समज गैरसमज

समज गैरसमज

मी ज्या दिवशी सेवानिवृत्त झालो, मला निरोप द्यायला माझे सहकारी, इतर कॉलेज मधील माझे मित्र, आणि माजी विद्यार्थी जमले होते. माझ्या या कार्यक्रमासाठी कुटुंबीय होतेच, खुप जणांनी पुष्पगुच्छ दिले भेटी दिल्या,दोन अडीच तास कसे गेले समजले नाही. माझी पत्नी खुश होती, तिचा समज झाला काय नवऱ्याची ऐट आहे किती मित्र परिवार आहे, याचं कारणही तसंच होतं, आता सेल्फीचा आलेला नूर ,बऱ्याच मित्रांनी माझ्या बरोबर सेल्फी किंवा फोटो काढून घेतला होता. अर्थात भेट वस्तू देतांना फोटो किंवा सेल्फी असला की चार मित्रांना सांगताही येत, मी हजर होतो बरं निरोप समारंभाला. निघतांना बरेच मित्र आवर्जून सांगावं त्या प्रमाणे म्हणाले होते, “सर आता निवांत आहात, तेव्हा वेळ काढून जरूर घरी यायचं, अगदी नक्की.” मी पण त्यांचं हे निमंत्रण “हो”, “हो”, “अगदी नक्की” म्हणत स्वीकारत होतो. अर्थात हे निमंत्रण अगत्याचे आहे आणि केळवणाला जावं तसं पुढील दोन महिने मला मित्रांच्या घरी भेटीला जायचं आहे असा गोड समज मी करून घेणार नव्हतो, देखल्या देवा दंडवत हा प्रघात आहे हे मला ठाऊक होतं.

कार्यालयीन कारणास्तव ह्या पूर्वी ज्या शिक्षकांना किंवा सहकाऱ्यांना मी रागावलो होतो त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला असावा, चला एकदाची सुटका झाली. एक व्यक्ती सर्वांना प्रिय असूच शकणार नाही याची कल्पना प्रत्येकाला असतेच. असो, हे अनुभव प्रत्येकाला येत असणारच त्यात काही नवीन नाही. दोन अडीच तासांनी हॉल रिकामा झाला माझं कुटुंब, दोन शिक्षक आणि माझा ऑफिस शिपाई सोडता कोणी नव्हतं, मी त्रयस्थपणे त्या मोकळ्या हॉलकडे आणि माझ्याकडे पाहिलं. दोघांची अवस्था सारखीच होती. रिकामा, रिकामा, आता मी अगदी रिकामा झालो होतो.

जे मित्र, सहकारी थोड्या वेळापूर्वी इथे जमले होते आणि सलगी दाखवत होते, माझ्या कामा बद्दल स्तुती करत होते, त्यांना आलेल्या चांगल्या अनुभवाबाबत सांगत होते ती सलगी खरी की आताचं हे रिकमीपण खरं, काय खर ? ज्यांनी गिफ्ट देतांना फोटो काढून घेतले आणि निघताना दोन्ही हात हाती घेऊन किंवा नमस्कार करून निरोप घेतला तो तरी खरा का? अर्थात हा विचार झटकून मी स्वतःला बजावलं आजच असा विचार करण्याची गरज आहे का? पत्नी आणि मुलं सोबत असतांना मन नको त्या दिशेला भटकणं योग्य नव्हतं. खूप साऱ्या भेटी आणि बुके ऑफिसमध्ये जमा झाल्या होत्या ते प्रेम होतं की भेटीचा सोपस्कार ते समजण कठीण होतं. कोणत्याही बाबतीत गैरसमज करून घेण वाईटच.

या वास्तूत अंदाजे तेहतीस वर्ष सुखाने गेली, अडचणी कोणाला नसतात. मुख्याध्यापक पदावर असतांना कार्यालयात उद्भवलेल्या काही प्रश्नावरून संस्था पदाधिकारी आणि मी यांच्यात वाद झडले, गैरसमज निर्माण झाले. कालांतराने गैसमज दूर झाले. त्रासही झाला आणि शाबासकीसुध्दा मिळाली.

गेले बारा वर्षे हे ऑफिस माझं होतं, यातील खुर्ची माझी होती, यातील कपाटे त्याच्या किल्ल्या माझ्या ताब्यात होता. येथील सहकारी कर्मचारी माझ्या आदेशानुसार काम करत होते. आज समजलं की हे ऑफिस माझे होते हा भ्रम होता. ज्या क्षणी मला निरोप दिला त्या क्षणी येथील माझा अधिकार संपला. तेव्हा इथ काहीच माझं नसतं काहीही शाश्वत नसत.

मी कोणत्याही शिक्षकांना विनाकारण कार्यालयात बोलावून गप्पा मारत नसे आणि या बाबत मला उगाचच वाटत होतं की माझं वागणं अगदी शिस्तीला धरून आहे. माझा असाही समज होता की त्यामुळे माझं कौतुक होत असेल पण एकदा स्टाफ रूम च्या बाहेरून जातांना काही शिक्षकांची चर्चा ऐकली, “आपले सर भारी कंजूस, कधी ऑफिसमध्ये गेल तर साधा चहा सुद्धा विचारत नाही, मन मोकळे बोलत पण नाही स्वतःला मोठं अधिकारी समजतात की काय कोण जाणे?”

अर्थात त्यांच्या बोलण्यात थोडं तथ्य होतंच, पण मी स्वतः सकाळी चहा घेतल्या नंतर फारसा चहा घेत नसे, कार्यालयात कोणी भेटीसाठी आले तर मी फक्त त्या निमंत्रित पाहुण्यांसाठी चहा किंवा स्नॅक्स मागवत असे, याचे कारण शरीराला चुकीची सवय लागू नये आणि कार्यालयास विनाकारण खर्च होऊ नये. सहकाऱ्यांचे संभाषण ऐकून माझा गैरसमज क्षणात दूर झाला. असा गैरसमज वेळोवेळी दूर झाल्याशिवाय इगो कमी होत नाही. फुग्यातील जास्तीची हवा काढणारी टाचणी आणि मनातील संभ्रम दूर करणारी संयमाची टोचणी असली तरच मन वाह्यात विचार करत नाही आणि शरीर वाईट आचरण करत नाही.

मी हेडमास्तर आहे. गरज असेल तेव्हाच मी शिक्षकांना बोलावलं पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. त्यांचा वेळ मुलांसाठी महत्वाचा अस माझं साधं गणित आणि म्हणूनच त्यांच्याशी निवांत गप्पा माराव्या त्यांना चहा पाजावा किंवा त्यांच्याकडून प्यावा हे मला जमत नव्हतं, माझं हे असं वागणं सगळ्यांना मान्य असावं असा माझा समज. पण हा सगळाच फक्त भ्रम होता हे एव्हाना माझ्या लक्षात आलं. पण म्हणतात ना, You can not please all at a time, तेव्हा माझ्या निर्णयाने कोणाला आनंद होईल अशी स्थिती नव्हती. नियत वयोमान ही किती नेमकी व्याख्या असावी, माझ्याजवळून अपेक्षित असलेल येथील काम संपलं. प्रत्येकाला एक दिवस आपली खुर्ची, आपला पिंजरा सोडून जावे लागते काही ना लवकर काहींना उशीरा. मी कुणाचा तरी शेर ऐकला होता

“मै अहम था वही मेरा वेहम था,
इस जींदगी मे मुझे समज मे आया
हे ईश्वर ऐ तेरा ही रेहम था”

प्रत्येकाला वाटत माझ्या भोवती कुटुंब फिरत, माझं ऐकतं, मित्र मला मान देतात, समाजात मला प्रतिष्ठा आहे. जो एखाद्या आस्थापनेचा मालक असतो त्यालाही गर्व असतो मी या लोकांचा मालक आहे, पोशिंदा आहे. या कामगारांनी माझ ऐकले पाहिजे, मला मान दिला पाहिजे. एखाद्या कार्यालयातील अधिकाऱ्याला वाटत लोकांनी मला साहेब म्हणावं, सुरक्षा अधिकाऱ्यांनी मला सलाम करावा. जस राजाला वाटत मी प्रजेचा परमेश्वर आहे, तोच राजा वृद्ध किंवा जरा जर्जर झाला की त्याचा अहंकार त्याचा गर्व गळून पडतो. मग त्याला लक्षात येत सामान्य प्रजा आणि माझ्यात काहीच अंतर नाही. व्याधीने मलाही दुःख होत, मृत्यूला मी ही घाबरतो. ज्या क्षणी त्याला ही गोष्ट कळते अहंकार गळून पडतो. गैरसमज दूर होतो.

हा अहंकार, पदाने, पैशाने,किंवा बलाने येतो.अगदी घरातील कमावत्या व्यक्तीलाही वाटत माझ्यामुळे घर चालतं, दुर्दैव हे की, त्याला कळतच नाही हे घर आहे तिथेच आहे स्थिर आहे, ते तुला मला चालवतं. पण आपली घमेंड म्हणते माझ्यामुळे घर चालत.हा आपल्यातील “मी” कुठं पर्यंत, जो पर्यंत तुमचे हात पाय चालतात, कोणाला तरी तुमचा उपयोग होतो तो पर्यंत. किंवा जो पर्यंत तुमचे खिसे भरलेले आहेत तो पर्यंत, कधी कधी तर खिसे भरलेले असूनही उपयोग नसतो, तेथे तुम्हाला कोणाची ना कोणाची मदत घ्यावीच लागते. मग “मी”, “माझे” हा फक्त समज आहे. जो पर्यंत त्या ईश्वराला वाटते की ह्याचा “मी” शिल्लक रहावा याच अस्तित्व राहावं, याचा श्वास रहावा तो पर्यंत “मी” आहे, श्वास संपला की ध्यास संपला.

जो पर्यंत कुडीत प्राण आहे तो पर्यंत हव्यासी “मी” संपत नाही. एकदा कुडी निवाली की, “येथे कुणी न कुणाचे, जग हे दिल्या घेतल्याचे.” दागिन्यांचा डबा, कपाटाच्या चाव्या सोबत नेता येतील का? पण तरीही कितीही वय वाढलं तरी त्या किल्ल्या सोबत बाळगायची काही महिलांना सवय असते. त्यातून घरात सासू आणि सून किंवा दोन जावा यांच्यात विसंवाद निर्माण होतो.म्हणून योग्य वेळी ह्या चाव्या म्हणजेच अहंकार सोडता आला पाहिजे तर मन जिंकता येईल. गैसमज टळेल, तुम्ही समंजस असाल तर या गोष्टी कोणी न शिकवता तुम्हाला जमतील.

लोकांच्या स्मृतीत राहावं अस भव्य दिव्य काम तुम्ही केलं असेल, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला असेल त्यांच्या जीवनातील कष्ट कमी केले असतील, त्यांचे जीवन समाधानी केले असेल, त्यांच दुःख हलक केलं असेल, तरच लोक तुम्हाला आपला मानतील. अन्यथा, “जन पळ भर म्हणतील हाय, हाय” अशीच तर सामान्य माणसाची गत असते.affiliate link

एकदा मित्रांन सुंदर स्लॅबच घर बांधले, पाच सहा खोल्या, हॉल, ड्रॉईंग रूम, देव खोली, बेड रूम, स्टडी रूम, स्टोअर रूम, किचन वगेरे वगैरे. येईल त्या पाहुण्याला तर कधी बोलावून मित्रांना तो घर दाखवत होता. अगदी आराखडा समजावून सांगावा तस सगळं दाखवत होता.म्हणजे देवखोली ईशान्य दिशेला, आणि किचन… त्याचा समज होता की मित्र पाहून स्तुती करतील, अर्थात तेव्हा नास्ता खाता खाता स्तुतीही केली पण काही दिवसांनी त्याला कळाले की त्यातील काही मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाले आपटेने एवढा मोठा बंगला उगाच नाही बांधला कुठेतरी झोलझाल केल असणार? तर आणखी कोणी म्हणाल काय म्हणावं आपटेला! साला संडास दाखवायचं सोडलं नाही, संडास काय दाखवायची गोष्ट आहे? तर तिसरा म्हणाला बंगला मोठा आहे पण प्लॅन बरोबर नाही माझ्या मुलानी छान प्लॅन दिला असता. एकुणात काय? तर बंगला पाहून गेलेल्यानी गैसमज जास्त पसरवले. त्यामुळे आत्मस्तुती करायला गेलं की नंतर पाठून निंदा ऐकू येणारच. तेव्हा कितीही चांगलं वागा, थोडी चूक हातून घडली की संधी मिळताच वाभाडे काढायला काही धूर्त कोल्हे टपून असतातच.

तेव्हा आपण कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती आहोत हा भ्रम जेवढ्या लवकर दूर होईल, तेव्हाच आत्मशोध सुरू होईल. जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी, लोकांसाठी जगणे सुरू कराल, लोकांचे दुःख समजून घ्याल, त्यांच्या दुःखावर फुंकर घालाल, त्यांच्या सेवेसाठी धावून जाल तेव्हाच ते तुम्हाला आपला मानतील. अर्थात त्या नंतरही आपलं मानतील की नाही सांगता नाही यायचं, तात्याराव आणी बाबाराव सावरकर यांचा, नथुराम गोडसे यांचा काय स्वार्थ होता? एक वेळ नथुरामच्या माथी गांधी हत्येच पातक होत पण सावरकरांचं काय? त्यांच्या वाट्याला का उपेक्षा आली?
दोन अडीच वर्षापूर्वी तात्याराव लहानेंविरूध्द काही कर्मचाऱ्यांनी षडयंत्र रचल होत, त्यांनी जातीवाचक शब्द वापरुन अपमानास्पद वागणूक दिली अशी आवई उठवली होती. नेहमीप्रमाणे वर्तमानपत्रात त्याला आवाजवी महत्त्व दिल गेलं. हा गैरसमज हितशत्रूनीं जाणीव पुर्वक पसरवला होता. चौकशी झाली आणि तात्यांवरच किटाळ दूर झालं. जर एवढ्या सन्माननीय डॉक्टर बद्दल गैरसमज पसरू शकतो तर सामान्यांचं काय?

वेळ खराब असेल तर कोल्हेही वाघाची शिकार करतात अन्यथा उंदिरही सिंहाचे कान उपटून पळू शकतो. मी जन्माला आलो म्हणजे माझ्या माथी काहीतरी दायित्व नक्की असणार, कोणाला सुख देणे किंवा कोणाला अगदी दुःखी करणे. उद्देशहीन कुणाचा जन्म नाही आणि कोणाला मृत्यू नाही. या दोन टोकातील प्रवास म्हणजे जीवन, हे समजून जगण्याचा प्रयत्न केला की लक्षात येईल की अहंकार काही कामाचा नाही, हा प्रवास कालावधी आपल्याला माहीत नाही म्हणूनच प्रत्येक क्षण योग्य कारणासाठी जगावं. आपल्याला वाटत की आकाश दूर कुठंतरी जमिनीला टेकलेले असावं, किंवा कसारा घाटातून जातांना डोक्यावरचा डोंगर कधीही कपळावर पडेल असे वाटते पण म्हणून काही आकाश कुठं टेकल नाही की कसारा घाटातील कडा कपळावर अजूनतरी कोसळला नाही. तेव्हा आपण समजून काही घडत नाही. पण वेळ आली तर अतर्क्य अस काही घडते. एखादी उंचच उंच इमारत पत्याच्या बंगल्यासारखी कोसळते आणि पिसाचा झुलता मनोरा कोसळेल असे वाटूनही कित्येक वर्षे तसाच राहतो.

तेव्हा “मी आणि माझे” हा भ्रम आहे. चुकीचा समज आहे. माणूस त्याला कळायला लागल्यापासून नाती विणू लागतो,आई, बाबा, ताई, दादा, आत्या, मामा, मावशी ही नाती त्याच्या वया बरोबर उलगडत जातात,वाढत जातात. हे माझे ते माझे अस नात्याचं कुंपण स्वतःभोवती पसरू लागतो आणि त्याच कुंपणात अडकून जातो.म्हणून प्रत्येक नात्यात एक पुसट रेषा हवी गरज पडेल तेव्हा मनाजोगती अलगद पुसता यावी. म्हणून अपेक्षांचे ओझे बाळगत बसू नये. अपेक्षा भंग झाला तरी कोसळू नये. मी म्हणावं बायको माझी, मुलं माझी आणखी बरच काही माझं… पण हे खरं का? कधीतरी मुलं म्हणतील जन्म दिलात म्हणून बाप आहात पण यात वेगळं काय केलंत? जनावरसुद्धा आपल्या पिल्लाला जन्म देत पण अधिकार दाखवत नाही आणि तुम्ही? म्हणजे जीवनात कुणाचा तरी नवरा किंवा कुणाचा तरी बाप बनणं यात काही पुरुषार्थ नाही. बायको किंवा मुलांसाठी योग्य वेळी तुमच्या जवळून कर्तव्य केल गेल नसेल तर मनात बायको किंवा मुलांविषयी गैरसमज बाळगून उपयोग नाही. तेव्हा तुमची सोबत ते त्यांना वाटलं तर करतील, कुठपर्यंत, संस्कृत सुभाषित म्हणतं,
धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे,
भार्या गृह द्वारि जनाः स्मशाने।
देहश्चितायां परलोकमार्गे
कर्मिनुगो गच्छति जीव एकः किंवा

अशनं मे वसनं मे जाया मे बन्धुवर्ग मे ।
इति मे मे कुर्वाणं कालवृको हन्ति पुरषाजम् ।।

म्हणून, मनात “मी” पणाचा गैरसमज नसावा. जोपर्यंत तुम्ही कुटुंबात आहत आणि कोणाच्या तरी उपयोगाचे आहात तो पर्यंत तुमची पत, फार तर तुम्ही पूर्वी केलेल्या कामाच्या भांडवलावर काही काळ तुम्ही निवांत जगू शकाल, म्हणजे कुटुंब तुमची काळजी घेईल पण तुम्ही Exit घेतली की पत्नी फक्त दारापाशी सोबत करते. म्हणूनच मी आणि माझे हा अहंकार उपयोगाचा नाही.

ज्याच्या दरवाजा बाहेर चपलांचे भरपूर जोड पडलेले दिसतील ती व्यक्ती कलेची भोक्ती, रसिक, दर्दी असते अस कुठल्याशा पुस्तकात वाचलं होतं अर्थात त्या घरातील व्यक्ति ह्या नक्कीच मैत्री करण्यास योग्य समाजाव्या असा समज आहे.पण ह्या चपला ज्याच्या घरी घरघुती ट्युशन सुरू असेल त्या विद्यार्थ्यांच्या असण्याची किंवा ज्याच्या घरी दासबोध, बापू, निरंकारी बैठक असेल तेथे जमलेल्या भक्तांच्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा मग एखाद्या राजकारणी माणसाचं घरही असू शकते. तेव्हा आपला समज खरा की खोटा ठरवणे इतके सोप्पे नाही. काही बाबतीत गैसमज होण्याची शक्यताच जास्त.affiliate link

काही प्रथितयश लेखक, कलाकार हे प्रसिद्धीच्या झोतात असतात तेव्हा प्रत्येक जण त्यांच्याशी आपली खास मैत्री आहे असं अभिमानाने सांगतो, सलगी दाखवतो पण त्याच व्यक्तीचे ग्रह फिरले, दुर्दैवाने त्याला व्यसन लागलं किंवा काही गंभीर आजार झाला तर त्याची कितीजण खबरबात घेतील ते सांगण अवघड. मी अत्रे बोलतोय हा एकपात्री सादर करणाऱ्या सदानंद जोशी यांचे वृद्धापकाळात जे काही हाल झाले ते ऐकूनच वाईट वाटले.कितीतरी नाट्य अभिनेते आणि कलाकार वृद्ध झाले की विस्मृतीत जातात,कधी काळी त्यांनी रंगमंच गाजवलेला असतो, लोकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले असते, आणि त्यांच्या भेटीसाठी लोक ताटकळत असतात, किंवा निर्माता त्यांची तारीख मिळावी म्हणून विनवणी करत असतो. पण एकदाका त्यांची गाडी उताराला लागली की जवळचे नातलगही दुरून जातात न जाणो काही मागू नये, तेव्हा समज आणि गैसमज हे काळानुरूप बदलत असतात.ज्या दिग्गज व्यक्तीच्या वैभव काळात घरी माणसांच्या रांगा असतात त्याच व्यक्तीच्या पडत्या काळात उपेक्षित जिणे वाट्याला येत. समजूतीचा घोटाळा हा असाच व्यक्तीच्या वलयावर अवलंबून असतो.

कोणावरही नात्याची जुलूम जबरदस्ती करू नये. कोणी आपल्याकडे पाहिलं म्हणजे तो किंवा ती आपल्यावर प्रेम करतं, असा समज करून त्याच्या किंवा तिच्यावर पागल होऊन जीव लावू नये. एक आईच्या उदरातून जन्म घेतलेले अगदी सख्खे भाऊ ही, स्वार्थ निर्माण होताच वैरी होतात, तिथं इतर नात्याची काय कथा ? हा माझा तो माझा हा केवळ भ्रम किंवा समज आहे. लोक प्रेमभंग झाला म्हणून जीवही द्यायला निघतात. एवढच जीवावर उदार आहात तर सैन्यात भरती व्हा देशसेवा करा जीव कारणी लावा फुकाचं का मरा? जगण्याला आणि मरणालाही उद्देश हवा,लक्ष्य हवं, निमित्त होऊन मरणं निरर्थक. तेव्हा एवढ नक्की तुमच जगण उद्देशहीन नाही. हा गैरसमज नाही तर वास्तव आहे.

वेगवेगळ्या भागात वेगवेगळे समज आहेत, लहानपणी आमच्या गावी पश्चिमेकडे असणाऱ्या डोंगराकडे दाखवत आमच्याकडे येणारी एक आदीवासी आजी म्हणे,”पोरा, तय नांग, तय ढोकुंबा देव रयतय,तोस आपल्याला पाऊस पानी देतय. त्याला सांगला की पाऊस येत.” आता एवढी म्हातारी आजी चुकीचं कस सांगेल, मग जेष्ठ संपत आला की आदिवासी आपल्या घरासमोर त्या वरूणाच्या स्वागतासाठी राख वापरून रांगोळी काढत, यात बऱ्याच वेळा भूमितीय आकृत्या असत, त्या का? याचा अर्थ कधी लावता आला नाही, त्यांच्या घरातील भिंतीवर देखील देव, झाडे ,फुले याच पेंटिंग असत, आपण याला आता वारली पेंटिंग म्हणतो. हा समाज घरा समोर पाट ठेऊन वरूणाची पूजा करत असे आणि आम्ही मुले अगदी उघडे नागडे ह्या ढोकुंबाला साद घालत असू, “ढोकुंबा देव पानी मोठा येव.” कधीतरी योगायोग म्हणून पाऊस पडत असे.आता जेव्हा विचार करतो की किती उथळ विचार आम्ही करत होतो,पण अदिवासी समाजाचे काही ठोकताळे हे निसर्गातील बदलाचे निरीक्षण करून ठरतं. या ढोकुंबा देवाच्या समजूतीच आता हसू येते पण तेव्हा ती समज पक्की होती.

थंडीमध्ये कोल्हे रानाकडून गावाकडे येत आणि त्यांची जाग लागली की गावातील कुत्रे भीतीने विशिष्ट आवाजात भुंकत. कोल्हेही विशिष्ट आवाजात ओरडत पण आम्हाला मात्र कुणीतरी सांगीतल की ती भालू आहे, गावात कुणी मरणार असेल तर तिला समजत, कुत्री रडू लागतात आणि ते गावात अघटीत घडणार आहे याची सूचना देतात. योगायोगाने किंवा फार थंडीमुळे कोणीतरी म्हातारं नेमक गचकायच आणि आमची अशीच समजूत व्हायची की भालू ओरडून गेली आणि म्हातारं मेलं.

गावात देव देवस्कीच तर विचारूच नका, काही बायकांवर गावातील लोक सरळ सरळ आरोप करत की ती भुताळीण आहे,तिला चेटूक करता येत. अशा बाईच्या घरी दारी कोणी जात नसे. तिने काही पदार्थ दिला तरी कोणी खात नसे तिने नक्कीच त्यावर चेटूक केल असावं असा दृढ समज होता. एखाद्या घरी कोणी आजारी असेल आणि सिंपथी म्हणून ती चौकशी करण्यासाठी गेली आणि तेव्हाच जर ती व्यक्ती योग्य उपचार न मिळाल्यामुळे वारली तरी त्याचा दोष तिच्यावरच यायचा आणि तिने भुताटकी केली म्हणून तो वारला असा तिच्यावर आरोप व्हायचा.तिला शिव्यांची लाखोली वाहिली जायची,प्रसंगी तिला मार ही खावा लागे.गंमतीचा भाग म्हणजे कोणत्याही पुरूषावर तो भुताळ्या आहे असा आरोप झाल्याचे मी ऐकले नव्हते. भूताटकी करते म्हणून काही ठिकाणी बायकांना जाहीर जाळपोळ केल्याची उदाहरणे आहेत.

तर समज किंवा गैरसमज पसरायला वेळ लागत नाही. कावळा बसायला आणि फांदी तुटायला अस आपण म्हणतो. किंवा कावळा घरा बाहेर ओरडायला लागला की आपण त्याला म्हणतो कुणी पाहूणा येणार असेल तर उड कावळ्या, कावळा उडून जातो. योगायोगाने पाहूणा आला तर आपण म्हणतो आम्हाला माहितच होत तुम्ही येणार ते आणि पाहूणा नाही आला काही अशुभ ऐकायला मिळाल तर म्हणणार मेल्याने सकाळीच अपशकुन केला होता.

ग्रामीण भागात अंधश्रद्धेवर खूप विश्वास ठेवला जातो, कोणतीही गोष्ट न पडताळता स्वीकारली जाते, त्यामुळे गैरसमज वाढतात. थोड समज आल्यानंतर मी या गोष्टींना विरोध करत असे पण लोक माझे बोलणे मनावर घेत नसत, ते म्हणत, “तू कालचा पोर तुला अनुभव कय हाय, आमचा बाबा नी आया काय खोटा सांगतन का?” गावात शिमग्याला होळीच्या भोवती जमून अर्वाच्य भाषेत शिव्या देत. चक्क बोंब मारत, आई, बहिण यांच्यावरून देता येतील तेवढ्या शिव्या घालत, होळी रे होळी, बामणाच्या xxxx गोळी, यापेक्षाही घाणेरड्या शिव्या घालत, हा कार्यक्रम तासभर तरी चाले. शिवाय होळी सुकी जाऊ नये म्हणून दारू पिऊन धिंगाणा घालत.एवढे धुमशान झाल्यावर त्यांची बॅटरी हळू हळू उतरत असे आणि काही तिथेच कुठेतरी आडवे होत. कोणत्या तरी इंग्रजी कवींच्या ओळी आठवत
“When they lose their senses they behave like pigs.”

पावसाळ्यात दारासमोर लावलेले भोपळे,कोहळे, दुधी, काकडी, पडवळ यांची फळे वाढ न होताच त्याला पोषण द्रव्य न मिळाल्यामुळे गळू लागत पण त्या वेलींना दृष्ट लागली अस समजून आम्ही ही अकाली गळालेली छोटी फळे जमा करून त्याला काड्यांचे चार पाय लावून त्याला अबीर, बुक्का लावून रस्त्याच्या मधोमध नेऊन ठेवत असू, समज असा होता की या मुळे नजर उतरून वेल नीट धरू लागेल. रस्त्यावर ठीक ठिकाणी असे दृष्ट उतरून ठेवलेले रेच दिसत. एखादे लहान मूल रडू लागले तर त्याला चुलीतील तिट लावला जाई किंवा मिरची, कोळसा वगैरे त्याच्यावरून फिरवून ही ओवाळणी रस्त्यावर ठेवली जाई. खरे तर अपचन किंवा अन्य कारणामुळे पोटात दुखत असेल किंवा डोके दुखत असेल म्हणून मुलं रडत असे पण यांचा आपला गैरसमज की मुलाची तब्येत गुटगुटीत असल्याने त्याला दृष्ट लागली. तेव्हा ग्रामीण भागात अशा अनेक पद्धती रूढ होत्या.

अगदी अलीकडे मी डोंबिवली सारख्या शहरातही पत्रावळीवर भाताचे गोळे आणि त्यावर लिंबू,लाल मिरची, कोळसा, अबीर, कुंकू असे रस्त्याच्या मधोमध आणून ठेवलेले पाहिले आणिआश्चर्य वाटले. एकविसाव्या शतकातही भुत, पिशाच्च, हडळ, भुताटकी, करणी, रेच याबाबतीत लोक विश्वास ठेवतात इतकी अंधश्रद्धा बाळगून आहेत. अनिस असो की अन्य संस्था जोवर यांच वैज्ञानिक निकषांवर प्रबोधन होत नाही यांच्या डोक्यातील गैरसमज कमी होणे शक्य नाही. हे केवळ भारतातच घडते असे नव्हे तर चीन आणि जपानमध्ये एका उंच टेकडीला लोक देव मानून पुजा करतात.

कधी कधी बोलताना गैरसमज होतात, बोलणारा योग्य बोलला पण जर ऐकणाऱ्या व्यक्तीने अपूर्ण ऐकले तर भांडणं होतात. म्हणून संभाषण हे मोठ्या आवाजात आणि समोरा समोर झालेलं कधीही चांगले. बऱ्याच महिलांना जी बाई हजर नसेल तिच्या विषयी किंवा एखाद्या घटने विषयी हळू आवाजात एकमेकींना सांगायचे असते, ज्या व्यक्ती विषयी त्या बोलत असतील ती व्यक्ती आली की ह्यांचे बोलणे अचानक ब्रेक लागल्या सारखे थांबते आणि मग संशयाला जागा निर्माण होते, “तुम्ही नक्की माझ्याच विषयी बोलत होतात, तुम्ही असच करता, वगैरे वगैरे,” दुसरी पदर खोचून समाचार घेते. कदाचित त्याचा शेवट रडण्यात किंवा शाब्दिक भांडणात होतो पण मी म्हणतो त्या महिलांनी गॉसिप करावंच का? पण नाही हा सवयीचा गुण तो कसा जाणार?

बऱ्याचदा पत्नी नवऱ्याला म्हणते लग्नापूर्वी तुम्ही किती गोड बोलायचा मी तुम्हाला काय समजत होते आणि तुम्ही काय निघालात? तेव्हा गैसमज हा नेहमी नंतरच होतो. आधी तर फक्त गोड समजत असतो. जेव्हा मतं जुळत नाहीत तेव्हा समज गैरसमजात रूपांतरित होतो. कधी अधिक रकमेची खरेदी केली म्हणून तर कधी सासू सासरे राहायला, मुक्कामी आले म्हणून, कधी मेहुण्याच्या अहेरसाठी फार चांगले गिफ्ट घेतले नाही म्हणून. तेव्हा सगळ्यात जास्त गैरसमज हे नवरा-बायको यांच्यातच होतात.

तेव्हा कोणत्या गोष्टी बाबत गैरसमज निर्माण होईल ते सांगता येणार नाही. जस केंद्र सरकारने गेल्या सहा सात वर्षात विविध निर्णय घेतले ज्या मध्ये नोट बंदी, तलाक, NRC, 370 कलम रद्द करणे,GST चा विविध वस्तू वरील वाढीव दर या बाबत सुस्पष्टता नाही. जर हे निर्णय घेतांना विरोधी पक्षाला विश्वासात घेतले गेले असते तर? या गोष्टी लोकांपर्यंत पोचण्यात सरकार कमी पडले, लोकांचे प्रबोधन न झाल्याने समज कमी आणि गैसमज जास्त अशी स्थिती झाली.जे उद्योग रोकडा व्यवहार करत होते, तो उद्योग काय आहेत हे सांगण्याची त्यांच्यात हिंमत नव्हती आणि एक दमडीही कर रूपाने ते भरले नव्हते त्यांना उद्योग करण्यात रस राहिला नाही त्यामुळे कित्येक उद्योग संख्या कमी झाली. बेकारी वाढली. जर सरकारने निर्णय घेण्यापूर्वी योग्य प्रकारे प्रबोधन केल असत,आणि टप्याटप्याने या सुधारणा केल्या असता तर लोक ह्या दुष्ट चक्राला सावरून समोर गेले असते.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत तेच, एमएसपी किंवा हमी भावाने खरेदी बंद होणार अशी आवई धनीक शेतकरी संघटनेने मारली. याच बरोबर केंद्र सरकारने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग या करिता निर्बंध शिथिल केले. त्यामुळे हळू हळू शेती करणारे शेतकरी न राहता शेती ही, उद्योग करणाऱ्या कंपनीच्या ताब्यात जाणार आणि शेतकरी भूमीहीन होणार अशी दुसरी लोणकडी थाप संघटनेने दिली. सरकारने काढलेले शेतकी कायदे जाचक नसून छोट्या शेतकऱ्यांना कसे लाभदायक आहेत ते समजून सांगण्यात सरकार आणि त्यांचे प्रतिनिधी कमी पडले. अन्यथा बॅक फूट वर जाण्याची गरज भासली नसती.जर सरकारने पूर्ण तयारी करून आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांना सोबत घेत या कायद्याची उपयुक्तता पटवून दिली असती तर सरकारला शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागली नसती आणि शेकडो शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर ऊन पावसात आणि गोठवणाऱ्या थंडीत १३०० जणांना मृत्यू आला नसता. समज आणि गैरसमज यात असणारी अस्पष्ट रेषा किती घातक असते ते यावरून दिसते. आता हे शेतकी कायदे उशिराने रद्द करण्यात आले पण तोपर्यंत खूप पाणी पुलाखालून वाहून गेले.

रेल्वे तिकिटांच्या पाठीमागे अतिशय छोट्या अक्षरात सूचना लिहिलेली असते, अगदी सिगारेट पाकिटावर किंवा तंबाखू पाकिटावर, दारूच्या बाटलीवर it’s dangers to health अशीच छोट्या अक्षरात सूचना असते.जर ही सूचना ग्राहकाने वाचावी अशी अपेक्षा असते तर ती डोळेफुटक्या अक्षरात का? तर ग्राहकाचे त्यावर लक्ष जाऊन कोणत्या प्रकारचे अधिभार लावले जात आहेत हे ग्राहकाला कळू नये याची ती ताजविज. ह्या छुप्या कारणाने, ग्राहक परावृत्त होऊन खप कमी होऊ नये याची तजवीज उत्पादक करतो. म्हणजे समज पटण्या पेक्षा किंवा स्पष्टीकरण देत बसण्यापेक्षा गैरसमजुतीत ठेवण्यात जो तो धन्यता मानतो.

सिगारेट ओढल्याने, दारू पिल्याने,तंबाखू खाल्याने, किंवा पान पराग, विमल असा मुखवास खाल्याने कोणते सुख मिळत असावे? पण कंपन्या प्रसिद्ध अभिनेत्यांना घेऊन त्याच्या जाहिराती अशा करतात की प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पडावी. एवढा मोठा अभिनेता करतो तर मी केले तर कुठे बिघडले? तेव्हा जाहिरातीच हे Slow Poison देऊन ग्राहकाला गंडवण्याचं काम प्रत्येक कंपनी करत असते. ती सुद्धा चुकीचा समज पेरून आपल्याला गैर समजुतीत ठेऊन खिशे भरत असते. ऑर्थो बामची जाहिरात करतांना तुम्ही प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर अर्थो बाम वापरून स्नायूंच्या दुखण्यातून कसा रिलीफ मिळतो?
ते सांगताना दाखवतांना पाहता, किंवा अजय देवगण आणि शाहरूख विमल पान मसाला खातांना दिसतो, यातील कोणतीच गोष्ट खरी नाही हे माहीत असूनही आम्ही अर्थो बाम विकत घेतो. अशी शेकडो उत्पादने खोटी किंवा अवास्तव माहिती देऊन बाजारात विकली जातात आणि आम्ही ग्राहक जाहिरातीच्या झगमगाटाला भुलून ही उत्पादने फारसा विचार न करता खरेदी करतो. फेस पावडर लावून कोणी गोरे होणार नाही पण गैरसमज पध्दतशीर पसरवून कंपन्या आपले उखळ पांढरे करून घेतात.

तेव्हा या जाहिरातीच्या भाऊ गर्दीत काय खरं नी काय खोटं हे ठरवायला ग्राहकाला वेळ असतोच कुठे. मॉल मध्ये वेगळं काय असतं, वर्तमान पत्रातील जाहिरातीला भुलून आम्ही, “करलो दुनिया मुट्ठीमे” च्या तालात क्रेडिट कार्ड घेऊन मॉलमध्ये जातो आणि किती मस्त किती स्वस्त असा समज करत जे जे दिसेल ते घेत सुटतो घरी येऊन जेव्हा त्या वस्तू वेळ असल्यास पुन्हा त्यांच्या किंमतीसह आणि मिळालेली सूट यासह पाहतो तेव्हा लक्षात येत की गैरसमज होऊन बऱ्याच नको त्या गोष्टी खरेदी केल्या गेल्या त्यातील काही वस्तूंची गरजही नव्हती. पण चुकीचा समज झाला की तोटा ठरलेला आहेच.

अर्थात हा समज आणि गैसमज होणं हे प्रेमाच्या बाबतीत ही होतं. वस्तूच्या बाबतीत होतं, आणि मनातील संभ्रमाविषयी सुद्धा होत. सुशांत सिंगच उदाहरण अगदी ताज आहे, मौज मस्तीत वाहून जाताना कधी व्यसनाच्या आहारी गेला कळले नाही आणि मग आधी निर्मात्यांशी गैरसमज झाला आणि मग व्यसनाच्या आहारी की त्या उलट हेच कळले नाही, परिणाम, आत्महत्या. त्याला पिक्चर किंवा काम न मिळण्यात निर्मात्यांचा अडसर होता? मैत्रीणींच्या मागण्यांचा होता की व्यसनांचा हे कधी कळलेच नाही. तेव्हा जीवनातील गैससमज कोणत्याही थराला जाऊ शकतात हेच यातून कळते.

मृगजळ कोणाला माहिती नाही, तरीही श्रुधा भागवावी अस वाटण स्वाभाविक नाही का? हव्यास कोणाला चुकला आहे? हा मृग सोन्याचा आहे असा समज सितामाईचा झाला होताच ना? आणि सर्वसाक्षी राम ही या मृगाला भुललाच ना! हिरव्या गार झाडावर पक्षी घरटे बांधतात तेव्हा हे झाड आपल्याला सोबत करणार हीच धारण पक्षांची असते पण अचानक पानगळ सुरू झाली आणि झाड निष्पर्ण झाल तर त्या पक्षांच्या मनातही गैरसमज पसरू शकेल ना! आणि मग
न रूकी वक्त की गर्दीश न जमाना बदला
पेड सुखा तो परिंदोने भी ठिकाना बदला
अस म्हणायची पाळी आली तर दोष कुणाचा?

तेव्हा आपल्या जीवनाच्या वाटचालीत गैसमज होणार नाही आणि झालेच तर ते सांमज्यस्यांने। दूर करण्याची कला अवगत करून घेतली तर जगणे सुंदर होईल. अहंकार कधीही वाईटच, माझे तेवढे खरे असा हेका बाळगला तर सुधारणेला वाव रहाणार नाही म्हणूनच समजूतदार असण आणि समोरच्याला समजून घेता येण फार फार महत्त्वाचे आहे. ज्याला समोरच्या व्यक्तीला समजून घेता येत गरज भासल्यास पडत घेता येत तो नेहमीच यशस्वी ठरतो म्हणून कमीपणा घेता आला तर गैरसमज टळतील.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar