सरिता भाग 1
सिंधूताई सकपाळ यांच्यावर चित्रपट प्रदर्शित झाला आणि उभ्या महाराष्ट्राला सिंधूताई आणि त्यांच सामाजिक कार्य याची माहिती कळाली. चित्रपट पाहिल्याने सामाजिक प्रबोधन होत का? खर तर ते व्हावं हा चित्रपट निर्मात्याचा उद्देश असतो, पण चित्रपट किंवा मालिका पाहून लोक स्वतःची करमणूक करून घेतात. बंदीनी किंवा दामीनी या सिरीयल आणि माहेरची साडी, वहिनीच्या बांगड्या हे चित्रपट पाहून स्त्रिया ढसाढसा रडल्या. हा तात्पुरता भावनिक आवेग होता. हा चित्रपट विस्मृतीत जाताच मुळ स्वभाव उफाळून आला. स्त्रीचं शोषण काही थांबलं नाही. कधी पुरेसा हुंडा मिळाला नाही म्हणून, कधी मानपान झालं नाही म्हणून तर कधी तिला मुल होत नाही म्हणून तर कधी तिच्या सासूने तिला चांगल वागवलं नव्हतं म्हणून तिचं शोषण होतच राहिल. कधी तिच्यावर अनैतिक संबधाचे आरोपही झाले तर कधी तिची घरातील वागणूक ठीक नाही म्हणून तिला उपाशी ठेवणे, सतत काम करायला सांगून तिचा छळ करणे, चटके देणे अशी हिंस्त्र वागणूक देऊन अपमानित केले गेले. खरे तर स्त्रियाच त्यांच्या घरात लग्न होऊन नव्याने आलेल्या सुनेच शोषण करतात.
सगळ्यात दुर्दैवी बाब म्हणजे जेव्हा जन्मदाता किंवा सावत्र पिता तिच्यावर अत्याचार करतो आणि तरीही त्या मुलीच्या आईला जाग येत नाही. आपल्या दुसऱ्या नवऱ्याकडून मुलीवर एवढा मोठा अपराध घडल्यानंतरही तिची जन्मदात्री आई मात्र आपल्या नवऱ्याला शिक्षा होऊ नये म्हणून पोटच्या पोरीवर होणारा अन्याय लपवून ठेवते. नवऱ्याचा गुन्हा लपवून ठेवते. आईच जर पोटच्या मुलीला न्याय देत नसेल तर अन्य स्त्री काय न्याय देईल?
शोषण हे अमुक ठिकाणी होत आणि तमुक ठिकाणी होत नाही अस ठाम सांगता येणार नाही. अगदी उच्चशिक्षित महिलांचं शोषणही होते तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. पोलीस खात्यात किंवा वैद्यकीय क्षेत्रात मानाच्या पदावर कार्यरत असणाऱ्या महिलांनी घरातून योग्य वागणूक मिळत नाही आणि नवराही तिची न्याय्य बाजू घेत नाही म्हणून जीवन संपवल्याची अनेक उदाहरणे आहेत. पुरुष श्रेष्ठ ही संकल्पना समाजात रुजविण्यासाठी खरं तर बायकाच जबाबदार आहेत.
याची सुरवात प्रत्येक घरात मुल जन्माला येण्यापूर्वीच सुरु होते. मुलींना लहान वयातच घरातल काम सांगितले जाते, अनिच्छेने का होईना तिला करावे लागते. मुलांना मात्र घरातील कामातुन तो मुलगा म्हणून सुट मिळते. इथेच भेदभाव सुरु होतो आणि तो ही आईकडून. जर आईलाच मुलीवरील अन्यायाची जाणीव होत नसेल तर सासुला कशी होणार? जर घरातील कोण्या मोठ्या पुरूषांनी मुलीची बाजू घेतली तर तिला वळण लागायला नको का?पुष्टी जोडली जाते. दुर्दैवाने ती मोठी झाली किंवा तारुण्यात आली की समाजातील दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांकडून तीचं शोषण सुरू होतं. कधी ते प्रत्यक्ष शारीरिक असतं तर कधी मानसिक.
विवाहित स्त्री तरी सुरक्षित मानली जावी पण नाही तिच्या मनाचा विचार तिचा जोडीदारच करत नसेल तर तिच्या सासरचे अन्य पुरुष किंवा स्त्रिया कसे करतील? “काय?तर म्हणे पायातली वहाण पायातच बरी.” जोडीदाराची अशी मानसिकता असेल तर दोष देणार तरी कुणाला?
आठ पंधरा दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे घडलेली घटना चटका लावणारी आहे. सुनेच्या वडिलांकडून ५० तोळे दागिने, गाडी आणि इतर वस्तू हुंडा म्हणून मिळवल्यानंतरही सासरची हाव संपली नाही. सासरची मंडळी धनलाभ व्हावा आणि घराची भरभराट व्हावी म्हणून काळी जादू करणाऱ्या एका महिलेच्या कच्छपी लागुन आपल्या सुनेचा छळ करत होते. तिला स्मशानातील राख खाण्यासाठी जबरदस्ती करत होते. हा छळ सहन न होऊन तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. ही महिला अशिक्षित किंवा कोणी साधीसुधी स्त्री नाही तर उच्च विद्याविभूषित IT Engineer आहे.
स्वतःला उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित समजली जाणारी माणसच जेव्हा आपल्या घरातील सुनेच शोषण करतात किंवा आपल्या मुलीने जातीबाहेरील मुलाशी लग्न करण्याचा प्रयत्न केला तर तिला कोंडून ठेवतात किंवा जन्माची अद्दल घडवण्यासाठी तिच्या होऊ घातलेल्या नवऱ्याला फसवणूक करून मृत्यूच्या दारी लोटतात तेव्हा त्यांचा बुरखा फाटून समाजापुढे येण आवश्यक ठरत.
घरातील कर्त्या महिलेला आपल्या सुनेकडुन कुलदीपक हवा असतो. तो म्हणे वंशाचा दिवा, त्याने तोंडात पाणी टाकून अग्नी दिल्याशिवाय स्वर्ग प्राप्त होत नाही. किती खुळी समजूत, कसला स्वर्ग? कोणी पाहिला आहे का स्वर्ग? मग घरात मुलगा जन्माला आला तर उत्सव आणि मुलगी आली तर घरातल कोणी तरी गेल्याप्रमाणे सन्नाटा.
महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी विवाहित महिलांच्या गर्भलिंगनिदानात वाढणारा गर्भ मुलीचा असल्याने मुलगी नको म्हणून अनेक अवैध गर्भपात घडवून आणल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या. हे गर्भपात घडवून आणायला जसे डॉक्टर जबाबदार आहेत तशी लग्न झालेल्या मुलाची आई किंवा घरातील अन्य स्त्रीया किंवा जेष्ठ कुटुंब प्रमुखही आहेत. प्रत्येक सासूला आपल्या मुलासाठी कुलदीपक हवा असतो. भले या कुलदीपकाने भविष्यात त्यांना वृद्धाश्रमात भरती केले तरी त्यांची तक्रार नसते.
घरात अठरा विश्व दारिद्र्य असल तरी “दीपकाची” वाट पहात खो-खो किंवा कबड्डीची टीम व्हावी इतक्या मुली जन्माला घालणारे अनेक आईबाप मी अनेकदा पाहिलेत. अर्थात आताची स्त्री तेवढी अडाणी नाही, तरीसुध्दा तिलाही मुलाची ओढ असते हे नाकारता येणार नाही. क्वचितच कुणी ग्रेट जोडपे असेल ज्यांना आपल्याला कन्याच व्हावी असे मनापासून वाटत असेल. मुलीचा जन्म झाला तर पहिली दुख्खी होते ती जन्मदात्री, मुलीच्या जन्माला कोणते भोग आहेत ते तिने जवळुन पाहिले, अनुभवलेले असतात. मुले आणि मुली यांचा जनन दर भिन्न आहे. म्हणूनच मुलींची टक्केवारी वाढावी यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. मुलींना शालेय शिक्षणात सवलत किंवा अन्य सवलती देऊन तिचा सन्मान केला जातो. मुलीच्या जन्माबरोबर तिचे बचत ठेव खाते उघडून सरकार काही रक्कम ठेव म्हणून जमा करते. जी रक्कम तिचे उच्च शिक्षण किंवा लग्नाच्या वयात तिला मिळते.
सिंधुताई सकपाळ यांनी आपले दुःख दूर ठेऊन अशा परित्यक्ता महिला आणि अनाथ बालके यांना आधार देण्यासाठी स्वतः कंबर कसली पण सर्व महिला एवढ्या धाडसी नसतात. आपल्या कुटुंबाची नाचक्की समाजात होऊ नये म्हणून जुलम सहन करतात.जुलूम करणारा गुन्हेगारच पण जुलूम सहन करणारी महिला देखील दोषीच, का म्हणून तिने पतीचा किंवा सासूचा जुलूम सहन करायचा? गमतीचा भाग म्हणजे बहुतांश प्रकरणी सासरा सुनेच्या बाजूने उभा रहातो किंवा न्युट्रल असतो.सुनेचा खरा छळ होतो तो सासू, नणंद, मोठी जाव यांच्याकडूनच.
affiliate link
अन्याय सहन करणाऱ्या अशा लाखोंनी महिला असाव्यात, त्यांनी सिंधुताई सकपाळ यांच्याकडे पाहून निर्धाराने कसं उभ रहावं ते शिकावं. एकच प्याला मधील सिंधूला न्याय मिळाला नाही पण या आधुनिक सिंधून घरातील अन्याया विरुद्ध बंड पुकारलं आणि व्यवस्थेवर लात मारून त्या घरातून बाहेर पडल्या पण जेव्हा नवरा हतबल झाला आणि त्यांच्या दारी गेला तेव्हा त्याची गरज ओळखून आपल्या वाट चुकलेल्या मुलाला पुन्हा पदरी घ्यावं तस त्यांना स्विकारलं, त्यांची सेवा केली. इतिहासाची पुनरावृत्ती होते अस म्हणतात. कधी ती समाजापुढे येते, कधी येत नाही. हे झालं नमनाला घडाभर तेल, पण सामाजिक स्थिती विशद करण तितकंच महत्वाचं. ज्या घरात स्त्रिया घरातील कर्त्या असतात आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे घरात सगळं घडतं तिथेच बहुदा सुनेवर अन्याय होतो.
कोकणात गोळवण गावात अशीच एक घटना तीस ,पस्तीस वर्षपूर्वी घडली, गेल्या चतुर्थीला त्याची सत्यकथा मी ज्या बाईच्या बाबतीत घटना घडली त्याच महिलेच्या तोंडुन ऐकली. सरिता निर्गुण तिच नाव, अर्थात काल्पनिक मात्र घटना अगदी सत्य. आज ती साठ पासष्ट वर्षांची असावी. सरिताचं लग्न झालं आणि ती कदमाची, निर्गुण झाली.
काय आश्चर्य आहे? आई वडीलांनी मुलीला वीसबावीस वर्ष लाडा कोडाने वाढवायचं आणि एक दिवस तिचा हात परक्याच्या हाती सोपवून द्यायचा. नवऱ्याच्या नावाने मंगळसूत्र बांधलं आणि सप्तपदी संपली की ती दुसऱ्याची होते. आपलं आडनाव आणि बाबाचं नाव हरवून बसते. लग्न झाल्यानंतर जन्मदेता बाप म्हणतो, “दिल्याघरी सुखी रहा.” यदाकदाचित सासरी तिच्यावर काही प्रसंग ओढवला आणि तिला परत यावस वाटलं तरी पालक नाराज होतात. त्यांना भिती असते ती समाजाची, समाज काय म्हणेल?
मुलगी परत आली ती तिला काहितरी दुःख आहे म्हणून पण आई बापाला चिंता आहे ती मुलगी परतून का आली याची लोक चौकशी करतील म्हणून. किती विचित्र आहे. मुलीच्या सुखापेक्षा यांना समाजाची पर्वा आहे म्हणूनच सासरी काही प्रसंग ओढवला तरी मुली गुपचूप सहन करतात. आपल्या पालकांना आपण परतल्याचा मनस्ताप होऊ नये याची काळजी घेतात. आजही शहरातील कमावत्या महिला सोडल्या तर परिस्थिती बदलली नाही, अशीच ही सरिताची कथा जीने आपल्या दादाला आपल्या परतण्याचा त्रास नको म्हणून सारे निमुटपणे सहन केले.
कदमाची सरिता, निर्गुण यांची सुन म्हणून गोळवण येथे आली. पहिले चार सहा महिने अतिशय आनंदात गेले. नुकतच लग्न झालं होतं. नवा संसार, साहजिकच गोडीगुलाबीने एकमेकांना समजून घेण ओघाने आलंच. यशवंत हट्टाकट्टा होता. दिसायला सुंदर नसला तरी सुस्वभावी होता. फारसा शिकलेला नसला तरी शेतीची आवड होती. घरी दुपिकी जमीन होती. घरात श्रीमंती नसली तर अन्नधान्याची कमतरता नव्हती. नारळाची बाग होती, भरपूर भात पिकत होत, परड्यात भाजी होत होती. उन्हाळ्यात भुईमूग, नाचणी पिकत होती.सगळ कसं मनाजोगत होतं.
पण सहा महिन्यानंतर संसाराला अचानक ग्रहण लागलं. नवरा दूर दूर राहू लागला, नक्की काय झालं? कळेना, तिच्या मागे राहू, केतूच दुष्टचक्र लागलं. नवरा घालून पाडून बोलू लागला. तिच्या पासून दूर लांब राहू लागला. अलिप्त राहू लागला. तिने त्याची अनेकदा मनधरणी केली,काय चुकलं? ते तरी सांगा म्हणाली पण तो काही बोलला नाही, एव्हाना निसर्गाने आपल काम केलं होतं, तिला दिवस गेले होते. त्याला ते कळलं, खरं तर पाहिलं मुलं म्हणजे जन्मदात्यांना आनंद व्हायला हवा पण त्याचा संताप झाला. आता तर तो जास्त तुटक वागू लागला. वेळोवेळी तिला घालून पाडून बोलू लागला. त्याच्या मनात कोणी काय भरवल? ईश्वराला ठाऊक पण एक दिवस त्यांनी तिला सांगीतले,” तू या घरात रवता कामा नये .तू आपली वाट धर, या घरात पुन्हा येता नये “
affiliate link
तिला आश्चर्य वाटलं, आपलं कौतुक करणारा,लाडीगोडीन बोलणारा नवरा अचानक अस विचित्र का वागतोय? हेच तिला कळेना. काही दिवस हे अस तुटक वागण सुरूच होत. तिच्यापासून तो दूर, वेगळा झोपू लागला, आईनेच जेवायला वाढावं असा आग्रह धरू लागला. तिने एक दिवस नवऱ्याला विचारलं, “ओ, तुमी माझ्याशी असे फटकून कित्याक म्हणान वागतास? माजा चुकला काय ता तरी सांगा? तो रागावून म्हणाला,”आऊस म्हणता तुझी पावला वाकडी पडली हत, तुझा लग्नापूर्वीच कोणाशी तरी झंगाट होता. आजव तू त्याका भेटूक नट्टापट्टा करून चोरून जातस. माका फसवून तू त्याचीच सोय करतस. तुझ्या पोटात प्वार वाढता ता माझा न्हयं.”
ती म्हणाली, “ओ तुमी कायेव कसा बोलता? तुमची आऊस खोटानाटा सांगता त्याच्यावर तुमी विश्वास कसो ठेवलास? कामाशिवाय मी घराभाहेर कदी पडतय काय? तुमच्या आवशीक आधी विचारा तिने माका कोणाबरोबर फिरताना बगल्यान ता ? मी देवासमोरचो बेलभंडारो उचलूक तयार आसय, तुमच्या आवशीकव बेलभंडारो उचलून ती खरा सांगता का ? ह्या सांगूक सांगा”
त्याला शहानिशा करण्याची गरज वाटली नाही, तो तिच्या अंगावर धावून येत म्हणाला, “माझ्या आवशीवर संशय घेतस? तिका बेलभंडारो उचलूक सांगतस? ता माका काय तू सांगा नको, माझी आऊस खोटा कित्या सांगतली? तूझा नक्कीच काय तरी झंगाट असतला म्हणानच आऊस माका बोलली.” ती चिडली,एकेरीवर आली, “काय येव आरोप तुका करवतत कसे? माका खयल्या पुरषाबरोबर बघलस ता तरी सांग? तुझ्या आवशीक आधी विचार, असे आरोप करतांना तिची जीभ झडली नाय कशी?”
तिच वाक्य ऐकताच त्याच्या रागाचा पारा चढला, त्याने तिला लाथा बुक्क्यांनी मारलं, खाली पाडलं, पोटावरही लाथ मारली, त्याच्या कुटुंबाचा वंश त्यात वाढत होता. सासू दूर उभी राहून हे सर्व बघत होती पण ती ना मुलाला काही बोलली, ना तिला मुलापासून सोडवून घेतलं. उलट सासूने उच्चारू नये अशा घाण्यारड्या शब्दात तिचा उध्दार केला. मुलाची बाजू घेऊन ती त्याला प्रोत्साहन देत होती. शेवटी ती मार सहन न होऊन निपचित पडली तेव्हा कुठे त्यांनी मारणं थांबवलं.
तिच्या ओरडण्याचा आणि विव्हळण्याचा आवाज ऐकून शेजारी धावून आले. त्यांनी तिला आपल्या घरी नेलं. पाणी पाजून सावध केलं. ते तिच्या नवऱ्यावर रागावले, “यशवंता, मेल्या गुरांका मारतात तसा वैनिक मारलस? दारात प्राण सोडलो असतो तर काय केला असतस?”
यशवंत शेजारच्या रवी निकामावर रागावला, “रवी, तुका तिचो पुळको कित्याक म्हणान ? व्हयी त, तू तुझ्या घराक तिका नेऊन ठेव. माझी बाईल हा, आमी दोघा कायेव करू. आमच्या भांडणात तुमी येण्याची गरज काय?” रवीच्या लक्षात आले, हा संशयाने पागल झाला आहे, आपण तिची बाजू घेतली तर हा, आपल्यावरही खोटेनाटे आरोप करायला मागेपुढे पाहणार नाही. तरी रवी त्याच्याबद्दल जे काही बोलला ते ऐकून अंगावर धावून गेला. त्यामुळे यशवंतला चेव आला,”रवी तुका मिरची झोंबली काय? सांगतय ना आमच्या भानगडीत पडा नको म्हणान.”
नाईलाज म्हणून रवी तिथून निघून गेला. त्यांनी ही घटना पोलीस पाटील गावडेना जाऊन कळवली.
संध्याकाळी पोलीस पाटील आले, त्यांनी तिच्या नवऱ्याला, यशवंतला दमात घेतलं आणि सांगितलं. “यशवंता सकाळी काय घडला त्याची बातमी माझ्या कानावर इलीहा म्हणान चार समजुतीचे शब्द सांगुक मी इलय, आज तू आपल्या बायलेक लाथाबुक्क्यांनी मारलस. तुझ्या विरुद्ध बायलेन जर पोलीस स्टेशनात कम्पलेंट दिली तर विवाहित महिलेचो छळ केलंस म्हणान कलम 304, 498 आणि 125 कलमाखाली सा महिने, वर्षाची शिक्षा होतली. तुझ्या औशिकव घेऊन जातले, रवी तुका सांगुक इलो तर त्याची खरडपट्टी काढलस. शेजारी तिका सोडवून घेऊन गेले म्हणान ती वाचली नायतर तू तिका मारूनच टाकलं असतस. रवीच्या कुटुंबाची जबानी होतली. मग बस जेलमध्ये, आये आणि तू. ती गरीब गाय तिच्यावर आरोप करण्याआधी शहानिशा करूक नको.”
तिचा नवरा यशवंत, पोलीस पाटलाकडे पहात म्हणाला, “काकानू तुमी विवाहितेचो छळ केलय म्हणतास पण तिका मी मारल्याचा तुमका कोणी सांगला? आणि तुमी मगासधरना ३०४/४९८ काय मटक्याचे सांगतास काय,? या आकड्यांचो आणि आमचो संबंध नाय. शेजारी आमच्या वायटावर हत, त्यांचा खय ऐकतास? मी तिका कित्याक म्हणान मारू?”
गावडे रागावत म्हणाले, “यशवंता माका काय मुर्ख समजलं? तू बायकोक मारलस ह्या गावभर झाला. नाईकांच्या गिरणीवर कितीशी लोका होती त्यांनी तुमचो तमाशो ऐकलो तरी निर्लज्जावरी माकाच चुतया बनवतं? किती पुरावे तुका आणून देव ता सांग?”
यशवंतच्या लक्षात आलं बातमी लपून राहिलेली नाही, तो म्हणाला, “माझ्या बायकोचे प्रताप तुमका ठावूक नाय म्हणान तुमी तिची बाजू घेतास. माझ्या डोळ्यावर हात ठेऊन ती बाहल्याबाहेर कारभार करता,राग येईत का नाय,तुमीच सांगा?” गावडे आता तापले, “रे मायझया आता म्हणी होतस मिह्या मारूक नाय म्हणान, आता म्हणतस तिचा चालचलन बरोबर नाय म्हणान, काय तरी खरा बोल, आपल्याच बायलेवर आरोप करूक तुका काय वाटता का नाय?” ‘काका, बाईल माझी हां,बायलेन येऊन तुमच्याकडे तक्रार केली हा काय? लोक काय येव सांगतीत.”
“यशवंता, तुझी खूप बडबड ऐकून घेतलय, आता माका काय करुचा ता मी करतय.” ते ऐकल्यावर यशवंतच नाटक सुरू झाल.पाय धरत तो म्हणाला, “काकानू तुमच्या मी पाया पडतंय, तुमी आमचे पावणे असान त्या छिनाल बाईची बाजू घेऊन माकच कसे धारेवर धरतास?”
गावडे पोलीस पाटलांनी त्याला दूर लोटलं, “एडझया कोणाशी बोलतस? मानपान काय आसा की नाय? गावात कोण कसा याची पयली बातमी माझ्या कानावर येता, सती सावित्री सारखी तुझी बायको तिच्यावर आळ घेताना तुका कायएक वाटणा नाय? त्यात ती गरोदर हा असा ऐकलंय. ता काय नाय तुमी, आवशी-झिलानी आताच्या आता माझ्या समोर तिची माफी मागुक व्हयी. तिका घरात नांदवूक व्हयी नाय तर तुमची लेखी तक्रार मीच कट्ट्यावर करतलय आणि मालवण पोलीस ठाण्यातव कळवतलय उद्या माका कोणी दोष देऊक नको. एकदा जेलची हवा खाल्लस मगे बुध्दी जाग्यावर येतली.”
ते ऐकताच,यशवंत, त्यांची माफी मागत म्हणाला,”काकानू, मी चुकलय पुना तिका नाय मारूचय मग तर झाला. आयेनच माका सांगल्यान तु नसताना ती खयतरी भाहेर जाता म्हणान, ता ऐकून माझा डोक्या तापला म्हणान मी हात उचललय.”
“मग माझी माफी कित्याक मागतं? बायलेची माग, जरा तिच्या शरीराकडे बग, कसा काळा, निळा पडलहा ता. तिच्या होणाऱ्या पोराक काय झाला तर तुझी धडगत नाय इतक्या निट लक्षात ठेव.” यशवंतने गावड्यांच्या बोलण्याला भिक घातली नाही. बायकोची माफी मागण्याबद्दल तर चकार शब्दही काढला नाही. गावाचं भांडण जगाला नको म्हणून पोलीस पाटील गावडे यांनी यशवंतला तंबी दिली. बायकोने छळाची तक्रार नोंदवली तर बाराच्या भावात जाशील असे सांगत चार समजुतीचे शब्द सांगितले. त्यानेही बायकोची क्षमा मागत, यापुढे मी बायकोशी अस वागणार नाही अस लेखी लिहून घेऊन प्रकरण मिटवले. पोलीस पाटलांसमोर त्याने बायकोला घरात घेतले.
पोलीस पाटील निघून गेल्यावर मात्र तो पालटला. सरीताचा हात धरून तिला घराबाहेर ओढत म्हणाला,”ओरड घालून तमाशो केलस मां! भोग त्याची फळा. आता तुझी मुळीच धडगत नाय गाव तुका जेवूक घालूचो नाय. ना तुझो भाऊस घराक नेतलो ना रवी तुका आपल्या घराक नेतलो.”
तिला कळेना, चांगल वागणारा नवरा असा अचानक विचित्र का वागू लागला? सासू म्हणाली,”तुका हय रवता येवचा नाय,आज पासून या घरातसून तुका अन्न पाणी मिळाचा नाय,तुझी काय ती सोय कर.”
तिची काही चुक नसतानाही, तीने सासूचे पाय धरले, “आई असा करू नका, माका घरातसुन बाहेर काडू नका. मी कोणचाच कायेक करूक नाय. तुमच्या झिलाक तुमी सांगा, तुमी जा काय सांगलास ता खरा न्हयं” पण सासू वस्ताद होती, ती म्हणाली,” खरा नाय तर रोज दोन दोन पावटी नटाक कित्याक व्हया, पावंडरी कित्याक व्हये?, कोणाक दाखवूचा असता?” ती म्हणाली,”न्हाल्यावर मी रोजच वेणी फणी करतय, माझो घो अजून आसा, निटनेटक्या रवाक नको काय?” “गो ! तुझी थेरा काय माका कळणत नाय काय? कोणतरी रांडेचो तुका बघूक येवचो असात म्हणानं या नटणा, मुरडणा नायतर शेतकऱ्याच्या बायलेक हे सोस कित्याक?” ती सासूला म्हणाली,”नीटनेटक्या रवण्यावर तुमचो आक्षप कित्याक, तुमी म्हटलास तर मी नाय वेणी फणी करणयं मग तर तुमच्या मना जोगता झाला ना.” सासूचे समाधान होईना ती म्हणाली, “तुमचा लगीन झाल्यापासून तो शेतभात निट नाय बगणा, ना आवशीकडे त्याचो लक्ष. तुझो उपेग तरी काय?”
तिने विचार केला,हिने आपल्याला दोष द्यायच ठरवलं आहे, हिला काही सांगून आणि मनधरणी खरून काय फायदा?
ती मांगरात रहायला गेली तर यशवंतने मांगराची बांधलेली चुडतांची झड काढून टाकली. दुष्टपणाचा कळस होता. मांगरात एका बाजूला गुर बांधली होती तर दुसऱ्या बाजुला त्यांचे गवत आणि सरपण भरले होते. तरीही ती त्या उघड्या मांगरात कशीबशी रहात होती. निकमाच्या बायकोनने एक जुनी साडी आणि जुने अंथरूण दिले. पोटात अन्नाचा कण नव्हता. रात्री उशिरा निकमाच्या बायकोने जेवण आणून दिले. लोकांनी दिलेल्या अन्नावर दिवस ढकलावे लागत होते.
दिसामासी गर्भ वाढत होता पण ती खंगत होती. रात्री मांगरात कुट्ट अंधार असायचा, गुरांच्या शेणाच्या वासामुळे पोटात मळमळायचे, मुरकुटे आणि मच्छर अंग फोडून काढायचे पण त्या परिस्थिती, नियती तिला मरू देत नव्हती.
क्रमशः