सरिता भाग 4
काळ हेच दुःखावर औषध असते. वर्षभर यशवंत तिला घरात राहायला जाऊ नाहीतर घुशी आणि उंदीर घराची वाट लावतील अस सांगत राहिला समजावत राहिला, पण ती बधली नाही. हळू हळू यशवंतला तिच्या स्वच्छ मनाची खात्री पटली. तो संसारासाठी कष्ट करू लागला. दिवसभर दोघे शेतात राबू लागले. त्याची शिवा-जीवाची बैलजोडी त्याला साथ देत होती. त्याने दुभती म्हैस विकत घेतली. तो तिच्या घरकामातही मदत करू लागला. तिच्यावर पूर्वीप्रमाणे जीव टाकू लागला. यशवंतने आता चाळीशी गाठली होती. तो लाडात असला की म्हणे,” सरे आपली खुशाली घेऊक आपणाक एकतरी पोरगी व्हयी,आपण तिका शीकवू मॅडम करू.” ती म्हणे, “या वयात पोरगी झाली त लोक हसतीत, म्हणतीत दोघावं खुळावलीहत.”
तो मात्र तिच ऐकायला तयार नव्हता. “कित्याक हसतीत, कोणा कोणाक उसरा पोरा होतत, तेतुर हसण्यासारा हां काय?” त्याने तिला लकडा लावत आपला हट्ट पुरा केला आणि ती नको म्हणत असतांना उशिराने तिला दोन जुळ्या कन्या झाल्या. यशवंतला खूप आनंद झाला. पाठचं सगळं विसरत त्याने त्यांचा बारसा धुमधडाक्यात केला. हळूहळू मुली मोठ्या होत होत्या. मुलींच्या बाललीलात रमून गेला.
तिला मात्र विजयच बालपण, त्याच्यावर झालेला अन्याय आठवायचा आणि ती दुःखी व्हायची. विजयने घरी येणं कधीच सोडून दिलं होतं तरीही कधीमधी विजयच बापा बरोबर भांडण झालं आहे आणि विजयच्या हातुन बापाचा खून झालाय अस स्वप्न तिला पडायचं आणि ती घामाघूम होत झोपेतून जागी व्हायची. देवाला साकडं घालायची हे महादेवा माझ्या मुलाच्या हातून अस वाईट साईट काही होऊ देऊ नको. निरागसपणे बाजुला शांतपणे झोपलेल्या मुलींना पाहिलं की ती पाणी पिऊन झोपी जायची.
सरिताने नवऱ्याशी जुळवून घेतले हे रवी आणि त्याच्या बायकोला मान्य नव्हते. इतका छळ सोसल्यावर ती त्याच्याशी पुन्हा संसार करेल याची त्यांना खात्री नव्हती. त्या दोघानी तिच्यासाठी अनेकदा यशवंतच्या शिव्या खाल्ल्या होत्या. तिच्यावर झालेल्या अन्यायाला त्यानीच वाचा फोडली होती. ती आपला अपमान विसरून यशवंतला जवळ करेल अस कधीही वाटलं नव्हतं म्हणूनच त्यानी सारिताशी संबंध तोडले. सरीताला खूप वाईट वाटले. ज्यांनी तिच्या वाईट दिवसात तिला आधार दिला त्यांच्यापासून दूर राहणे तिला असह्य होते पण आता मार्ग बदलला होता. तिच्या मुली रवी निकामाना मामा ,मामा म्हणून हाक मारत, तो ही त्यांचे लाड करत असे पण ती मात्र त्यांच्या प्रेमाला पारखी झाली ती झालीच.
जूळ्या मुलींपैकी निला व्दाड होती. सतत आपला हट्ट पुरवून घ्यायची. निलाच्या मागोमाग तासाभराने जन्मलेली शमा मात्र नावाप्रमाणेच समजुतदार होती. दोघी मोठ्या झाल्या तशा एकत्र ,एकाच वर्गात जाऊ लागल्या. यशवंत आता मनापासून शेती करत होता. मुलींची काळजी घेत होता. त्यांना काय हवं, नको ते पहात होता. पाहता पाहता दोन्ही मुली चौदा वर्षांच्या झाल्या. दोघीही अंगाने उफाड्याच्या असल्याने वयापेक्षा मोठ्या वाटत होत्या. सरिताला वाढत्या वयाच्या मुलींची या चिंता वाटू लागली. त्यांना न्हाणी आणि झोपण्याची खोली हवी अस प्रकर्षाने वाटू लागल. खर तर तिला घरात राहायला जायची इच्छा नव्हती पण यशवंत सतत त्या घराविषयी चिंताही व्यक्त करू लागला. तो तिला म्हणाला, “गो आऊस वारली त्याका पंधरा वर्षा उलटली, घराची उस्तावारी केलीहा नाय, लक्ष दिलो नाय तर घर कपळावर पडतला. तिचा नाईलाज झाला तिने सासूच्या त्या शापित घरात जिथे तिचा छळ झाला होता तिथे जायचा निर्णय घेतला.
तब्बल सोळा वर्षांनी ती पुन्हा घरात राहायला गेली. घराची दैना झाली होती. ते निटनेटक करायला तिला सहा महिने लागले. आता तिची आर्थिक स्थिती सुधारली. दरम्यानच्या काळात विजयचे शिक्षण पूर्ण होऊन तो एका कंपनीत कामाला लागला होता. आई भेटायला आली की तो आपल्या बहिणींबद्दल विचारपूस करत असे पण त्याला त्यांच्या बद्दल ओढ किंवा आपुलकी नव्हती. ज्या माणसाने आपल्याला जन्मताच नाकारले त्या माणसाला तो बाबा म्हणायलाही तयार नव्हता. बापाने मुलींवर मनापासून प्रेम केले. सरितानेही मुलींना आपल्या जीवनात काय घडले त्याची वाच्यता कधीच केली नाही.
affiliate link
त्या थोड्या मोठ्या झाल्यावर इतर मैत्रिणीकडून, त्यांना मोठा भाऊ असल्याचे समजले पण तो घरी का येत नाही ? ते कधीच कळले नाही. वेळोवेळी त्या आईला आपल्या कधीही न पाहिलेल्या भावाबद्दल विचारत पण आई फक्त डोळे गाळत राही. गोळवण येथील शाळा तो पर्यंत सातवी पर्यंत झाली होती.त्यांचे पुढील शिक्षण कट्ट्यावर सुरू झाले. मुली मोठ्या झाल्या झाल्या आणि तिला घरकामात मदत करू लागल्या. सरिताला कृषी अधिकारी भिशे यांच्याकडून पोल्ट्री फार्म बद्दल माहिती मिळाली. त्यासाठी अनुदान मिळाले. स्वतःचे शेतभात,वाडी सांभाळून सरिताने पोल्ट्री फॉर्म सुरू केला.
नवरा तिला कामात मदत करत होता. दर सहासात आठवड्यांनी हजारदीड हजार कोंबड्या विक्रीस जात होत्या. नवीन बँच येत होती, त्यांची इंजेक्शन, त्यांचे खाणे, खुराड्याची स्वच्छता आणि विक्री कामाचे व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागत होत्या. सरिता हे सगळ काम लिलया पेलत होती. यशवंत खुराड्यातील शीट आपल्या शेतासाठी वापरून कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून कांदा पात, मुळा अशी भाजी निर्माण करत होता
या साऱ्या वैभवाच क्रेडिट यशवंत आपल्या पत्नीला देत होता. तिचे गुणगान येणा जाणाऱ्याकडे करत होता. कधीकाळी याच माणसाने आपल्या बायकोला संशयाने लाथा बुक्क्यांनी मारल होत हे सांगूनही कोणाला पटलं नसत. माणूस एवढा बेरकी असतो, सरड्यासारखे रंग बदलू शकतो हे तिने अनुभवलं पण मुलींसाठी ती गप्प होती.
मुली मोठ्या झाल्या त्यांना सांगून मागणी येऊ लागली. तिने स्वतः स्थळं पाहून दोन्ही मुलींची लग्न ठरवली .दोन्ही लग्न एकाच मांडवात केल्यास खर्चात बचत होईल असा विचार करून तिने होणाऱ्या जावयांना विनंती केली. जावयी मोठ्या मनाचे होते, त्यांनी मानपानाचा आग्रह न धरता तिच्या म्हणण्यास होकार दर्शवला. दारातच मांडव घालून तिने लग्नाचा बार उडवून देण्याचे ठरवले.
तिने गोव्यात मुलाची भेट घेऊन त्याला ही आनंदाची बातमी ऐकवली. त्याने या लग्नासाठी आठ,पंधरा दिवस अगोदर मदतीसाठी यावे अशी विजयला गळ घातली. तो मात्र आपल्या मताशी ठाम होता, “आये माका माफ कर,मी काय तुझ्या मदतीक येऊ शकणय नाय. मी काय तरी तजवीज करून तुका धाविस हजार मदत करतय पण माका लग्नाक येवची गळ घाला नको.”
तिचे डोळे भरून आले,”रे तुझ्या भैणींनी तुझा काय केल्यानी? तुका काय काढुचो तो राग बापाशीवर काढ पण भैणींका आचवू नको.” तो मान खाली घालून रडत राहिला,पण लग्नाला येण्याबाबत त्यानी तिला शब्द दिला नाही. ती बिचारी हिरमुसली होऊन परतू लागली तस तो तिचा हात घट्ट धरत म्हणाला. “आयेsss! मी काय करू गे? माका थय येईनसाच वाटणा नाय, न्हान असतांना बापाशीन मायेन कधी जवळ घेऊक नाय, कधी विचारपूस करुक नाय, तुच सांग माका गोडी कशी लागतली?” तिला ते पटलं,त्याच खरंच होतं. तो शाळेला सुट्टीत असतांना घरी यायचा, पण बापाने कधी त्याला जवळ घेतल नव्हत. कधी मायेने डोक्यावरून हात फिरवला नव्हता, त्याला गोडी लागणारच कशी? ती काही न बोलता त्याच्या गालावर हात फिरवून परत फिरली. मन आक्रंदत होत पण उपाय नव्हता.
लग्नाच्या आठ, दहा दिवस आधी पोस्टमन रजिस्टर पार्सल घेऊन आला. तिने पोस्टमन भाऊंना विचारले,”भाऊ कोणाचो लखोटो हां? आमका कोणाचो लखोटो येतलो,आमचा ममयीत हा कोण?” पोस्टमन हसला,”गे वयनी तुझ्या झिलाचा टपाल हा, झिलान तुका पंधरा हजार धाडलेहत, झिल व्हयो तर असो. नायतर आमची पोरा, ममयीत हत पण मागीतल्याशीवाय कधी चार रूपये बापाशीक धाडणत नाय. आता आधी चा ठेव आणि ह्या पार्सल बगून घे. व्हया तर माझ्या समक्ष फोडून बग आणि मोजून घे, मगे उगाच झंझट नको, बरोबर?” तिने शमाला हाक मारली, “गो शमा,हय ये,हे काका काय सांगतत ता बग मी चा ठेवतय.”
निला आणि शमा दोघीही आल्या.परब पोस्टमन विचारू लागले,” गो तुमच्यातली शमा कोण? दोघी एकमेकीकडे बोट दाखवू लागल्या, तशी सविता मुलींना ओरडली, “गो तुमची काय अक्कल पेटली हा,काकांची मस्करी कसली करतास? आधी सांगलेला काम करा.” शमाने ते जाडजूड पाकीट ब्लेडने फोडून त्यातील नोटा निलाकडे दिल्या. निलाने त्या नोटा मोजायला अर्धा तास लावला असता, पोस्टमन काकांनी त्यांना नोटा भराभर मोजून दाखवल्या. हिरवट रंगाच्या हजारच्या चार नोटाही त्यात होत्या. पोरींनी पहिल्यांदाच हजारची नोट पाहिली असावी. परबांच्या हातावर सरिताने विसची नोट ठेवली आणि चहा देता देता म्हणाली, पोरींचा पुढल्या महिन्यात लगीन धरलय,लग्नाक येऊक व्हया, वैनीकव सांगा बोलवलय म्हणान.” परब त्या पोरींच्या डोक्यावर आशिर्वाद देण्यासाठी हात धरत म्हणाले, “आवशीन खूप हाल अपेस्टा सहन करून तुमका वाढवल्यान तिका सुखी ठेवा आणि सुखात रवा.”
लग्न आठ दिवसांवर आलं तसं सरिताने मुलाला एसटीडीत जाऊन फोन लावला पण मुलाचं आपल एकच, मी येवचय नाय. माझो बहिणींवर राग नाय. तु माझी वाट बघा नको. ती एसटीडीवर ढसाढसा रडली पण तिला मुलाचा स्वभाव माहिती होता. त्याच्या मनात बापाचे विष खोलवर रूजले होते. चुक असलीच तर बापाची होती.
यशवंतने गोव्यात जाऊन मुलाची माफी मागण्याची तयारी दाखवली पण सरिताला मुलाचा स्वभाव माहिती होता. ठरल्या मुहूर्तावर लग्न झाली, तिचा भाऊ आणि वहिनी आली. चार दिवस लग्नात वावरले पण ते यशवंतशी एक शब्दही बोलले नाहीत. तिचे जावई बऱ्या नोकरीला होते, एक जावई कणकवलीत बँकेत कारकून होता तर दुसरा गोव्यात फॅक्टरीत कामाला होता. मुली अधून मधून तिला भेटून जात. उशिराने का होईना देवाला तिची दया आली होती. सगळं काही सुरळीत होत होतं.
विजय गोव्यात नोकरी करून पुढेही शिक्षण घेत होता पण गावी यायचे नाव घेत नव्हता. आईने स्वतः जाऊन त्याची खूप समजूत घातली पण तो ऐकायला तयार नव्हता. शेवटी ती निर्वाणीच म्हणाली, “विजय माका नवऱ्याकडसून तर सुख मिळुकच नाय पण वाटला होता माझो झील माका बरे दिवस दाखवीत. पण तू घरी येवचा टाकलस. तुका माझीव दया येणा नाय? बहिणींका भेटीन सा वाटणा नाय?, दोघीव तुझी आठवण काढतत त्यांका काय सांगू?” तो म्हणाला, “आये मी त्यांका त्या काळ्या आसत की गोऱ्या बघुकव नाय, त्यांच्या विषयी माझ्या मनात ना प्रेम ना मत्सर. मी काय करू? माका त्यांका भेटीन सा नाय वाटणा.” सरिता म्हणाली, “रे तुझ्या सख्या बहिणी हत, तू त्यांचो एकटो भाऊस. तू त्यांका विचारलं नाय त आमच्या पाठी त्यांका कोण विचारतलो? आम्ही जो प्रपंच उभारलोहा त्याचा आमच्या पाठी काय होतला?
“औशी ता माका काय म्हाईत नाय, पण त्यांच्या विषयी माका प्रेम वाटणा नाय. असा कसा? तुका काय समजुचा ता समज पण मी घराकडे येणे शक्य नाय.” ती रडू लागली, तुका बाप नको मी समजू शकतय पण तुका आऊस नको बहिणी नको मग व्हया तरी कोण? तुझा प्रेम माझ्या कर्मात नाय त्याका काय करू.” ते ऐकून तो गहिवरला, पण आईला म्हणाला,” ह्या गावंड्यात माका रवाक जमाचा नाय. तुच गोव्यात रवाक ये. गावाकडे देखभाल करूक आपण कोणी तरी बघू. बापाशीक मात्र मी माफ करुचय नाय, त्याचा तोंड बघीन सा वाटणा नाय.” ती रागावली,” रे मेल्या बाप न्हय तो? चुकलो असात पण जनम तर दिल्यान ना! “
तो रागाने म्हणाला, “ज्या माणसान तुका खोटो संशय घेऊन घरातून भायली केल्यान,माझ्या जन्मा वक्ताक बेवारस असल्यावरी मांगरात ठेवल्यान त्याका मी माफ करू शकणय नाय. घरदार असान माका वसतिगृहात शिक्षण घेवची पाळी त्याच्यामुळे इली, हे भोग पाठी लावल्यान. तुका घरातून भायली केल्यान त्याका मी बाप म्हणू तरी कसो? त्या पेक्षा आमचे साटम मास्तर बरे त्यांनी माका मार्गाक तरी लावल्यानी. आये तु कायेव सांगलस तरी मी त्यांका माफ करणे शक्य न्हय.”
सरिताचा नाईलाज झाला, ती मुलाला म्हणाली, “रे कसो असलो तरी तुझो बाप तो, ह्या कुंकू त्याच्या नावानं मी भरतय, त्याका टाकून मी तुझ्याकडे रवाक कशी येव? लोक माझ्या तोंडात शाण घालतीत. तू शिकलो सवरलो आसस जरा जाणतो होऊन विचार कर, त्यांका तरी आता कोण आसा. त्यांका माफ कर.”
त्याच्या लक्षात आले की आई आता, बापाला एकट सोडू शकणार नाही. तो तिचा हात हातात घेत म्हणाला,”औशी माका माफ कर, माझो नाइलाज हा. तू त्याच्या शिवाय रवा शकणस नाय आणि माका त्याच्या बरोबर रवणे शक्य नाय, तू माका विसरून जा, नाय तरी बापुस माका आपलो झिल समजणा नाय. माका विसरून जा,असा समज की तू माका जन्म देऊक नाय. पुन्हा माका भेटाक कधीच येव नको. तू इलस तरी मी तुका सापडाचय नाय.” त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा गळत होत्या. तिचाही कंठ भरून आला. तिने त्याला मिठीत घट्ट धरले,गदगदलेल्या स्वरात ती त्याला म्हणाली. “रे बाबल्या नव महिने तुका पोटात वाढवलय,अन्न नव्हता तरी माझ्या जीवाचा रान करून जनम दिलय, मोठो केलय, पण आता तुच पाठ फिरवतस ना? फिरव. माझो न इलाज झालो म्हणान हय वसतिगृहात ठेवलंय. तू काय माका नको होतस?” साटम गुरुजी म्हणाले,” गे ह्याक थय धाडलस तर कल्याण होईत. म्हणानच ना माझ्या काळजचो तुकडो वेगळो केलंय! तूका घरी नाय येवचा मा, येव नको पण माका भेटूक मना करू नको. मी दुरसून तुका बघून वाटेक लागीन,माका तुझा काय नको. तू जय रवशीत थय सुखी रव.”
ती उठली झपझप चालू लागली तिला कळेना त्याला वाढवण्यात तिची काय चूक झाली. एकीकडे नऊ महिने गर्भात वाढवलेला मुलगा तर दुसरीकडे ज्याच्या बरोबर सप्तपदी चालली आणि त्याच्या नावान कुंकू लावलं तो नवरा तिने नक्की कोणाला जवळ कराव तिला कळेना. तिला दोघेही तितकेच प्रिय होतो. नवऱ्याने केलेला अत्याचार ती विसरू शकत नव्हती हे खरं होताच पण यशवंत आता थकला होता आणि तिच्या सोबतीची त्यालाही गरज होती. त्याच द्विधा अवस्थेत ती फर्लांगभर अंतर चालून गेली. मुलगा बापाला माफ करायला तयार नाही आणि ती नवऱ्याला विसरायला तयार नाही. नक्की तिने करावे काय?
‘प्रेमाची ताकद मोठी खरी पण प्रेमाची कट्यार तितकीच संगीन असते.’ तिची अवस्था विभोर झाली, ती पाठी वळून त्याला पाहत होती. पाहता पाहता ती अडखळली आणि तिथेच कोसळली. तो दुरून पहात होता, तो धावत आला त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती मलूल पडली होती. कदाचित दुःख सहन न झाल्याने किंवा मनाचा कोंडमारा झाला असल्यानी तिला जोराचा ह्दयविकाराचा झटका आला असावा.
त्याने जोराचा हंबरडा फोडला,”आये,आये माका सोडून जाऊ नको, आये माका तू व्हयी आसस, आये मी तुझ्या बराबर गावाक येतंय. मी तुका काय एक मागणय नाय, आये उठ ना! पण ती दूरच्या प्रवासाला निघून गेली होती. कधीही परत न येण्यासाठी. सरिताने नवऱ्याला आपली ताकद देऊन चांगला माणूस बनवले पण मुलाच्या मनाचं कोड तिला सोडवता नाही आलं. तो तिला मृत्यू समयीही जगण्याचं समाधान तो देऊ शकला नाही.तिच्या जीवनाची शोकांतिका झाली. विजय या घटनेने हतबल झाला. काय करावे ते सुचेना. आईचे शव घेऊन त्याने तिला मुठमाती दिली आणि गावाचा शेवटचा निरोप घेतला.
यशवंतने विजयला समजवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. त्याची माफीही मागितली पण यशवंत बधला नाही. ज्याने आईचा छळ केला, आपलं बालपण हिराऊन घेतलं आणि अकाली प्रौढत्व दिलं त्याला बाप म्हणायला विजय तयार नव्हता. बहिणींनी त्याला आपल्याला माहेर रहाव म्हणून तरी त्याने गाव सोडू नये असा आग्रह धरला पण विजयला आता कोणत्याच मोहात अडकायच नव्हतं. त्यांनी बहिणींची समजुती घातली आणि तो मोहाचे पाश तोडून निघून गेला. सरिता आपल्या नवऱ्यासाठी सावित्री प्रमाणे वागली आणि दूरच्या प्रवासासाठी निघून गेली कधीही न परतण्यासाठी. यशवंतच्या गैरसमजुतीने सरितेचा बळी घेतला आणि विजयलाही पोरकं केलं.