सरिता भाग 3

सरिता भाग 3

त्या प्रसंगानंतर ती वाचलेलं किडूकमिडूक घेऊन घराला लागून कोंबड्यांची एक रिकामी खोली होती त्यात राहायला आली. ती खोली अस्वच्छ तर होतीच पण कोंबड्यांच्या शीटीची दुर्गंधी त्यात भरून राहिली होती. ती दुर्गंधी सहनही होत नव्हती. तिला नववा महिना यापूर्वीच लागला होता. काल झालेल्या धावपळीने दुसऱ्याच दिवस पहाटेच तिला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या. कळा सहन न झाल्याने ती विव्हळत होती पण निर्लज सासू मदतीलाआली नाही. आदल्याच दिवशी तिने नवऱ्याला आगीपासून वाचवले होते तरीही त्या पाषाण हृदयी माणसाला दया आली नाही. आपली बायको का विव्हळते हे पाहण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही.

तिच रडणं ऐकून रवीची बायको आली, पण तिला होणारा प्रंचड रक्तस्राव पाहूनच तिला चक्कर आली. तास दिडतास ती विव्हळत होती. त्या कळा सहन करत, स्वतःशी झगडून तीने स्वतःची सुटका स्वतः करून घेतली. हा प्रकार घडुनही सासू घराबाहेर आली नाही. जन्म झालेल्या बाळाला गुंडाळायलाही तिच्याकडे काही नव्हते. रवीच्या बायकोने तिला जुने पातळ आणि चहा आणून दिला. यशवंत ओसरीवर बसून निर्लजपणे रवीच्या बायकोकडे पहात होता. दोन तीन दिवस तिने सरिताला मदत केली पण शेजारी तरी किती पुरे पडणार? दोनचार शेजारच्या बायकांना रवीच्या पत्नीने बोलावून आणलं. तिची परिस्थिती त्यांना दाखवली. प्रत्येकीने काही ना काही आणून तिची सोय केली.

यशवंत दारू पिऊन रवीला आणि इतर शेजाऱ्यांना, तिच्या मदतीला आल्या म्हणून नाव घेऊन शिव्या देत होता. तरीही आठवडाभर आलटून पालटून कोणी तिला जेवण दिल तर कोणी तिला पेज पाणी दिली. शेजारी झाले तरी किती मदत करणार. दुसरीतिसरी महिला असती तर आपल्या जीवाच काही बरंवाईट करून घेतलं असतं पण ती ठाम होती.





त्या बाळंतीणीकडे खायला काही नव्हतं. त्या कोवळ्या जीवाला टाकून ती कुठे कामाला जाऊ शकत नव्हती. सासूबाई असुनही या परिस्थितीतही तिला दया आली नाही. आपल्या नुकत्याच जन्माला आलेल्या नातवासाठी म्हणून का होईना, सुनेला काही देऊया असे वाटले नाही.

तिच्या शेजारी भात भरडण्याची आणि पिठाची नाईकांची गिरणी होती, गावातील लोक या गिरणीवर आपले भात किंवा दळण घेऊन यायचे. तिची शेजारीण निकम गिरणीवर येणाऱ्या बायकांना म्हणायची “बायांनो, निर्गुणाची सुन बाळत झालीहा. सासूने तिका वायळी टाकलीहा, ती उपाशी आसा. तिच्या पोटाक काय येक गावणा नाय. तर नुकताच जन्म घेतलेला प्वार काय जगणा नाय, त्या पोराच्या आवशीसाठी या पिशवीत मुठभर पिठ, तांदूळ जमात ता देवा. देव तुमका काय येक कमी करूचो नाय.” लोक तिच्या शब्दाचा मान राखत. पसाभर पिठ, तांदूळ देऊन त्यांचं काही कमी होणार नव्हतं. लोक आनंदाने द्यायचे. ती ते धान्य तिला आणून द्यायची. सरिता रवीच्या बायकोला म्हणायची, “वैनी माझ्या चामड्याची पायतणा करून तुझ्या पायात घातली तरी तुझे उपकार या जन्मात फिटाचे नाय. तू नसतस तं माझा प्वार काय जगला नसता.” ती म्हणायची,”यानी तुका भैण मानलीहा ना? मग झाला तर. उपकार कसले आपल्या माणसांका बगूक नको. उद्या व्हयतो प्रसंग माझ्यावर इलो असतो तर तू धावान इलं असतस की नाय! झाला तर. तू सडसडीत हो मगे भरान पावला.”

मुलाच्या जन्मानंतर,त्याच रडणं ऐकून तरी यशवंताच मन पाझरेल असं तिला वाटलं, पण कुठच काय? कधीकधी ती आंघोळीला किंवा कुठे अडचणीच्या ठिकाणी असायची आणि बाळ भुकेने रडून हैराण व्हायचं पण तिच्या सासूला किंवा नवऱ्याला दया आली नाही. त्यांनी तिला त्या खोलीबाहेर हाकललं नाही हेच नवल. शेजारी तिच्या पुरत द्यायचे, तिला सारखं ओशाळ वाटायचं, पण काहीच उपाय नव्हता.

यशवंत कधी कधी भरपूर दारू प्यायचा. नशेत तिच्या दरवाज्यावर लाथ मारायचा. तिच्या वडिलांचा,भावाचा उद्धार करायचा. जगणं हराम करायचा. या सगळ्या व्यापाला ती कंटाळली होती. केवळ पदराला बाळ होतं म्हणूनंच ती दिवस ढकलत होती.

तिला बाळ झाल्याचा निरोप मिळाला तसा भाऊ भेटायला आला. येतांना त्याने बरच काही आणलं. ती म्हणाली, “दादा तू कित्याक त्रास घेऊन इलं, हे तुका उगाच कायेव बोलतीत. माका ता सहन जाणा नाय. या मातीतलो हो गोळो आसा, देवाक मान्य असात तर जगात, न पेक्षा मातीत जाईत. आता इलस तो इलस पुना येव नको, हे आवशी बापशिवरून वाईट गाळ घालतत. ह्या लोकानी तुझो अपमान केलो तर माका खपाचो नाय.”

भावाने तिला खूप समजावले, “हय छळ सहन करीत बसण्यापेक्षा माहेरी मिठ भाकरी खा. आम्ही आसव, तू काय आमका जड जाऊक नाय” पण तिने नकार दिला. “दादा, लगीन करून माका धाडलास आता पुना घराकडे इलय तर गावातले लोक माका नावा ठेवतीत. कायेव बोलतीत ता माका सहन जावचा नाय. माजा जा काय होवचा असात ता याच उंबऱ्यावर होऊ दे. हकडेसुन भरल्या कुकवान जाईन. तू वाईट वाटून घेव नको.” किती ही अंधश्रद्धा, नवरा तिला पत्नी समजत नव्हता, सासू तिला सुन मानत नव्हती, तरी ही मात्र सावित्री बनायला पहात होती.

दोन दिवस भाऊ आणि वहिनी तिच्या मदतीला राहिले. वहिनीने तिला लापशी करून घातली. डिंकाचे लाडू खायला दिले. भाच्याच्या अंगाला मालिश करून तिने न्हाऊ घातले, धुरी दिली. दोन दिवस स्वतः गोड धोड जेवण करून जेवू घातले. निरोप घेऊन निघून गेले. तिच्या वहिनींनी या दोन दिवसात तिला शक्य होईल ते सगळं केलं. ती बाळंत होऊन महिना झाला तरी मुलाचे बारसे केले नव्हते. बारसे करण्यासाठी हाती काहीच तर नव्हते, पण शेजारच्या रवी निकम यांनी आपल्या भाच्याचे बारसे करावे तसे एक दिवस चार शेजारी बोलावून मुलाचे बारसे उरकले. त्याचे विजय नाव ठेवले. सरिताकडे रवी निकम आणि त्याच्या बायकोचे आभार मानायला शब्द नव्हते. ती म्हणाली, “मोठ्या भावावरी धावून इलात म्हणान मी जगलय. तुमचे उपकार या जन्मात फिटाचे नाय, मी काम शोधतय, माझ्या विजाक तुमच्या अंगणात रवांदे.” रवीच्या पत्नीने तिला जवळ बोलावून सांगितले, “वहिनी तू, विजयची काळजी करु नको, आमी लक्ष ठेव”

हळूहळू ती स्वतः सावरली, दुसऱ्या लोकांच्या शेतावर कामाला जाऊ लागली. स्वतः मुलासाठी कमवू लागली. मुलगा मोठा होत होता. आपले वडील आपल्या सोबत राहत नाहीत हे त्याला माहिती होतं पण ते जेव्हा दारू पिऊन येतात तेव्हा आईला नको नको त्या शिव्या देतात हे ऐकून त्याला वडिलांचा प्रचंड राग येई. बाबा आपला तिरस्कार का करतात? हे मात्र त्याला कधीच।कळले नाही, आणि सरीताने त्याला सांगितले नाही. काय सांगणार होती ती, की तुझ्या बाबांना तुझ्या जन्माविषयी आक्षेप आहे?

शेजारी तिच्या अडीअडचणीत देवा सारखे धावून येत होते. निकम यांचे कुटुंब विजयची काळजी घेत होते. विजय रवीला मामा, मामा म्हणून हाक मारत होता.त्याला स्वतःला मुलं नव्हते म्हणून ते दोघं विजयवर माया करत होते. त्याला शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू आणून देत होते. आई नसताना विजय रवीच्या ओसरीवर खेळत बसे.

बघता बघता विजय सहा वर्षांचा झाला. तिने त्याला जिल्हा परिषदेच्या शाळेत घातले. ती शाळा चौथी पर्यंत होती. ती सातवी शिकली होती, तिला जमेल तसा त्याचा अभ्यास घेत होती. पाहता पाहता तो चौथीत गेला. विजय जन्मताच हुशार होता. त्याची हुशारी पाहुन साटम गुरूजी तिला म्हणाले, “बाई तुझो झिल हुशार आसा, त्याका चांगल्या शाळेत घातलास तर तेचा कल्याण होईत.”



affiliate link

तिने साटम गुरूजींना घरची परिस्थिती सांगितली, गुरुजी म्हणाले, “बाई ता तू माझ्यावर सोड, त्याका फोंड्याक वसतिगृहाच्या शाळेत घालूया. थय रवण्याची, खाण्याची, कपड्याची सोय तेच करतले. तुका एकव रुपयो खर्च नाय.” तिने शेजारच्या निकमांजवळ, गुरुजींनी सांगितलेला विषय सांगितला, ते म्हणाले, ” ताई विजयाक हय ठेवून त्याका शिकवण्याची तुझी ऐपत हा काय? गुरूजी सांगतत ता ऐक, त्या पोराच्या जन्माचा कल्याण होईत.”

विजय फोंड्याला शिकत होता, कधीतरी त्याला भेटायला ती जात असे. कामावर जाऊन वाचवलेले पैसे त्याला देत होती. तर कधी त्याच्या मापाचे कोणी दिलेले कपडे देत होती. शाळेत इतर मुलांचे आई बाबा भेटायला येत. त्याला नेहमी प्रश्न पडे, आई इतक्या वेळा भेटायला येते मग बाबा एकदाही का येत नाहीत? एक दोन वेळा त्याने आईला त्या बद्दल विचारले तर ती रागावली, “तुका बापुस कित्याक व्हयो? मी येतंय ना, त्यांका तुका भेटूक वेळ नाय.” तो एवढासा जीव, त्याला कळेना, बाबा बद्दल विचारलं की आई नाराज का होते? तिचं दर महिन्यादोनमहिन्यानी येऊन भेटणं सुरू होतं. त्याचे गुरुजी त्याच्या बद्दल समाधानी होते. तिला अजून कोणतीच अपेक्षा नव्हती.

रोजच्या कामात तिचा दिवस संपत होता, आता तिने मांगरात आपलं बस्तान बसवलं होतं. सकाळी कामाला जाईल तिथेच जेवण मिळत होतं. रात्री कधी ती स्वयंपाक करी तर कधी तशीच झोपी जाई. अद्यापही सासूला तिची दया येत नव्हती पण काही बोलतही नव्हती.

एक दिवस सकाळी यशवंत जोराजोरात रडू लागला. नवरा का रडतो तिला कळेना, तर यशवंतच तिच्याकडे आला आणि म्हणाला, “सरिता आये बोलणा नाय तिका काय झाला ता तरी बघ. बेगीन चल तिचा काय खरा दिसणा नाय.”

आईलेकानी छळ करूनही, मागचा पूढचा विचार न करता ती तिच्या खोलीत गेली. सासू निपचित पडली होती, तिचे ओठ थरथरत होते. तिला काहीतरी सांगायचे असावे पण ती बोलू शकत नव्हती. तीचा चेहरा वेडावाकडा झाला होता. ती समजुन चुकली. सासूला अर्धांगाचा झटका आला होता. तिने तिचे हातपाय चोळण्याचा प्रयत्न केला, ती नवऱ्याला म्हणाली, “रवी भावोजीक बोलावून आणा, बघू ते काय म्हणतत ता?”

रवी आला, तेव्हा ती सासूला चमच्याने पाणी भरवण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. तोंडातून पाणी खाली ओघळत होते. सासू तिच्याकडे एकटक पहात होती, तिच्या डोळ्यांना धार लागली होती. तिने सासूच्या कपाळावर हात फिरवला. ती सासूला चमच्याने पाणी भरवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होती. पाणी बाहेर ओघळून पडत होते. सासूने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिले आणि प्राण सोडला. सुनेला छळल्याची तिला शिक्षा मिळाली. यशवंत जोरजोराने रडू लागला. “आये, माका सोडून कित्याक म्हणान गेलस? आता मी कोणाकडे बघू?” त्याला काही सुचत नव्हते.

सारिताने त्याची समजूत घातली, त्याला धीर देण्याचा तिने प्रयत्न केला. शेजारच्या निकामाना आपल्या मुलाला, विजयला आणायला सांगितले. नवऱ्याच्या नातेवाईकांना बोलावण्यास सांगितले. यशवंत बाबत जी गोष्ट त्यांच्या कानावर पडली होती त्यामुळे कोणी नातेवाईक येण्यास उत्सुक नव्हते. कसेंबसे आठ दहा लोक जमले. शेजारचे निकम विजयला घेऊन आले. कसेबसे सासूचे कार्य तिने पार पाडले, ती पुन्हा तिच्या खोलीत राहायला गेली. नवरा यशवंत कळवळून तिला म्हणाला, “सरीता तूझी माका गरज आसा, तू वेगळी रवा नको. घरात रव. ती त्याच्यावर रागावली, “तुम्ही माका काय खेळणा समजलास? गरज वाटली तर खेळला, नाय त भिरकावून दिला! माझी काय एक चूक नसता माका घरा बाहेर काढलास मा, मग आता मी त्याच घरात रवा कित्याक? तुमचो मार खाऊक?” तो तिच्या समोर शरण गेला, “बाय माझे, मी चुकलंय माका माफ कर. तुका करुची ती शिक्षा माका दी, पण घर सोडून जाव नको.आऊस गेली आता माका तरी कोण हां”

ती ठाम राहिली, “इतको छळ केलास तेवा नाय आठवलय मा, आऊस गेल्यावर मी व्हयी झालयं. आता या घरात माका रवानसा वाटणा नाय, ह्या घर माका माझा वाटणा नाय, तुमका येवचा असला तर तुमी खोलीत येवा. माका जमात तशी तुमची सेवा करीन.”

त्याने तिला खूप समजावले पण काही फायदा झाला नाही. थोडे दिवस तो घरात एकटा राहिला पण रात्र झाली की घर खायला उठे, त्याला नीट निज येईना. शेवटी त्याच पिणे वाढले, एवढे की कधीकधी तो रस्त्यात कुठेही पडून राही. तिलाही त्याची दया येत होती,तो तिच्या कुंकवाचा धनी होता पण त्याचे दुर्गण आठवले की तिला त्याची शिसारी येई.

एक दिवस नशेत तो तिच्या पाया पडला. “सरिता माका माफ कर मी शाण खाल्लय, माका माफ करं, घरात चल.” सरिता त्याची असहाय्य स्थिती पाहून हेलावली. तिच्यावर प्रचंड अन्याय करूनही तिने त्याला माफ केले. हीच ती स्त्री मधील ममता, आत्मीयता, समर्पण वृत्ती.

कोणतीही स्त्री, नवऱ्याने तिला कितीही अपमानास्पद वागणूक दिली तरी जगाला कळू देत नाही किंवा त्याची निंदाही करत नाही. यशवंत धोरणी होता,आई असेपर्यंत सर्व आयते मिळत होते. यापुढे सर्व स्वतः करून खावे लागणार शिवाय एवढ्या मोठ्या घराची साफसफाई कोण करणार? म्हणूनच त्यांनी बायकोपुढे नमते घेतले. ती त्याला म्हणाली, “तुमी आणि तुमच्या आवशीन माझा जगणा नरक करून टाकला तरी मी तुमका माफ करू, माका जिती जाळण्याचो प्रयत्न केलास त्याचा काय?” “बाय माझे मी आवशीचा ऐकून मँड झालय, माझी चूक झाली मी कबूल करतय. तुझ्यावर खोटो आळ घेतलय,आवशीक आपल्या भाचीक आणुची होती. आता माझ्या मनात कोण ऐक नाय.”

“मुत पितास आणि तुमची बुध्दी भ्रष्ट जाता, ता आधी बंद करा, ता बंद केलास तर मी विचार करीन.” “सरिता आवशीची आण घेऊन सांगतय आजपासून दारू सोडलय, परत मी पिताना बगलस तर माका जुती मारून हाकव पण तू घराक चल.” तिने शेजारच्या दोन तीन वयस्कर माणसांना बोलावून आणलं आणि त्याला त्या काळ्या गाईची शेपटी धरुन शपथ घ्यायला लावली. पोलीस पाटील गावडेंच्या उपस्थितीत तिने घरात पाय ठेवला. त्यांनी यशवंतला समजावले, “सावित्री सारखी शुध्द आचरणाची बायको मिळान जर तुका पून्हा दुर्बुद्धी सुचली तर मात्र तुझी धडगत नाय या समजून चल. पुन्हा तुझी तक्रार येता कामा नये.” यशवंत त्यांच्या पाया पडला, बायकोची सर्वासमक्ष त्यांनी माफी मागितली आणि तिने मोठ्या मनाने त्याला माफ केलं.

हळूहळू तिच्या संसाराची गाडी रुळावर आली.अर्थात तिच्यात मनावर झालेल्या जखमा कधीही भरून येणार नव्हत्या. विजय लहान होता तेव्हा त्याला भेटण्यासाठी ती दर महिन्यात जात असे. त्याला मोठ्या सुट्टीत घरी आणत असे. तो घरी आला की तिला प्रश्न विचारे, “माझे बाबा खय हत ?” त्याला प्रश्न पडे एवढे मोठे घर असताना आई गुरांच्या गोठ्यात का राहते? मग त्या मोठ्या घरात एक पुरुष राहतो तो कोण? ती यशवंतकडे बोट दाखवून म्हणे, “त्या घरात रवता तोच तुझो बापुस पण तो तुका घेवचो नाय. तो तुका बघून घेणा नाय. तू आपलो चार हात दूर रवं”


हे कळल्यापासून त्याला बापाची घृणा वाटू लागली. आधी तो घरी यायला उत्सूक असे पण जेव्हा वस्तुस्थिती समजली की आपल्या वडिलांनी आपल्याला जन्मापूर्वीच नाकारले होते, त्याने घरी येणे बंद केले. आईवर त्याचे नितांत प्रेम होते पण आईने निमूट अन्याय सहन केला हे ऐकून त्याचे रक्त तापत असे.





तिने मात्र सासू वारल्यानंतर नवऱ्याची हलाखीची परिस्थिती पाहून थोडे नमते घेतले कसेही असले तरी तो तिचा नवरा होता तिच्यासाठी तो सात जन्माचा सोबती होता, असा तिचा समज होता. कित्येक वर्षे अन्याय सहन करूनही नवऱ्याला माफ केले. नदी जशी तिच्या प्रवाहात आलेल्या गढूळ ओढ्याला सामावून घेते पुन्हा प्रवाहित होत स्वच्छ होते तसे तिने पूर्वीचे भोग विसरून जगायचे ठरवले. त्याच्याशी जुळवून घेतले. दुरावा संपला. पुरुषी अहंकार आणि संशयी वृत्तीने तिचे जगणे नरक बनले होते पण यशवंतचे, आईचे छ्त्र हरवले आणि त्याचे डोळे उघडले. तिच्या मनाने यशवंतला माफ केले. नवरा आणि सासू यांनी अन्याय करूनही तिने नवऱ्याला स्वीकारले.

क्रमश:

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar