सुखाच्या शोधात
नक्की कशात सूख आहे? आई वडीलांच्या छत्राखाली सिक्युअर जगण्यात, की शिक्षण संपवून कोणतीही अधिकची जबाबदारी न घेता हँगआऊट करण्यात? की मग कोणाच्या तरी प्रेमात पडुन विरहात जळण्यात आणि ती/तो नजरेस दिसला की आनंदून त्याला/तिला मिठी मारण्यात? बालपणाचे दिवस सुखाचे असं आपण ऐकलय पण हल्ली अवघ्या सहा वर्षाच्या मुलालाही राग येतो आणि तो घरातून निघूनही जातो. मग ही लहान मुलं ही सुखी आहेत म्हणायची का? हल्ली तर इयत्ता आठवीच्या मुलांना मोबाईल घेऊन द्यावा लागतो तो ही ब्रँडेड, नाही घेऊन दिला तर ही मुलं पालकांना ब्लॅकमेल करतात. काही तर इतकी एँग्रेसिव्ह होतात की पालकांवर हल्ला करतात. मग ही लहान मुलं आणि त्यांचे पालक सुखी आहेत का?
आता तर मुल सुख शोधण्यासाठी लहान वयातच मैत्रीण किंवा मित्र शोधतात, घरी न सांगताच फिरायला जातात. घरातून पळूनही जातात? का? पालक म्हणून आपण कुठे अपुरे पडतो. त्यांना समजून घेण्यात काय चूक होते. कॉलेजला जाणारी मुले मित्रांच्या सोबतीने ड्रग्जचा शोध घेतात. ज्या काळात यशासाठी झटायचे त्या काळात सुखाच्या शोधत सिगारेट, दारू आणि त्यापुढे जाऊन ड्रग्ज हे अभद्र व्यसन कशापायी? सुखाची व्याख्या या मुलांना कोणी सांगेल का? या सुखाच्या शोधत ते आपल्या पालकांना दुःखात लोटतात त्याचे काय?
लग्न झाल्यावर जीवाभावाचं,आपलं म्हणावं असं कुणी जीवनात आल म्हणून सुखाचे दिवस आले अस समजण्यात सूख आहे की मग चार दिवस हनिमूनला गेल्यानंतर जे अद्वैत सापडल ते कुठे हरवू नये म्हणून तुझ्यासाठी काय वाट्टेल ते म्हणत तिचा प्रत्येक शब्द झेलण्यात सूख आहे? स्वतः च्या मुलांना जन्म देतांना होणाऱ्या वेदना सहन करतांना होणारे सुख मोठे की तो तिच्या काळजीने झुरतोय हे समजल्याने, त्याला मी हवी आहे ची भावना दाटून आल्याने होणारे सुख मोठे?
बाळ पहिल्यांदा तिच्या हाकेसरशी हुंकार भरतो हे पाहून तिला होणारा आनंद मोठा? की ते बाळ उभं राहण्याच्या प्रयत्न करतांना पाहण्याच भाग्य मोठं ? नोकरी लागल्यानंतर आईच्या हाती अँपॉईंयमेंट पत्र दिल्यानंतर आनंदाने तिचे पाणावलेले डोळे पाहताना होणारे सुख मोठे? की मग एखादे अवॉर्ड मिळाल्यानंतर ते आई किंवा बाबांच्या हाती देऊन त्यांना केलेल्या नमस्कार किंवा मारलेल्या मीठीतील सुख मोठे? काहीच तर कळत नाही.
मित्रांनो सुख हे सापेक्ष आहे. ते कोणाला कोणत्या गोष्टीने होईल किंवा मिळेल सांगण तसं अवघड आहे. कोणाला बालपणातील गोष्टी आठवल्यानंतर किंवा बालपणीची मैत्रीण कित्येक वर्षांनी भेटल्यानंतर होणारा आनंद मोठा असू शकतो किंवा आपल हरवलेल बाळ पुन्हा सापडलं याचा आईला होणारा आनंद आणि त्याच सुख मोठं असू शकतं. सतत डाव हरणाऱ्या जुगाऱ्याला एखादा भला मोठा डाव जिंकल्यावर होणारा आनंद,मिळणारे सुख याच मोजमाप करता येईल का? सुखात कोणीही वाटेकरी व्हायला तयार असतो तसा दुःखात कोणी वाटेकरी होईल का? होईल का? नाही ना!
विजय खासदारदारकी जिंकल्याचा असो, की ग्रामपंचायत जिंकल्याचा असो, आपला मित्र जिंकलोय इतकं ओझरते कानावर पडले तरी जल्लोष सुरू होतो, आणि मग त्याची वाजतगाजत मिरवणूक काय, फटाके काय? ते यश कसं साजरे कराव ते जस त्याच्या सहकाऱ्यांना कळत नाही तसं घरकारभारणीलाही कळत नाही. तिचे डोळे आनंदाने पाझरू लागतात. पण दुर्दैवाने अपयशाचा सामना करावा लागलाच तर? त्याच्या बंगल्या समोर सन्नाटा होतो. जणू नुकतच कोणी मेल असावं तेव्हा सुखाचे वाटेकरी हजार दुःखाला ना आई, ना बाप.
सध्या प्रयागराज येथे महाकुंभ निमित्ताने करोडो लोक हजेरी लावत आहेत आणि एवढा मोठा समुह एखाद्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याचा जागतिक विक्रम आता भारताच्या नावावर नोंदवला जात आहे. या महाकुंभ यात्रेतून राज्यात ३,००,००० करोड रूपयांची आवक झाली आहे. आदित्य योगी आणि पंतप्रधान मोदी प्रचंड आनंदी आहेत पण काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरीत १९ मृत्युमुखी पडल्याची बातमी पहिली,त्यापूर्वी मौनी अमवासेला प्रयागराज येथेही त्रीवेणी संगमावर ३५ जण चेंगरून मेले. ज्यांचे आप्त या अपघातात मेले त्यांच्या घरातील स्थिती कशी असावी? त्यांच्या दुःखाबाबत चार शब्दात दुखवटा व्यक्त करून महामहिम राष्ट्रपती मुर्मु आणि पंतप्रधान मोकळे झाले. पण या मृतांच्या कुटुंबांचे सात्वंन या कोरड्या शब्दांनी होईल का? जर कर्ता व्यक्तीच या अपघातात वारला असेल तर काय? घडलेल्या अपघाताबद्दल पंतप्रधान मोदींनी योगींना फारसे बोल लावले नाहीत पण हाच प्रसंग बाका असता, विरोधकांनी किंवा आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी पाठपुरावा केला असता तर मोदींनी योगींची पाठराखण केली असती, की हालात पे छोड दिया होता. किंवा मग योग्य नियोजन करता आलं नाही म्हणून जबाबदार धरत राजीनामा घेतला असता?
भारतात रोज कुठे न कुठे रेल्वे अपघात, रस्ता अपघात होत असतात. आपण त्या बातम्या पाहतो. क्षणभर वाईटही वाटतं पण क्षणभरच बरं का? या सततच्या बातम्या पाहून आताशा मृत्यू बाबत भय किंवा भीती नाही वाटत. वाईट वाटतं हे मृत्यू लोक स्वतः ओढवून घेतात. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात मोदी, मुर्मु, धनकड, शहा, फडणवीस, हेमामालिनी शाहीस्नान घेतांना आम्ही पाहतो. ती बातमी पाहिली की आमच्यात उत्साह संचारतो. माध्यमावर तेथीर दाखवली जाणारी साधू मंडळी पाहून आपल्याला तेथे जावेसे वाटते.
मग मिळेल त्या साधनाने जाण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करतो. पंतप्रधान, गृहमंत्री, राष्ट्रपती, मुख्यमंत्री यांची गोष्ट वेगळी आहे. त्यांना त्यांच्या अनुयायांना, आम्ही आध्यत्मिक धर्म पळाला हे दाखवायचे आहे.त्यांच्यासाठी प्रयागराज येथे जाण्यासाठी विशेष विमान,सुरक्षा व्यवस्था, शाही स्नानासाठी व्यवस्था आहे. तुमचे काय? खरच तुम्हाला या त्रिवेणी संगमावर स्नान करून सुखाची किंवा मोक्षाची प्राप्ती होणार आहे का? मग हा आटापिटा का?
शेळ्या मेंढ्या किंवा गाई म्हशी रेल्वे डब्यात कोंबून नेतात तसा प्रवास तुम्ही करता आणि जेथे तुमच्यापुर्वी पन्नास करोड स्नान करून गेले त्याच घाटावर जाऊन डुबकी मारून पवित्र होता. गंगेत डुंबावे मलाही वाटते पण अशा गर्दीत मुळीच नाही. जेथे स्वतःच्या जिवीताचा भरोसा नाही. कधी काहीही घडेल याची शाश्वती नाही अशा ठिकाणी सूख कसे मिळेल? आनंदी कसे वाटेल. नागपूरच्या निरी संस्थेने गंगा जल शुध्द आहे अहवाल दिला होता मात्र दोन दिवसांपूर्वी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण तपासणी आयोगाने गंगेच्या जलात,विष्ठा, हानिकारक जीवजंतू असल्याचा अहवाल दिल्याने योगीजी नाराज झाले आहेत ही बातमी आजच्या लोकसत्ता वर्तमानपत्रातच पहिल्या पानावर आहे.
गेले काही दिवस प्रयागराज येथे विविध पंथाचे साधू आणि साध्वी, त्यांचे अनुयायी पाहून आपण कोणत्या युगात वावरतो आहोत? तेच कळत नाही. ज्यांना प्रयागराज येथे भेट दिल्याने सूख ,समाधान लाभले त्यांच्या बाबत बोलण्याचा आपल्याला अधिकारच नाही. त्यांनी खुशाल त्या सुखात रममाण व्हावे. पण ही व्यवस्था पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आपण विचार केला आहे का? गेले चाळीस दिवस अहोरात्र ते प्रशासनाने दिलेली जबाबदारी पार पाडत आहेत. तुम्हाला असे खरेच वाटते का की ही सेवा ते भक्तीभावाने किंवा आनंदाने करत आहेत ? जे नजरेला दिसते ते खरे असेलच असे नाही. प्रयागराज येथे जाऊन आलेली कोणतीच व्यक्ती आपल्याला तेथे हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या सांगणार नाही. मान सांगावा जगात अपमान भोगावा मनात हेच खरं.
तेव्हा जे नजरेला दिसत नाही ते पाहण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला सत्य कळेल. पन्नास कोटी वेगवेगळ्या ठीकाणाहून आणि त्यात किमानपक्षी लाखभर नागरिक तरी वेगवेगळ्या रोगाची लक्षणे घेऊनच तेथे आले असावेत. साहजिकच याचा उपद्रव निरोगी नागरिकांना होणार की नाही? आपणच ठरवावे. तेथील नागा साधू त्यांचे चित्र विचित्र पोशाख, त्यांच्या करामती पाहून गुंग झालेले पर्यटक याचा माध्यमावर दाखवला जाणारा आवेश यामुळे त्याचा समाजमनावर परिणाम होणारच यात शंकाच नाही. प्रयागराज येथे त्रिवेणी संगमावर स्नान करून कोणते सुख मिळणार आहे? मोक्षप्राप्ती होईल म्हणजे नक्की काय ? यापूर्वी ज्यांना मोक्ष मिळाला ते सध्या कुठे राहतात? काय करतात? तेव्हा मनातून खुळचट समजूत काढून जर अपघात घडला नाही तर फक्त आनंद घेता येईल पण तो लाखोंच्या संख्येने जिथे स्नान करत आहेत त्या गढूळलेल्या पाण्यात नक्कीच नाही.
आनंदी असण्याचा आभास दिर्घकाळ टिकवणे कठीण असते. मला आठवते, परेल ब्रीज वरची चेंगराचेंगरी झाली आणि त्यात मृत्युमुखी पडलेले असहाय्य प्रवासी, मला आठवते काळूबाईच्या जत्रेत झालेली चेंगराचेंगरी. काळबाईच्या जात्रेला जातांना भक्त आनंदात होते. त्यांच्या सोबत मित्र ,मैत्रीणी असाव्यात. देवीचे दर्शन आणि मग जत्रेतील मौजमजा म्हणजे सुखच की पण अचानक गर्दी वाढली आणि कोणाच कोण कुठे हरवल कळेना? त्या गर्दीत, चेंगराचेंगरीत कोण मेलं कळलही नाही. ज्यांच्या बरोबर आलो त्यांचा पत्ताच नाही म्हटल्यावर मनात आशंकाच वादळ आल पण अचानक भेट झाली आणि डोळे पाणावले पण अस सुख सगळ्यांच्या वाट्याला आले असेल का?
काही वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने फायदेशीर चालवता यावे यासाठी मद्यार्क निर्मितीला शरदचंद्र पवार यांच्या काळात मंजुरी दिली गेली. साखर कारखान्यांना या योजनेचा फायदा झालाही असेल त्यांचा नफा वाढला पण ही दारू प्यायल्याने कुटुंब उध्वस्त झाली त्यांचे काय? द्राक्ष लागवड निर्णयाबाबत असेच झाले. द्राक्ष बागायतदार यांनी आपला माल मद्यार्क निर्मितीसाठी विकला ज्याच्या सेवनामुळे अनेक तरुण मद्यपी बनले . तेव्हा अशा कैक घटना सांगता येतील ज्यामध्ये वरकरणी फायदा किंवा सूख दिसत असले तरी अंतिमतः तो केवळ भ्रम आहे असे लक्षात येते.
संपूर्ण देशात हे चित्र असेच आहे, काही धेंड नदीच्या पात्राजवळ किंवा मोठ्या नाल्याकडे इमारत उभी करतात. लोक त्या नव्या इमारतीत रहायला येतात. काही कुटुंबाना ते त्या जागेतील रहिवासी असल्याने भरपाई म्हणून छोट्या घराऐवजी मोठे घर इमारतीत मिळते. आपल्या नशीबावर बेहद खूश असतात. सत्यनारायण घालून आपल्या नातेवाईकांना बोलवतात. त्यांनाही या कुटुंबाचा हेवा वाटतो अन अचानक नाला बुजवून बांधलेल्या त्या इमारतीवर संकट येत. धो धो पाऊस कोसळतो. आधी पाणी सोसायटीत घुसते. सगळीकडे दलदल निर्माण होते. लोक बिल्डरच्या नावाने बोटं मोडतात.
अशाच एखाद्या मोठ्या पुरात नाला भरून वाहतो. भर घालून बुजवलेला नाला आपली हद्द मोकळी करून घेतो आणि नवीन बांधलेली इमारत पुरात कोसळते. लोक मृत्युमुखी पडतात. बिल्डर पळून जातो. सुखाचा संसार दुःखात बुडतो तेव्हा फारच थोडे मदतीचा हात देतात. काही शेजारी किंवा नातेवाईक जे आधीच असुयेने जळत असतात ते मनात आनंदच व्यक्त करतात.
सुखाचा शोध ना कुणाचा लागला ना कुणाचा संपला . झोपू योजनेत ज्यांना चाळी ऐवजी ५००चौ.फुटाची घरे एकही दमडी न देता मिळणार असतील तर त्यांनी दुःखी का व्हायचं? पण एकदा जागा मोकळी करून बिल्डरच्या ताब्यात दिली की शुक्लकाष्ट काही केल्या संपत नाही. नवीन इमारत बांधायची असेल तर त्याचा आराखडा मंजूर करून घ्यायला पैसे द्यावे लागतात. तुमची त्या आराखड्याशी संबधीत कागदपत्रे परिपूर्ण असतील तरीही तुमच्या जवळून जोवर ‘प्रसाद’ पोचत नाही तो पर्यंत आशीर्वाद नाही चमत्कार नाही. ‘ काय द्या नी करून घ्या’ ही नवसंस्कृती झाली आहे. हे पैसे काही गुंड प्रवृत्तीचे बिल्डर या झोपडी मालकांकडे करतात तेव्हा त्यांना सुखाची किंमत कळू लागते.
दुर्दैवाने कधीकधी आम्हीच अतिउत्सुक असतो, आम्हीच पैसे देऊन झटपट काम करून घ्यायला उत्सुक असतो मग, ‘मिया राजी तो साहब की मर्जी’ या न्यायाने तुमच काम होते. ज्या कामाला, आठ दिवस लागणार असतील ते नैवेद्य दाखवल्यास आठ मिनीटातही होते. तेव्हा लाच देणे आणि घेणे हा शिष्टाचार झाल्यामुळे कोणालाच काही फरक पडत नाही. फक्त अशी लाच देणाऱ्या आणि घेणाऱ्या व्यक्तीने आपल्या मनाला विचारावे की हे योग्य आहे का?
आपल्यापैकी प्रत्येकजण आपले काम करून घेण्यासाठी, कधी ना कधी आपले काम झटपट व्हावे म्हणून किंवा रांगेत उभे राहावे लागू नये म्हणून स्वतः नकळत लाच देऊन मोकळा होतो. पण ‘करून सवरून मोकळा आणि मी नाही त्यातला.’ अशी आपली गत असते. मरता क्या नही करता?
दोन वर्षांपूर्वी घाटकोपर येथील भलेमोठे होर्डिंग्ज वादळात पडले आणि या होर्डिंग्जला महानगरपालिकेची परवानगी न घेता स्वतः च्या लाभासाठी परस्पर अनुमती दिल्याने रेल्वेत कमीशनर पदावर कार्यरत खालीद वादात सापडले. यांच्या बाबतीत जे घडले ते थोडक्यात सांगतो. त्यांनी घाटकोपर स्टेशनच्या हद्दीत एका जाहिरात कंपनीला जाहिरात फलक लावण्याची अनुमती दिली होती. दुर्दैवाने तो निट न उभारल्याने पडला. त्याखाली काही लोक चिरडून मेले. खालीद यांचे निलंबन झाले. मान मरातब धुळीस मिळाला. जे लोक त्यांना ओळखत होते. त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी उत्सुक होते ते दूर निघून गेले. सुखात सगळेच जवळ येऊ पाहतात दुःखात वाटेकरी कोणी नसतो.
महामुनी नारद यांना वाल्याकोळी यांनी वाटेत अडवले आणि तुझ्याकडे जे काही मौल्यवान असेल ते त्वरीत मला दे अशी मागणी केली तेव्हा नारदमुनी वाल्याला म्हणाले हे वाल्या मला द्रव्यासाठी अडवलेस त्याबद्दल मी नाराज नाही वाटमारी तुझा धंदा आहे,फक्त एक काम कर तुझ्या बायको मुलांना तू काय करून त्यांचा उदरनिर्वाह करतोस ते सांग आणि विचार, “तुम्ही माझ्या पापात वाटेकरी आहात का?”, “बघ काय उत्तर मिळते ते, ते ऐक आणि नंतरच माझा शिरच्छेद कर. तो पर्यंत मी कुठेही जाणार नाही.” वाल्या कोळ्याने नारदमुनींनी सांगितल्या प्रमाणे कुटुंबातील प्रत्येकाला विचारले, पुढे काय घडले ते आपल्याला ज्ञात आहेच.
आपल्या राहाणीमानाची कोणाशी तुलना करू नका, आपल्या पत्नीला आणि कुटुंबीयांना तुमच्या कामचे स्वरूप तुमची खरी स्वच्छ कमाई आणि तुमची औकात काय आहे? ते खरे सांगा. तुमच्यावर इतर कोणत्या आर्थिक जबाबदाऱ्या आहेत ते ही सुरवातीला सांगा म्हणजे पत्नी व कुटुंब खोट्या भ्रमात राहणार नाही. श्रीमंती चोचल्याची अपेक्षा करणार नाही. तुमच्या गरजा सिमित असल्या तर तुम्हाला गैरमार्गाने आलेले पैसे लागणार नाहीत आणि तुम्ही सुखी जीवन जगाल.
खालीद चांगले पोलीस अधिकारी आहेत असे मी समजत होतो, एकदा माझ्या मित्राचे पाकीट रेल्वेत हरवले तेव्हा त्यांनी मित्राला मदतही केली होती. दुर्दैवाने तेव्हा पाकीट मिळाले नाही पण त्यांची शोधकार्यातील तत्परता दिसून आली. आज परिस्तिथी बदलली आहे, ‘कोण होतास तु? काय झालास तु? अरे वेड्या असा कसा वाया गेलास तु?’ असे विचारण्याची पाळी त्यांच्या मित्रांवर आली आहे. यश पचवणे ही एक कला आहे, सुसंस्कृत माणसालाच ते साध्य होत.तुमचे दिवस चांगले असेपर्यंत सगळे खूषमस्करे तुमच्या सोबत असतील पण तुमचे वाईट दिवस सुरू झाले तर कुणीही तुमच्या सोबत नसेल. घर फिरले की घराचे वासे फिरतात म्हण आहे तीचा प्रत्यय अडचणीत नक्की येतो.
आजकाल अनेक लोकांना, “अरे मित्रा,मी अनंतम/पलावा/ रिजन्सी अशा मोठ्या कॅम्पसमध्ये फ्लॅट घेतला आहे, एकदा सहकुटुंब ये बघ कसा सजवला आहे तुला आयडिया मिळेल, अस सांगण्याची सवय असते. मोठा फ्लॅट घेतला की त्याच्या सजावटीसाठी खर्च ही मोठाच येतो. दर महिन्यात पगार बँकखत्यात जमा होताच फ्लॅट हप्ता, फर्निचर हप्ता, स्मार्ट टीव्ही, किंवा इतर डेकोरेटिव्हस याचे हप्ते कापले जातात. याशिवाय जे बँक क्रेडिट कार्ड दोघे वापरत असतात त्याची उधारी किंवा उच्च भाषेत क्रेडिट, डेबिट होते.मग प्रत्यक्ष खर्चासाठी फारच थोडे पैसे उरतात आणि पुन्हा संपूर्ण महिना डेबिट कार्डवर खरेदी करावी लागते.
‘अंथरूण मोठं करावे’ हे पटत असलं तरी प्रत्येकालाच योग्य मार्गाने अंथरूण मोठं करण शक्य होईलच अस नाही मग तो चुकीचा मार्ग अवलंबतो. स्पर्धा असते मित्रांसोबत, शेजारी आणि नातेवाईक यांच्या सोबत. हे ठीक आहे का? जीवघेणी स्पर्धा कशासाठी? हे अस उर फुटेस्तोवर धावून शरीरात व्याधी निर्माण झाल्या तर त्या पैसे खर्च करूनही बऱ्या होणार नाही. आयुष्य असेपर्यंत सोबत वागवाव्या लागतील हे तुम्हाला मान्य आहे का? बरं मित्रांशी किंवा नातेवाईकांशी स्पर्धा करून काय सिद्ध होईल? मित्रांनो सुविधा हव्यात यात शंकाच नाही पण त्याचा अतिरिक्त ताण सहन करत जगण हे काही जगणं आहे का? तुम्हीच ठरवा. याच कारण तुमच्या कुटुंबात नव्हे तुमच्या पर्सनल मॅटरमध्ये डोकावण्याचा तुमच्या वृद्ध आई बाबलाही हक्क नसतो मग त्रयस्थ व्यक्तीचे काय? जगण्यात समाधान आणि शांती नसेल तर त्या जगण्याला अर्थ आहे का? विचार करा? वेळीच सावध व्हा!
आता मोबाईलवर अनेक Online खेळ दिलेले असतात, प्रथम खेळणाऱ्या व्यक्तीला बक्षीस म्हणून काही पॉईंट दिले जातात आणि फुकट खेळून जिंकणार आहोत या मोहात पडून मुले,मुली खेळतात आणि आपल्या जवळचे पैसे घालवून बसतात. यासाठी काही मुले, आपल्या स्वतःच्या किंवा घरातील मौल्यवान वस्तू मित्र किंवा अन्य कोणाकडे गहाण ठेवतात,काही मुले चोरी करतात. तेव्हा झटपट पैसे मिळवून श्रीमंती बनण्याचा कोणताही शॉर्टकट्स हा आयुष्य संपवणारा असू शकतो. तेव्हा, ‘अती मोहापाई सर्व जाते लयाला’ हे लक्षात ठेवा. आयुष्य खूप सुंदर आहे पण ते कष्टाने, मेहनतीने, विवेक आणि सुविद्य बुध्दीने धन प्राप्त करून जगाल तरच लोकांच्या लक्षात राहिल.
अख्ख आयुष्य राबूनसध्दा कर्जाने घेतलल्या फ्लॅट चे हप्ते भरल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर फारसे काही उरत नाही मग, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांच्या संपत्तीत दर निवडणूक गणिक वाढ होते कशी? त्यांचे उत्पनाचे स्त्रोत कोणते? हे कधीच कळत नाही.
हल्लीच कधीतरी मी नाना पाटेकर यांचा व्हिडीओ पाहिला, कोणत्या तरी कार्यक्रमात आताचे कार्यरत तीनही मुख्यमंत्री होते. नानांची गाडी अचानक भ्रष्टाचाराकडे वळली आणि नाना, फडणवीस यांच्याकडे पहात म्हणाले, “मी जेवढे पैसे कमावतो त्या प्रमाणात कर भरतो. पण मला नेहमी प्रश्न पडतो की नगरसेवक ते आमदार किंवा खासदार निवडणुकीला उभे राहतांना आपली प्रॉपर्टी सादर करतात ते एवढे करोड कुठून आणतात? म्हणजे कोणता व्यवसाय करतात?पाच वर्षात त्यांची प्रॉपर्टी दुप्पट किंवा तिप्पट कशी होते? असा कोणता व्यवसाय आहे ज्यात एवढ्या वेगाने पैसे वाढतात? आणि मग इनकम टॅक्स वाले, तुम्हाला विचारत नाहीत का? की बाबा रे हे इतके उत्पन्न तुझे कसे वाढले? तुमच्यापैकी कोणीतरी याच उत्तर द्यावे.” शिंदे आणि दादा यांना उत्तर देण्याचा धीर झालाच नाही. फडणवीस यांनी थातुरमातुर उत्तर देत निभावून नेलं. पण प्रश्न तर उरतोच ना? की तुमच्या शेतात सोन्याची वांगी पिकतात का? ज्यामुळे सुळे ताई मालामाल झाल्या. सध्या राष्ट्रवादी पवार पक्षात असणारे खडसे नक्की किती कोटीचे खजूर पिकवतात? हा मंत्र ते उर्वरित जळगावकरवासीय मित्रांना का देत नाहीत?
महाराष्ट्रात एखादाच आमदार किंवा खासदार कदाचित असू शकेल की ज्याच्याकडे बंगला, गाडी नसेल. किंवा काही कोट रूपये बँक बँलन्स नसेल , अन्यथा प्रत्येक अगदी नगरसेवक पदावर काम केलेल्या पक्ष सदस्यांकडे किंवा पक्षाच्या शहरप्रमुख पदी काम करणाऱ्या पक्ष सदस्याकडे स्वतःची चांगली फोर व्हिलर आणि मोठा फ्लॅट असतोच असतो. ते इनकम टॅक्स रिटन भरतात की नाही त्यांना ठाऊक? हे इनकम टॅक्स अधिकारी, त्यांच्या उत्पनाचा स्रोत जाहीर करायला सांगतात का? त्याची छाननी होत असावी का? की त्यांनाही मॅनेज करता येते? म्हणजे जे सुख हे स्वतासाठी मिळवतात ते कोणाला तरी ओरबाडून मिळवलेल असते.
एक मात्र खरं की सत्तेवर असतांना सर्वोच्च पद असेल तर काहीही करता येत, जर तुमच्या विरोधात कुणी असेल तर त्याच्या विरोधात सीबीआय चौकशी लावता येते, तो शरण येत नाही तो पर्यंत इडीची टांगती तलवार त्याच्या मानेवर ठेवता येते. जर तुम्ही त्यांच्या सापळ्यात अडकला तर तुमची बाजू घ्यायला कोणीही येत नाही. हर्षवर्धन पाटील, विखे पाटील यांच्यासह आनंदराव अडसूळ,छगन भुजबळ, हिना गावित रवींद्र वायकर आणि दादा अर्थात अजित पवार आणि आता राजन साळवी यांनाही वेळ आली तेव्हा समर्पित व्हावे लागले. मुख्य म्हणजे ज्यांनी ठाकरे कुटुंबासोबत पंगा घेतला होता त्या राणे आणि भुजबळ यांना खराब वेळ आली तेव्हा नांगी टाकावी लागली.
जेव्हा ह्या ‘महान’ व्यक्ती संकटात होत्या तेव्हा त्यांना पक्ष वाचवू शकला नाही. ना कुणी मात्तबर मित्र मदतीला धावून आला. ‘शीते असतील तर भुते नेहमीच जमतात’, पण जेव्हा तुम्ही कोणत्याही कारणाने हतबल असता तेव्हा तुम्हाला सपोर्ट करणारं कोणीही नसत.अगदी घरूनही तुम्ही त्यांच्यासाठी केलेल्या कृत्याचा तुम्हालाच जाब विचारला जातो. अशा वेळेला ज्यांच्या पायाशी ईडी, सीबीआय, सीआयडी किंवा अन्य गुप्तचर विभाग तत्पर आहेत त्यांना शरण जावे लागते. कदाचित पुढील स्वार्थ लक्षात घेऊन तोच तुम्हाला वाचवू शकतो.
‘जिओ’ ची जाहिरात मी नेहमी पाहतो, ‘कर लो दुनिया मुठ्ठी मे’ ते कसे तर जिओ और जिने दो. महत्त्वाच्या पक्षाला जगवूनच जगता येईल हे सुत्र अंबानी, अदानी यांनी आत्मसात केल त्यामुळे त्यांच्या मुठीत अनंत व्यवसाय आले. एकच परिवार कपड्या पासून ते पेट्रोकेमीकल, इन्फ्रास्ट्रक्चर ते अवकाश वाहिन्या, रिटेलींग ते रिअँलीटी अशा प्रत्येक क्षेत्रात त्याच दिमाखात उभा राहतो त्याच कारणच यांना मुठ कधी उघडायची हे कळतं आणि कधी आवळून धरायची हे ही कळतं. आपण सुखात रहायच असेल तर ते सूख मिळवण्यासाठी अनेकांना स्वप्न दाखवत सुखी करण्यासाठी आभासी जगात तरंगत ठेवावे लागते १०रूपये मुळ किंमतीचा शेअर २९० रूपयांना तुमच्या गळ्यात घालतांना पुढील दोन वर्षात तो ४५० किंवा १२००पातळीवर असेल हे सांगण्याचा आत्मविश्वास तुमच्या मनात येणार नाही पण त्यांच्या मनात तो येतो.
अर्थात तुम्हाला सुखी करण्याच रसायन त्यांच्या कुपीत भरलेल आहे.पण दुर्दैवाने त्यात पडझड झाली तर समजायच आपल फेट, नशीब आपलाच शेअर का पडला? तेव्हा शाश्वत असे काही नाही, जेव्हा सुखी असाल तेव्हा आनंदी रहा आणि जेव्हा दुःख वाट्याला येईल तेव्हा परिस्थिती कधीही तशीच रहात नाही, रहाणार नाही म्हणून कार्यरत रहा. दुःखी राहून तसे ही हाती फारसे काही लागत नाही हे वास्तव स्विकारायला हवे हेच खरे. सुखाला वाटेकरी अनेक असतील पण कदाचित दुःखात तुम्ही एकटे असाल तेव्हा धिरोदात्तपणे सामोर जा. मित्रांना कळू दे तुम्ही संभाजीराजे सारख जगू शकता.
एक लक्षात ठेवाच, आयुष्यात जे सुख सहजच मिळते, ते सहजच दूर ही पळू शकते परंतु परिश्रमाने मिळवलेले सूख आणि त्याही पेक्षा समाधान चिरंतन असते चिरंजीवी राहते. तेव्हा आपल्या भोवती हौशेगौशे जमवतांना आणि चुकीच्या मार्गाने सुख मिळवतांना एक लक्षात ठेवा की तुमच्या पडत्या काळात मित्र तर सोडाच पण तुमची सावलीही तुमच्या सोबत नसेल.
वाह सर! खूपच सुंदर व विवेकपूर्ण लेख. नक्कीच विचार करायला लावणार 👌👌