अवलिया

अवलिया

आज तो सेवानिवृत्त जीवन आनंदात जगत आहे. त्याचेच तसे म्हणणे आहे. तो म्हणतो ते खरे मानावे की त्याचा आनंद हा फक्त जगाला दाखवण्यापुरता हे एक कोडेच आहे. म्हटलं तर तो मनमौजी, आज आपल्या सोबत असला तरी तो उद्या कोठे असेल? हे सांगणे अवघड, उद्याचे नियोजन करणे त्याच्या तत्वात नाही, याचे कारण, नियोजन केलेल्या गोष्टी घडतील याच्यावर त्याचा कधी विश्वास नव्हता, आजही नाही. विठू नेईल तेथे जावे, तो देईल ते खावे आणि त्याचेच गोडवे गावे इतक साध जीवन तो जगतो. वरकरणी तसे दिसते.

कोणत्याही गोष्टीचा अट्टाहास नाही की कोणाबद्दल राग नाही. प्रत्येक जण आपल्या प्राक्तनाप्रमाणे जगतो, वागतो, सूखदुःख भोगतो असं त्याच आवडत विधान आहे. त्याच्या दिनक्रमात पांडुरंग आणि पांडुरंगच आहे. तो स्वतःला नामस्मरणात गुंतवून घेतो अस म्हटलं तर वावग ठरू नये.

घडणाऱ्या गोष्टींबाबत शंका न घेता तो वाटचाल करत राहतो. चालता चालता मार्ग सापडत जातो, नवीन समज येत जाते.” येथे मी कशासाठी आलो? ते भगवंताने ठरवले आहे. तो कार्य करून घेण्यास समर्थ आहे आणि मी फक्त माध्यम आहे.” हा विश्वास मनात असल्याने संकटाचे दुःख किंवा भिती वाटत नाही असे तो म्हणतो. सुखाची किंमत कळावी, नामाची आठवण व्हावी म्हणून परमेश्वर दुःख निर्माण करतो. दुःखातही नाम घेत राहीले तर तोच त्या संकटातून मार्ग काढून देतो, पाठी नव्हे सोबतच असतो, हा त्यांचा विश्वास आहे. जर मनात कोणताही गंड नसेल आणि इश्वरावर श्रद्धा असेल तर येणारे सूख, दुःख हे ऋतुचक्रासारखेच आहे असे त्याला वाटते.

बालपणी आपण खूप मस्तीखोर होतो, अभ्यासापेक्षा मुलांसोबत खेळणे, मस्ती करणे ,कुठेही फिरायला जाणे यातच वेळ दौडणे, घरी वेळेवर न परतल्याने वडील देतील ती शिक्षा निमूट भोगणे असे बरेचदा घडे असे तो सांगतो. अनेकदा रात्री उशिरा आल्याने झाकून ठेवलेले थंडगार जेवण आणि घराबाहेर झोपण्याची शिक्षा भोगावी लागल्याची आठवण तो सांगतो. आईवडीलांच्या धाकात असल्याने तिला मुलाविषयी कितीही प्रेम असले तरी वडीलांच्या विरोधात जाऊन ती निर्णय घेऊ शकत नव्हती. शिस्त लावण्याच्या नादात मुलगा-वडील नात्यातील जिव्हाळा करपून गेला असेल त्याला वाटते. कोणाचे बरोबर होते? कोणाचे चुकत होते? याचा विचार करण्याची वेळ निघून गेली. भुतकाळात डोकावून आठवणी काढून कुढण्यात भविष्यकाळ नासवू नये.

बाळासाहेब ठाकरेंच्या सभांना जाणे, मोर्चात सामील होणे या गोष्टी आनंदच्या अंगवळणी पडल्या होत्या, तरूण रक्त असल्याने काहीतरी करायची खुमखुमी होती त्यामुळे शिवसेनेच्या युवा शाखेत जाऊन पडेल ते काम केले, भाईगीरी केली, राडाही केला असल्याची त्याची आठवण आहे. अभ्यासाचा ताण घ्यायचा नाही अशी वृत्ती असल्याने पोटभर बोलणे खाल्ले आणि सतत हेटाळणी ऐकून तेव्हाच मन निबर झाल्याचे तो सांगतो. आज विचार करताना आपलेच कुठेतरी चुकले त्यामुळे वाट्याला उपहास आल्याची त्याची आठवणी अतिशय ताजी आणि संवेदनशील आहे. पण तरीही घडलेल्या गोष्टींचा मनस्ताप तो करून घेत नाही. येईल त्या परिसरातीशी जुळवून घेणे त्याने स्विकारले आहे.

वडीलांनी शैक्षणिक साहित्य दिले मात्र पिकनिकला पैसे किंवा चांगले कपडे, बुट वा इतर ऐषारामाच्या गोष्टी कधीच मिळाल्या नाहीत. अतिशय साधे जीवन वाट्याला आल्याने, तेच अंगवळणी पडले. डेपो मॅनेजर किंवा डेपो ऑडिटर झाल्यानंतरही साधेपणा सोडता आला नाही. ढुंगणाखाली खात्याची गाडी नसेल तेव्हा बेस्ट ने प्रवास केला. ग्रँज्युएशन पूर्ण झाल्यावर शाखेचा निष्ठावंत सैनिक या ओळखीतून बेस्ट मध्ये चंचूप्रवेश झाल्याची तो कबुली देतो . नोकरी लागल्याचा आनंद घरी झाला, आईने देवाकडे साखर ठेवली मात्र वडील या नोकरीवर फार खुश नसावेत असे तेव्हा वाटल्याची त्यांची आठवण आहे. पगार घरात देऊ लागल्यावर बोलणी थोडी कमी झाल्याचे त्याला जाणवले. अर्थात तरीही उशिरापर्यंत बाहेर थांबणे, शाखेत जाणे आणि मित्रांत रमणे सुरूच होते. त्याबद्दल प्रत्यक्ष शिक्षा त्यानंतर कधीच झाली नाही तरी बोलणी खाणे चुकत नव्हते.

वडील अतिशय गंभीर स्वभावाचे असल्याने घरात थट्टामस्करीला जागा नसे. वडीलांची नोकरी महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागात असल्याने ते घरातही तोच नियम आणि तेच आचरण पाळत त्यामुळे चार भावंडे असूनही घरात एकमेकांच्या खोड्या काढणे, जोक मारणे, पत्ते खेळणे असले उद्योग करता आले नाही. वडीलांच्या स्वभावामुळे मनात प्रचंड कोंडी होती. त्याला वेळोवेळी होणारी शिक्षा पाहून वडिलांच्या आज्ञेत राहणे इतर भावंडांनी निमूटपणे स्विकारले. माझ्यातली बंडखोरी मात्र त्यामुळे जास्त उफाळून बाहेर आली असे त्याला वाटते.

ते पूर्वी रहात होते त्या मनपा क्वार्टर चाळीच्या खाली अनेक व्यवसाय होते. त्या चाळीच्या आवारात अनेकजणांनी पथरी पसरली होती. दर महिन्याच्या एकादशीला येथील मुले वडाळा येथील प्रती पंढरपूरला पायी चालत जात असत. त्यांच्या सोबत तो जात असे . विठू नामाचा गजर आणि टाळ याने मंत्रमुग्ध व्हायला होई. खरे तर या वारीत भक्तीपेक्षा मित्रांसोबत उंडगण्यात त्याला आरंभी रस होता पण हळूहळू त्यांच्या मनात या भक्तीचा संचार होऊ लागला. विठू नामाची झिंग मनावर चढली.

आरंभी बेस्टमध्ये लिपिक म्हणून काम सुरू केले पण मेहनत आणि मेंटर लोकांचे आशीर्वाद यामुळे पाहता पाहता तो असिस्टंट डेपो मॅनेजर झाला. मॅनेजर झाला, डेपोचे ऑडिट करू लागला हा अतर्क्य प्रवास केवळ पांडुरंग कृपेने घडला अन्यथा आपली तेवढी लायकी नव्हती असे त्याला आजही त्याला वाटते.

अर्थात जे काम त्यांच्यावर सोपवले गेले ते त्यांनी चोखपणे पाळले. पैशांचा मोह कधी नव्हता, गरजेपेक्षा जास्त नोकरीने दिले होते. कंपनीचे भलेमोठे निवासस्थान ३२ वर्ष मिळाल्याने मुंबईत स्वतःचे घर असावे असा आग्रह नव्हता. अर्थात, ‘मुंबईत घर घेण्याचा विचार केला नाही ही माझ्या आयुष्यातील फार मोठी चूक होती असे आज नक्कीच वाटते.’ असे तो कबूल करतो.

एक दिवस एक ड्युटी ड्रायव्हर सुट्टी मागायला केबिनमध्ये आला, “साहेब उद्या मी ड्युटीवर नाही, मला वारीला आळंदीला जायचे आहे,” तो म्हणाला मी तुला अशी अचानक सुट्टी देऊ शकत नाही. माझ्याकडे पर्यायी ड्रायव्हर उपलब्ध नाही .” ड्रायव्हर म्हणाला, “साहेब आज पर्यंत मी ड्यूटीसाठी कधी नकार दिलाय का? पण आज ते काय बी मला सांगू नगा, ह्या गाडीच्या चाव्या, तुम्ही माझी रजा मान्य करा, वा करू नका, हा, मी निघालो.” ते त्याच्या तोंडाकडे आश्चर्याने पाहत राहिले. त्याला नको जाऊ, कारवाई होईल असे म्हणावे हे त्यांना सुचले नाही. तिसऱ्या दिवशी तो प्रसाद घेऊन कार्यालयात हजर झाला. मुख्य म्हणजे, हा त्याच्यावर ना रागावला ना त्यांनी त्याची खरडपट्टी काढली. असे का घडले? तो म्हणतो, आळंदीला जाऊन तो परतला तेव्हा त्याचा प्रफुल्ल चेहरा पाहून त्याच्या चेहऱ्यावर मला पांडुरंग दिसला आणि मी त्याच्यावर रागवायचे विसरून गेलो.

त्यानंतर, तो ड्रायव्हर अनेकदा ड्यूटी अँडजेस्ट करून जात होता, प्रसाद आणत होता आणि त्याचा डेपो मॅनेजर भक्तीभावाने प्रसाद खात होता. आजही त्याला कोडे आहे, की तो त्या ड्रायव्हर वरती का रागावत नव्हता? त्या ड्रायव्हर ने त्याच्यावर काय मोहिनी घातली होती? त्यालाच कळत नव्हते. बहुधा पांडुरंग तसे वागायला त्याला भाग पाडत असावा असा त्याचा समज आहे.

त्याचा लग्नाचा किस्सा रोचक आहे, सिनेमात शोभावी अशी ती कथा होऊ शकेल. कार्यालयात जाण्यासाठी तो नियमित बेस्ट ने प्रवास करत असे, हा प्रवास त्यांना विनामूल्य होता. या प्रवासात त्या दोघांची नजरा नजर झाली. ती त्याच मार्गाने नियमित प्रवास करत होती. दिसायला सुंदर होती, बोलका आणि स्पष्ट स्वभाव त्याला आवडला आणि दोस्ती जमली प्रेम जुळले. ती एका मोठ्या रुग्णालयात स्टाफ नर्स होती अर्थात ती नर्स आहे हे प्रेम मुरल्यावर कळले. नेहमीच्या प्रवासात आधी नजरेला आणि नंतर त्याच्या संवादाला हळूहळू ती प्रतिसाद देऊ लागली. त्यानी एकमेकांना भेटायचे ठरवले आणि मनमोकळ्या गप्पा झाल्या. ती दिसायला आकर्षक आणि सुंदर तर होतीच पण स्वभावही चांगला होता त्यामुळे तीचे नर्स असणे प्रेमाच्या आड आले नाही. त्याच्या घरात मात्र तोच तर विरोधाचा मुद्दा होता.

प्रवासात ते एकमेकांचा निरोप घेऊन उतरू लागले. प्रासंगिक भेटू लागले, फिरू लागले . दोघानी आपल्या घरातील परिस्थिती आणि संभाव्य कल्पना त्यांनी एकमेकांना दिली. तो ब्राह्मण तर ती सिकेपी तिच्या घरी अजून एक बहीण आणि आईबाबा तर याच्या घरी त्याच्यापेक्षा लहान दोन भाऊ एक बहीण आणि गंभीर प्रकृतीचे वडील आणि सतत त्यांच्या दबावाखाली वावरणारी आई. खरे तर आई सुशिक्षित, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असुनही त्या घरात मोकळे विचार मांडण्याची बंदी असावी असेच वातावरण होते.

तिच्या घरात मात्र वातावरण तसे मोकळे होते,दोन्ही मुलींना पूर्ण स्वातंत्र्य होते. जेव्हा मोठ्या मुलीने आपण जोडीदार निवडल्याचे घरी कळवले तेव्हा वडील थोडे धास्तवले कारण ती थोडी चंचल मनाची होती, त्यामुळे तिच्या निर्णयामुळे तिचे आयुष्य धोक्यात येऊ नये, तो निर्णय घेण्यापूर्वी तीने घरात चर्चा करायला हवी होती इतकेच त्यांचे म्हणणे होते. पण त्यांची आपल्या होणाऱ्या जावयाशी भेट झाली आणि मनमोकळ्या गप्पा झाल्या तेव्हा त्यांनी तिला सहमती दर्शवली.

तीने मात्र लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या आईची भेट घेण्याची इच्छा आनंदकडे दर्शवूनही त्याने या भेटीला नकारच दिला कारण तिचा जॉब, तेव्हा नर्स या नोकरीला प्रतिष्ठा नव्हती. वडील घरी असले तर तिचा पाण उताराच होण्याची शक्यता अधिक होती. त्याने आपल्या प्रेम प्रकरणाबाबत आईला सांगितले तेव्हा ती म्हणाली, “मी हा विषय दादांकडे काढू शकत नाही. तु बोलणार असल्यास माझी हरकत नाही. पण दादा या लग्नाला सहज मान्यता देणे अशक्य, त्यामुळे घराबाहेर काढले तर लग्नानंतर तुम्ही कुठे राहणार? ते आधी ठरावा.”

त्यांनी आपल्या लहान भावंडाना विश्वासात घेऊन आपला निर्णय सांगितला, तेव्हा तिघांनी त्याला विरोधच केला कारण तिन्ही भावंडाना ह्या लग्नास वडीलांची संमती मिळणे अशक्यप्राय वाटत होतेच, पण हे लग्न झालेच तर घरातील वातावरण कसे पेटून उठेल ते ठाऊक होते. पण घरातील घुसमट कोणी तरी संपवणे गरजेचे होते आणि ती जबाबदारी त्याने उचलली.त्याच्या आनंदाच्या समीधा घालून त्याने शांतीचा होम पेटवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

प्रेम आंधळे असते, आता पर्यंत तिचा जॉब आणि त्यामुळे येणारा अडथळा याचा दोघानीही विचार केलाच नव्हता, जेव्हा त्यानी आपल्या घरून लग्नाला मान्यता मिळणार नाही ही गोष्ट तिला सांगितली तेव्हा ती ही घाबरली. पुढे काय, तो आता अर्ध्यावरून साथ सोडणार तर नाही ना? ही शंका तिच्या मनात वारंवार येऊ लागली. मात्र त्याने तिला तो त्याच्या निर्णयावर ठाम आहे, त्यासाठी तो घर सोडले पण कितीही संकट आले तरी तो माघार घेणार नाही हे तिला त्याने सांगितले तेव्हा ती सावरली. त्याने आपली अडचण मित्राला सांगितली आणि त्याच्या मध्यस्थीने कशीबशी दहिसर येथे त्यांना डिपॉझिटवर रूम मिळाली. ती गिरगावात राहत असल्याने दहिसर ते चर्नीरोड प्रवास अडचणीचा होता पण त्याला पर्याय नव्हता.

संसार म्हणजे काय? त्याची पुरती जाणीव नसतांना आणि त्यासाठी पुरेसे पैसे वा साधने नसतांना ते लग्न करण्याच्या विचारांवर ठाम होते. तिच्या बाबांनी त्याच्या वडिलांना भेटून त्या गोष्टीसाठी होकार मिळवण्याचा प्रयत्न करण्यास काय हरकत? असा सरळ प्रश्न मांडला. पण आनंदनी त्यांना वस्तुस्थिती सांगितली. शेवटी त्यांनी आपला हट्ट सोडून मुलीच्या निर्णयात मदत करण्याचे ठरवले.

इतक्या टोकाच्या परिस्थितीतही एकमेकांच्या सहवासात ते फुलले, त्याची परिणीती, त्यांनी कोर्ट मॅरेज केले.आपल्या पत्नीला घेऊन आईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी तो घरी आला. कदाचित आई एकटी घरी असती तर तिने तिची ओटी भरली असती,सौभाग्य कुंकू लावून तिचे स्वागत केले असते पण जर तर ला अर्थ नसतो.

केवळ बाहेर तमाशा नको म्हणून दादांनी त्याला घरात घेऊन त्याची खरडपट्टी काढली. त्याची पत्नी अरुणा पाया पडू लागताच ते दूर झाले, त्यांनी पत्नीच्याही पाया पडू दिले नाही. एवढा अपमान सहन केल्यानंतर त्याला तिथे राहण्यात स्वारस्य नव्हते. त्यांनी प्रेम करून लग्न केल्याची शिक्षा त्यांना मिळाली. घर सोडावे लागले. अर्थात कायमचे घर सुटले, डिपॉझिटवर खोली घेऊन ते राहू लागले. ती रुग्ण सेवा करत होती आणि त्यात काही चुकीचे नव्हते पण समाज काय म्हणेल? या खोट्या प्रतिष्ठेपायी त्यांनी मुलाला आणि सुनेला नाकारले. त्यानंतर तो वडील घरी नसतांना आई आणि भावंडाना भेटून जात असे, मदत करत असे आणि त्यावरून घरी भांडणे होत.

संसार थाटला आणि काही वर्ष तो संसारात छान रमला. पत्नीला तो शक्य ती सर्व मदत करत असे. दोघांचे एकमेकांवर नितांत प्रेम होते. वेळ मिळेल तसे दोघे फिरायला जातं. तिला शिफ्ट ड्युटी होती त्यामुळे त्याला तिच्याकडून जेवण शिकावे लागले. पण ती घरी नसली तर बरेचदा वडापाव खाऊन तो राहात असे. पूढील चार वर्षात त्यांना दोन गोंडस मुले झाली, त्याच्यावरची जबाबदारी वाढली. आता त्याला तिच्या शिफ्ट ड्युटीनुसार स्वतःची शिफ्ट ऍडजस्ट करावी लागे त्यासाठी साहेबांची मनधरणी करावी लागे. घरी असला की तो मुलांच्या बालक्रीडात घरात रमून जाई. काही वर्षे भाऊबहिण यांच्या बद्दल तो आत्मियतेने चौकशी करत असे. त्यांचेही दोनाचे चार हात झाले तशी त्यांची भेट प्रासंगिक होत होती. शक्य तो कोणाच्या संसारात आणि व्यवहारात दखल द्यायची नाही हे त्यांनी जाणीवपूर्वक जपले होते. आईसाठी मात्र तो काही करायला तयार असे.

दरम्यानच्या काळात मुलांच्या नशिबाने त्याची भरभराट झाली. पांडुरंगाने कृपा केली, त्याचे चोख काम आणि थोडी ओळख आणि शाखेची प्रामाणिक सेवा यामुळे नोकरीत दोन वेळा बढती मिळाली, मुंबईत कफ परेड सारख्या ठिकाणी कंपनीचा खूप मोठा फ्लॅट मिळाला, जा ये करायला गाडी मिळाली. अरुणाला आकाश दोन बोटावर असल्याचा भास झाला, सूख म्हणजे नक्की काय? ते भरभरून उपभोगता आले.

मुलांची शाळेतील प्रगती द्रुष्ट लागण्यासारखी होती. त्यांचा अभ्यास अरूणाच घ्यायची त्यामुळे तो सुखाच्या लाटेवर तरंगत होता. चमचमीत खाणे, फिरणे याची त्याला आवडही होती. मुलांचा वाढदिवस किंवा काही कार्यक्रम असेल तर भावंडे कधीतरी त्याच्या फ्लॅटवर येत असत गप्पा टप्पा होत, पण अजूनही वडीलांचा राग मात्र निवळला नव्हता. दादा हयात असे पर्यंत आई कधीही त्याच्या घरी रहायला आली नाही ना ते दोघे आईकडे गेले. लग्नानंतर काही काळ तो शिवसेना शाखेतही जात नव्हता पण तो शिवसेनेचे मेळावे, जाहीर सभा यासाठी आवर्जून हजर रहात असे. मुलं गिरगावात आर्यन हायस्कूलमध्ये शिकत होती पण तो शाळेतील पालक सभेला एकदाही गेल्याचे त्याच्या आठवणीत नाही. तो ते प्रामाणिकपणे कबूल करतो.मुलांच्या अभ्यासातही तो फारसे डोके घालत नसे.

घरी सुबत्ता होती त्यामुळे जीवन आनंदी होते. कामाचा ताण असला तरी त्रास नव्हता. मुले असली तरी कुटुंबात गुंतवून घेण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. पक्षाचे काम त्याच्यासाठी महत्त्वाचे होते. वयाच्या ३८ व्या वर्षी एका घटनेमुळे तो संसारातून हळूहळू बाहेर पडला आणि अध्यात्म्याकडे वळला.

त्या वर्षी कार्तिक एकादशीला ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधी सोहळ्याच्या आदल्या दिवशी त्याच्या डेपोतील ड्रायव्हरने त्याला गळ घालून आळंदी येथे दर्शनासाठी नेले. रात्रीच्या उशिराच्या बसने ते निघाले आणि आळंदीत सकाळी पोचले. तेथेच आवश्यक ते कपडे खरेदी करून त्यांनी इंद्रायणीत स्नान केले. चहा घेऊन ते दर्शनासाठी निघाले. खरे तर तोवर ड्रायव्हरने तेथील अजाण वृक्षाबाबत त्याला जी माहिती सांगितली त्यावर त्याचा काडीमात्र विश्वास नव्हता केवळ जिज्ञासा म्हणून तो त्या कार्तिक शुद्ध एकादशीला हजर होता. समाधी स्थळी प्रचंड गर्दी होती. पाय ठेवायलाही जागा नव्हती. त्याच्या ड्रायव्हर ने खूप मेहनतीने त्याला तेथे नेले. तेथे पोचेपर्यंत अकरासाडेअकरा वाजले, कपडे चुरगळले, तो घामाघूम झाला. लघुशंकेची भावना झाली पण आत पोचल्यावर परत माघारी फिरायला, बाहेर निघायलाही जागा नव्हती.

लोक समाधीवर डोक टेकवून आणि त्या पवित्र वृक्षाला फेऱ्या मारून त्या दिवसाची अलौकिक घटना पाहायला खोळंबळे होते, आपली जागा पकडून बसले होते. त्याला लघुशंकेने बेजार केले होते पण मनातील तो समाधी सोहळा आणि माऊलीच स्वर्ग निर्गमन पाहायला तो उत्सुक होता. जवळपास चार तास तो अधून मधून पिंपळ वृक्षाच्या शेंड्याकडे पाहत होता आणि मनात झक मारली, इथे उगाचच आल्याचा खेद व्यक्त करत होता. तो आणि त्याचा ड्रायव्हर यांच्यात बेट लागली होती, जर त्याला अभिप्रेत असणारी घटना तो पाहू शकला नाही तर त्याच्या ड्रायव्हरने स्वतः नोकरीचा राजीनामा द्यायचा.

एकाच जागी उभे राहून पायात पेटके येत होते, पण त्याच्याच सारखे अनेक भक्त पिंपळाच्या शेंड्यावर लक्ष ठेऊन होते त्यामुळे त्याची उत्सुकता कमी झाली नव्हती अचानक पिंपळाचा शेंडा थरारला, त्याच्या अंगावरचे रोमांच उभे राहीले अंगातून विज चमकून गेली. त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना, त्याने डोळे चोळले पुन्हा तेच दृष्य. क्षणभर वाटले भ्रम असावा पण माऊलीच्या नामाचा गजर सुरू झाला.

त्याच्या ड्रायव्हरने त्याला हलवले,” साहेब पाहिलंत का? शेंडा हलतो आहे पहा, दिसतेय ना?” ” कुठे हलतोय? मला नाही हलताना दिसत, तो चक्क खोटं बोलला, पण आसमंतात गजर सुरू होता, ‘माऊली, माऊली, ज्ञानेश्वर माऊली’ , आवाज टिपेला पोचला तस तो भानावर आला. त्याच्या शरीरात चैतन्य प्रवेश झाल्याची जाणीव त्याला होत होती. तिथे आल्याचे सार्थक झाल्याचे त्याला जाणवले. त्यानी मनातून ज्ञानेश्वर माऊलींना दंडवत घातला. तो तेथील वातावरणात झपाटला गेला होता. थोड्या वेळाने गर्दी मोकळी होताच तो लघुशंकेला जाऊन आला. एवढा वेळ तो शरीरधर्म कसा रोखू शकला? हे कोडेच होते. तो किती वेळ तेथे पद्मासनात बसला त्यालाच कळत नव्हते. भुक लागली तसा तो उठला. मठाबाहेर महाप्रसाद वाटप सुरु होते. त्याने रांगेतून महाप्रसाद घेतला.

बराच उशीर झाला होता,आता पुन्हा मुंबईत परतायचे होते. चालत चालत हायवे जवळ आले. एकही वाहन थांबत नव्हते. इतक्यात त्याच्या ड्रायव्हरला दूर एक एसटी दिसली. ते धावतच जवळ पोचले तो समजले एसटी बंद पडली होती. नुकतीच दुरूस्त झाली. कंडक्टरने विचारले, “पावणं कुणीकडे जायचंय?” त्याने, ‘पुणे’ सांगताच, तो बसा म्हणाला.ते पुण्यात पोचले तेथून त्यांना बाराची बस मिळाली, तीन साडेतीनला मुंबईत हजर झाले. तो म्हणतो विठुरायानेच आमच्या परतण्याची सोय केली. सकाळी ऑफिसला वेळेवर हजर झाला, त्यानी आळंदीचा प्रसाद त्याच्या जीएम ला दिला. जीएम ने स्वतः सुट्टी नाकारली होती. पण तो दुसऱ्या दिवशी त्यांच्या समोर हजर होता. मुख्य म्हणजे जीएम त्याला त्याबद्दल रागवला नव्हता.

ज्या दिवशी तो दर्शन सोहळा पाहिला, त्याच दिवशी पांडुरंगाचा झाला. विषय आसक्ती सरली,भोग संपला. कोणताही दिवस न पाहता मांसमटण खाणारा तो, पण चमत्कार घडावा तसे घडले. त्या दिवसापासून त्याने मांसाहार सोडला. पत्नीला वाटले नवऱ्याला नवीन झटका आला, त्या शिवाय हे दुसरे टोक गाठणे शक्य नव्हते. त्या वर्षी पहिल्यांदा कार्तिकी वारी केली आणि त्यानंतर अव्याहत दोन्ही वारीत जात राहिला. अडचणी येत राहिल्या,मार्ग मिळत गेला.

तो म्हणतो आता ना कुटुंबाची आसक्ती ना संसाराची विरक्ती, मी घरी असेन तोवर मी घरातील माझ्या माणसांच्या कर्तव्याला बांधील आहे, मी घरातही नामानिराळा जगू शकतो, जोवर कुणी मला काही सांगत नाही, मी कोणत्याच प्रश्नांत स्वतः लक्ष घालत नाही पण कोणी माझ्यावर जबाबदारी दिली तर मी नाकारत नाही. दुसऱ्या व्यक्तीच्या प्रश्नात नाक किंवा डोके घालून वाईटपणा येण्यापेक्षा जो मागेल त्यालाच करावी मदत हे त्याचे तत्त्व तो सांगतो. तो पत्नी किंवा मुलांना कोणताही सल्ला देत नाही वा काही भल्याचे सांगत नाही. भावंडांची उगाचच काळजी करत नाही. त्यांच्या संसारात दखल देत नाही. त्यांनी मदतीस बोलावले तर वेळ असल्यास तो जातो मात्र आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये याची तो काळजी घेतो. त्याच्या माऊलीच्या नामस्मरणात तो व्यस्त असतो.

त्याने गळ्यात वारकरी माळ घातली आणि मांसाहार सोडल्याचे घरी सांगितले. त्याच्यासाठी नियमित काहीतरी शाकाहारी व्यवस्था करावी लागत होती. मग कुटुंबात कधीतरी वाद झडू लागले. त्याच्यासाठी अरूणाने दरवेळी शाकाहारी करावं काय? पण त्याचा फार मोठा परिणाम त्याने स्वतःवर होऊ दिला नाही. त्याने पत्नी आणि मुलांच्या आहारावर बंधन आणलघ नाही ना ते मांसाहार करतात म्हणून त्रागा केला. पण त्यामुळे घरात तट पडले ते पडलेच.

यापूर्वी त्याच्या नोकरी आणि पक्षातील कामामुळे तो मुलांना वेळ देऊ शकत नव्हता. मुलांना आईचाच सहवास जास्त मिळाला साहजिकच त्यांनाही आईचाच लळा लागला. त्यांनी आपले मत मुलांवर लादले नाही, मुलांनी आपल्या इच्छेने शिक्षण घेतले, नोकरी मिळवली साहजिकच त्याची मुलांमधील गुंतवणूक नगण्यच. आता ती स्वतः कमावती असल्याने त्यांचे स्वतःचे पाहण्यास समर्थ. यामुळे तो घरात असला तरी त्यांच्या मनात नसतो. तो फक्त विठू नामात असतो अस त्याचं स्वतःच म्हणणं.

कुटुंबात राहून आणि डेपो मॅनेजर सारख्या व्यस्त पदावर राहून नामस्मरण करता येते का? संसारातून अलिप्त राहता येते का? तो म्हणतो, ‘मी राहतो. मला हवे तेव्हा मी घरा बाहेर पडतो, मला रुचेल त्या मंदिरात जाऊन मी ध्यानात बसतो. मन शांत होईपर्यंत थांबतो. उगाचच बायकोच्या किंवा मुलांच्या प्रश्नांत नाक खूपसुन त्यांची गैरसोय करणे मला आवडत नाही. मी त्यांचे प्रश्न सोडवत नाही तर मी त्यांच्या समोर नवीन प्रश्न निर्माण करू नये याची जाण मला आहे. त्यांच्या आवडी निवडीवर मी बोलावे त्यांनी त्या बाबत काही प्रतिक्रिया द्यावी यापेक्षा अलिप्त राहणे कधीही चांगले असे परखड मत तो मांडतो.’

तो मुंबईत असेल तेव्हा सकाळी तो आपले आन्हिक आटोपून मंदिरात जातो, दर्शन घेऊन तेथे नामस्मरण करतो. दुपारी वृद्ध आईची सेवा करतो, तिच्याशी गप्पा मारतो. संध्याकाळी उशिराने घरी आला की पत्नी स्वयंपाक करत असेल तर तिला मदतही करतो, अन्यथा मोबाईल वरील येणारे मेसेज किंवा व्हिडिओ पाहण्यात वेळ घालवतो. रात्रीचे जेवण झाले की नाम घेत शतपावली आणि नंतर निद्रेची आराधना करत पडून राहतो.

त्याच्या कुटुंबात अडचणी आल्या,पत्नीला मोठे आजारपण आले, त्यातून ती बरी झाली मात्र औषधे कायमची मागे लागली. तो म्हणतो आपल्या संचितानुसार सुख दुःख मिळते, त्याला ती व्यक्ती स्वतः जबाबदार असते. त्यामुळे त्याचा दोष कोणी कुणाला देऊ नये. त्याचे हे ज्ञान सामान्य माणसाच्या पचनी पडत नाही. त्याला स्वतःला आरोग्य अडचणी आहेतच पण त्याचा ताण तो घेत नाही. ‘जे घडते ते पांडुरंग कृपेने घडते, माझ्या आजारपणाच्या आड पांडुरंगाचा काही संकेत असावा.’ त्याचे हे विधान ऐकून आपण अवाक होतो.
खरेच एवढे अलिप्तपणे वागता येते का?

प्रापंचिक प्रश्नांपासून दूर पळता येते का? घरात अडचणी असतांना, त्या अडचणींपासून मुक्त राहता येते का? घरातील जबाबदाऱ्या नाकारुन मन स्थिर आणि आनंदी ठेवणे शक्य आहे का? मनात येणाऱ्या प्रापंचिक अडचणींचा मनाला त्रास करून न घेता जगणे शक्य आहे का? माझ्या डोक्यात असे अनेक प्रश्न तरंगत आहेत, मी त्याची स्वतः उत्तरे शोधतांना थकून जातो पण त्याला हे प्रश्न थेट विचारण्याचा मला अधिकार नाही.

त्याला निसर्ग, भ्रमंती आणि भक्ती मित्रांपेक्षा जवळची वाटते, तो गावी असेल तेव्हा घराच्या व्हरांड्यात किंवा गच्चीवर खुर्ची टाकून किलबिल करणारे पक्षी पाहतो, डोंगरा आडून उगवणारा सुर्य, गवताच्या पात्यावर जमलेला दव आणि त्यावर चमकणारी किरणे त्याचे ते सप्तरंग, हिरवळीवर पडणारी प्रभा पाहतो. आकाशात तरंगत सुसाट वेगाने जाणारे परतीचे ढग पाहतो. या वैविध्याबद्दल ईश्वराचे आभार मानतो.

कपभर चहा आणि निरीक्षण याने तो सुखावतो. शांतता त्याला भावते, कोकण त्याला मनस्वी आवडते, तो ठराविक मित्रांमध्ये रमतो, त्या मित्रांच्या मदतीसाठी धावून जातो. ते मित्रही त्याला आपला खरा सखा मानतात. वारीत तो इतरांसोबत मांडी घालून पिठल भाकरी खातो. अन्नाची विशेष अशी त्याला गरज नाही. अगदी पेज किंवा भाकरी मिळाली तरी तो आनंद मानून खातो. कोणत्याही गोष्टींचा अट्टाहास नाही, आग्रह नाही. तो डोळे मिटून निवांत ध्यान लाऊ शकतो. त्यांच्या भजनात रममाण होतो आणि चिंतनात वेळ घालवतो.

आपण मोठ्या पदावरून सेवानिवृत्त झाल्याचा गर्व नाही. मी पांडुरंगाचा आहे, त्यावर माझा भार सोपवून मी मुक्त झालो आहे. मी कोणाच्या बंधनात नाही, शब्दांत नाही,प्रेमात नाही आणि राग लोभातही नाही. माझी विचारपूस कोणी केली नाही तरी वाईट वाटत नाही आणि मी ही विनाकारण कुणाच्या जीवनात दखल देत नाही. कुटुंबापासून दूर असला तरी मुद्दाम फोन करून सतत खुशाली घेणे त्याला पटत नाही. इतके अलिप्त जगता येते यावर माझा तरी विश्वास नाही. तो खरच आपल्या जवळच्या लोकांपासून अलिप्त राहू शकतो की हे त्याचे ओढून ताणून नाटक आहे हे कळतही नाही.

हे अवलीयापण त्याचे त्याला लखलाभ, कुटुंबाला गरज असतांना कौटुंबिक विरक्ती आणि पांडुरंग भक्ती याची सांगड मला तरी चुकीची वाटते. जो पांडुरंग अठरा युगे विटेवर उभा राहून भक्तांना उभारी देतो, भक्तांची दुःख दूर करतो तो अशाही एखाद्या व्यक्तीला निराकार बनवतो हेच अदभुत आहे. असे का? ची उत्तरे शोधणे खरच अवघड आहे. त्याच्या वागण्याचा अर्थ न लावणे यातच शहाणपण असावे कारण तो अतर्क्य आहे. म्हणून मला तो अवलिया वाटतो.

Mangesh Kocharekar

Mangesh Kocharekar