अडगळ

अडगळ

सध्या नवीन पिढी मॉल संस्कृतीत जगते. आठवडा-पंधरवड्यात मॉलला भेट दिली नाही तर तरुण तरुणींना चुकल्यासारखे वाटते. एकाच ठिकाणी संसारासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी मिळत असल्याने तेथून खरेदी करणे यात काही चूक नाही. मात्र मॉलमध्ये अनेक वस्तू आकर्षक पद्धतीत मांडलेल्या असतात, मग मॉल फिरताफिरता अनेक गोष्टी खुणावत जातात, त्यातील काही गोष्टींची घरासाठी उपयुक्तता आहे की नाही हे न पाहता खरेदी होते. सुट या शब्दाला भुलून आवश्यकतेपेक्षा जास्त खरेदी केली जाते.

कालांतराने त्यातील काही गोष्टी आपण कधीच वापरल्या नाहीत. भविष्यात त्या वापरू या विषयी खात्री देता येत नाही असे वाटू लागते. तर कधीकधी त्या पेक्षा सुधारीत, सुटसुटीत गोष्टी बाजारात आल्याने यापूर्वी खरेदी केलेल्या गोष्टी अडगळ ठरतात. मग भंगारात जातात. तेव्हा कोणतीही गोष्ट उपयुक्त असेल तरच जवळ बाळगली जाते. त्याची उपयुक्तता संपली की ती अडगळीत जाण्याची शक्यता अधिक किंवा तेथेही ठेवणे अशक्य वाटल्यास ती कचरा म्हणून दूर होण्याची शक्यता अधिक.

तुम्ही आज स्वतः घरात नजर टाका किंवा तुमचं कपाट आवरून पहा, घरात कितीतरी वस्तू आणि कपाटात कितीतरी कपडे असतील की ज्याचा आपण क्वचितच वापर केला असावा. एखादा ड्रेस आपण यापूर्वी कधी घातला होता किंवा एखादी वस्तू आपण यापूर्वी कधी वापरली होती ते मेंदूला ताण देऊनही आठवत नाही. घरात असणाऱ्या अशा असंख्य वस्तू कालांतराने अडगळ ठरून बाहेर पडतात. वस्तूवर खरेदीसाठी पैसे खर्च झाले असले तरी त्या आपण अडगळ ठरताच फेकून देऊ शकतो पण माणसांचे काय?

मित्रांनो आपली घरातील उपयुक्तता अशीच आहे. जोपर्यंत तुम्ही कमावते आहात, तुमच्याकडे पुरेसे पैसे धन किंवा संपत्ती, सत्ता, शक्ती, नावलौकीक असेल. घरात, समाजात तुम्हाला पत, प्रतिष्ठा, मानसन्मान असेल तोपर्यंत तुमचे स्थान अबाधित आहे. यातील एकही गोष्ट तुमच्याकडून कमी होत गेली की तुमची पत हळूहळू संपत जाईल. प्रतिष्ठा सरेल आणि तुमची घरातील आणि समाजासाठीची उपयुक्तता संपेल. तुम्ही चाणाक्ष नसलात तरी या गोष्टी तुमच्या सहज लक्षात येतील.

“उत्तम व्यवहारे जोडुनिया धन, उदास व्यवहारे वेच करी” रामदास स्वामी म्हणतात, किंवा “असतील शिते तर जमतील भुते.” आपण नेहमी म्हणतो, हे लक्षात घेऊन आपला व्यवहार किंवा घरातील वर्तणूक हवी. दिर्घकाळ कोणी केंद्रस्थानी नसतो. तेव्हा स्थान राजकारणात, समाजात असो की घरात. आपल्याला, स्वतःला नेतृत्व सोडून दूर होता आलं पाहिजे. स्वतः अलिप्त राहून दुसऱ्या पिढीला, व्यक्तीला नेतृत्व संधी देता आली पाहिजे.

घरातील गोडवा टिकवायचा असेल तर स्वतः समजून उमजून नेतृत्व बदल करता आला पाहिजे. संधी इतरांना देणे हेच कौटुंबिक कलह दूर करण्याचे साधन आहे. अधिकारशाही,जुलूम करून स्वतःचे स्थान टिकवता येईल पण सन्मान टिकवणे अशक्य. कुणासाठी आपण अडगळ होण्याआधी दूर जाणे, दूर राहणे फार फार गरजेचे आहे. मुख्य म्हणजे हातातून सत्ता गेल्यावर जसा त्रागा होतो, तो येथे अपेक्षित नाही. तेव्हा घरात खेळीमेळीचे वातावरण तयार व्हावे यासाठी अलिप्त राहण्याचे आव्हान स्वीकारू आणि कुणीतरी दिलेल्या संधीचे सोने करू.

आपण ठराविक वर्षांचे झाल्यानंतर स्वतः घरातील जाणतेपण आपल्या मुलाकडे डोळसपणे सोपवले पाहिजे, अर्थात काही दिवस किंवा महिने ‘जागल्याची ‘ भूमिका आपल्याला वठवावी लागणारच पण होता होईल तो अलिप्त राहून त्याला प्रोत्साहन दिले तर तो ती जबाबदारी हळूहळू उचलेल आणि आपल्याला स्वतःचा क्वालिटी टाईम मिळेल. ज्यात आपली राहिलेली आवड जोपासणे, मित्रांशी हितगुज करणे, काही समाजपयोगी काम करणे यासाठी आपण वेळ देऊ शकू आणि आपली घरातील अतिरिक्त लुडबूड थांबवू शकू. तुम्ही विचारालच की हे अस कधीपासून वाटू लागले?

त्याच काय झालं, काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे पाय मोकळे करायला घरा बाहेर पडलो, मी सध्या राहतो तिथून थोडया अंतरावर भंगरवाल्याचे दुकान आहे. भंगार गोळा करताना जी चारचाकी ढकलगाडी घेऊन ते फिरतात तशी गाडी दुकानाबाहेर उभी होती, त्याच्यावर दोन तीन लाकडी ट्रॉफी ठेवल्या होत्या. कधी काळी त्या सन्मानाने लेकुरवाळ्या घराच्या हॉलमधील शोकेसमध्ये दर्शनी भागात मिरवत असाव्यात, आता घरातील व्यक्तीच्या मनातून त्याची उपयुक्तता संपली. त्या ट्रॉफीपेक्षा अतिमहत्त्वाचे काही तरी त्या घरात आले असावे.

कदाचित त्या ट्रॉफीशी भावनिक संबंध असणारी व्यक्ती त्या घरातून कायमची परदेशी किंवा अनंताच्या प्रवासाला गेली असावी. साहजिकच त्यांचे त्या घरातील वास्तव्य संपले असावे. ते पाहताच मनात उदासी आली. प्रत्येक घरातील व्यक्तीचीही एक उपयुक्तता असते, एक किंमत असते. ती कालपरत्वे बदलते. त्या व्यक्तीला आपले मूल्य बदलत आहे हे लक्षातही येते. जेव्हा तो स्वतः कमावता असतो, सत्ताकेंद्र त्याच्याकडे असते तेव्हा प्रत्येकजण त्याच्या भोवती फिरत असतो. हळूहळू त्याचे किंवा तिचे स्थान घरातील आणखी कुणी मिळवतो आणि पाहता पाहता तो अडगळीत पडतो. प्रत्येक घरात कमी अधिक प्रमाणात असेच असते. कधीतरी त्याने सुवर्णयुग पाहिलेले असते पण काळ सरकरतो तसे हळूहळू त्याची सद्दी संपते. प्रत्येकाच्या जीवनात पौर्णिमा येते तशी अमवास्याही येते.

आमच्या मसुरकरीण आज्जीच्या बाबतीत तसच घडले. आमची ती सख्खी आजी वगेरे कोणी नाही पण, काही हासभास नसताना गावावरून फोन आला, की मसुरकर आज्जी वारली. ते ऐकून फार वाईट वाटलं, तिच्या पाठीमागचा इतिहास डोळ्यासमोर आला. मसुरकरीण आमच्या घराकडे दोन पिढ्या काम करत होती, आता तशीही ती वयाने थकली होती, भात लावणीला आणि भात कापण्यासाठी ती अट्टाहासाने यायची, भात साधारण ऑक्टोबर मध्ये पिकायचे तेव्हा दहा वाजता कडक उन पडायचे, आपण मुंबईत त्याला ऑक्टोबर हिट म्हणतो.

“गे आज्जे व्हयत्या निंबरात तू कित्याक म्हणान मरमरतं, निवात घराकडे बसान न्हानग्याक बघलस तरी माका खूप मदत जाईत, हय पळत्या निंबरात तिरमिरी आली तर तुका खय घेवन जाव? डॉक्टर रवलो भंडारवाडीत, त्याका निरोप देऊक हय हां कोण?” श्रध्दा वहिनी तिला म्हणाली. मसुरकरणीने दुर्लक्ष केलं. भात कापता कापता ती कोपऱ्यात बसली.पंच्याहत्तर पुढेच तिच वयं असावे. तस हाडापेराने ती दणकट होती. पूर्ण आयुष्य शेतात काम करण्यात गेले होते.

गावी जुन्या लोकांच्या जन्मटिपणाचा किंवा तारीखेचा फारसा पत्ताच नव्हता, तिला त्याबद्दल विचारल तर सांगायची, “माझा लगीन झाला ते वर्षा आमच्या देशाचा आणि खयल्यातरी देशाबरोबर युध्द झालेला माका आठवता, आमचो सासरो रात्री बत्ती लाऊक देय ना, सांजेक लवकर पेजपाणी खाऊन आमी निजाक जावं, सदी आमी खळ्यात निजू पण ते वर्षाक घरातच मुटकूळी वळून निजाची पाळी इली. घरात लाईट, ना पंखो, लय उकडाक जाय. आमच्या ह्यांका त्या गरमीतव मरणासारी निज लागा.”

मग तिच्या त्या कथेतून बहुतेक तिच लग्न १९६२ किंवा १९६५ मधल असावे असा आम्ही अंदाज बांधू त्यावरून तिच्या जन्माचे वर्ष काढण्यासाठी अंदाजाने आणखी पंधरा सोळा वर्ष पाठी जावे लागे. कारण तेव्हा बहुतांश लग्न पंधरा सोळा फार तर अठराव्या वर्षी होत असतं. तर अशी ही मसुरकर आज्जी. तेव्हा अंदाजे ७५ ते ७८ वर्षांची होती. तिने म्हणे माझ्या पत्नीच्या जन्माच्यावेळी सुयीणपण केले होते म्हणून लोक माझ्या पत्नीला, ती मसुरकरणीची असं म्हणत.

नक्की ती आमच्या सासरी किती वर्षे शेतीच किंवा इतर काम करत होती ते मला किंवा माझ्या पत्नीला माहिती नाही, पण माझ्या पत्नीच्या लहानपणी ती आमच्या घरची शेताची तर कामे करायचीच पण उन्हाळ्यात मिरची भाजून देणे, कुळीथ भरडून पिठी दळून देणे, खापरात काजी भाजून फोडायला मदत करणे, तांदूळ आसडून कणी कोंडा वेगळा करणे. तांदळाची कणी दळून भाकरीसाठी पिठ दळून देणे, खळे सारवणे,झड बांधण्यासाठी चुडते वळून देणे अशी बहुतेक सर्व कामात मदत करायची.

आमच्या घरी तिला वर्षभर काम असायचे. तिला मजूरी देण्यासाठी सासूकडे नेहमीच हाती पैसे नसायचे मग कुडूभर तांदूळ किंवा नड असेल तेव्हा ती मागायची पण पैसे नाही दिले तर मी कामाला येत नाही अस ती कधीच म्हणाली नाही. तिचे पती मील कामगार होते. कधीकाळी ती ठाण्यात रहात होती. ते देवाघरी गेले तेव्हा मोठ्या मुलाचे लग्न झाले होते, तो मुंबईत वडिलांनी घेतलेल्या जागेत रहात होता. लहान मुलगा गावीच होता. दिराच्या मदतीने स्वतः शेती करत असल्याने तिला तांदळाची फारशी गरज लागत नव्हती. कालांतराने लहान मुलगाही नोकरीच्या शोधात मुंबईत निघून गेला .

मुले नोकरीच्या निमित्ताने ठाण्यात, मुंबईत गेली पण म्हातारी गावीच राहिली. कधीतरी मुलं जबरदस्तीने तिला मुंबईला घेऊन जातं पण महिनाभरात ती पुन्हा गावी येई, याचे कारण मुंबईत अवघ्या दिड खोलीत तिचा जिव घुसमटून जाई. तिला तंबाखूची मशेरी लागे, तिथे तंबाखू भाजला की शेजा-यांना ठसका लागे, ते तक्रार करत आणि तिला तर तंबाखू मशेरी लावल्या शिवाय दिवसाचा कार्यक्रम सुरू होत नसे. मुंबईत राहिली की चलन नसल्याने तिच्या अंगाला सूज येई. त्या शिवाय तिथे शरीराला काम नसल्याने स्थूलपणा येई, तोंड सुजल्यासारखे दिसू लागे. ती म्हणे, “हय मराक झाला तर खांदो देऊक कोणी येवचो नाय, त्यापेक्षा आपला घराकडे गेलला बरां.” कालांतराने तिच्या मुलांची परिस्थिती सुधारली, नातू मोठ्या पदावर पोचले, मोठी घरे घेतली, गाड्या घेतल्या तिची बडदास्त ठेवली तरीही मुंबईत ती टिकेना.

आमच्याकडे काम नसलं तर ती आजुबाजुच्या शेजाऱ्यांकडे जाई पण जे स्वातंत्र्य तिला आमच्याकडे मिळे ते इतर कोणाकडे मिळत नसे त्यामुळे ती बामणांची आज्जी म्हणून गावात प्रसिद्ध होती. लहानपणी आमच्या मुलांनाही ती आमची सख्खी आज्जीच असल्याचे वाटे. आमच्याकडून किंवा इतर वेळेस मिळालेल्या मजूरीच्या पैशांचे ती काय करत असावे हे कोडं आम्हाला होते. कधीतरी तिने तिच्या पानसुपारीच्या पिशवीतून बँकेचे पासबुक काढून मला दाखवले, “रे झिला ह्याच्यावर किती रुपये शिल्लक हतं बघ, काल बाळगो शिक झाल्याचा पत्र इलाहा, त्याका मनिऑर्डर करूक व्हयी.” मी पासबुक पाहिले, त्यावर बारा हजार सातशे रुपये तेव्हा शिल्लक होते. एव्हडे तर तेव्हा माझ्या बचत खात्यावर पण नव्हते. तिने माझ्याकडून मुलासाठी दोन हजार रुपयांचा मनिऑर्डर फॉर्म भरून घेतला. शहरातील मुले गावी आपल्या आई वडिलांसाठी मनिऑर्डर करतात. इथे गंगा उलटी होती, एक वृद्ध आई आपल्या कष्टाचे पैसे आजारी मुलासाठी गावावरून मुंबईत पाठवत होती. यालाच म्हणतात आईची माया.

हे दुर्मिळ दृष्य पाहून पोस्टमास्टर सद्गदित झाला असावा. तर अशी ही मुलांसाठी आपली पुंजी खर्च करणारी आई आणि माझ्या मुलांची मानलेली आज्जी. आजी फारच म्हातारी झाली तसे तिचे आमच्या घरी येणे कमी झाले. तिच्या घरापासून आमचे घर मैलभर होते. न जाणो वाटेत पडायची आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावर कोणी जाग घ्यायला नव्हते.

मुंबईत मुलं घेऊन जायला तयार होती पण तिचे अगदीच गावंढळ राहणे आणि त्यांच्या घरी येणारे पै पाहुणे यामुळे थोडं अवघड परिस्थिती होती. काही महिने तिचे शेजारी तिची काळजी घेत पण हळूहळू तिची अवस्था अवघड बनली. घरी एकटीने राहणे अवघड होते. मुलगा रिटायर झाला होता, पण त्याला गावी फारसे करमत नव्हते, शिवाय त्याला स्वतः ला आजारपण असल्याने तातडीने डॉक्टर लागला तर गावी मिळणे अवघड होते. म्हातारी मुबंईत अँडजस्ट होईना. शेवटी मुलांनी आणि नातवंडानी तिला आश्रमात ठेवायचा निर्णय घेतला. आम्हाला खूप वाईटही वाटले पण त्यांचा नाईलाज असावा, कारण आता ती घरातील शोभेची किंवा कामाची वस्तू नव्हती तर मुले आणि त्याची हाय सोसयटीमधली संस्कृती यासाठी अडचण होती. वापरात नसणाऱ्या वस्तू लोक माळ्यावर किंवा अडगळीच्या खोलीत फेकून देतात.

मोठा मुलगा आमच्याकडे येऊनही गेला, त्याने आपली बाजू मांडली, “आईला मुंबईला नेलं तर तिथे तिला जमत नाही. दर तासाभराने तंबाखू खाते, त्याचेही ठिक आहे पण घरात बसत नाही, उगाचच शेजारच्या घरी जायला बघते. ते लोक चांगले आहेत पण मुंबईत वेळेला महत्त्व. प्रत्येक जण आपल्या कामात असतो. आमची आई तिथे गेली की फार पेर्वीच्या जुन्या गोष्टी ऐकवत बसते. त्यांना त्या गोष्टीत रस नसतो. आमच्या ते लक्षात येते. तिला काही सांगायला गेलं तर आमच्याशी भांडते.” म्हणते,” ती लोका माझ्या वांगडा बरी बोलततं, तुमकाच स्वतः चा मोठेपण, म्हणून माका धाडणास नाय.” “आईची समजूत कशी घालायची?” इथे राहिली तर आता तिच कोणाशी पटत नाही. त्या मोठ्या घरात एकटी रहायला बघते. कुठे धडपडली तर लोक म्हणतील मुलांना आई जड झाली. करायच तर काय करू? मुलंच म्हणाली नाईलाज आहे,आईला इथेच वृद्धाश्रमात ठेऊ. इथले नातलग येतील जातील. इथल वातावरण तिला आवडेल. म्हणून आम्ही तिला पावशीला ठेवली. महिना बारा हजार घेतात पण वृद्धाश्रम चांगला स्वच्छ आहे.

त्याची बाजू ऐकली, मनात आलं भविष्यात कोणाच्या वाट्याला काय वाढून ठेवलंय आपल्याला तरी कुठे माहिती? कुणाची बाजू आणि का म्हणून घ्यावी? पण जी कुटुंब शहरात राहायला गेली, त्यांची पुढची पिढी ही परिस्थितीमुळे सुधारित आवृत्ती बनते यात शंका नाही. त्यांच्या मनात भावनेला फार मोठे स्थान नाही. गरज आणि तत्कालीन परिस्थिती मोठी. त्यानी गरजेपोटी घेतलेली प्रत्येक वस्तू त्या घरात किती काळ टिकेल किंवा किती काळ सांभाळून ठेवली जाईल, ठेवता येईल, सांगणे अशक्य.

नवीन पिढी आपल्या शिक्षणासाठी संस्था बदलतात, विकास व्हावा म्हणून नोकरी बदलतात, स्वभाव जुळले नाही तर आपला जोडीदार बदलतात. स्थाई हा शब्द त्यांच्यासाठी नाही. स्थाई या शब्दात विकासाला जागा नाही. आज एखाद्या मित्रमैत्रीणीवर प्रेम केले तर ते किती काळ टिकेल हे त्यांना स्वतःला माहिती नाही. कदाचित हीच गोष्ट त्यांच्या घरातील सदस्यांबाबत असेल. इथे प्राथमिकता आणि गरज मोठी ठरते. आपला इथे व्हावा तसा विकास होत नाही हे लक्षात आलं तर ते भावनिक न होता येथील संबंध संपवून दुसरीकडे जायला मोकळे असतात .

मग या परिस्थितीत आज्जीची पत्रास ती काय? त्यांच्या कुटुंबात कधीतरी तिचं स्थान होत आज नाही that’s it, nothing more. जी तरुण मुले परदेशात सेटल झाली आहेत त्यांना त्यांची आज्जीआजोबा इतकेच काय पण जन्मदाते गेले, तरी येथे येणे परवडणारे नाही, एक व्हिडिओ कॉल करून मृत व्यक्तीचे तिथून दर्शन घेतले तरी त्यांना पुरते. फार तर तिच्या अंतविधीसाठी किंवा पुढील क्रियेसाठी शंभर पाचशे डॉलर पाठवले की ते रिलॅक्स होतात. यापेक्षा भावनेत अडकणे त्यांना शक्य नसते.

गच्च भरलेलं कपड्यांचे कपाट खाली करावे इतक्या लीलया लोक आपल्या मनातील नको ते विचार,नको ती नाती पुसून टाकतात. कपाटात आणि मनात अडगळ ठेवली तर नवीन कपडे, वस्तू किंवा नवीन विचार स्विकारता येत नाहीत. आजच्या घडीचे हे सत्य त्यांनी स्विकारले आहे.

तशी मसुरकर आज्जी कुटुंबाची अडगळच झाली. म्हणूनच ती वृद्धाश्रम नावाच्या पेटीत फेकली गेली. नाही म्हणायला नात्या गोत्यातील कुणीतरी पंधरा दिवसांनी किंवा महिन्या दोन महिन्यांनी तिला पहायला जाऊन येई . भेटून येणारा म्हणे, “म्हातारीत काय रवला नाय, घराकडे एकली होती, तेवातरी खाल्ल्या पिल्यावरी वाटा, थय पोटाक काय घालतत का नाय अशी तरा हा।”

त्या परिस्थितीत ती दोन अडीच वर्षे त्या वृद्धाआश्रमात होती. एक दिवस श्रद्धा वहिनी तिला भेटायला गेली तर म्हातारी म्हणू लागली, “गे बाय माका घराकडे घेऊन चल, आणिक आठ दिवस गेले त हयच मरतलयं, मगे तुमका दिसाचयं नाय, हयं माझे हाल अजिबात नाय, खाऊन निंदण्याऱ्यातली मी न्हय, सकाळी नाष्ट्याक उपमो, फाव, शिरो , बटाटे वडे काय माय घालतत, दोन पावटी चाय देतत, पण हयं करमणा नाय, सारखो जिवाक घोर लागल्यावरी वाटता.

चार दिवसांपूर्वी कोणीतरी सांगत आले की मसुरकर आज्जी गेली. मी दीर्घ उसासा सोडला. एक अडगळ कमी झाली. त्या जागी कदाचित दुसऱ्या कुणाच्या अडगळीची सोय व्हावी म्हणून मसूरकर आज्जी निघून गेली. मित्रानो मनातही अशीच अडगळ असेल तर नवीन गोष्टी सुचणार नाहीत. म्हणून दुसऱ्या विषयी मत्सर, द्वेष, असूया बाळगू नये. मनातील जळमटे स्वच्छ करावी म्हणजे, आपली कुणाला अडगळ वाटणार नाही.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar