सरिता भाग 2

सरिता भाग 2

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तिच्या माहेरी, बहिणीच्या छळाबाबत हे समजले तेव्हा तिचा भाऊ उमेश आणि त्याची पत्नी रजनी तिला घेऊन जायला आले. तिच्या शरिरावरील जखमा आणि तिची खंगलेली प्रकृती बघून त्यांना फार वाईट वाटले. तो बहिणीला म्हणाला, “गे बाय माझे, माका सगळा समजला, या नरकात तू रवा नको. आत्ताच्या आता तू घराक चल.” उमेश यशवंतला या कृत्याबद्दल जाब विचारणार होता. त्या पूर्वीच यशवंतने पुन्हा तमाशा केला, म्हणाला, “जा जा आपल्या भैणीक घेऊन जा, तिच्या पोटात वाढता ता पोरं माझां न्हय, तिकाच आपला विचारा, तां कोणाचा हा? “

सरिताचा भाऊ उमेश प्रचंड रागावला त्याला मारायला धावून गेला. ती मधे पडली, भावाला म्हणाली, “दादा तू हात उचला नको, माझा काय होवचा ता होईत, मी काय ऐक वाईट करूक नाय, वाईट वागूक नाय. माझ्या सासवेन माझ्यावर खोटो आळ घेतलोहा, झिलाक काय तरी खोटानाटा सांगीतल्यान म्हणानं ते असे वागतत, माझा बगुक मी समर्थ आसय, तो वेताळ त्यांच्या काठ्यावर बसतलो तेवाच त्यांचे डोळे उघाडतले. तुमका माजी काळजी करूची गरज न्हय. ह्यांका वाटता मी घर सोडून जाईन आणि मगे हे कोण सुंदरी बगलीहा तिच्या बरोबर लगीन करूक मोकळे, पण मी हयसून हलाचय नाय. मी बरोबर रवतलय, ह्यांका पुरून उरीन.”

सरिताचा भाऊ उमेशने यशवंत विरुद्ध पोलीस तक्रार द्यायची तयारी दाखवली होती, त्यालाही तिने विरोध केला. शेवटी यशवंतला ताकीद देऊन ते तिला धीर देत निघून गेले. जाताना उमेश यशवंतला म्हणाला ” यशवंता, आमच्या भैणीक काय झाला तर तू हस न मी आसय, घरातून बाहेर खेचून जूत्यान नाय मारलय तर बापाशीचा नाव लावचय नाय.”

यशवंत त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसत म्हणाला, “मग बापाशीचा नाव लावाच नको, तू काय मारतलस? मीच तुझी तंगडी तोडून हातात देईन.” उमेश त्याच्या अंगावर धावून गेला, त्याची बायको मध्ये पडली, ओ! तो एक अडाणी, त्या मेल्याच्या तोंडाक खय लागतास? ताईंका कळाक नको असल्या भिकारचोट माणसा बरोबर संसार कशी काय करतली? चल म्हणतवं तरी ऐकणा नाय.” नाईलाजाने मोठा भाऊ, त्याची बायको आणि त्यांचे शेजारी तिची खुशाली घेऊन परतुन गेले. जाता जाता ते गावडे पोलीस पाटलांना भेटले, त्यांना घडलेला प्रकार सांगून हात जोडून विनंती केली, “भाऊ माझ्या भैणीकडे वाईच लक्ष ठेवा. ती तुमच्या मुली सारखी हा.”

पोलीस पाटील म्हणाले, “तुझ्या भैणीन घोवा विरुद्ध जबाब दिल्यान असतो तर मी त्यांका आत्ता धडो शिकवलो असतो पण ती तक्रार देणा नाय, काय करुया? तुम्ही घाबरा नको मी आसय, आजच काय ता करतय, बऱ्या चालीचो पोरगो तो, मानेवर काय भूत बसला कोण जाणं? चार फटके खाल्ल्या शिवाय शाणपण येवचा नाय. तो तिका घरात कसो नाय घेणा ताच मी बघतय?”

त्यांचे आभार मानुन उमेश निघून गेला. संध्याकाळी पोलीस पाटील गावडे अचानक यशवंतच्या घरी गेले, गावडे पोलीस पाटलांची चाहूल लागताच यशवंताच्या आईने सुनेला पाठच्या दाराने घरात आणण्याचा प्रयत्न केला. तशी ती सासूवर रागावली, “व्हयता नाटक कोणाक देखवूक करतास? आज पंधरा दिवस झाले माका घराभाहीर काढलास, अन्न देऊक नाय आणि आजच प्रेम सा चाळवला.”

गावडे पोलीस पाटलांनी, यशवंतला घरा बाहेर बोलवून चार गावकऱ्यांचा समोर चांगली हजेरी घेतली. “यशवंता, तुझी खूप थेरा बघलय, सहनव केलय, त्या बिचारीक त्रास देण्याचो थांबव. बऱ्या बोलान नाय ऐकलस तर ग्रामपंचायतीसून फोन लावून पोलीस बोलवून घेतलय, पोलिसांचे चार रट्टे खाल्ल्याशिवाय तुझा समाधान जावचा नाय” यशवंता पोलीस पाटलांच्या पाया पडत म्हणाला, ” काकानू कुलस्वामिनीची आण घेऊन सांगतय,तिका मी नांदवूक मी तयार आसय तिच हट्टानं मांगरात रवता त्याका आमी तरी काय करतलवं?”

पाटील संतापले, “रे कुलस्वामिनीची आण घेऊन खोटा बोलताना तुका लाज कशी नाय वाटणा? ती काठ्यावर बसतली तेवा कळतला. तुझ्या आवशीक विचारु?, बोलव आवशीक बाहेर, मी तिका आत्ता मांगराकडुन तुझ्या बायलेक ओढुन आणतांना बघलय. म्हातारेकव जेलची हवा खावची इत्सा झालीहा तर आजच धाडतयं. दोघाव महिनोभर जेलात रवलास मगे अक्कल जाग्यावर येईत.”

ती खोलीतून बाहेर आली आणि हात जोडत म्हणाली, “रे झिला, माझा ऐकान तरी घे, मी काय तिका बाहेर काढूक नाय पण तिकाच औदसा आठवलीहा त्याका काय करू!”
पाटील वैतागले, “म्हातारे, माका शाणपण शिकवू नको. तू तिका आत्ता घरात ओढीत आणी होतस ता मी बघलय. रोज रोज तुमची नाटका नको, जर सुनेक बाहेर काडलास तर गाव पंचायत बसवून तुमका शिक्षा होईत. गावातला कोणेक तुमच्या कार्याक येवचो नाय. निट ध्यानात घ्या.”
“रे झिला तिका घरातसुन बाहेर काढून मी काय खुळावलय, पण तिकाच उत इलीहा, लोकांका देखवूक नको सासू छळ करता म्हणानं”

“तुमची थेरा ऐकूक मी येऊक नाय, माका आत्ता लिवान देवा, या पूढे आमी सुनेक नांदवू , तिका त्रास देवचव नाय. आमी छळ केलो तं जी शिक्षा गावकरी आणि पोलीस पाटील देतीत ती आमका मान्य आसा.” पोलीस पाटील यशवंतला म्हणाले.

यशवंतने नाईलाजाने पोलीस पाटील सांगतील तस लिहून दिलं. आईचा आगंठा दिला स्वतः सही केली आणि सरीताला घरात घेतल.

सासू पक्की नाटकी आणि बेरकी होती. सर्व निघून गेल्यावर सुनेला म्हणाली, ” तुझ्या भावाशीक आमची कंपलेट करूक लायलस काय? लक्षात ठेव, घरात रवलस तरी तुका कायेक मिळाचा नाय. उपाशी रवण्याची तयारी असात तर रव बापडी. घरात ढेंगा पसरून बसून रवता कामा नये, गोठो, शाण, झाडलोट सगळा करूचा लागात.”

तिने काही उत्तर दिले नाही. गरोदर असूनही ती मुकाट सगळी काम करत होती. सासू छळ करत असुनही त्या परिस्थितीत ती घरात राहिली. सासू फक्त दोघांपुरते जेवण करत असे. तिच्यासमोर बसुन निर्लज्जपणे ते दोघ जेवत होते, उरले तर यू यू करत कुत्र्याला घालत होते. किती ही अवहेलना पण तरीही तिचे डोळे उघडत नव्हते.

मिळेल ते खाऊन दिवस तिने ढकलले,गुराचा कुंडाही खाल्ला पण त्याने अपचन होऊन तिला ढाळ लागली. अशक्तपणा आला. अनेकदा सासूला विनंती केली पण सासू तिच्याकडे पाहून फक्त हसत होती हा छळ सहन न होऊन ती पुन्हा मांगरात राहू लागली. एवढ्या दिवसात तिने गरोदर सुनेला एकदाही पोटासाठी ना काही दिले ना तिची विचारपूस केली. शेजारीच दयाबुध्दीने तिच्यासाठी काही ना काही पाठवत राहिले. म्हातारी शेजारच्या कुटुंबाचा रोजच उध्दार करायची मग ते तरी कशी मदत करणार?

पोलीस पाटील गावडेंच्या हे कानावर आलं तस त्यांनी परपस्पर हवालदार शिरसाट यांना फोन करून सरिताची कर्मकहाणी त्यांना ऐकवली.त्यांनी गावडेना एफ आय आर करायला सांगितला. पण तो ज्याच्यावर अन्याय झाला त्याने किंवा नजिकच्या नातेवाईकांनी करायचा असतो. सरिता बाबतीत सगळच उलट होत. भावाने एफ आय आर केलाही असता पण बहिणीने तक्रार करू नको सांगितले त्यामुळे त्याचाही नाईलाज. हवालदार शिरसाट यांनी तिच्या नवऱ्याला गाठलं आणि त्याला आत टाकायची धमकी देऊन पैसे वसूल केले. दर महिन्याला तो एक चक्कर टाकून शे, पाचशे वसूल करून मोकळा होत होता. अर्थात या व्यापाला यशवंत वैतागला. त्यांनी गावडे यांच्या घरी जाऊन त्यांचे पाय धरले, सर्व कहाणी सांगितली “काका, व्हयती बिलामत तुमी पाठी लावून दिलास. ह्याचतसून तुमीच तोडगो काडा, नायतर शिरसाट हवालदार आमका भिकेक लावीत.”

गावडे वैतागले, “चुतमारीच्या आतापर्यंत काय बायकोचो कमी छळ केलस? केलेली कर्मा हयच भोगूक व्हयी. इलस तसो चलत रवं.”affiliate link

त्याचा नाईलाज झाला. घरी परततांना यशवंतने भोगल्याकडे पावशेर मारली आणि बायकोच्या नावाने शिमगा करत घर गाठलं. बायको मांगरात जेवण बनवत होती. यशवंताने दारूच्या नशेत बायकोला शिव्या देत चुलीवर लात मारली. चुलीतली लाकडे बाहेर फेकली गेली. एक जळता निखारा मांगरात साठवलेल्या गवतावर पडला आणि गवताने पेट घेतला. यशवंतही त्या आगीत भाजला असता पण तीने त्याला बाहेर ओढले. त्याच्यासह मांगराबाहेर पळ काढला. नशीबाने उन्हाळा असल्याने गुर झाडाच्या सावलीला, मांगरा बाहेर होती म्हणून वाचली.

सुक्या चुडतामुळे आगीचा डोंब उसळला होता. शेजारी धावत आले आणि बादल्यांनी पाणी मारून त्यांनी कशीबशी आग विझवली. इतका बाका प्रसंग ओढवला तरी त्याला शुद्ध नव्हती. सकाळी त्याला जाग आली. त्याने पाहिले मांगराचा जास्त तो भाग पेटून खाक झाला होता. तो घराबाहेर आला तेव्हा आपल्या हातून काय घोडचूक झाली ते त्याला कळलं. पण,आपली चुक मान्य करेल तो यशवंत कसला? खरतर सरीताने पोलीस स्टेशनवर तक्रार केली असती तर यशवंतला आपल्या पत्नीला जाळण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शिक्षाच झाली असती पण तिने त्या आगीतून यशवंतला वाचवले हीच ती अवाजवी पत्नी निष्ठा. या अशा वागण्यानेच तो डोक्यावर बसला होता. एवढा दुर्दैवी प्रकार घडुनही यशवंतकडे दुर्लक्ष केले.

क्रमशः

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar