स्त्री जन्मा ही तुझी कहाणी

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी

एक दिवस अभय कुत्रा कुत्रींचं झोंबाट पडवीच्या आडोशाला उभं राहून पहात होता एवढ्यात आजोबांनी ते पाहिले, “आरं ए पोरा इकडे ये, जा घरला, तुला गुरूजींनी अभ्यास दिलाय ना? कुत्र्यांच झोंबाट कशापायी बगतो? काय लाजबीज हाय का नाय?” तो कावराबावरा होत घरात गेला, त्याला माहिती होत आता आजा आईला गाऱ्हाण सांगणार, आई पाय फुटेस्तोवर मारणार. पण आश्चर्य म्हणजे आजा घरात आला पण एक अक्षर आईला बोलला नाही.
संध्याकाळी अभयने पर्वचा म्हटली,आजाच्या पाया पडला तस आजा म्हणाला,”ये पोरा, असल्या गोष्टी आजुबाजुला नियमित घडतात आपण ते न्हाय बघायचं. प्रत्येक सजीव जवळ येऊन आपली नवीन औलाद निर्माण करते. म्होरं या समद्या गोष्टी तुला कळतील, आता फकस्त अभ्यास करायचा, नको तिथ नाक न्हाय खुपसायचं, काय कळलं नव्ह?” त्याने मान होकारार्थी हलवली . आजा निघून जाताच तो हसला. “च्यायला आजोबा बी लपून छपून बघत होता की काय?”

अभयला कळायला लागलं तेव्हापासून घरी कुत्रे होते. ऐक तांबड्या रंगाचा तर दुसरा काळ्या रंगावर पांढरे पट्टे असणारा, या कुत्र्याची त्याला आवड होती. आजोबांनी शेती आणि घराची राखण व्हावी म्हणून कुत्र्यांची जोडी पाळली होती. त्यांची नावं अभयने “टॉमी” आणि “जिमी” अशी ठेवली होती. दर रविवारी अभय या कुत्र्यांना विहिरीवर नेवून साबणाने चोळून आंघोळ घालत असे. अभयच्या हातून पळण्याचा ते प्रयत्न करत पण बाजा काका अभयच्या मदतीला असे. ते त्याच सगळ्यात आवडत काम होतं.अंग कोरडं होई पर्यंत तो त्यांना टॉवेलने पुसत असे. आजीकडे दूध मागून त्यांना घालत असे. त्या कुत्र्यांचाही त्याच्यावर जीव होता. तो शाळेत जातांना दोन्ही कुत्रे त्याला ठराविक अंतरापर्यंत सोडायला यायचे. तो शाळेतून घरी आला की जोराने भुंकुन त्याच्या अंगावर उड्या मारत खेळायचे. त्याला पाहिले की जणू जिमी,टॉमीला आनंद व्हायचा. त्याची आणि कुत्र्यांची गट्टी जमली होती. तो कुत्र्यांबरोबर सतत खेळतो म्हणून आई त्याच्यावर रागावायची. अभयने कुत्र्यांना जवळ घेतले की त्याच्यावर डाफरायची. “अभय, ए पोरा ss, उठ आधी, दूर हो त्या कुत्र्यांपासून, खेळतांना नख लागलं तरी इंजेक्शन घ्यावं लागंल मग कळल! या कुत्र्यांसोबत तुलाव बांधाय पायजेल.” त्याच्यावर मात्र आईच्या बोलण्याचा काही परिणाम होत नव्हता.

कुत्र्यांना रात्री व्यतिरिक्त सहसा बांधले जात नसे. घराजवळ भटकी कुत्री, गाई, गुरे आलीच तर दोघे त्यांची पाठ घेऊन हाकलवून लावत. कधीतरी गाय आणि बैल किंवा म्हैस आणि रेडा यांच मिलन सुरू असल तरी दोन्ही कुत्रे त्यांच्यावर भुंकू लागत आणि मुल आपला खेळ सोडून ते पाहण्यात दंग असत. कधीकधी टॉमी,जिमी देखील तो खेळ खेळत. जर कोणी मोठ्या माणसांनी हटकल किंवा दगड मारला तर कुत्रे पळून जात. पण मुले मात्र या बाबत ती चोरून चर्चा करत. “आमचा रेडा लय माजोर हाये,आयला तेच्या, तुमची म्हस बगीटली की तिच्या पाठीवर चढल्या बीगर त्याच समाधान होईना!” दुसरा म्हणायचा, “आमचा गोरा बी लय जीगरबाज हाय एकदा गायची पाठ काडली तं चडल्या बीगर न्हायच सोडत.”, पोरांची अशी चर्चा सुरू असताना एकदा दोनदा अभयच्या आईने, शिवानीने ऐकलं होतं. “शी कसली भाषा, या पोरांनला काही लाज लज्जा हाय की नाय” ती स्वतःशीच बोलली. मुलांचे उपद्व्याप तिला माहिती होते म्हणूनच ती त्या मुलांमध्ये अभयला खेळण्यासाठी पाठवत नव्हती.

ग्रामीण भागात प्राण्यांच्या प्रणयक्रिडा नियमित सुरू असतात. पोर ते टक लावून बघतात पण मोठी माणसं इतकं गांभिर्याने घेत नाही. या गोष्टी त्यांच्या सरावाच्या असतात, उलट अमक्या एकाची गाय किंवा म्हैस तमक्याच्या काबऱ्या बैलाने फळवली किंवा अमक्याचा रेडा आज तमक्याच्या म्हशीला पावला अशी जाहीर चर्चा पारावर किंवा चावडीवर चालते. म्हशींचा मालक कॅलेंडरवर ती तारीख लिहून ठेवतो, पण शिवानीन मुलांची ही चर्चा ऐकली आणि तिला अभयची चिंता वाटू लागली. तिने एकदोन वेळा ही गोष्ट नवऱ्याच्या कानावर घातली तर तो म्हणाला, आयला आमच्या लहानपणी भाद्रपद महिन्यात रोज अस घडायचं किती कुत्रे एका कुत्रीपाठी फिरायचे, श्रावणात बैल बी गाईच्या पाठी सुसाट धावायचे पण आमाला लय वेगळ काय नाय वाटायचं.आम्ही बघत बसलो त आबा येऊन शिवी घालायचे, “घरला जा हीत काय बगताय? मग आम्ही धुम पळायचो.”

त्याच ते वाक्य ऐकून ती रागावली, “बापलेक एका माळेचे मणी, आबा सुद्धा राजरोस बाज्याला, ये भोकाच्या, आयघाल्या, शिंदळीच्या, अशा कोणत्याही शिव्या देतात. बाजा नोकर असला तरी त्यो बी माणूसच हाय नव्हं,
त्यांचा नातू आजुबाजुला फिरत असतो. म्हतारं झाला तरी बी लक्षात येत न्हाय वयं, उद्याच्याला नातुबी असल्याच वंगाळ शिव्या द्याला सुरू करंल, चालल का?” “अग, आबाचं कसल घेऊन बसलीस, म्हातारं हायेत ते, तु त्यास्नी वळण लावशीला का? अन बाजाच म्हणशीला तर त्यो आबांवर अज्याबात रागावत न्हाय,आबानी त्यो लहान होता तवा त्याला घरला आणला, लगीन लावून दिलं.त्याला सख्या पोरावानी करत्यात.” “म्हनुन कोण वाट्टंल त्या शिव्या देत का? तो पडला गरीब, त्याला आय ना बा , पर आबांच मला हे काय पटत न्हाय.”

“विषय अभयचा होता, तु तो आबावर न्हेऊन ठेवला,काय कारण हाय का? आबाच आबा बघून घेईल. तुला नस्त्या पंचायत्या नको.जा आपल्या कामाला लागा.” “मंग अभयने, देऊ देत का शिव्या, उद्या लोक तुमच्याकडे बोंबलत येतील तवा तुमचं डोळ उघडत्याल. मग मला म्हणु नका तुझं त्याच्यापाशी लक्ष न्हाय.”

एक दोन वेळा शिवानीने सासऱ्यांनाही हीच गोष्ट लक्षात आणून दिली.”आबा,तुमी अभयच्या म्होरं काय बाय बोलू नका, तो तुमचं शब्द बरोबर उचीलतो. आधीच बाहेरची पोर बी वंगाळ भाषा बोलत्यात,तुमी बी तसच बोललासा म्हंजे…” “बर बर, लय शाणपण शिकवू नको, तुझ पोरग इथे नव्हत. ते कसल बेणं हाय ते फकस्त मलाच ठाव हाये, पुन्यांनदा ध्यानात ठेवीन, जा डोस्क नको खाऊ.”

शिवानीने ते ऐकलं तेव्हाच तिच्या ते लक्षात आलं,या कार्ट्यानी काय उपद्व्याप केले म्हणूनशान आबा असं बोलले? अभयला विचारावं का कसं करावं? राहू दे झाकली मुठ सव्वा लाखाची,उद्या प्रश्न आलाच तं बगता येईल.तिच मन शांत झाल.

आमच धनगरवाडी गाव जंगलाजवळ असल्याने कधीतरी बिबटे गावातील भटक्या कुत्र्यांची शिकार करून घेऊन जात, आबा रात्री दोन्ही कुत्र्यांना एका खोलीत सुरक्षित ठेवत. बिबट्या कुत्र्यांच्या वासावर आले की दोन्ही कुत्रे घर डोक्यावर घेत. मग आबा बाहेर जाऊन बंदूकीचा बार काढत. अख्या गावाला कळत असे की गावात बिबट्या शिरला. गाव मग सावध होऊन आपली गुर वासर ठीक हैत ना दावणीला जाऊन बघत.

दोन्ही कुत्रे अभयचे जीव की प्राण होते. अभय चवथी पास झाला आणि आदर्शने त्याला पुढील शिक्षणासाठी पुण्याला न्यायचे ठरवले. त्याची पोलीस खात्यात बदलीची नोकरी होती, एकमेकांच्या संगतीने मुल बिघडतात म्हणून पोलीस क्वार्टरमध्ये रहायचं नाही अस आदर्श यांनी ठरवलं होतं. यासाठीच त्यांनी अद्यापही कुटुंब गावीच ठेवले होते. आणि इथे चवथी शिकणार पोरग नको त्या गोष्टींत रस घेत होता.

आदर्श अतिशय प्रामाणिकपणे नोकरी करत होता. पुणे आणि कोल्हापूर अशा दोन ठिकाणी घर खर्च करावा लागत असल्याने त्याला घर घेणे शक्य झाले नव्हते पण अभयच्या शिक्षणाचा विचार करता आणि त्याला काही चुकीच्या सवयी लागू नये म्हणून आता अभयला ग्रामीण भागातच ठेवणे शक्य नव्हते.

पुण्यात एप्रिल महिन्याच्या अखेरीस शाळेचे प्रोविजनल प्रवेश सुरू होतात. मुल मुलाखतीसाठी समोर हजर केल्या शिवाय शाळा प्रवेश देत नाही म्हणून आदर्श भोसले मुलाला न्यायला आपल्या गावी आले. आपल्या वडिलांकडे त्यांनी सांगितले, “आबा,म्होरल्या वर्षापासून अभयच्या शिक्षणासाठी त्याला पुण्यात न्याचं म्हंतो. हित तो पोरांबरोबर कायबाय बगतो त्याच्या मनावर विपरीत परिणाम होईल. हिथ शिक्षणाच काय बी खंर न्हाय, मास्तर कवा येतात कवा नसत्यात आन इंग्रजीची बोंबच हाये. हिथ राहिला त पुढच काय खंर न्हाय बगा.” ते ऐकून ते चिडले, “तुझा जनम बी याच घरातला का नाय? तु बिगडलास व्हय? मग अभय का म्हणून बिगडल?” त्याला योग्य उत्तर देता आले नाही.

“आबा! ,माझ्या येळेची परिस्थिती येगळी होती. आता अभ्यास लय येगळा हाय, इथं त्याची म्हणावी तशी प्रगती नाही व्हाची.” त्यांनी नाईलाजाने संमती दिली. ते म्हणाले “आरं ,जन्मापासून तो हिथच हाय की, त्याला आपली गाई, गुर, मांजरं आन त्याच्या कुत्र्यांची जोडी यांचा लळा लागलाया, त्यो त्यांच्याबिगर कसा ऱ्हाईल ?” “आबा कसला लळा म्हंता, तो त्या गुरांच लवंगाट लागलं का बघीत बसतो. आयशीला काय बी विचारतो, ती माझ्यावर कावली होती. म्हणती तुमच्या पोराचं काय खंर नाय, नको त्या उचपत्या करीत फिरतो, तिने काय उत्तर द्याचं”

“आर पण ती गोष्ट आमी बी बगीटली, तु बी बगत होता. आमी त्याला लय महत्त्व न्हाय दिलं. आमच्या लहानपणी आंडेल रेडा मस्ती कराय लागला का बा मानस बोलवून त्याला ठेचायचा तो बी माह्या नजरेसमोर. मग त्याची मस्ती कमी व्हायची, पर त्याला का ठेचतात? आमी कोणिलाबी न्हाय इचारल, आताची पोरच लय विचित्र, काय बी दिसल त धा प्रश्न विचारत्यात. दिसतयं त गपगुमान बगावं,नसत्या पंचायत्या कशाला? पण न्हाई. बगत्यात आणि उगाचच चर्चा करत्यात. सुनबाई काय सांगल पोराला?”

मुलाने समजुत काढली,”ओ आबा म्हणूनच मी म्हंतो, हिच येळ हाय, आपुन त्याला या दुनियादारी पासून दुर ठेऊ. हिथ अभ्यासाचा धड पत्या नाय आन नको ती लफडी बगीत बसत्योय. आता त्याला नेल नाय तर पूढे शाळेत प्रवेश मिळल का? जगण्यासाठी कुत्रेमांजर महत्त्वाची न्हाईत, शहरात नोकरीसाठी शिक्षण लागतया. जर आता पासून स्पर्धेत ऱ्हायला तर माझ्यासारख स्ट्रगल कराव न्हाय लागणार . मला त्याला आयपीएस बनवायच हाये.ते माझ सपान हाये. तो अधिकारी झाला तं बंगला, गाडी ,मानमरातब सगळ मिळल, न्हाय तं आमच्या सारखी प्रमोशनसाठी वाट पहात कुथामावं लागल.”

“ठिक हाय रे पोरा, तुझा निर्णय योग्यच म्हणायचा की ,तु म्हणतोस ते बी खरच हाय, तुझ्या मेहनतीने तु शिकलास, यानला ते बी शक्य व्हायच न्हाई, पर त्याची समजुत अदोगर काड, त्याच्यावर उगाचच डाफरत नग बसू , त्यो लहान हाय, त्याच्या वयाचा विचार कर.”

आदर्शने अभयला त्याला पुण्यात मोठ्या शाळेत शिकायला जायच आहे सांगितले तेव्हा त्याला प्रचंड आनंद झाला. नवीन शहर,मोठ्या शाळा, सुंदर युनिफॉर्म, शाळेची सॅक,शाळेत जायला बस, हे सगळ त्याने ऐकल,पाहिले होते. अभयने बाबांना विचारले, “आपण समदं तिथं जाणार तर मग आपल्या मांजरी,कुत्रे बी तिथे न्याचे का?”

“येडा हाईस का लेका ?आपण म्हणजे आई आणि तु , आजोबा आज्जी, हिथच थांबतील, ते आले तर आपल वावर कोण बगील ? आजोबा तुझ्या कुत्रे मांजराची काळजी घेतील की”

अभयला आपण पुण्यात आपले लाडके कुत्रे नेऊ शकणार नाही समजले तेव्हा तो खट्टू झाला. “कुत्रं नेणार नसाल तं मला बी न्हाय याचं , मला कुत्रं पायजेल म्हणजे पायजेल.” अभयने त्याची समजूत काढली,” आरं अभय, सध्या आपल्यापाशी सवताच घर नाही,एक दोन वर्षांनी आपलं सवताच घर घेटलं की आपणही छान डॉबरमॅन घेव,तो लय छान दिसतोय. शिकीवलं तर तुझं सगळं ऐकल बी. ह्या कुत्र्यांसारख कुठ बी हुंगत फिरत न्हाय, त्यो, त्यो आपल्या सोबतच -हातो.”

“पण आपल तिथ घर न्हाय म्हंता तर आपण कुठे
-हायाचं ?” “आपण भाड्याच्या घरात राहाय जाचं हाय, तथ घराबाहेर मोकळी जागा नसती, मग आपण कुत्रे कुठे ठेवणार, सांग बघू?” “पण मग माझ्या जीमी ,टॉमीच काय? ते मरून जातील की?” “न्हाय रं पिल्ला,तुजा आज्जा हितं हाय ना, त्यो त्यांची काळजी घेईल की.”, “पण दर ऐतवारी मी त्यांनला आंघोळ घालतो तशी आंघोळ आज्जा जीमी, टॉमीला घालतील का? त्यानला दूध देतील का?न्हायतं माझं कुत्रे मरून जात्याल की” “हे बघ अभय, येड्यागत कायतरी प्रश्न विचारू नग,आजोबा सगळ करल, आपल्या बाजा हाय त्यांची काळजी घ्याला.”

” मग दर मोठया सुट्टीला मला घरला आणाल ना? मला त्यांच्या शिवाय न्हाय करमणार , सांगा ना, याचं ना घरी? माझ्या शिवाय जिमी आणि टॉमी न्हाय -हाणार, माजी सवय हाय त्यानला” हे सांगताना त्याचा चेहरा पडला होता. आदर्श थोडा चिंतेत पडला. “आयला हे पोरग लय पागल निघालं, तिथ माणसाला जागा मिळना,यानला कुत्रे ठेवाय जागा पायजेल. कशी समजुत काडावी गड्याची? कोनास ठाऊक.” पण हळूहळू अभय तिथे मित्रांमध्ये रुळला, की सगळं विसरून जाईल याची त्याला खात्री होती.

दोन दिवसांनी त्यांनी निघण्याची तयारी केली तेव्हा आजी आजोबा खूप भावुक झाले, अभय कुत्र्यांना जवळ घेत खूप रडला. कुत्रे त्याला सोडायला तयार नव्हते,ना तो कुत्र्यांना दूर करायला तयार होता. शिवानीही मुलाची विभोर अवस्था पाहून रडली, “चल बाळा आपल्याला निघाय लय उशिर झाला तर बाबा कावलं, वेळेत पुण्यात पोचाय हवं. चल निघ, आपण पंधरा दिसांनी पुन्हा नक्की येऊ तेव्हा त्यांनला जवळ घे.” त्याने दोन्ही कुत्र्यांना जवळ घेऊन थोपटल,” हे बघ जीमी, मी आता शेरात शिकाय जातोय, आज्जा एकला हाये,म्हातारा झालाय, त्यांनला त्रास देव नको,शहाण्या माणसा सारख वाग.मी लवकरच परत येईन.”affiliate link

कुत्र्याला काय समजल ईश्वर जाणे पण तो त्याच्या पोटावर पुढचे पाय ठेऊन, त्याच्या तोंडाकडे पहात भुंकू लागला. बिचारे मुके जनावर पण माणसापेक्षा त्याला जास्त कळत असावे. आजोबाही भाऊक झाले त्यांनी अभयला पोटाशी धरले, “अभय लेका शेरात शहाण्यासारख वाग बर ,तिथं, बाबाचा मार खाऊ नको.” आजोबांनी दोन्ही कुत्रे बांधून ठेवले,मांजरीही ओसरीवर बसून मँव मँव करत होत्या,कोण गाढव म्हणत की प्राण्यांना भावना नसतात?

आदर्श, शिवानी आणि अभय निघाले. शिवानी सासूसासरे यांच्या पाया पडली. शिवानी तुळशीच्या पाया पडली. अभयही दोघांच्या पाया पडला. आजी तोंडावर पदर घेत रडत होती, “पोरा! माझ्या नातवाला मारूबीरु नको रं,त्याला समजून घे, लाडाचा आहे, थोडा हट्टी आहे पर पोर हुशार हाये.” ते निघणार हे सर्वांना कळल होतं,गोठ्यातून गाय आणि तिच सहा महिन्याच वासरू हंबरत होत. त्यांचा गडी बाज्या येऊन अभयच्या बाजूला उभा राहिला,”पोरा काकाची आठवण ठेव व्हय, लय मोठा हो, सायेब हो.” आदर्शने बाजाच्या हातावर शंभर रूपये ठेवले, “दादा, आबाची काळजी घे हो, बघ, जरा गुरा वासरांवर लक्ष ठेव.” कोणाचाच पाय निघत नव्हता पण जायचे होतेच.

त्यांच्या सोबत सर्व सामान सुमान होते म्हणून त्यांनी आरमडा गाडी ठरवली होती. सर्व सामान वरती नीट बांधल होत. ड्रायव्हर वाट पहात होता.आजोबांनी नातवाला जवळ घेतले,”अभय, पोरा हट्ट करुन बापाचा मार खाऊ नगस.” कुत्रे बांधून ठेवले होते. गाडी निघाली तसे भुंकून त्यांनी घराचे आवार डोक्यावर घेतले.जोरजोरात पायांनी माती उकरून टाकली. आजोबांना ते पहावेना पण आता अभयला थांबवण्यात अर्थ नव्हता.

अभय कोल्हापूरच्या ग्रामीण भागातून पुण्यात कोथरुडला रहायला गेला तिथेच त्याची आणि आदर्शची मुलाखत झाल्यावर एका सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळाला. हेड बाईंनी आदर्शला प्रश्न विचारून भंडावून सोडलं, “घरी सुशिक्षित किती जण आहेत? किती इयत्ता शिक्षण झालयं?आता याचा अभ्यास कोण घेत? पोलीस खात्या विषयी समाजाचं मत थोडं वाईट आहे, तुम्हाला काय वाटतं? प्रश्न संपत नव्हते. आदर्शच्या मनात आलं बाईंना सांगावं प्रवेश मुलाला हवा, मला नको पण तो गुपचूप राहिला. सिनियर ने चिठ्ठी दिली म्हणून फुकटात प्रवेश होत होता. अभयलाही विचारलं, “कोणाजवळ बसून तुला अभ्यास करायला आवडत? तुला शहर आवडत की गावं? गावी कोण असते? तुझी आई आणि आजी भांडतात का? कोणत्या विषयावर भांडतात? घरी जास्त काम कोण करत? आई की आज्जी?

आदर्श ते ऐकून वैतागला,घरी आल्यावर बायकोला म्हणाला, “आयला नोकरीच्या इंर्टव्हुला नव्हत इतके प्रश्न बाई विचारत होत्या. लय कटाळा आला होता, पर मरता क्या नही करता,शाळा सरकारी हाय,चांगली बी हाय. अभयचं कल्याण होईल.”

एका जुन्या इमारतीत तीन खोल्यांची जागा आदर्शला अकरा महिन्याच्या करारावर ओळखीने मिळाली. भाड होत तीन हजार रूपये. ते भाडही परवडणार नव्हते पण आता इलाज नव्हता. ही खोली शाळेपासून जवळ होती. इमारतीत गावाकडची दोन तीन कुटुंब होती. आगगाडीच्या डब्यासारख्या एका मागे एक तीन खोल्या होत्या. घरात नळ होता. सकाळी दोन तास पाणी यायचं. शिवानीला हे सर्व नवे होते. गावाकडून आणलेली भांडीकुंडी, शेतात पिकलेल कायबाय धान्य, बाजार तिने लावून घेतला. त्या रात्री ते बाहेर खानावळीत जेवायला गेले.

त्या खानावळीची मालकीण, मध्यम वयाची बाई होती. आदर्श त्या वयस्क बाईला म्हणाले, “आत्या माझी कारभारीण आणि पोरगं आणलया, मान्यांच्या ईमारतीत खोली घेटलीया, आता हिथच दोघ राहतील, पोरग टिळकांच्या शाळेत घालाचं हाय.” त्याने बायकोला खुणेनेच आत्याला नमस्कार करायला सांगितला, तस अभयही पाया पडला. “असू दे पोरी, पाया नग पडायला, माझ्या पोरीच्या वयाचीच हायेस तू. शेरात नवी हायेस, काय लागल सवरल त हाक दे, तुझा नवरा मला परका न्हाय.”

घरी परततांना आदर्शने त्या आत्याची कर्मकहाणी बायकोला ऐकवली.”आपल्याच तालुक्यातली हाय, नवरा इचलकरंजीत गिरणीत कामाला होता. तो दम्यान आजारी पडला न टीबी होऊन वारला. तो गेल्यानंतर तीने एकटीने संसार ओढला. मुलबाळ शिकवली. शहरात रहायच तर येईल त्याला तोंड द्याव लागत.” “अव पर,तिन गावाकडं जायच ना? गावी शेतभात असलच की, सासरची मानस तिला टाकून देत्याल व्हय? हिलाच शेराची गोडी असलं. म्हणून ही बया हिथ हट्ट करून -हायली असलं.” “ती नवरा नसतानाबी सवताचा संसार करते,पोरांच शिक्षण करते त्याच तुला कौतुक न्हाई ते न्हाईच वर असल वाईट बोलायचं, शिवानी हे बरं नव्हं”

ती पण भडकली,”तुमची ती सख्खी भैण हाय का आणखी कोणी? तिच्या साठी माझ्यावर दात ओठ काडाय काय झाल?” आदर्शच्या लक्षात आलं,बोलण्यात काही पॉईंट नाही, “जाऊ दे , तुला सांगून काय फायदा म्हणा.”

“सांगुन फायदा न्हाय नव्ह मंग म्या काय तुमच्या पाठी लागले होते का आत्याची स्टोरी मला सांगा म्हणून? जीव लावायचा तिथ न्हाय लावीत अन नको तिथ जीव उगाच घुटमळतो.” “अग ए,फुकणीचे, विषय न्हाय तिथ बोलू नको.पुन्यांनदा बोलली तर जीब हासडीन.”
बऱ्याच दिवसांनी आदर्शने शिवानीचा असा उल्लेख केला होता. ती तोंडाला पदर लावून रडू लागली, “याचसाठी शहरात आणलं होतं का?पुन्यांनदा बोललासा तर मी गावाकड निघून जाईन,तुमचा पोरगा,त्याच शिक्षाणं तुम्हाला लखलाभ.” शेवटी आदर्शलाच माघार घ्यावी लागली होती, “आत्याबाईला बोलायची तुला गरज होती का?माह्या मोठ्या भैणीसारखी हाय नव्हं, तु कसलाबी आरोप करशील तं ऐकून घेव काय?”

हळूहळू शिवानी शहराला सरावली, बाजार स्वतः करू लागली.आधी तिचा सातारी हेल ऐकून शेजाऱ्यांना गंम्मत वाटायची. तरी तीच बोलण बरच शहरी होत.हळूहळू आजू बाजूच्या शेजाऱ्यांशी तिची ओळख झाली.काम सरल की दुपारी गप्पांचा फड जमे. गावी घराजवळ अभयला मित्र नव्हते त्यामुळे बुजरा असल्या प्रमाणे घरातच बसून रहायचा. दोन तीन दिवसांनी शेजारची मुलं त्याला खेळायला बोलवायला आली. अभयच बोलण मोठं गमतीशीर होतं. सांग की, कर की,घे की,न्हाई की.मुलं त्याची कॉपी करायची. मग तो रागाने घरी जायचा.मुलांची तक्रार करायचा. “मी न्हाय जाणार खेळाय, आपण आपलं घरला जाऊ, समदी पोरं चिडीवतात. माझी नक्कल करतात.”

तिने समजुत घालून सांगितलं,अर आपण शुद्द बोलण्याचा परयत्न करायचा, कोणी पोटात शिकत व्हंय, चार एक दिसात तुला जमलं. तु त वाघाचा बच्चा हाईस, कोनचा? वाघाचा, वाघ कोणाला भितो काय? जा पोरा, अजाबात घाबराचं न्हाय, मी हाय नां” त्याची समजुत पटली त्याला त्या मुलांसोबत पाठवले. तो त्यांच्या सोबत गेला.त्यांच्या सोबत क्रिकेट खेळून संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांनी मित्रांची नावे सांगीतली. श्रीपती, रघुनाथ, सदाशिव, बबन, जयराम. मित्रांची नावं सांगताना थोडा आनंदी दिसला.टॉमी जीमी ची कधीमधी आठवण यायची तेवढीच पण आज्जा न आजीचं नाव गेल्या आठ दिसात काढलं नव्हतं. माणसाचं असच आहे.स्वतःला गुंतवून ठेवणारे नवे विषय नव्या व्यक्ती मिळाल्या की जुन्या आठवणी धुसर होत जातात.शिवानी लग्न करून आली तेव्हा अवघ्या एकोणीस वर्षांची होती पहिले काही दिवस आईची आठवण आली की रडत बसायची हळूहळू आदर्श जीवनात आला आणि आईच्या विरहाच दुःख कधी संपलं तिला कळलही नाही.


क्रमशः

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar