेट, डबा खाण्यासाठी स्वच्छ जागा अशा योग्य सुविधा पुरवल्या जात नाहीत.नियमित वेतन मिळत नाही. दुर्दैवाने संघटित नसल्याने कोणी दादा फिर्याद घेत नाही. कामगार शोषण हे सगळ्याच शहरात आढळणारी गोष्ट आहे.
आपणही प्रत्येक जण अनावधानाने आपल्या घरी काम करणाऱ्या कपडे धुणाऱ्या, भांडी घसणाऱ्या, केर आणि पोतेर करणाऱ्या बाईंना कधीकधी, विशेषतः सणावाराला किंवा पाहुणे आले की तिच्या क्षमतेचा विचार न करता वापरले जाणारे प्रत्येक भांडे सिंकमध्ये घासायला टाकतो, त्यातील काही भांडी स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येण्याजोगी असतात पण कामाला ठेवली आहे आणि पगार देतो ना? पिळून काढा.किती खालच्या पातळीचे विचार आहेत! यदाकदाचित तिच्या घरी कुणी आजारी पडले आणि ती सलग दोन तीन दिवस आली नाही तर आपलं भांड्यानी भरलेल बाथरूम तिची वाट पाहत असते, शिवाय ती न आलेल्या दिवसाचे पैसे न कापण्याचे औदार्य आपण दाखवत नाही. इतकी छळवादी वृत्ती आपल्यात येते कुठून?
कधी कधी कामवाल्या बाईंनी घाई गडबडीत लादी स्वच्छ पुसली नसेल तर तिच्या अपरोक्ष आपण तिथे मुद्दाम तिच्या नकळत पाणी सांडवून तिला पुसायला भाग पाडतो. सांगा आपण खरंच सुशिक्षित आहोत का? तिच्या गैरहजेरीत यातील काही छोटी कामे आपण करू शकलो असतो की नाही? पण दिलेले पैसे,पुरे वसूल, हा कुठला करंटेपणा?
बाबू म्हणजे सरकारी अधिकारी, गरजू सामान्य जनतेचे नेहमी शोषण करत असतात, ज्या गोष्टीसाठी जास्तीत जास्त दोन मिनिटे लागणार असतात त्या गोष्टींसाठी मुद्दाम तास, दोन तास ताटकळत ठेवतात किंवा काही सूचक बोलून लाच घेतात. समोर आलेली व्यक्ती गरजू आणि अगतिक असते.त्या बाबूकडून मिळणाऱ्या दाखल्यावर त्यांच्या काही जीवन मरणाच्या गोष्टी अवलंबून असतात. हे सुद्धा शोषणच आहे. अधिकार पदावर असणारी व्यक्ती तिच्या कार्यकाळात एकदा ना एकदा आपल्या हाताखाली काम करणारे सहकारी किंवा शिपाई यांचे शोषण करतातच असा माझा दावा आहे. मग एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या वेळेनंतर थांबवून ठेवणे, काही खोटे कारण शोधून मेमो देणे किंवा असेच एखादे दुसरे कारण. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. केवळ अधिकार मिळाला म्हणून हे वागणे योग्य आहे का?
मुंबई, पुणे, दिल्ली बँगलोर, हैदराबाद या मोठ्या शहरात जातपात पाळली जात नाही पण दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे आजही खालच्या जातीतील माणसांना काही मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जात नाही. काही मंदिरात विशिष्ट पेहराव असल्यानंतरच मंदिरात प्रवेश दिला जातो. हे सुद्धा शोषणच आहे. मंदिर परिसरात स्वच्छतेचा आग्रह बाळगला जात असेल तर कोणाचा आक्षेप नाही पण विशिष्ट जातीधर्माच्या नागरिकांना मंदिरात प्रवेश न देणे हे समानतेच्या तत्वात बसत नाही. तेव्हा दलित जातींचे हे शोषणच आहे.
आपले मायबाप सरकारही दुहेरी कर आकारणी करून आणि स्वतः साठी तसेच इतर आमदार, खासदार यांच्यासाठी भरपूर वेतन, भत्ते, अनेक सुविधा आणि पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या पश्चात पत्नीला किंवा लहान बालकांना कमाल वय वर्षे १८ ते २१ पर्यंत नागरिकांच्या पैशांतून पेन्शनचा लाभ देते. त्यांच्या वेतन आणि भत्ते वाढीचा निर्णय सर्वानुमते सहमत होतो. त्याबद्दल कोणाला काही आक्षेप नसतो.त्यांना मिळणारे वेतन,भत्ते हे करमुक्त असतात.देशाची की स्वतःची सेवा केल्याचा तो नजराणा असतो. वा रे घटनेतील तरतूद!
सरकार सामान्य माणसाच्या खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूवर, सेवेवर, ठेवलेल्या ठेवीवर, जमा केलेल्या मालमत्तेवर, सेवानिवृत्तकाळातील पेन्शनवर कर लावून आपली कोणती सेवा करते आहे ते समजून घ्या. आता तर त्यांच्या बापाची जहागिरी असल्याप्रमाणे केंद्र आणि राज्य तिजोरी खाली तर करतेच आहे पण राज्याला आणि देशाला आर्थिक दृष्टीने कमकुवत बनवत आहे. मित्रानो हे ही शोषण आहे.
अंबानी आणि अदानी किंवा काही करोडपती कोट्यवधी कर भरतात कारण त्यांची मिळकत काही हजार कोटी डॉलर आहे पण कमी उत्पन्न असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना जेव्हा काही हजार किंवा फार तर लाखभर उत्पन्न असते आणि प्रचंड कर भरावा लागतो त्याला त्याची साधी स्वप्ने विसरून जावी लागतात. औषधोपचार करून घेता येत नाही. आज शांत बसलात तर जे चालले आहे ते तुम्हाला मान्य आहे समजून तुमची मुंडी पिरगळण्यात येईल. सहन करण्याशिवाय काय कराल? हे ही शोषण आहे.पुरूषी प्रवृत्तीचा सामना महिलांना शतकानू शतके करावा लागला पण आजही त्याची पुनरावृत्ती शासनाकडून होत असेल तर?
मित्रांनो जागे व्हा, तुमची पत्नी, तुमच्या कार्यालयातील महिला ह्या तुमच्या गुलाम किंवा तुमच्या बटीक नाहीत. त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना स्वतः चा निर्णय घ्यायचा अधिकार आहे. तुमची मते लादणे हे अन्यायकारक आहे. यापूर्वी जे पुरुषी अहंकारातून घडले त्याचे तुम्ही अनुकरण करणे कोणाच्याच हिताचे नाही. तुमच्या लाडक्या बहिणीच्या किंवा कन्येच्या बाबतीत हाच प्रकार घडला तर ते क्षम्य आहे का?
म्हणूनच माणसा सारखे वागण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. स्त्री ला दिली जाणारी दुय्यम वागणूक ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे. एकीकडे जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांची नावे घ्यायची आणि दुसरीकडे आपल्याच घरातील महिलांवर अन्याय करायचा असला दुटप्पी व्यवहार योग्य नाही.
भगिनींनी हा लेख पुन्हा पुन्हा वाचा, समजून घ्या, संघटित व्हा अशा नियमांना विरोध करा. तुम्ही सहन करत गेलात तर तुमच्या शिक्षणाचा काय फायदा? अगदी सुशिक्षित आणि उच्च पदावर कार्यरत पुरूषांनी जर घरात तुमचा छळ होत असेल तर विचारपूर्वक मार्ग काढलाच पाहिजे. अन्याय तो आन्याय मग अन्याय करणारी व्यक्ती पुरूष असो की स्त्री तिला किंवा त्याला त्याची जागा दाखवलीच पाहिजे.
शोषण कोणत्याही प्रकारचे असो, ते विवाहित महिलेचे असो किंवा अविवाहित मुलाचे असो. हिन किंवा कमी दर्जाच्या जातीतील नागरिकांचे किंवा वेगळ्या धर्मातील मुला- मुलींचे असो. शोषण करणारा कुणीही उच्चपदस्थ असो, न्याय मिळवण्यासाठी एकत्रितपणे लढा दिला तरच शोषण थांबवता येईल .
आता डोळे काही क्षण मिटा आणि स्वतः च्या अंतरात्मास विचारा, आपल्या हातून कोणाचे शोषण तर झालेले नाही ना? प्रामाणिक असाल तर नक्की अशा किमान काही घटना आठवतील की आपल्याजवळूनही शोषण झाले आहे. आपण आपल्या मनासच कबुली देत असाल तर भविष्यात आपल्याकडून ते होणार नाही याची काळजी घेतली, तसा पण केला तरी लेख सार्थकी लागेल.