श्रद्धा वालकरच्या निमित्ताने भाग 2
आज कोणत्याही मोठ्या शहरात नवतरुण जोडप्यांचा सर्व्हे केला तर दिसेल की ही जोडपी मोठ मोठ्या हौसिंग कॉम्प्लेक्स मध्ये किंवा टॉवर मध्ये आणि मोठ्या फ्लॅट मध्ये राहतात, पण त्यांच्यावर लक्ष द्यायला, प्रसंगी त्यांची समजूत घालायला किंवा त्यांच्यातील गैरसमज दूर करायला घरात तिसरी व्यक्ती नसते. परिणामी त्यांचा वागण्यात नको तेवढा मोकळेपणा असतो. आपल्या जोडीदाराला आदराने बोलवावे, वागवावे याचे भान कधी कधी सुटून जाते. विसंवाद वाढतात. परिणामी त्यांनी लव्ह म्यारेज केल असलं तरी ते किती काळ एकत्र सुखाने नांदतील हे सांगणे कठीण असते. शैक्षणिक आणि आर्थिक दृष्टीने दोघेही सारख्या पायरीवर उभे असल्याने कोणी एक पाऊल पाठी यायला व माघार घ्यायला तयार नसते. मीच का? हाच वादाचा प्रश्न असतो. करिअर म्हणून पाळणा लांबवलेला असतो याचा परिणाम दोघाना धरून ठेवणारा दुवा नसतो.म्हणून संबंध ताणले गेले तर वेगळे होणे कठीण नसते. याचेच प्रतिबिंब वेगवेगळ्या सिरीयलमध्ये दाखवले जाते. एका एका मुलीने किंवा मुलाने किती वेळा लग्न करून डिव्होर्स घ्यावा त्याला मर्यादा रहात नाही. आज डिव्होर्स एवजी अगोदर दोन चार ब्रेकअप झालेले असतात. परस्परांतील मतभेदांमुळे ते तरूण वयातच दोन तीन लग्न सहजच करतात. मुख्य म्हणजे डिव्होर्स झाल्याचा त्यांच्या मनावर फार गंभीर परिणाम होत नाही. या उलट आज भी हम मिलते है अस ते जाहीरपणे माध्यमावर सांगतात. पाश्चिमात्य देशात जी मुक्त संस्कृती आहे ती इथ जगणं हा भोळसट विचार मनात बाळगून जगण सुरू असत तिथेच चूक घडते. सिरीयलमध्ये किंवा चित्रपटातील चित्रण वास्तव नसलं तरी त्याचा इम्पॅक्ट तरुण मुलांच्या मनावर, विशेषतः अशिक्षित आणि उथळ मनाच्या मुला-मुलींवर याचा परिणाम सहज होतो.
जो आपल्यासाठी पैसै खर्च करू शकेल,आपले म्हणणे उचलून धरेल किंवा मुक्त जगण्यावर बंधन घालणार नाही. असा होयबा नवरा मुलींना आवडतो. त्या मुलाची पार्श्वभूमी नीट माहिती करून न घेता, केवळ तो दिसायला सुंदर आहे किंवा त्याची एखादी लकब आवडते म्हणून त्याच्याशी मैत्री करणे योग्य आहे की नाही ठरवणे फार गरजेचे आहे. वरवर दिसते ते वास्तव नसेलही पण गाढव प्रेम केले की एवढाही विचार करण्याची काळजी मुली घेत नाहीत.याउलट मुलांचे मत असते, आपल्या बाहेरील लफड्यात पत्नीने उगाच डोके घालू नये अशी त्याची भुमीका असते. कमिटमेंट नाही, डिहोशन नाही आणि कम्पँशन तर नाहीच नाही.
आज प्रेम करून लग्न केल्यानंतर एक दोन वर्षात घटस्फोट घेतल्याच्या अनेक घटना वारंवार ऐकू येत असतात. मुला मुलींनी पळून जाऊन पालकांच्या इच्छेविरुद्ध लग्न केल म्हणून किंवा खालच्या जातीतील मुलाशी लग्न केल म्हणूनही त्या दोघांची किंवा एकाची जाहीरपणे हत्या होते त्याची व्हिडिओ क्लीप समाज माध्यमातून फिरते आणि अशी लग्न कोणी करू नये म्हणून दहशत माजवली जाते, हे किती भयानक आहे. यापुढे असा कोणी प्रयत्न केला तर परिणाम गंभीर होतील असा इशाराच जणू हे धर्मांध देत असतात. बायकोने बुरखा घातला नाही म्हणून तिची गळा चिरुन हत्या केली ही बातमी वाचल्यानंतरही आपला जन्माचा जोडीदार निवडतांना आमच्या भगिनी शहाण्या होत नाहीत हे दुर्दैव. धर्माविषयी किंवा जातीविषयी कडवटपणा कोणत्या थराला जातो त्याच हे जीवंत उदाहरण.
“प्यार किया तो डरना क्या,प्यार किया कोई चोरी नही की छुप छुप आहे भरना क्या ?” हे गाणं म्हणून नक्की ठिक आहे.आंतरजातीय विवाह व्हावे की नाही? आंतरधर्मीय विवाह व्हावे की नाही? हा तर फार गहन विषय आहे.यावर व्यक्ती निहाय मतभेद असण अगदी स्वाभाविक आहे. बर आंतरधर्मीय लग्न यशस्वी झाली नाहीत असही कोणी ठाम म्हणणार नाही. पण अशी उदाहरणे दुर्मिळ किंवा मोजकीच.
तौफिक कुरेशी यांची पत्नी गितीका वर्दे या ब्राह्मण आहेत तरीही त्यांचा संसार उत्तम चालला आहे. या उलट अनेक वर्षे संसार करुनही आज किरण राव आणि आमीर यांच्यात सौहार्दाचे वातावरण राहिले नाही. त्याने या वयातही अजून कुणाशी निकाह लावून संसार थाटला तरी तिचे काय? तिनेही तसाच दुसऱ्यातिसऱ्या माणसाशी संसार थाटला तर समाज मान्यता असेल का? कदाचित श्रीमंत वर्गात ते चालेलही पण सर्वसामान्य कुटुंबातील मुलींनी याच पद्धतीने मुलाशी डिव्होर्स घेतला तर समाज त्या मुलीला नाव ठेवण्यास कमी करणार नाही. जर ती कमावती असेल तर कदाचित आपले आयुष्य ठरवेल. पण लहान वयातच मुलांची जबाबदारी पदरी पडली तर कदाचित पूढील संपूर्ण आयुष्य एकटीन काढाव लागले.
मुलीला वैचारिक स्वातंत्र्य का असू नये? पण आचरणात काही पथ्य तिने जाणिवपूर्वक पाळाणे गरजेचे वाटते. तिने कोणते कपडे घालावे? यावर कुटुंबाने बंधन घालणे योग्य नव्हे पण चित्रपटात जसे कपडे घातले जातात तसेच कपडे चार चौघात घालणे योग्य ठरेल का याचा तिने स्वतः जरूर विचार करावा.प्रत्येक गोष्टीत कुटुंबाने किंवा पतीने बंधन घालणे कितपत योग्य? पण मुलींनी कोणत्या मित्रांबरोबर फिरायला जावे या बाबत संकेत पाळले नाही किंवा आपल्या जोडीदाराला विश्वासात घेतले नाही, किंवा किती वाजेपर्यंत घरी परतावे या बाबत दोघामध्ये मतभिन्नता असेल तर भांडण विकोपाला जाणार यात वाद नाही.
दोघेही कमावते असल्याने घरी दोघांनी कामाची विभागणी करून एकमेकांना अपेक्षित मदत करणे ओघाने आलेच. घरातील स्वच्छता, भांडीकुंडी,व्यवस्थापन, स्वयंपाक, मुलांची किंवा पालकांची देखभाल ह्या गोष्टी दोघानी समसमान केल्या तर वाद होणार नाही. वागण्यातील स्वातंत्र्य किंवा समानता दोघाना सारखी हवी. जर आर्थिक बाबतीत ती स्वंयपुर्ण असेल आणि कुटुंबाला मदत करत असेल तर मुलगा म्हणून काही वेगळे स्वातंत्र्य त्याने घेऊ नये हीच तर प्रत्येक महिलेची अपेक्षा असते. आणि ती अपेक्षा रास्त आहे. तिने नोकरी करावी आणि घरही कुशलतेने सांभाळावे अशी अपेक्षा करणे योग्य नव्हे. मुलगे किंवा पुरुष प्रत्येक बाबतीत तिला स्वातंत्र्य देण्याची उदारता खर तर मानवता दाखवतीलच या बाबत आशंकता असते.
अगदी उच्चशिक्षित जोडप्यामध्ये मी-मी, तू- तू होत असते. अशा वेळेस मुलांसाठी सामंजस्य स्वीकारून एकत्र राहण्याचा प्रयत्न दोघेही करतात. पण दोघेही उच्चशिक्षित असल्याने त्यांची वैचारिक झेप मोठी असते. दुसऱ्याला समजून घेण्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीत काय न्यून आहे त्याचा उहापोह करण्यात शक्ती खर्च करतात आणि I can’t tolerate him any more पर्यंत गाडी गेली की ती रुळावरून घसरते आणि भरकटते. यात मुलांवर कोणता मानसिक आघात होत आहे याचा विचारही मनाला शिवत नाही. म्हणूनच “काय भुललासी वरलीया रंगा” असा विचार कृतीपूर्वी नक्की करावा.
चाळीस वर्षांपूर्वी सामान्य कुटुंबातील मुली कपडे किंवा स्टाईल याबाबत फारशा आग्रही नव्हत्या. माझ्या परिचायाची मुलगी शिक्षीत होती. शिक्षीका म्हणून कार्यरत होती. तेव्हा शाळेची शिक्षीका म्हणजे साडीतच असा समज होता, त्यामुळे लग्न झाल्यानंतर तिच्या पेहरावात तिने काही बदल केला नाही. लग्नानंतर तिला तिचे धार्मिक सण साजरे करण्याची मुभा होती की नव्हती या विषयी कधी कोणाजवळून चर्चा झाली नाही. मात्र तिच्या आई वडिलांनी तिला या लग्नानंतर माहेर वर्ज्य केले. ज्यांनी जन्म दिला त्यांच्या पासून कायमची ताटातूट हे काही छोट दुःख नव्हते, पण ते तिने स्विकारले कारण लग्नाचा निर्णय तिचा होता. तिच्या आई वडिलांची समाजात मानहानी झाली कारण परजातीतील नव्हे तर परधर्मातील मुलाशी लग्न करणे हे त्या काळी मान्य नव्हते आणि आजही मान्य नाही.
घटनेत,भारताने सेक्यूलरवाद स्विकारून, मानवतेच्या दृष्टीने आमच्या प्रतिज्ञेत सारे भारतीय माझे बांधव आहेत हे मनावर बिंबवल तरी आचरणात येण तितके सोपं नक्कीच नाही.माझ्या परिचयाची महिला ऐशीच्या दशकात परधर्मातील मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेते पळून जाऊन त्यांच्या रितीरिवाजानुसार लग्न करते ही सामान्य गोष्ट नव्हे. तिचे मनोबल, तिचा धिरोदात्तपणा पराकोटीचा होता यात वाद नाही.
आज काल लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये अनेक तरुण मुली, मुल एकत्र रहात आहेत. कामाच्या कारणास्तव घरा दारापासून लांब रहात असल्याने कोणाचा अंकुश नाही, कोणाचे नियंत्रण नाही, हाती सहा आकडी पगार आणि आठवड्यात दोन दिवसांची सुट्टी. काय म्हणतात ते “हँग आऊट” करण्यासाठी काही निमित्त हवं असं नाही मग शहराबाहेर एखाद्या पब मध्ये,डिस्को थेक मध्ये भेट होते. जवळ येतात आणि मनावरील संस्कृतीची बंधन झुगारून मद्य, नशा आणणारी मादक द्रव्य यांच्या आहारी जातात. ह्या वाईट गोष्टीचे काय परिणाम होतील हा सारासार विचार मनाला शिवत नाही आणि पाहता पाहता नशेच्या गर्तेत नको त्या सगळ्या गोष्टी करू लागतात, त्या दिवसाची वाट पाहण्याची गरज आता उरत नाही, म्हणून एकाच रूमवर,एकत्र राहू लागतात. ना लाज जनाची, ना मनाची.ना जाण आई,बाबांच्या कष्टाची.
पातळी सोडून एकदा वागायचं ठरवलं, आणि त्यातच सुख आहे अशी भ्रामक समजूत करून घेतली की कोसळण्याची भीती त्यांना वाटेनाशी होते. हेच ते तरुणपणी आणि अवेळी अमाप पैसा हाती आल्याने ओढवले दुर्दैव. सुखाचा शोध पैशांनी किंवा वैभवांनी पूर्ण होत नाही तर तो सांमजस्य आणि समाधान यांनी पूर्ण होतो. दुर्दैवाने तरुण पिढीच्या हाती अमाप पैसा आल्यानं दुनिया मेरी मुठ्ठीमे अस या तरुणींना वाटणं यातच त्यांच दुःख आणि दुर्दैव लपल आहे.उच्च शिक्षित असण्यापेक्षा सुसंस्कृत असणं, समजूतदार असण,दुसऱ्या व्यक्तीच्या भावना समजून व्यवहार करणारा बनणं गरजेच आहे . शरीराच्या सुंदरतेपेक्षा मनाची सुंदरता आणि धन दौलत या पेक्षा सभ्यता मानवी जीवन समृद्ध आणि सुखी करू शकेल हे जेव्हा मुलं आणि मुली हे समजून घेतली आणि दुसऱ्याचा आदर करायला शिकतील तेव्हा संसार सुंदर होईल.
जर मी पणा, प्रतिष्ठा आणि गर्व जोपासला तर अधःपतन होण्यास फारसा वेळ लागत नाही. तू तू ,मी मी करून आणि दुसऱ्यावर शरसंधान करून प्रश्न सुटणार नाहीत पण वितुष्ट निर्माण होईल,वाढीस लागेल. दुसऱ्या व्यक्तीला कमी लेखून त्याची मानहानी करून आपण मोठं होणार नाही तर विसंवाद वाढेल. मनातील अंतर वाढेल, यातून सावरण्याची शक्यता फारच कमी,आत्मघात ओढवून घ्यायचा ठरवला तर कोण काय करणार?
affiliate link
मुलांनो सावरा, हे खरे आयुष्य नव्हे. हे खरे लाईफ नाही. ना समर्पण, ना त्याग ना दुसऱ्याच्या कष्टाची,दुःखाची जाण, फक्त सुख ओरबाडून रिकामे व्हायची उत्सुकता,याला कोणी जीवन म्हणत नाही.धोका ओळखा. अविचार थांबवा, घरी तुमची आईबाबा तुमची भावंड तुमच्या परतीच्या मार्गावर डोळे लावून वाट पहात असतांना तुमचं हे असं कुठेही रेंगाळत राहण त्यांना किती दुःख देत असेल याचा विचार करा.या मोहमयी सापळ्यात गुंतू नका,शरीर हे काही खेळणं नव्हे की कोणीही त्याच्याशी मनसोक्त खेळावं आणि कंटाळा आला की मोडून तोडून, कुस्करून फेकून द्यावं. विचार करा.
प्रेम करून मुलगी आपले सर्वस्व आपल्या जोडीदाराला द्यायला तयार असते, आपले घरदार सोडून द्यायला तयार होते, आपल्या जन्मदात्यांना विसरायला तयार होते पण मुलाच काय? तो काही काळ प्रेमाच्या पाशात तिला गुंतवतो आणी इप्सित साध्य झाल की तिचा कंटाळा आला म्हणून आपल्या सहचरणीचा जीव घ्यायला तयार होतो. कुठे गेली त्याच्यातील मानवता? कुठे हरवला त्याच्यामधील प्रेम करणारा जोडीदार? मुलींनो सावध व्हा, जे डोळ्यांना भुरळ घालत ते सगळ चांगलच असतं अस नक्की नाही.
तुमचे जन्मदाते तुमच्या अहिताच कधीही सांगणार नाहीत. डोळ्यावरची खुळ्या स्वप्नांची,मौज, मजेची, ऐश, आरामाची आणि बेगडी वैभवाची पट्टी दूर सारूनच आपला जोडीदार शोधा. काही दिवसांच्या मौजमजेसाठी आई वडीलांनी पंचवीस वर्षे खर्ची घालून आणि हाल अपेष्टा सहन करून वाढवलेला तुमचा जीव खोट्या भ्रमास भुलून दवडू नका. ज्याला तुमच्या मनातील प्रेम कळले नाही, ज्याला तुमची त्याच्यासाठी केलेला त्याग आणि भेटीची तळमळ कळली नाही तो मानवात लपलेला, राक्षसी चेहऱ्याचा पशूच आहे. या पूढे मैत्री करण्यापूर्वी सावध व्हा. मानवधर्म प्रेम शिकवतो,हत्या, तिरस्कार आणि मत्सर नाही. कोणताही धर्म दुसऱ्या धर्माचा व्देष करा अस शिकवत नाही. दुर्दैवाने आम्हा माणसातील हैवान शांत बसायला तयार नसतो म्हणूनच धर्माच्या आणि जातीच्या आड लपून लोक विकृत कृत्य करतात. हैवान बनून जगतात. मुलींनो सावध रहा, सावध वागा, सावध जगा, रात्रच नव्हे तर दिवसही वैऱ्याचा आहे, कोण? कोणती ? भूलथाप देऊन तुम्हाला मोहात पाडेल आणि तुमचे जीवन उध्वस्त करेल सांगणे अवघड आहे. हा लेख वाचून जर काही सुधारणा घडून आली तर ती श्रद्धाला श्रद्धांजली ठरेल.
नवीन पिढीसाठी अगदी डोळ्यात अंजन घालणार आहे.
नमस्कार नगरकर सर, माझ्या लिखाणाचा उद्देश तर तोच आहे पण अस सांगणारा आणि लिहीणारा मुर्ख ठरतो. एकतर वाचन संस्कृती रसातळाला पोचली आहे आणि कोणालाही त्याच्या मनाविरुद्ध असेल ते ऐकायची इच्छा नसते. मग नव्याने काही आत्मसात करण तर फारच दुर. असो आपण अभिप्राय कळवला आनंद आहे..धन्यवाद